अहंकाराची बाधा

अहंकाराची बाधा

‘अहं ब्रह्मस्मि”, म्हणावं की न म्हणावं, मी मध्ये अहंकार आहे म्हणून ‘मी’ म्हणणं पण वर्ज करायचा तर मग स्वतःची ओळख कशी करून द्यायची हा प्रश्न आहेच? गीतेतील श्रीहरी ‘मी’, तो कर्ता करविता आहे. तो तुमची इच्छा असल्यास तुमच्या कृतीतून सगूण साकार होतो. तो सर्व व्यापी आहे. तो कमल दला प्रमाणे अलिप्त आहे, अविनाशी आहे. म्हणूनच हरीला ‘मी’ शोभतो. तुम्हा आम्हाला नाही. ‘मी’ केले म्हणताना तुमच्या कृतीमागे करून घेणारा कुणी अन्य आहे याची जाणीव तर मनात हवी तरच ‘मी’ ला अलिप्त ठेवूनही कर्म करणे साध्य होईल. केलेली प्रत्येक कृती ही त्याच्या चरणी अर्पण केली तर भावनेचे संभ्रम दूर होतील. त्या कृतीने निर्माण होणारे फळ हे ही त्याच्या नावावरच असेल मग त्याला अर्पण केले म्हणण्यातील गर्व डोकावणार नाही.

आपल्या प्रत्येक कृतीत ‘मी’ असतोच, किंबहुना मी शिवाय आपण वेगळ काही बोलत नाही, खरं तर मी शिवाय काही शक्यच नाही कारण कर्म करवून घेणारा भगवंत असला तरी माध्यम तर हवेच हे माध्यम कधी सजीव असते तर कधी निर्जिव. ज्या प्राण्यांना बुध्दी आहे तेच सकारात्मक किंवा विघातक काम करू शकतात. बुध्दी कशी आणि कुठे वापरायची? हा प्रश्न माणसागणीक बदलतो पण ‘मी’ तर असणारच. तरीही ‘मी’ बद्दल अध्यात्म सांगणाऱ्या लोकांना मी ची अढी का? कळत नाही.

माझ्या जवळून घडलेल्या चुकीचं खापर मी ईश्वरावर का फोडावे? बर ह्या चुकीच्या गोष्टी माझ्या नकळत किंवा अनावधानाने घडल्या असाव्या असच म्हणता येणार नाही. प्रत्येक कृतीतही आपला काही स्वार्थ दडलेला असताना मी कृष्णार्पणास्तू कस म्हणू शकतो? कृष्ण किंवा कोणताही देव मला चोरीमारी शिकवत नाही की खोटं बोलायला सांगत नाही. माझ्या वागण्याबद्दल देवाला जबाबदार धरणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा असतांना मी सोयीस्करपणे निर्णय घेतो आणि त्याच खापर त्या नियंत्यावर फोडतो.

ज्या गोष्टीत मला कोणतीही प्राप्ती होणार नसेल तिथे मी फिरकत नाही किंवा त्या गोष्टीत मी रस घेत नाही पण ज्या गोष्टीत तात्काळ फायदा असेल किंवा भविष्यात फायदा होण्याची शक्यता असेल तिथे ‘मी’ आवर्जून पोचतो, त्यासाठी जीवाचे रान करतो यातून काय दिसते? लाभाचे क्षेत्र मला ओळखता येत, अशा गोष्टीतच मला रस असतो जिथे माझा वर्तमान आणि भविष्य याची हमी किंवा शाश्वती असते.

आपण पदावर असतांना किंवा अधिकार पदी असतांना स्वतःला खूप महान समजू लागतो आपल्याला हेच कळत नाही की काही ठराविक काळासाठी आणि ठराविक उद्देशाने आपली नेमणूक इथे लोकांची किंवा नागरिकांची कामे करण्यासाठी झाली आहे. या पदावर आज आपण आहोत उद्या कोणी अन्य असेल परवा कोणी तिसरा असेल तेव्हा त्या पदाचा गर्व करण्यापेक्षा पदाला न्याय देता येईल असे काम किंवा कार्य हातून घडले तर काही काळ तरी लोक स्मरणात ठेवतील. मी साधन असलो तरी साध्य नाही.

आपल्या पुर्वी त्या खुर्चीवर कोण कोण विराजमान होते आणि त्यांची कारकीर्द कशी होती? याबाबत आपल्याला काही न काही माहिती आपसूकच मिळते. काही माहिती आपण मुद्दाम मिळवतो जेणे करून आपल्याला आपले वागणे किंवा एकंदरीतच कारभार ठरवता येईल.

म्हणजे त्या खुर्चीतील ‘मी’ मला जपायचा असतो. तो कोणत्या अर्थाने जपावा यासाठीच तर आपण पुर्व इतिहास जाणून घेतो. आपल्या हाताखाली कार्यरत कारकून किंवा शिपाई याच्या मार्फत वेळोवेळी आपण आपल्या पुर्वसुरींची माहिती काढून घेतो कारण तुलना आपोआपच होत असते. माझी वेगळी छाप, वेगळा ठसा उमटवणे ही त्या खुर्चीतील ‘मी’ची गरजच असते. कदाचित तो अहंकार असेल कदाचित ती कर्तव्यदक्षता असेल किंवा असुया असेल पण ते तसे घडते.

कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीला कुटुंब प्रमुख भुमिका मिळाली असली तरी कुटुंबाचे स्वास्थ्य म्हणजे शैक्षणिक विकास व गुणवत्ता, बौध्दिक संपदा आर्थिक मिळकत, नातेसंबंध आणि मानसिक समाधान, कौटुंबिक स्वास्थ्य, कुटुंबाची भरभराट, सामाजिक संबंध इत्यादी गोष्टी संतुलित राखताना कोणावर बळजबरी किंवा अतिरिक्त ताण तर निर्माण होत नाही ना? याची काळजी कुटुंब प्रमुखाला घ्यावी लागते. जर त्यांचा कल कोणा एकाच्या दिशेने झुकला तर कौटुंबिक अस्वस्थता जन्म घेईल.

येथे महत्त्वाचा मुद्दा कौटुंबिक प्रमुखांने स्वतःच्या ‘मी’ ला मुरड घालून आणि स्वार्थी हितसंबंध टाळून कुटुंबातील सर्व सदस्यांना समन्यायी वागणूक दिली तर त्यांच्या ‘मी’ मध्ये अहंकार डोकावणार नाही. कोणाचे काय चुकले हे त्याला विश्वासात घेऊन आणि संबंध न दुरावता सांगितले गेले तर मी कुटुंब प्रमुख आहे आणि मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे हा अहंकार डोकावणार नाही.

पदामुळे अहंकार जागृत होतो,मी आहे म्हणून सर्व आहेत. माझ्यावर कार्यालय चालते असा समज झाला की मग्रुरी येते. वागण्या,बोलण्यात अहंकार डोकावू लागतो. दुसऱ्याला हीन समजण्याची वृत्ती निर्माण होते. म्हणून सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा आणि स्वतःची टापटीप किंवा साधी राहणी यांचा गर्व होऊ नये ही केवळ साधने आहेत त्यांचा वापर दुसऱ्या व्यक्तीचे दुःख दूर करण्यासाठी, त्याला आनंद देण्यासाठी केलात तर तुम्हाला समाधान मिळेल. तेव्हा संपत्ती आणि त्या सोबत आपत्ती हवी की काम पूर्ण करता आले याची तृप्ती आणि आनंद हवा ते आधी ठरवा.

कार्यालयात काम करतांना उत्तम प्रशासक म्हणून तुम्ही ओळखला जावे की आदर्श प्रशासक म्हणून तुमची ओळख असावी ते तुम्हीच ठरवले पाहिजे, उत्तम आणि आदर्श यांच्यात एक धुसर रेषा आहे. फक्त कार्यालयीन कामावरच तुम्ही फोकस करत असाल तर तुम्ही आदर्श प्रशासक म्हणून ओळखला जाल यात शंकाच नाही, पण कार्यालयातील कामकाज सांभाळताना जर तुम्ही त्यातील सजीव घटकांच्या सुख दुखःचा विचारही करत असाल तर तुम्ही चांगले किंवा उत्तम प्रशासक गणला जाल याचे कारण तुमचे कार्यालय म्हणजे निर्जीव वस्तू नव्हेत. तुमच्या कार्यालयातील सहकारी जितके तुम्हाला चांगले आणि प्रामाणिक सहकार्य करतील तुमच्या कार्यालयाचा आलेख उंचावेल, अभिप्राय चांगला राहील. लोक आपली कामे घेऊन तुमच्याकडे येतील आणि काम वेळेत पूर्ण झाले तर आशिर्वाद देतील.

मी स्वतःभोवती नात्याची गुंफण विणतो, आई, बाबा, दादा, ताई, मामी मामा , काका, मावशी ही गुंफण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला तुमचा आज आणि उद्या असेल तिथ पर्यंत. एकदा का तुमचा बाजार उठला, तुम्ही सक्षम किंवा कार्यतत्पर राहिला नाही किंवा तुमचा अधिकार चालत नाही हे लोकांच्या लक्षात आले, की कुणीच कुणाचे नाही. बाजार उठला हा शब्द तसा बहुढंगी आहे, बहुअर्थी आहे. जेव्हा तुम्ही जन्माला आलेले नसता आईच्या उदरात वाढत असता तेव्हा ती आणि तुमचा जन्मदाता तुमची काळजी घेत असत़ो. तुम्हाला केंद्रस्थानी ठेऊन स्वप्न विणत असतो.

पहा,ज्याने या जगात अजुनही प्रवेश केलेला नाही, त्याच्यावर हक्क सांगितला जातो. त्याच नाव ठरतं. त्याच्यासाठी भविष्यातील योजना ठरतात. तेव्हा स्वतःला सिध्द करायचे असेल तर तुम्ही जागरूक राहून स्वतः ला घडवल पाहिजे. षड्रिपु पासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. मी चा जागर थांबवून विधायक गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण महात्मा बनू शकणार नाही पण आत्मा गहाण न टाकता, दुसऱ्याला पिडा न देता जगण्याचा प्रयत्न करू शकलो तरी खूप चांगले.

खर तर ‘मी’ हा भ्रम आहे. या ‘मी’ ला संस्कारीत करून तयार केल्याखेरीज त्या मी ला किंमत मिळणार नाही.आई जन्म झालेल्या मुलाला छातीशी धरते आणि संवाद साधते. “धल, पी हा माज्या लाज्या भुकू लागली, ललू नको”,धर अस म्हणत स्तन त्याच्या मुखात देते आणि त्याच्या अंतरी ते अमृत प्राशन करण्याची उर्मी जागृत होते.

अहं, म्हणजे, मी जागा होतो आणि मातृत्वाच्या धाग्याशी जोडला जातो. आई त्याला मोठं करताना स्वतःला विसरून जाते. तीचे मी पण काही काळ संपून जाते. ते बाळ हेच तिच विश्व असतं. बा.भ. बोरकर यांच्या कवितेत, ‘मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो मी पण त्यांना कळले हो.’ हे वाचले की आपण किती अपरिपक्व आहोत ते कळते. आई स्वतःसाठी कोणतीच अपेक्षा करत नाही.

जोपर्यंत माझा उपयोग कुटुंबाला इतर सहकाऱ्यांना,
समाजाला होत नाही, माझ्यातील मी ला अर्थ नाही. मी नसतांनाही माझ्या सोबतच्या व्यक्तींचे काही अडत नसेल आणि या गोष्टींचा मला आनंद असेल तर तुमच्या मनात सद्भावना आहे पण अहंकार नाही असे म्हणता येईल.

पदाचा किंवा खुर्चीचा किंवा संपत्ती अथवा ज्ञानाचा अहंकार सोबत घेऊन आपण फिरलो तर आनंद मिळणे अवघड.
जेव्हा मी कोणाशी तरी माझ्याशी तुलना करुन पाहण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ माझ्या मनातील मी आणि त्याचा अहंकार जागृत आहे.

मी समोर असताना किंवा माझ्यासमोर कोणीही माझी स्तुती करत असेल तर ते फारस योग्य नाही. मी नसताना माझ्या कार्यालयातील काम तितक्याच तत्परतेने आणि नागरीकांना कुठेही तोशीस न लागता होत असेल तरच माझ्या कामाचे संस्कार तेथे रुजलेत असे मी म्हणेन. अर्थात मी संस्कार रूजवले असे म्हणणेही योग्य नाही. आपण कार्यालय सोडतांना किंवा हे जग सोडतांना लोकांच्या उपयोगी किती पडलो हेच महत्त्वाचे असेल.

अर्थात कुटुंबाचा विचार करता,फक्त चांगुलपणा पुरत नाही तर त्यासाठी घर,संपत्ती, समाजात कमावलेली पत आणि सर्वात शेवटी रूजवलेले संस्कार उपयोगी येतात असे कुटुंबातील माणसे मानतात, याचे कारण केवळ तुमचे गोडवे गाऊन त्यांना दिवस काढणे शक्य नाही.

खर तर स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतील अस्तराला शुक्राणूतील पेशी चिकटली की फलन होऊन प्लेसेंटा तयार होतो. हा प्लेसेंटा गर्भाशयात ढकलला जातो.याच वेळेस फलीत अंडी गर्भाशयाच्या दिशेने हलतात. तेथे पेशी विभाजन होत ब्लास्टोसिस्ट म्हणून ओळखला जाणारा पेशीचा गोळा तयार होतो. तो प्लेसेंटाशी जोडलेल्या गर्भात वाढतो. प्लेसेंटा अनेक हार्मोन्स तयार करते आणि गर्भ टिकवून ठेवण्यास मदत करते. ज्याचे स्त्री नाभीतुन किंवा नाळेतून पोषण होते.अस म्हणतात की वाढणारा गर्भ म्हणजे ‘मी’ हा त्याच्या जननीला म्हणजे दुसऱ्या ‘मी” ला
कुरतडून खात असतो.

म्हणजे मी वाढतो,माझा अहंकार जोपासत वाढतो, मला जे हवं, जेवढ हवं ते मिळवण्याचा मी प्रयत्न करतो.मला जे आवडेल तेच मी स्विकारतो, ज्यांच्याशी मैत्री करावीशी वाटेल आणि ज्यांच्या बरोबर ऋणानुबंध जोडावेसे वाटतील त्यांच्याशीच मी बोलतो, त्यांच्या सानिध्यात मी फुलतो. याचा अर्थ मी चे अस्तित्व स्विकारूनच जर मला जगायचे असेल तर त्या मी मुळे येणारे भोग, दुःखही मला स्विकारावे लागेल.

‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.’ ह्या यातना खुद्द पांडुरंगाला सुटल्या नाहीत तु मायबाप तू मोठा, तू जगदिश्वर तू जगाचा पोशिंदा मग रहा निश्चल, एका जागी भक्तांची गाऱ्हाणी ऐकत बस. हा शाप पांडुरंगाला आहे अस म्हंटल तर त्यात वावगं काय? तुम्ही तासभर एकाच जागी उभे रहाल का?

पशू आणि पक्षी यांचे थोडे वेगळे आहे. पक्षी आपला जोडीदार ठरवून खोपा बांधेपर्यंत दोघ मेहनत घेतात. अंडी उबवून पिल्ले बाहेर येई पर्यंत मादी जागरूकपणे घरटे आणि अंडी यांचे रक्षण करते पण एकदा का पिल्ले सक्षम झाली की पक्षी या पिल्लांवर दावा सांगत नाहीत तर ती स्वतःच अन्न शोधायला आणि वेगळ घरट बांधायला मोकळी असतात.

या पिल्लांनी माझ्या सोबतच रहावं असा अट्टहास पक्षी बाळगत नसावेत. पशूंच्या बाबतीत ही अवस्था थोडी प्रगल्भ आहे, मांजर, कुत्रा, वाघ, डुक्कर हे प्राणी आपल्या पिल्लांसह फिरतांना दिसतात. या पिल्लांच रक्षण करतात. ठराविक मोठी होईपर्यंत त्यांच्यावर स्वतःचा दावा सांगतात मात्र थोडी सक्षम झाली की ही पिल्ले स्वतः आईपासून वेगळी होतात आणि स्वतंत्र प्राणी म्हणून जगतात. याचा अर्थ पशू व पक्षांमध्ये अधिकाराची भावना तेवढी तिव्र नसावी याला अपवाद आपला एरीया किंवा परिसर, शक्य तो आपल्या प्रभागात आपल्याच जमातीच्या दुसऱ्या प्राण्यांस ते येऊ देत नाहीत. याचा अर्थ तेथे ही मी आणि माझे असा अहंकार डोकावतांना जाणवतो. समुहाने जे प्राणी जगतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांना भेडसावत नाही मात्र जे प्राणी ऐकटे दुकटे राहतात त्यांना स्वअस्तित्वाची भिती असणारच यात शंकाच नाही.

तेव्हा, ‘मी’ पोटी भोग आहेत हे निश्चित.’अहंकाराची बाधा न हो कदा काळी..’ म्हणायला एकदम सोपं, आचरणात आणणे एकदम अवघड. ‘पतितपावन न होसी म्हणोनि जातो माघारी अशी धमकी भक्त विठ्ठलाला देवू शकतात.’

तेव्हा ब्रह्म पद सांभाळण अवघड. अनेकदा ईश्वराने दिलेल्या वराचा उपयोग दैत्यांनी ईश्वरावरच करायच प्रयत्न केल्याचे आपण ऐकले असेल. तेव्हा ब्रह्म पद राखण म्हणजे आगीशी खेळणं. अहं चिकटला की भोग सुरू झालेच म्हणून समजा. मी एखादे पद धारण केल की जबाबदाऱ्या येणारच, अगदी भक्तीमार्ग पकडून मी प्रवचन देऊ लागलो किंवा एखाद्या आध्यात्मिक पिठाची जबाबदारी स्विकारली की बंधने आलीच. तुम्हाला लोक केव्हा गुरूपदी मानतील?
‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही.’ लोकांसाठी केवळ भक्तीमार्ग सांगून लोक तुम्हाला डोक्यावर घेणार नाहीत.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” मग तुम्हाला वंदनीय होण्यासाठी काही कृती, कार्य करावे लागेल. जे लोकांचे श्रम वाचवेल, लोकांच्या पिडा कमी करेल, लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवेल. ज्ञानेश्वर महाराज यांनी केवळ भिंत चालवली म्हणून त्यांना लोकांनी संतपदी नाही नेमले तर समाजातील अनिष्ट प्रथांचा अन्याय सोसत त्यांनी समाजातील अंधकार, भेदभाव दूर करण्याचे काम त्यांनी केले. लोकांना भक्तीचा खरा मार्ग त्यांनी दाखवला. तेव्हाही काही भोंदू महाराज स्वत: ला वेदसिध्द समजून स्वतः च्या स्वार्थासाठी समाजावर बंधनं घालत होते आणि काही पाखंडी त्यांच अनुकरण करत होते.

माणसाच्या मनात अहंकार निर्माण झाला की तो कसाही वागायला मोकळा होतो, ‘मै चाहे ये करू, वो करू मेरी मर्जी.’ पण मेरी मर्जी कुठपर्यंत जोवर सत्ता असेल आणि शरीरही साथ देत असेल तोपर्यंतच.

एखाद्या अधिकाऱ्यांना मान कुठपर्यंत? एकतर तो कामावर असतांना आणि त्याच्याकडे जोपर्यंत पद किंवा अधिकार आहे तोपर्यंत. त्या अधिकाराचे क्षेत्र ही मर्यादित असतं जस पोलीसांना जिथे नेमणूक दिली असेल तिथलीच चौकशी करण्याचा अधिकार असतो. मुंबई बाहेर पडल्यावर त्या पोलीसांना सर्वसामान्य नागरिक होऊनच वावरावे लागते. एसटीच्या प्रवासासाठी त्याला अधिकृत तिकीट घ्यावे लागते.

तसेच एखाद्या कंपनीच्या डायरेक्टर चा अधिकार कंपनीच्या आवारात तेथील नियुक्त कर्मचाऱ्यांपर्यंत सिमीत असेल तो इतर कंपनीच्या आवारात आपला अधिकारी गाजवू शकणार नाही याची त्याला जाणीव हवी. तेव्हा कोणताही शासकीय अधिकारी आपल्या मनाने कारभार करू शकत नाही. आपल्या अधिकाराची झुल उतरवून तो नम्रतेने बोलला तरच त्याचे काम होऊ शकते. म्हणून बहुधा म्हटले जाते कुत्ता गली मे शेर है।

तेव्हा संमजसपणा दाखवत आणि समोरच्या माणसाला मोठेपणा देऊन जे काम होऊ शकते ते धाकाने, दहशत निर्माण करून होईलच याची खात्री नसते.जो अधिकारी हुशार असतो तो आपल्या हाताखालच्या माणसाचे गुणगान करत त्याचे कौशल्य आणि मेहनत याच्या जोरावर स्वतः मोठा होतो आणि त्यालाही मोठा करतो.हे कौशल्य शिकून घेतल्याशिवाय कंपनी किंवा कार्यालयात निभाव लागणे अशक्य. तेव्हा मी ला केंद्रस्थानी न ठेवताही कामे होऊ शकतात, किंबहुना जास्त सहज आणि जास्त चांगली होतात.

लोक ज्ञान, श्रीमंती, शारीरिक बळ, सुंदर रूप, सत्ता, पद असा कोणत्याही गोष्टींचा अहंकार बाळगू लागतात. परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आसेत. त्यातल्या त्यात ज्ञान, कला,कौशल्य, मनमिळाऊ स्वभाव कदाचित मेंदू सोबत करे पर्यंत साथ देतील. तरीही या गोष्टींही आपल्याला कधी धोका देतील सांगणे अवघड आहे. म्हणून विनयाने वागावे, उगाचच गर्व करू नये.

अगदी घरातील लहान मुलांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल,तुम्ही त्याला अधिकारवाणीने सांगता की मित्रत्वाने सांगता यावर तो तुमच्या आज्ञा पाळेल की कानाडोळा करेल हे ठरत. हे तुला सहज जमेल असा आशावाद तुम्ही व्यक्त करा आणि त्याची किमया पहा, तो स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करायला पुढे सरसावेल. आलेली अडचण स्वतः सोडवेल आणि काम पुर्ण झाल्या नंतरच तुम्हाला भेटून सांगेल. दुसऱ्या व्यक्तीला मोठेपणा दिल्याने आपले काम सहज सोप्पे होत असेल तर त्यात वावगे काय आहे?

काही व्यक्ती स्वतः चा अहंकार जोपासण्यात इतक्या मश्गुल असतात की जर त्यांना आदर दर्शवण्यासाठी गेटवरील सुरक्षा अधिकारी उठला नाही तर त्याची कान उघाडणी केली जाते. तर काही कार्यालयात त्या अधिकाऱ्यांची जेवणाची खरकटी भांडी तेथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना; उचलून न्यावी लागतात. वास्तवता हे काम तो स्वतः करू शकतो.

हाच प्रकार घरातही असतो.ज्या पुरूषांना आणि मोठ्या मुलांना घरातील कामाची सवय नसते किंवा ते संस्कार झालेले नसतात त्यांना घरातील प्रत्येक काम हे महिलांनीच करायचे असते असा सोईस्कर समज असतो. त्यामुळे अगदी जेवणाचे उष्टे ताट ही पत्नीने उचलून ठेवावे असा समज असतो. हा अहंगंड मोठा करण्यात घरातील गृहिणी मदत करतात. जसे नवरा किंवा कमावता मोठा मुलगा याचे कपडे, मोजे, रुमाल, ऑफिसमध्ये न्यायची बॅग, कागदपत्रे त्याच्या हाताशी आणून देणे. त्याचा मोबाईल चार्ज करून देणे,त्याचे मनी पॉकेट, किंवा इतर गोष्टी शोधून त्याच्या सॅकमध्ये ठेवणे.त्याचा नास्ता त्याच्या टेबलावर आणून ठेवणे, दूध, कॉफी हाती देणै वगेरे.

जर घरातील महिलेने पुरुषांचे फाजील लाड केले, की तो घरातील प्रत्येक काम तिचेच तर आहे असा ग्रह करून घेतो आणि तीची मुलं तीच अपेक्षा आपल्या पत्नीकडे बाळगतात. जर पत्नी ऑफिसला जाणारी असेल तर हे सर्व काम करण्यास मोकळी नसते किंवा तिच्या मनास या गोष्टी पटत नाहीत आणि ते योग्यच असते त्यामुळे जोडप्यात वाद निर्माण होतो. त्याच्या मनाची पुरुषी अहंकार बैठक सांगत असते की हे काम घरातील गृहिणीचे आहे.

घरातील गृहिणी ही योग्य वैचारिक बैठक असणारी असावी. पुरुषी अहंकाराला खतपाणी घालणारी नसावी अन्यथा तिच्या मुलाचा संसार उधळल्यास तीच जबाबदार ठरते. महिलांनी पुरुषांच्या कामात मदत करावी किंवा नाही हे पुरुष महिलांना त्यांच्या कामात मदत करतात की कसे यावर अवलंबून आहे.

आज वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आपण जगत आहोत. ज्यांच्या हाती सत्ता आहे आणि सांख्यिक पाठबळ असल्याने ते स्वतःचे निर्णय लादत आहेत. आम्ही थोडया फायद्यासाठी मनाची कवाड बंद करून त्यांचं म्हणणं ऐकून टाळ्या पिटत आहोत. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला अनुमोदन देत आहोत. वर वर पाहता हे निर्णय बरे वाटले तरी ते खरच योग्य आहेत का? हा विचारच आम्ही करत नाही परिणामी भविष्यात कोणते भोग भोगावे लागतील याची शुद्ध आमची हरपली आहे. काहीही आपत्ती नसतांना फुकट अन्नधान्य वाटणे संयुक्तिक वाटते का?

स्वयपाकाचा गॅसच्या चढ्या किमती कमी केल्या गेल्या याचा अर्थ या किमती आटोक्यात ठेवणे आधी शक्य असतांना गेले आठ वर्षे सतत किमती वाढवून सामान्य लोकांची लूट केली गेली असे वाटते की नाही? आपण गरिबांचे मासिहा आहोत हे दाखवण्याचा आटापिटा करतांना, जेष्ठ गरीबांना निर्वाह भत्ता वाटतांना त्याचा अनावश्यक बोजा मध्यमवर्गीय माणसावर टाकला गेला याचे काही समर्थन होऊ शकेल का? पण ‘मी’ मोठा झाला की अन्य गोष्टी आपोआपच लहान भासू लागतात, खर तर तो आभास आहे पण समजेल त्यालाच.

भरती मेळावे आयोजित करून शासकीय नोकऱ्या देण्याची व्यवस्था नक्की चांगली म्हणावी लागेल. ती पारदर्शक आहे असे म्हणता येईल मात्र आजही अनेक आस्थापना तीस टक्के जागा रिकाम्या असताना त्या बाबत जलद कृती करून हा अनुशेष भरण्या ऐवजी उगाचच महा भरती प्रक्रिया राबवण्याचे नाटक गरजेचे आहे का? मला शासनाने नोकरी दिली मी केंद्र सरकार व पंतप्रधान यांचा आभारी आहे असे वदवून घेण्याची गरज आहे का? नागरिकांना सुविधा देणं हे सरकारचे काम आहे. नोकरी देणं हा इतर व्यवस्था पुरवण्याचे काम आहे तसाच एक भाग आहे. त्यात नवल वेगळेपण ते काय? त्या कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत नसेल तर ती अभिनंदनीय बाब आहे.

जोवर लग्न होत नाही, घरून आणा पाठी लागलेला नसतो,पण लग्न झाल की,”अहो! ते हे संपलय, प्लीज घेऊन या ना गडे” तर अशी लाडीक हरकत नोंदवली तर पूर्ण करावीच लागते. हा ‘आणा’ कधीच सुटत नाही. ‘मी’ केवढा अवघड असतो तो कळलं असेल. “तुझ्यात विरू दे माझे मी पण.” अशी विनवणी भक्त विठ्ठलाच्या चरणी करतो त्याचे कारण एकट्या मी च्या पाठी किती भोग आहेत ते माहिती असल्यावर शहाणा काय करेल? तरीही अहंकार सहसा नाही मरत म्हणून तर आपण ‘मी’ च्या बढाया सतत मारत असतो.

‘अहं तत्वमसि, ह्या श्रुष्टीत असणारी पंचतत्वे ही माझ्या ठायी आहेत. कारण हे शरीरच मुळी पंचतत्वांनी मिळून बनलेले आहे. तेव्हा मी कुणी एकटा नसुन पंचमहाभूतांचा समुह म्हणजे ‘मी’ चा साक्षात्कार होईल तेव्हाच मी गळून पडेल आणि शांतपणे जगणे साध्य होईल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar