आमचे गडकिल्ले आणि…
आजपासून दिवाळीला प्रारंभ झालायं, आज वसुबारस, पण आज आणि उद्या माझा पेपर आहे. परीक्षा संपण्याची मी वाट पाहतोय. तसं तर हल्ली दर महिन्यात कसली न कसली परीक्षा सुरूच असते. आम्ही सर्व मुलं आणि विशेषतः आमचे पालक अलर्ट मोडवर असतो. सध्या आम्ही मात्र किल्ला बांधायचा या अलर्ट मोडवर आहोत. आमचे प्लॅनिंग आठ दिवसांपूर्वी झालेले आहे, गुगल करून आम्ही किल्ल्याची शोधाशोध केली. रायगड आपल्या शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून त्याची निवड केली होती पण त्यावर जगदिश्वर मंदिर, टकमक टोक, होळीचा माळ, राणीवसा, सात महाल, हत्ती तलाव, बाजारपेठ हे सगळ दाखवायचे म्हणजे किचकट कामं, पंधरा दिवस पुरणार नाहीत. शिवाय इतकी प्रॉपर्टी आणायची कुठून? मुख्य प्रश्न मातीचा, शहरात सिमेंट मिळेल पण माती!
आम्ही मुले किल्ले का बांधतो? आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव महाराष्ट्र आहे इतर राज्याना राष्ट्र शब्द जोडलेला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवास्तव आपले राज्य खरेच महान आहे. त्याने स्वांतत्र्याची अस्मिता जनतेत जागवली. हिंदवी स्वराज्याची हाक देणारे ते पहिले सिंहासनाधिश्वर राजे. ज्यांनी एकच वेळेस निजामशाही आणि मुघल यांना परास्त केले. महाराष्ट्र राज्यात ३५० किल्ले आहेत. यातील साधरण २२५ किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. जनतेवर जुलूम होऊ नये म्हणून त्यांनी अष्टप्रधानमंडळ स्थापन करून जनतेला न्याय मिळेल अशी व्यवस्था केली होती. साहजिकच अशा थोर राजाची स्मृती जपली जावी आणि आपल्या राज्यातील गडकिल्ले यांची ओळख व्हावी म्हणूनच आम्ही मुले स्वतः पुढाकार घेऊन किल्ले बांधणी हाती घेतो. किल्ला बांधताना योजना करणे, एकजुटीने निर्णय घेणे, नियोजन करून काम पूर्ण करणे अशा अनेक गोष्टी नेतृत्व स्विकारणऱ्या मित्राला पूर्ण करावे लागतात. त्यामुळे किल्ला बांधण्याच्या कृतीतून खूप गोष्टी आम्ही शिकतो.
आम्ही शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा जुन्नर येथील शिवनेरी किल्ला बनवण्याचे निश्चित केले आहे. खरे तर त्यावरील महादरवाजा, गणेश दरवाजा, परवानगी दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा इतके सात दरवाजे दाखवावे लागणार आहेत. याशिवाय त्याच्या वाटेवर असणारे शिवाई देवीचे मंदिर दाखवावे लागणारच, किल्ल्यावर बदामी तलावही दाखवावा लागणार, जेथे शिवाजीचा जन्म झाला ती दगडी वास्तू, इतरही बारकावे दाखवावे लागतील. मुख्य म्हणजे हा गडकिल्ला असल्याने आधी जमीन सपाटीपासुन ठराविक उंचीवर सपाट भाग दाखवण्यासाठी बरेच मटेरिअल लागेल. रोज संध्याकाळी थोडे थोडे सामान आणून आता बरीचशी तयारी झाली आहे. आता परीक्षा सुरू असल्याने फारसा मोकळा वेळ मिळाला नव्हता. पण किल्ला बनवण्याचे होमवर्क डोक्यात तयार आहे. अब इंतजार छूट्टी का.
सुट्टीची प्रतीक्षा सर्व मुलांना असते, आम्हाला आहेच, रोजच्या खेळाच्या दिवशी वेळ पाळावी लागते. शाळा सहा तास, ट्युशन दोन तास, होमवर्क दोन तास पण रोजच खेळण्यासाठी अवघा दिड तास. त्यामुळे घड्याळात सात वाजले की मी सुसाट निघतो. इमारतीच्या खाली माझे मित्र वाट पहात असतात, कधीकधी लिफ्ट वरच्या माळ्यावर तर कधी ग्राऊंड फ्लोअरवर अडकलेली असते, धीर धरवत नाही, कानात मित्र माझ्या नावाचा धोशा लावत आहेत असा भास होत राहतो.
मी नेहमी जिन्याच्या दोन दोन पायऱ्या एकदम उतरतो. काही सेकंदात चार माळे उतरून येतो. बाबा म्हणतात ही माझीच जुनी सवय तुला लागली आहे. खरेच अशा सवयी अनुवांशिक असतील का? चेहरा, डोळे, कुरळे केस हे अनुवांशिक असतुल ही पण तशाच सवयी किंवा खोड्या करणं अनुवांशिक असेल का? आतापर्यंत अभ्यासक्रमात वाचलं नाही, आमच्या मॅडमना माहिती असेल का? की search करावं! एकदा उडी मारतांना पायरी चुकली, ढोपर जिन्यावर आपटले. आईची खूप बडबड ऐकून घेतली. लागले मला आणि बोलणीही मलाच, पण काही दिवसानी मी ते विसरलो. आताही मी तसाच जीना उतरतो. मला पाहताच सर्व माझ्या भोवती गोळा होतात. फार बरं वाटते. आपण स्पेशल आहोत असा भास होतो.
रोज काय वेगळं खेळायचं? हा प्रश्न आमच्या पूढे असतोच, आम्ही आठनऊ जण प्रत्येकाची वेगळी आयडिया, लवकर एकमत होत नाही, दहा मिनिटं त्यातच वाया जातात. पकडापकडी खेळून घामाघूम व्हायला होतं पण तो सहज आणि पटकन खेळता येणारा खेळ आहे, कधीतरी डबल एक्स्प्रेस खेळतो. कधी सायकलने इमारतीच्या भोवती स्लो सायकलींग करण्यात मजा येते.
आमचे ग्राऊंडवरचे खेळ ऋतू नुसार बदलत असतात. पावसाळ्यात पावसात भिजावेसे वाटते, भिजणे फक्त एकदाच अलाऊड असते, पावसात बाहेर खेळल्यास आजारी पडण्याची शक्यताच अधिक. शिवाय लादीवर शेवाळ आल्याने घसरून पडण्याची भिती असतेच त्यामुळे आई पावसाळ्यात खाली सोडत नाही. बाबा म्हणतात, “आम्ही लहान होतो तेव्हा समोर मातीचे मैदान होते आणि कुठेकुठे खडकही होते. क्रिकेट खेळताना आम्ही डाय मारून चेंडू पकडायचो, कधीतरी पावलाला ठेच लागून बोटं फुटायची,नख निघायचे पण घरी आल्यानंतर रडारड केली तर आई धपका घालायची. म्हणून छोटमोठं लागले तरी घरी सांगत नसू. आमचा हुलीया पाहून थोड्या वेळाने आईची तपासणी सुरु व्हायची आणि ती जखम धुवून हळद लावायची. सहसा डॉक्टर माहिती नव्हते.आई तंबी द्यायची उद्या मैदानात गेलास तर तंगडी तोडेन, पण दुसऱ्या दिवशी होमवर्क झाले, की आई कामात आहे पाहून चोर पावलाने हळूच निघून जायचो.” आता मात्र मला जरा काही झालं की माझ्या अगोदर आई घर डोक्यावर घेते, आता तिचीही सवय मला लागल्याय, मी कोणाचे काय काय घेतलंय माहिती नाही. बाबा तसा दिसायला शांत आहे पण आईच्या संपर्कात राहून आता तो ही नाजूक झाल्या सारखा वागतो. बहुधा आई आम्हाला दोघांना pampering करत असावी.
बाबांची तेव्हा खूप मजा होती. आता आमच सगळ घडाळ्याच्या काट्यावर चालते. आमच्या एकंदर परिस्थिती बाबत बाब रिग्रेट करतात. मनाला तेवढच बरं वाटतं.
अभ्यास संपवला की वीस मिनिटे आईचा किंवा बाबांचा मोबाईल खेळण्यासाठी मिळतो. त्याचा पूर्ण वेळ वापरायला मिळावा याची काळजी मी घेतो. कोणी पाहूणे आले तर आईबाबा बिझी होतात मग थोडा जास्त वेळ मोबाईल वाट्याला येतो. चोरी पकडली गेली तर मात्र काही खरं नाही, बोलून बोलून मानसिक छळ करतेच आणि वरून दोन दिवस आई मोबाईलला हात लावू देत नाही. कोणता खेळ खेळावा , माईनक्राफ्ट गेमवर किल्ले, शहर व्हिजवलाइज करू शकतो. मला सबवे सरफर खूप आवडतो, प्रत्येक अडथळा पार करतांना क्विक डिसिजन घ्यायचा असतो. रेसिंग सुध्दा आवडते. मी मला हवी ती गाडी निवडू शकतो. कोणताही लेटेस्ट गेम आला तरीही काही वेळातच तो मी अडाप्ट करतो.
ज्या गोष्टीत आपल्याला किन इंटरस्ट असतो त्या आपल्याला सहज जमतात. किंबहुना आपण जास्त लक्षपूर्वक त्या करतो. मोबाईल गेम एकट्याने खेळता येतो त्यामुळे मला तो आवडतो. कसा वेळ जातो कळतही नाही. मोठी माणसे स्वतः कित्येक तास मोबाईलवर असतात मात्र आम्हाला सांगताना Bad habits म्हणून मोबाईल हातातून हिसकावून घेतात. Just injustice.
अभ्यासाचे असे नसते, पाठांतराचे विषय कंटाळवाणे असतात, त्यात प्रामुख्याने हिस्टरी आणि जिआँग्राफी विषय खूप कंटाळवाणे असतात. कित्येक शहरांची नावे, लढाया, परिणाम लक्षात ठेवावे लागतात.घटनांच्या तारखा पाठ करणे अवघड असते. अर्थात Homework करून घ्यायला आई डोक्यावर बसली की काहीच पर्याय नसतो. कदाचित मी पूर्ण होमवर्क लिहून घेतला नसेल असे वाटून ती माझ्या इतर मित्रांच्या आईला फोन करून तो मागवून घेते. इतर मित्रांच्या घरूनही तसेच फोन येतात. Nobody wants to trust us. त्यामुळे प्रत्येक विषयाचा होमवर्क पूर्ण करावाच लागतो.
माझ्या बाबांना प्लेअर सिलेक्ट करून क्रिकेट खेळायला आवडते. ते मोकळे असतील तेव्हा टीम तयार करून मोबाईलवर खेळत बसतात. चेस ही खेळतात. हळूहळू मी त्याची माहिती शिकून घेतली आहे.
दिवाळी सुट्टीपूर्वी आम्ही मित्रांनी किल्ला बांधण्याचे नियोजन केले आहे. किल्ल्याचा बेस तयार झाला आहे. Day to day work shoot करून ठेवलं आहे. ते आम्ही सगळ्यांना शेअर करतो म्हणजे दुसऱ्या दिवसाचे शेड्युल ठरवता येतात. किल्ल्यासाठी घरातून,आजू बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या ईमारतीमधून कितीही सामान नजर चुकवून आणलं तरी कमीच पडते. लागणारे सामान मिळवणे कठीण असते. आम्ही राहतो तिथे दगड, विटा, माती, काठ्या अशा वस्तू सहज मिळत नाहीत. कधीतरी आजूबाजूला एखाद्या इमारतीचे काम सुरू असेल तर तिथून आम्ही सिक्युरिटी काकांना सांगून तुटलेल्या विटा वगेरे सामान आणतो पण त्यासाठी त्यांना फार मसका मारावा लागतो. किल्ल्यावर उभे करायचे मावळे, तोफा, मशाली जनरल स्टोअरमध्ये उपलब्ध होते. आम्ही आधीच वीस वीस रूपये वर्गणी काढून पैसे जमा केलेले आहेत त्यातून मावळे, सैनिक, सिंहासन, तोफा, मेणबत्ती खरेदी करून ठेवली आहे. आईचे लक्ष नसेल तेव्हा मी हे बाबांना सांगतो. ते काय short fall आहे त्यासाठी मदत करतात. माझ्या मित्राच्या वडिलांनी आम्हाला किल्ल्यावर लावायला गणपतीचे तोरण दिले आहे.
दिवाळी सुट्टी लागण्यापूर्वीच संध्याकाळी रोज दिड दोन तास आम्ही किल्ला बाधंत होतो. त्यासाठी माती कालवून चिखल तयार करून तो गोणपाट, प्लास्टिक गोणचे तुकडे एकत्र करत ते मातीने लिंपून एकसंध केला आहे. पुढील योजना डोक्यात आहेच. मशालीचा लूक येण्यासाठी लेसर बिम हवे आहे पण ती बॅटरी फार महाग पडते. हौसेला मोल नसते, आमच्याकडे काही न काही उपाय शोधून काढण्याचं स्किल आहे. बाबा म्हणतात स्वप्नं सत्यात उतरवायची असतील तर त्या स्वप्नाची पाठ काढली पाहिजे.
आज वसुबारस आहे, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज संध्याकाळी गायीला आणि तिच्या वासराला सजवून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांना पुरणपोळी खाऊ घातली गेली. अर्थात शहरात जेव्हा बेवारस गायी फिरतात आणि त्यातलीच एखादी गाय टाकलेल्या ढिगाऱ्यावर मिळेल ते खाण्यासाठी धावत जाते तेव्हा पाहून खूप वाईट वाटते. गायीची आणि तिच्या वासराची काळजी फक्त एका दिवसापुरती घ्यावी का? आम्हा मुलांना जे प्रश्न पडतात ते मोठ्या माणसांना पडतात की नाही? तरीही त्यांचे मालक या गायींना मोकळे का सोडून देत असावेत? हमरस्त्यावर गायी बसलेल्या दिसतात तेव्हा त्या आंदोलन करत असाव्या असे वाटते, आपल्याला काही तरी विचारत असावे असे वाटते. काय दुर्दैव जीला आम्ही गो माता म्हणतो त्या मातेला तिची उपयुक्तता संपली की रस्त्यावर सोडून मोकळे होतो. मग फक्त वसुबारस दिवशी तिची पुजा मांडण्यात काय हशील?
आमचा ‘शिवनेरी’ गड आकार घेत आहे. उद्या संध्याकाळ पासून आम्ही थोडा जास्त वेळ देऊन आमचा किल्ला सोसायटीमधील लोकांसाठी खुला करणार आहोत. आपणही किल्ला पहायला येऊ शकता. आमच्या सोसायटीत आपले स्वागतच आहे. मग कधी येताय आपण किल्ला बघायला. किल्ला बांधणे हे एक निमित्त आहे, या मोहिमेतून एकमेका साह्य करू संकल्प पूर्ण करू निश्चयाने हे आम्ही शिकलो. बाबा काल म्हणाले किल्ला पूर्ण करताय ही गोष्ट फारच छान आहे पण जीवनात असे अनेक गोल आहेत हे पूर्ण करण्यासाठी असाच प्रयत्न करं. या मोठ्या माणसांना काहीतरी शिकवल्याशिवाय चैन पडतच नाही. आदत से मजबूर. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.