लक्ष आणि दृष्टिकोन

लक्ष आणि दृष्टिकोन

महाभारत कौरव पांडवांच्या युध्दात महाराज धृतराष्ट्र यांचे सारे लक्ष त्या युद्धातील प्रसंग आणि युध्दाच्या निर्णयाकडे होते. ते अंध असल्याने प्रत्यक्ष काही पाहू शकत नव्हते पण त्यांचा सारथी आणि सल्लागार अतिशय हुशार होता. महर्षी व्यासांनी संजयला विशाल दृष्टी दृष्टी दिली होती. रणांगणावरील घडणारा प्रत्येक प्रसंग धृतराष्ट्राला कळत होता. संजय धृतराष्ट्र यांना युद्ध भूमीवरील प्रत्येक प्रसंग सविस्तर सांगत होता. धृतराष्ट्र यांच्या मनाला दुःख होईल अशी घटना कथन करणे संजय टाळत होता.

संजय याचा ‘दृष्टिकोन’ कितीही चांगला असला तरी धृतराष्ट्र याचे लक्ष मात्र युद्धाच्या प्रत्यक्ष परिणामावर होते. त्यामुळे अप्रिय असले तरी युध्दभुमीवर जे काही घडेल ते तो धृतराष्ट्राला सांगत होता. या युद्धात कौरव पराभूत झाले आणि हस्तिनापूरचे राज्य पांडवानी जिंकून मिळवले. लक्ष साध्य होताच संजय कुंती, धृतराष्ट्र, कुंती यांच्यासह वानप्रस्थाश्रमास निघाले. तेव्हा लक्ष्यापर्यंत पोचतांना मनात इर्षा जरूर असावी पण आपल्या स्पर्धकाविषयी कटुता मनात बाळगू नये.

महाभारतात युद्धभूमीवरील कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आपण वाचला किंवा ऐकला तर लक्षात येते की अर्जुन आपल्या लक्षाबाबत संभ्रमित होता, पण कर्तव्यापूढे सर्व मिथ्य आहे हा दृष्टिकोन कृष्णाने धनंजयाला दिला. अर्जुनाकडे गांडीव धनुष्य होता आणि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता पण युध्दात शत्रू म्हणून उभे असलेले आप्त पाहताच त्याला दृष्टिभ्रम झाला आणि तो आपल्या लक्षापासून विचलित झाला. तेव्हा प्रत्येकाला एक गुरुस्थानी असणारा आणि दृष्टिकोन स्पष्ट करून लक्षाप्रत नेणारा मार्गदर्शक हवाच असतो. जर तुम्ही ईश्वराला शरण गेलात तरच पिंडी ते ब्रह्मांडी पाहणे शक्य होईल. तेव्हा आपल्याला कितीही ज्ञान असले तरी फुकाचा गर्व करू नये कारण दृष्टी देऊन कृती साध्य करून घेणारी नैसर्गिक शक्ती तुमच्या सोबत असेल तरच तुम्हाला यश मिळते हे मी अनेकदा अनुभवले आहे.

लक्ष्याचा पाठलाग करतांना वेळोवेळी आपला दृष्टिकोन योग्य आहे ना? हे तपासणे आवश्यक ठरते. जीवनात लक्षापर्यंत पोघण्यासाठी केवळ उच्च शिक्षण, बुध्दीमत्ता आणि प्रासंगिक व्यवधान उपयोगी पडत नाही. तर आपला दृष्टिकोन ठाम हवा आणि तो आपल्याला योग्य प्रकारे मांडता यावा यासाठी त्याची पूर्वतयारी हवी. म्हणतात ना, सशाच्या शिकारीसाठी जायचे असेल तरी वाघाच्या शिकारीला जात आहोत अशी परिपूर्ण तयारी हवी.

चाणक्य नितीच्या कथा आपण वाचल्या असतीलच केवळ शौर्य कामी येत नाही तर कधीतरी वाक्यचातुर्य काम करून जाते. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने द्रोपदीला ‘वसने’ म्हणजे वस्त्रे पुरवली नाही तर आपल्या विव्दवत्तापूर्ण संभाषणाने दुर्योधनाला द्रौपदी वस्त्रहरण करण्यापासून परावृत्त केले. अचूक शब्दांना शस्त्राची धार असते, फक्त ते शब्द योग्य वेळी आणि योग्य व्यक्तींने उच्चारले तरच त्याचा प्रभावी परिणाम होतो. तेव्हा लक्षापर्यंत पोचायचे असेल तर जशी नियोजनाची गरज आहे तितकीच योग्य मार्गदर्शनाचा आहे. मार्गदर्शक हा आपल्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगत असतो.

थॉमस अल्वा एडिसन म्हणतात की विजेच्या बल्बचा शोध लावतांना माझे ९९९ प्रयोग फसले असे मी म्हणत नाही तर प्रत्येक प्रयोगानंतर हा मार्ग चुकीचा आहे हे मला कळत गेले. प्रत्येक चुकलेल्या प्रयोगाने त्यांना नवा दृष्टिकोन दिला आणि ते शोधाच्या लक्षापर्यंत पोचले. तेव्हा एडिसन हे स्वप्रयत्नातून शिकले पण प्रत्येक वेळेस तुमच्याकडे इतका वेळ आणि संयम असेलच असे नाही म्हणून तुम्हाला दृष्टी देणारी, गुरुस्थानी असणारा मार्गदर्शक मिळाला तर तुमचे काम सोप्पे होते.

लक्षाचा वेध घेण्यासाठी मनाची एकाग्रता आणि संयम हवा. दुरवर आणि न दिसणाऱ्या भुंकणाऱ्या कुत्र्याचे ओरडणे बंद करण्याची किमया एकलव्याने साधले होते याचे कारण मनाची एकाग्रता आणि आपल्या साधनेबद्दल ठाम विश्वास. केवळ मनाने द्रोणांना गुरू मानून एकलव्याने ते साध्य केले. तात्पर्य जर लक्ष ठरवले तर दृष्टिकोन हळूहळू आकार घेतो जो तुम्हाला यशापर्यंत नक्की नेतो.

कोण व्हायचे? ते ठरवणे तुमच्या हाती आहे की नाही यावर वाद होतील, मतभेद होतील,पण तुम्ही तुमचे लक्ष ठरवले आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर तुमचा लक्षापर्यंतचा प्रवास नक्कीच सुकर होईल. असे म्हणतात दुसऱ्याची रेष पुसून लहान करण्याचा प्रयत्न तुमच्या बुद्धीच्या मर्यादा दाखवून देत तुम्ही स्वतःची प्रगती वाढवा तुमची रेष आपोआप मोठी होईल.

आपण मोठे व्हायचे तर त्यासाठी योजनाबद्ध नियोजन आणि सातत्य हवे. दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करून किंवा त्याच्या विरोधात कटकारस्थान करून कुणी मोठे होत नाही आणि यदाकदाचित त्यात यश मिळाले तरी ते टिकत नाही याचे कारण कोणत्याही गोष्टीसाठी विषयाची योग्य बैठक तर हवीच, त्या बैठकीसाठी विषय ज्ञान आणि चिंतन हवे. आजकाल शॉर्टकट चा जमाना आहे पण प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट उपयोगी पडेलच हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.

एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते.पाण्याने भरलेल्या ग्लासकडे पाहून तो अर्धा भरलेला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे सर्वस्वी आपल्यावर आहे. ज्यांना तो भरलेला दिसतो ते हे जग फार सुंदर करू शकतात. सुंदर पाहू शकतात.

काल मी प्रवास करत असलेल्या एसी बोगीतून साधारण कपड्यातील दहावीस माणसे प्रवास करत होती तिकीट चेकरने त्यांना संशयाने तिकीट विचारले कदाचित त्याच्या मनातही अतिशय साध्या वेशातील माणसे फस्ट्स क्लास एसीने कसा प्रवास करतील? अशी शंका असावी. त्यांच्यापैकी एकाने मोबाईलवर रिझर्व्हेशन बुकिंग दाखवले. त्याचे समाधान झाले तसे तो निघून गेला. माझ्या मनात त्यांच्या विषयी उत्सुकता होती. तास दोन तास प्रवासानंतर मी त्यांच्यापैकी एकाला सहजच कुठे निघालात म्हणून विचारले? तर त्यांने चित्रपटाचा सेट बनवायला म्हणून सांगितले. हे सगळे बिहार मधील सुतारकाम करणारे होते पण त्यांच्या मालकानी त्यांची प्रवास सोय उत्तम करून दिली होती कारण त्यांचे कामही चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांइतकेच महत्त्वाचे आहे हा त्याचा दृष्टीकोन होता. तेव्हा समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर जातीच्या भिंती पाडून टाकाव्या लागतील आणि त्यासाठी आरक्षण विषयही लवकर संपवावा लागेल.

वरील उदाहरणात कामगारांना आपल्या मालकप्रति आदरच असेल. जो प्रोड्युसर आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना समन्यायी वागणूक देत असेल त्याचे कौतुक तर व्हायला हवेच. जर कामगार संतुष्ट असतील, समाधानी असतील तर ते नक्कीच मनापासून काम करतील आणि त्यामुळे घडणारी कलाकृती नक्कीच उत्तम असेल.

काही कार्यालयात अधिकारी इतक्या मुजोरीने वागतात की त्यांच्या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या शिपाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःचे जेवलेले ताट स्वच्छ करून घेतात किंवा जेवल्यानंतर टेबल पुसून घेतात. किंवा आपले खाजगी काम, जसे बँंकत चेक टाकून येणे, टपाल पोचवणे, मुलांना शाळेत सोडणे, भाजी आणून देणे अशी कामे करून घेतात. अधिकार पद हा अधिकार नसून जबाबदारी आहे. तेव्हा प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या मान मर्यादेच पालन केलेच पाहिजे. हाताखालील कर्मचारी कधीकधी .साहेबांची आर्थिक नड भागवतात किंवा अपेयपान करून साहेब धिंगाणा घालत असेल तर त्यांची लाज वाचवतात. आपण पदावर आहोत तोपर्यंत कमाईचे दिवस आहेत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण कसेही वागवू शकतो हीच उर्मट भावना ठेवून अधिकारी वागत असेल तर कदाचित रिश्वत घेऊन तो पैसे मिळवू शकेल पण त्याला जीवनात कधीही सन्मान आणि समाधान मिळणार नाही. अधिकारी म्हणून त्याच्या काही गोष्टी क्षम्य पण त्याचे खरकटे त्याच्या हाताखालील नोकराने का म्हणून काढावे? का स्वच्छ करावे. तो ही तुमच्या सारखा नोकर आहे त्यालाही स्वतः चा मान सन्मान आहे, पण जे लक्षात घ्यायचे कोणी? आपल्या मनातच उच्च नीच कल्पना असेल, आपले विचार बुरसटलेले असतील तर आपण कोणास कसा न्याय देऊ शकू?

एखाद्या व्यक्तीची त्याच्या विचारामागे काय भावना असेल सांगणे अवघड होते. एक मित्र कुठे काही देणगी दिली की त्याची जाहीर वाच्यता करायचा आणि त्याचे मित्र पाठीमागून टिंगलटवाळी करायचे. लोक आपली टिंगलटवाळी करतात हे एव्हाना त्याला समजले. कोणीतरी त्यांना विचारले,”तुम्ही स्वतः च्या उदारपणाची जाहिरात करण्यासाठी संस्थाना आर्थिक मदत करता का?” तो समोरच्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून हसला आणि म्हणाला. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे का?, मी डोनेशन दिले हे माझ्या whatsapp मित्रांनी वाचले की ते अहमअहिकेने माझ्या पेक्षा जास्त रकमेचा मदतीचा धनादेश संस्थेच्या कार्यालयात देतात याचा मी अनुभव घेतला आहे. परिणामी संस्थेच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत जमा होते. माझ्या या कृतीमुळे जर संस्थेला लाभ होत असेल तर मला कोण काय म्हणते याने फरक पडत नाही. आता मला सांगा, यात माझा काही स्वार्थ आहे का? “ तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कृतिमागे किंवा बोलण्यात काय दृष्टिकोन आहे ते माहिती करून न घेता त्या व्यक्तीवर टीका करणे चुकीचे आहे.

आपल्या तरुण वयात पालकांनी आपल्याला शिस्तीचे काही सांगितले की आपला पारा चढलाच म्हणून समजा, अगदी आपले चुकले आहे हे आपल्याला पटत असले तरी, पालक प्रत्येक गोष्टीबाबत सतत टोचून बोलतात असे वाटू लागते. विशेषतः आपला मित्र परिवार किंवा नात्यागोत्यातील व्यक्ती समोर गप्पा मारतांना आपण हजर असलो तर बोलण्याच्या भरात मुलाचे कौतुक करता करता, “मुलगा छोट्या छोट्या गोष्टीतही कधीतरी धांधरटपणा करतो, नाहीतर तो बोर्डात पहिला आला असता.” असे घरातील मोठी माणसे विशेषतः वडील पाहुण्यांना सांगून टाकतात. खरे तर आपल्या मुलाचे दुर्गुण जाहीर करणे त्यांचा उद्देशच नसतो. पण बोलण्याच्या ओघात ते आपला दृष्टिकोन सांगून मोकळे होतात. तेव्हा बोलतांना आपला दृष्टिकोन ठाम ठरवला पाहिजे आणि तसेच मुद्देसूद बोलले पाहिजे अन्यथा आपल्या नकळत एखादे विधान वा वाक्य गहजब करून जाते. गैरसमज पसरवू शकते.

कोकणातील लोक साधे आहेतच, त्याबद्दल ‘कोकणची माणस साधी भोळी,मनात त्यांच्या भरली शहाळी’ हे गाण तर खूप प्रसिद्ध आहे. पण ते कोणती गोष्ट कधी सरळ बोलत नाहीत. त्यातून कधीकधी गेरसमज निर्माण होतात. तुमचे कितीही चांगले नाव असू दे ते त्या नावाच्या वाट लावतात. बरेच दिवसांनी भेटत असाल तर कचकचीत शिवी देत विचारतील, “ xxxx इतके दिवस गमलस नाय होतस खयं.” ऐकणारा त्याच्या कुळातील असतो आणि त्याला त्याचा प्रेमळ स्वर कळतो म्हणून ठिक. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ समजला तर तुम्ही त्याची गचांडी धराल. कोकणातील माणसे रसिक आहेत. आणि ते विविध कलांचा मुक्त आस्वाद घेतात कोकणी माणसाची भाषा आणि त्याचा प्रेमळ स्वभाव आणि मानसिकता सांगते. कोकणातील नागरिक देवभोळे आणि कलासक्त आहेत. त्यातील काही कष्टाळू आहेत त्यांनी ग्रामीण भागात आपल्या कौशल्याने आपला व्यवसाय उभा केला आहे याचे कारण त्यांचे लक्ष ठरलेले आहे. आपण ग्रामीण भागात राहिलो तरी मुंबईतील सुविधा आपल्याला मिळवता आल्या पाहिजे. विपरीत परिस्थितीत झुंजून यश मिळवणाऱ्या अशा बांधवाचा सत्कार झाला पाहिजे. माझ्या माहितीत काही तरुण आहेत त्यांनी स्वतःचा उद्योग उभारून आपल्या गावातील लोकांना रोजगार दिला आहे तर काही तरूणांनी मुंबईत जाऊन स्पर्धा करून आपले भविष्य घडवले आहे. लक्ष ठरवले तर आपल्या दृष्टिकोनात योग्य बदल करून यश मिळवता येते.

मात्र त्यातील काही नागरिक आपल्या अपयशाला किंवा परिस्थितीला दैव आणि देव यांना दोष देतात. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतात ही चांगली गोष्ट नाही. कोणीतरी येईल आणि अपल्याला मदत करेल ही वृत्ती फारशी पोषक नाही. विशेषता शैक्षणिक प्रगती करुन सन्मानाने नोकरी मिळवावी त्यासाठी मेहनत घ्यावी वेळ द्यावा हे सांगणे त्यांना पटत नाही. एकवेळ रात्र जागून ते दशावतार पाहतील किंवा भजनाला जातील किंवा चव्हाट्यावर गप्पा मरतील पण काही वेगळे शिकून त्यात कष्ट करण्याची मेहनत घेणार नाहीत. असा चव्हाट्यावर गप्पा मारण्यापेक्षा तोच वेळ आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरतील का? याबाबत ठाम सांगता येत नाही. अंधश्रद्धा आणि ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून त्या हातभार करून गजाली मारण्यात ते हुशार आहेत. दुर्दैवाने ते अल्पसंतुष्ट आहेत, याच गुणामुळे ते फारशी मेहनत घेत नाहीत मात्र कोणी प्रगती केली तर त्याची टिंगलटवाळी करतात. हा दुर्गुण त्यांच्या प्रगतीला खीळ घालतो.

तुम्ही आर्थिकदृष्ट्या विकसित पश्चिम महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील आहात, की अर्धविकसित मराठवाड्यातील की कोकणातील आहात किंवा अविकसित चंद्रपूर गडचिरोलीचे आहात याने काही फरक पडत नाही. आपले लक्ष आपण ठरवले पाहिजे,अडचणींचा बाऊ न करता संघर्ष करत आपले लक्ष साध्य केले पाहिजे. त्यासाठी आपला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट हवा. लक्ष छोटे असो की मोठे आपले नियोजन योग्य असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचणार यात शंका नाही. ‘मन मे है विश्वास पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन.’ हाच संकल्प हवा आणि या संकल्पासाठी निकोप दृष्टी. आशा करतो की तुमची वाटचाल ही ध्येयाच्या दिशेनेच सुरू आहे आणि लक्ष तुमच्या अगदी समोर आहे. तेव्हा दृष्टिकोनातील दोष दूर करून यश साजरे करण्यासाठी तुम्ही तयार असणारच.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *