ओळख तुझी ताकद
राजकरणाचा डोह गढूळला त्यात दुर्दैवाने ओघळले मानवी रक्त
कळे ना ही कसली महायुती? सरली निती, आता कोण कोणाचे भक्त?
लग्नानंतर पाट लावतात तसे यांचे वागणे, कोणाशीही जुळवतात सूर
कळे ना या मागचे कारण, नियती कोणाचा असा घेत आहे सूड?
शब्दांनी सांगायचे, तत्वानी लढायचे त्या ऐवजी नराधाम करू लागले हल्ले
खरच कळेना हे जन्मताच कोणत्या पशूचे रक्त, दूध म्हणून प्याले
मनात ईर्षा जागी झाली की संपतो विवेक, शरीरात होतो सैतानी संचार
हे नरभक्षका! रक्ताची चटक लागण्यापूर्वी तू कोणाची संतान? स्वतःला विचार
हल्ला करून निवडणूक जिंकता येत नाही, शक्तीचा उगा बाळगू नको अहंकार
म्हण आहे एक मुंगीही हत्तीला पडे भारी जेव्हा तुटतो मनाचा दैवी आधार
समजू नये लोक आहेत अडाणी बहिरे मुके, मुर्खाचे लक्षण म्हणजे फक्त पैशांचा बाजार
माणसा जागा हो, तू विकाऊ नाहीस हे दाखवून दे, फुकटच्या धनाला दे नकार
टाकू नकोस नितिमत्ता गहाण, ओळख तुझी ताकद, वापर तुझ्या मताचा योग्य अधिकार
पाच वर्षांनी मिळते प्रतिनिधी निवडण्याची संधी, पैशासाठी होऊ नको उगाचच लाचार
तुझ्या नगराला बनवायचे आहे स्वच्छ, सुंदर द्यायचा आहे शहराला मनाजोगता आकार
हव्या नागरी सुविधा आणि शांतता आणि मोकळा श्वास तर योग्य
माणसाला मताने सहकार
दवडू नकोस ही संधी मानवातील राक्षसाला गाडून टाक कर स्पष्ट योग्य निर्धार
जो आपल्या संकटात हाकेला ओ देईल, धावून येईल त्याला मत देऊ करू नगराचा उध्दार