प्रवाहात टिकून राहण्यासाठी

प्रवाहात टिकून राहण्यासाठी

वातावरण बदलाचा झाडावर परिणाम होत असतो, त्यानुसार झाडे कधीतरी निष्पर्ण होतात. काही सरडे स्वःसंरक्षणार्थ आपला रंग बदलतात. बेडूक शितकाल समाधी घेऊन स्वतःचे रक्षण करतात. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही देणगी दिलेली आहे ज्याचा वापर तो टिकून राहण्यासाठी करतो. बदलाला प्रतिसाद देत स्वतःत बदल घडवून आणले तर जीवन सुसह्य होते,परंतू या प्रवाहाच्या विरूध्द जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्रास हा होणारच.

आज पालक आपल्या मुलांना परवडत नसतांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकवण्याचा अट्टाहास करत आहेत कारण माध्यमांनी त्यांची ठाम समजुत करून दिली आहे की ग्लोबल जगात इंग्रजी येणारी पिढीच टिकून राहिल. अर्थात हे काही खरे नाही. आजही जपानमध्ये, चीनमध्ये आणि अनेक युरोपियन देशात त्यांच्या भाषेतून शिक्षण दिले जाते. मात्र आपल्या देशात सोईस्करपणे इंग्रजी भाषा किती आणि कशी महत्त्वाची आहे ते पेरल्यामूळे अगदी छोट्या शहरातही इंग्रजीचे लोण पसरले आहे. ज्यांची आकलन क्षमता चांगली असते ते भाषेचा बाऊ करत नाहीत. मातृभाषेत संकल्पना जितक्या सहज लक्षात राहतील तितक्या परकीय भाषेत राहणार नाही.

प्राचीन काळी अनेक धर्मग्रंथ हे संस्कृत मधून होते आणि अनेक गुरुकुल आणि पाठशाळा ह्या संस्कृत मधूनच चालत असत, साहजिकच संस्कृत भाषेला दर्जा प्राप्त झाला होता. त्यामुळे त्याच भाषेत अध्यापन होत असे. आजही कर्नाटक राज्यातील काही खेड्यात सम्पूर्ण व्यवहार संस्कृत भाषेत चालतो. भारतात जेव्हा अवघ्या आठव्या वर्षी मुलाची मुंज होऊन त्याला वेदांचा आणि शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी गुरुगृही पाठवण्यात येत होते तेव्हा तो सर्वसाधारण आठ वर्षांचा असे. तोपर्यंत त्याचे आयुष्य बागडण्यात जात असे, त्यामुळे त्याची शैक्षणिक जाणीव फारशी विकसित असण्याची शक्यता नव्हती.

पालक त्याला गुरुगृही पाठवत तेव्हा त्या शिष्यांसमोर फक्त एकच लक्ष ठेवले जात होते ते म्हणजे लवकरात लवकर अभ्यास पूर्ण करून कलेत निष्णात व्हायचे आणि आपल्या गुरुगृही घेतलेल्या ज्ञानाची कसोटी पूर्ण करून आपले ज्ञान समाजासाठी वापरात आणायचे. त्या वेळी आठ वर्षांच्या मुलाला आपण घरापासून दूर पाठवत आहोत ह्या विचाराने मुलाच्या आईचे ह्रदय आपली आणि मुलाची ताटातूट होणार म्हणून गलबलले असेल की नाही?

कदाचित पुढील दहाबारा वर्षे आपला मुलगा आपल्या शिवाय तेथे एकटा कसा राहील? या चिंतेने तिचे काळीज अस्वस्थ झाले असेल की नाही? तरीही तिने काळजावर दगड ठेऊन पतीने घेतलेल्या निर्णयाला मुक संमती दिली. ‘उद्याचे भविष्य चांगले घडवण्यासाठी आरंभी सुखाची आहुती द्यावी लागते’ याची तिला कल्पना होती. नव्हे तोच परिपाठ वर्षानुवर्षे ती ऐकत होती.

आजही काही कुटुंबात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लहान वयातच त्यांच्याकडून विविध आध्यात्मिक ग्रथांतील अध्यायाचे पठण करून पाठांतर करून घेतले जाते. त्यांना संस्कृत भाषेची गोडी लागावी म्हणून अशा संस्कार वर्गांना पाठवले जाते. पोहणे, ज्युदो, कराटे अशाही वर्गांना पाठवून त्याचे शरीर स्वस्थ राहील असे पाहिले जाते. ज्या मुलांना प्रकृतीमुळे शारिरीक कसरती किंवा व्यायाम जमत नाही त्यांना बुद्धिबळ, कॅरम अशा खेळत सहभागी करून त्याची बौद्धिक क्षमता विकसित होण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेतील विविध उपक्रमात भाग घेण्यासाठी उद्युक्त केले जाते.

मात्र पुर्वीच्या काळी, विद्याभ्यास पूर्ण केलेला शिष्य त्या दहा बारा वर्षांच्या विद्याभ्यासानंतर गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार अन्य देशात वा अन्य राज्यात जाऊन करायचा. या विद्यार्थ्यांमध्ये कोणी वेद पारंगत होत असे तर कोणी शस्त्र आणि कोणी शास्त्र पारंगत होई. तर कोणी नितिशास्त्र कोणी कायद्याच्या आणि न्यायाच्या प्रांतात तज्ञ असे. आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्य जातीच्या उत्थानासाठी व्हावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असे.

आज काही शाळांतून प्रचलित शिक्षणा बरोबरच संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि वेदांचा अभ्यास शिकवला जातो. याच बरोबर पुजा पाठ, नाना व्रतवैकल्य विधी शिकवले जातात. या शिक्षणाचा फायदा त्याला पौरोहित्य करण्यासाठी उपयोगी पडतो. हे शिक्षण साधारण पाच वर्षांचे असते. काही शहरात नियमित अभ्यासासह तांत्रिक शिक्षण दिले जाते.
भविष्यात आपला व्यवसाय करण्यासाठी ते उपयोगी ठरते.

पूर्वी जेव्हा गुरूकुल पध्दती होती तेव्हा संस्कार आणि नैतिकतेसह श्रम व स्वावलंबन शिकवले जायी याचबरोबर वेद, धर्मग्रंथ, विज्ञान आणि गणित वैद्यकशास्त्र, युध्दकला, व्यवहार कला याची पूर्ण ओळख करुन दिली जाई.

ज्याला वैद्यक ज्ञानात गती असे तो शारीरिक व्याधी आणि त्यावर करायच्या उपचार यावर लक्ष केंद्रित करून विविध आजाराची लक्षणे आणि विविध जडीबुटींच्या गुणधर्माचा अभ्यास करून कोणत्या आजारावर कोणत्या औषधाची मात्रा चांगली ऊपयोगी पडते यावर संशोधन करत असे. ज्याला युध्दकलेत पारंगत व्हायचे असेल तो शस्त्रे चालवायचे प्रशिक्षण घेई. याच बरोबर रणनीती, डावपेच याचे तंत्र शिकून घेई.

त्या काळी वसिष्ठ, द्रोणाचार्य, विश्वमित्र, सांदिपनी, गौतम, भारद्वाज, अगस्त्य इत्यादी ऋषींनी आपल्या आश्रमात गुरूकुल परंपरा चालवून उत्तम नितिवान शिष्य घडवले. या शिष्यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपले बस्तान बसवले. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे केला. आपल्या पालकांचा उध्दार केला. एवढेच नाही तर त्यांची वृद्धपकाळात सेवा केली.

तेव्हा आपल्या देशात नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला आणि वल्लभी यासारखी अनेक विद्यापीठ होती जेथे वेगवेगळ्या आचार्यांनी स्वताची हस्तलिखिते या विद्यापिठास भेट दिली होती. येथील विद्यार्थ्यांना स्वतः मार्गदर्शन केले ‘चाणक्य’, ‘चंद्रगुप्त मौर्य’ आणि ‘चरक’ हे तक्षक्षिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते असे मानले जाते. नालंदा हे बिहार मधील बौध्द धर्मिय विद्यापीठ होते याची स्थापना ‘कुमार गुप्त’ याने केली असे मानले जाते.

विक्रमशीला या विद्यापीठाची स्थापना भागलपूर बिहार येथील पर्वतावर धर्मपाल या राजाने केली होती असे मानले जाते. ‘सोमपुरा’ , गुजरात आणि ‘शारदा’ काश्मीर येथेही विद्यापीठ होती . याचा स्पष्ट अर्थ स्वातंत्र्य पूर्व काळात शैक्षणिक प्रसारासाठी अनेक राजे पाठबळ पुरवत होते. याचाच अर्थ मोघलांच्या आक्रमणापुर्वी भारत हा संपंन्न देश होता आणि येथे शांतता नांदत होती.

खिलजी याने तक्षक्षिला आणि नालंदा विद्यापीठ नष्ट केले. स्वतःच्या धर्मप्रसाराच्या वेडापाई हजारो ग्रंथ त्याने पेटवून दिले. या ग्रंथात मानवाच्या विकासासह त्याला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल ऋषी मुनीनी केली होती. त्याच्या वेडपटपणाने समाजाच्या उपयोगी पडणारे अमोल ग्रंथ नष्ट झाले. विद्येचे मार्ग बंद झाले.

थोडक्यात प्राचीन काळी राजेमहाराजे यांच्या दरबारात ज्या प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असे त्या प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था तेव्हा आश्रम आणि गुरूकुले चालवत असत. त्या नंतरच्या शांततेच्या काळात भारतात बौध्द धर्माचा प्रसार फार वेगाने झाला, ते शांतताप्रिय होते. या धर्मातील कलाऊपासकांनी भारतातील अनेक राज्यात नैसर्गिक संकटांचा सामना करत गुहा खोदल्या, शिल्पे कोरली. तेथे ध्यानधारणेसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. या ठिकाणी विद्यार्जन करण्यासाठी विद्यार्थी येत होते. अजिंठा, वेरूळ, नाशिक येथील पांडव लेणी, कान्हेरे गुंफा, एलिफंटा येथील गुंफा याचा विस्तार आणि त्यातील प्रमाणबद्धता, कोरलेली शिल्पे पाहिले की थक्क व्हायला होते. या शिल्पांचा कालखंड साधारण १५०० वर्षे किंवा त्याहून जुना आहे.

बौध्द धर्माच्या प्रसार काळात मौर्य, चौल, यादव यासारखी मोठ मोठी राजांची घराणी होती आणि ती या कलेच्या जोपासनेसाठी द्रव्य आणि माणसे पुरवत. सुदैवाने काळाच्या ओघातही ही शिल्पे आजवर टिकून आहेत.

भारतात वेगवेगळ्या ग्रंथकारांनी लिहून ठेवलेले वेद, शास्त्र, पुराणे यांचा विस्तार प्रचंड आहे. भारतात महाभारत, रामायण यासारखी महाकाव्ये आहेत. अर्थशास्त्र, नितीशास्त्र, काव्यशास्त्र, व्यवहार कोश, व्याकरण, रचनाशास्त्र यांवर भाष्य करणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. आर्यभट्ट, भास्कराचार्य, पाणीनी यासारखे अभ्यासू संशोधक होऊन गेले.

भारतात वैदिक काळात विद्येबाबत गुरूकुल होऊन गेली तशीच परंपरा गायन आणि वादन क्षेत्रातही पूर्वी होती, आजही आहे. संगीतात कर्नाटकी, उत्तर भारतीय अशा संगीताची परंपरा आहे. ग्वाल्हेर( ख्याल), आग्रा(धृपद धमर), किराणा – भीमसेन जोशी,गंगूबाई हंगल हे मधुरता जपत असत ,जयपूर (जटिल ताना आणि रागांचे मिश्रण) , दिल्ली (तबला वादन) , रामपूर, पटियाला (पंजाबी लोकसंगीत) यासाठी प्रसिद्ध आहे, सेनिया ही घराणी विशिष्ट गायकी आणि रागांचे सादरीकरण करतात मोगुबाई कुर्डुकर, हिराबाई बडोदेकर, आमोणकर इत्यादी गायिकांनी कर्नाटकी संगीत दिक्षा अनेक गायकांना दिली.

नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बाल गंधर्व, छोटा गंधर्व सौदागर नारायण गोरे, किशोर गंधर्व, शिवपुत्र सिध्दरामय्या कोमकली, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनीही अनेक शिष्य घडवले. त्यापैकी शौनक अभिषेकी, महेश काळे, राहुल देशपांडे यांची नावे अग्रेसर आहेत.

आपल्या देशात शास्त्र, कला आणि विविध विद्या यांचा भक्कम पाया आहे यात शंकाच नाही. आपल्या देशावर मुघलांसह अनेक व्यावसायिक आणि परदेशी घुसखोरांनी राज्य केले. येथे स्थापत्य कला विकसित केली. नवनवीन शैली निर्माण केली. त्यामुळे देशी विदेशी शैलीचा पगडा विविध राज्यात दिसून येतो.

आपल्या देशाला वेगवेगळ्या शास्त्रातील किंवा कलातील प्रचंड वारसा होता आणि आजही आहे. भारतातील वेद वा इतर शास्त्रे ही एका गुरुकडून दुसऱ्या शिष्याला मौखिक पद्धतीने पोचवली जात होती. लिखित स्वरूपात साहित्य जवळजवळ नव्हते. याच बरोबर जेव्हा परकीय आक्रमणे झाली तेव्हा ऋषींचे आश्रम नष्ट झाले. ताडपत्र हस्तलिखिते जाळून टाकण्यात आली. साहजिकच कालौघात लिखित माहिती नष्ट झाली . परकीय आक्रमणात अनेक साधू ,संताची हत्या झाली त्यामुळे ज्यांना या विद्या अवगत होत्या ते मृत पावले, वाचले ते स्वःसंरक्षणार्थ दूर निघून गेले. त्यांनी आपली ओळख पुसून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. साहजिकच पुढील पिढीकडे या विद्या दिल्या गेल्या नाहीत.

भारतातही बांधकाम क्षेत्र असो, उत्पादन क्षेत्र असो की वाहतूक क्षेत्र असो किंवा आधुनिक शेती सातत्याने बदल घडतच आहेत. या बदलांचा स्वीकार करून येणाऱ्या नवनवीन उद्योगासाठी मनुष्यबळ पुरवण्यात आपण सक्षम ठरले पाहिजे. कंप्युटर क्षेत्रात कितीतरी उलथापालथ होत आहे, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, एअरोस्पेस आरटिफिशल इंटेलिजन्स अशा विविध बक्षेत्रात कंप्यूटरची मदत प्रोग्रामिंगसाठी घेतली जाते. बँकींग क्षेत्रात कंप्यूटर प्रोग्रामिंगमुळे अमुलाग्र बदल घडले आहेत. या सर्वांचा परिणाम, तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. मात्र सेवा देण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे ठरते.

आपल्या देशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचा ट्रेंड आहे. तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे ग्राज्युएशन झाल्यानंतर GRE, TOEFL,GMAT या सारख्या भाषा प्राविण्य आणि स्पर्धा परीक्षा देऊन गुणवत्ता सिध्द केल्यानंतरच जाता येते. त्यासाठी विद्यापीठाकडून किंवा तेथील कंपनीतून व्हिजा मिळवावा लागतो. तेथे गेलेले सर्वच विद्यार्थी यशस्वी होतात असे नाही. पण तेथे गेल्यानंतर ते ऐनकेन प्रकरणे तिथे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी तेथील कंपनीने तुम्हाला स्विकारणे भाग आहे अन्यथा तुमच्या व्हिजाची मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांत तुम्ही परतला नाही तर कारवाई होण्याची शक्यता असते.

आपल्या देशातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च गुणवत्ता तर आहेण पण त्याच बरोबर अधिकचे श्रम किंवा मेहनत करण्याची क्षमता आणि जोखीम घेण्याची वृत्ती आहे. त्यामुळे सहसा आपल्या देशातील तेथे गेलेला विद्यार्थी किंवा व्यवसायिक अपयशी ठरत नाही. आपल्याकडील विद्यार्थ्यांना तेथील उद्योग कमी वेतनावर राबवून घेतात. दुर्दैवाने भारतात यापेक्षाही कमी वेतन आणि सुविधा असल्याने तेथे गेलेले विद्यार्थी या वेतनात समाधानी असतात. त्यामुळे तेथील व्यावसायिकांना परदेशी कर्मचारी परवडतात.

आज जे विविध शोध परदेशात लागत आहेत, त्या मागे भारतीय इंजिनिअर्स आहेत फक्त त्याचे श्रेय त्यांना नेहमीच मिळेल असे सांगणे अवघड आहे. आपल्या देशातील तरुण मुलांचे गणितीय ज्ञान नक्कीच चांगले असते.आपल्या देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत उत्तम गती आहे. याचा फायदा त्यांना होतो. भारतात अंकगणित आणि खगोलशास्त्र याचा विकास फारच आधी झाला होता त्यावरून गणनाशास्त्र विकसित झाले होते. आज या गोष्टी तुम्ही सांगता तेव्हा काही विचारतात मग जास्तीत जास्त शोध इतर देशात का लागले? याचे कारण स्वातंत्र्य पूर्व काळात आमच्या लोकांनी आपल्या वैज्ञानिकांवर पुरेसा विश्वास दाखवला नाही. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. उलट हेटाळणी केली.

आता परदेशात भरवल्या जाणाऱ्या विविध विषयांच्या आँँलपियाड स्पर्धेत आपले विद्यार्थी चमकतात. खेलीयड सरख्या संकल्पना राबवल्या आणि आपल्या देशात चांगले खेळाडू निर्माण झाले. पदक तालिकेत आजही आपण पाठी असलो तरी क्षमतेत सुधारणा होत आहे. जर खेळाडूंना चांगल्या सुविधा, प्रशिक्षक आणि आहार दिला तर भविष्यात आपल्या देशातील गुणवत्ता नक्कीच वाढेल.

परदेशी संशोधक आपल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यातील उपचार पद्धतीचा शोध घेत आहेत. या माहितीचा योग्य वापर करून परदेशात संशोधन झाले. आज अनेक देशात भारतीय आयुर्वेद पध्दती आणि योगा यांचा उपचार पध्दती म्हणून वापर होतो.

सुदैवाने गेल्या चाळीस वर्षात म्हणजे संगणक युगात सारे काही बदलले. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ लागले, त्यासाठी बँक तारणावर कर्ज देऊ लागल्या, पालक आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून किंवा बँकेतून कर्ज काढून विद्यार्थ्यांना परदेशात पाठवू लागले मात्र या विद्यार्थ्यांपैकी फारच थोडे विद्यार्थी भारतात परतले याचे कारण त्यांना अपेक्षित असलेले पॅकेज येथे नव्हते आणि परदेशात जे राहणीमान आहे त्याची गोडी लागल्याने त्यांना येथे राहणे सोयीचे वाटत नाही.

दुर्दैवाने आजही आपल्या देशात पुरेसे उद्योग धंदे विकसित झाले नाहीत. आपले विद्यार्थी त्यांचे ज्ञान आपल्या देशासाठी वापरत नाहीत हीच तर शोकांतिका आहे. सुरवातीस त्यांना परदेशात गेल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही त्यामुळे त्याच्या दैनंदिन खर्चाची तरतुद पालकांना करावी लागते. त्यानंतर पालकांवर बोजा नको म्हणून समजूतदार मुले पार्ट टाईम जॉब करून आपल्या दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळवतात. तेथे पार्ट टाईम जॉब करतात. आपली गरज भागवण्यासाठी काही विद्यार्थी दोनतीन छोटे जॉब करावे लागतात.

आपल्या देशातही पैसे कमवण्याची संधी आहे मात्र येथे जास्त मेहनत करावी लागते. त्या मानाने सुखसोयी नाहीत. येथे परदेशाच्या तोडीस तोड उत्पदान तयार होते एक्सपोर्ट होते, किंबहुना तेथील उत्पादन खर्चाच्या निम्म्या किमतीत आपण त्यांना ऑटोमोबाईल पार्ट आणि बरेच सुटे भाग विकतो. आपलेच परदेशात शिकलेले सुशिक्षित या गोष्टीची कोणताही अभ्यास न करता आपल्या येथील उत्पादन आणि उत्पादक यांची खिल्ली उडवतात.

कॉम्पुटर क्षेत्रात आपली मुले स्मार्ट आहेत. त्यामुळे परदेशात आणि येथील विदेशी कंपन्यात काम करतात. संस्कृत या भाषेचा वापर संगणकात कोडींगसाठी होतो. जर्मनी ,अमेरिका जपान यासह ६० देशात संस्कृत शिकवले जाते. याचे कारण आपल्या संस्कृत ग्रंथात आजही अमर्याद ज्ञान आहे त्याची उकल करण्याचा प्रयत्न परदेशात गांभीर्याने होत आहे. भारतात मात्र तिचा उपहास होतो.योग आणि आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी ही भाषा उपयोगी पडते.

गुरूकुल शिक्षणपद्धती गेली आणि शाळा अस्तित्वात आल्यामुळे मुले आपल्या पालकांसोबतच राहू लागली परिणामी त्यांचे अवलंबित्व वाढले. गेल्या तीस चाळीस वर्षात कुटुंबातील मुलांची संख्या घटली त्यामुळे पालकांचे मुलांवरील लक्ष वाढले त्याचा परिणाम म्हणजे अगदी छोट्यात छोट्या गोष्टींसाठी ती पालकांवर विसंबून राहू लागली. यामुळे त्यांची स्वावलंबन आणि अडचणीवर मात करण्याची इच्छा आणि क्षमताही हरवली.

आज परिस्थिती बदललेली आहे, विद्यार्थ्यांना आम्ही उच्चशिक्षित केल्यामुळे, माझ्या क्षमतेचे काम मिळाले तरच ते मी करीन किंवा माझ्या डिग्रीला अमुक एक पँकेज शोभत नाही. या संकुचित विचाराने मुलगा शिक्षित असला तरी अर्थार्जनासाठी लायक रहात नाही आणि मानसिक दृष्टीने त्याचे खच्चीकरण होते. ही पालकांची जबाबदारी आहे, की तुला साध्य होईल आणि तू सहज अर्थार्जन करू शकशील असा अभ्यासक्रम तुच निवड, त्यात तुझे करिअर शोध किंवा मार्ग बदल करून आपला विकास कर. नेहमीच ज्या क्षेत्रात शिक्षण झाले आहे त्याच क्षेत्रात नोकरी मिळेलच किंवा करिअर होईलच हे संभव नाही.

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे ठेऊ नये. मुले जे शिक्षण घेऊ इच्छितात त्यामूळे त्याचे भविष्य उभे राहील का? याचा सारासार विचार करूनच त्याच्या निर्णयास सहमती द्यावी. अन्यथा शिक्षणावर खर्च करूनही तो स्वतः स्वयंपूर्ण झाला नाही तर शिक्षण वाया गेल्यातच जमा.

आजच्या शिक्षण पध्दतीत व्हर्टिकल ग्रोथ आहे पण त्यासाठी असणारी स्पर्धा भयानक आहे. तुम्हाला तुमची उपयुक्तता सिध्द करता आली आणि तुमचे कौशल्य सातत्याने अपडेट करण्याची क्षमता वाढवता आली तरच तुम्ही आजच्या इंडस्ट्रीत टिकू शकाल. याचे कारण तुम्ही जे काम करता तेच काम तुमच्या पेक्षा जास्त आत्मविश्वासाने आणि कौशल्याने करणारी नवीन पिढी उदयास येतच असते. सतत तुमच्या मागे मी ‘आऊट डेटेड’ तर होणार नाही ना याची भिती पोखरत असते.
म्हणून शिक्षणाचे क्षेत्र निवडतांना मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा एखादे युनिक क्षेत्र निवडा जेथे तुम्हाला मोजकेच स्पर्धक असतील आणि तुमच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर होईल.

ज्या विद्यार्थ्यांनी आय टी क्षेत्र निवडले होते त्यांना स्वतःला माहिती नव्हते की नक्की ते कोणत्या प्रकारचे काम ते करणार आहेत. त्यातील काही तरूणांना त्यांच्याच क्षेत्रात वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा अनालाटिक्स, टेक्निकल सपोर्ट या त्यांना अभिप्रेत असलेल्या क्षेत्रात नोकरी मिळते तर काही बँकींग क्षेत्रात काम मिळाले काहींना मेडिकल सर्विसेस आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात नोकरी मिळते.यातील बरेच काम हे एका जागेवर स्क्रीन समोर बसून करत रहावे लागते. कामात तोच तो पणा असतो. त्यामुळे या क्षेत्रातील तरूण, तोच तो पणा टाळण्यासाठी दर दोन तीन वर्षांनी आपला जॉब बदलत राहतात.

मेकॅनिकल इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांना व्हेइकल प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, हेवी मशिनरी प्रोडक्शन, फॅब्रिकेशन वर्क, डिझायनिंग, टेस्टिंग ,एअर क्राफ्ट, एनर्जी जनरेशन या क्षेत्रात स्कोप असतो. रिपेअर आणि मेंटेनन्स या क्षेत्रात त्यांचा वावर असतो. बरेचदा या कामासाठी वेगवेगळ्या लोकेशन्सवरती भेट द्यावी लागते, तेथील स्थिती समजून काम करावे लागते त्यामुळे ते फारच क्वचित प्रसंगी एकाच खुर्चीत बसलेले आढळतील. जेथे प्रोडक्शन वर्क चालू असते तेथे काही ना काही तांत्रिक बिघाड होतच असतात त्यामुळे त्यांना ते चँलेंजिंग वाटते. अर्थात माणसाच्या प्रकृती आणि आवडी प्रमाणे ज्याला त्याला ते काम योग्य वाटते.

भविष्यात गरजेनुसार नव नवीन यंत्र सामुग्री बनण्याचे कारखाने निघतील हे बदलते तंत्र आत्मसात करून घेण्यात ज्यांना रुची असेल ते जास्त जोमाने प्रगती करतील. जसे आज टनेल बोअरिंग मशीन किंवा समुद्रात रिग मशीन कार्यरत आहे. बांधकाम क्षेत्रात मोठं मोठ्या क्रेनचा वापर होत आहे. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी विविध साधने मोठ्या बंदरात उभारली जात आहेत. वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडून येत आहेत, याचे प्रचलन करण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भविष्यात केवळ एक डिग्री पुरेशी ठरणार नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव गाठीशी असेल तरच तुमचे भविष्य उज्वल ठरेल.

आज मेडिकल क्षेत्रातील डॉक्टरना सॉफ्टवेअरचा वापर माहिती असणे गरजेचे झाले आहे. वैद्यकीय शास्त्रात अनेक क्रिटिकल ऑपरेशन ही रोबोट कडून करून घेतली जातात, शस्त्रक्रियेतील गुंतागुंत आणि उपयातील अचूकता अतिशय महत्वाची असते. वेळेचे भान राखत आणि शरीराच्या असंख्य पॅरॅमिटरवर लक्ष केंद्रित करत या शस्त्रक्रिया होत असतात. त्यामुळे डॉक्टर व्यक्तीला प्रचंड तणावाखाली निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करून घेतांना अचूकता साधावी लागते.

भविष्यात मल्टी टास्क फोकस करण्याची क्षमता जो प्राप्त करेल तोच ‘लंबे रेस का घोडा ठरेल’. पाश्चिमात्य देशात मल्टीस्पेशालिटी इंजिनिअर्स तोच तो पणा टाळत काही वर्षांनी आपला जॉब बलतात त्यामुळे त्यांना कामाचा आनंद घेता येतो आणि ते जास्त उत्तम काम करतात. फक्त शिक्षण घेऊन तुम्ही मोठा पल्ला गाठू शकणार नाही, तर विविध क्षेत्रातील अनुभवच तुम्हाला नवीन उंची गाठण्यासाठी मदत करेल.

मित्रानो तुमच्या बाबांनी जशी नोकरी केली, जसे शांत जीवन ते जगले तो ट्रेंड कधीचाच संपला, ह्या युगात सतत नाविन्यपूर्ण गोष्ट करण्याची कुवत आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धडपड करण्याची उर्मी आणि क्षमता तुमच्याकडे असेल तरच तुमचे भविष्य तुम्ही घडवू शकाल आणि उद्याला आकार देऊ शकाल.

नवनवीन उद्योग त्यातील नवनवीन संकल्पना याची माहिती मिळवत, मी यातील कोणते आव्हान स्वीकारू शकतो याचा अंदाज घेऊन त्या दिशेने वेळीच झेप घेतली तर काही वर्षात तुम्ही तुमच्या नव्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकाल यात शंकाच नाही. फक्त विचार करून भागणार नाही . संकल्प आणि कृती याचा समन्वय साधत प्रगती करा आणि तुमचे नाव उद्योजक म्हणून इतिहासात अजरामर करा. यशस्वी भव:

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *