mobile-raj

मोबाईल राज आणि सुजाण प्रजा

               आज लहान मुलांच्या,अगदी तीन साडेतीन वर्ष वयाच्या मुलांच्या हाती मोबाईल असतो आणि तो मोबाईल त्यांना सहज हाताळता येतो. त्याच्यावर अनेक गेम असतात, ते गेम त्यांना कुशलतेने खेळता येतात आणि तो पालकांच्या कौतुकाचा विषय असतो. ही छोटी मुले ज्या शिताफीने SubWay surfer, Fall guys, Call of duty, Temple run इत्यादी खेळ खेळतात, ते पाहता त्यांचे Hand-Eye coordination उत्तम असते ह्यात वादच नाही. मुख्य म्हणजे हा खेळ अगदी तन्मयतेने ते कितीही वेळ खेळू शकतात. 

वय वर्षे तीन ते सहा या काळात शाळा ही अवघी दोन किंवा तीन तास असते. परिणामी लहान मुले बराच वेळ घरी मोकळी असतात, या मुलांना सतत काही तरी नवीन उद्योग करावासा वाटतो त्यामुळे पालकांना त्यांनी केलेला उद्योग आवरत बसावा लागतो. यात पालकांचा किती वेळ जातो तो त्यांनाच माहीत. साधं मुलांना सकाळी किंवा दुपारी नाष्टा किंवा जेवण भरावायचे झाले तर दोन तीन तास पुरत नव्हते. मोबाईलने त्यांचं काम सोप्पं करून टाकलं. एखादं कार्टून मोबाईल वर लावलं की हीच मूल त्याचं जेवण दहा मिनिटात आवरतात हे सुज्ञ आईच्या लक्षात आलं. तिने  मोबाईल आपल्या बाळाच्या हाती दिला तो त्या स्क्रीन वर रमला.

या मुलांच्या पालकांना आपल्या मित्रमैत्रिणी,नाते वाईक मंडळी यांच्याशी निवांत गप्पा मारायला वेळ मिळू लागला. महिला तर स्वयंपाक करता करता आपल्या मैत्रिणीशी सुसंवाद साधू लागल्या. मैत्रिणीने किंवा माहेरून “रविवार ना ! काय आज मेनू?” एवढं म्हणण्याचा अवकाश लगेचच video कॉल करून मेनू याची देही याची डोळा दाखवून मोकळ्या. किती हे फायदे, तिथे मूल गेम मध्ये व्यस्त आणि पालक त्यांच्या मित्र मैत्रिणी यांच्या संवादात व्यस्त. 





यांची मोठी मुले त्यांच्या मित्र मैत्रिणींशी कसा संवाद साधतात ते अजूनच निराळे. WhatsApp रुपी संजयच्या मदतीने यांच चॅटिंग एवढं वेगाने सुरू असते की  stenographer ही पोस्ट कुठे निर्माण झाली तर यांची निवड निर्विवाद. त्यांच्या हाताची चपळता खरंच वाखणण्याजोगी. कोणी वेगा वेगात बोलू लागले तर, जीभ लवलवते असे आपण म्हणतो पण ह्यांची बोटं लवलवतात असं म्हणावेसे वाटते. कधी कधी हा Whatsapp संवाद तास तास सुरू असतो. तेच video कॉल चे. व्हिडिओ conferrence सुरू झाली की ही तरुणाई किती आणि कोणत्या कोणत्या विषया बद्दल बोलेल कुणीही अंदाज बांधू शकणार नाही.

आताशा हा खेळ संक्रमित होत सर्व वयात शिरतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण ही ग्रुप कॉन्फरन्स सुरू झाली की वेळेचे भान हरपते आणि नाईलाज म्हणून आठवण करावी लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण होते.

ना कोणाचे कोणाशी समोरा समोर  संभाषण ना कोणाशी कोणाचा वाद या मुळे घर अगदी शांत शांत. किती हा मोबाईल रुपी यक्षाचा फायदा. जेव्हा Android phone बाजारात आले तेव्हा त्या मोबाईल वरील अनेक application आम्हाला, म्हणजे जे आता पन्नाशी पार केले आहेत त्यांना कळत देखील नव्हते, आजही त्यातील अनेक application आम्हाला माहीत नाहीत, गरज लागेल तशी, ती आम्ही आमच्या मुलांकडून शिकून घेतो. पण आठ ते दहा वर्षाचा मुलगा अथवा मुलगी त्यातील अनेक गोष्टी सहज साध्य करतात. आता तर मुलांचा अभ्यास ऑनलाईन त्यामुळे मुलगा अभ्यास करतो की गेम खेळतो हे पालक स्वतः त्याला विचारत नाही किंवा पहात नाही तो पर्यंत पालकांना कळणे शक्य नाही. चार दिवसांपूर्वी कोण्या सुज्ञ पालकाने न्यायालयात “Online” तासिका वाढवाव्या म्हणून याचिका केली होती. तथापि ही बाब आमच्या कार्य कक्षेत येत नाही आपण राज्य शासनाकडे या बाबत माहिती घ्यावी असा शेरा मारत याचिका निकाली काढली. हल्ली कोणीही आणि कशा साठीही न्यायालयाचे दार ठोठावते त्यामुळे त्याचे अवमूल्यन होते हेच सगळे विसरत चाललोय. ही Online तासिका वाढवण्याची याचिका का केली असावी, तर हे Online अभ्यास वर्ग सुरू झाल्यापासून मुले  खूप वेळ घरी मोकळी असतात त्यामुळे पालकांना ती व्यस्त राहिली नाही तर वेगळे उपक्रम सुरु करतील याची खात्री आहे म्हणून ही काळजी, मुले अन्य काही करतात  हे पाहण्यासाठी पालकांना आपल्या मोबाईल व्यस्त वेळतून मोकळीक मिळाली तर ना!

या मोबाईल रुपी जादूगाराने सगळ्यांना इतक डोळस बनवलं आहे आणि त्यांचा मेंदू इतका तल्लख बनवला आहे की हा मोबाईल रुपी मेंदू जवळ बाळगल्याशिवाय यांना झोप येत नाही. अगदी रात्रीच्या दोन वाजताही यांचे WhatsApp कार्यरत असतात. किती ही कार्यक्षमता. मोबाईल ने ‘टूट’ असा आवाज केला की लगोलग ह्यांचा हात कोणाचा आणि काय मेसेज आला तो पाहण्यासाठी लगबग करतो. वयात आलेली मुले आणि त्यांचे पालक यांचे वाद होण्याचे प्रमाण या मोबाईल ने कमी केले. “डँडी आणि मम्मी मोबाईल वर व्यस्त आणि मुले चॅटिंग मध्ये मस्त”. त्यातून प्रश्न विचारला तर उत्तर तयार हे काय मित्राकडून assignment घेत होतो. त्यांची स्क्रीन इतक्या वेगात बदलते की पालकांना आक्षेप घ्यायला जागाच नसावी. 





थोडक्यात या मोबाईल जादुगाराने आपल गारूड लहान मुले ते पालक आणि निवृत्त आजोबा यांच्यावर सारखच केल असल्याने कोणी, कोणाला बोलायचे? आणि कोणी कोणाला उपदेश करायचे?तुम्ही बोलू नका आणि मी ही काही सांगत नाही. आता “YouTube ” उपलब्ध असल्याने वेळ कसा घालवावा असा प्रश्र्न कोणालाच पडत नाही. महिला त्यांच्या Recepies  पाहण्यात आणि करण्यात व्यस्त. घरी असणारे निवृत्त YouTube वर वेग वेगळ्या नेत्यांची भाषणे, उपोषण, मोर्चा यांचे बाईट पाहण्यात व्यस्त, ज्यांना राजकारणात रस नाही भजन, कीर्तन, निरूपण पाहण्यात व्यस्त, मुले रियालिटी शो आणि त्यांना आवडणारे Netflix चे चित्रपट पाहण्यात व्यस्त. सांगा इथे कुटुंबात कोणाला कोणाशी बोलण्यासाठी वेळ आहेच कुठे?

हे वर्ष हे कारोना नावाच्या राहूने ग्रासले, न भूतो न भविष्यती अशी अघोषित टाळेबंदी प्रत्येक घरी लागली. कोरोना विषाणूचा आणि त्याच्या दाहकतेचा विचार करता दहा वर्ष वयाची मुले आणि मोठ्या वयाची लहान मुले ही त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने या आजाराचा सहज मुकाबला करू शकणार नाहीत म्हणून त्यांच्यावर अधिकची बंधने लादली गेली. लहान मुले किती काळ चारशे, सहाशे चौरस फूट जागेत स्वतः ला बंदिस्त करू शकतील. मोठ्या माणसांना कोंडून ठेवण्याची बातच सोडा. “अरे किती पावसाळे आम्ही पाहिले, दुसरे महायुद्ध पाहिले, प्लेग पाहिला, चीन आणि पाकिस्तान युद्ध पाहिले, पुण्याचं पानशेत अनुभवलं आणि बांगलादेश युद्ध पाहिले आणि आणीबाणी पहिली. BirdFlu पाहिला,अगदी Bomb blast आणि २००५ ची वर्षा वृष्टी पाहिली, म्हणून अंग गाळल नाही की पाठ ही फिरवली नाही किती संकट झेलली ते आम्हालाच ठाऊक. आम्ही काय या फालतू आजाराला घाबरतो काय?” त्यांचं वीरश्री युक्त भाषण ऐकल्यावर त्यांची वयातील मूल त्यांना काय सल्ला देणार? तर एकंदरीत असा हा भीषण आणि भयानक काळ. पण तरीही धोक्याची घंटा वाजवून सावध करणे हे आता घराची आणि घरग्रहस्थी स्वीकारलेल्या मंडळींचे काम हे तर खरे.

संपूर्ण जगात जी भयावह स्थिती आहे आणि अजूनही ना लस उपलब्ध ना त्यावरील खात्रीशीर उपाय.बरे हॉस्पिटल्स रुग्णांनी भरलेली आहेत आणि खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना लुबाडण्याचा गोरखधंदा करत आहेत त्याला पायबंद घालण्यास शासन समर्थ नाही. त्यामुळे त्यांची भूमिका फारच जोखमीची वयाने मोठ्या असणा-या व्यक्तिंना दुखवायचं नाही आणि त्यांनी केलेली शेरेबाजी सहन करत मार्गही काढायचा. “यार करोना तो सचमुच गूरु निकला, कूछ न कहते हुये सब कुछ सिखा रहा है.”

या अशा संकटग्रस्त काळात ख-या अर्थानी कुणी सावरलं असेल तर ते इंटरनेटवर असणा-या विविध अँप सुविधांनी. घरी बसून घरातल्या साहित्यापासून ते औषध मागवण्यापर्यंत सार काही साध्य झालं. On Fingertip.

मोबाईल रुपी जादुगाराने या मोठ्या माणसांना आपल्या चांगलच नादी लावलाय, या ज्येष्ठ मंडळीनी स्वतःचे WhatsApp group केले आणि उध्दव, राज,  योगी आदित्य नाथ,मोदी,शहा, अजितदादा, फडणवीस, सोनिया, पुत्र राहुल,सचिन पायलट, सिंदिया आणि आता आता निर्मला सीतारामन या थोरामोठ्यांना आपल्या चर्चेचा विषय बनवून त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयाविषयी त्यावर यथाशक्ती वाद घातले. यांचे ठाकरे ग्रुप, मोदी ग्रुप, डावे, राहुल ग्रुप, उजवे, कडवे, मवाळ असे अनेक पंथ तयार झाले. दिवसाचे दोन चार तास या वाद-विवाद आणि मतमतांतरे यात जाऊ लागले. त्यामुळे घरातील वाद नक्की कमी झाले.भले मित्रांमधले मतभेद राजकारण चर्चेने वाढले, काय फरक पडतो. नाहीतरी घरी बसून उद्योग आहेच कुठे?

अंबानींच्या आणि इतर मोबाईल नेटवर्क कृपेने WhatsApp रुपी संवाद होत राहिले त्यामुळे घर शांत राहिले आणि ही मोठ्या वयाची लहान मुले घरी असूनही घरच्या सदस्यांना त्रास न देता व्यस्त राहिली. केवढा हा Android phone चा फायदा आणि स्वस्त network पुरविणाऱ्या कंपनीचा त्याग. अर्थात तरी काही कारणासाठी ते घरा बाहेर पडणार हे सुर्यप्रकाशाइतके सत्य होते. मग त्यांची पेन्शन बँक किंवा पोस्ट यातून घेऊन येणे असूदे किंवा चष्मा दुरुस्ती असूदे अशी छोटी मोठी घरा बाहेर जायची कारण होतीच. तरीही या मोबाईलने बरेच व्यवहार शक्य होत असल्याने मी लाईट बील,पाणी बील किंवा अशाच कोणत्या तत्सम कारणासाठी जातो असे म्हणण्याचे धाडस आता मोबाईल internet banking सुविधेनी संपवले हे खरे.





तर ह्या whatsapp ग्रुप वरील चर्चा मोठ्या मनोरंजक आणि आपल्याला राजकारण कस नीट कळतंय हे सांगणाऱ्या असतात. कोणत्याही घटनेवर मत व्यक्त करणं हा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि तो मी बजावणारच अशी शपथ घेतल्या प्रमाणे ती ऑनलाईन Chat चर्चा चालते. हे शब्दयुद्ध, धर्मयुद्ध असल्याप्रमाणे दोन्ही पक्ष लढत असतात. त्यासाठी कोणती पुराणातली उदाहरणे दिली जातील त्याचा नेम नसतो. अगदी संस्कृत

सुभाषित वापरून आपल्या विधानाला वजन आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. कधी कधी या ग्रुप मधील इतर सदस्य या चर्चेच्या होमात समिधा अर्पण करण्यात धन्यता मानतात. होम चांगला प्रज्वलित झाला की हे काठावर बसलेले बगळे आपले कार्य संपले असे समजून चर्चेतून गायब होतात आणि हा धगधगता अग्नीकुंड कोणतरी मध्यस्ताला शांत करण्याचं पाप करावं लागत. पाप अश्यासाठी की हे युद्धखोर त्यालाच बळी बनवतात. त्यांचा रोख असा असतो की उद्घव किंवा मोदी, किंवा योगी या महाशयांचा  सल्ला घेवून त्यांचे धोरण ठरवत असावेत. ते वयाने सीनिअर असल्याने राजकारण्यांनी  घेतलेले निर्णय किती चुकीचे आहेत हे सांगण्याचा हक्क त्यांनी कोणी न देताच घेतलेला असतो. 

घरी हे युद्ध निशब्द चालत असल्याने तसा त्यांचा घरातील कोणाला त्रास होत नाही. अर्थात कधी कधी त्यांच्या समोर ठेवलेले पोहे, चहा थंड झाला तरी ह्यांची या चर्चेत किंवा पक्षिय बाजू घेण्याच्या युध्दात तन्द्री लागली असल्याने त्यांना काही फरक पडत नाही. इतर वेळेस मात्र चुकीने ह्यांना थंड चहा दिला गेला तर घर डोक्यावर घ्यायला कमी करत नाहीत. जर हा मोबाईल फोन नसता तर यांना शांत घरात बसवणे कोणाला शक्य झालं असत का? तेव्हा सर्व मोठ्या वयातील लहान मुलांना शांत ठेवण्यात Android phone and  cheap internet service यांच योगदान आहे म्हणायला काहीच हरकत नाही.

आपण जाहिरात पाहतो, नातू आजोबांचं काम घर बसल्या करून देतो आणि आजोबांना आपला नातू फार हुशार असल्याचा शोध लागतो. ही सर्व किमया information at fingertips ची आहे हे मान्य करावेच लागेल. मोठ्या माणसांचे, तेच लहान मुलांचे,आमच्या शेजारी तीन साडेतीन वर्षांची मुलगी आहे. ती कोणी जिना उतरत असेल तर बिनदिक्कत विचारते “आजोबा कुठे चाललात? बाहेर जाऊ नका, बाहेर करोना फिरतोय, आजी त्यांना बाहेर पाठवू नको”. ही मुलगी आईचा मोबाईल घेऊन त्याच्यावर गेम खेळत बसते. मला आमचे लहानपण आठवते घर हे जेवणे, खाणे आणि झोप किंवा विश्रांती यासाठी असते असा आमचा समज होता. शाळेचा गृहपाठ कधी संपवतो आणि कधी मैदानात खेळायला जातो असे होत असे. दिवसाचे किमान चार सहा तास आम्ही रस्त्यावरील चंचेचे झाड या पत्त्यावर सापडत असू त्यामुळे शोध काम करायला लागत नसे.किती प्रकारचे खेळ,डब्बल एक्सप्रेस, आबाधुबी, लगोरी सुर पारंब्या, रुमाल सोडी, tug of war, लंगडी, आंधळी कोशिंबीर, खांबशीपी नावे सांगूनही संपणार नाहीत त्यामुळे भरपूर कसरत व्ह्यायची. मातीत खेळलो तरी व्हायरस आमच्या वाट्याला आला नाही. आम्हाला आजार म्हणजे ढोपर फुटणे, पाय सायकलच्या चेन मध्ये जाणे, चप्पल नसल्याने पायात काटा, काच जाणे आणि फारच फार तर खूप कै-या खाल्ल्याने सर्दीखोकला होणे. पण ठेच लागली किंवा जखम झाली तर लवंग घरच्या  तुपात भाजून वाटलेली मलम आणि सर्दी झाली तर अडुळसा, कृष्ण तुळस, बेल वावडींग आणि गुळ यांचा काढा. एवढ्यावर भागलंच नाही तर चण्याचा लसणाची फोडणी आणि लवंग घातलेला रस्सा. काय बिशाद सर्दीखोकला आणि पडश्याची. असे मजेचे दिवस होते.भाकरी बरोबर लसूण पाकळ्या किंवा कांदा हा नाष्टा होता. ना बर्गर, ना नुडल्स, ना चायनीज भेळ, त्या ऐवजी भरपूर पेज पाणी आणि असमाधान पचवायला मार खाल्ला त्यामुळे immunity भरपूर निर्माण झाली.

 कब्बडी, खो खो, कुस्ती, पकडा पकडी हे खेळ आजही जेथे राहाता तेथे खेळणे शक्य आहे, तेव्हा Mobile, Laptop, internet या मधून प्रथम तुम्ही डोकं बाहेर काढा आणि मुलांना घेऊन तुम्ही खेळा तर विना Horlicks, Bournvita आणि Chavanprash मुलांची immunity Boost होईल आणि स्वास्थ घरोघरी नांदेल. आता सर्वत्र पसरलेली ह्या Carona ची भीती आणि क्षती कमी होवो आणि लवकरच एकदा भिती मुक्त वातावरण निर्माण होवो या साठी शुभेच्छा.

पण सर्व ज्ञानी आणि सुसंस्कृत मित्र मैत्रीणीना विनंती या काळातही घरी तर घरी मोबाईल वरचा व्यायाम कमी करा आणि शक्य ते योगा प्रकार किमान अर्धा तास करण्यासाठी वेळ काढा आपल्या पिल्लांना तुम्हीच चांगले उदाहरण घालून द्या.

असो, तर आग्रह नाही पण विनंती आहे हे अरिष्ट दूर झाले की आपल्या पिल्लांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही खेळा, निरोगी आणि आनंदी जगा. निसर्गाशी संवाद साधा, मोकळ्या वातावरणात फिरायला जा.

सर्वे ऽपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:|
सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्र्चिद् दु:खमाप्नुयात् ||

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar