आठवणीतील दिवस

आठवणीतील दिवस

आठवण ही जादूची पोतडी आहे त्यात किती आणि कोणकोणते प्रसंग साठवून ठेवले असतील ते सांगणं तसं अवघड आहे. ही आठवण अचानक कधीतरी उफाळून येते. प्रत्येकाला त्याचे बालपण हा सुखाचा काळ होता असेच वाटत असावे. भले त्या वेळेस आर्थिक सुबत्ता नसेलही पण आपले एकाच वयातील सवंगडी, त्यावेळचे बिनपैशांतील खेळ, रूसणे फुगणे, एकत्र वनभोजन किंवा साजरी केलेली कोजागिरी, गावातील गोंविदा आणि त्यात केलेला, ‘घरात नाही पाणी घागर उताणी गो’ नाच, शाळेत भाषण करतांना अचानक झालेले विस्मरण आणि फजिती.

खो खो खेळताना अचानक टर् असा आवाज होत पँट पाठीमागे फाटणे, खो देऊन उठतांना बाही हातात येणे. शाळेबाहेर सरकून पडल्याने कपडे चिखलात माखणे आणि त्यानंतर मुले हसली म्हणून अनावर होऊन आलेले रडू , एक ना अनेक घटना आठवू लागतात. ज्यांच्या बाबतीत घटना घडली ते मित्रमैत्रीणी आठवतात. तेव्हा बालपण ते तारूण्य या काळातील आठवणी म्हणजे एक रंजक इतिहास आहे. तो विस्मरणात जाऊ नये म्हणून त्या काळातील मित्र, ते ठिकाण याची नाळ तुटू देऊ नये.

माझं बालपण खेडेगावात गेलं. चारचौघांसारखं सामान्य जीवन वाट्याला आलं पण त्या काळात दुरदर्शन नसल्याने जगण्यात एक वेगळा उत्साह होता. पावसात चिंब भिजावे, ओढ्यात पोहावे, पाऊस संपला की शाळेसमोरील गवत अंथरलेल्या मखमली मैदानावर मस्त गडबड लोळावे. चिंचेवर झोके घ्यावे, विटी दांडू, डबल एक्सप्रेस, गोट्या,
आबाधुबी ,चोर पोलीस ,लगोरी, हु तू तू असे अगणित खेळ खेळावे यातच दिवस जाई.

चार दोन सधन शेतकरी किंवा मोठे व्यापारी सोडले तर बाकी, ‘सब घोडे बारा टक्के’ तुमचं आमचं सेम टू सेम अशी परिस्थिती होती. वडील मोठ्या वयात नोकरीसाठी वेंगुर्ला येथून मुंबईत आले. नातेवाईकांच्यख ओळखीने ठाणा रेमंड मिलमध्ये कामाला लागले आणि तेथील आर्द्र वातावरणाचा त्रास होऊ लागला म्हणून ती नोकरी सोडून सफाळे गावात आपल्या मोठ्या भावाकडे आले. माझी आई तेव्हा मामाकडेच गावी रहात होती.

तेव्हा फारच थोड्या लोकांना नोकरीसाठी मुलाखत द्यावी लागे, उरलेले भाऊ किंवा कोणी दूरचा नातेवाईक अथवा गावातील ओळखीची व्यक्ती याच्या मदतीने तेथे चिकटवले जात. तेव्हा म्हणजे १९५० ते ५२ ला गिरणी जोमात होत्या. खाजगी कंपन्या जोशात होत्या मुंबईत आलेल्या आणि काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती नोकरी सहजच मिळे.

कंपनीत वरीष्ठ पदावरील मॅनेजर ,सुपरवायझर असलेल्या व्यक्ती गावावरून आलेल्या व्यक्तीला, आपल्या किंवा मित्राच्या मदतीने अन्य कोणत्याही टेक्सटाईल गिरणीत अथवा कंपनीत सहजच कामाला लावत असत . गोदरेज, व्होल्टास, भारत बिजली, सिमेन्स, बरोज वेलकम, सिबा गायगी, सिएट टायर, नोसिल, या आज ज्या नावारूपास असलेल्या कंपन्या आहेत, तेथे तेव्हा ओळखीने सहजच नोकरी मिळत असे,अर्थात आता हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही.

सफाळा फारच गावंढळ भाग होता. प्रवासी साधने नव्हती, संपूर्ण दिवसात रेल्वेच्या दोन ते तीन मुंबईकडे जाणाऱ्या आणि तितक्याच मुंबई वरून येणाऱ्या गाड्या सफाळा येथे थांबत. इतर वेळेस प्लटफार्मवर शुकशुकाट असे. वस्ती अतिशय विरळ होती.

सफाळ्यात आल्यानंतर त्यांच्या दूरच्या आतेभावाने, शांताराम शेट केळुसकर यांनी त्यांना जंगल किंवा वन खात्यात चिकटवले. तेव्हा नोकरीसाठी शैक्षणिक अहर्ता, वयाची अट, अर्ज करणे, लेखी परीक्षा, मुलाखत या झंझटी नव्हत्या, तर शब्द टाकणे, पायावर घालणे, चिकटवणे या पध्दतीने नोकरी मिळे. वडील मोडी लिहीत, मराठी लिखाणही अगदी टोकदार होते. स्वतःची लफाटेदार सही करत. मुंबई किंवा पुणे या ठिकाणी कामाला लागलेली व्यक्ती हळूहळू अनुभवातून आपणच शिके. वडिलांना पालघर येथे घोलविरा तपासणी नाक्यावर नोकरी होती. जंगलातून होणाऱ्या चोरट्या लाकूड कटाईवर लक्ष ठेवणे आणि अशी लाकडे वाहून नेणारी बैलगाडी वा टेंपो जप्त करणे असे या पदावरील व्यक्तीचे काम होते. त्या पदावरील व्यक्तीला नाकेदार म्हणत. मात्र येथे बिऱ्हाड थाटणे धोक्याचे होते कारण तेथे मुळीच वस्ती नव्हती. पालघर येथे त्यांच्या जवळच्या नात्यातील कोणी नव्हते म्हणून त्यांनी सफाळ्यात बहिणीच्या शेजारी बिऱ्हाड थाटले , उद्देश हाच की ते कामावर असतील तेव्हा आईला नणंद सोबत करेल. वडील पावणे सहा फुट उंच सावळे पण दणकट देहयष्टीचे होते. त्यांना पाहताच समोरच्या व्यक्तीच्या मनात धस्स होई.

ते स्वतः एकटे गावाच्या बाहेर जंगलाच्या वाटेवर निर्जन जागी असलेल्या फॉरेस्ट नाक्यावर, पालघर येथे राहात तेथे त्यांच्यासाठी ऑफिस वजा घर फॉरेस्ट खात्याने दिले होते. ते महिन्यातून एकदाच पगार झाला की घरी दोन दिवस येऊन जात. वडील सतत नोकरीच्या ठिकाणी रहात असल्याने आमच्या त्यांच्या नात्यात तसा दुरावाच होता.

तेव्हा ट्रेझरी रोखपाल कर्मचाऱ्यांना पगार हातात देत असे. पगाराच्या दिवशीच बिस्कीट किंवा अन्य खायच्या वस्तू घरी येत त्यामुळे वडील सुट्टीवर येणार त्या तारखेकडे आम्ही लक्ष ठेऊन असायचो. सगळ्याच कुटुंबात तेव्हा सरासरी चार पाच मुले असतं. जन्म घेऊन मुले मोठी होत असत. मुलांच्या संगोपनाची सर्व जबाबदारी अर्थात आईची. मुलांनी पालकांचे निमुट ऐकणे हाच संस्काराचा भाग वाटे. ऐकले नाही तर किमान पाठीवर धपाटा, पायावर एखादी काठी पडे. त्यामुळे पालकांनी मुलांवर प्रेम करावे असा तो काळच नव्हता. याला एखादे कुटुंब अपवाद असावे नाहीच असे नाही.

कुटुंब व्यवस्था इकडून तिकडून अशीच होती. आठ वर्षांवरील मुलींना आईच्या मदतीस जुंपले जाई, त्या मानाने मुलांना थोडी सुट असे. वडील कधीतरीच अभ्यासाविषयी विचारायचे. आय कमी आणि व्यय जास्त त्यामुळे परिस्थिती बेताची असायचीच. अर्थात तरीही घरात यावर काही बोलण्याचा वा प्रतिक्रिया देण्याची कोणालाच हिंमत नव्हती. वडीलांचा चेहरा कष्टाने रापलेला आणि डोळे घारे पण वेध घेणारे होते, ते सहजा मारत नसत पण त्यांची भिती वाटे. त्यांच्या समोर उभे राहण्याची हिंमत नव्हती.

वडील क्वचित कधीतरीच ओरडले असावेत पण का कुणास ठाऊक? त्यांची भिती वाटे त्यामुळे लहानपणी मी त्यांच्या जवळ जात होतो, त्यांनी मला उचलून घेतलं, मांडीवर बसवलं अशी कोणतीच आठवण नाही. मात्र स्टेशनवर गेले की ते चणे शेंगदाणे घेऊन येत आणि हातावर घालत. तेव्हा पाच पैशात पसाभर चणे येत. आज आपण कामावरून येतांना मुलांना वडापाव, भजी, पिझ्झा किंवा चॉकलेट आणतो तसे तेव्हा काही प्रचलित नसावे आणि कोणी आणतही नसावे. तुला आई आवडते की वडील? असला फाजील प्रश्न मला कधीच कोणी विचारल्याचे आठवतही नाही.

आज मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो तसा तेव्हा साजरा केला जात नव्हता. माझ्या लहानपणी आम्हा भावंडांचा कधीच वाढदिवस साजरा झाल्याचे मला आठवत नाही. अभ्यंगस्नान घालण्यापूर्वी आई किंवा ताई पाटावर बसवून उटणे लावून ओवाळत असल्याची आठवण मात्र आहे. तेव्हा उटणे घरीच पाट्यावर वाटले जात असे त्यात आवळा, कापूर आणखी काय काय होते ते स्मरणात नाही.उटणे खरखरीत लागत असे पण कशालाच नावे न ठेवण्यातच हित होते. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज सणाला ताई ओवाळत असे. आम्ही आईनेच दिलेली पावली किंवा आठ आणे भाऊबीज तिला घालत असू.

१९५४ साली सफाळ्यात अगदी स्टेशन समोर राजगुरू पंडीत यांची एक ईमारत होती त्यापाठीमागे चिकूची वाडी होती,या वाडीत त्यांचे ऐसपैस बैठे घर होते . घरासमोर खूप मोठ्ठी विहीर होती आणि त्यावर डिझेलचे पाण्याचे इंजिन होते. या इंजिनवर पिठाची गिरणीही चाले. ते पुण्यात रहात आणि हवापालट म्हणून सफाळ्याला येत असत. कधीकाळी ते मंत्री होते. तेथेच त्यांची आणखी , एक माळ्याची इमारत होती, त्यात चासकर कुटुंबासह काही मध्यम वर्गिय पांढरपेशी कुटुंब राही. ते बहुधा सरकारी कर्मचारी होते. या इमारतीच्या मागे भरपूर जमीन होती आणि उंच गोलाकार भात साठवायची कणगी सारखी इमारत होती.

स्टेशनवर ग्रामपंचायत कार्यालय होते,त्यात रोज एक ,दोन वर्तमानपत्रे येत. धोतर आणि वर नेहरू शर्ट असा पेहराव असणारे ह.म.दिक्षित हे सफाळ्यात जुने वार्ताहर होते. अर्थात ते बातम्या कुठून आणत त्यांचे त्यांनाच माहिती. सफाळ्यात या काळात कोणाकडे मोटरगाडी असल्याचे पाहिले किंवा ऐकले नव्हते. मात्र रामबाग गावातील एका ठाकूर आडनावाच्या व्यक्तीकडे खूप मोठ्या आकाराची एकमेव मोटरसायकल होती.

काही श्रीमंत जमीनदार लोकांकडे स्वतःचे टांगे होते. केळुसकर शेट, रानडे शेट, नृसिंह सामंत शेट, भाऊराव पाटील, फडके शेट हे टांग्याने प्रवास करत. त्यांच्याकडे टांगा हाकणारा नोकर नेमला जाई. स्टेशनवर गुजराती समाज आणि त्यांची दुकाने किंवा पेढ्या होत्या त्यांनाही शेट किंवा शेठ म्हणण्याचा प्रघात होता. बाबुलाल मगनलाल, घेरीलाल, फुलचंद असे मारवाडी यांची वाणसामान दुकाने प्रसिद्ध होती. येथील गुजराती ,मारवाडी ,जैन मुले आमच्या सोबतच मराठी माध्यमात शिकत.

सफाळा स्टेशनवर ग्रामपंचायत कार्यालया जवळ एक पार होता, या पाराच्या समोर एका लाकडी खांबावर पितळी घंटा होती. गावात काही अघटित घडले किंवा घोषणा करायची असेल तर ही पितळी घंटा जोराने बडवली जाई. तिचा आवाज दोन ते तीन किलोमीटरवर पोचे. एकदा कपासे गावाच्या हद्दीत कच्चे तेल वाहून नेणाऱ्या रेल्वे गाडीच्या डब्याला आग लागली होती. त्याची सूचना देण्यासाठी ही घंटा वाजवली गेली होती. आग लागलेली वाघीण वेगळी करतांना सफाळ्यातील अनेक तरूण भाजले होते. त्यात मन्या निमकर, मांजरेकर पोर्टर , रणझोड कंपाऊंडर यांना शरीरावर भाजल्याचे व्रण होते. ही पेटती वाघीण दूर केली नसती तर सफाळ्यातील बरीच वस्ती नष्ट झाली असती.

स्टेशनवर काही मोजक्या इमारती होत्या. लखमसी शहा यांचे घर, शांताराम शेट केळूसकर यांच्या चाळी, लोहार काम करणारे चंपानेरकर कुटुंब ज्याच्या मागे त्यांच्याच जागेत पोष्ट ऑफिस होते. त्यापुढे शेट्टी कुटुंबाचे उपहारगृह, नृसिंह सामंत यांचे गवताचे गोडाऊन होते.म्हशींचे तबेले होते. ते मुंबईत दूध विकत या शीवाय पंचक्रोशीतील गवत विकत घेऊन मुंबई येथील म्हशीच्या तबेल्यांना गासड्या करून पुरवत असत.ते सधन शेतकरी होते आणि गावातील बहुसंख्य आदिवासी आणि आगरी समाज त्यांच्याकडे नोकरी करत असत. त्यांचे रहाणीमान अतिशय साधे होते. खाकी रंगाची अर्धी विजार आणि स्वच्छ सफेद रंगाचा शर्ट हा नेहमीचा पेहराव. कुठे बाहेर जायचे असल्यास लेहंगा आणि झब्बा.

या गवताच्या गोडाऊन समोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, अय्याज, गुलाम, सुलतान आणि इतर चार मुस्लिम समाजाची घरे, अंतु नाना फडके यांचे माडीचे घर आणि फुलचंद शेट यांची भाताची आणि लाकडाची गिरणी होती.

शांताराम शेट केळुसकर यांचे माडीचे प्रशस्त घर दुरून दिसत असे. शांताराम शेट केळुसकर हे जंगलाचे ठेकेदार होते. आज फुलचंद यांची लाकडाची, भाताची गिरणी ही शांताराम शेट केळूसकर यांच्या जमिनीवर उभी आहे. शांताराम शेट यांनी गोरगरीब जनतेसाठी एक मोठी विहीर रस्त्याच्या कडेला बांधली होती. नंदाडा आणि नारोडा येथील सर्व नागरिक या विहिरीचे पाणी भरत. शांताराम शेट यांची आजच्या तांदूळवाडी रस्त्याच्या कडेला चाळ होती त्यात वर्तक कुटुंब, गुर्जर पाध्ये , मोहनशेट सामंत रहात असत. या चाळीच्या समोरील बाजूस ,रस्त्याच्या पलीकडे एक मजली चाळ होती. या चाळीतच सफाळा विद्यामंदिर माध्यमिक शाळा भरत असे. या शाळेत आठवी ते अकरावी वर्ग भरत असत. कालांतराने येथे इयत्ता ०५ ते ११ वी वर्ग भरू लागले. ही संपूर्ण इमारत लाकडी ढाच्यावर उभी होती आणि या इमारतीच्या भिंती विटा चुन्याने बांधल्या होत्या. मोहन सामंत या शळेत दरमहा नाममात्र एक रुपया घेऊन मुख्याध्यापक म्हणून काम करत.

आज असलेली जिल्हा परिषद शाळा न.०१ ही केळुसकर यांच्या जागेत होती आणि त्यापुढे मैदान असा माहोल होता.या संपूर्ण भागाला उंबरपाडा म्हणत. त्यापूढे कुतुबुद्दीन यांच्या दोन चाळी होत्या. यापैकी एका चाळीत आमच्या शाळेत शिकवणारे भोईर शिक्षक रहात असत तर एका चाळीत मन्याकाका हे नरसिंह सामंत यांचे मुकादम रहात असत. त्यापुढे अर्धा,एक किलोमीटर अंतरावर मुळ सफाळा गाव होते. या गावात जो रस्ता जाई त्याच्या तिठ्याला चावडी म्हणत.

कधीकाळी तेथे तलाठी कार्यालय होते. ते महसूल गोळा करण्याचे ठिकाण होते, तेथे गावातील प्रतिष्ठित पोलीस पाटील रहात होते आणि ते आदिवासी आणि काथोडी समाजातील भांडणे तेथे सोडवत म्हणून कदाचित त्या तिठ्याला चावडी संबोधत असावेत. त्यापुढे कुर्लाई देवीचे मंदिर आहे. फार पूर्वी ही देवी सरतोडी येथील टेकडीवर होती तिथून तिला गावात आणून तिची प्रतिष्ठापना केली हे मी लहान वयात ऐकले.

मुळ सफाळे गावात तेव्हा फक्त आगरी वस्ती होती. सफाळा गावात पुर्वपार येथे पाटील आळी आणि घरत आळी अशा दोन आळ्या आहेत. हा समाज मुळात दादर येथे रहात होता. इंग्रजांनी रेल्वेचे जाळे तयार करायला घेतले तेव्हा दादर माटुंगा ते बांद्रा या दरम्यानच्या जमीनी ताब्यात घेतल्या तेव्हा येथील मुळ निवासी आगरी समाजाला बोरीवली पूढे विस्थापित केले. ते विरार आणि पुढील पट्ट्यात राहिले. दुर्दैवाने तेव्हा प्रकल्पग्रस्त असा शेरा नसल्याने ते आरक्षित नोकरी पासून वंचित राहिले. इथे या समाजाची वस्ती विरळ होती. गावाचे क्षेत्रफळ फार नसल्याने वाढ होण्यास वाव नव्हता. कुडू, किणी,वझे या आडनावाची मोजकी कुटुंब होती, जी आजही आहेत.

गावाला वळसा घालून ओहोळ आहे याचा उगम तांदुळवाडी किल्ल्यावर आहे. सध्या या प्रवाहावर लोडखड किंवा रोडखड येथे मातीचा बंधारा आहे. ह्या ओहोळवर काही ठिकाणी कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधल्यामुळे पावसाळ्यातही या ओहोळाला पूर येत नाही. माझ्या लहानपणी पावसात ओहोळ तुडुंब भरून वहात असे आणि आम्ही त्या ओहोळात उडी घेत असू. तेव्हा मरणाची भिती वाटत नसे कारण ते वाचनात नव्हते. ऐकण्यातही नव्हते.

गावात एकट जायचं म्हटलं तर पाय लटपटायचे कारण सपाट रस्ता तर नव्हता, पण आजुबाजुला प्रचंड वाढलेले निवडुंग व झाडी होती. शेते होती आणि त्याला निवडुंगाची कुंपण होती. एकंदरीत वातावरणात गुढता होती. पावसात रस्त्यावर साप फिरत असत. कोणीतरी भुतं आणि चेडा किंवा देवचार कुठही आणि कधीही गाठतो अशी समजूत येथील वृद्ध लोकांनी करून दिली होती. वाटेत एका चिंचेच्या झाडाखाली अकाली गेलेल्या लहान मुलांना पुरले जात असे त्यामुळे तेथे भिती वाटे.

माझी आई कोकणातील मालवण तालुक्यातून बिऱ्हाड थाटायला इथे आली. कोकणात त्यांचे घर डोंगराला लागूनच होते त्यामुळे तिला येथील परिसर आणि खेड्यात फारसा फरक पडला नाही. ती घाबरट नव्हती कारण तिच बालपण चक्क डोंगरातील घरात गेल होत. माझ्या आजोळी परसदारी घराला लागूनच डोंगर होता. पावसाळ्यात विंचू, साप सहजच दिसत तसेच तिच्या लहानपणी आईने तिच्या आईकडून, भुताखेतांच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण तसा कधीतरी अनुभव आला नव्हता त्यामुळे ती धीट बनली होती.

तेव्हा सफाळ्यात लाईट नव्हती, गावात दोन ठिकाणी लाकडी खांबावर दिवे लावण्यासाठी षटकोनी पतंगाच्या आकाराचे काचेच छोट घर बसवलेलं होतं. त्याची एक बाजू उघडझाप करण्यासाठी झडप होती. रोज संध्याकाळी ग्रामपंचायतीचा शिपाई तेथे येऊन त्यात रॉकेलचा दिवा लाऊन जाई त्याचा प्रकाश शे दोनशे चौरस फुटात पडत असे तेवढाच काय तो तेथे गाव असल्याचा पुरावा.

तेव्हा, घासलेट अतिशय तुटपुंजे मिळत असल्याने शक्य होईल तेवढ्या लवकर घरातील कामे आवरून जेवून घेण्याकडे कल असे. साडे सहा सात पर्यंत देवाची आरती झाली की पुढील तासाभरात जेवून भांडी आवरून ओसरीवर गप्पांची मैफल भरे. मग दिवसभरात गावात घडलेल्या घटनांचा उहापोह होई. फक्त अभ्यासापुरता दिवा किंवा कंदील पेटता ठेवला जात असे.

साधारण साडे आठ फारतर नऊ वाजले की संपूर्ण गाव झोपी जात असे. लाईट नसल्याने पंखे नव्हते त्यामुळेच पावसाचे दिवस वगळता घरासमोरील ओटीवर ऐसपैस झोपण्याची सवय होती. तेव्हा चोर चिलटांची भिती नव्हती. असेलच कशी? सगळेच गरीब होते. दुसरे म्हणजे चार दोन सधन कुटुंब सोडता कोणाकडे चोरण्यासारखे काही नव्हते, चोरून चोरणार तरी काय?

थंडीच्या दिवसात आम्ही भावंडे गोधडी घेऊन झोपलो की सकाळ पर्यंत जाग नसे. पावसाळा संपला की चांदण्यात झोपायला छान वाटे. खाली धरणी वरती स्वच्छ आकाश आणि लुकलुकणारे तारे अतिशय मनोहरी दृष्य. हिवाळ्यात दव पडू लागला की थोडी अडचण व्हायची. सकाळी चादर चिंब भिजलेली असे मग घरात झोपण्याशीवाय पर्याय नसे. थंडी पडू लागली की घरीच सुती साड्यांच्या आणि वर मांजरपाट लावून हाती शिवलेल्या गोधड्या छान उबदार वाटत. कोणी दुलई किंवा रजयी म्हणत. गरीबांना गोधडी किंवा वाकळ हाच जवळचा शब्द. थंडीच्या दिवसात काट्या कुटक्या शोधून शेकोटी पेटवण्याचा उद्योग रोजच चाले. याच दिवसात बोरे पिकत असत. सकाळी उठून पडलेली बोरं वेचून खाण्यात मजा यायची. तेव्हा आम्ही लोकांच्या कुंपणावर असलेल्या कैरी चोरून आणायचो.

आता लहान मुले अडीच वर्षे वय झाली की बालवाडीत किंवा नर्सरीत जातात. एवढ्या लहान वयात, जोरजबरदस्ती करून त्यांना बालवाडीत पाठवल्यावर त्यांचे बालपण फुलणार तरी कसे? आम्हाला नर्सरी म्हटलं की सरकारी रोपवाटिका आणि बागेची आठवण येते. माझ्या वयातील सर्व लहान मुलं सहाव्या किंवा सातव्या वर्षी शाळेत गेली. पाच वर्षापर्यंत मुलं आईच्या दुधावर वाढत, त्यामुळे त्यांची शारिरीक प्रतिकारशक्ती आताच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त आहे. मुख्य म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील स्पर्श आणि निकटता यामुळे त्यांच्यात जास्त आपलेपणा होता. आज बाळाच्या जन्मानंतर एखादी आईच बाळाला अंगावरील दूध पाजते तिला चिंता असते ती तिच्या सौंदर्यात काही कमीपणा येईल याची. आता तर लहान मुलं आईच्या कुशीत झोपतही नाहीत, त्यांना वेगळी बेडरूम असते मग आई -मुलं यांच्यातील कोमल भावना दृढ होणार तरी कशी?

आमच्या पिढीतील मुले आईच्या सहवासात जास्त असत. पाच वर्ष होईपर्यंत नुसती मज्जा, पाच वर्ष झाल्यानंतर आईने पाटीवर दोन रेघा ओढून त्यात पाटीच्या डोक्यावर श्री आणि नंतर अ, आ, इ, ई मुळाक्षरे शिकवल्याचे धूसर आठवते. अभ्यासाची जोर जबरदस्ती नव्हती. शाळेत पहिलीला जायला लागल्यावर दुपारच्या सुट्टीत जेवायला धावत यायचो आणि दहा-विस मिनिटात पुन्हा शाळेत जायचो. शाळेत तिसरी पर्यंत अभ्यास पाटीवरच असे. फारच एखाद्या मुलाकडे जोडपाटी असे तीचा उपयोग लिहिलेल पुसू नये म्हणून होत असे.

संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर पाटी ठेऊन हातपाय धुवून खेळायला कधी धाव घेतो? असे व्हायचे, त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर नाश्ता किंवा चहा याला स्थान नव्हते. नाष्टा हा प्रकार जवळपास नव्हताच. शिळी भाकरी किंवा चपाती शिल्लक असलीच तर चतकोर चतकोर मिळायची. आता सारखे फरसाण, बिस्किटे अशी सुकी खाज तेव्हा नव्हती.

सकाळी चहाच्या वेळेवर साखरपाणी मिळे. तेव्हा रात्रीचे जेवण आठच्या दरम्यान असे त्यामुळे आईच्या मागे खाण्यासाठी तगादा लावण्यात अर्थ नव्हता. तरीही साठे कंपनीची मोठ्या रुपयांच्या आकाराची गोल बिस्किटे हातावर कधीमधी आई घाली, क्वचित रावळगाव किंवा लिमलेट गोळ्या एवढ्यावर भागत असे.

तेव्हा कपड्यांचा सोस नव्हता, पातळ कापडाची, उभ्या रेषा रेषांची डिझाइन असलेली चड्डी आता तुम्ही त्याला ट्रावझर म्हणता ती आणि घराबाहेर जायचे असल्यास एखादा जुना झालेला शर्ट इतके कपडे पुरायचे. आताच्या मुलांसारखे आतले,वरचे,बाहेरचे,वाढदिवशी,घालायचे, लग्नासाठी, सणावाराला असले प्रकार नव्हते.

हाफ पँट, फुल पँट,बनियन असले प्रकार नव्हते. अगदी शाळेत जाऊ लागलो तरी रूमाल कधी बाळगला नाही, नव्हे तो कोणाकडेच नव्हता. तेव्हा पाण्याची बाटली नव्हती, पाणी नळावर ओंजळीने प्यायचो आणि पॅन्ट किंवा सदऱ्याला हात पुसायचो. काटकसरीने संसार करणे म्हणजे काय ते त्यावेळच्या पिढीच्या पाचवीला पुजलेल होते. हौस मौज सोडाच एखाद्या वर्षी घरातील स्त्री ला पातळ म्हणजे नववारी साडी घेणं ही जमेलच अस सांगणे अवघड होतं. पातळ विरून फाटलं तर त्याला बारीक टीपं घालून तिला सारख कराव लागे. समाजात सगळीकडे तेच चित्र होते. आमच्या कपड्यांचे तेच हाल होते. पण तरीही त्या गैरसोयीचे कोणी भांडवल करत नव्हते कारण चार दोन घर सोडली तर परिस्थिती सगळीकडे सारखीच होती. या परिस्थितीत आनंदी रहाता येत होत याचे कारण विवंचनेचा विचार करण्यासाठी आम्हा बच्चेकंपनीला काही कारण नव्हते.

संध्याकाळी मस्त मैदानावरील चिमणी गवतावर लोळायच, पकडा पकडी, आबाधुबी,लगोरी, लंगडी, सागर गोटे, खांबशीपी, विटी-दांडू, गोट्या, हू तू तू असे नेव्हर एंडिंग खेळ खेळायचे आणि अंधारून आले की घरी परतायचे असा रिवाज होता. ढोपर फुटले, करंगळी ठेचकाळली तरी फारशी तमा नव्हती. विटी लागून कपाळावर खोक पडून भळाभळा रक्त वाहिले तरी हळदीचा लेप यापुढे उपाय जात नसे. डॉक्टरकडे नेऊन टाके घालणे फारच दूर. फार तर हळद किंवा ठेचलेल आलं जखमेवर बांधल जात असे. मुख्य म्हणजे डाव सोडून घरी यायला फार जिवावर यायच पण अंधारून आल की पर्याय नसायचा. अंधारात चेंडू हरवला तर रुखरुख लागून रहात कसे. चेंडू अर्थात चिंध्या गुंडाळूनच करत असू तेव्हा क्वचितच वर्गणी काढून रबरी किंवा टेनिस चेंडू आणला जाई, बॅट तर फळकूट तासूनच बनवलेली असे.

तेव्हा प्रत्येक ऋतूत, काही ना काही फळ झाडांवर असायचे, ते चोरून खावून आम्ही पोटाची खळगी भरायचो आणि जिभेची हौस भागवायचो. विलायती आवळे, पिकलेली उंबरे, विलायती चिंचा, पेरू,चिकू, तोरणे, कैरी, जमीनित असलेल्या विरल्या, कारांदे, अभयच्या शेंगा. तोरणे पेटारे, हटुर्णे, पापड्या, चिंचा, बोरे, रान आवळे आणि काही काय मिळेल ते. ह्या पदार्थांनी आमची फक्त भुकच भागवली नाही तर आम्हाला तंदुरुस्त ठेवले. जीवनसत्त्वे दिली. चपळ बनवले आणि निरीक्षण क्षमता दिली.

मुख्य म्हणजे ही फळे खाल्ली आणि आजारी पडलो असे कधी झाले नाही. पावसात भाजलेले किंवा भाजून भिजत घातलेले चिंचोके खायचो. अगदी चिंचेचा कवळा लुसलुशीत पाला किंवा अंबाडीचा पाला खायचो पण त्यामुळे कफ झाला, किंवा घसा बसला असा प्रकार घडला नाही. क्वचित घरची केळी, सिताफळ, रामफळ मिळे. त्या वेळी सर्व मुलांची रोग प्रतिकारशक्ती खरेच स्ट्रॉंग होती. आता सारखे डॉक्टर जवळ उठसूट जाणे पालकांना परवडणारे नव्हते.

पावसात ओहळात मनसोक्त डुंबलो. जमिनीवरील मोठ मोठाले दगड काढून घेतल्यानंतर तयार होणाऱ्या सखल भागातही अर्थात खदानीत पोहण्याची दिक्षा घेतली. पण त्या पाण्याचा आमच्या तब्येतीवर काही परिणाम झाला नाही इतकी प्रकृती ठणठणीत होती. डॉक्टर कधी लागलाच नव्हता, क्वचित कधी सर्दी ,पडसे झाले तर आई, लाल अडुळसा, तुळशी मंजिरी, बेल, सफेद कांदा, मिरी,लवंग आले किंवा सुंठ यांचा कढकढीत काढा करून द्यायची की सर्दी गायब. पुन्हा डुंबायला आम्ही मोकळे.

आई तिचे काम करता करता अभ्यास करून घेत असे. पर्वचा, उजळणी, रामरक्षा, हनुमान स्तोत्र, व्यंकटेश स्त्रोत्र तिचे मुखोद्गत होते. पंचतंत्र तिला माहिती नव्हते तरीही ती चांगल्या गोष्टी सांगत असे. नवनाथ कथासार, भक्तीविजय, गुलबकावली, ज्ञानेश्वरी, गुलबकावली या पुस्तकांची पारायणे झाली होती. तेव्हा आम्ही बुध्दू नक्कीच नव्हतो पण शंका विचारायचे धारिष्ट्य नव्हते. आमच्या प्रश्नांचा रोख चुकला किंवा अतिशहाणपणा केल्यास पाठीत दणका ठरलेला.

आजच्या विद्यार्थ्यांना सतत अभ्यासाचे ओझे असते तो प्रकार नव्हता. रात्री आई ,आपली कामे आवरून झोपायला येईपर्यंत मी अंथरुणावर टिवल्या बावल्या करत पडून रहात असे. अभ्यास झाला का? पर्वचा आणि उजळणी म्हटली का?” हा प्रश्न मात्र न चुकता विचारला जाई. तिच्याकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट केला तर कधीतरी एखादी गोष्ट सांगे,मुख्य म्हणजे आम्ही ती ऐकून घेत असू,ती ऐकता ऐकता कधी झोप लागे कळतही नसे. आताची मुले त्या गोष्टींची चिरफाड करून त्यावर प्रश्न विचारत बसतील इतके शहाणपण आमच्याकडे नव्हते. आई सांगते म्हणजे मग प्रश्न संपला.

आताच्या आयांना वेळच नसतो,अगदी भांडी,कपडे,लादी या सर्व गोष्टींसाठी कामवाल्या बाई असल्या तरीही वेळ नसतो. बिचारी मुले! बिचारी का? त्यांनाही गोष्टीत रस असेलच असे नाही. त्यांचे वैचारिक क्षितीज विस्तारलेलं आहे. एक तर आताच्या आयांना आपले ऑफिस, त्यातील गॉसिप, मैत्रिणी, व्हाट्सअप्प ग्रुप इत्यादी अटेंड केल्यावर वेळ शिल्लक नसतो. त्यातून वेळ काढलाच तर मुलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची तर त्याचे प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं देणं शक्य नसतं. सोईचे तर नसतेच नसते.

मी आईच्या कुशीत निजण्याच भाग्य दहा बारा वर्षांपर्यंत अनुभवलं. त्या नंतर तिच छत्र हरपलं आणि आईच्या मायेला पोरका झालो. तोपर्यंत त्या मायेच्या उबेने खेळणी आणि खाणे या कमीची उणीव भरून निघाली आणि बालपण अतिशय सुंदर गेलं.

आताच्या लहान मुलांची बेडरूम वेगळी असते आणि आई-बाबा किंवा मॉम-डॅड यांची बेडरूम वेगळी असते. त्याला स्वतंत्र कस जगायचे त्याचे लेसन सुरू असतात. बरे ह्या लहान मुलांचे आज्जी आजोबा दूर कुठेतरी राहात असतात आणि त्यांना भेटायला हे कुटुंब occesionaly जात असते. ते ही काही तास किंवा फार तर दोन दिवस राहून ते परततात परिणामी त्यांची आज्जी आणि आजोबाशी ओळख होण्याआधीच ते विसरूनही जातात. वास्तू टू बीएचके, थ्री बीएचके होत आहे त्यातील वस्तू मोठ्या आकर्षक होत आहेत पण मानसिक आणि व्यक्तिगत संबंध छोटे होत आहेत हेच ते दुर्दैव.

तेव्हा घरात नळ नव्हते, बाथरूम नव्हते, सौचकूप नव्हते, विहीरीचे पाणी शेंदून भरावे लागे. साधरण सात वर्षांचा असल्यापासून मी विहिरीवरून जमेल त्या कळशीने पाणी आणत होतो. दहा वर्षांपासून सरपणासाठी जंगलात जात होतो. दळण आणत होतो. रेशन आणण्यासाठी जात होतो . आईने सांगिलेले काम करण्यात कधी कंटाळा केला नाही. त्यामुळे आजही कोणत्याच कामाची लाज वाटत नाही. आईने घरात मुली आणि मुलगा असा भेदभाव केला नाही.

तुमच्या घरातील किती जण सुशिक्षित आहेत? नोकरी करत आहेत की स्वतःचा व्यवसाय आहेत? हे तर आवश्यक आहेच पण घरातील सर्वांचा एकमेकांशी सुसंवाद आहे की नाही! घरातील अडीअडचणी सोडवताना एकत्र येऊन विचार होतो की नाही? घरातील प्रत्येक जण कामाचा किंवा जबाबदारीचा वाटा स्वतः उचलतो की नाही? हे महत्त्वाचे आहे. घरात चर्चा झाली तर चांगलेच आहे पण गैरसमजुतीने भांडण आणि ते विकोपाला जाऊन एकमेकांवर हात उचलणे या गोष्टी होणे योग्य नाही. मी सगळ्या गोष्टीला सुसंस्कृत वागणे किंवा आचरण म्हणतो. तेव्हा एका कुटुंबात चार भावंडाची लग्न झाली तरी सगळे एकत्र रहात. अडचणींना एकत्र तोंड देत. सख्खे ,चुलत असा भावंडात दुजाभाव नसे. जावा जावा एकत्र मिळून कामाचा फडशा पाडत.

चार माणसे एकत्र राहतांना मतभेद होणे स्वाभाविक आहेच पण मनभेद होणे योग्य नाही. तुमच्या घरातील जेष्ठ व्यक्ती किती समजुतदार आहे यावर घराचे घरपण टिकून असते. त्यांच्या सगळ्या गोष्टी योग्य नसतीलही पण त्यांना त्या योग्य नाहीत हे सांगतांना त्यांना काही कळत नाही हा अविर्भाव नसेल तर कुटुंब अखंड राहील.

आमच्या घरी बऱ्यापैकी गरिबी होती म्हणजे स्वतंत्र घर बांधल्या नंतर काही वर्षे घरावर छप्पर केंबळ्याचं म्हणजे गवत व सागाच्या पानाने शाकारलेल होत. पण घरात आईमुळे वैचारिक समृद्धी होती. एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीच्या सुख दुःखाशी जोडलं जाण्याची संस्कृती होती.आज आपल्या शेजारच्या घरी कोण राहते? काय चालले आहे? त्याची फारशी माहिती नसते. ती माहित करून घ्यायला आपण उत्सुक नसतो. तेव्हा ब्लॉक संस्कृतीत दार बंद असलं हरकत नाही पण मन आणि विचार बंद नकोत. मदत करण्यासाठी ज्याचे मन आणि तन तत्पर असतो तो दुनयेवर राज्य करतो.

“माझी आई सुंदर स्वयंपाक करायची तुला यातले काहीच जमत नाही.” जगातले सगळे पुरूष ज्या अर्थाने हे वाक्य आपल्या पत्नीला ऐकवतात त्या अर्थाने मी म्हणत नाही. पण आई जवळून लोणचे भरून घेणे, पापडाचे पिठ, किंवा सांडगे पिठ तयार करून घेणे, चकल्या खुसखुशीत व्हाव्यात, पुरणपोळ्या खमंग व्हाव्यात यासाठी आईला नेहमीच कुणी ना कुणी बोलवत असे.

घरी फारसे ठेवणीतले मसाले नसतांना ती नेहमीचे जेवणही लज्जतदार बनवायची अशी माझी आठवण आहे. अर्थात याची टेप कुणाजवळ सतत वाजवली तर न जाणो आईला बोलवून घ्या किंवा आईकडे जा अस रागाच्या भरात कोणी म्हणाले तर! त्यामुळे काही गोष्टी बोलतांना जीभेवर नियंत्रण राखावेच लागते.

शेजारी सधन असतील तर कदाचित देणे घेणे किंवा विचारपूस असते पण ते सधन नसतील आणि आपल्या पेक्षा वेगळ्या जाती धर्माचे किंवा संस्कृतीतील असतील तर त्यांच्या घरावरील नावची पाटी,किंवा अगदी नजरा नजर झालीच तर Hi ! या पलीकडे संवाद नसतो. माझ्या गावी शेजारी पाजारी मिळून एक कुटुंब होत.अगदी त्यांच्या चुली पर्यंत आम्ही नाही पोचलो तरी खूप अंतरही नसे. एक मेकांना सोबत आणि भावनिक आधार यावर सगळं सुरक्षित आणि आनंदी होत.

इमारत किती मजल्याची आहे या पेक्षा माणसाचे विचार किती मजल्याचे आहेत किती सहृद आहेत ते महत्वाचे. जगण्यासाठी पैसे हवेच पण समृद्ध मन आधी हवे, मनाची श्रीमंती असेल तर गरीबाच्या घरी राजेशाही स्वागत होते, आपुलकीचे शब्द आणि निघतांना पाय निघत नाही इतका स्नेह जुळतो, जमतो, वृद्धिंगत होतो. तीच तर तुमच्या कुटुंबाची कमाई.

खेडेगावात आजही माणस मनाने श्रीमंत आहेत कारण त्यांना शहरी वारे शिवले नाहीत, ‘आम्ही’ आणि ‘आमचे’ याची लागण झालेली नाही. एकदा गावाचे शहर झाले की लोक एकमेकांच्या दरम्यान वैचारिक देवाणघेवाण करण्या ऐवजी समाजाच्या, जातीच्या, आहार वेगळा असल्यास शाकाहारी, मांसाहारी अशा भिंती बांधतात, मनाने दूर जातात.

मने विभक्त झाली तर वैचारिक संवादच खुंटतो मग नाते संपते. पण सुदैवाने गावाकडे अजूनही वाड्या वस्त्यातील घरे एकमेकांच्या सूख दुःखात सहभागी होतात. घरातील लग्न, सण, पुजा एकत्र येऊन साजरी करतात. वातावरणात आनंदी असते. मनात आपुलकीची भावना असते. ती भविष्यात तशीच रहावी वाटत असेल तर कोणत्याही निमित्ताने एकत्र आले पाहिजे, खुंटलेला संवाद सुरू ठेवला पाहिजे.आनंदाचे डोई आनंद तरंग हीच ठेव मिळो ही अपेक्षा.

आता घरोघरी स्मार्ट मोबाईल आहेत आणि मोबाईलवर अनेक प्रसंगाचे फोटो व व्हिडीओ साठवून ठेवण्याची सोय गुगलने करून दिली आहे. मात्र हे फोटो पाहण्यात जितका आनंद मला मिळतो त्या ही पेक्षा मागच्या तीस वर्षापुर्वीचा फोटो अल्बम पाहतांना मिळणारा आनंद मोठा आहे. अल्बम पाहतांना मुले मोठी होत जातांना जे शारिरीक आणि परिस्थितीजन्य बदल घडले ते त्या अल्बममधील फोटोत सहज जाणवते.

तेव्हा घरात फारसे फर्निचर वा साधने नव्हती पण त्या काळातील फोटो पाहतांना त्या वयातील मुलांच्या आनंदी चेहऱ्यावरचे भाव पाहून आज मुले मोठी झाल्यावर हे सगळं हरवले अस वाटू लागलंय. कधीतरी हे अल्बम काढून मी ते चाळतो आणि पुन्हा एकदा भुतकाळात शिरून तोच आनंद नव्याने एंजॉय करतो. रम्य ते बालपण आणि त्या आठवणी.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *