भेळ

भेळ

आपल्या घरात काय घडते? आपल्याला कळत नाही
सोशल मेडियावरून कळते आपली म्हैस फळत नाही

कोण कोणत्या पक्षात, रात्रीतच बदलतात शेकडो बॅनर
मॉर्निंग वॉकला, होते मनात उलटी, हतबलतेने झुकते नजर

काल काय झाले? खरेच आठवत नाही, आज वेगळा गजर
काल पर्यंत ती ड्रेसमध्ये होती, आज अचानक घेतला पदर

मन घट्ट केले तर तत्व गुंडाळून रात्रीत कापता येते क्षणात अंतर
मशाल पेटवून दिसत नसेल तर चुकले काय? शोधावे लागते उत्तर

एकाच घरात दोन पक्ष, नाईलाज, आईचे मन दोलायमान
नवरा की मुलगा? प्रश्न अनुत्तरित, तिचा नाही तयार कान

त्यांचा चाळीस वर्षाचा दबदबा यांनी केली दोन दिवसात घाण
त्यांच्याकडे पक्ष नेतृत्व, पुत्रांच्या स्पर्धेत यांचा घुसमटला प्राण

पती पत्नीत नाही बिड, वेगळ्याच दिशेला सौ मुंडीचे शीड
तिच्यावर झालेत हल्ले, ती घाबरत नाही तिची चेपली भीड

कमळाचा दांडा धरावा? का घड्याळचा काटा मोडावा? नाही कळत
गांडीव धरावे, की घ्यावा हाती हात, मुळीच अक्कल नाही चालत

नावात पैसा, जय असुनही काहीकेल्या रूतलेलं चाक नाही पळत
कोणालाही चुचकारले तरी आरोपाचा डाग राहिलाय तसाच छळत

लोकचर्चा चाले, पक्षासाठी हुजरेगिरी, ते झालेत बिजेपीचे मिंधे
भाऊबीज कामी आली, पैसे नागरीकांचे, चमकून गेले येथे बंदे

विरोधकांचे फारच हाल, फंड नाही, हप्ता नाही, खायचे झाले वांदे
कसले धरणे? कसला मोर्चा, सगळा लोचा, स्वस्त झालेत फक्त कांदे

काहीच हाताला लागत नाही, यांचे सगळेच तर झालेत बंद धंदे
घरी शांत बसवत नाही, श्रेष्ठी बोलवत नाही, झुकले दोन्ही खांदे

प्रामाणिक कार्यकर्ता असाह्य, पक्षात हौशागौशांची येथे भेळ
प्रत्येक पक्षात कित्येक गटतट, कोणाचा कोणाशी नाही मेळ

सांगा या निवडणुकीत इज्जतीत मत द्यावं असा कोणी आहे का?
ते गोड हसतील, ‘साहेब’ म्हणतील, ठरवा, तुम्ही स्वतःला विकणार का?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *