उसण
आज संध्याकाळी ती मला अचानक दिसली. मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे, मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे असे किमान दोन तीन वेळा घडले मी रस्त्याच्या कडेने चालत होतो त्याच्या पलीकडच्या बाजूने ती माझ्या दिशेनेच चालत होती. बहुधा तो मीच आहे का? याची तिच्या मनाची खात्री पटत नव्हती आणि तिच गत माझी होती. ती तिच आहे का की आणखी कुणी? ती माझ्यापेक्षा हुशार निघाली, ती रस्ता ओलांडून माझ्या जवळ आली, “महेश नाडकर्णी ना तुम्ही? ” “हो! आणि तू निनाच ना? मी चक्क एकेरी उल्लेख केला तशी ती लाजली. “अजूनही मी तुझ्या लक्षात आहे तर?” आता ती एकेरीवर येत म्हणाली. तिचे डोळे चमकले, की मला तसा भास झाला कळे ना, पण ती मनमोकळ हसली, अर्थात मीही तिच्या स्मृतीला हसून दाद दिली.
तिच्या भेटीचा मलाही प्रचंड आनंद झाला,इथे पुण्यात तिची अशी अचानक भेट होईल असे कधी वाटले नव्हते. मी तिला म्हणालो, “इथे रस्त्यात उभं राहून बोलण्यापेक्षा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ या का? मस्त कॉफी घेऊ किंवा फक्कड आईस्क्रीमच खाऊ.” माझं वाक्य ऐकताच तिला आनंद झाला, तुला अजूनही आठवतयं तर मला आईस्क्रीम…” तिने वाक्य असच सोडलं. “हो तर, न आठवायला काय झालं, अगदी परवा परवाचीच गोष्ट असावी इतक स्पष्ट मला आठवतयं, आणि तुला? तुला आठवतय ना? की मग तू विसरून गेलीस?” “नाही रे मह्या, इतक्या सहजा सहजी मी विसरेन का तो काळ,ते दिवस, तो जुहू चा फुललेला बिच आणि..”
मला मह्या म्हणतांना ती फारच भाऊक झालेली दिसली. आजही ती तितकीच सुंदर आणि ताजी टवटवीत दिसत होती, नाही म्हटले तर चार दोन थोडे सोनेरी केस बटेत डोकावत होते पण अजूनही तिची ती नाजूक जीवणी, सुडौल बांधा, गुलाबी ओठ आणि केशसंभार जसाच्या तसा होता. जवळच एक मध्यम दर्जाचे रेस्टॉरंट होते. आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोचताच तिला एका कोपऱ्यातील जागा दाखवत म्हणालो, ” इथे बसायचं का? म्हणजे थोड निवांत बोलता येईल.”
ती काही न बोलता मी अंगुली निर्देश केलेल्या जागेवर बसली तिच्या समोरच्या जागेवर मी बसलो. एवढ्यात वेटर तिथे आला, “साहेब काय आणू?” मी त्याला हातानेच थोड थांबण्यासाठी खुणावले तसा तो पाणी ठेऊन निघून गेला. “निना, जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्षे झाली असावीत नाही, आपली भेटगाठ नाही आणि आज अशी अचानक भेट झाली, अजूनही आपण इथे भेटतोय याचा मला विश्वास वाटत नाही.” तिने एक दिर्घ उसासा टाकला, तुझ ग्रज्युऐशन झाल आणि तू मला काही न सांगता, न भेट घेता निघून गेलास, मला ते कोडं कधी सुटल नाही, माझ्याशी तू असा का वागलास? का एवढा निष्ठुर झालास? तुझ्या खिजगणतीत मी नव्हते तर प्रेम का केलस? का मला तुझं वेड लावलस? ” “निना, मला खरचं माफ करं पण जर मी तुला तेव्हा भेटायचा प्रयत्न केला असता किंवा भेटलो असतो तर मी तुला सोडून बाहेर जाऊ शकलोच नसतो, फार मुश्किल परिस्थितीत ती संधी मला कंपनीकडून मिळाली होती. ती एम एस साठी स्पाँन्सरशीप होती आणि मला त्या आठवड्यात तिथे हजर होणे भाग होते. मला माहिती होते मी चार वर्षांसाठी बाहेर जातोय ऐकून तू तुटून गेली असतीस, मलख ते सहनही झालं नसत. पण मला जायचेच होते. माझा अगदी नाईलाज होता.”
“तुला माहिती आहे? तू अचानक निघून गेलास आणि माझी परिस्थिती काय झाली? बरेच दिवस मी आपल्या भेटीच्या वेळी तुझी वाट पाहिली, अगदी चातकासारखी, पण तुझा थांगपत्ताच नव्हता, तुझा पत्ता मिळवणे कठीण नव्हते पण तुझ्या घरी मी काय म्हणून जाणार होते? तुम्ही कोण म्हणून विचारले असते तर काय सांगणार होते? त्या नंतर बरेच दिवस मी कसे कसे काढले तेच मला माहित नव्हते. पप्पांनी मला पुन्हा माणसात आणण्यासाठी काय केले असावे त्यांचे त्यानाच ठाऊक. “
“निना मला माफ कर, मी खरचं तुझा गुन्हेगार आहे, पण मी उच्च शिक्षणासाठी बाहेर जात आहे हे सांगण्यासाठी जरी भेटलो असतो तर तुला सोडून जाणे मला खात्रीने जमलेच नसते म्हणून मी तो अक्षम्य अपराध केला. तिकडे गेल्यानंतर मी अगदी एकाकी आहे याची मला जाणीव होऊ लागली. खूप वेळा वाटे की तुला फोन करून कळवावे,पण मला माहिती होते तूझ्याशी मी बोलू शकलो नसतो,तू मला शब्दांनी नकोसे केले असतेस ते घाव मला सहन करणे जमले नसते, म्हणून, म्हणून मी नाही कॉन्टॅक्ट केला, मनाने मी दुबळा होतो गं.”
पुन्हा वेटर जवळ आला, “साहेब काय ऑर्डर?” “दोन प्लेट कसाटा आईस्क्रीम” “साहेब, फुल की हाफ?” “फुल ” तो निघून गेला. महेश तुला एवढ्या दिवसात माझी कधीच आठवण नाही आली? जिच्या सोबत तू चार वर्षे मैत्री केली, सुखदुःखाच्या गोष्टी केल्या, संसाराची कल्पना रंगवली, तिला काहीही न सांगता तू सोडून गेलास. तिच्या मनाची अवस्था काय असेल? कशी असेल ती, जिवंत असेल की आठवण असाहाय्य होऊन तिने जिवाचे काही बरेवाईट करून घेतले असेल? काहीच विचार तुझ्या मनात आला नाही का? इतका क्रूरपणे तू माझ्याशी कसा वागू शकलास? तुझ मन दगड बनलं होतं का?”
“निनू, प्लीज नको डागण्या देऊ, मी तुला फोन केला नाही हे खरे असले तरी मी तुला विसरू शकत नव्हतो. मी मित्रांकडे तुझी चौकशी सुध्दा केली. किती दिवस मी रडून काढले आहेत ते सांगून तुला पटणारही नाही. दिवसा, अनेक लेक्चर, प्रॅक्टिकल, परिसंवाद यात वेळ निघून जायचा, पण संध्याकाळ झाली की मन उदास व्हायचे, डोळ्यासमोर तू यायचीस, समोर माणसांनी फुलून आलेला बीच, तो पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर धावून येणारा समुद्र त्याच्या लाटांचा सपाक् असा आवाज यायचा. मी त्या काळात अचानक ओढला जायचो. तुझ्या मांडीवर पडून मी वाळूत रेघा मारतोय असा मला सारखा भास व्हायचा, वेड लागेल की काय असे वाटायचे. आणि हळूहळू गडद होत जाणारा अंधार पसरत जायचा. आणि मग, भयाण शांतता. मी तेथे सुखात होतो मजा करत होतो असं तुला वाटत असेल तर तो भ्रम होता. कधीकधी कितीतरी वेळ मी एकटाच बसून असायचो . मीच मला विचारायचो की तुझी सोबत सोडून त्या मास्टरर्सच्या भेंडोळीसाठी मी का म्हणून इतक्या दूर आलो? का तुला दगा दिला. खूप वाईट आहे गं मी. तुझ्याशी खरचं खूप वाईट वागलोयं. मी तुझा गुन्हेगार आहे. मी तुझ्या प्रेमाची प्रातारणा केली.
तुझी चौकशी मित्रांकडे केली आणि तूझी नाजूक परिस्थिती समजली तेव्हा मी अमेरिका सोडून येण्याचा प्रयत्नही केला पण मला स्कॉलरशिप असल्याने माझा व्हिसा युनिव्हर्सिटीच्या ताब्यात होता. परतण्याचा विचार केला तर युनिव्हर्सिटीला काही हजार डॉलर परत करावे लागणार होते. I was totally helpless.” निना माझ म्हणणं ऐकत होती की मी एकटाच वेड्यासारखा बडबडत होतो कळेना, पण तिच्याकडे पाहिले तर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते आणि ती रुमालाने ते टीपण्याचा प्रयत्न करत होती. क्षणभर काय करावे सुचेना, निनू प्लीज रडू नकोस ना, लोक आपल्याकडे पहात आहेत. प्लीज नको रडू. तिने रुमालाने डोळे पुसले. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या हातावर हळू थोपटत समजुत घालू पहात होतो. मी म्हणालो, ” हे बघ निनू , खूप मोठा कालखंड पाठी पडला. त्या नंतर बरेच काही घडले की मी तुझ्यापासून दूर दूर गेलो. दुर्दैवाने आपण जवळ नाही येऊ शकलो. त्यानंतरच्या काळात घटना घडून गेल्या. आता या उतार वयात अकस्मात आपली भेट झाली. आता मागचे सारे विसरून जाऊ. नव्याने मैत्री करू, तुला आवडेल ना?” आइस्क्रीम आले तसे,मी निनूला आग्रह केला,” आधी खावून घे मग निवांत बोलू, आइस्क्रीम वितळून जाईल.”
ती खोल उसासत म्हणाली ,” महेश माझ आयुष्य या पूर्वीच सागराच्या लाटात ढेकळासारख विरघळून गेले आता उरलाय तो फक्त चोथा, पण तरीही मी अजून छान जगते आहे. तू गेल्यानंतर बरीच वाट पाहिली. नोकरी केली तू मला पूर्णपणे विसरलास याची खात्री पटली . बाबांनी लग्नाचा धोशा लावला आणि तरण्याताठ्या मुलीने तसही एकटं जगण कठीण . कुणीतरी सोबतीला हवे म्हणून लग्न केले.
तो प्रोफेसर होता, प्रभात साठे,एखदम उमदे व्यक्तीमत्व. त्याने माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्या आनंदासाठी राब राब राबला पण पहिल्या वहिल्या प्रेमाची पोकळी तो भरून काढू नाही शकला. खरं तर मीच करंटी त्याला समजून घेऊ शकले नाही. त्याने मला फुलवण्याचा खूप प्रयत्न केला. पण एकदा सुकलेलं फुल पाण्यात ठेऊन फुलत का? तो अगदी वेडा होता. मी आपल्या प्रेमाबद्दल त्याला कधीही काहीही सांगितले नाही. कदाचित तो ते सहनही करू शकला नसता. तुला ठाऊक आहे, मला गाण्याची आवड होती. तो ही हौशी कलाकार होता.
आम्ही संगीत अकादमी चालवली, खूप मुल तयार केली. तो अनेक वाद्य वाजवायचा. नियतीच दान आम्हाला पडलं नाही, माझ्या पदरात मुल घातलं नाही. तो निराश झाला, कोमेजून गेला. मी समजवायचा खूप प्रयत्न केला पण.. एक दिवस तो झोपेतच मला एकटीला सोडून निघून गेला. रिटायरमेंटही पाहिली नाही. मग मी ही नोकरी सोडून दिली मुंबईतल सगळ आवरलं आणि इथे आले. कोथरूडला एक बंगला पाहिला भाड्याने आणि एकटीचा संसार थाटला. उद्या गेलेच तर व्याप कोण आवरणार?
छान चालले आहे ,सकाळी मी शेजारच्या झोपडपट्टीत तासभर शिकवायला जाते, त्या नंतर नगरपालिकेच्या वाचनालयात जाऊन वर्तमानपत्र पाहते आणि मग रमतगमत परतते. मेलं एकटीचे जेवण ते काय? कितीसा वेळ लागणार? आज काही तरी भाजी घ्यावी म्हणून मंडयीत जात होते तर अचानक तू दिसलास. तुला भेटून बरं वाटल, पण जखम पुन्हा भळभळून वाहू लागली. नसतास भेटला तर, पुन्हा सोडून दूर जाशील याच दुःख तरी वाटल नसतं ,पण तुला त्याचे काय? नाहीतरी पुरूषांची जमात अशीच तर असते, लुटून झाल की नामानिराळ व्हायचे. ” तीचे शब्द मनाला खूपच लागले,बोलता बोलता आईस्क्रीम सगळ वितळून प्लेट मधून खाली वाहू लागलं. तस मी निनाला सावध केल. “अग निनू! मला काय बोलायचे ते बोलून घे पण आधी तुझ्या आवडीचे आईस्क्रीम तर खायचे होतेस ना?”
ती घड्याळाकडे पहात ताडकन उठली, “मह्या खूप उशीर झाला. खूप उशीर केलास, आता मला थांबून जमणार नाही. चल मी निघाले, या जन्मी आपली भेट व्हायची नव्हती, खूप उशीर झालाय. आता मला थांबता येणार नाही.”
मी तिला थांबवण्यासाठी तिचा हात धरू पहात होतो, निनू ,अग ते आईस्क्रीम, ऐक ना गं वाटल्यास मी दुसरं मागवतो पण तेवढ तुझ्या आवडीचे आईस्क्रीम खाऊन तरी..” पण ती माझा हात अलगद सोडवून निघून गेली, मी संभ्रमित अवस्थेत तिला मागून हाक मारली, “निनूSss , निदान पत्ता तरी सांगून जा, निनू.. माझा आवाज घशात अडकत गेला, खोल खोल गेला.
कुणीतरी माझ्या कपाळाला हात लावल्याचा भास झाला. मी डोळे उघडून पाहिले तो माझ्या शेजारी माझी मुलगी कपाळावरची मिठाच्या पाण्याची पट्टी बदलत होती. ” नाना, थोड पाणी पिता का? तिने माझ्या मानेखाली हात घालून मला उठत केलं आणि ती मला पाणी भरवत होती.
दोन दिवसांनी माझा ताप कमी झाला, ही गेली आणि मी शांत जागी राहण्याचा निर्णय घेतला. मी पार्ले सोडायचे ठरवले. मी माझा निर्णय कन्येला बोलावून सांगितला. ती पुण्यात रहात होती. तिनेच मला औंध ची ही राहती जागा सूचवली होती. तेथून तिलाही येथे येणेजाणे सोप्पे होते. पार्ले येथून पुण्यात स्थलांतरित होण्याच्या दरम्यान माझी बरीच धावपळ झाली आणि त्यामुळेच थकवा येऊन ताप आला होता.
मुलीला माझ्या सुश्रूसेसाठी येऊन रहावे लागले, आणि हा असला प्रकार अजाणता घडला. जे कुणाजवळ कधीच बोलायचं नाही असे मनाशी ठरवले ते माझ्या नकळत माझ्यासोबत घडून गेले. आता या पैकी माझ्या मुलीने काय ऐकले ते न कळे पण,माझ्या जवळून केवळ स्वार्थापोटी निनूवर जो अन्याय झाला होता त्याला पस्तीस वर्षानंतर वाचा फुटली होती. मला समजले ते इतकेच गेल्या पस्तीस छत्तीस वर्षात निनूला मी विसरू शकलो नव्हतो. निनू कुठे राहते,या जगात ती आहे की नाही हे मला माहिती नसतांना आजच तिने असे स्वप्नात यावे आणि मला बोलते करावे यातही काही संकेत आहे, की ही गेल्यानंतर मनाचा कोपरा रिकामा झाला त्यामुळे निनूच्या आठवणी उचंबळून वर आल्या कळेना.
माझी मुलगी तेजश्री फार मोठ्या मनाची. आज माझ्या सोबत जे घडले ते तिला समजले की कळेना, पण तिने एका शब्दाने मी काय बडबड करत होतो किंवा निनू कोण? या विषयी मला विचारले नाही ही केवढी मोठी मेहरबानी. जर तिन निनू विषयी विचारले असते तर मी एका निष्पाप मुलीच्या प्रेमाची प्रातारणा केली हे तिला समजले असते. मी तिच्या मनातून पार उतरलो असतो.
आधीच मी निनूचा आणि हिचाही अपराधी आहेच. भरल्या संसारात विघ्न नको म्हणून मी कधीच निनू बद्दल चकार शब्दही काढला नाही. केवढा धुर्त होतो मी. चांगला नवरा असल्याचे शाबीत करण्यासाठी मी निनूला पार खोल गाडून टाकले होते. आता ती तर गेली. सुखाचा संसार करून गेली. पण पहिलं प्रेम ते पहिल प्रेमच असते. सह्रयी ते नाही विसरू शकत. कधीतरी निनू बद्दल तेजश्री ला माझ्या कन्येला मला सांगावेच लागेल, मग तिने आपल्या बापाला पाषाण ह्रदयी म्हटल तरी चालेल, सहन करेन मी, अन्यथा माझ्या मनातील निनू चे भूत माझा पिच्छा सोडणार नाही. “निनू मला खरचं माफ करं, मी तुझ्यावर खरचं अन्याय केला आहे. तू जिथे कुठे असशील सुखी रहा. पण माझा पिच्छा पुरवू नको. तुला दिलेल ते दुःख आता पुन्हा पचवण्याची माझ्याकडे क्षमता नाही गं, खरंच नाही, म्हणून तरी माफ कर.