तनया

तनया

विनय अवघा अठरा वर्षांचा होता तेव्हाच त्याला आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव आली, यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर लवकरच आपल्याला स्वबळावर ताकदीने उभे राहून घराला आधार द्यावा लागेल हे त्याने ओळखले. जेव्हा इतर मुलं कॉलेजमध्ये जातांना ब्रँडेड शूज, चांगले घड्याळ, याची मागणी करतात तेव्हा तो साधी सँडल घालून ज्यू.कॉलेजला वाणिज्य शाखेत शिकायला जाई. आपल्या वडिलांना फारसा पगार नाही त्यामुळे आपण कोणतीही अवाजवी गोष्ट त्यांच्याकडे किंवा आईकडे मागायची नाही याची जाणीव त्याला लवकरच आली होती. ज्यांना चांगली समज असते ते चुकीच्या मार्गावर सहसा जात नाही. कदम कुटुंबाच्या नशिबाने विनय हा असाच एक चांगली समज असणारा मुलगा हे कुटुंबाचे भाग्यच होते.

विनय कदम याचे आई वडील गेले पंचवीस वर्षे भांडुप येथील डोंगरावर टेंभिपाडा येथे रहात होते. येथून चांगल्या जागेत रहायला जावे असे अनेकदा त्यांच्या मनात आले पण पैशाअभावी शक्य झाले नाही.

आजुबाजूच्या अशाच खोलीतून कुटुंब रहात असल्याने, सातवी आठवी इयत्तेत असेपर्यंत विनयला त्यात काही वावगे वाटत नव्हते. त्याचे वडील एका होलसेल लोखंड विक्री करणाऱ्या व्यवसायिकाकडे वाशीला कामाला होते, पगार तुटपुंजा होता त्यामुळे त्यांना दुसरे घर घेणे शक्यच नव्हते. पण आता बदलत्या काळानुसार चार माणसांच्या कुटुंबासाठी थोडे मोठे घर असणे गरजेचे होते.

खाजगी क्षेत्रात पगार वाढ फारशी नव्हती त्यामुळे त्यांना खर्च भागवणे कठीण होते. विनयला स्वतःला आपण मुंबई मधील एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. लोकलने प्रवास करावा असे वाटत असे पण हा खर्च घरला परवडणार नाही असे लक्षात आल्याने विनयने भांडुप येथेच नॅशनल कॉलेज येथेच सायकलने जाऊन वाणिज्य शाखत ग्रँज्युएशन केले. कॉलेजमध्ये कंम्पुटर ऑपरेटिंगचे जुजबी ज्ञान शिकवले होते पण Tally किंवा accounting असे काही तरी केल्याखेरीज जॉब मिळणे शक्य नव्हते. या क्लासची फी भरणे शक्य झाले नव्हते.

तो शेजारी येणाऱ्या वर्तमानपत्रात पाहिजेत सदरात रोजच नोकरीचा शोध घेत होता. त्याच्या वडीलांनी मुलगा ग्रँज्युएट झाल्याचे मालकांच्या कानावर घातले होते. कोठेतरी कामावर चिकटवून द्यावे यासाठी त्यांची धडपड चालू होती. सरकारी एम्प्लॉयमेंट कार्यालयात नाव नोंदवले होते कोणीतरी सल्ला दिला म्हणून विनयने पैसे भरून प्रायव्हेट एजन्सीकडे नाव नोंदवले होते.

नोकरीसाठी तो सतत प्रयत्नशील होता पण वर्षभर त्याला नशीब हुलकावणी देत होते. दोन चार ठिकाणी त्याने मुलाखत दिली पण कोणताच कंम्पुटर ऑपरेटिंग अनुभव नाही म्हणून नाकारले गेले. संधी मिळाल्याशीवाय अनुभव काय सांगणार? तो स्वतःवर प्रचंड नाराज होता. काय करावे? काही सुचतही नव्हते.त्याची अस्वस्थता आई पहात होती, मिळेल जाँब तू उगाच जीवाला घोर लावून घेऊ नको सांगत होती, पण वडीलांची स्थिती पाहून त्याला स्वतःच्या नाकर्तेपणाचा राग येत होता.

अखेर खाजगी एम्प्लॉयमेंट एजन्सी कडून त्याला एका खाजगी मेडिसिन सप्लाय फर्म कार्यालयात त्याला नोकरीचा कॉल आला, जुजबी इंटरव्ह्यू झाला. त्याने कॉम्प्युटर tally येत नसल्याचे सांगितले. मालकांनी स्वतः शिकवण्याची तयारी दर्शवली. काही अनुभव नसतांना जॉब मिळाला हेच मोठे होते. या मेडिसिन फर्म मध्ये वेगवेगळ्या औषध कंपन्यांची विविध आजारावरची औषधे स्टोअर करून ऑर्डर नुसार मेडिकल स्टोअरना ऑर्डर नुसार सप्लाय केली जात. पाहिले काही दिवस प्रवासाचा खूप त्रास झाला. नोकरी सोडून द्यावी असे वाटले पण अनुभव नसेल तर कुठेच नोकरी मिळणार नाही याची जाणीव होती म्हणूनच त्याने हिमतीने तग धरला.

सुरवातीस त्याला कामाची अजिबात माहिती नव्हती. स्वतंत्रपणे कंम्पुटर कधी हाताळला नव्हता, Word documents मध्ये तो प्रचंड चुका करायचा आणि घाबरून शांत बसून राहायचा . ems किंवा tally एन्ट्री कशा करायच्या? ते ही माहिती नव्हते. मालक त्याच्या बाजूला बसवून एंट्री शिकवत होते. मालक रागाने कधीतरी कसल ग्रँज्युएशन केलय? म्हणत इज्जत काढायचे,पण तो अपमान गिळून शांत राहिला.

हळूहळू त्याला एन्ट्री जमू लागली. महिन्याभरात त्यांनी बरेच शिकून घेतले. कामाचा व्याप प्रचंड होता. आठ दहा दिवस तो थोड्या थोड्या वेळाने मालकाला मदतीला बोलवायचा. काम जबाबदारीचे होते. ऑफिसमध्ये त्याला बँकेशी निगडीत कामापासून ते खरेदी,विक्री बिल तयार करणे, स्टाँक मेंटेन करणे, कंपनीत मेडिसिन ऑर्डर प्लेस करणे, दर तिमाही जीएसटी, आयकर कर भरणे, इथपासून ते कार्यालयाची छोटीमोठी सगळीच कामे करावी लागत. कोणतेही लेटर फायनल करण्यापूर्वी, ऑर्डर प्लेस करण्यापूर्वी, एखाद्या कंपनीला पेमेंट करण्याआधी तो मालकांना दाखवून confirmation घेत होता. त्यामुळे सुदैवाने काही चूक झाली तरी मालक शांतपणे समजावून देत होता. त्याचे नशीब म्हणून मालकाने काही अनुभव नसतानाही नोकरीवर ठेवले होते.

एक महिना झाल्यावर चार दिवसांनी त्याला पहिला पगार मिळाला.तो मालकांच्या पाया पडला. त्यांनी त्याचा हात घट्ट धरत शेक हॅन्ड केले आणि म्हणाले, तुझ्यावर मी भरपूर मेहनत घेतली आहे.आता इमानदारीत काम कर. चांगला शिकलास तर तुलाच फायदा होईल. त्याने मालकांचे आभार मानले. हा जॉब ज्यांनी दिला त्या एजन्सीला पहिल्या महिन्याचा अर्धा पगार एजंसीला द्यावा लागला.

आता तो स्वतंत्रपणे काम करू लागला होता. मान वर करून बघायला वेळ नव्हता, कधी कधी घरून आणलेला डबा खायला वेळ मिळत नव्हता. त्याने ते कुणाला सांगितले नाही. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढला. कधीतरी कंपनीचा CA त्याचे हिशोब तपासून पाही. काही सूचना असेल तर सांगून जाई. कम्प्युटरवर वेगवेगळी सॉफ्टवेअर असल्याने आणि सगळेच ड्राफ्ट असल्याने तो ते वापरत गेला तसे त्याचे काम सोप्पे होत गेले. मालक आधी त्याच्यावर चिडचिड करत होता तोच महिन्या दोन महिन्यांनी त्याची स्तुती करू लागला. त्याच्या कामावर मालक खुश होता. कधी त्याने रजा घेतली तर मालकाचे धाबे दणाणत असे.

किमान दोन माणसांचे काम तो एकटा करत होता, मालक त्याला अवघे साडेचार हजार सॅलरी देत होता. हा पहिलाच जॉब असल्याने कुठेही गेलं तरी ही परिस्थिती बदलणार नव्हती म्हणूनच तो शांत होता. मुख्य म्हणजे या जॉबने त्याला GST, tax ,challan, credit bill, Debit note, over draft अशा या क्षेत्रातील भरपूर अनुभव मिळाला. भविष्यात याचा फायदा त्याला नक्कीच होणार होता.

डिलिव्हरी करणारे सेल्समन त्यानी केलेल्या डिलिव्हरीच्या बिलाची रोख रक्कम आणून त्याच्या सुपूर्द करत, ती रक्कम दर दुसऱ्या दिवशी बँकेत डिपॉझिट करावी लागे, ती वेळेत बँकेत जमा करण्याची मोठी जबाबदारी होती. फर्मचे कार्यालय सहाला बंद झाले तरी हिशोब करून कॉम्प्युटर एन्ट्री करेपर्यंत रोजच सात वाजून जात. त्याच्या वडिलांची प्रकृती नाजूक होती आणि वडिलांना दोन दोन गाड्या बदलून कामावर येण्याजाण्याचा प्रवास गर्दीमुळे आता जमत नव्हता, आपण लवकरात लवकर कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे याची जाणीव त्याला वर्षभरातच आली.

त्याला वाशी येथून भांडुपला घरी पोचेपर्यंत रात्रीचे आठ साडेआठ वाजून जात. रोज प्रवासाला येऊन जाऊन तीन तास सहजच निघून जात, घरी आल्यावर काही करण्याची उर्जा रहात नसे. त्याचे मित्र मात्र आई वडिलांच्या जीवावर पुढील शिक्षण घेत होते. आपणही पुढे शिकले पाहिजे असे त्याला सारखे वाटे. एक दिवस त्याने त्याचे म्हणणे आईकडे काढले. ती म्हणाली, तुला शिकवायला आमच्याकडे पैसे नाहीत, पण काही वर्षे घरात पैसे देऊ नको, तुझ शिक्षण पूर्ण कर, आपण कसबस भागवू. विनय आता एवढाही लहान नव्हता की घरातील व्यवहार त्याला कळू नये.

रविवारी त्याची भेट इतर मित्रांशी होत असे. त्यापैकी काही कंप्यूटर सॉफ्टवेअर शिकत होते तर काही पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते. सगळीकडे MBA चे फॅड होते. संध्याकाळच्या सत्रात कुठे तरी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा तर अडचणींची मालीका होतीच. सेकंड हॅन्ड लॅपटॉप घ्यावा लागणार होता. घरी पोचण्यासाठी खूप उशीर होणार होता. नियमित अभ्यासाला वेळ द्यावा लागणार होता. रात्री जागायचे म्हटले तर घर डिस्टर्ब होणार होते. पण त्याचा निश्चय कायम होता. एक दिवस त्यानी वडिलांना विचारले, “नाना आपण नवी मुंबईत रहायला जायचं का? मला पूढे शिकायचे आहे पण इथून प्रवासात तीन चार तास जातात त्यामुळे ते शक्यच होणार नाही.”

नानांनी त्याला आपली परिस्थिती सांगितली, ते म्हणाले, “नवी मुंबईत चाळीत घर घ्यायचे दहा लाख रुपये लागतील, आपल्या या खोलीचे पाच लाखही कोणी देणार नाही, मालक त्यातील २०% घेईल, कसे करायचे? माझ्या मालकांकडे आधिच तुमच्या शिक्षणासाठी पैशांची उचल केली आहे. तेच फेडले नाहीत, पुन्हा मागणे बरे दिसतही नाही.”

विनय त्यांना म्हणाला,” नाना, तुम्ही फक्त होकार द्या, पुढचे कसे काय करायचे मी पाहतो.” नाना हसून म्हणाले, “ठिक आहे, तुझ्या आईच्या कानावर घाल,पहा ती काय म्हणते? पण पुढच्या वर्षी अजय काँलेजला जाईल, नवी मुंबईतील काँलेजची फी महाग पडते, त्याच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण व्हायला नको.”

विनयने आपल्या मालकांना, MBA शिक्षणासाठी कर्ज द्याल का? विचारले पण त्यांनी सुरवातीला नन्नाचा पाढाच वाचला. विनयने नम्रपणे सांगितले, मी तुमच्याकडे गेले दोन अडीच वर्षे काम काम करतो आहे, विनाकारण रजाही कधी घेत नाही. तुम्ही मला मदत करत नसाल तर मला दुसरीकडे जॉब पहावा लागेल. शेवटी मालकांनी दोन दिवसांनी पगारातून पैसे वसूल करून घेण्याच्या बोलीवर कर्ज दिले. थोडी जमा पूंजी आणि थोडे कर्ज अशी सांगड मिळताच, भांडुप येथील पागडीची खोली विकून जुईनगर येथे एका चाळीत त्यानी खोली मिळवली. ही चाळसुध्दा स्टेशन पासून पंधरा मिनीटांवर होती.

त्याला ठाऊक होते की हे पैसे फिटेपर्यंत आपण येथून बाहेर पडू शकणार नाही पण पर्याय नव्हता. येथेही स्वच्छतागृह बाहेर होते पण इलाज नव्हता. त्याने लवकरच खारघर येथे फायनान्स मॅनेजमेंट साठी ITM येथे प्रवेश घेतला. अजयचे ज्यू. कॉलेज भांडुप येथेच होते. त्याची बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय कॉलेज बदलणे शक्य नव्हते. अजयची तात्पुरती सोय त्याच्या आत्याकडे करून ते जुईनगर येथे आले. आता त्याच्या वडीलांचा प्रवासही सोप्पा झाला

जुईनगरला आजुबाजूच्या लोकांशी लवकरच त्यांची मैत्री झाली. अजय दर शनिवारी घरी येत असे आणि सोमवारी पुन्हा कॉलेजला आणि तिथून आत्याकडे राहायला जाई. विनय रोज रात्री जेवण आटोपून बारा वाजेपर्यंत आपल्या लॅपटॉप वरती नोट्स काढत राही. भांडूप येथे शिक्षक मराठी किंवा हिंदीतून स्पष्टीकरण देत. येथे स्पष्टीकरण सुध्दा इंग्रजीतच असे, पहिल्या वर्षी त्याला फारसे चांगली प्रगती झाली नाही. त्यांनी आपले सिनियर्स गाठून त्यांच्या नोट्स मिळवल्या, इतर कॉलेजेस चे पेपर रेफर करून अभ्यास करू लागला. त्यांनी स्वतःला अभ्यासात बुडवून घेतले. कधीतरी मालक अभ्यासाची चौकशी करून शुभेच्छा देत.

समाधानाची गोष्ट, अजय बारावी फर्स्ट क्लास मिळवून पास झाला तसे तो ही जुईनगर येथे राहयला आला. विनयच्या वडिलांनी अजयच्या खर्चासाठी बहिणीला पैसे द्यावे लागत त्यात बचतही झाली.

दर दसऱ्याला मालकांचे कुटुंब चोपडी पूजन करण्यासाठी वाशीला येत असत. मालकांचा मुलगा युएसमध्ये शिकत होता तर मुलगी ग्रज्युएशन करत होती असे तो ऐकून होता. मालकांची पत्नी त्याच्याशी उत्तम मराठी बोले याचे त्याला नवल वाटे. मालकीण दसऱ्याला त्याला अडीच हजार बोनस आणि स्वीटबॉक्स देत असे. त्याला याचे आश्चर्य वाटे. एका नोकराकडून त्याला समजले की मालकांची पत्नी महाराष्ट्रीयन आहे आणि त्यांचे लव्ह मॅरेज आहे.

पाहता पाहता विनयची फायनान्स मॅनेजमेंटची दोन वर्षे निघून गेली. तिसऱ्या वर्षी त्याने मालकांना शनिवारी संध्याकाळी दोन तासांची सूट मागितली. फायनान्ससाठी शनिवार, रविवारचा खाजगी क्लास लावला.त्यामुळे त्याला पेपरचे स्वरूप कळाले, पेपर सोडवतांना कोणती काळजी घ्यायची ते समजले. इंटरव्ह्यू कसा द्यायचा? याचे ज्ञान मिळाले. आपल्याला ज्या टॉपिक्स वर खात्रीशीर सांगता येईल त्या दिशेने इंटरव्ह्यू कसा न्यायचा त्याचे तंत्र त्याने आत्मसात केले. मार्केटिंग कंपनीचे बरेचसे व्यवहार स्वतः पहात असल्याने त्या अनुभवायचा त्याला फायदाच झाला.

परीक्षेसाठी सुट्टी घेतली की मालक कटकट करत असे. पण त्यांनी मनात ठरवले होते की मालक कितीही खालच्या पातळीवर येऊन बोलला तरी उलट उत्तर द्यायचे नाही, मालकानेच खोलीसाठी बिनव्याजी कर्ज दिले होते. ते उपकारच होते. मालकांनी त्याला वेळोवेळी कामावरून कमी करण्याची तंबी दिली होती. तो MBA चांगल्या ग्रेडने पास झाला. त्याने पेढे आणून ऑफिसमध्ये सेल्समन आणि पॅकिंग असिस्टंट यांना वाटले . मालकाला MBA सर्टिफिकेट दाखवले त्यामुळेच मालकावर अप्रत्यक्ष दबाव वाढला. मालकाने त्याला एक हजार बक्षीस दिले. दुसऱ्या महिन्यात त्याने न मागता त्याचे वेतन वाढवले. मालकाला हे ठाऊक होते की MBA झालेला विनय दीर्घकाळ आपल्या सोबत काम करणार नाही.

विनयने इंटरव्ह्यूसाठी दांडी मारली की मालक दुसऱ्या दिवशी जळफळाट करून त्याला जास्त वेळ थांबवून ठेवी. त्याचे ठिकठिकाणी इंटरव्ह्यू देणे सुरू होते. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू चांगला होऊनही तो सिलेक्ट होत नव्हता. साहजिकच त्याचा त्रागा वाढत होता. आई त्याला आधार देत होती. समजूत घालत होती. चांगला जॉब मिळाल्याशिवाय चांगल्या जागेचा विचार करणे शक्य नव्हते. एक दिवस आईने तो एकटा असताना त्याला मालकाच्या कर्जाविषयी विचारले. अजूनही निम्मेच कर्ज फिटले होते. त्यामुळे ही नोकरी सोडणे शक्यच नव्हते. त्याची प्रतीक्षा संपत नव्हती. दोन वर्षांनी त्याचे नशीब उजळले आणि एका ग्लोबल फर्म मध्ये त्याला असिस्टंट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्याने ते मालकांच्या कानावर घातले. मालक काही बोलले नाही मात्र ते नाराज असल्याचे दिसले.

नव्याने रूजू होत असलेली ‘ प्लॅटिनम इकॉनॉमिक्स’ ही एक युके बेस कंपनी होती आणि ती शिपिंग क्षेत्रात कार्यरत होती. त्या कंपनीत पहिला online जनरल इंटरव्ह्यू झाला, पंधरा दिवस होऊन गेले तरी त्यांचा फोन नव्हता. त्यामुळे त्याने आशा सोडून दिली होती. आजपर्यंत त्याने अनेकदा हाच अनुभव घेतला होता. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने ज्या प्रकारे शिक्षण घेतलं त्याबद्दल त्याचे कौतूक होत होते पण शेवटच्या पातळीवर तो ड्रॉप होत होता.

तो इंटरव्ह्यू देतांना सहजच गुजराती, हिंदी,इंग्रजी भाषेत बोलत असे,तरीही काही तरी चुकत होते हे नक्कीच, हेच त्याला कळत नव्हते. बराच विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की तो गरज नसतांना अधिकची माहिती आधीच सांगून मोकळं होत होता, त्यावरून तो अति उत्साही किंवा अधीर भासत होता.

त्यांनी इंटरव्ह्यू पॅनल विचारेल त्याचे नेमके उत्तर देण्याचा सराव केला. इंटरव्ह्यू देताना समोरच्या पॅनलमधील अधिकारी वर्गाकडे पाहून स्माईल देत शांत आणि प्रसन्न राहण्यास शिकला. त्यांनी सांगितल्या शिवाय कोणतीही कागदपत्रे दाखवण्याची मुळीच घाई करायची नाही हे तंत्र त्याला मित्राने सांगितले. आपण अधीर आहोत असे दिसणे योग्य नाही हे त्याला कळले. ह्या ट्रिक्स त्याला उपयोगी पडल्या. एक दिवस त्याच्या मेल बॉक्समध्ये त्याला इंटरव्ह्यू कॉल आल्याचे दिसले. या वेळेस इंटरव्ह्यू चांगला झाला.

महिन्याभरात त्याला जॉइनिंग लेटर मिळाले. नशीब उजळले, ग्लोबल फर्म मध्ये त्याला असिस्टंट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून नेमणूक मिळाली,अट एकच होती, त्याला आठ दिवसात जॉईंट होणे गरजेचे होते. कंपनीचा एक्सपोर्ट, इंपोर्ट व्यवसाय होता आणि त्यासाठी भांडवल उभारणी, कंपनी बाजारातून करत होती. ही आनंदाची बातमी विनयने सांगताच घरी सर्वांना आनंद झाला. विनयच्या कष्टाचे चीज झाले.

अजयचे शिक्षण सुरू होते त्याला इंजिनिअरिंग कॉलेजला मेरिटवर नंबर लागला होता, नानांचे उत्पन्न कमी असल्याने आर्थिक दुर्बल म्हणून त्याला फीमध्ये सवलत मिळाली. अजय तसा मेहनती होता. विनय त्याला आठवणीने दर महिन्याला स्वतः पॉकेटमनी देत होता. जे आपल्याला भोगावे लागले ते भावाला भोगावे लागू नये याची पुरेपूर काळजी विनय घेत होता.अजय त्याची जाणीव ठेवून चिकाटीने अभ्यास करत होता.

विनयने, कंपनीकच्या मालकांना भेटून आपल्याला नवीन जॉब मिळाला असून रिसिग्नेशन देत असल्याचे सांगितले. मालक म्हणाले, “तू अचानक सोडून गेलास तर आमचे नुकसान होईल, मला दुसरा माणूस बघून दे, मी त्याला अँपॉइंटमेंट देतो, तो आला की त्याला ट्रेंड कर आणि जा.” विनयने त्यांना विनंती केली, “मालक त्यांनी आठ दिवसांत जॉईन व्हायला सांगितले आहे, पुन्हा अशी संधी लवकर मिळेल याची काय खात्री?”

मालक त्याला रिलिव्ह करायला तयार होत नव्हते. शेवटी विनयने मालकाचे पाय धरले व विनंती केली , “मालक मी एवढे वर्ष तुमच्याकडे नोकरी केली. यापुढेही मी संध्याकाळी येऊन तुम्हाला शक्य ती मदत करीन मला त्याबद्दल काही देऊ नका पण प्लीज मला मोकळ करा, मी तुमचे उपकार विसरणार नाही.” त्याचे डबडबले डोळे पाहून मालकाला दया आली. त्याने विनयला सांगितले, “तुझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन मी तुला सोडतो पण मला फसवले तर माझ्या सारखा वाईट माणूस नाही.”

विनयला मालकाने बरोबर आठ दिवसांनी मोकळे केले. सोडतांना एक प्रॉमिस नोट लिहून घेतली, ज्यामध्ये नवीन माणसाला ट्रेंन करण्यासाठी रोज संध्याकाळी दोन तास निशुल्क काम तो करेल असे विनयने मान्य केले होते. विनय नवीन ऑफिसमध्ये जॉईन झाला तरीही त्याच्या डोकीवर सतत जुन्या मालकाचे टेन्शन असे. रोज संध्याकाळी त्याला जुन्या मालकाकडे जाऊन नवीन माणसाला शिकवावे लागे.

नवीन कंपनीत त्याला फाईव्ह डे विक, वीस हजार सॅलरी, पीएफ, मेडिकल अलाऊन्स, ट्रॅव्हलिंग अलाऊन्स अशा अनेक सोयी होत्या. या नवीन ठिकाणी लागल्या पासून त्याला घरी पोचायला रोजच उशीर होऊ लागला. आपल्याला जुन्या मालकांकडे रोज काम करावे लागते ही गोष्ट तो घरी बोलला नव्हता.

आईला शंका येऊ लागली, की हा कोणा मुलीच्या प्रेमात तर पडला नाही ना? तिने एक दिवस या बाबत त्याला विचारले पण त्यांनी नाना आणि आईला उगाच त्रास नको म्हणून खरी हकीकत सांगितली नाही. त्याऐवजी मला खूप शिकायचे आहे, आता पासून संसारात पडून काय करू? विचारून निरूत्तर केले.

विनयचे लग्नाचे वय झाले आहे, याला लग्नाच्या बेडीत अडकवले की तो वेळेवर घरी येईल असे त्यांना वाटले. दोघेही त्याच्या मागे लग्न करण्याची घाई करू लागले. त्याने आपल्याला पुढे शिकायचे आहे सांगत लग्नाला नकार दिला. या दरम्यान अजयने कॉम्प्युटर डिग्री केली आणि तो कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला. आता कदम कुटुंबाची परिस्थिती पालटली. जुईनगरला राहायला आल्यापासून नानांचा प्रवासही कमी झाला होता .

कधीतरी नवीन कंपनीतही ) उशिरापर्यंत थांबावे लागे आणि जुन्या मालकाला तसे तातडीने कळवावे लागे. पाहता पाहता दीड दोन वर्षे सरली तरी जुना मालक त्याला मोकळे करण्याविषयी स्वतः काही बोलेना, शेवटी आणखी दोन महिन्यांनी विनयने मालकाला सांगायचे ठरवले. त्यासाठी त्याने नव्याने अपॉइंट केलेल्या प्रकाश चव्हाणला विश्वासात घेऊन म्हणाला, “प्रकाश जोवर तू फर्मच्या कामाची पूर्ण जबाबदारी घेणार नाहीस, मालक तुला वेतनवाढ देणार नाही. मलाही मोकळं सोडणार नाही. आता तुझे तुच ठरव. तुला काही अडले तर मी तुला नक्की मदत करीन.”

प्रकाश या गोष्टीला तयार झाला, त्याने मालकाला सांगितले, तो आता कदम यांच्या मदतीशिवाय काम करू शकेल. विनयने पुढाकार घेऊन मालकाला आश्वस्त केले की आता प्रकाश स्वतंत्रपणे काम पाहू शकेल. अखेर आणखी पंधरा दिवसांनी मालकांनी त्याला मोकळे केले. लक्षात असूनही विनयने मालकांकडून प्रामीसरी नोट मागितली नाही.

महिन्याभराने जुन्या मालकाने विनयला पुन्हा फोन केला, त्याला कळेना आता आणखी काय गडबड झाली? मनात थोडी धागधूग होतीच. तो भितभितच मालकांना जाऊन भेटला. मालक त्याच्याकडे पाहून हसले. त्यांनी त्याची चौकशी केली, नवीन कंपनीतील कामाचे स्वरूप समजून घेतले. त्याच्यासाठी कॉफी मागवली, त्याच्या हाती एक पाकीट देत ते म्हणाले , “विनय तुला पुन्हा बोलवल्या बद्दल आश्चर्य वाटल असेल, तू आमच्या कंपनीला गेले दोन वर्ष जी प्रामाणिकपणे मदत केली त्या बद्दल ही भेट. मला खात्री आहे की भविष्यात तू अजून तरक्की करशील.”

विनयने मालकांच्या पायाला हात लावत नमस्कार केला. विनयला आश्चर्य वाटले की अचानक मालकाला आपल्या विषयी दया कशी आली? संध्याकाळी त्यानी ते पाकीट आईच्या हाती दिले . तिने ते पाकीट उघडून पाहिले त्यात चक्क पन्नास हजार रूपयांच्या नोटा आणि विनयने लिहून दिलेले प्रामिसरी पत्र होते.

आपला गुजराती मालक ऐवढे औदार्य दाखवेल याची कल्पना विनयने कधीही केली नव्हती त्यामुळे त्या सुखद धक्यातून विनयला उमजले चांगल्या कामाचे फळ उशिराने का होईना पण नक्कीच मिळते. विनयने दुसऱ्या दिवशी आपल्या जुन्या मालकांना फोन करून आभार मानले तेव्हा ते म्हणाले तुझी मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून मी तुझ्यावर खुश आहे. तुला कधी मदत लागली तर तू माझ्याकडे ये तुला नाराज करणार नाही. अर्थात मालकांना माहिती होते की एवढा मोठा जॉब सोडून विनय परत येणार नाही.

प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कंपनी ही शिपिंग कंपनीची उपकंपनी होती आणि त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत होता, कंपनी चांगला बोनस देत होती. विनय या कंपनीत आनंदी होता पण अजूनही बराच टप्पा पार करायचा होता. लवकरच या चाळीतून चांगल्या जागेत शिफ्ट व्हायचे होते. त्यासाठी तो पैसे साठवत होता. असेच चार, सहा महिने निघून गेले पुन्हा जुन्या मालकांनी त्याला फोन केला. तो त्यांना ऑफिस टाईम संपल्यानंतर भेटायला आला तेव्हा मालक तर नव्हते पण त्यांच्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी बसली होती. त्याने मालक कुठे गेले चौकशी केली तर ती म्हणाली, “डॅडी थोड्या वेळात येतील तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा मागावते.”

तो संकोच बाळगून उभाच राहिला, तस ती म्हणाली, “डॅडी तुमचे फार कौतुक करत असतात, पण तुम्ही तर शाय आहात.” त्याला क्षणभर काय बोलावे सुचेना,पण तो चाचरत म्हणाला, “नाही,तसं काही नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा पाहतो म्हणून – – -” ती हसून म्हणाली, “मी पण तुम्हाला पहिल्यांदा पाहते आहे, तुम्ही आमच्याकडे पाच सहा वर्षे काम केलं आहे, आणि डॅडी तुमच्या बद्दल घरी बोलायचे. तुम्हाला भेटून बर वाटले. हा चहा घ्या. “

विनय बराच सावरला, “तुमच्या डॅडींच माझ्याकडे काय काम होतं, तुम्हाला माहिती आहे का? ” ती हसली, “sorry ,but डॅडी नी मला, तुझ्याशी भेटून बोलायला सांगितले होते. तू मला ओळखत नसला तरी मी तुला चांगलच ओळखते. डॅडी तुझी नेहमी प्रशंसा करत असतात.

त्याला ती काय म्हणते कळत नव्हते,पण तिचे शब्द ऐकून तो हरखून गेला. अचानक दोघांची नजरानजर झाली तशी ती लाजली. त्याला कळेना, ती थट्टा तर करत नाही ना! तस ती म्हणाली, Vinay I like you so much, I like your politeness, your hard work, honestly.”

तिच्या शब्दाने विनय गोंधळून गेला होता, खरे खोटे त्याला काही कळत नव्हते पण ती दिसायला खूप सुंदर होती, मालकीण बाई दिसायच्या तशीच. त्याला आवडली होती. पण एवढ्या श्रीमंताची मुलगी आपल्याला कशाला मोजेल हे त्याचे प्रामाणिक मत होते. विनय मधला मेहनती हिरा मालकाने पाहिला होता.

थोड्या वेळाने मालक आणि त्यांची पत्नी गाडीने आली. मालक येताच तो गोंधळून उठला, तस मालक म्हणाले,”अरे विनय बस, माझ्या मुलीशी, तनयाशी ओळख झाली ना. तिने ग्रँज्युएशन नुकतंच संपवलं आणि तुझ्या गायडान्सची तिला गरज आहे. ती पण एमबीए करू इच्छिते. तू मेहनत करून MBA केलंय तिला मदत करशील ना?”

विनय मालकांकडे पहात म्हणाला, “साहेब तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना? तिला कोणत्यातरी चांगल्या क्लासला घाला. आमच्या कंपनीचा व्यवसाय वाढतो आहे, मला ऑफिसमधून निघायला असाच उशिर होतो मी कधी त्यांना गाईड करणार? त्यांना गाईड करण्या एवढा माझ्याकडे वेळही नाही आणि माझ्या गायडान्सपेक्षा कोणताही क्लास त्यांना जास्त उपयोगी पडेल.”

मग मात्र मालक थोडे रागावले, म्हणाले,” विनय मी वेळोवेळी तुला मदत केली होती हे तू विसरलास का? तुझ्या ग्रँज्युएशनकाळात मी तुला नेहमी पाठिंबा दिला आणि आता मी तुझ्याकडे मदत मागतो आहे तर…”

“सर , प्लिज रागावू नका, फार तर मी दर sunday ला येऊन त्यांना मदत करिन डे टाईम मध्ये मला खरच वेळ नसतो, तुमचे माझ्यावर उपकार आहेत पण प्लिज मला समजून घ्या.” तस मालक त्याच्या जवळ जात पाठ थोपटत म्हणाले,” विनय तू एक मेहनती मुलगा आहेस,तू अतिशय प्रामाणिक आहेस, बिझनेस तुला चांगला कळतो म्हणून आम्ही तुला आमचा भावी जावई म्हणून पाहत आहोत. तनयाची आई तुझ्यावर एकदम राजी आहे. ती तुला जावई करून घ्यायच म्हणते.”

जर आमची तनया तुला आवडली असेल तर आम्ही तुझ्या वडिलांना येऊन भेटू. या पूढे तुम्ही दोघे मिळून हा व्यवसाय सांभाळावा असे मला वाटते.” विनय नम्रपणे म्हणाला, “साहेब, तुम्ही कुठे आणि मी कुठे? तुमच्या कुटुंबाशी आमची बरोबरी होऊच शकत नाही. आम्ही एका गरीब कुटुंबातील आहोत आणि तुमच्या मुलीला सूखात ठेवणे माझ्या अवाक्याबखहेरील गोष्ट आहे. माझ्यापेक्षा जास्त योग्य स्थळ यांना सहजच मिळेल.तेव्हा उगाचच मला शब्दात अडकवू नका. तुम्ही स्वतः मला योग्य समजले हा तुमचा मोठेपणा.पण प्लीज मला या बंधनात अडकून नका.”

पण तनयाची आई मोठी हुशार होती, तिने त्याला आपली स्वतःची गोष्ट सांगितली, तुझे मालकही आधी एका फर्ममध्ये कामालाच होते, त्यांनी जिद्दीने ही एजन्सी सुरू केली. मी त्यांच्या कामात आधी मदत करायची आज तिचा टर्न ओव्हर किती आहे ते तुला ठाऊक आहे. तनयाचा भाऊ मोहित युएसमध्ये सेटल होतोय, तिथे त्याने स्वतःचा बिझनेस सेटअप केला आहे. त्यामुळे विचार करूनच आम्ही तुझी निवड केली आहे. तेव्हा तू आमचा शब्द मोडणार नाहीस अशी आशा आहे. हवा तर तुला वाटेल तोपर्यंत तू जॉब करून इथे लक्ष दे. तनयाला शिकव ती बिझनेस पाहिलं.

विनय एका गोड संकटात सापडला, तनया त्याला आवडली होतीच, पण एवढ्या श्रीमंत कुटुंबात वाढलेली लेक आपल्या गरीबाच्या घरात कशी रुळेल हा प्रश्न विनयला पडला होता. मालकांनी मात्र त्यांच्या मुलीसाठी विनयच्या कुटूंबासाठी मोठा फ्लॅट घेऊन दिला. थाटामाटात लग्न करून दिले आणि विनयला बिझनेस पार्टनर करून घेतले. प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे पूर्ण माप दैवाने त्याला दिले.

मेहनत आणि जिद्द यामुळे विनयने मालकांचे मनच नाही तर मुलगीही जिंकून घेतली. अर्थात त्यासाठी कष्ट उपसलेल्या आईला मात्र आपल्या मुलावरचा हक्क सोडावा लागला. एवढ्या मोठ्या मालकाचा जावई छोट्या घरात राहणार तरी कसा? त्याला घरजावई व्हावे लागले. मुलाच्या सुखासाठी आईने जड अंतकरणाने त्याला मान्यता दिली. सुरवातीस काही दिवस विनयचे कुटुंब विनायच्या नव्या फ्लॅटमध्ये राहिले. पण नानांचे मन तिथे रमे ना. त्यांनी महिन्या दोन महिन्यात स्वतः च्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

विनयला खूप वाईट वाटले. त्याने समजवूनही नाना या उच्चभ्रू वस्तीत रहायला तयार नव्हते. अजयही आईला म्हणाला, नानांचे मन इथे रमत नाही तर आपण जुईनगरला जाऊ. तनयाने आपल्या सासऱ्यांना निक्षून सांगितले, नाना तुम्ही तुमच्या घरी जाऊया म्हणत असाल तर आम्हीही तिथे रहायला येतो, विनयला आपल्या आई वडीलांचे प्रेम आणि माया मिळालीच पाहिजे. माझ्या आधी विनयवर तुमचा हक्क आहे. मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही.

माझ्या आईने माझ्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. मी जशी माझ्या आईची मुलगी आहे तशी तुमचीही मुलगीच आहे. तनयाचा अर्थच मुळी मुलगी असा आहे , नाना असे समजा की मी ही तुमची मुलगीच आहे. तेव्हा मुलीचा एवढाही हट्ट तुम्ही पूर्ण करणार नाही का? तेव्हा तुम्ही कुठेही जाणार नाही, मी जाऊ देणार नाही. अखेर तनयासाठी त्यांना आपला निर्णय बदलणे भाग पडले. विनयला आपल्या मालकांच्या उपकाराची फेड करता करता तनया सारखी सहचरणी मिळाली आणि कुटुंबाला एक सुखी परिवार.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *