कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

आज ‘तुकाराम बीज’ आहे. तुकाराम आजच्या तिथीला सदेह वैकुंठाला गेले. त्याचा आध्यात्मिक अर्थ आपली जीवनयात्रा संपवून देहत्याग न करता ते थेट विष्णुच्या निवासस्थानी (वैकुंठी) गेले. ते आत्माचे परमात्म्याशी मिलन होते. त्यांचे शरीर हे नश्वर नसून चिन्मय किंवा ज्ञानमय होते. ते आपल्या वाणीने, अभंगाने चिरंतन राहिले असा अर्थ घेणे जास्त योग्य ठरेल. तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे म्हणतात. सदेह वैकुंठगमन या विषयी कोणताही पुरावा कधीही सापडलेला नाही.
त्यामुळे उगाचच ऐकीव गोष्टींची आधार घेऊन लोकांना भ्रमीत करणे योग्य नाही.

डॉ साळुंखे यांनी ‘विद्रोही तुकाराम’ मांडले आहेत.त्यावेळेस प्रस्थापित असणाऱ्या मंबाजी किंवा अन्य ब्राह्मणांच्या असहिष्णु वाणीवर आणि देवाच्या मालकीविषयी किंवा गुढ किंवा ब्रह्मज्ञान सांगण्याच्या मालकीवर तुकारामांनी आपल्या भजनातून अनेकदा कोरडे ओढले होते. देवावर कोण्या एका व्यक्तीचा अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे होते. उद्दाम अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी टीकेची झोड उठवली. समाजातील प्रतिष्ठित, प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झाले होते.

रामेश्वर भट आणि तात्कालिक कर्मठ ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांचा छळ केला. तुकाराम महाराजांनी वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सामान्यांना सांगितल्यामुळे या ब्राह्मणांना ते आवडले नाही त्यामुळे अभंग गाथा नदीत सोडण्याची शिक्षा दिली होती. तुकाराम शिष्य ‘संत संताजी जगनाडे’ आणि इतर टाळकऱ्यांनी ती गाथा पुन्हा लिहिली. याचा स्पष्ट अर्थ रामेश्वर यांनी तुकारामांना शिक्षा फर्मावेपर्यंत त्यांचे अभंग, ओव्या लोकाभिमुख झाल्या होत्या.

त्यांनी प्रस्थापितांच्या मतांच्या विरोधात प्रत्यक्ष टीका न करता आपल्या भजनातून उद्बोधन करून विद्रोह केला होता म्हणूनच तुकारामांना रामेश्वर भट आणि मंबाजी किंवा इतर ब्राह्मण वर्गाने जगणे अवघड केले होते. तुकाराम महाराजांच्या भजनात ही मंडळी व्यत्यय आणीत पण जनसामान्यांना त्यांचे भजन किर्तन आवडत असे. दिवसेंदिवस तुकाराम यांचे नाव लोकांच्या मनात रूजत होते त्यामुळे ब्राह्मणवृंद त्यांच्यावर आगपाखड करत होते.

तुकारामांच्या वडिलांचे पिढीजात किराणा मालाचे दुकान आणि सावकारी आणि शेती होती पण तुकारामांना विठ्ठल नामाची गोडी लागली होती त्यामुळे त्यांचे व्यवसायात मुळीच लक्ष नव्हते, ग्राहक त्यांना हातोहात बनवत. त्यांची सावकारी ही लोकांनी पैसे परत न केल्याने बुडाली. अन्नाची भ्रांत पडू लागली. या मुळे संसारात विरक्ती आली. पूर्ण वेळ ते विठ्ठलाच्या भक्तीत व अभंग रचना आणि किर्तन यातच रममाण होऊ लागले. तुकाराम महाराजांच्या भजनाला एकदा छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित होते. भजनानंतर महाराजांनी तुकारामांची भेट घेत नजराणा अर्पण केला. तुकारामांनी तो नाकरला. यावरून त्यांची आसक्ती सरल्याचे जाणवते.

तुकारामांची माहिती वेळोवेळी वाचनात येत होती आणि हळूहळू या तुकाराम नावाने मी झपाटून गेलो. कित्येक अभंग वाचनात होते. कळेना की फारसे शिक्षण नसलेल्या तुकाराम महाराजांकडे एवढे शब्दभांडार आले कुठून. बरे शब्द जडजंजाळ नाही तर सहज ओठी यावे आणि गेय ठरावे असे आहेत. प्रत्येक अभंगात दर्शनी अर्थ तर होताच पण किती गुढ अर्थ लपला आहे त्याची प्रचिती एक एक अभंग तन्मतेने ऐकताना येऊ लागली.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटूं धन जनलोका।।

तुकाराम यांच्याकडे सावकारी असुनही प्रापंचिक धन नव्हते मात्र त्यांना नामदेव महाराजांच्या सहवासात अभंग सहज सूचत. मग या शब्दांची रत्ने ते पाडुरंगचरणी अर्पण करत. समाजाला भक्तीमार्गाची शिकवण देत असत. अतिशय सहज सरळ शब्दांतून ते पाखंडावर टीका करत.

‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ पहा अगदी सहज तोडांत बसेल अशा शब्दांत अशिष्ट माणसाशी व्यवहार कसा असावा ते तुकाराम महाराज सांगतात.

तुकारामांचे अभंग हे कित्येक लोकांच्या चरितार्थाचे साधन झाले. कोणी तुकाराम महाराजांच्या अभंग अभ्यासून डि.लीट. मिळवली. कोणी एक एक अभंग घेऊन व्याख्यान दिले, कोणी त्यातील शब्दालंकार शोधून लेख लिहिले. तर कोण्या फिरस्त्याने त्यांचे अभंग आपल्या रोजीरोटीचे साधन बनवले. प्रत्येक वक्त्याला त्याच्या पुरता अभंग आणि ‘तुका’ कळला पण तो कळलं त्यापेक्षा तुकारामांचे अभंग त्याची व्याप्ती खोल आहे. तुका किती मोठा? तर तो आकाशा एवढा नव्हे तर त्यापेक्षा मोठा हे क्षणोक्षणी पटले. गेले साडेतीनशे वर्षे तो निनादत आहे आणि पुढेही अनंतकाळ शब्दांची भांडारे वाटत राहिलं.

एकोणीसशे एक्याण्णची गोष्ट, मी माझ्या आतेभावाकडे देवबागला माझ्या पत्नीसह गेलो होतो. माझं वय एकोणतीस वर्ष आणि आतेभाऊ एकोणऐशी वर्ष. देवबाग मालवणच्या पश्चिमेला समुद्राच्या आत म्हणजे बेटावर वसलेल गाव, नितांत सुंदर एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कर्ली खाडी. भावाचे तीन गुंठ्यांत पसरलेलं घर, समोर मोठी मोकळी पडवी, त्या पडवीत झोपाळा बांधलेला. घराभोवताली नारळाची बाग, पपनस, पेरू विलायती फणस यांची दाटी आणि समोरून येणारा समुद्रावरचा गार वारा. त्या झोपाळ्यावर आम्ही दोघे बसून झोके घेत होतो. भाऊ घराच्या दगडी पायरीवर रेलून बसला होता. मुंबईमधील भाऊबंधाची चौकशी आणि इकडतिकडच्या गप्पा सुरू होत्या इतक्यात पेटीचा सूर जवळ जवळ ऐकू येऊ लागला आणि मी कान टवकारले. माझी ती स्थिती पाहून माझा भाऊ म्हणाला, “दिवाळी सरली की हे मायझये कानडी इकडची वाट धरतत. ईश्वरान मेल्यांका गोड गळो दिलो हा, आमची मराठी भक्ती गीतं गातत आणि खंडणी वसुल करून जातत.” ते मला माहिती सांगत होते, इतक्यात पेटीचा सूर आणि आवाज आमच्या दिशेने जवळ येत गेला.

“दादा नमस्कार”, त्यांनी माझ्या भावाकडे पहात म्हटले, भावाने वीस रूपयाची नोट त्याच्या हाती ठेवली. त्याच्या सहकाऱ्यांनी पेटीवर सूर धरला आणि त्याने खड्या आवाजत, “कानडा राजा पंढरीचा” सूरूच केलं. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ , ‘अवघाची संसार’, अशी पाठोपाठ दोन चार गाणी म्हंटली, तब्येत एकदम खुश झाली. मी वीस रूपयाची नोट त्याच्या हातावर ठेवली. त्याने नमस्कार केला आणि तो निघून गेला.

मी माझ्या भावाकडे पहात म्हटलं, “ह्याचा आवाज गोड आहे नाही? मुंबईत गेला तर कुठेतरी नक्की संधी मिळेल.” भाऊ हसत म्हणाला, “तुका ठाऊक आसा काय? मेले दोन चार गाणी वर्षभर घोटून घेतत आणि तिच टेप प्रत्येक दारावर लावतत.” त्यांच खरही असेल कारण तो हे अनुभवातून बोलत होता आणि मी पहिल्यांदा ऐकून, पण ते काही असल तरी विठ्ठलाला भिमसेन जोशीनी आळवावं किंवा त्याच्या भक्तांनी त्याची आळवणी करत त्याला शरण जावं. तो विठ्ठल कोणालाही नाराज करत नाही. वारकरी जेव्हा दिंडीत विठ्ठलाचा जयघोष करतात ते पाहून वाटतं त्याच्या नामातच गोडी आहे. समाधान आणि तृप्ती त्याच्या भक्ताला घरीही मिळते आणि पंढरीच्या वाटेवरही मिळते.

जेव्हा मी या विठ्ठलनामाचा विचार करतो तेव्हा मनाचा गोंधळ उडतो. ना त्याच्याकडे शस्त्र, ना दाग दागीने, ना गोरा रंग, ना वाहन, ना दिमतीला सेवेकरी तरीही त्या विठ्ठलाची महती सर्व भक्तगणात आहे. त्याच्याकडे पाहिल की दंभ गळून पडतो हेच खरे.
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ”
अशी स्थिती, अशी वृत्ती झाली की काही काळ आपोआप निवृत्ती येते मग प्रत्येक वारकरी हा फक्त विठ्ठल होतो, माऊली होतो. नाहीतरी, “पिंडी ते ब्रम्हांडी” ते तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे, म्हणजे ईश्वरात आहे. म्हणूनच ‘विठ्ठल पहावया गेलो विठ्ठल होऊनि राहिलो’ अशी भक्तांची भावना होते ती स्वतःला विठ्ठल चरणी समर्पित केल्याने.

स्वतःचे अस्तित्व नष्ट केल्याशिवाय, दंभ जाळल्या शिवाय, विठ्ठल दिसेल कसा? कारण विठ्ठल तर तुमच्यात आहे, चराचरात आहे पण स्वतः कडे पाहता आलं तर पाहिजे. जोपर्यंत स्वतःची ओळखच होत नाही आणि मी पणाला माणूस चिकटून राहिला तर त्या पांडुरंगाची ओळख पटणार तरी कशी? केवळ तुळशीची माळ हाच दागिना मिरवत त्याला शरण जाण्यातच धन्यता वाटते. ‘मी तू पण’ हरवता येते. जर तुम्हाला आमच्या विठ्ठल इतका भावतो तर तुकाराम महाराजांचा काय दोष? त्यांची तर विठ्ठल नामाने तहानभूक हरवली होती. मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा त्याचे गुणगान करण्यातच धन्यता मानत होता.

विठ्ठल नामाच्या व्युत्पत्ती बद्दल मराठी विश्वकोशात अनेक गृहीतके आहेत. मतमतांतरे आहेत. मंदिराच्या सोळा खांबापैकी एक खांबावर कन्नड आणि संस्कृत भाषेत पंढरपूरचा उल्लेख “पंडरगे” असा आढळतो. मुळात विठ्ठल हा विष्णूचा अवतार असलेला कृष्ण असून तो गुरे राखून आला असल्याने धुळीने रंगला असल्याने सावळा दिसत आहे. इतिहासकार वि. का. रजवाडे यांनी विठ्ठल म्हणजे म्हणजे रानावनातील देव असा योजावा असे म्हटले आहे. तामीळ भाषेत इटू म्हणजे कमरेवर ठेवलेला हात, त्या अर्थ विटेवर उभा तो विठू. ज्ञानदेवांनी त्याला कानडा, कर्नाटकू म्हणजे ‘अगम्य आणि लिला दाखवणारा’ म्हटले आहे.

मात्र माझ्यासारख्या सामान्य भक्ताला असले जड अर्थ उमगत नाहीत. जेथे मनाला समाधान मिळेल, त्याच्या साधेपणाने अहंकार गळून पडतील तो विठ्ठल माझा. ‘विठ्ठल’ या शब्दातला ‘वि’ हा विकारांवर विजय मिळवणारा ‘ठ’ हा जनमानसात ठाण मांडून बसलेला ‘ल’ हा कशाचीही लालसा, अभिलाषा नसणारा असा ठणठणपाळ आहे. त्याच्या देहाकडे पहा, सावळे असे रूप असूनही तो मनात भरतो, मला भजा अस म्हणत नाही, कोणती अट घालत नाही. काहीच मागत नाही, तुळशीपत्र घातले न घातले तरी त्याला राग नाही. प्रेमळ नजरेने तो फक्त आशीर्वाद देतो. साधं रहा, सोज्वळ रहा, विवेकी बना, जणू असच तो सांगतो.

पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती ही एकट्या विठ्ठलाची आहे, सोबत रुक्मिणी नाही ते का? या बाबत विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी आपल्या ‘पैस’ या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे, विठोबा हा मल्हारीदेवाचा मांडलिक राजा, एकदा काही भक्त विठोबाच्या दर्शनासाठी येत असता मल्हारीने विठोबाला त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगितली, विठ्ठलाने आपल्या पत्नीला पद्मवतीला तो निरोप दिला, मात्र ती रागावली, ती काम करून थकली असल्याने भोजनाची व्यवस्था करण्यास नकार दिला. विठ्ठलाला याचा राग आला त्याने तिला शाप दिला, तुझे माझे नाते तुटले. तू उद्या वेडी होशील, सैरभैर होऊन फिरशील, रानात मरून पडशील. तुझ्या अस्थी समुद्रात जातील, तसेच झाले. त्यामुळे विध्द झालेल्या पद्मिनीच्या वडिलांनी बारा वर्षे तप केले. त्याला समुद्राने अस्थी परत दिल्या. त्या त्याने चंद्रभागेच्या पद्मतिर्थात टाकल्या, तिथेच कमळ उगवले. विठ्ठलाला तद्नंतर पश्चाताप झाला. तो ही पत्नीच्या विरहाने राज्य सोडून तिथे फिरत फिरत आला, त्याला त्या सुंदर कमळाचा मोह पडला, त्याने ते कमळ तोडले असता, त्याचीच रूक्मीणी झाली. तिच्यावरचा त्याचा राग मावळला पण एकत्र रहायचे नाही हा निर्धार होता. म्हणूनच रूक्मीणी वेगळी दिसते.

एका पौराणिक कथेप्रमाणे, पंढरपूरात तो कसा प्रकटला तर मातृपितृभक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी विष्णू पंढरपुरी आला. पुंडलिक म्हणाला, मी आई वडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब. आणि गेली अठ्ठावीस यूगे तो कटी कर ठेऊनी उभा आहे. या कथेबरोबर इतरही कथा सांगितल्या जातात, डिंडिरव नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेऊन पंढरपूर येथे भिमातटी वध केला. अशीच दुसरी कथा सांगितली जाते ती द्वारकेत आल्यानंतरही कृष्णाने राधेचा नाद सोडला नाही म्हणून रुक्मिणी रागावली, तिची समजूत काढायला कृष्ण गोपवेष धारण करून तिथे आला. पंढरपूर जवळ असलेल्या गोपाळपुरात त्याने आपला परिवार ठेवला तो कृष्ण म्हणजेच विठ्ठल. असो तर अशा अनेक कथा असतील मात्र आपल्यासाठी तो दिनांचा कैवारी आहे हे खरे.

पंढरपूरचा विठोबा आणि तिरुमलाई येथील वेंकटेश या दोन्ही देवात साम्य आहे ते म्हणजे दोन्ही निशस्त्र आहेत. त्याचा एक हात कमरेवर आहे. दोघानाही कांबळे प्रिय आहे. वेंकटेश हा वेंकटचलावर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली असणाऱ्या वरुळातून प्रगटला त्यालाही विठ्ठला प्रमाणे चिंच प्रिय आहे म्हणून विठ्ठल व व्यंकटेश ही एकच देवाची रूपे आहेत असे डॉ. अरूणा ढेरे यांचे मत आहे.

कोटी कोटी रूपे तुझी कोटी कोटी सुर्य तारे
कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे

तेव्हा या विठ्ठलाचा शोध घेण्याचा मुर्खपणा मी पामराने काय म्हणून करावा? ज्याची रूप कोटी कोटी आहेत, तो त्या त्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तेव्हा स्वतःचा शोध अजूनही संपलेला नाही तर त्या अगम्य विठ्याचा शोध कसा घ्यावा? तामिळनाडू, आंध्र आणि कर्नाटक या राज्यात तो वेगवेगळ्या नावानेओळखला जातो. कर्नाटकात मंडया जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी, हसन जिल्हयात हरणहळ्ळी, तुमकुर नागलपूर येथे विठ्ठल मूर्ती आहेत.तंजावर येथील विष्णुमंदिरात आणि हैद्राबाद येथे एका खाजगी मंदिरात विठ्ठल मूर्ती आहे. विजयनगरच्या राजाला,कृष्णदेवराय याला आपल्या राज्यात विविध देवतांची स्थापना करायची हौस होती त्या प्रमाणे त्याने येथील विठ्ठलाची मूर्ती नेवून विजयनगर येथे स्थापन केली होती ती एकनाथ महाराज यांचे पणजे संत भानुदास यांनी परत आणली अशी कथा सांगीतली जाते. तेव्हा विठ्ठल सर्वत्र आहे, तो सर्वांचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य.

त्याच्याकडे भेदभाव नाही, कोणीही निसंकोच यावं, त्याच्या दर्शनाने तृप्त व्हावं आणि निसंकोच घर गाठवं. ना काही साकडं, ना मागणं. शरीररूपाने त्याने भरभरून दिलंच आहे. मग अन्य गोष्टींची लालसा बाळगायची कशाला? म्हणूनच वारकरी त्याच्याकडे काही मागत नाही घर दुःखाच्या छायेत असेल तरी वारी चुकवत नाही आणि जर काही मागायची इच्छा झाली तर ज्ञानदेव यांचे पसायदान मागतो.

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे पसायदान ॥१

जे खळांचि व्यंकटी सांडो,तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो,मैत्र जीवांचे ॥२

दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात ॥३

पसायदानात ज्ञानोबा माऊली काय मागते तर माझ्या वाणी आणी आचरणाने संतुष्ट असशील तर एवढच दे, दुष्टांचे दुष्टपण नाहीस कर, त्यांना सत्कर्म करण्याची बुद्धी दे, त्यांना स्वारस्य दाखवू दे. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होऊ दे. पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा कर. म्हणजे स्वतःसाठी काही मागीतल का? नाही ना, हेच ते, खरा भक्त स्वतःसाठी काही मागत नाही, मागणार नाही.

तो काय मागतो? तुझ दर्शन झाले धन्य झालो,आता काही च मागणे नाही. हा अमुल्य देह दिला तेच तर मोठ धन आहे मग आणखी काय मागावं, ह्या विठ्ठलाला बसायला आसन नाही, एकाच जागी उभा असल्याने वाहन नाही. तरीही तो सर्वसंचारी आहे. तो मनामनात आहे, पाना फुलात आहे, प्राणिमात्रात आहे. चंद्रभागेत आहे, इंद्रायणीत आहे.
‘जैसा ज्याचा भाव तैसा येई अनुभव’

तुम्ही त्याला ज्या रुपात ज्या स्वरूपात पाहण्याची इच्छा करता त्या रुपात तो तुम्ही पाहता. त्याच्या दर्शनासाठी पासेस नाहीत आणि पैसेही नाही. सुमन कल्याणपुकर यांच्या मिठ्ठास वाणीतून, ‘दिनाचा कैवारी,दुःखिता सोयरा,मुला माणसात माझा विठ्ठल साजिरा’ गाणं ऐकल्यावर त्या विठ्ठलाचे, पांडुरंगाचे रुप डोळ्यात साठवून घ्यावेसे वाटते कारण तो दिनांचा कैवारी आहे, तुमचा माझा, सर्व सामान्य जनांचा आहे.

भिमसेन जोशींच्या आवाजातील, ‘कानडा राजा पंढरीचा’ ऐकतांना जो स्वर लागतो तेव्हा त्या ‘विठ्ठल नामाचा टाहो’ , ह्दयात ऐकू येतो. तो विठ्ठल भले ‘वेदांना’ न कळो पण तो प्रत्येकाच्या जाणीवेत आहे. तो ज्ञानोबाचा आहे, तुकोबाचा आहे, नाम्याचा, जनाबाईचा आहे आणि प्रत्येक सजीवाचा आहे. तो सावतामाळ्याला दिसतो, गोरा कुंभारही त्याला पाहतो, नरहरी सोनारालाही दिसतो. विठू भक्ताला त्याच्या दर्शनाची इतकी आस असते की महिनामहिना सतत पाई प्रवास करून तो पंढरपूर गाठतो आणि त्याचे दर्शन होताचा त्याला जो आनंद होतो तेव्हा नकळत म्हणतो, ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’

विठ्ठल नामाचा जो जो विचार करीत जावे तो तो आपली मती कुंठीत होते, झेप संपते, खर तर झेप कसली ती तर माकड उडी, कतीही उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला तरी द्राक्ष हाती येत नाही तशीच आपली गती होते आणि लक्षात येते हे रसायन काही वेगळच आहे याला कोणताच फॉर्म्युला नाही तो ‘अनादी आहे अगम्य आहे’ कोणत्याच शब्दात मांडता येत नाही ह्रदयात कोंडता येत नाही आणि मनात साठवता येत नाही. म्हणून त्याच्याकडे पाहण्याची उत्कंठा असली तरी पाहूनही मन भरत नाही म्हणून चरणांकडे पहावे. चरण स्थिर आहेत आणि मन अस्थिर आहे म्हणून चरणाची सेवा दे एवढच मागण करावं आणि शांत मनाने घरी जावं.

तो विठ्या लेकुरवाळा आहे म्हणूनच भक्तांचे ते माहेर आहे, प्रपंचात फक्त स्त्री ला माहेर असते पण भक्तीमार्गात पंढरी हे अवघ्या भक्तांचे माहेर आहे. गंमतीचा भाग पहा जेव्हा वारकरी वारीला निघतो तेव्हा सोबत काहीही नसतं ना तिजोरीची चावी ना दागदागिने अगदी निश्चिंत मनाने तो वारीला निघतो. सारा संसारच जर त्या विठ्याचा, तर आपण काळजी करणारे कोण?

प्रत्यक्ष पांडुरंगच भक्ताच्या दारी नाचतो, का? तर पंढरीत प्रत्येक भक्ताला मुर्तीचे मुख दर्शन होईलच असे नाही. भक्त तर त्या मंदिराची पायरी पाहुन तिचे दर्शन घेऊनही तृप्त होतो. भक्त तनामनाने त्या पांडुरंगाचा झाला असतांना त्याला वेगळे दर्शन घ्यावे लागत नाही. त्याची अवस्था वेगळीच झालेली असते दुरुन जरी दर्शन झाले तरी तो तृप्त होतो.

म्हटलं तर विठ्ठल कळण सोप्प आहे आणि म्हटलं तर अतिअवघड. सोपं या साठी वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पायाची धुळ माथ्यावर लावली आणि त्याला पांडुरंग स्वरूप मानल तरी प्रश्न संपतो. माझा विठ्ठल हा भाव स्वरूप आहे.त्यामुळे पंढरपूरला जायची दगदग मला नाही झेपली तर मी त्याच दर्शन मनातही घेतो आणि म्हणतो विठ्या, मायबापा तू श्वास बनून माझ्या देहात रहा म्हणजे मला शोधाशोध करावी लागणार नाही आणि शरीराला कष्ट पडणार नाहीत.

पण पंढरपूरला जायचाच अट्टाहास असेल, तेथेच मुखदर्शन किंवा चरणाचा अट्टाहास असेल आणि ते ही आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला मग वाळवंट तुडवावं लागेल. दहा वीस तास रांगेत थांबावं लागेल आणि त्याच्या समोर पोचलात की काही सेकंद त्याच्या मुर्तीवर नजर स्थिरावत नाही तो पर्यंत तुम्हाला लोटून बाहेर काढले जाईल. तो दिनांचा कैवारी असला तरी तेथे मात्र तो स्वतः या लाखो लोकांच्या पुढे दिनवाणा आहे कारण त्या जनसागराला सामोरं जाण तसही कठीणच आहे.

म्हणून, ‘पाहता दिठी, साठवावे रूप, माय बाप स्वरूप आठवावे।’ दर्शन घेतांना तुमच्या आई वडिलांना क्षणभर आठवा तो त्यांच्या देहात सामावलेला आहे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी।

त्या काळ्या विठ्या बद्दल कितीही सांगण्याचा लिहिण्याचा प्रयत्न केला तरी तो अपुराच ठरेल. वेदांना कळला नाही तो , अल्पमती बुध्दी असणाऱ्या मला कळणं तसही अवघडचं, मी त्याच्या दर्शनासाठी आडवारी गेलो, जेणेकरून दर्शन सुलभ होईल, पण कुठले काय? एवढ्या दूर आलोय तर पददर्शन व्हावे ही इच्छा म्हणून आड मार्गाने प्रयत्न करून पहावा या हेतूने ट्रस्ट कार्यालय गाठलं पण त्यांच्या कार्यालयात तो वेळपर्यंत कुणी ट्रस्टी आलेच नव्हते. वाटलं विठूची करूणा भाकावी आर्त हाक मारावी,

‘अगा ईठ्ठला, पांडुरंगा, आता तरी होई जागा
देव माझा कसला? वाळवंटी बसलेला
नाही दया, नाही माया, मजवरती रुसलेला।’

पण पाहिले तो चरण दर्शन मार्गावर शेकडोनी लोक उभेच होते, इथे आपली डाळ शिजणं अशक्य हे लक्षात आलं आणि मी वेगळ्या रांगेत उभा राहिलो. त्याच्या घुमटाच्या द्वारापाशी येताच त्या विठ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. तो स्वतः कुठेतरी हरवल्या प्रमाणे भासला. हार आणि प्रसादाची पिशवी मी पूढे केली. त्यांनी ती चौकटीला लावत त्यातल्या हारासकट परत केली. मला तेवढ्याच खड्या आवाजात म्हणाला, “पावणं व्हा पूढं” निमूट मुखदर्शन घेऊन बाहेर पडलो. माझ्या सारखे शेकडो भाविक मुखदर्शन झाले नाही म्हणून मनात कुढतही असतील पण मग मनात आले आपल्या अंतचक्षुनी दर्शन घेऊ. मंदिराच्या बाहेर फरशीवर बसलो डोळे मिटून घेतले, दिर्घ श्वास घेतला आणि मला तेथील माणसा माणसात विठ्ठल दिसू लागला. मी स्वतःशी हसलो.

‘दिनांचा कैवारी दुःखिता सोयरा मुला- माणसात माझा विठ्ठल साजिरा.’ शब्द कानात गुंजत राहिले, तो तर कणा कणात आहे, चंद्रभागेच्या डोहात आहे. रंजल्या गांजल्यात आहे, मी मात्र त्याला मंदिरात शोधतोय याचे कारण माझी तशी श्रध्दा होती पण मनाने कौल दिला. ‘कोटी कोटी रूपे तुझी कोटी कोटी सुर्य तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे’

संभ्रमित मन शांत झालं. त्याच्या पायरीवर नाक घासून क्षमा मागितली. माझ्या मुढ स्वभावाला तो हसला नाही याचे कारण त्याला माझ्या अज्ञाना मागचा भाव उमजला. मी कळसाकडे नजर टाकली तर तिथूनही चमचमत्या उन्हात मला निरोप देत होता. मी श्रध्देने हात जोडले. जातो माघारी, जातो माघारी पंढरी राया तुझे दर्शन मजला झाले. हा भाव मनात घेऊनच मी परतीच्या मार्गाला लागलो.

मित्रांनो मी १९९१ साली देवबागला ज्या आर्त स्वरात कानडा राजा पंढरीचा ऐकलं होतं त्या दिवसापासून कधीतरी पंढरपूरला जायचे ठरवले होते. माझा मामेभाऊ दरवर्षी आषाढी एकादशीला पायी जातो हे त्याच्याकडून ऐकलं होतं. मी संसारात वाहून गेलो. जाणं झालं नाही, त्या विठ्याने बोलावलं नाही आणि, २०२४ ला अचानक लहर आली. नोकरीची धावपळ संपली होती म्हंटले एकदा पंढरपूरला जाऊन यावे.

मित्रासह देवदर्शनासाठी निघालो आणि पंढरपूरला जाऊनही आलो. योग आल्याशिवाय काही घडत नाही हे मनोमन पटले. असो निदान विठू चरण दर्शन सहज प्राप्त नाही याची प्रचिती आली आणि त्याच्या मुखाचे, मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले हे ही नसे थोडके. पांडुरंग ,पांडुरंग. तुकाराम बिज याविषयी लिहिता लिहिता झपाटून इथवर पोचलो. माझी क्षमता नसतांना वेडेपणा करत हे लिहिले. आपण दयाळू आहात काही चुकले तर क्षमा करावी.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “कानडा राजा पंढरीचा

  1. Archana Kulkarni
    Archana Kulkarni says:

    लेख आवडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *