करंटा
देत राहिला भगवंत मी त्याला पूरे कधी म्हटलेच नाही
नव्हते मज जवळ काही कमी परंतु घेण्याचीच नित्य घाई
ओरबाडून सरला न हव्यास, कपाळावर हरिने मारला शिक्का ‘कसाई’
हातावर दुर्गुण लिहिता लिहिता तो गेला थकून, सुकून गेली शाई
होता बरसत मृग, आर्द्रा, पुष्य, मघा महत्त्व मज त्यांचे कळले नाही
केला न पुढचा विचार,जल, ‘जीवन आधार’ उधळले मी स्वार्थापायी
देत होता निसर्ग फुले, फळे, अन्न, न किंचितही राखून स्वतःसाठी काही
उचलून जडावला पदर माझा, ठेवले न कुणासाठी मागे जराही
वाहत होता निर्मळ वात, करंटे माझे हात, निसर्गाची केली वाताहत
उघड्यावर टाकून कचरा केला उकिरडा, कसा घ्यावा श्वास आज संभ्रमात।
दारी होते कितीतरी वृक्ष, वेली, धुंद गंध प्रभाती तसेच सांजवेळी
अंगणी बरसत होते चांदणे, घालून मंडप अंगणी अडवले, हत्या मीच केली
देत होते निर्झर अमृत जल, घालून बांध त्यास म्हटले कुंभ, दिली झिलई
बनवल्या सडका डांबरी, थर काँक्रीटाचे चढवले, कसे झिरपेल मृदेत जल
कळे ना हिरवी बहरती शेते कुठे हरवली? निसर्गाची प्रभावळ नष्ट झाली
बंगले उभारले स्थानिकांनी, चढे मुखावरी तेज, चारचाकी चमके महाली
करून बोडके डोंगर, उभारली श्रीमंत वस्ती, लावले दिवे, रात्री लखलखाट
उभारले हमरस्ते, नेली छाताडावरून मेट्रो, नायनाट करण्याचा घातला घाट
जिथे तिथे पाहावे, माणसांची वसाहत, परी न कोणाचा, कोणास पायपोस
म्हणे धरा, “अरे नराधमा! असून माणूस, वृत्तीने दानव, हा तुला कसला भिकारडा सोस?”
रुसली मजवरी वसुंधरा, म्हणे करंटा तू केलास नायनाट, कसा सोसु आघात?
क्षुब्ध पक्षी रुसले, बांधावे घरटे कुठे? कसे? झाला मांगल्याचा नायनाट
आपल्या सुखाकारणे भविष्यात पिढीस भोगावे लागतील मोठे भोग
ना जमीन, ना जंगल, ना वनराई, कसा पडावा पाऊस? माणसा येऊ दे जाग