कसं सांगावं नाही कळत

कसं सांगावं नाही कळत

मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका
‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका

आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुका
किती वर्ष तुम्ही स्वतःचे गाणार गोडवे, घेणार का आजन्म ठेका?

आताची पिढी आहेच शार्प, सोडत नाही धडा शिकवण्याचा मोका
तुम्ही सांगाल त्याचा, मागतील लगेच पुरावा, ओळखा त्यातील धोका

त्यांची चूक नाही, विज्ञानाच्या कसोटीवर पारखा हीच तर शिकवण
बुध्दी न वापरता, रूढी परंपरेत अडकून, स्विकारले नको तेच बंधन

पेशवे जानवे, जापतापांनी करू शकले असते का स्वतःचे रक्षण?
काही परंपरा आहेतच चांगल्या कन्येचे करावे लक्ष्मी पुजनाला औक्षण

वर्णव्यवस्था, जातपातीत अडकून कुठवर करावे तेच ते राजकारण?
‘जुने तेच असेल सोने’ तर कशास हवे प्रवासी विमान, पाण्यासाठी धरण?

कशासाठी हवी तंत्रनिकतने, का पाठवता मुलांना घेण्या उच्चशिक्षण?
रहात होता घरात, चाळीत, का फ्लॅट चा सोस? बरे नव्हे दुटप्पी वर्तन

आपल्या चपला मुलांना होऊ लागल्या की बनवावे त्याला तुमचा मित्र
मनात वाढणारे अंतर कमी करावे द्यावे हाती त्याच्या कुटुंबाचे सुत्र

कदाचित त्याचे नियोजन तुमच्यापेक्षा असेल योग्य, द्या त्यालाही दाद
काही हौसेचे खरेदी केले तर नका म्हणू आलाय याला पैशाचा माज

मुले पुढची पिढी त्यांच वागणे अगदी तुमच्या सारखेच कसे असेल?
तुमच्या डोळ्यांना चुकीचे काही दिसत नाही, नेमके तेच त्यांना दिसेल

तुमच्यावर तसच कधी संकट आले तर त्याचाही जीव तीळ तीळ तुटेल
काही गोष्टींशी आपला परिचय नसतो त्यांना आशेचा किरण तेथे दिसेल

यापुढे निदान तुम्हाला, सर्वच माहिती नसेल, स्विकारून टाळा धोका
पूढची पिढी चार पावले पुढेच असणार, करू नका उगाचच सतत टिका

योग्य तेव्हा व्हावे थोडे फ्लेक्जीबल तरच होणारा संघर्ष सहज टळेल
जुने की नवे यात सतत अडकून न पडताही मैत्रीचा सूर पुन्हा जुळेल

आताच्या पिढीजवळ आहे नवविज्ञानाच्या, तंत्राच्या जादूची चावी
कटुता टाळायची असेल तर शाब्दिक रस्सीखेच टाळायलाच हवी

विषयावर चर्चा झडायला हवी, म्हणून घालू नये कोणाचे घशात दात
कोणीच श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो कधीकधी फरक असतो फक्त विचारात

पटले असेल तर आनंदाने स्वीकारा आणि करा स्वतःच्या इगोवर मात
मतभेद असले तरी मनभेद नको तेच करतात शब्दाने प्रेमळ नात्याचा
घात

वयातले अंतर विसरा,तरूणांनाही द्या संधी, प्रेमळ मैत्रीचा हात
त्यांचाही आत्मविश्वास होईल जागा घेतील झेप खुल्या नभांगणात

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “कसं सांगावं नाही कळत

  1. Kishor dange

    व्वा अप्रतिम. पालकांना या पिढीशी जुळवून घेणे खरच गरजेचे आहे. आपण सायकल ,स्कुटर, बसने प्रवास केला म्हणजे मुलांनी ऐपत असूनही कार ,विमान प्रवासावर खर्च करुच नये काय? आपल्याला आर्टस,काॅमर्स, सायन्स इतकेच माहीत होते पण आधुनिक युग वेगवेगळे ऑप्शन देत असतांना पालकांनी मुळात अट्टाहासच करू नये. खूप छान सरजी.

Comments are closed.