निवडणूक नव्हे उत्तर
निवडणूक आली की काही अदृश्य कर लटकवतात बॅनर
बिचारे चार पैशासाठी कुठेही चढतात, ते तर हुकमाचे चाकर
त्यांचे काहीच चुकत नाही पोट जाळायला हवी रोजच भाकर
मालक कितीही निष्ठूर असला तरी त्याच्या हाती नोटांची साखर
लाईटचे खांब, डिस्ट्रिब्युशन पेट्या, बंद दुकानाचे सजते शटर
कोण उभे? चिन्ह कसले? लाऊन जाणारा कोण? नसे उत्तर
टग्या पोरांना येतात बरे दिवस त्यांचा पक्ष बुथवर असतो वावर
वडापाव, सिगारेट पान आणून देतांना यांचा होतो गरम कुकर
सुरू होतो प्रचार वार्डातील महिलांमध्ये होतो अचानक संचार
वाटू लागतात पत्रके, घुमू लागतात घोषणा, वाढत जातो उंच स्वर
काही दिवस पिंजून काढतात गल्ली बोळे, सुटत नाही एकही घर
आपले लाडके नेते यांनाच निवडून द्या, आवाजाने थरारते शहर
रोज संध्याकाळी वाटला जातो रोख भत्ता, त्यात नाष्टा चहाची भर
बिचाऱ्या, गांधीबाबाचे होता दर्शन, नेतृत्वाच्या भाटास जोडती कर
चौका चौकात होतात सभा, आव्हानांचा खुराक, चिन्हाचा गजर
जिकडे तिकडे झेंडेच झेंडे, हिरवे, लाल, निळे पाहून येते चक्कर
घरोघर पोचवल्या जातात मतदार स्लिप, सोबत भेट कॅलेंडर साभार
निवडणूक जवळ येऊ लागतात प्रचाराची वाढत जाते गती अन धार
निवडणूक संपली की नेता गायब, काचबंद गाडीतून वाढते अंतर
घसट असली तर धावत्या गाडीतून दाखवतो हात तितकाच बहर
प्रत्येक निवडणूक म्हणजे त्याच्या विकासाची हमी, तुम्ही रस्त्यावर
निर्लज्जपणे तुम्ही प्रचारात सामील, जगू नका फेकल्या तुकड्यावर
आता तुम्ही तुमच्या झोपडीत त्याचा हळूहळू मोठ्या वर्तुळात वावर
कधीतरी येते नोटीस, चाळी तुटून तुम्ही बेघर तेथे होणार मोठा टॉवर
तुम्ही काढता त्याच्या कार्यालयावर मोर्चा पोलिस बंदोबस्त तुमची घरघर
तो सामोरा येत निर्लज्जपणे हसतो तुम्हाला दाखवतो झोपूचे गाजर
करा कष्ट, आखा योजना, मिळवा माहिती, मुलांच्या शिक्षणावर द्या भर
तोच होईल कुटुंबाचा तारणहार, मान झुकवायची कशाला, बना निडर
अंधविश्वास बरा नव्हे, एरियातील भाऊ खरा नव्हे, तोच करील घात
ठरवा ‘गांधीसाठी’ स्वतःला विकणार की परिस्थितीवर करणार मात
कोणीही हाकायला तुम्ही नव्हे गुरं , इतके लाचार वागणेही नव्हे बरं
देवाने दिलय धडधाकट शरीर, कर नाही त्याला कसले डर