गण्या लायनीवर आला
“राम राम, काका…, काका, राम राम.., काका, राम राम म्हटलं…” काका एक नाही की दोन नाही, काका बहिरे नव्हते, मुके तर नव्हतेच नव्हते मग आज अचानक हरताळ का? कळायला वाव नव्हता. प्रतिसाद देतील म्हणून थोड थांबलो, छे ते लाकडावर जोरात कुऱ्हाड चालवत होते. मी निमूट निघालो, दहा पाऊले चालून गेलो तो त्यांनी जोराने हाक मारली, “ये गण्या इकडे ये, मी वळून पाहिलं तर ताठ उभे राहून माझ्याकडे पहात होते. मी जवळ गेलो, “मगाशी हाक मारली काऊन “ओ” नाय दिली, अन आता कशाला बोलीवतो.” “मगाशी तुझ्या काकीच्या सरणाची लाकडं फोडीत होतो, पायलं नाय का तू, का आंधळा हाय?,” “रामुकाका, तू काय बी बोलतो, काकू मरल कशी? ,”ती” त लाकडा सारखी एकदम कडक हाये, काय बी बोलू नगं” “अर ती कडक हाय म्हणून त म्या तिच्याशी लगीन केलं व्हतं ना, पण अजूनबी कडक हाय त्याच काय? नुसती राग राग करती. म्हणती दिवस भर तुम्ही मोकाट वळू सारख गाव हिंडता, मला पाठ टेकायला हाय का टाईम?”
“मग तुमी काय म्हणलं ? अन काकू म्हणली ते बी खरंच हाय की, तुमी आज घराकडं सापडला, नायतर, आत्ता सुदीक चावडीवर, पारावर नायपेक्षा कदमच्या चायच्या टपरीवर असता. खोटं हाय का? “असतो कि, कंदी कंदी, अरं! आमी गावकरी मानस, गावाची खुशाली घ्याला नग का? तुझ्या काकुला राजकारण काय कळत? भाकरी थापायच्या हायेत व्हय! गावात काय प्राब्लेम झाला त आमालाच बगावा लागल का नाय?” “पर, काका तुमी सरपंच नाय की सादे सदस्य बी नाय मंग तूमी गावच काऊन पायचं? त्यापेक्षा तुम्ही तिलाच सरपंच का करत न्हाई? तिला बी हौस हाय की, बगा अख्खी पंचायत गाजवल.तिला कोण अडवल त्याचं तोंड फोडल, तिच तोंड धरायची कुणाची शामत हाय का?
“नुसतं सरपंच होऊन भागत का गड्या? सरपंच काय नोटा फेकल्या की कुणी बी होतय, पण गावाचं प्रॉब्लेम कळाय नको का? मी त्या शिंद्याला मदत करतो म्हणून ठीक हाय नाय त कवाच वाट लागली असती. तुझ्या काकूच काय हाय, कंदी डोस्क आऊट होईल कळणार नाय, माज चालू देत न्हाई, तिच्या जिभेचे काय बी खर न्हाई, तिथं पंचायतीत कोणालाबी काय बोललं म्हणजी! जायची आमची आब्रू , नाय त आत्ता पंचायतीत तिला निवडून आणली असती.” “ते बी खरं हाय, जाता येता ऐकाय येत की, सकाळ धरन तुझ्या नावानं ओव्या दळती, ऐकू येत की. पर तिचं म्हणणं तरी काय हाय?”
“तेच तं, ती म्हणली, तूमी जाता उकीरड फुकायला, मी दिसभर घरात शेतात राबते, म्हणली आज पासून घराबाहेर पडायच न्हाई. तुमची चावडी आणि पंचायत गेली झक मारत. आज घरातून बाहेर पडला तं काय खर न्हाई.” “म्हणून चिडला व्हय, म्या म्हणलं तुला झाल तरी काय? का गा, काकूच तुझ्यावर तापली. म्हणून मी आपली हाक मारली. चल लाकडं फोड, नाय तं काकू तुला फोडलं, उगाच माझ्यामूळ तुझी खोटी नको.
“मी काय तुझ्या काकूला घाबरतो की काय ? पर काय हाये, आपल्याले ना पोर ना दार, रातीला भ्या वाटल तर तिचाच आधार. कंदी कंदी तिच काय होत तेच कळत न्हाई, अर पोरा, सकाळ धरन तीन डोक खाल्लं, म्हणली, सगळी लाकडं सरली भाकरी शेकाय काय तुमची हाड घालू का चुलीत?” सख्य्या नवऱ्याला अशी बोलती, काय म्हणावं हिला, हिच्या तोंडात जीभ हाय का सूरी? तिलाच ठाव. चा बी कसा बसा दीला, म्हणली, “लाकडं नाय त जेवण बी नाय.” म्हणून हातघाईवर होतो. बर तू कुठ जल्दीत चालला म्हणायचा?”
“मी होय, आता गावात नवीन डाक्टर बाई यायची हाय, तिच स्वागत कराय नको का? म्हणून जरा घाईत होतो. रामू काका तू निवांत लाकड फोड मी चावडीवर सांगतो का, की रामूकाका आज लाकड फोडल्या बिगर येणार न्हाई.” “ये गण्या, सुकाळीच्या ही बातमी गावातल्या चावडीवर सांगण्या सारखी हाय होय? लेका काकाचं श्राद्ध घालायचा बेत हाय का? तुझी काकी काय बोलली चावडीवर कळलं त माझ्याशी गाठ हाय ध्यानात घे.”
मी रामुकाकाचा निरोप घेऊन चार पावलं चालत नाय त रमा काकू भेटली, जाम घुश्यात होती, तरी हाक नाय मारली. काय बोललं त्याचा नेम नव्हता, म्हणून म्हणलं, “का काकू, आज काय मूड खराब हाय का? हसत नाय का काय नाय, रागाला आली की काय? माझं काय चुकलं न्हाय नव्ह?” त बळेच हसली, बोलली, ” तुझ्यावर कायला रागवू , तुझ्या काकापाई संताप झालाय, ना रानात जात, ना गोठयात वळून बघत, मी ऐकली काय काय करू. लगीन करून आणली, त जणू कामवाली आणली, ती म्हातारी, याला माह्या गळ्यात टाकून गेली, ना पोरबाळ दिल का कसलं सुख, घर माह्यावर टाकून तुझा काका गाव घेत फिरतो तूच सांग माह्य काय चुकलं का? चूल पेटवाय लाकडबी मीच बघायची म्हंजी . सांग यो काय कामाचा हाये का?” “खर हाय तुज काकू, पर आता काय उपेग बोलून? फुटक मडकं सांदत होय? पण रामू काका भोळा हाय. तुझ्यावर लय प्रेम हाय त्याच.” “प्रेम हाय तं गाव घेत कायला फिरतो? ना वावरात माह्या मदतीला येत ना दूध काडाय मदत करत, फकस्त काडलेलं दूध डेरीत घालाय जातो. समदे दूध घालून परतले तरी बी ह्यो न्हाय परतत, नक्की दूध घालाय जातो का दूध घालणऱ्या बायांना बघाय जातो ते बी कळना? चार टाईम गाव फिरतो. दिसभर मी मरमर मरते. ह्यो नुसत गिळायला येतो ह्याला प्रेम म्हणल का कुणी!” काकू कावली.
मी तिची समजूत काढायची म्हणून म्हणलो, “काकू काय बी म्हण पण तुझ्या शब्दाबाहेर त न्हाई ना? आता बघ कशी लाकडं फोडतोया ?” “सवताहून लाकड फोडाय नाय घेटली, म्याच म्हणली, प्रेमानं चूल पेटलं होय, ते काय नाय, आज चवडीवर न्हाई गेल म्हणून काय तुझ्या काकाशिवाय चावडी ओस पडती का बघतेच मी! पर तू कुठं निघाला म्हणायचा? का काकाचा कित्ता गिरवाय चालला?” “न्हाय तसच काय न्हाय, गावात आपल्या झेड.पी. च्या हॉस्पिटलात नवी डाक्टर बाई यायची हाय त म्हणलं एकदा बघून यावं.” “तुलाबी यांचा नांद लागला की काय? हे बग यांचं आविष्य पार फुकट गेलं आता तू बी घालवू नग जाय घरला गपगुमान. लोकांची माप घेऊन पॉट भरत होय? जा उसाला पाणी पाज, पिवळा पडाय लागलाय.”
आता आली का पंचायत? , झक मारली आणि काकूला हाक मारली. आता तिच्या समोर जायचं म्हणजे बोंबटत बसल, म्हणून माघारी फिरलो त रामूकाका उभा, म्हणला, “काय रे गण्या परत का फिरला? कोणती मांजर आडवी आली?” मी म्हणलो, “रमा काकू पाठीमागून येती. तिच म्हणली काकाचा कित्ता गिरवू नग, म्हणून माघारी फिरलो. आता ती घरात शिरल्या बिगर जायला नग.”
‘ती’ येती ऐकून रामूकाकान जोरात कुऱ्हाड लाकडावर चालवली, त्याची ढलपी थेट काकूच्या पायावर लागली, काकू जोराने ओरडली, “आई आई ग.” तसा रामूकाका कुऱ्हाड टाकून तिच्याकडं धावला, नी मी हळूच पाय काढता घेऊन निघणार तो काकू ओरडली, “ये गण्या माग फिर, जा गडुभर पाणी आण मंग जा कुठं जायचा तो.” तिला पाणी दिलं, तेवा सुटका झाली. म्या म्हणलं आता चुकामुक होते की काय? गावात पंचायतीत पोचलो त डॉक्टर बाई आलीच नव्हती.
मनात म्हणल, काय बी म्हणा, आपल नशीब एकदम स्ट्राँग है, थोड्या वक्तान डॉक्टर बाईंची गाडी आली, म्हनल गुड मॉर्निंग करून घ्याव, पार पुढं गेलो, सरपंच, उपसरपंच, ग्राम सुधार सदस्य, सगळं गडी गाडी दिसताच क्षणी धावले, डॉक्टर बाई, गाडी बाहेर पडली.
आयला माझी त त्या डॉक्टर बाईना बघून शुद्धच गेली, पॅन्ट शर्ट घातलेली बाई भाईर पडली. माझा विश्वास बसना डॉक्टर बाई अन पॅन्ट शर्टात? माज गुड मॉर्निंग तोंडात विरलं. बाईचे डोळे नुसती घारे निळे होते, समुद्रच जणू, बाई साडेपाच फुट उंच, दिसाय नुसती ऐश्वर्या राय. आपण त बूवा एकदम आऊट. लांबसडक हात, रंगवलेली नखे, ओठावर गुलाबी लिपस्टिक आणि कोरीव भुवया. दिल खूश झाला. तिच्या डोळ्यांकडे बघायची हिम्मत होई ना. मनात म्हणल, आपली लायकी तर हाय का बाईच्या पूढ उब ऱ्हायची. मी हळूच माग सरलो. Good Morning म्हणाय गेलो असतो आणि चार चौघात काय बोलली असती त काय घ्याच?
सरपंच पुढं होत त्यांच्या गळ्यात हार घालीत होते, तो बाईन हार हाती घेतला, बाई कडाडली, “इट्स ऑल राईट, नो नॉटी बिजनेस.तुमच PHC दाखवा.” सरपंच उडाला, बाई काय बोलते ते बी कळना, आयला ही डॉक्टर बाई हाय का कोण हाय म्हणे, तुमचं काय ते दाखवा म्हणली “ओ मिस्टर, तुमच्या गावच आरोग्य केंद्र दाखवा.” बाई पून्यांदा बोलली तेवा कुठं त्याच्या टकुऱ्यात आलं. बेगी बेगीन आरोग्य केंद्राकडे जाया लागला. तिच्या पाठून समदी ग्रामपंचायत. बाई म्हणली, “ओ सरपंच! तुमच्या मित्रांना सांगा, ही पंचायत नाही, सरकारी हॉस्पिटल आहे. पाठी पाठी येण्याची गरज नाही. तुमच्या “आशा’ सेविका कुठे आहेत?” आमच्या शिंदे सरकार यांनी हॉस्पिटलच्या दारावर उभ्या असलेल्या सफेद साडीतील बाईकडे बोट दाखवले. ती पंचारती घेऊन उभी होती. बाई रागावली, what is this, I don’t want this foolish business, is this a hospital or a temple?” ती काय बोलली कोणाला कळना, मला तोडक मोडक कळालं पर म्हणलं उगाच आगीत उडी का मारा. सरपंच माझ्या तोंडाकडे पहात म्हणला, ” ये गण्या बाई काय म्हणती? ” मी म्हणलं, “ते पंचारती नको म्हणती.” “असं कसं, काय रीत भात हाय का नाय? आमी नुसतं तिला सोडू पण उद्या वास्तूपुरुष काय म्हणलं?” “ओ सरपंच, तुमचा वास्तूपुरुष काय म्हणेल ते मी बघते, सिस्टरला ती पंचारती हवं तर तुम्हाला ओवाळायला सांगा. ओके. आता माझं काम करू द्या.”
डाक्टर बाई तापली म्हणता, आशा बाई पंचारती घेऊन निघून गेली.नवीन बाई येणार म्हणून पेशन्टची रांग लागली होती, मला बी कळना आज इतके जादा पेशन्ट कसे, मंग ध्यानात आलं. बाईला बघायची उत्सुकता सगळ्यांनाच होती. काही अतिशहाणी मंडळी बाईंच्या तपासणी खोलीच्या खिडकीशी दाटीवाटीने उभी होती. आत डोकावून पहात होती. बाई खिडकीपाशी जाऊन म्हणाली, “भाऊ या आत या ना, खिडकीतून नका येऊ, दारातून या.” तिच ऐकताच सगळे पसार झाले. आशा ताईंनी त्यांचं टेबल स्वच्छ केलं. प्यायला पेल्यातून पाणी दिल. Stethoscope, blood pressure gauge , thermometers writing pad आणून दिले. डॉक्टर बाई हसली, ” Thank you,हं नाव काय तुझ?” “मी सुरेखा साळवी, गावातच रहाते, इकडची पुरुष मंडळी अशीच, कुणी नवीन आल, की वाघ पहायला किंवा सरकस पहायला याव तशी येतात. तुम्ही लक्ष देऊ नका, मी आहे ना.”, डॉक्टर बाई थँक्स म्हणाली. बाई मोठी हुशार, पाहता क्षणी समजली,पेशन्ट बोगस दिसतात.
ती आशा ताईला ओरडली, ” साळवी बाई, पेशन्टला पाठवा.” पयला गेला तो बाहेर बोंबलत आला. दुसरा पेशन्ट बाईकडे जाण्या अदोगर पाटचे सगळे गायब. त्यानला खरंच दाखवायच होते ते दोन बुढ्ढे एक मावशी उरली. बाईंनी त्यानला तपासलं.थोडया वेळात रमा काकू पट्टी बांधाय आली, काका सोबत होताच. मी दुरूनच त्यांना पाह्यलं. रमा काकू शाणी, काकाला म्हणली, “ओ, हित गुपचीप बसा, मी पट्टी करून येते.” तरी काका डोकावून बघीत होता एव्हढ्यात एक म्हातारं बाहिर आलं, त्यानं सोडलेलं दारच फळकूट काकाच्या नाकावर आदळल तस काका निमूट पाठी फिरला. नसती उठाठेव करू नये ती यासाठी. काका डॉक्टर बाईला बघाय शाळा करून आला होता पर काकून त्याचीच शाळा घेतली. काकू हसत हसत भायेर आली. रामू काकाला म्हणली, “ओ चला घरला. तुमच्यासाठी बी औषध घेतलया.” काकाला कळना कारभारनीन कसलं औषध बाईकड मागून घेतलं. रात्री म्हण काकून बळे बळे काकाला औषध दिल, म्हणली जालीम औषध हाये काय बी दोष आसल तर पाक पळतोया, सकाळ धरन पाच वेळा काका पळ पळ पळाला, च्या बायला, हैराण झाला की झाड्याला जाऊन. काकी गालात हसती, म्हणती, “डॉक्टर बया लय हुशार. आमचं दुखणं झ्याक ओळखलं.” रामू काका मला म्हणला, “शाणा बन, त्या डॉक्टर बाईला बघाय अजिबात जाऊ नग, जाशील आणि फसशील, माजी पुरती वाट लावली. बायकोच्या अन नवीन डॉक्टर बाईच्या नादाला लागून ऊपेग नाही.
म्या म्हणलं, “रामूकाका अस काय इपरित घडल ते तरी सांग?” त म्हणला, “तुझ्या काकीकड गोळ्या दिलत्या, मला म्हणली गोळ्या खास तुमच्यासाठी दाक्तरबाईन दिल्या. म्या म्हणलं, घेऊन पाहू, आता नवीन नवीन शोद लागत्यात वाढली ताकद त चार नमस्कार जास्त काढू, आयला तिच्या, पार वाट की लागली, झाड्याला जाऊन पार कंबर मोडली. आता हे तूला बोललो. कोणास्नी सांगू नग, नाय त फिरशील बोंब मारीत.” म्या म्हणल, डॉक्टर बाई जालीम हाई आता गावातल्या बघ्यांच काय बी खरं न्हाई तेवाधरन चावडी सोडली, रान जवळ केलं.
काका पण तवा पासून अगदी सुता सारखा सरळ झाला. थोड्या दिसान रमा काकू अधूनमधून डॉक्टर बाईकडे जाया लागली. पायता पायता रमा काकू पंजाबी ड्रेस घालाय लागली, आंबाड्या ऐवजी दोन वेण्या घालाय लागली. नेल पेंट लावाय लागली. हातावर मेहेंदी काढली, होटाला लिपस्टिक लावली. एकदम शोकेस मधल्या पुतळ्या सारखी दिसाय लागली. मला कळना, काकू एवढी कशा पाय बदलली ? .
मी रामूकाकाला इचारल त म्हणला, “त्या बायला बायकोच्या, लय नट्टा पट्टा करती, त्या डॉक्टर बाईन हिला पार बिघडवली. पर गण्या, तुझी काकू दिसाय कशी दिसते? खर खर सांग.” मी म्हणलो, “खर सांगू का? नायत माझ्यावर कावशील? त म्हनला गड्या नाय कावणार अक्शी खर खर सांग” मी म्हणलो आता काकू आपल्या माधूरी दिक्षीत वानी दिसती.” काका पार लाजला, म्हणला, “चल काय बी सांगू नग.” पर मी त्याच्या तोंडाकडे पायल, त्याला लय आनंद झाला. रामूकाका आता रान आणि घर. चावडी, ग्रामपंचायत पार विसरला. घराकड रमू लागला. काकूबी एकदम खूश. रामू काकाची गाडी रूळावर धावाय लागली. अन चमत्कार झाला पूढल्याच वर्षात काकाच्या घरी पाळणा हलला. काकी म्हणली, सगळी डॉक्टर बाईची किरपा. काकी डॉक्टर बाईच्या जाऊन पाया पडली. तिची साडी, चोळी देऊन ओटी भरली.
महिन्या दोन महिन्यान आक्रीत घडल एक दिस डाक्टर बाई गाडीतून उतरली त चक्क नववारी नेसून आणि नटून थटून हाँस्पीटलात आली. चावडीवर बसलेल्या लोकास्नी कळना, हा काय चिमीत्कार घडला, अचानक ह्यो बदल कशापायी पण बाईला बघाय यायची कोणाची टाप नव्हती. नंतर कळलं बायच लगीन आठ दिवस माग झालं आणि गंमत म्हणून बाई चक्क नववारीत आली. बाई बी लय ग्रेट आमच्या गावाची तीन विकेटच काडली. आमच्या खासदारांच पोरग मंमयला होत त्याच्याशीच सोयरीक झाली. आमच्या खासदारांच्या चिरंजीवाच लगीन आणि आमाला ठाव बी नाय. समदा पानचटपणा बंद.
गावात आता कनचाच रोग येत न्हाई. डाक्टर बाई खमकी हाय.
लोक चावडीवर उचापती कराय बसत नाही. माज बी औदा लगीन हाये. सगळी डाक्टर बाईची किरपा. नाय म्हंजे चावडीवर याव लागतया पण सगळा वंगळपणा बंद, नायत ती डॉक्टर बाई आमच्या हिला औषध द्यायची म्हंजे मंग आमी बी करीत बसतव ‘ग्यानबा तुकाराम’. चला तर रानात मस्त काम पडलया, तुमास्नी फुकट गोष्ट ऐकाय काय जात? आमच होणार कुकू आज आमच शेत बगाय येनार आहे. ती यायच्या अदोगर रानात गेलल बर. मळा सुकलला दिसला त बाय आखडायची.
म्हणलं, “तुमचा ऊस सुकलेला है, यात साखर कुठून येल. सुकलेला ऊस आनी चिप्पाड पुरूष काय कामाचा! मंग सगळच बारगळायच. आपल्या पेक्षा एक यत्ता जास्त शिकल्याली हाय आपली शाळा घ्यायची त्यापेक्षा मळ्यात काळी मधी जोर बैठक काढल्या तं बर होईल.” मंडळी म्या काय म्हणतो,आमच्या काकाचा अनुभव लय वाईट, इथ तिथ गाव भटकून पॉट भरण्यापेक्षा आपल्या रानात, वावरात, मळ्यात काम करून रुबाबात ऱ्हायला कोणाची चोरी हाय काय? उगाच मोकाट वळूवानी चावडीवर, तिठ्यावर, ग्राम पंचायत ऑफिसात जाऊन वेळ वाया घालवण्यापरीस दोघांनीबी काळीत कष्ट केलेलं वाया जातील काय? तवा फुकटची फौजदरकी सोडा, न मळ्याकडे , घराकडे लक्ष द्या.घरची बाई सुखी त समदा गाव सुखी.