न कळलेला नाना

न कळलेला नाना

मृत्यूच्या वास्तवतेवर प्रेम करत तू घेतलास जगाचा शांतपणे निरोप
मृत्यू अटळ आहे, त्याचा तिरस्कार नको वाक्याने उडवली माझी झोप

कालच तर तू म्हणालास, मृत्यूला मी भीत नाही, तो नव्हे दैवी प्रकोप
तो आसपास, माझ्यासोबत,आहे मला कल्पना, हाच तुझा सत्याचा शोध

तुझा स्पष्टवक्तेपणा, तुझा साधा पेहराव यावरच सर्व चाहत्यांचा लोभ
तुझी ओळख पटवणे भल्या भल्यांना जमले नाही, नव्हताच तसा योग

तुझ्या अटीवर तू निवडले चित्रपट, तुझ्या विक्षिप्त स्वभावात होता क्रोध
तू नव्हतास माणूसघाणा, तुझ्या शेतावरील प्राणी वास्तव्यातून, घ्यावा बोध

तुझ्या आयुष्यात वाद विवादही रंगले, तू मूकपणे, सांगायचे तेच टाळले
‘मल्हार’ जीवनात बरसलाच नाही पण ते शल्य ही, न बोलता तूच झेलले

खांदे कितीही मजबूत असले तरी मनाची खात्री देता येत नाही हे दिसले
अलीकडे तू निराशेच्या गर्तेत एकटाच भोगत होतास हे मनास नाही पटले

लोकांच्या दुःखाने कळवळणारा तू, तुझ्या दुःखाला करून दिली नाही वाट
नटसम्राट नाटकातील तुझी भूमिका त्यातील दुःखाची होती वेगळीच जात

तिलाही उशीराने समजले तीने तुझी निवड करुन पदरी बांधून घेतली आग
तुझ्या प्रत्येक यशाच्या टप्प्यावर तुमच्या विसंवादी सुरांना येत होती जाग

गेले ५० वर्षांची तुझी कारकीर्द आठवून हळहळला परिवार, तुझा गणगोत
निलकांती वहिंनी सोबतचा संसार हे ही एक नाट्य, की फसलेला प्रयोग

देवधर्म न मानणारा तू, संसारातील कटू स्वप्नांवर न करू शकलास मात
कमीपणा घेत जाऊन दारी, अद्वैत साधत घट्ट धरायचा होतास तिचा हात

नाना म्हणजे बेबंद वादळ, कर्तृत्वाला बहु आयाम, तिचकाच प्रचंड व्याप
या वादळासोबत प्रवास करतांना निलकांती यांना लागली असावी धाप

तुझी सणक सांभाळणं एक दिव्य होतं, दुर्दैवाने त्यातच त्यांची कोमजली बाग
आत्मप्रोढी तुला नव्हती पण तत्त्व आणि अभिमानाचा फुत्कारत होता नाग

‘विश्वनाथ, नावातच होता तर तिच्यासाठी का होऊ शकला नाहीस नाथ?
तुझ्या शवावर फुले वाहत असतांना ती आतून उध्वस्त, तुझी वेगळीच बात

पाटेकर कुटुंबाचा तू शेवटचा वारस तुच सांगायचास नियतीचा अदृश्य योग
फार भोगलस स्वतः ला समृद्ध करतांना, तुझ्या वाट्याला केवळ होते भोग

ताकदीने केल्यास कित्येक भूमिका, पण आयुष्याचा विणता आला न गोफ
खुप काही अजून करायचं होतं म्हणालास,पण आता हवी तुला शांत झोप

हे जग सोडून गेलास तरी भूमिका करून देत राहतील नित्य तुझी आठवण
तुझ्या प्रत्येक भूमिकेचा दरारा कायम, तुझे ठेवणीतील संवाद म्हणजे घण

‘नामची’ स्थापना, निस्वार्थी सेवा म्हणजे स्वतःचा दाह कमी करणारे रक्तचंदन
तू जसा, कसा होतास, कळणे अवघडच, तरी माणूस म्हणून नाना तुला वंदन

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *