पैस
देव शोधायचा म्हटलं तर शोधणार कुठे? कोटी कोटी सुर्य, कोटी कोटी तारे आणि त्यावर कुठेतरी तुझा देव्हारा. मग माझ्या सारख्या अडाणी अज्ञानी माणसाने तुझा शोध कुठे घ्यावा? लोक म्हणतात तू चराचरात आहेस, तू निसर्गाच्या प्रत्येक रूपात आहेस आणि तरीही तू अस्तित्व हीन आहेस. कोणी कोणी काय काय थापा माराव्या आणि मनाला पटले नाही तरी आम्ही मान डोलवावी हे अतीच झाले.
तुझे निसर्गातील अस्तित्व मला मान्यच आहेच. जे डोळ्याने दिसते, मनाला भावते ते मान्य करावे लागतेच. झुळझुळ वाहणारे झरे, संथ नदी, उंचिवरून कोसळणारा धबधबा, वाहत्या नद्या, अथांग सागर, जंगलातील हिरवीगार झाडे झुडपे त्यावरची रंगीबेरंगी फुले तुझे अस्तित्व सिध्द करत असतात. मंदिरातील मुर्तींपेक्षा ते नक्कीच विलोभनीय असतात. मन प्रसन्न करतात. मनाला झपाटून टाकतात. याचा अर्थ असा नाही की मी मंदिरात जात नाही. मी जातो , तुझ्या नावाने श्रध्देने लोकांनी बांधलेली मंदिरे त्यावर कोरलेली शिल्पे मी पाहतो. भक्तांच्या डोळ्यातील तुझ्या भेटीची आस मी पाहतो. मनातल्या मनात त्यांना दाद देतो. त्यांच्या भाबड्या श्रध्देचे कौतुक करतो.
पण तुझे दर्शन घेण्यासाठी बारा तास रांगेत थांबण्याचा मी कधी अपराध केला नाही. त्यापेक्षा मी तासभर पाण्यात डुंबेन, चिंचेच्या झाडावर चढून लवचिक फांदीवर बसून ती गदागदा हलवेन, गोरमलेल्या चिंचा पाडून मनसोक्त खाईन, घाम निथळेपर्यंत उंच टेकडीवर सायकलने जाऊन तेथे शरीर थंडगार होणे म्हणजे काय त्याचा अनुभव घेईन आणि टेकडीवरून सायकलने परततांना परमानंद म्हणजे काय त्याचा आनंद घेईन. माझा पैस या सगळ्या नैश्वर नसलेल्या गोष्टींत आहे.
एकांतात बसून कर्णमधुर गाणी किंवा फक्त त्या गाण्याची सांगीतिक धुन ऐकताना तंद्री लागली किंवा एखाद्या व्हिडीओ पाहताना जगाचे भान न बाळगता आपण खळाळून हसलो की इतर आपल्याकडे पाहून सहजच म्हणतात काय आनंदी माणूस आहे ! एखादे गमतीशीर पुस्तक वाचतांना स्वतःशी हसू आले आणि आपण वाचनाचा आनंद घेतांना केवढ्या जोराने खिदळतोय हे उशिरा लक्षात आले की आपल्याला हळूहळू पैस चा स्वतःपुरता अर्थ कळू लागतो. तेवढ्या वेळापुरते का होईना आपण जगातील अतिशय श्रीमंत असतो. अस सहज हसू येणं वाटतं तेवढे सोप्पे नाही ना !
याचेच दुसरे उदाहरण, आपण छान गादीवर आणि थंड वातावरणात झोप यावी म्हणून निद्रादेवीची आराधना करत असतो आणि तरीही ती सहज प्रसन्न होत नाही. पण त्याच काळात एखादा भणंग दिसणारा माणूस अगदी देवळाचा ओसरीवर किंवा एखाद्या झाडाखाली दुपारी किंवा सकाळी शांत झोपलेला दिसला की आपल्याला त्याचा हेवा वाटतो. अशी शांत झोप यायला नशीब लागते. त्याच्या सारखे सूखी जीवन लाभावे असे क्षणभर तरी वाटतेच.
तेव्हा श्रीमंती किंवा सत्ता याने तुम्हाला मानसन्मान मिळत असेलही पण सूख तुमच्यापासून कोसो दूर असेल तर त्या सत्तेचा काय फायदा? आपल्यातील कोणत्याही क्षमतेचा विस्तार नक्की कशाने होतो? ते शोधता आले पाहिजे. शांत झोप लागण्यासाठी भरपूर श्रम करावे तर लागतातच मग ते शारिरीक असतील किंवा बौध्दिक असतील पण महत्त्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी मनातील विचारांना पूर्णविराम देण्याची सवयही लावून घ्यावी लागेल. त्यासाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण किंवा चिंतन करून झोपावं लागेल. झोपतांना दुसऱ्या व्यक्ती विषयी मनात असुया असेल तर झोप येईल का? मी हे करतो, ते करतो, तुमच्यासाठी राब राब राबतो अस सतत म्हणत बसलो तर मी मधील अहंकार मला व्यापून टाकेल मग शांतता मिळणार कशी? पैस तर अहंकाराने आणि क्रोधाने व्यापला आहे. त्यात जगण्यातील कृतार्थ भाव नाही हेच तर दुर्दैव.
मनाचा थांग कुणाला सहसा लागत नाही, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखणे फारच कठीण. कधीकधी भावना व्यक्त करायला तोंडाने बोलावे लागत नाही. तुमचे बोलके डोळेच हितगुज करतात आणि या मनातील त्या मनाला सहजच कळते. जे कळते त्याचा अर्थ कुणालाही सांगायचा नसतोच तो अनुभव घ्यायचा असतो. हे भाग्य ज्यांच्या वाट्याला येते ते खरेच थोर. मग हे नाते आई आणि बाळ यांच्यात असेल, दोन प्रेमिकात असेल किंवा भक्त आणि ईश्वर यांच्यातही असेल.
इथे या देहाचे त्या देही सहजच पोचते आणि माध्यम असतो भाव. पण मुळातच तुमच्या मनाची कवाडं उघडी असतील आणि तुम्ही संवेदनशील असाल तरच दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण होईल. तुमच्या सोबत रोज प्रवास करणारी तुमच्याशी बोलणारी मैत्रीण एखाद्या दिवशी गप्प गप्प असते तेव्हा तुम्हाला तिची अवस्था कळते. आज काही तरी बिघडलय ते तिने न सांगता तुम्हाला कळते. मग तिच्या भावनेला साद घालत तुम्ही तिला बोलतं करता. तिचा सल ती सांगताना भाऊक होते. डोळे पाझरू लागतात. कधीकधी हीच गोष्ट संवाद किंवा फक्त हुंदक्यातूनही व्यक्त होते. तुम्ही तिची समजुत काढता. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवता. मग कुठे ती थोडी मोकळी होते. तेव्हा आपल्या मनात दुसऱ्याविषयी ‘पैस’ असेल तरच ती व्यक्त होईल.
जेव्हा मोबाईल नव्हते आणि संभाषण करण्यासाठी डायरेक्ट फोन उपलब्ध नव्हता तेव्हा ट्रंक कॉल करावा लागे, ती त्याचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेलीच असे. त्यांचे संभाषण म्हणजे दूर राहणाऱ्या दोन जीवांची घालमेल आणि भावनेतील ओलावा, तळमळ आणि विरहातही टिकून असणारी ओढ याचे जीवंत उदाहरण असे. दोघांतील स्पेस, अंतर प्रचंड पण त्या दोघांतील पैस एकच ओढ, प्रेम.
बिग बँंग थिअरी ,कृष्ण विवर या सारख्या वैज्ञानिक संज्ञाचा अभ्यास करता विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्याचा खटाटोप लक्षात येतो. या विश्वाच्या मुळाशी जाण्याची धडपड करणारे वेडे नाहीतर काय? किती वर्षे शोध घ्यावा? का म्हणून ते सत्य उलगडण्याचा प्रयत्न करावा? पण मनात ते सत्य उलगडण्याची आस असल्याने दुसरे तिसरे काही दिसतच नाही. इथे पैस एकाच ध्येयाने व्यापला आहे. मग कधीतरी त्यांना समजते हे शिवधनुष्य एका जन्मात पेलणे अवघड आहे.
यत्किंचित बिंदूरूप घन कणाच्या केंद्रबिंदुत साठवलेल्या उर्जेचे बिंदू प्रसरण होत त्याचे रूपांतर महाकाय आकाशगंगेत होणे आणि तरीही तिचा विस्तार सातत्य होत राहणे हे आज अनाकलनीय आहे. पण संतांनी सांगितलेले ईश्वराचे विश्वरूप ते हेच असावे आणि अणूरूप तर आपण ऐकून आहोतच. आज शास्त्रज्ञ सांगतात की दोन आकाश गंगेतील अंतर हळद वाढत आहे याचा अर्थ आकाशगंगेचा विस्तार होत आहे. तेव्हा विश्वाचा पैस किंवा पसारा किती अमर्याद आहे आणि भविष्यात तो किती विस्तारेल ते सांगणे तसे अवघड आहे. विश्वातील सगळ्या मानवजातीला ते आव्हान आहे.
आकाशगंगेत घडणाऱ्या घडामोडींचा आपल्या ग्रहावर देखील परिणाम घडतच असतो. धुमकेतू त्याचेच उदाहरण, उल्कापात हे देखील त्याचेच उदाहरण. मग एखाद्या प्रसंगात बुलढाणा येथील लोणार तयार होते. यासाठी आकाशगंगेत घडणाऱ्या बदलाचा मानवावर त्याचे काय परिणाम होतील? याचा अभ्यास करण्यासाठी नासा अमेरिका,,इस्त्रो भारत, इसा युरोप, आर एफ एस ए रशिया, सीएन एस ए चिन, जाक्सा जपान , व खाजगी स्पेस एक्स या सारख्या संस्था झगडत आहेत. कदाचित चंद्र, मंगळ किंवा आणखी एखादा ग्रह हा भविष्यातील आपले वस्तीस्थान असेल. त्यामुळेच तेथील वातावरणाचा आणि त्या वातावरणात जीवसृष्टी टीकू शकेल का? याचा अभ्यास सुरू आहे. काही अंशी तो यशस्वी होत आहे पण आजतरी त्या बाबत खात्रीशीर दावा करता येणार नाही. पण आपला पैस कुठपर्यंत पोचवायचा याचा विचार सुरु झाला आहे.
आपण मनुष्य, म्हणजे बाल अवस्था ते पूर्ण वाढ झालेला माणूस आणि पुन्हा वृद्धावस्थेत जातांना होणारे बदल अभ्यासले तर लक्षात येईल की बाळाला तो वर्षाचा होईपर्यंत त्याची आई फक्त ‘आई’ किंवा ‘बाबा’ हा दोन अक्षरी शब्द त्याने बोलवा यासाठी किती आटापिटा करते. जर वर्ष दिडवर्षं झाले आणि तरीही बाळ ‘बाबा’ किंवा कोणताही छोटा शब्द बोलत नसेल तर तिची घालमेल सुरू होते. पण एकदा एक दोन शब्द तो बोलला की तिला होणारा आनंद वर्णातीत असतो. त्यानंतर पुढील चार सहा महिन्यात तो असंख्य शब्द, पुढे जाऊन पूर्ण वाक्य बोलण्याची त्याची धडपड हे एखाद्या बिग बँग थिअरी सरखेच आहे. फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. याचा सोपा आईचे सगळे जीवन मुलाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याने व्यापून टाकलेले दिसते त्या व्यतिरिक्त तिच्या मनात फारसे वेगळे विचार नसतात.
बाळ असतांना त्याला बोलता येणारे आई किंवा बाबा हे दोन शब्द, ते वीस पंचवीस वर्षाचा झाल्यानंतर त्याला येणारे लाखो शब्द, मोठं मोठाली वाक्ये, भाषणे आणि कित्येक मोठ्या संकल्पना हे तो मेंदूत सहज लक्षात ठेवतो याचा सोप्पा अर्थ त्याच्या मेंदूतील न्यूरॉन विस्तार पावत त्यांची संख्या कोटयावधी झाली असावी. हा ही मानवी बुद्धीचा पैसच आहे. जर तुम्ही तुम्हाला स्वतःला किती आणि काय काय आठवते याचा शांत बसून विचार करू लागलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमची hard Disk कित्येक ट्रेलियन byte ची असावी.
गेल्या काही वर्षात तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, स्थळे, वस्तू, वेगवेगळ्या प्रसंगी झालेली चर्चा अशा असंख्य गोष्टी तुमच्या लक्षात आहेत. तुम्ही जसे थोडा जास्त जास्त विचार कराल, काही नवीन माहिती वाचाल ती तुमच्या संग्रही साठवली जाईल. यावर विचार केलात की तुमचा पैस तुम्हाला अनुभवता येईल. आध्यात्मिक मार्गातील व्यक्ती वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करते, वेगवेगळे ग्रंथ अभ्यासते ते लक्षात ठेवते याचे कारण मनावर आपण जसे संस्कार करू त्याचा विकास होत जातो. मनाचा पैस सातत्याने वाढत जातो. ती व्यक्ती जास्तीत जास्त वेगाने ग्रहण करायला शिकते. त्याची मेमरी पावर वाढत जाते. त्यासाठी त्याला ट्रेण्ड करणे गरजेचे आहे. सरावाने ते शक्य होते. एखादी व्यक्ती भाषणात तारखेवार अनेक संदर्भ सहज देते तेव्हा आश्चर्यचक्कीत व्हायला होते पण त्याच्यासाठी तो सरावाचा भाग असतो.
जो जो आपण आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा विचार करू आपल्याला पैसचा वेगवेगळा अर्थ लागत जाईल. ग्रामीण भागात आजही मोठ मोठी घरे आहेत. घराभोवती विविध झाडे आहेत. प्रसन्न वातावरण आहे पण दुर्दैवाने घरात राबणारे हात आता थकलेत. घरातील कर्ती माणसे येथे पोटाचे साधन आणि मुलांना चांगले शिक्षण या ग्रामीण भागात देऊ शकत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी मनात नसले तरी शहराकडे धाव घ्यावी लागते. आपल्या आजुबाजूच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मनात जागा करावी लागते. ती जागा जर आधीच नको त्या विचारांनी, विवंचनेने भरलेली असेल तर आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगता येणार नाही.
नाईलाज म्हणून देशातील अनेक लोक कामकाजासाठी शहरात राहतात, ग्रामीण भागातील आंघोळीसाठी खोली असते तेवढ्या घरात शहरात संसार थाटावा लागतो. पांडुरंगा तू अंबानीला अँटलिया दिलस, चित्रपट व्यवसायात असणाऱ्या बहुतेक अभिनेते अभिनेत्री पालीहील, वर्सोवा, मड आयलंड,जुहू येथे स्वतःच्या बंगाल्यात राहतात. बराच अधिकारी वर्ग वरळी,प्रभादेवी, अंधेरी, पार्ले अशा मोठ्या वसाहतीत अपार्टमेंटमध्ये राहतो. या थोरा मोठ्यांकडे, घरकामवाल्या बाईंसाठी किंवा पुरूषासाठी राखीव खोली असते. व्यायामशाळा, स्टोअर रूम , देवखोली असते. अगदी पाळीव प्राण्यांसाठीही खोली असते. याचा अर्थ ते बरेच जणांना सामावून घेतात. त्यांना जास्त जणांचा विचारही करावा लागतो. त्यांचा पैस मोठा आहे. दुर्दैवाने आपण कुपमंडुक वृत्तीने फक्त त्यांची श्रीमंती मोजतो, त्यांचा ‘पैस’ पाहत नाही. कधीकधी ते आठवडा भरात एकदाही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नाहीत. मोकळ्या रस्त्याने फिरू शकत नाहीत. पैसा कमावण्याच्या नादात काही आजार जडले तर आवडते ते खाऊ शकत नाहीत. मनाला वाटलं तरी स्वास्थ्य नसल्याने गुणगुणू शकत नाहीत. त्यांना किती आघाड्यांवर लढावे लागते ते आपण पाहत नाही.आपल्याला दिसतो तो त्यांचा पैसा, बंगला, प्रसिद्धी. त्यांना दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात जावे असे खूप वाटत असेल पण त्यासाठी मुक्त निर्णय घेऊ शकत नाहीत. मग त्यांच्या जीवनात ‘पैस’ आहे असे तुम्ही म्हणाल का?
ईश्वरा, आम्हालाही सर्वांना मोठी जागा मिळाली नाही पण तुझे अस्तित्व आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही तुझी शक्य तशी एका कोपऱ्यात सोय केली. तुझी आमच्यावर कसलीच सक्ती नाही. आम्हीच उगाचच स्वतः ला दोष देतो पण तू मात्र कमालीचा शांत असतोस. खर तर तेव्हा मला माझ्या सारखा तू ही बापडा वाटतोस. एकंदरीत आपल्या दोघांच्या मनात अनेक अडचणींची बोचकी आहेत पण तरीही तू आनंदी आहेस हे पाहून तुझा नक्कीच हेवा वाटतो.
तशा आमच्या वस्तीतील बायकाही संध्याकाळी घराच्या बाहेर अपुऱ्या जागेतही गप्पा गोष्टी करत आनंदात जगत असतात. त्या उगाचच तक्रार करत बसत नाहीत. म्हणजे त्या त्यांची स्पेस मस्त एंजॉय करतात. पण काही माझ्या सारखे कर्म दरिद्री उगाचच स्पेस नाही म्हणत एकतर आपल्या जोडीदाराला किंवा मग दैवाला दोष देत एकाच जागी ठिय्या आंदोलन करत बसून राहतात. त्यांना आनंद कसा मिळणार? त्यासाठी मनात सकारात्मक विचार हवे. वाईटातही चांगले पाहण्याची दृष्टी हवी.
मुंबईत सध्या अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई सुरू आहे. बांगलादेशातील लोक अगदी फुटपाथ अडवून रहात आहेत. त्या समाजाने आपला पसारा नालासोपारा ते जोगेश्वरी आणि माहिम धारावी ते मुंब्रा किंवा टिटवाळा या विशाल भागावर वसाहती उभारल्या आणि त्यांना तेथील नगरसेवक फुकट नागरी सुविधा पुरवतात. शहरातील चाळींवर कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाला रस्त्यावर झोपड्या दिसतही नाही. अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि पक्षाती गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या गरीब लोकांजवळून
पैसे घेऊन त्यांना संरक्षण दिलेले असते. त्या विरोधात कोणी कोर्टात गेले तर कोर्ट म्हणते त्यांना जगण्याचा अधिकार आहे की नाही? कोर्टाला काय माहिती की त्यांच्याकडे असणारे आधार कार्ड हे नकली आहे. पण कोर्ट त्यांच्या मताचा आदर करते. माणुसकी दाखवते.
मुंबईत कामाधंद्यासाठी आलेला मुळ भारतीय नागरिक मात्र जागेच्या अभावी टिटवाळ्यात किंवा वांगणीला रहायला गेला. कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडत असू. आम्ही ज्यांना मते देतो ते प्रसंगी आम्हाला वाऱ्यावर सोडतात. दहशत माजवून सरकारी किंवा कुणाच्या जागा हडप करणे आम्हाला जमत नाही शिवाय आम्हाला कोणत्या पक्षाचा पाठींबाही नाही. चिरीमिरी देऊन नगरपालिका वार्डातील अधिकाऱ्यांना खुश करायचे तर मला खिसा नाही आणि मनीपर्स बाळगायची तर आधी मनी हवेत ना? तरीही हे सत्य की आपली मुंबईत रहायची लायकी नाही. आता पैस या विषयावर लिहायच कसे सुचले? तर मला शहरात घर घेण जमलं नाही म्हणून तुम्हाला जमणार नाही, जमूच नये असे मला नक्कीच वाटत नाही म्हणून नकाराचा अनुभव देऊन सकारात्मक बदल घडवावा अशी इच्छा निर्माण झाली. म्हणून हा प्रपंच.
समाजात असे कित्येक विद्वान आहेत की ते ७०-७५ व्या वर्षी काहीतरी नवीन शिक्षण घेतात. त्या शिक्षणाचा फायदा विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना देतात. एवढा उपद्व्याप करूनही लिखाणही करतात, ते जर्नल छापून आणतात आणि त्यांचा सन्मान होतो.मग त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी स्पेस कोणी पाठवली का? जीवनात ज्यांना काही साध्य करायचे असते ते संकटांचा सामना करतात. स्वतःचा पैस स्वतः शोधतात. विपरीत परिस्थितीत कला साधना करतात. ताक घुसळून ‘नवनीत’ काढणाऱ्या कष्टकरी कलाकारांना यश मिळते. त्यातील कोणी भीमसेन तर कोणी जितेंद्र अभिषेकी होतो. बहिणाबाई चौधरी, शांताबाई शेळके असोत की दुर्गाबाई भागवत किंवा फारस शिक्षण न झालेल्या सिंधुताई सपकाळ त्या स्वतःचे भाग्य स्वतः घडवतात. जगाचा भलाबुरा अनुभव घेऊन त्याच नेमक सार तुमच्याकडे पोचवतात. मित्रांनो तुम्हाला कोणी आयते काही देणार नाही त्यासाठी संघर्ष करावाच लागेल. तुमच्या माहितीतील पेडणेकर मँडम, अंधारे मँडम, चित्रा वाघ यांनी राजकरणात आपली जागा निर्माण केली की नाही? प्रियांका चोप्रा, दिपिका पादुकोण, ऐश्वर्या , माधुरी दिक्षित यांनी कला क्षेत्रात पैस मिळवले की नाही?
कोणे काळी अंधारे मँडम शिवसेना आणि बाळासाहेबांच्या बाबत सडकून टीका करायच्या पण त्यांना अचानक उपरती झाली आणि त्यांनी आपले अगाध ज्ञान उध्दव चरणी अर्पण करायचे ठरवले. पाहता पाहता शाखेतील इतर महिलांच्या तुलनेत त्यांना झटपट सन्मान मिळाला. कारण त्यांच्या शाब्दिक तोफेची किंमत पक्षाला कळली. त्याचा पैस किती मोठा आहे ते समजले. अनेक पक्षात फिरून आल्याने त्यांना उबाठात अनुभवी म्हणून लवकर स्थान मिळाले. अर्थात कमळाबाईच्या दारी असाच व्यवहार सुरू आहे. ज्यांनी पक्ष कार्यासाठी उभं आयुष्य वेचल त्यांना ठेंगा आणि जे उडी मारुन आले त्यांना पंचपक्वानांचं भरले ताट. तेव्हा आपल्याला स्वतः चा शोध घ्यावा लागेल.
अर्थात ज्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल त्याला तो मार्ग दाखवतो, त्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टींनी खचून जाऊ नये. उलट जी गोष्ट पहिल्या प्रयत्नात साध्य झाली नसेल तर तिच्या बाबत मनात अभ्यास आणि ध्यास दोन्ही आवश्यक आहे. आधी मनात इच्छा हवी तर मार्ग आपोआपच दिसतो. प्रगती कशात करायची? हा ज्याचा त्याचा प्रश्न ,काही अध्यात्म मार्गात पंडित होतात. काही शेती क्षेत्रात तर काही तंत्र कौशल्यात आणि काही राजकारणात.
पंतप्रधान पद एकच, मग ते मोकळे नाही, मी उगाचच त्याच्या मोहात पडून कष्ट का करू? ही झाली कूपमंडुक वृत्ती. तुला पंतप्रधान व्हायचे आहे ना? मग त्या दिशेने कर की प्रयत्न. ती जागा भरलेली आहे असे का समजावे? मोदी आधी प्रचारक होते, मग संघटक झाले, मग आमदार मंत्री, मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान. त्यांनी स्वतःच्या मनाशी म्हटले असते,
पंतप्रधान पदी मनमोहन सिंग आहेत मी उगाचच प्रयत्न करून वेळ का घालवू? तर ते कधीही पंतप्रधान झाले नसते. त्यांनी आपले काम सुरू ठेवले. कामातील शिस्त अनुसरली,आपल्या भोवती आपलं निमूटपणे ऐकतील असे अनुयायी तयार केले आणि पाहता पाहता सत्तेच्या सर्वाच्च घोड्यावर नुसतेच स्वार नाही झाले तर त्याचा लगाम बळकट हातात घट्ट धरून ठेवला. ते या पदासाठी इच्छुक होते तेव्हा त्यांच्यापेक्षा अनुभवी अनेक व्यक्ती त्याच पदाची इच्छा ठेऊन रांगेत होत्या.
प्राप्त परिस्थितीत आपण जास्त योग्य आहोत हे त्यांनी कधी चुचकारून तर कधी डोळे मोठे करून पटवून दिले. जे वयोजेष्ठ आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, त्यांचा योग्य सन्मान पक्ष करेल असे पटवून देत त्यांना स्पर्धेतून दूर ठेवण्यात ते यशस्वी ठरले आणि मग त्यांचा काळ सुरू झाला. मदमस्त हत्ती चालतांना आपल्या पायाखाली काय आले ? किंवा पाठीमागून कुत्री भुंकतात का? याची दखल घेत नाहीत. मोदींनी अशा मदमस्त हत्तीची संथा घेतली. कोणी कितीही ओरड घातली, कोणी कितीही शरसंधान केले तरीही लक्ष द्यायचे नाही अस ठरवून त्यांनी स्वतःसाठी स्पेस निर्माण केली. त्या स्पेसच्या आजुबाजूला कोणी फिरकू नये म्हणून मजबूत फळी तयार केली. आता दिल्ली येथील राजभवनात त्यांना भरपूर पैस आहे त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आयडीया सूचत असतात. त्या कल्पना युनिक असतात. ३७० कलम रद्द करण्यापूर्वी त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आपले संख्याबळ वाढवले. राममंदिर बांधतांना त्यांनी भारतभर मोहीम राबवत समाजात प्रतिनिधी पाठवून जनतेचा कौल घेतला. नवीन संसदभवनाला त्यांनी सेंट्रल व्हिस्टा नाव दिले ज्यात सेंगोल किंवा राजदंड प्रस्थापित केला.
राजपथ ते कर्तव्य पथ हा एकच बदल नाही तर असे शेकडो बदल दिल्लीच्या आसमंतात घडत आहेत पुढेही घडतील. गुलामगिरीची मानसिकता आता पूर्ण संपविण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे त्यामुळे भविष्यात दिल्लीच्या जागी इंद्रप्रस्थ असेल याची खात्री बाळगा. पैस मिळाला तर माणूस आपल्या मनातील गोष्टी सत्यात कशा उतरवू शकतो याचे आजची दिल्ली उदाहरण आहे. मात्र अति आत्मविश्वास कधीतरी घातक ठरतो. सत्ताधारी पक्षाने सत्तेत बळाचा वापर करून राज्य केले तर त्यांच्या विषयी जनतेच्या मनात रोष उत्पन्न होतो. प्रत्येक गोष्ट रेटून साध्य करणे हा चुकीचा पायंडा सध्या राजकारणात दिसत आहे. आपल्या लोकसभेचे काम याच आधारे चालणे ही शोकांतिका आहे.
पण आज विरोधी पक्षातील नेते राहुल गांधीही आपला पैस राखून आहेत हे कबूल करावे लागेल. मोदींच्या ताफ्यात अनेक मात्तबर राजकरणी असुनही लोकसभेच्या प्रत्येक सत्रात मांडलेल्या वेगवेगळ्या विधेयकातील नेमक्या त्रुटी शोधून राहुल गांधी जनतेच्या मनातील शंका सत्ताधारी पक्षाला विचारत आहेत. सत्ताधारी पक्षाकडे राहुल गांधी यांच्या काही प्रश्नांची उत्तरे नाहीत. लोकसभेत विरोधक संख्येने कमी असल्याने सत्ताधारी पक्षाने मांडलेले विधेयक आवाजी मंजुरीने पारित होईल पण विरोधकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
मित्रांनो बीग बी आज ऐंशी वर्षांचे झाले, पण कौन बनेगा करोडपतीच्या सिटवर ते मांड ठोकून आहेत. खरे तर अमिताभ यांना ‘ते’ अस म्हणण आदरार्थी वाटतच नाही तर त्यांना तो अमिताभ म्हणून संबोधण जास्त भावते. कधीकाळी त्याची अवास्तव उंची आणि खर्जातील आवाज हा त्याच्या अभिनेता बनण्यातील मार्गात अडथळा होता पण अतिशय मेहनतीने आणि शिस्तबद्ध आचरणांने त्यांनी याच वैगुण्याच संधीत रूपांतर केल. ‘मेरे आंगनेमे तुम्हारा का काम है’ किंवा ‘खै के पान बना रसवाला’ किंवा ‘घने जंगलोमे गुजरता हुवा कही जा रहा था’ ही अस्सल त्याच्या आवाजातील टीपीकल गाणी आहेत जी त्याची क्षमता दर्शवतात. त्याला चित्रपट इंडस्ट्रीन बरेचदा नाकारले होते यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? पण ते सत्य होते. सुरवातीच्या काळात त्याने खूप स्ट्रगल केले आहे. अर्थात काही अति काल्पनिक सांगतात जसे की ‘मैने शूरू शुरू मे रास्ते पर दिन निकाले’ ते मनावर नाही घ्यायचे. आपल्या जीवनात त्यांनी इतक्या भुमिका केल्या की त्याचा पैस मांडणे अशक्य व्हावे.
ड्रामा मांडल्याशिवाय ग्लॅमर मिळत नाही, चमत्काराशीवाय नमस्कार नाहीच नाही. असा अनेकांचा समज आहे, समाजाचा दंडक आहे. पण अमिताभ नावाच्या साडेसहा फुट माणसाने आपली स्पेस स्वतः मिळवली हे मान्य करावेच लागते. यासाठी प्रचंड मेहनत आणि शिस्त हेच कामी आले. आता त्याचा पैस प्रचंड मोठा आहे. त्याचे किती बंगले आहेत. किती करोड बँलन्स आहे किंवा परदेशात कुठे कुठे खाती आहेत ते मी सांगत नाही तर त्या नावाच्या समोर मोठमोठ्या हस्ती आदराने झुकतात. त्याच्या सतत स्वतः ला कामात मग्न ठेवण्याच्या सवयीला दादा देतात आणि हाँटसिटवर बसणाऱ्या व्यक्तीच्या मनात अमिताभ जो मोकळेपणा आणि आदर निर्माण करू शकतात त्या त्यांच्या क्षमतेला दाद देतात. त्याअर्थी अमिताभ यांचा पैस आणि कोणत्याही भुमिकेत शंभर टक्के देण्याचा अवाका हा वर्णनातीत आहे.
जर हेच ग.दी.मा आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर सरस्वतीचा हस्त ज्यांच्या चरणावर होता आणि शब्द ज्यांना सहज वश होत होते ते ग. दी. माडगूळकर यांच्या भावपूर्ण गितांनी आणि सुधीर फडके यांच्या गळ्यातील सुरांनी, त्यांच्या गीतातील भावना संगीत प्रेमींच्या कानापर्यंत पोचवल्या आणि मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ? ते आपल्याला समजले. त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील पैस किती व्यापक होता त्याची साक्ष म्हणजे त्यांच्या निधनानंतर गेले कित्येक वर्षे त्यांच्या कलेने आपण तृप्त होतो तेव्हा पटते. आजही गीत रामायण ऐकतांना त्या स्वरांनी भारावून जायला होते जणू काही कथानक आपल्या समोरच घडत असल्याचे वाटते.
कोणताही कलाकार एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो तेव्हा त्याला आनंदच होत असतो. श्रवणबेळगोल येथील गोमतेश्वराची मुर्ती घडवणीरा पाथरवट न थकता,न थांबता छिन्नी आणि हातोडा घेऊन कित्येक वर्ष उन्हापावसात, कडाक्याच्या थंडीत प्रचंड उंच अशा एकसंध पाषाणातून मुर्ती घडवत होता. ध्येय एकच, त्याच्या मनात असलेले शिल्प घडवणे. ही एकाग्रता हेच त्याच्या पैस चे उदाहरण आहे. जगण्याला उद्देश हवा ,निश्चित ध्येय हवे,डोळ्यासमोर आव्हान हवे मग अशक्य काहीच नाही.
आपला पैस आपणच ठरवावा, तो कुणी दुसरा ठरवून देणार नाही. पण आपला पैस ठरवतांना दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आक्रमक होत नाही ना याचा विचार केला तरच माणूसकी शिल्लक राहिल अन्यथा मानव आणि पशूत फरक तो कोणता?