वर्तुळ

वर्तुळ

कधीकधी आपल्या जीवनात एखादा प्रसंग अचानक घडतो आणि असं का घडलं? याची कारण मिमांसा आपण करत रहातो, कधीतरी उत्तर सापडते तर कधीतरी त्याचा थांगपत्ताही लागत नाही. फक्त एकच जागा भरायची असतांना अनेक उमेदवारांमधून तिची शाळेत निवड झाली तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले. राजे शिवाजी विद्यालयाची जाहिरात पेपरात आली तेव्हा तिच्या आत्याने तिने नशीब अजमावावे म्हणून त्या जाहिरातीचा फोटो तिला व्हाट्सऍप केला होता. गणित-विज्ञान विषयाचे ८ वी ते १० साठी ची सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा होती. तिचं ग्रॅज्युएशन कोकणात कुडाळ येथे झाले होते तर B.Ed, सावंतवाडी येथील महाविद्यालयात झाले होते. कोकणातच मालवण येथील भंडारी एज्युकेशन, पाटाची स. का. पाटील विद्यालय अशा शाळेत तिने काही महिने रिलीव्हर म्हणून शिकवले होते पण सगळाच अनुभव वर्ष दिड वर्षांचा होता साहजिकच मुंबईत असणाऱ्या उमेदवारांच्या तुलनेत ती पिछाडीवर असावी आणि तरीही तिची सहा जणांच्या पॅनल ने निवड केली हे आश्चर्य होते.

प्राजक्ता प्रदिप ठाकूर परूळ्याला परूळे बाजारात रहात होती.
गोरेगाव येथे राहणाऱ्या शालन आत्यानेच राजे शिवाजी विद्यालयात गणित-शास्त्र विषयाची जागा भरायची असल्याचे कळवून जाहिरातीचा फोटो मोबाईलवर पाठवला होता. खरं तर एक जागा असल्याने आणि गावीच शिक्षण झालेलं असल्याने आपला तिथे पाडाव लागणार नाही असाच तिचाही समज होता. जेव्हा ती दादरला शाळेत मुलाखतीसाठी पोचली तेव्हा त्यांच्या टिचररूममध्ये मुलाखतीसाठी जमलेले दहा पंधरा जण पाहून ती गांगरुन गेली होती.

एवढ्या उमेदवारांमधून निवडून येणे थोडं अवघडच होतं, पण म्हणतात ना नशीबात असेल ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पंधरा विस उमेदवारांमधून ती सिलेक्ट झाली. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांमध्ये प्रश्न विचारण्याची चढाओढ लागली होती. अगदी घरगुती प्रश्नांपासून ते गणितीय संज्ञा, वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आणि शेवटी शेवटी अगदी अंधश्रद्धा आणि देव आहे की नाही इथपर्यंत. तिने निर्भीडपणे उत्तर दिली.

देव आहे की नाही यावर ती मार्मिक बोलली. म्हटलं तर तो आहे आणि म्हटलं तर तो नाही, अस म्हणत ती म्हणाली, तुम्ही नकारात्मक विचार घेऊन कृती करत असाल तर तुम्हाला कोणी साह्य करणार नाही पण तुमची काही तरी करण्याची धडपड पाहून कुणीतरी तुमच्या मदतीस नक्की येईल. तुम्हाला पाठबळ देईल,वतुमचा विश्वास वाढवेल. तिथे तुम्ही यशस्वी ठराल. तुमच्या मनी हीच भावना असेल की या व्यक्तीने मला मदत केली म्हणून मी यशस्वी झाले.त्या व्यक्तीच्या ठायी तुम्ही ईश्वर पहाल. या उलट, आधीच मला हे जमणार नाही अशा मानसिकतेतून तुम्ही काम करत असाल तर दुसरी व्यक्ती मदतीस आली तरी तुमच्या मनात संशय निर्माण होईल, मी इतका वेळ धडपडतो आहे, ही व्यक्ती काय मला मदत करणार? त्यामुळे तुम्ही तुमचे १००% देत नाही आणि दोष मात्र नशिबाला किंवा देवाला देता. मग यश कसे मिळेल? गावाकडे असणारी मंदिरे ही ऊर्जा केंद्रे आहेत. त्या मूर्ती तुम्हाला सकारात्मक विचार दिशा देतात. अंधश्रद्धा पाळायची की नाही ते तुमच्या हाती आहे.

तिचे विश्वास पूर्ण विचार ऐकून ट्रस्टी हसले. त्यांनी दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन, चांद्र यान, NASA चा पूर्ण फॉर्म काय असे अनेक प्रश्न विचारले. अगदी पुण्याच्या आयुका, टीआयएफआर किंवा टाटा सायन्सेस बद्दलही विचारले. अध्यक्ष नाडकर्णी म्हणाले, “तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कोकणातुन एवढ्या दूर येणार का? तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकाल का?”

तिने कोकणातून मुंबईत आलेल्या आणि येथे मोठ्या पदावर काम करणाऱ्या अनेकांची नावे सांगितली, डॉ. आंबेडकर, जयंतराव साळगावकर, एकनाथ ठाकूर, मधू मंगेश कर्णिक, पाडगावकर, आणि अगदी दत्ता दावजेकर, मश्चिंद्र कांबळी ते डॉ. दत्ता सामंत. ते ऐकून नाडकर्णी हसले. ती म्हणाली, “माझे वडील शिक्षक आहेत आणि त्यांचा वसा मी पूढे नेत आहे. गेले दोन वर्षे मी हे विषय शिकवत आहे आणि संधी मिळाली तर त्याच सोन करण्यात मला आनंदच होईल.” मुलाखत संपली तशी तिने मुलाखतीसाठी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ती बाहेर जायला निघाली तस शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, “तुम्ही बाहेर थांबा, आम्ही तुम्हाला कळवू.”

अजूनही काही उमेदवारांच्या मुलाखती बाकी होत्या तेवढ्या वेळात तिने स्टाफरुम नजरेखालून घातली. स्टाफरूममध्ये यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची नावे आणि कार्यकाळ होता. संधी मिळाली तर यात माझे ही नाव यात असेल अस तिला वाटलं. ज्यांची मुलाखत झाली नव्हती ते तिच्याकडे मुलाखती बाबत माहिती घेत होते. तिने थोडक्यात मुलाखती विषयी सांगितले.

थोड्या वेळाने शिपाई तिला बोलवायला आला आणि ती ट्रस्ट कार्यालयात जाताच हेडमिस्ट्रेस मोडक मॅडमनी तिचे अभिनंदन केले आणि म्हणाल्या तुझी निवड तु सार्थ ठरवशील याची आम्हाला खात्री आहे. तुझे अपॉइंटमेंट लेटर उद्या आम्ही मेल करतो. त्याची कॉपी तुला तु जॉईन झाली की मिळेल.

तिने सर्वांचे आभार मानले आणि ती बाहेर निघणार होतीच, तिला मोडक मॅडमनी जवळ बोलवून विश केलं आणि म्हणाल्या All the best wishes for your new job. ती ट्रस्टींच्या कार्यालयातून बाहेर पडली पण आपण सिलेक्ट झालो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती सिलेक्ट झाल्याचे ऐकून आत्यालाही आश्चर्य वाटले. तीने तर चक्क देवापुढे पंचवीस वातींचा दिवा लावला आणि साखरेचा नैवेद्य ठेवला. म्हणाली, “प्राजक्ता, माझा आदिनारायण तुला पावला बरं, तुझे दादा खुश होतील. प्रत्येकाला मुबंईत जायची इच्छा असते, त्यातून दादांनी तुला मुद्दाम सायन्स विषय घ्यायला लावला होता, तू तेव्हा फारशी खुश नव्हतीस अस मी ऐकून होते. पण आज तुझ्या मनासारखे झाले,खरं ना?” “हो ग आत्या, मला गेले दोन वर्ष वाटायच, मर मर अभ्यास केला, सायन्स ग्रॅज्युएट झाले, पण कुठेही व्हॅकन्सि नव्हती, चार सहा महिने इथे तिथे काम करण्यात वेळ तर जात होता पण हाती काही लागत नव्हतं. जिथपासून आरक्षण सुरू झालयं ना आपल्याला नोकरीसाठी चान्स मिळतच नाही. मग हुशारीचा उपयोग काय? आपल्या गावी खूप हुशार मुले आहेत पण ती SSC पुढे शिकत नाहीत, इथे येऊन मिळेल ती बारीक बारीक नोकरी करतात. मलाही माझ्या शिक्षणाचा काही फायदा होणार की नाही कळत नव्हतं. पण आता मी मेहनत करून स्वतःला सिद्ध करून दाखवणार. आत्या तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.” “हे बघ उपकार वगेरे राहू दे, हे बघ मी मार्केटमध्ये जात्याय, तु येतेस का? थकली असशील आणि येत नसशील तर तेवढी भाजी चिरून ठेव, बारीक चिर बरं का!” “हो आत्या, ये तु बाजारात जाऊन आणि हे पैसे घे,येतांना पेढे घेऊन ये,अर्धा किलोचे दोन आणि पाव किलोचा एक असे तीन बॉक्स आण.” “पैसे ठेव तुझ्याकडे पण एवढे पेढे कुणाला?” “अग पुरूषोत्तमला ठेवेन आणि आपल्या अवाठात द्यावे लागतील ना? दादाच म्हणतील, एवढी चांगली बातमी नुसती का सांगायची?” “अग पण चार दिवसांनी निघशील ना? एवढे दिवस पेढे रहायला नको का? तू निघशील त्याच दिवशी आणू की.” “अग आज ३० तारीख झाली, तेरा जूनला शाळा सुरु होणार, तद्पूर्वी चार दिवस हजर रहायला नको का? इथे येऊन थोडा अभ्यास सुरु करायला हवा, मुंबईची मुलं थोडी शार्प असणार नाही का? ‘First Impression is the last impression.’ शिवाय येथील प्रवासाची मला सवय नाही. सकाळचे सत्र आहे म्हणजे मला सहा वाजता घर सोडावे लागेल.” “तुझं खरं आहे, मी जाऊन येते, हे बघ प्रदीप आला तर त्याला चहा करून दे, अलका आज उशीरा येणार आहे. हे फिरायला गेलेत ते आले की त्यांना विचार,चहा घेणार का? बरं मी निघू ना ?” “हो आत्या, जा तू मी पाहीन सर्व.”

शालन आत्या निघून गेली आणि तिच्या डोक्यावर विचार सुरु झाले. नोकरी तर मिळाली पण राहण्याचे काय?आत्या जवळ राहू शकू पण किती काळ? आत्याच्या मुलांना नाही आवडले तर !” मग तीने विचार दूर सारला. सकाळचा लोकसत्ता घेऊन ती वाचू लागली. ती आल्या पासून प्रदिप आणि अलका यांच्याशी फारस बोलणं झाल नव्हते. गावी इकडतिकडच्या गप्पा झाल्याशिवाय कोणी जेवत नव्हते, इथे जेवताना फारसे कोणी बोलत नव्हते. प्रदिप, अलका लहान होते तेव्हा गावी आले की खूप खेळत पण आत्ता ते मोठे झाले होते त्यामुळे काय बोलावं ते सुचतही नव्हतं. प्रदिप तिच्या पेक्षा पाच सहा वर्ष मोठा होता आणि आता महिंद्रा ट्रक्टर कंपनीत इंजिनिअर होता, अलका एका बिल्डिंग फर्ममध्ये आर्किटेक्ट होती. साहजिकच दोघ वेल सेटल्ड होती.अलका मनमोकळी होती पण दोन दिवसात प्रदिप मोजकच बोलला होता, त्यामुळे ती संभ्रमात होती.

शाळेत रुजू व्हायला अवघे दहा बारा दिवस होते. मुंबईत येतांना आपली निवड होईल याची खात्री नसल्याने तिने मोजके कपडे आणले होते आणि कोणाला काही सांगितले नव्हते. म्हणूनच चारआठ लदिवसात परत यावे म्हणून ती दुसऱ्या दिवशी आत्याचा निरोप घेऊन इमर्जन्सी तिकीट बुक करून गावी निघाली. गाडीतून प्रवास करताना तिच्या मनात तेच विचार होते. ती सिलेक्ट झाल्याची बातमी गावी कळाली होतीच. त्यामुळे तिला गाडीवर घ्यायला दादा येणार याचा अंदाज होताच. ती कुडाळ स्टेशनला उतरली आणि समोर वडिलांना पाहताच त्यांच्या वाकून पाया पडली.

“दादा! खरच अजूनही माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही.
केवढी मोठी शाळा, केवढी मोठी स्टाफ रुम, सुंदर वर्ग, शाळेच्या कार्यालयात कितीतरी फोटो आहेत त्यात स. का. पाटलांचा, बॅरिस्टर नाथ पै यांचा फोटो आहे.” तिला बरंच काही सांगायचे होते,पण वडील म्हणाले,” प्राजक्ता अग प्रवास करून थकली असशील ,आधी घरी तर जाऊ, मग रात्री निवांतपणे सांग.” ती हर्षोउल्हासात घरी पोचली. एखादा गड सर करून आल्याचा आनंद तिला झाला होता. प्रवासाचा शीण जाणवत होता पण राजे शिवाजी सारख्या मोठ्या शाळेत खुल्या गटात नोकरी मिळाल्याचा आनंद फारच मोठा होता. रात्री गप्पांच्या ओघात दादांनी तेथील माहिती विचारली मुलाखत घ्यायला कोण कोण होते ते काही तिला सांगता आलं नाही पण सुलेखा मोडक नावाच्या बाई मुख्याध्यापिका आहेत हे सांगताच ते हसले, सुलेखा मुख्याध्यापिका झाली का? अरे वा! अस म्हणताच प्राजक्ता गोंधळली, “दादा,तुम्ही त्यांना ओळखता?” “अग सुलेखा मोडक म्हणजे पुर्वाश्रमीची मंदा तळेकर माझ्याच शाळेत होती. मॅट्रिकला आम्ही एका वर्गात होतो. हुशार होती पण अगदी भित्री होती. ग्रॅज्युएशन होण्यापूर्वीच तीच लग्न झालं, इथेच, कुडाळतच तर लग्न झालं. मी गेलो होतो की लग्नाला.” ते सांगताना दादा उल्हसित होते,बहुदा जुन्या आठवणीत रमले असावेत. म्हणजे दादरला लग्न होऊन जाताच तिने आपलं अर्धवट शिक्षण पूर्ण केलं. बीएड होऊन नोकरी मिळवली आणि आता मुख्याध्यापिका झाल्या होत्या.

“प्राजक्ता, या मंदाला गणित विषयात मी मदत करायचो, मेहनती होती. गंमत म्हणजे मॅट्रिकला तिला माझ्यापेक्षा पाच गुण जास्त होते. कदाचित मी काही चुका केल्या असतील पण ते माझ्या कायमचे लक्षात राहीले. तिच्या ती गोष्ट नक्कीच लक्षात असेल कारण तिच यश अभुतपुर्व होत. तिच्या लग्नानंतरही इथे आली की आवर्जून भेट व्हायची पण आता मात्र ती गावी येते कधी आणि जाते कधी कळतही नाही. असो, माणूस मोठ्या पदावर गेला की मागील आठवणी धुसर होत जातात. तो तर सृष्टीचा नियम आहे. असो,आता तू अराम कर, मला थोडं आगारात काम आहे. मग रात्री आपण बोलू.” दादा आगारात गेल्यावर आईने तिचा ताबा घेतला,कितीतरी वेळ त्या गप्पा मारत होत्या. आत्याने आपल्या भावजयसाठी बरेच काही दिले होते. ते दाखवता दाखवता बराच वेळ गेला. प्राजक्ता मुबंईला जाणार म्हणून तिची आई थोडी गंभीर झाली होती, आता पर्यंत प्राजक्ता कधीही चार आठ दिवसापेक्षा जास्त दिवस कोणाकडे राहिली नव्हती. आता तिला नोकरीसाठी कायमचे मुंबईत राहावे लागणार होते, साहजिकच तिची घराला उणीव भासणार होती.

व्यक्ती जवळ असली की त्याच महत्व वाटत नाही मात्र घरापासून दूर गेली की तिच्या आठवणी मनाला सतावत राहतात तसेच प्राजक्ताच्या आईचे काहीसे प्राजक्ता बाबत झाले होते. लवकरच प्राजक्ता मुंबईला जाणार हे समजले तेव्हापासून ती हळवी झाली होती. गेले दोन वर्षे ती शाळेत शिकवायला जात असूनही, आईला तिच्या कामात शक्य ती सगळी मदत करत होती. विशेषतः सण असेल तेव्हा देवाची भांडी चकचकीत करून देण्यापासून ते वस्त्र ,फुलवाती, वाती करून ठेवण्या पर्यंत सर्वच मदत ती करायची. देवाच्या समया, धुपारत, झांजी, लामण दिवा, सगळ नवीन खरेदी केल्यासारखं लख्ख घासून सुकवून ठेवायची. सोवळ्याने स्वयंपाक करतांना प्राजक्ता उत्साहात सगळं करायची.दादा पुजेला बसल्यावर एखादी गोष्ट सापडली नाही अस कधीच झाल नव्हतं. गणपतीच्या भजनासाठी येणारी माणसं दादांकडे आवर्जून साजूक तुपावर भाजलेल्या पिठाचा लाडू मागून खायची.

मोदकाची पातळ पारी लाटून मोदक करावा तो तिनेच, पुरणपोळीचा मैदा मळून ठेवण्याच काम तीचंच. म्हामद्याचे वडे तीच थापून देई आणि ऋषीची भाजी तीच चिरून देई, ती आईचा उजवा हात होती. म्हणून ती मुबंईला जाणार हे कळल्यापासून त्यांचं मन अवघडंल होत. पण त्यांना माहिती होत, मुबंईत गेल्यामुळेच तीच आयुष्य बहरणार होत. तिची चांगली शिक्षिका बनण्याची इच्छा पूर्ण होणार होती. प्राजक्ताने दुपारी अवाठात पेढे वाटून बातमी सांगितली. काही महिलांना तिथे कोणाकडे राहणार विचारायचे होते,तर काहीना नोकरी (टेंपररी) की कशी? याची काळजी होती. कोणाला शाळा पूर्ण पगार देणार का? याच्या विषयी उत्सुकता होती. तिने जमेल तशी उत्तरे देत मार्ग काढला. भाऊ तेंडुलकर मात्र आशीर्वाद देत म्हणाले मोठ्ठी हो नाव कमाव. त्यांनी आपल्या खिशातून पाचशेची नोट तिच्या हाती देत म्हणाले, हे शकूनाचे पैसे, हे जपून ठेव राठी तुला यशच यश देईल. तिला नाही म्हणता आलं नाही. ती पाया पडली. येते म्हणत तिने निरोप घेतला.

रात्री जेवताना प्राजक्ताने दादांकडे मुंबईत राहण्याचा विषय काढला, “दादा, मुंबईत राहण्याची सोय कशी करावी? एखादा महिना आत्याकडे राहणे ठिक पण कायम तिच्याकडे राहणे मला तरी बरोबर वाटत नाही. प्रदिप दादा आणि अल्का आता लहान राहिले नाहीत, आत्या लवकरच दादाच लग्न करेल तेव्हा त्यांच्या संसारात अडचण बनून मला रहायचे नाही. एखाद्या लेडीज होस्टेलवर सोय होते का मी पाहणार आहे, जर दादरमध्ये सोय झाली तर फारच चांगले,तुमच काय मत? ” “तुझ म्हणण ठिक आहे पण तू आत्याकडे नाही राहिलीस तर तिला राग नाही का येणार?” “ते मी पाहिन, आत्याला कस पटवायचे ते मला चांगले कळते, तूम्ही उगाच टेंशन घेऊ नका, फक्त तुमची संमती मला पाहिजे.” “प्राजक्ता तुझ्या आत्याच लग्न मी लावून दिलयं, त्यामुळे तुझ्यापेक्षा मी तिला चांगली ओळखतो, नात्यात दुरावा नको म्हणजे झाले.”

प्रसाद कोल्हापूरच्या शाहू महाविद्यालयात Law शिकत होता. ताईला भेटायचे म्हणून तो दोन दिवसासाठी आला होता. तो इतका वेळ फक्त ऐकत होता. तो म्हणाला, “बाबा, अस म्हणतात मुंबईत एक वेळ चार सहा माणसांना जेवायला घालण लोक पसंत करतील पण रहायला पाहुणा न येईल तर बरा अशी त्यांची मानसिकता असते. दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये ते कुठे राहणार आणि पाहुणा कुठे झोपणार? मुलांना तर आपली बेडरूम किंवा स्टडी कोणालाही शेअर करायला बिलकुल आवडत नाही. त्यांची प्रायव्हसी जाते. “ताई म्हणते ते अगदी योग्य. तुम्हीच तिला सोडायला जा आणि आत्याला काय ते सांगा. महिन्याभरात ती तिची सोय लावेल.” प्रसाद म्हणाला तेव्हा दादा त्याच्याकडे पहातच राहिले.

“बरं बाबांनो थोडक्यात, आत्याकडे प्राजक्ता राहणार नाही इतकच ना! ठीक आहे मी तिची समजूत घालेन. आता या विषयी वाद नको. तुमचं आवरा मला काम आहे.” असं म्हणत ते ताटा भोवती पाणी सोडून उठले. प्राजक्ता ने आपल्या बालमैत्रीणींच्या भेटीगाठी घेतल्या,काही मैत्रीणींनी तिला घरी जेवायला बोलवले, भेटवस्तू दिली. त्यांचा घरातील मोठ्या माणसांचे आशिर्वाद घेतले. काही मैत्रिणी एकदम जिवाभावाच्या होत्या त्यांचे डोळे भरून आले.एकमेकांची खुशाली घेत राहू म्हणत त्यांनी निरोप घेतला.

आठ दिवसांनी तयारी करून ती मुबंईला निघाली.दादा सोबत होते. प्रवासात त्यांनी आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले. आपल्या बहिणीला भेटतांना त्यांनाही आनंद झाला. भाचे कंपनीही मामाशी दिलखुलास बोलली. नेहमी आपल्या कंपूत जाणारे आत्याचे मिस्टरही दादांसाठी घरी राहिले. बहिणीने भावासाठी पुरणपोळीचा बेत केला. गप्पा मारता मारता प्रदिप बहिणीला म्हणाला, “शालन, प्राजक्ता थोडे दिवस तुझ्याकडे राहिल, इथूनच कामावर जाईल,मग महिन्या भरात तिथेच काही सोय होते का पाहिलं.” “का रे दादा, माझे घर काही फार दूर नाही, ती सहजच अप डाऊन करू शकेल. आकाश नाही का रोज जात. यांनी तर किती वर्षे फोर्ट ला अपडाऊन केल. आम्हाला तिची अडचण नाही होणार, तू काळजी करू नकोस.” “तस नाही गं, पण तिला लोकल प्रवासाची सवयही नाही. त्यामुळे रोजचा प्रवास तिला झेपेल की नाही अशी मलाच शंका. त्यातून महिन्या भरात तिला काही अडचण नाही आली तर ती राहिलच की. तू उगाचच मनात काही आणू नको, तुझ घर का मला परकं आहे पण ती काय म्हणते ते पाहू.” “जशी तुझी इच्छा, उद्या जग मला नावं ठेवेल, सख्खी आत्या मुंबईत रहात असतांना मुलीला दुसरीकडे ठेवली म्हणून.” “तू उगाचच काही म्हणू नको, जगाशी आपल्याला काय देणंघेणं.”

दोन दिवस दादांनी प्राजक्ताला आपल्या जवळच्या मित्रांच्या
घरी नेले. दादरलाच पारसी कॉलनी शेजारी मित्र रहात होता त्याला भेटायला गेले. त्यांनी दादांचे स्वागत केले, चहापाणी झाल्यावर गप्पांच्या ओघात बोलता बोलता प्राजक्ता राजे शिवाजी विद्यालयात रुजू होत असल्याचे दादा बोलले. ते ऐकता नाडकर्णी म्हणाले, “प्रदिप ठरलं,तुझी मुलगी माझ्याकडेच राहणार, इथून चार पावलांवर शाळा आहे. नाडकर्णी काकू तेच म्हणाल्या. “आमची दोन्ही मुल पुण्यात आहेत. ती इथे राहिली तर आम्हाला बरच वाटेल.” नाडकर्णी म्हणाले, प्रदिप तु पुढे काहीच बोलायचे नाही. तुझी मुलगी आता आमची मुलगी तू निशंकपणे गावी जा. रोज ती तुझ्याशी बोलेल.”

“अरे शालन गोरेगावला राहते, तुला माहिती असेल ना? ती नाही का रागावणार माझ्यावर, सध्या तरी ती आत्याकडे राहिल,पुढे पाहू काय करायचे ते. बाकी तुझी मुले पुण्यात काय करतात?” ” मुलगा तिथे टेल्कोत आहे आणि मुलगी आयटी कंपनीत, फ्लॅट घेऊन राहतात. शनिवार, रविवार इथे असतात. त्यांना बरं आहे इथून इंद्रायणी पकडली की झालं. तुझ कस चाललय? तू रिटायर झालास का?” “अरे पुढच्या महिन्यात मी रिटायर होणार, हिचाच प्रश्न होता. आपल्या लोकांना आता नोकऱ्या राहिल्यात का? सगळं आरक्षण. तिच्या नशिबाने इथे सिलेक्ट झाली. माझी चिंता दूर झाली, मुलगा आता वकील होईल, पाहू कुठे प्रॅक्टिस करतो तो. त्याचं बस्तान बसलं की मी मोकळा.”

निघतांना प्राजक्ता, नाडकर्णी काका, काकूं च्या पाया पडली. त्यांनी तिला जवळ घेत गालावरून हात फिरवत सांगितले, “प्राजु इथेच राहायला ये तुझी आमच्या सुमीशी छान मैत्री होईल.कोणी परक नाही. तुझे बाबा मुबंईत आले की इथे आल्याशिवाय राहत नाहीत.”

त्यांचा निरोप घेऊन ते बाहेर पडले, दादर टिटी ला बाबूभाई भवानजी जवळ रस्ता क्रॉस करणार होते तोच त्यांना समोरच्या फुटपाथवरन कोणीतरी हाक मारली,ते इथेतिथे पहात होते तोच त्या समोर येत म्हणाल्या, “प्रदिप! अरे मी हाक मारत होते.” “मंदा तु? अग मी हिला घेऊन प्रकाश नाडकर्णीकडे गेलो होतो, तो इथेच राहतो.पारसी कॉलनी जवळ. प्रकाश आठवतोय ना?” “हो, न लक्षात राहायला काय झालं पण तो तर पुण्यात राहात होता ना?” “पुण्यात मामाकडे शिकायला होता,तो मंत्रालयात सचिव होता. आता रिटायर आहे.” प्राजक्ता हेड मिस्ट्रेस बाईंना पाहून थोडी बावरली होती. तिच्याकडे पहात त्या म्हणाल्या, “तुझी मुलगी हुशार आहे,आमच्या ट्रस्टींच्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली,अर्ज आला तेव्हाच माझ्या लक्षात आलं, ही तुझीच मुलगी असणार, मी संधी दिली, ओपन सिट होती.”

प्राजक्ता त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकली तेव्हा तिला मधेच अडवत त्या म्हणाल्या,”प्राजक्ता तुझे बाबा,मला, गुरूस्थानी आहेत, त्यांनी माझा गणित विषय पक्का करून घेतला नसता तर, कदाचित मी इथपर्यंत झेप घेतलीही नसती. मी तुला संधी देऊ शकले, त्या पलीकडे मी काहीही केलेलं नाही.” “चल प्रदिप इथे रस्त्यावर उभं राहून बोलत बसण्यापेक्षा कुठेतरी मस्त चहा घेऊ.” खरं तर त्यांच चहापाणी प्रकाशच्या घरी आटोपलं होत पण त्यांच्या आग्रहाखातर ते रेस्टॉरंटमध्ये गेले. गावाकडच्या गप्पा झाल्या. त्या प्राजक्ताकडे पहात म्हणाल्या,”मी दोन महिन्यांनी रिटायर होणार आहे,तु तुझे असे रेप्युटशन बनव की तू शाळेच्या स्मरणात राहिली पाहिजे, ट्रस्टी म्हणाले पाहिजेत की मोडक मॅडमनी योग्य निवड केली.” “हो मॅडम,माझा तोच प्रयत्न असेल. तुम्ही मला या दोन महिन्यात मार्गदर्शन करा मी तुम्हाला विचारत जाईन.” दोघानी निरोप घेतला, “प्रदिप तुझी मुलगी शंभर नंबरी सोनं आहे, माझी पारख चुकणार नाही. आपण दोघे समवयस्क असलो तरी तू मला मार्गदर्शन केले म्हणून मी इथपर्यंत पोचले त्याअर्थी मी तुझी विद्यार्थिनी आहे आणि आता तुझी मुलगी माझ्या हाताखाली तरबेज करण्यात मी कसूर करणार नाही गुरू शिष्य परंपरेचं एक वर्तुळ पूर्ण होईल याची खात्री बाळग.” तो हात जोडत म्हणाला,”मंदा मला लाजवू नको,अग तू हुशारच होतीस, फक्त सुरवात कुठून कशी करावी आणि आपल्याला अपेक्षित पायरीकडे कस जावं हीच तुझी अडचण होती. मी तुला मार्गदर्शन केल आणि तू गणित विषयावर मेहनत घेऊन यश खेचून आणलस, उलट प्राजक्ताला संधी देऊन तू उपकारच केलेस. आता तुच तिला मार्गदर्शन केलस म्हणजे शहरातील मोठ्या शाळेची भिती कमी होईल. यासाठी मी तुझा आभारी आहे.” मोडक मॅडम हसल्या, “प्रदीप हा उगचचा मोठेपणा देऊन तु मला कोड्यात टाकू नकोस, तरीही तु म्हणतोस म्हणून मी प्राजक्ताची तयारी करून घेईन तु निश्चिंत रहा.” प्राजक्ता हसली, तिला आपल्या दादांचा प्रचंड अभिमान वाटला. तिने कल्पनाही केली नव्हती की तिच्या बाबांनी लावलेल्या बिजाला अशी मधुर फळे येतील.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *