श्रद्धा आणि राजकरण

श्रद्धा आणि राजकरण

निष्ठा हा शब्द कसा प्रचलित झाला असावा? श्रद्धा आणि निष्ठा ह्या शब्दात जो फरक आहे त्यामध्ये श्रद्धाळू मतलबी कि निष्ठावान मतलबी कि दोन्ही सारखेच मतलबी. साहेबांवर श्रद्धा आजही आहे म्हणणारे आज साहेबांच्या पक्षात नाहीत ह्याचा सामान्यजनांनी काय अर्थ घ्यायचा? कि श्रद्धेचे राजकरण सोयीप्रमाणे करून स्वतःचा स्वार्थ जपणे एवढच मतलबी माणसाच्या लक्षात राहत.  आज रामपाल महराजांचा विषय गाजतो आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भक्तांनी रामपाल ह्यांना अटक होवू नये म्हणून त्यांच्या  आश्रमा भोवती गराडा घातला होता.गेले पंधरा दिवस स्थानिक पोलीस आणि रामपाल ह्यांचे शिष्य यांचात बाचा बची सुरू होती कोर्टाचा आदेश होवूनही त्यांना अटक करता येत नव्हती.आपल्यावर भक्तांचा असणाऱ्या श्रद्धेचा गैर फायदा घेत रामपाल आणि त्यांचे पाठिराखे प्रशासनाला हुलकावणी देत होते. सामान्यजन खोट्या श्रद्धेच्या मोहात गुरफटले कि भोंदू बाबा लोकांचे प्रस्थ वाढते.ह्या भोंदू बाबांना जनाधार आहे हे ओळखून हुशार राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी बाबाची पाठराखण करतात. ना त्यांची बाबावर श्रधा असते ना बाबाशी त्यांना काही देणे घेणे असते.
 आज प्रत्येक राज्यात अशा बाबा  लोकांचे पेव फुटले आहे, पक्का राजकारणी ह्या बाबाच्या हात चलाखीचा आणि अंधश्रद्धाळू लोकांच्या भोळ्या निष्ठेचा फायदा घेवून आपली मतपेटी आणि आपले राजकरण साधत आहेत. अशा बाबांच्या आश्रमात राजकारणी नेत्याची उठबस का असते? हा संशोधनाचा विषय आहे. मठात आणि आश्रमात अंधश्रद्धाळू महिलांचा वावर असतो.बिचाऱ्या आपले कौटुंबिक प्रश्न सुटावेत ह्या साठी बाबा आणि साधू लोकांच्या आश्रयाला आलेल्या असतात.त्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर फायदा घेत बाबा त्यांना नादी लावतात आपल्या वाणीने आणि त्यांच्या भाटानी बाबाच्या केलेल्या खोट्या स्तुतीला भुलून ह्या अशिक्षित आणि अगदी शिक्षित स्त्रियाही बाबाच्या भूलथापांना बळी पडून सर्वस्व  अर्पण करतात.
 अशा नाडल्या गेलेल्या महिलेला समाजात काय सांगाव आणि कस सांगाव हेच कळत नाही कारण अब्रू …….. !  तोंड दाबून बुक्क्याचा मार ह्या महिला सहन करतात.पुढच्यास ठेच मागचा शहाणा हि म्हण आहे पण वास्तवात तसे घडत नाही.अनेक बाबा लोकांना तुरुंगवास होवूनही बाबा लोकांच समाजातील महत्व कमी झालेलं दिसत नाही.ह्या अंध श्रद्धेला आणि ह्या फाजील विश्वासाला  काय म्हणावे? राजकारणी माणुस अश्या बाबा लोकांचा आपल्या राजकारणासाठी आणि अगदी गलिच्छ समाधानासाठी अश्या आश्रमी बाबांना संरक्षण देतात.श्रद्धा अंध असून चालत नाही आणि शास्त्रीय आधार असल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही हे सत्य न स्वीकारता स्वत:चे धन आणि शीलही डावाला लावणाऱ्या भक्त जनांना कोणी आणि कशासाठी सल्ला द्यावा?
जी गोष्ट बाबा लोकांची तीच गोष्ट समाजात वावरणाऱ्या समाजसेवकाचा बुरखा पांघरणाऱ्या लोकांची.आपल्याला समाजाची चिंता आहे समाजाचे प्रश्न आपल्या इतके कोणाला चांगले समजले नाहीत असा आव आणत उपोषण,रास्तारोको करत जन आंदोलन करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधत राजकीय वजन निर्माण करायचं हे तंत्र अनेक नेते म्हणवणारे लबाड वापरात आहे.समजातील नाडला गेलेला गरिब  आपल्यासाठी ईश्वराने मसिहा पाठवला असावा आणि आपल्यासाठी तो शासना विरोधात लढतो आहे असे वाटल्याने भोळी जनता त्याच्या पाठीशी उभी राहते.त्यालाच आपला देव मानू लागते.जनतेचा विश्वास बसावा म्हणून एखादे आंदोलन हा नेता यशस्वी करून काही फुटकळ मागण्या मान्य करून त्याची जाहिरात करतो आणि तोच जनतेचा तारणहार आहे अशा कंड्या  पिकवतो. एकादाका जनतेने त्याचावर विश्वास टाकला कि तो गरीब,अशिक्षित लोकांच्या गळ्यातला ताईत असल्याचा आव आणत सरकार दरबारी आपले वजन वाढवत स्वार्थ पलीकडे काहीही करत नाही.अशी दिशाभुल करत आपली संघटना गरज भासल्यास एखाद्या पक्षच्या दावणीलाही बांधतो.म्हणूनच जनतेन शहाण झाल पाहिजे.
विश्वास,श्रद्धा कोणावर ठेवावी? कोण  आपल्या भोळ्या स्वभावाचा आणि मजबुरीचा वापर करत आहे? ह्याचा विचार करूनच नेतृत्व मान्य केल पाहिजे. आज समजतील कनिष्ठ गटांच नेतृत्व करणाऱ्या अनेक संघटना आणि नेते उदयाला आले आहेत पण स्वतःला पद आणि प्रतिष्ठा मिळाली कि ह्यांची जनांदोलन बस्त्यात जातात.आज महाराष्ट्रात अशा उपटसुभांचा सुकाळ झाला आहे. जनेतेचा कोणतही प्रश्न ह्यांना नीट समजला नाही तरी आझाद मैदान, काळाघोडा,शिवाजी पार्क मैदान इथे जनतेचा समूह जमा करायचा आणि सरकारला नव्हे तर सामान्य जनतेला वेठीला धरायचे असले सर्रास प्रकार चालत आहेत.ज्यांनी ह्या आंदोलनात,रस्तारोकोत,किंवा उपोशणात भाग घेतला त्यांना आपल्या आंदोलनाच ,आपल्या मागणीच काय झाल ह्याच कधीच काही कळत नाही.आत्ता वेळ आली आहे आपलेच प्रश्न आपण सोडवण्याची कारण ज्यांच्यावर विश्वासून तुम्ही उपाशी पोटी आंदोलन केलीत त्यांनी खरच तुम्हाला काय दिल ?ह्याचा विचार करा.केवळ डोकी भडकावून आणि भावनेला हात घालत जाळपोळ करून तुमचे प्रश्न कदापि सुटणार नाहीत.
  श्रद्धा आणि विश्वास जरूर असावा पण कोण पेंढारी आहेत आणि कोण पुढारी आहेत त्यांना ओळखून चार पावले दूर राहा नाहीतर हे नेते तुम्हाला आंदोलन करून जेलमध्ये जायला भाग पाडतील आणि तुमच्या जीवावर तडजोड करत रातोरात मालेमाल होतील.राजकारणा करिता तुमचा वापर कोणी करू पाहात असेल तर त्याला  चार हात दूर ठेवा. तुमच नेतृत्व करण्यासाठी उभी राहिलेली व्यक्ती हि समाजच हित पाहणारी आहे कि समाजसेवकाचा वेश घेतलेला लांडगा आहे हे ओळखा.अधिवेशनाचे दिवस जवळ आले कि वातावरण तापवायला हे स्वयंघोषित नेते आंदोलन सुरू करतात,गोवारी हत्याकांड असुदे कि अन्य आंदोलन जनतेचा काय फायदा झाला? कोणाचा बळी गेला?कधी नेता अशा आंदोलनात मेल्याच सोडाच साधा जखमी झाल्याच ऐकिवात आहे का ? तर ह्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असेच बगळे तुमचा वापर करून घ्याय ला तापून बसले आहेत ,जरा जपून, ”समजने वालो को इशारा काफी होता है||” समाजकारणाच ढोंग घेतलेली टग्या नेत्यांना दूर ठेवा.सश्रद्ध असा अंधश्रद्ध नको

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar