पुंजी आणि प्रगती
प्रगती आणि पुंजीचा थेट संबंध आहे का? पुंजी असेल तरच प्रगती साधता येते हे खरं आहे का? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे थोडी विचित्र किंवा बुचकळ्यात टाकणारी आहेत. कधीकधी त्याचा थेट संबंध असतो पण तो तसाच नेहमीच असतो असेही नाही. उच्च शिक्षण घ्यायचे तर केवळ टक्के असून चालत नाही तर पालकांकडे पुंजी असणे आवश्यक असते. याउलट एखाद्या कुटुंबाकडे आवश्यक आर्थिक पाठबळ असते परंतु त्या कुटुंबातील मुलांकडे उच्च शिक्षण झेपेल एवढी बौध्दिक नसते. त्यामुळे पुंजी असली तरी त्या कुटुंबातील तरूणांना प्रगती साधता येत नाही. कधीकधी शिक्षणात हुशार असणारा विद्यार्थी रिस्क घेण्यात पाठी राहतो किंवा ज्ञानाचा वापर करण्यात पाठी पडतो. मग ज्ञान असले तरी त्या ज्ञानाचा कौशल्यापूर्ण वापर न करता आल्याने त्याला आपले ज्ञान स्वतःसाठी वापरून पैसे कमावता येत नाहीत. साहजिकच प्रगती साधता येत नाही. याचा सरळ सोप्पा अर्थ एखाद्या युवकाची योग्य शैक्षणिक प्रगती आहे याचा अर्थ तो जीवनात प्रगती करण्यात यशस्वी ठरला असा निष्कर्ष तात्काळ काढता येत नाही.
काही मुलांची शैक्षणिक प्रगती फार मोठी नसली तरी त्यांच्याकडे व्यवसायिक कौशल्य ठासून भरलेले असते त्यामुळे तो त्याच्या विद्वान मित्रापेक्षा वेगाने प्रगती करतो. कोणाला कोणत्या क्षेत्रात गती असेल ते सांगणे किंवा पारखणे अवघड असते. ज्या मुलाला बारावी इयत्तेत इंग्रजी विषयाचा बाऊ वाटतो तोच मुलगा पुढे सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ञ म्हणून योगदान देतो, त्याची चर्चासत्र युनिव्हर्सिटी आणि मोठ्या कंपनीत आयोजित केली जातात आणि तो पोलीस खात्याला मार्गदर्शक म्हणून सल्ला देतो हे समजणे अवघड आहे. तेव्हा प्रगती साध्य करण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवून आपल्याला आवडेल आणि पचेल त्या क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी पूर्ण वेळ मनापासून दिला तर व्यावसायिक उंची गाठता येते आणि प्रगती आणि पुंजी दोन्ही जोडीनेच साध्य होतात.
आज आधुनिक युगात नवीन तंत्रज्ञानाच्या नवनवीन वाटा निर्माण होत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी कला, विज्ञान किंवा वाणिज्य ही तीन क्षेत्रे माहिती होती. कला क्षेत्रातून आर्ट, चित्रकला, शिक्षक, वकील असे विषय निवडीस तेव्हा प्राधान्य दिले जात होते.विज्ञान विषय निवडल्यास इंजिनिअरिंग, मेडिकल आणि वाणिज्य शाखा निवडल्यास अर्थशास्त्र असा साधारण समज होता. आज शिक्षणाच्या १९०० पेक्षाही जास्त शाखा असाव्यात. रोज एखाद्या नवीन शाखेची भर पडतेच आहे. याचा अर्थ ग्रगतीसाठी नवीन दालने खुली होत आहेत. तुम्हाला आवडेल, बुध्दीला आणि तुमच्या खिशाला झेपेल असे शिक्षण क्षेत्र निवडून तुम्ही वाटचाल आणि प्रगती करु शकता. तेव्हा ज्याला पंख आहेत त्यानी झेप घेण्यात कुचराई करू नये.
तेव्हा आपल्याला प्रगती आणि पुंजी दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर नवीन क्षेत्रांची माहिती त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून मिळवून साक्षरता निर्माण करावी लागेल तरच ही क्षेत्रे पुढील पिढीसाठी खुली होतील. यातील ज्या विषयाची गती आपणास नाही त्याचे महत्त्व वेळीच ओळखता आले पाहिजे. आता हेच पहा ना, गेल्या चार पाच महिन्यात अनेक कंपन्यांनी आपल्या बजेटमध्ये AI संशोधन आणि आपल्या व्यावसायिक वापरासाठी तरतूद केली तीही लाखो डॉलर्स ची. भविष्यात AI हा परवलीचा शब्द होईल की तो शाब्दिक बुडबुडा होईल आज माहिती नाही आणि तरीही कंपन्या आपल्या स्टाफला प्रशिक्षित करण्याकरिता धडपडत आहेत.
कृत्रिम बुद्धमत्ता माणसाच्या मनाचा पूर्ण ठाव घेऊ शकणार नाही हे आज तरी सत्य आहे पण भविष्यात कोणी डोकावले नाही, तातडीने डोकावू शकणार नाही. विजय भटकर यांनी परम संगणक निर्माण करे पर्यंत त्याची शक्यता तरी कोणी आजमावली होती का? पण “अशक्य ते शक्य करता सायास, न राही उदास त्यासी लाभ” माणसाच्या बुद्धिमतेची झेप किती प्रचंड आहे ते अंतराळ संशोधनाने सिद्ध केले आहेच. भावना विरहित यंत्र मानव ते तुमच्या चेहऱ्यावरील बदलणाऱ्या तरंगाचा मागोवा घेत तुमच्या मनातील विचार ओळखण्याचा प्रयत्न करणारा अति जलद प्रोसेसर युक्त यंत्रमानव हा टप्पा विकसित व्हायला फार वेळ लागणार नाही. कधीकाळी ह्रदय शस्रक्रिया तज्ञ डॉक्टर करत होते, मेंदूवरील शस्त्रक्रिया न्युरोतज्ञ करत होते, आज मेडिकल सायन्स इतके प्रगत आहे की अतिशय कमी जागेतील शल्य चिकित्सा आणि अर्थातच तेथील दोष दूर करून टाके घालण्यासाठी यंत्रमानव उपलब्ध झाला आहे. त्या यंत्राला योग्य व अचूक माहिती दिली तर आजाराचे अतिशय योग्य निदान करण्याची किमया साध्य झाली आहे. त्यामुळे अवघडातील अवघड शस्रक्रिया लिलया आणि फारसा रक्तप्रवाह न होता किंवा रुग्णांना त्रास न होता केली जाणे शक्य झाले आहे. याचा सक्सेस रेट जास्त आहे. साहजिकच मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध होत असल्याने आता कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाण्याची गरज भासत नाही. रुग्णाला आपल्यावर कोणते उपचार सुरू होते याची चित्रफीत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शंकेला वाव रहात नाही किंवा तो आपल्यावर योग्य उपचार झाले आहेत याची खात्री अन्य तज्ञामार्फत करून घेऊ शकतो.
विकसित तंत्रज्ञानाने माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवणे शक्य झाले आहेच त्यामुळे नवनवीन शोध आपल्या पर्यंत तात्काळ पोचत आहेत. त्याची व्यवहारीक उपयुक्तता पडताळता येत आहे. संदेश वहनाची जादू अशी की शाळेतील हजारो मुलांना शाळेच्या नियोजनाची माहिती व्यवस्थापन एका क्लिकवर पाठवू शकते तितक्याच सहज आपला फायनान्स विभाग किंवा शेतकी खाते शेतकऱ्यांना त्यांच्या सन्मान निधीचे वाटप करू शकते आणि करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात काही सेकंदात पैसे वर्ग किंवा जमा होतात. तेव्हा माहिती जाल आणि त्याची व्याप्ती पाहता हळूहळू संपूर्ण विश्व पंखाखाली घेण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे याची खात्री पटेल.
कोणत्याही गोष्टींची कारणमीमांसा जितकी अचूक केली जाईल तितकी त्या गोष्टी उत्पादन किंवा निर्माण करण्याची, दुरूस्त करण्याची, उपचार करण्याची अचुकता वाढेल. युद्ध काळात हवेत एका विमानातून दुसऱ्या विमानात इंधन भरले जातांना आपण पहात होतो पण एका स्पेस शटल मधून अवकाशात दुसऱ्या स्पेस शटलमध्ये किंवा स्पेस स्टेशनवर आंतराळवीर पाठवणे शक्य झाले. हे पाहणारी आपली पिढी खरच भाग्यवान आहे. ज्ञानाच्या कक्षा किती रूंदावल्या आहेत ते ऐकताना, पाहताना हा प्रवास थक्क करून जातो. कधीकाळी दुरदर्शनवर वर्तवलेले हवामान किंवा पावसाची स्थिती चकवा देत असे आणि त्यावेळी पु. ल. देशपांडे त्यावरून सभागृहात चवल्या पावल्या पाडतं. मात्र गेले काही वर्षे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जातो आणि हानी पूर्णपणे टाळता आली नाही तरी कमीतकमी मनुष्यहानी होईल यासाठी दक्षता बाळगली जाते. आर्थिक नुकसान कमी होते.
आज वाहन निर्मिती क्षेत्रात अवघ्या दहाव्या मिनीटाला एक मोठे वाहन पूर्ण जोडणी करून व त्याच्या चाचण्या करून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. जोडणी करतांना यंत्रमानव अगदी सुट्या लहान पार्ट किंवा भागापासून ते मोठे पार्ट लिलया हाताळतात,अचूक जोडतात आणि जोडताना कुणालाच हानी होत नाही. परिणामी कारखान्यात अपघात शुन्य, उत्पादन गुणवत्तापूर्ण, हेच संगणकाच्या बाबतीत आणि अगदी मोबाईलच्या बाबतीतही. मोबाईल उत्पादनात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत हे खरे वाटत नाही.
ऑगस्ट 2025 मध्ये आपण बहुचर्चित सिलिकॉन चिप निर्माण केली, भविष्यात आपल्याला येथील अनेक यंत्रासाठी लागणाऱ्या चिप येथेच तयार होतील आणि अवलंबित्व कमी होईल. मेडिकल सायन्स क्षेत्रात लागणारी सिटी स्कँनर आपण उत्पादीत करू लागलो. महिंद्रा आणि टाटा कंपनी हेलिकॉप्टर निर्मिती करू लागले. ड्रोनची निर्मिती होऊ लागली. तेव्हा जसजशी वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादकता वाढत जाईल आणि निर्यात वाढत जाईल आपला रुपया तेजीत येईल.सध्या फक्त अशियातील बाजारपेठेचा विचार केला तरी आपल्या शेजारी असणाऱ्या राष्टांची बाजारपेठ आपण काबीज करू शकतो. इतर देशांच्या तुलनेत आपले तंत्रज्ञान हे किफायतशीर असल्याची खात्री शेजारच्या राष्ट्रांना होत आहे. याचा फायदा येथील उद्योजक नक्कीच करून घेतील.
विज्ञान आणि त्यातील अफाट प्रगती हाच एक प्रचंड बाजार आहे आणि यातून मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मनुष्य भावभावना, शेती, माती, पिके, साधने, विविध गरजा, शिक्षण, वैद्यकीय उपचार, क्रिडाक्षेत्र, करमणूक अशा अमर्यादीत शाखांचा शोध घेत त्यासाठी तंत्र विकसित करतांना यापेक्षा वेगवेगळ्या शाखांची गरज आणि त्यातून नवनवीन उद्योग वाढीला लागतील. माणसाच्या गरजा जसजशा बदलत जातील तशा नवीन वाटा निर्माण होतील. माणसाच्या बुद्धिमत्तेला आणि कल्पना विस्ताराला मर्यादा नाही. त्या कल्पनेतून उद्याच्या नवीन उद्योगाची पायाभरणी होईल.
तेव्हा एखादा उद्योग मृत पावला की त्याची जागा दुसरा उद्योग घेणार यात वाद नाही. त्यामुळे एखाद्या उद्योगाला लागलेली घरघर ही कदाचित नव्या क्षेत्रात झेप घेण्याची तयारी असू शकेल. जसे वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादन वाढत जाईल वस्तू नक्कीच स्वस्त होतील. आज एलईडी बल्बला किंवा ट्युब ला जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. तेव्हा आपली प्रगती आता कोणीही थोपवू शकणार नाही. आपल्याला या प्रगतीचा एक भाग होता आले पाहिजे. नवीन तंत्र शिकून घेऊन संशोधनात सहभाग नोंदवला पाहिजे. भविष्यात नवीन पिढी या क्षेत्रात चमक दाखवतील आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर स्थापित करतील.
प्रश्न आहे तो विज्ञानाच्या या अफाट वेगात माणूस, माणूस राहील का? माणसातील नातेसंबंध टिकून राहतील का? तुमची भौतिक गरज विज्ञान पूर्ण करेल पण भावनिक गरज पूर्ण करण्याची क्षमता भविष्यात विकसित होईल का? मुलांनी तुमची काळीजी घेण्यासाठी घरी आधुनिक यंत्र मानव आणून दिला तरी तुमच्या मनाला होणारे दुःख, त्याला लागलेली टोचणी, मुलांची ओढ, हवे असलेले सान्निध्य, या गरजा यंत्र मानव पूर्ण करू शकणार का? अर्थात आज तरी याचे उत्तर नाही असेच आहे.
मेंदूत असणारे असंख्य न्यूरॉन आणि क्षणक्षणाला त्यात निर्माण होणारी कंपने यांची तितक्याच वेगाने नोंद घेणारा सेन्सर आणि त्याची उकल करणारा प्रोसेसर जरी निर्माण केला गेला तरी त्यावर भावनिक सोल्युशन तो देऊ शकणार नाही हे शल्य आहेच. म्हणून आपल्या कुटुंबात केवळ शैक्षणिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्य आहे यावर आनंदी असून चालणार नाही तर भावनिक गुंतवणूक तितकीच गरजेची आहे. तुम्ही आम्ही घराच्या प्रत्येक एका कोपऱ्यात एका एका मोबाईलवर किंवा टॅब अथवा लॅपटॉप वर स्वतः ला गुंतवून घेतले तर एकलकोंडा जीव घाबरून जाईल.
आज घरात कोणाला एक लमेकांशी बोलायला वेळ नाही, घर थ्री बीएचके झाले पण मन संकुचित झाले. मी, माझी, माझ्यापुरती उरली तर घरात आधुनिक साधने असल्याने काम वेगाने आटोपलं तरीही एखाद्या जेष्ठ व्यक्तीला गरज असेल तेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असेलच असे नाही. किंबहुना तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून डोके बाहेर काढून पहाल तेव्हा तुमच्या घरातील दुसऱ्या खोलीतील कुणी व्यक्ती तुमची वाट पाहून या जगाचा निरोप घेऊन निघून गेलेली दिसेल आणि कदाचित तुम्ही हताश, निराश व्हाल तेव्हाच मनाची गाठ बांधा की तुमचा रस्ता येथूनच जातो.
तुमचे युग कितीही वेगवान असो, स्वतःची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहेच पण तुमच्या घरातील लहान मुले आणि जेष्ठ व्यक्ती आणि तुमच्यासाठी राबणारे आईबाबा किंवा अगदी मेड यांचे स्वास्थ्य आणि त्यांची भावनिक भूक भागवण्याची जबाबदारी तुमचीही आहे. तेव्हा तुम्ही शिक्षण घेत असाल, कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल आणि कितीही व्यस्त असाल तरीही आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी नियमित वेळ देता येईल याचे योग्य नियोजन केले तरच तुमचे पूर्ण कुटूंब सुखी जीवन जगू शकेल.
घरातील संसाधने तुमचे काम सोप्पे करण्यास मदत करू शकतील पण तुमची हक्काची माणसेच तुमच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतील, तुमचे सुख दुःख वाटू शकतील. तेव्हा सशक्त मनाची जादूच तुमचे कौटुंबिक हित जपू शकेल. अजूनही वेळ गेलेली नाही, उच्च शिक्षण,मोठ्या पगाराची नोकरी किंवा व्यवसाय, बंगला, गाडी आणि शेअर्स किंवा बँकेतील ठेव हे asset तुम्हाला कायमच उपयोगी पडणार नाही. तुम्ही कुणाला माणुसकी दाखवली असेल तर तिच तुमच्या कामी येईल. कारण पैसे देऊन नोकरचाकर मिळेल पण आपलेपणा आणि आत्मियता फक्त तुमच्याशी मनाने जोडलेली व्यक्तीच दाखवू शकेल. तेव्हा धन तर हवेच पण माणुसकीची पुंजीही तुमच्या नावे जमा हवी तरच या कलीयुगात समाधानाने राहता येईल.
आज भारतातील श्रीमंत माणसाच्या यादीतील नावे पाहिली तर अंबानी अदानी यांनी एकेकाळच्या श्रीमंत बिर्लाना कधी मागे टाकले ते कळलेही नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रगतीचा वेग एवढा भन्नाट होता की त्यांनी जगातल्या श्रीमंत व्यक्तीमध्ये झटपट स्थान मिळवले. पुंजी योग्य ठिकाणी लावली की प्रगती कोणी थांबवू शकत नाही हे त्यांनी सामान्य जनतेलाही दाखवून दिले. पण श्रीमंत आणि अतिश्रीमंत होणे ही प्रगती तुमच्या मनालाही श्रीमंत करेलच असे नाही. अर्थात व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तीचा संदर्भ तसाच असणार आहे. मी कोण कोणत्या क्षेत्रात नव्याने प्रवेश केला आणि त्या क्षेत्रात लावलेल्या पुंजीने माझ्या सामर्थ्यात किती वाढ झाली हेच तर व्यावसायिक गणित तो आपल्या गुंतवणूकदार सभासदांच्या समोर ठेवेल. गुंतवणूकदार देखील माझा शेअर कितीने वाढला हेच पाहिल. समाजातील इतर लोकांच्या जीवनाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्या प्रगतीने त्यांचे जीवनमान उंचावले की नाही याच्याशी माझा संबंध नाही. अशा वैचारिक बैठकीला तुम्ही प्रगती म्हणाल का?
१४० करोड भारतातील जनतेपैकी ८० करोड जनतेला अत्यल्प दरात किंवा फुकट धान्य, वयोवृद्ध लोकांना , १८ वर्षावरील महिलांना, शारीरिक अपंगांना, शेतकऱ्यांना सातत्याने मदत करावी लागत असेल. तरीही त्यांचे जीवनमान उंचावत नसेल तर आपण प्रगती केल्याचा डंका पिटू शकतो का? विकसनशील ते विकसित हा टप्पा पार करायला आपल्याला अजून किती वर्षे लागतील? आपण खरेच जगातील चौथ्या क्रमांकावर झेप घ्यायला तयार आहोत का? आपल्याकडे संसाधनाची कमी मुळीच नाही पण ती फक्त श्रीमंताकडे एकवटणे आणि त्याचे फायदे फक्त त्यांनीच लाटणे हा अडसर दूर होत नाही तोवर आपण स्वतः ला प्रगत म्हणू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम आणि फक्त त्यासाठी दाम हे सुत्र हवे. फुकट आणि मेहरबानी, अनुदान हे शब्द माणसाला हीनदीन बनवतात त्याच्या प्रगतीच्या वाटेत धोंड बनून राहतात. आपण कर्ते आहोत भिकारी नाही, हक्क म्हणून काम मागा फुकटचा दाम नको तरच आपला अभिमान जागृत होईल जो प्रगतीला पोषक असेल.
उठा आवाज उठवा हक्क द्या उपकार नको.
दुर्दैवाने आज समाजात प्रत्येकजण मी कसा श्रीमंत होईन याचा ध्यास घेऊनच जगत आहे. त्याच दृष्टीने त्याचे नियोजन आहे. त्याने ज्या उद्योगात त्याची पुंजी लावली आहे, त्या उद्योगातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्याचे नाहीत. खाण उद्योगात तेथील कर्मचारी ज्या वातावरणात काम करतात आणि तेथील कोंदट वातावरणामुळे अल्पायुषी ठरतात त्या प्रश्नांशी त्याचा संबंध नाही. त्या खाणीत होणारे अपघात, मरणारी माणसे, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे प्रश्न हे त्याचे नाहीत. कारण त्याला ध्यास आहे तो त्याची पुंजी कशी वाढेल त्याचा.
हे चित्र फक्त खाणकामगाराशी निगडित नाही तर तेल विहिरी, उंचच उंच बांधल्या जाणाऱ्या इमारतीवर अतिशय असुरक्षित आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार या प्रत्येक ठिकाणच्या कामगाराचे आहेत. पुंजीपती त्याला काम देऊन जणू उपकार करतो. तेथे अपघातात मारणाऱ्या माणसाला किंमत नाही कारण त्याच्या जागेवर दुसरी व्यक्ती नेमता येते. हे सगळे ऐकल्या नंतर तुम्ही ,आम्ही प्रगती करत आहोत असे वाटते का?
माणुसकी ही फक्त आपल्या घरातील, नात्यातील माणसांपुरती नको तर तुमच्याकडे येणारी कामवाली मावशी, पोष्टमन काका, सोसायटीचे रखवलादार यांच्याशीही तुमचा स्नेह हवा. तुमचा हुद्दा, तुमची आर्थिक कुवत, तुमचे समाजातील स्थान ,मानसन्मान ही खरी पुंजी नाही तर माणूस म्हणून तुमची समाजात काय ओळख आहे ती जास्त महत्त्वाची. पैसा सोबत नेता येणार नाही, तुम्ही गेल्यानंतर किती माणसे हळहळ व्यक्त करतील ते तुम्हाला ठाऊकही नाही पण तुम्ही जिवंत असतांना तुम्हाला सामान्य माणूस सहज भेटू शकत असेल, साद घालू शकत असेल. तुमच्या बाजूने जातांना हळूच हसत असेल, हात दाखवत असेल तर नक्कीच समजा की तुमची माणुसकीची पुंजी नक्कीच मोठी आहे. आयुष्यात पैसे येतील आणि जातीलही पण तुम्ही आयुष्यात समाजासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या असतील त्याची आठवण निरंतर राहील तीच तर कमावलेली पुंजी आहे. तेव्हा प्रगती करतांना किती पदे, मानसन्मान मिळाला यापेक्षा किती माणसे कमावली किती मने जोडली हेच महत्त्वाचे आहे.
आज काही लोकांचा अध्यात्माकडे ओढा आहे, किमान तसे दाखवले जाते, भासवले जाते. श्रीमंत व्यक्ती आपल्या लवाजम्यासह येऊन सिद्धिविनायक मंदिरात पूजा किंवा अभिषेक करतात त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही नवकोटनारायण अबुधाबी येथे अब्जावधी डॉलर खर्चून अक्षरधाम किंवा अन्य मंदिर बांधतात. ही श्रद्धा आहे की दिखावा तुमच्या या मंदिरात गरीब दर्शन घ्यायला जाऊ शकतो का? मग तुमच्या पुंजीने तुम्ही दबाव निर्माण करून कमाईचे वेगळे साधन निर्माण केले यात गरीब माणसाचा फायदा कोणता. तेव्हा प्रगती अशी असावी ज्यात प्रत्येकाच्या जीवनात गती मिळेल.
प्रत्येकाला आनंद मिळेल, त्याचेही जीवनमान उंचावेल. तुम्ही किती मजल्याच्या आलिशान टॉवरमध्ये राहात याने गरीबाच्या जीवनात काय फरक पडला? पण गरीबाला सुरक्षित निवारा मिळाला,हाताला काम दिले गेले, पोटाला अन्न मिळाले तर ती गोष्ट आनंददायी असेल. तेव्हा पुंजी जमा करतांना मनात विचार हवा की माझ्या प्रगतीत ज्यांचा वाटा आहे त्यांना आनंद देण्यासाठी, त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी मी काही केले का? करू शकतो का? हा विचार आणि त्या दिशेने कृती करण्याची प्रेरणा तुम्हाला लाभली तरच तो विकास तुम्हाला आनंद तर देईलच पण तुमच्या प्रगतीला कस्तुरी गंध देईल.
गरीब असलात तरी चालेल पण मन स्वच्छ आणि श्रीमंत हवं मग समाधान आपोआप मिळते. कोण काय देते यापेक्षा आपल्याला काय देता येईल ही भावनाच सुखाची आहे. ते भाग्य सदैव लाभो हीच गुरूचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.