वाढता वाढता वाढे
वाढता वाढता, वाढे
मारूती स्तोत्रात हनुमंताने जेव्हा सुर्य पाहिला तेव्हा ते फळ असावे असे वाटून खाण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली आणि तो प्रचंड मोठा झाला. त्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामींनी केलेले ते वर्णन आहे.
“आरक्त देखिले डोळा, ग्रासीले सुर्यमंडळा
‘वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा”
त्याची मला अचानक आठवण झली.
आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर ते वर्णन लागू पडते. स्वातंत्र्य काळात अगदी एकोणीसशे पासष्ट पर्यंत भारताची लोकसंख्या होती फक्त ‘३३ करोड ‘आज ती ‘१५० करोड ‘ आहे. म्हणजे पासष्ट सालच्या लोकसंख्येशी तुलना केल्यास ५ पट आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत १७.५% आहे. पूर्वी भारतात ठराविक मोठी शहरे होती आज मोठ्या शहरांच्या यादीत अनेक नवीन शहरांची भर पडली आहे.
लोकसंख्येतील वाढ ही फारशी जमेची बाजू नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर सोयीसुविधा यांचा सततचा वाढता बोजा सहन करणे कर्मकठीण. १९७२-७५ च्या काळात अनेक घरांच्या भिंतीवर लाल त्रिकोण रंगवलेला दिसे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा उपक्रम सरकारने हाती घेतला होता. याचे कारण भारतातील प्रचंड गरीबी आणि काँग्रेस सरकारचा ‘गरीबी हटाव कार्यक्रम’ तेव्हा मा.पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे डॅशिंग सुपुत्र संजय गांधी यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केवळ सक्तीची केली नव्हती तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी त्यांनी १० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडल्या पाहिजेत टार्गेट दिले होते. या काळात या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा अतिरेक झाला आणि कित्येक तरुण अविवाहित मुलांची जबरदस्तीने शस्त्रक्रिया झाली. तेव्हा या लोकसंख्या वाढीवर केलेले उपाय किती जबरदस्त होते त्याच्या कहाण्या रंगवून सांगितल्या जात.
आज स्थिती काय आहे? या वाढलेल्या लोकसंख्येलाच आपण बलस्थान म्हणून पहात आहोत, अर्थात असा दुसऱ्या टोकाचा विचार करणेही भविष्यात धोका ठरू शकतो, पण आजतरी या अमर्याद लोकसंख्येला पोसण्याची धम्मक सरकारजवळ आहे. आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरूनही अनेक आफ्रिकन देशांना आणि इशान्येकडील देशांना आपण अन्नधान्य निर्यात करतो.वसरकार गेले दहा वर्षे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा ३५ किलो फुकट धान्य देते. अर्थात ही काही कौतुकास्पद बाब नाही. दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने यावर ताशेरे ओढले आहेत. ‘जर तुम्ही लोकांना फुकट अन्नधान्य, घरे आणि विज पुरवली तर लोक हातपाय हलवतील कशासाठी? तेव्हा हे फुकटचे चोचले बंद करा.’ हा गंभीर इशारा पंतप्रधान ऐकतात की सत्तेचं कातडं डोळ्यावर ओढून धृतराष्ट्र भूमिका जगतात ते लवकरच समजेलच. पण आज अन्नधान्य उत्पादनात देशाने जी विक्रमी वाढ नोंदवली आहे ती खरेच आश्चर्य व्यक्त करण्याजोगी आहे. शेतीसाठी पाणी, विज आणि सबसिडी देऊन खते पुरविण्यात आल्याशिवाय हे शक्य नव्हते. याचा अर्थ उत्पादन वाढीत अजाणतेपणी सरकारच्या एका विभागाचा वाटा आहे हे मान्य करूनच पुढे जावे लागेल.
मी कॉलेजला शिकत असताना सफाळा येथून मुंबईकडे जाण्यासाठी दिवसभरात सहा रेल्वे गाड्या होत्या. आज छत्तीस गाड्याही अपुऱ्या आहेत. दोन राज्यांना जोडणाऱ्या तर ठराविक रेल्वे गाड्या होत्या आणि त्यांची नावे लक्षात रहात होती. लालूंच्या रेल्वेमंत्री काळात ‘गरीब रथ’ नावाची वातानुकूलित रेल्वे गाडी सुरू झाली. ममता बॅनर्जींच्या काळात ‘दुरांतो’. कोकण रेल्वे १९९६ ला सुरू झाली तेव्हा सावंतवाडी पर्यंत अवघ्या दोन तीन गाड्या सुरु होत्या. १९९८ नंतर कोकण रेल्वे मार्ग पूर्ण झाला आणि गाड्या केरळात जाऊ लागल्या. आज कोकणात वीस पंचवीस पेक्षा अधिक गाड्या ये जा करतात.त्यामध्ये जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या, मांडवी या एक्स्प्रेस गाड्यांनी तसेच दिवा सावंतवाडी या गाडीने कोकणातील भरपूर प्रवासी प्रवास करतात.
कोकण रेल्वेत जास्त गुंतवणूक महाराष्ट्र सरकारची असूनही त्याचा फायदा ज्यांचे कोकण रेल्वेसाठी फारसे आर्थिक योगदान नाही अशा दक्षिणेस जाणाऱ्या प्रवाशांना होतो. मत्स्यगंधा, दोरंतो, ओखा एर्नाकुलम, मंगला, नेत्रावती, हापा मडगाव, बिकानेर कोइंबतूर, ,कुचुवेली, तेजस, दिल्ली राजधानी, एर्नाकुलम अशा अनेक गाड्या काश्मीर ते कन्याकुमारी किंवा कलकत्ता ते केरळ असा कोकणमार्गे थेट प्रवास करता येतो. यावरून आपल्याला कोकण रेल्वेची व्याप्ती कळली असेलच, म्हणजे नाव कोकण रेल्वे पण तिची लांबी किंवा पल्ला वाढला आणि मुळ मालक वंचित झाला. आधी हा पूर्ण मार्ग एकपदरी होता आता तो वीर पर्यंत दुहेरी आहे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढील दहा वर्षात तो दुहेरी होईल असा विश्वास दर्शवला आहे. मुख्य म्हणजे मागील पाच वर्षात या ६५० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन झाले ही गोष्टी नक्कीच अभिमानास्पद आहे.
आधी म्हणजे १९९० ला पनवेल ते रोहा टप्पा पूर्ण झाला. पण त्यानंतर सुरू झालेली कोकण रेल्वे महाराष्ट्र ओलांडून गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यात पोचली. कोकण रेल्वेचा विस्तार आणि व्याप वाढला. कधीकाळी हे स्वप्न होत आज वास्ताव आहे. म्हणूनच स्वतःच्या “वाढता वाढता वाढे “ म्हणजे काय? या शिर्षकाचा मी आढावा घेत आहे. त्या वाढत्या शब्दांच्या अर्थात हरवून जाणीवपूर्वक आमची कोकण वासियांची किती कोंडी होते ते स्वतः समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.
कधीकाळी रेल्वे जम्मु पर्यंत जाईल अस कोणी म्हटले असते तर तेथील उंच पहाडी प्रदेश पाहता खरे वाटलेही नसते पण आता रेल्वे श्रीनगरला पोचली आणि काही महिन्यात ती काश्मीर घाटीतून पुढेही जाईल. मे २०२५ मध्ये जम्मू मधून वंदे भारत काश्मीरमध्ये पोचली. यामुळे नवीन उद्योग काश्मीर राज्यात येतील अशी अपेक्षा आहे. अर्थात तेथे कोणते खनिज मिळेल किंवा कोणत्या गोष्टींना चांगली मागणी असेल याचा विचार करूनच उद्योजक गुंतवणूक करतील. सर्वात प्राधान्य असेल ते शांतता आणि उद्योगास अनुकूल वातावरणाला.
येथे पूर्वीपासून पर्यटन व्यवसायाला बरकत आहे मात्र सततचे दहशती वातावरण आणि हिंसा यामुळे त्याला स्थैर्य नाही. मोदी सरकारने येथे एन्फ्रास्ट्रक्चरवर जोर दिल्याने आणि त्यासाठी प्रचंड गुंतवणूक केल्याने येथील स्थानिक माणसाला रोजगार मिळाला. राबणाऱ्या हातांना काम नव्हते त्याला काम मिळाले साहजिकच त्यांच्यासाठी ही अमुल्य भेट होती. आज, येथील मोठ मोठे बोगदे. उंचावर बांधलेले केबल पूल आणि खोल दऱ्या, यामुळे येथील रेल्वे प्रवास हा एक आल्हाददायक अनुभव असेल. यामुळे तेथे नवीन उद्योग सुरू होतील. येथील उत्पादने अतिशय जलद भारतभर पोचतील. काश्मिरी जनतेला लागणाऱ्या गरजेच्या वस्तूचा पुरवठा वेगवान होईल. जीवन सुलभ होईल. काश्मीर मुख्य प्रवाहाशी सहज जोडले जाईल. वाढता वाढता वाढे चा प्रत्यय येथील स्थानिक माणसाला आला की तो या वाढीचा आणि प्रगतीचा एक भाग होईल.
आसाम या राज्यातही पंधरा वर्षांपूर्वी आतंकवाद होता, सरहद्दीवर घुसखोरी होती. गेल्या दहा ,पंधरा वर्षात तेथे सरकार पुरस्कृत जे उपक्रम सुरू झाले, लोकांना काम मिळाले, घरातील बालके आणि वृद्ध यांना पोटभर अन्नाची सोय झाली. वाड्या वस्त्यांवर लाईट आली, पाणी अंगणात खेळू लागले. साहजिकच लोकांचे मन काम, रोजगार यांत गुंतले आणि हिंसाचार कमी झाला. मोठं मोठ्या सडका बांधल्या जाऊ लागल्या, उद्योग उभे राहू लागले त्यामुळे लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून दिला. दिल्ली ते गोहाटी, नॉर्थ इस्ट एक्सप्रेस, ब्रह्मपुत्रा मेल,अवध आसाम, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, अमृत भारत एक्सप्रेस अशा अनेक गाड्या धावत आहेत. गेल्या काही महिन्यात सरकारने आसाम राज्यात साडे एकोणिस कोटी रुपये खर्चाच्या योजना सुरू केल्या आहेत. भविष्यात येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी राज्याच्या बाहेर जाण्याची गरज उरणार नाही. गोहाटी येथे ३२००/ कोटी रूपये गुंतवणूक करून मेडिकल कॉलेजचा विस्तार होत आहे. याचा स्पष्ट अर्थ ईशान्य पूर्व जो अतिशय डोंगराळ आणि दुर्लक्षित भाग होता तेथेही विकास होत असल्याने भविष्यात तेथील लोकांचे जीवनमान उंचावेल यात शंका नाही.
महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाच्या लाल रंगाच्या बस धावत होत्या. त्यात साधी आणि रातराणी असे दोन प्रकार होते. दिल्ली येथे एशियाड गेम सुरु होते तेव्हा आरामदायी ऐशियाड बस पहिल्यांदा वापरात आल्या.एशियाड स्पर्धा संपली तशा या गाड्या वेगवेगळ्या शहरांना दिल्या. तेव्हाच पुण्यात मुंबई एशियाड सुरू झाली आणि आज हिरकणी, शिवनेरी , शिवशाही पर्यंत तिचा नाम विस्तार झाला. कोकणात जायचे तर नशिबी लाल डबा किंवा रातराणी असायची. आता कोकणातही एसटी महामंडळाच्या स्लिपर कोच गाड्या धावत आहेत. गाव तिथे एसटी आहेच. फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ८३०० नवीन बस देण्याचे आश्वासन दिले असून त्या अंतर्गत ३००० अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बस आणि शिवनेरी बस ठिकठिकाणी धावू लागतील. तेव्हा राज्यातही प्रगतीचा वेग वाढत आहे असे म्हणायला वाव आहे.
थोडक्यात सगळ्याच राज्यात ठिकठिकाणी विस्तार झाला. लोकसंख्या वाढली तशा नवनवीन बाजारपेठा, नवीन पर्यटन स्थळ विकसित झाली. करमणुकीची साधन वाढली. या अगोदर बोरिवली गोराई येथे वॉटर पार्क होते आज ठाणे येथे आणि अन्य शहरात अशी वॉटर पार्क निर्माण झाली आहेत. आधी एक पडदा (स्क्रीन) असणारी चित्रपटगृहे होती आता दोन किंवा तीन स्क्रीन असणारी चित्रपटगृहे शहरात ठिकठिकाणी आहेत. यापूर्वी फार तर डिपार्टमेंटल स्टोअर होती आता मॉल आहेत. जेथे घरातील हर एक वस्तूच्या खरेदी बरोबरच, कपडे, इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक साधने, करमणूक आणि खाद्यपदार्थ व्यवस्था किंवा रेस्टॉरंट असतात.
नव्या पिढीच्या गरजा अन्न ,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या पलीकडे वाढत करमणुकीपर्यंत वाढल्या आहेत.यातही तीसचाळीस वर्षांपूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या शब्दांचे अर्थ किमान पातळीवर गृहीत धरले जात होते आज त्याला व्यापक अर्थ प्राप्त झाला आहे. या सगळ्याचा पोषक परिणाम होऊन सामान्य नागरीकांना रोजगाराच्या संधी वाढल्या.
आज अन्नधान्याचा विचार केला तर अधुनमधून काही राज्यात अवर्षण होऊनही अन्यधान्य तुटवडा जाणवत नाही याचे कारण सिंचनाची सोय, संकरित बीबियाणे, मुबलक रासायनिक खतांची उपलब्धता आणि शेतीसाठी यांत्रिक साधनांचा वापर याचा एकत्रित परिणाम म्हणून अन्न उत्पादन वाढले. करोना काळात इतर छोट्या देशांना मदत करूनही आपल्या देशातील गरीब, गरजू लोकांना पुरेशा प्रमाणात मोफत अन्न वाटण्याची पत भारताने कमावली हे विकसित भारताचे यश आहे. अन्न म्हणून असणारे पर्याय विस्तारले. ब्रोकोली, आईसबर्ग, झुकीनी, चेरी टोमॅटो, पार्सले, ड्रॅगन फ्रुट, अव्होकडो इत्यादि पाश्चिमात्य देशातील भाज्या व फळे येथे उपलब्ध होत आहेत. नवीन पिढीने या पाश्चिमात्य भाज्या आणि फळे बदल म्हणून स्विकारली आहेत.
केवळ अन्नच नव्हे तर आधुनिक घरात लागणाऱ्या कोणत्याही वस्तूंचा बाजारात तुटवडा नाही.याचे कारण गरजेच्या सर्व गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामुग्रीचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात, इतकेच नव्हे तर गरजेनुसार आणि ग्राहकाच्या ऐपतीप्रमाणे त्याला त्या घरपोच घेता येतात. या गोष्टी ग्राहकांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी आज जलद वितरण व्यवस्था उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचे ज्या वस्तूची खरेदी करायची असेल त्या वस्तूचे बाजारात अनेक ब्रँड आहेत. ग्राहकाला पर्याय उपलब्ध आहेत परिणामी ग्राहक हा व्यवसायिकाचा देव आहे. यामुळे व्यवसायात घमासान स्पर्धा सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षात वीज वितरण व्यवस्थेतही सुधारणा झाली. काही वर्षांपूर्वी दिवसात अनेकदा वीज जायची. शेतकऱ्यांना तर दिवसा सलग चार तासही विज मिळत नव्हती. आज वीज वितरण व्यवस्था सुधारली आहे. शहरात तर सुधारली आहेच पण ग्रामीण भागातही वीज वितरण करणाऱ्या खांबावरील यंत्रणा जाऊन त्या जागी जमिनीखालून जाणाऱ्या केबलची व्यवस्था केली गेली यामुळे अगदी पावसाळ्यातही विजेचा लपंडाव पाहावा लागणार नाही असे म्हणण्यास हरकत नसावी. नेहमी नकारात्मक बोलायचे की जे चांगले घडते त्या बद्दल कधीतरी प्रशंसा करायची याची योग्य जाण हवी तरच तुमच्या प्रामाणिक टीकेलाही अर्थ उरतो.
मुख्य म्हणजे जसे मोठे खेळाडू या व्यवसायात उतरत आहेत, छोटे हतबल होऊन बाहेर फेकले जात आहेत. मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय मात्र करोडात वाढत आहे. मोठा मासा लहान माश्यांना गिळंकृत करत आहे.वाढ आहे पण नक्की कोणाची ? हाच प्रश्न आहे. आपल्याला चार अदानी, अंबानी हवेत की पन्नास किर्लोस्कर हवेत हा प्रश्न महत्वाचा आहे.
मोठ्या मॉलमध्ये असलेली गुंतवणूक ही भारतीय कंपन्यांची नाही परिणामी तेथेळ खरेदी केली किंवा ऑनलाईन यंत्रणेने खरेदी केली तर हे पैसे देशा बाहेरील कंपन्यांना जाणार आहेत. आज या वस्तू स्वस्त वाटत असल्या तरी एकदा ही पद्धत अंगवळणी पडली की याच वस्तू महाग झाल्या तरी आपण खरेदी करू आणि हा पैसा देशा बाहेरील कंपन्यांना मिळेल आणि येथील स्थानिक व्यवसाय नष्ट होतील. अंबानी रिलायन्स फोन सेवा आधी विनामूल्य होती. नंतर हळूहळू त्याचे दर वाढू लागले आणि आज जर मोबाईल रिचार्ज केला नाही तर इनकमिंग सुविधाही बंद केली जाते.
डोंबिवली किंवा अंबरनाथ, बदलापूर किंवा टिटवाळा आधी चाळी असलेलं गाव होतं, या चाळी नव्वदच्या दशकात दोन मजली झाल्या. याच काळात बंगले आपलं अस्तित्व टिकवून होते. कालांतराने दोन मजली इमारती निर्माण झाल्या. या इमारती स्थानिक मालकांनी पागडीवर देऊन रग्गड पैसे कमावले. त्यानंतर नाखेसारख्यांनी गृहनिर्माण सोसायट्या उभ्या केल्या. ऍलोरा, सारस्वत कॉलनी, विवेकानंद नगर ही त्याची काही उदाहरणे. तेव्हा बँक कर्ज देण्यास उत्सूक नसे म्हणून लोक MHFC जवळ आपला प्रस्ताव सादर करून कर्ज घेऊन इमारत उभी करत. याच काळात अनेक बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गृहनिर्माण सोसायट्या उभ्या केल्या. बँक या त्यांचा कर्मचाऱ्यांना अवघ्या ४% दराने गृह कर्ज उपलब्ध करून देत असे. त्या नंतर गृहप्रकल्पांना बँक कर्ज देऊ लागली आणि जास्त सुविधा देणाऱ्या मोठं मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या.
आधी डोंबिवली शहर हे डीएनसी हायस्कूल पर्यंत मर्यादित होते, एकविसाव्या शतकाच्या आरंभी ते नाल्या पर्यंत गेले आणि मग त्यांनी भोपर डोंगर कधी काबीज केला कळले देखील नाही.याच प्रकारे घोडबंदर रोडवरची वस्ती बाळकूम ओलांडून वाघाबिळला कधी पोचली कळले नाही. याच प्रकारे पश्चिम उपनगरात वस्ती मुंबई अहमदाबाद एक्स्प्रेस रस्ता ओलांडून कधी पलीकडे पोचली आणि गोकुळधाम सारखी मोठी वसाहत निर्माण झाली कळले नाही. या अगोदर डिएसके, पुरोहित, गोदरेज असे प्रकल्प होतेच पण हिरानंदानी केवळ पवईत होते आता त्यांनी ठाण्यात ,कल्याण शहरात आणि बदलापूर येथे मोठाले प्रकल्प उभे केले. नवी मुंबईत हावरे यांनी बस्तान बसवले. पाहता पाहता लोढा मागून येऊन तिखट झाले. शहराच्या नागरी सीमा कशा विस्तारल्या ते आश्चर्यकारक आहे.
शीळ-कल्याण रस्त्यावर प्रिमियर कॉलनीच्या अवघ्या दोन तीन इमारती होत्या आणि आज मानपाडा रस्ता ओलांडून डोंबिवली शहर लोढा पलावा आणि रूणवाल महामार्गाच्या पलीकडे अनंतम पर्यंत पसरले आहे. वाढीचा हा वेग थक्क करणारा आहे. आज डोंबिवलीतच नव्हे तर इतर शहरात दोन मजली इमारतीच्या जागेवर जे वीस माळ्यांचे टॉवर उभे राहत आहेत त्यांना, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा देतांना महानगरपालिकेवर किती ताण येईल याची कल्पना नगरविकास खात्याने केली आहे का? अंडरटेबल लाखो रूपये घेऊन इमारतीच्या बांधकामांना मंजुरी देतांना भविष्यात किती व्याप आणि ताप वाढणार आहे याची कल्पना न करता आज पैसे गोळा करून घ्या ही भुमिका नागरीकांचे जीणे हराम करेल.
डोंबिवलीत डॉ.मेस्त्री, डॉ.भाटिया, डॉ.अग्रवाल, डॉ.बेंगेरे, डॉ.कुलकर्णी या डॉक्टर मंडळींचे दवाखाने होते तर डॉ.दिलीप ठाकूर, डॉ. राव, डॉ.कारवा,डॉ.शिरोडकर,अशी ठराविक मर्यादित हॉस्पिटल होती.त्या नंतर एम्स, बाज, आयकॉन, अशी मोठी हॉस्पिटल सेवा देऊ लागली आणि आज प्रत्येक रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा किमान चारसहा सुविधायुक्त हॉस्पिटल उभी आहेत. हा पसारा त्यांच्या स्पेशालिटी नुसार वाढतच आहे. नक्की आकडेवारी सांगता आली नाही तरी साधारण पाच हजार छोटी मोठी हॉस्पिटल आज डोंबिवलीत असावीत. अर्थात या ठिकाणी सेवा देण्याच्या नावाखाली लूट सुरू आहे याचे कारण ही हॉस्पिटल ज्या पेशंट जवळ मेडिक्लेम कार्ड आहे त्याला किंवा ज्यांचे वैद्यकीय बिल कंपनी भरते त्यांना सेवा देण्यात आघाडीवर आहेत. हॉस्पिटलच्या संख्येच्या प्रमाणात मग औषध पुरवठा करणारी यंत्रणा म्हणजे मेडिकल स्टोअर आली. जर सांख्यिकी माहिती जमा करणाऱ्या अभ्यासू मित्रांनी हा खटाटोप केला तर हा डेटा मेडिकल कंपन्यांना विकून पैसा मिळवू शकता.
अनेक हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल स्टोअर्स आहे, त्यातूनच औषध खरेदीचा आग्रह धरला जातो. याची कारणे दोन, पहिले, औषधांवर होलसेअर्स जवळून खूप मोठी सूट मेडिकल स्टोअर्स ना मिळते ती पदरात पाडून घेणे आणि दुसरे कारण गंभीर आहे, ते म्हणजे रुग्णाला भली मोठी औषध यादी देऊन त्यातील निम्मी औषधे प्रत्यक्षात रुग्णासाठी वापरून उर्वरित मागील दाराने पुन्हा मेडिकल स्टोअर्स ला परत करून नफा कमावणे. अर्थात कधीकधी यात हॉस्पिटल व्यवस्थापन सहभागी नसते तर स्टाफ नर्स सहभागी असतात.
हे लिहिण्याचा प्रपंच याचसाठी की गेल्या चाळीस वर्षात प्रत्येक बाबतीत प्रचंड वाढ झाली आहे. एकीकडे मुबंई शहरातून मोठे उद्योग, कंपन्या हद्दपार झाल्या आहेत तर शहरीकरण वाढत आहे.
शाळांचे तेच झाले, पार्ले येथे सहस्त्रबुद्धे यांची पार्ले विद्यालय, दादर येथे रेगे यांची बालमोहन, राजे शिवाजी, शारदाश्रम, परेल येथे शिरोडकर, भट, महात्मा फुले, ग्रँट रोड येथे रॉबर्ट मनी, डोंबिवली येथे स.वा.जोशी, नेरुरकर ,डी. एन. सी. शाळा अशा नामचित शाळा होत्या. या शाळांची आज काय अवस्था आहे? बिली बॉंग, स्कॉटिश, आयर्न लेडी, ग्रीन स्कुल अशा शाळांनी सीबीएससी, आयसीएससी पॅटर्न राबवत मुबंई मधील सर्व शाळा हायजॅक केल्या. या शाळांच्या उंचच उंच चकचकीत इमारती, तो गणवेश,ते सो कॉल्ड सफाईदार इंग्लिश याची नशा मध्यम वर्गावर पडली आणि आपण ज्या शाळेतून शिकलो त्या ओस पडल्या.
गुरुजी, सर, हद्दपार झाले. मनोज, रवी सर,नीता मॅम आल्या. मित्र आपला नातू स्कॉटिश शाळेत शिकतो आणि दीड लाख फी मुलगा भरतो हे अभिमानाने सांगू लागला आणि माशेलकर म्युनिसिपल शाळेत शिकले त्याच शाळेत मी होतो हे ही सांगू लागला. जयंत नारळीकर, काकोडकर आणि असे अनेक दिग्गज शास्त्रज्ञ, लेखक हे एक तर म्युनिसिपल शाळेत किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि तरीही त्यांनी आपल्या कर्तृत्ववाने योग्य उंची गाठली. किती विरोधाभास! मोठ्या शाळेत जाऊन मुलं मोठी होत नाहीत तर मुलं आपल्या सदाचार आणि कर्तृत्वाने शाळेच नाव मोठं करतात.
कोल्हापूरच्या राजवाड्यात भोसले घराण्याची वंशावळ लिहीली आहे आणि आज त्यांचे सतरावे वंशज कोल्हापूर राजवाड्यात स्थानापन्न आहेत. त्यात शिवाजी ,संभाजी, शाहू आणि राजाराम ही नावे किमान तीनवेळा आली आहेत. यापुढे वंश विस्तार सुरूच आहे. लोकसंख्या वाढी बरोबरच नगर विस्तार आवश्यक ठरतो. शहाजी राजांनी पुणे वसवले अशी नोंद आहे. तेव्हा दोन नद्यांच्या दरम्यान पुणे होते आज पुणे वाकड सोडून दूर पळत आहे तीच बाब मुंबईची सत्तरच्या दशकात मुंबई आणि मुंबई उपनगर पुरेनात म्हणून नवी मुंबई ची स्थापना सिडको मार्फत झाली. आता पनवेल सिमा ओलांडून पेणच्या दिशेने, उरणच्या दिशेने मुंबई विस्तारत आहे. उपनगराचा विचार करता दहिसर सिमा ओलांडून ती कधीच मिरा भाईंदरला कवेत घेऊन वाढली पण आता तर तीने विरारही गिळंकृत केले आणि डहाणूला धक्का दिला. तेव्हा वाढीचा वेग अफाट आहे. आजतरी प्रत्येक क्षेत्रात मागणी भरपूर आहे. तुम्ही बाजारात चांगले नव्हे तर उत्तम घेऊन याल तर तुम्हाला ग्राहक पसंती देतील मग तुमचा व्यवसाय कोणताही असो.
‘नाणे वाजवून घ्यावे’ अशी म्हण आहे. तुम्ही घर विकता, दाग दागिने विकता, कपडा विकता की अन्य गृहोपयोगी वस्तू विकता,काहीही विका, जर तुमच्या उत्पादनाला गुणवत्ता असेल आणि जर तुम्ही योग्य ग्राहक सेवा देत असाल, जर तुमच्या वागण्यात, बोलण्यात माधुर्य आणि ठामपणा असेल तर ग्राहक स्वतः तुमच्याकडे येईल. ‘ज्याची गुणवत्ता , त्याचीच जगावर सत्ता.’लोक तुम्हाला मोठ करायला उत्सुक आहेत पण तुम्ही मोठं व्हायला कठोर परिश्रम आणि सातत्य टिकवून तयार आहात का? Yes तस असेल तर आज, उद्या आणि परवा तुमचाच आहे. मोठी स्वप्ने पहा मोठे मोठेच व्हा.
तेव्हा वाढ संख्येत होत आहे की ती गुणात्मक होत आहे याला फार महत्व आहे. सध्या दर वर्षी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा वकील पदवी घेतलेले लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात पण यातील किती विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा तात्काळ वापर करू शकतात हे महत्वाचे आहे. आपल्याला पदवीच्या भेंड्योळ्या घेतलेले पदवीधारक नकोत तर ज्याला त्या क्षेत्रातील ज्ञान आणि ते ज्ञान वापरायची उत्तम जाण असेल असे विद्यार्थी हवे आहेत. जर यासाठी आपण झटत असाल तर पुढचा स्टार्टअप तुमचा असेल याची खात्री बाळगा.
आपल्या देशात कल्पना मांडणारे लाखो आहेत पण त्याचे इंम्फ्लीमेंटेशन करणारे फारच थोडे आहेत. या थोड्या, मोजक्यात असणारेच आपले नाव इतिहासाच्या छाताडावर लिहू शकतात. मग तुम्ही तयार आहात ना? आज पंतप्रधान मोदी यांचे नाव जगात गाजते, का? दिल्ली लोकसभेत राघव चड्डा भाषण करतांना इतर सासंद कान टवकारतात का? या का च्या पाठचे उत्तर आणि त्यासाठी ध्यास आणि धोका पत्करण्याची तयारी असेल तर वाढणाऱ्या लोकसंख्येचा, आव्हानांचा बाऊ करत बसण्याची गरजच उरणार नाही.