trekची गम्मत…
मला माझ्या गावाची ओढ आजही आहे. वय वाढल्याने ज्या जबाबदाऱ्या वाढल्या त्यामुळे मर्यादा आल्या मात्र जंगलात फिरायला जाणे हा माझा छंद होता.
लहानपणी पावसाळा वगळता दोन्ही ऋतुत टोळक्यांनी फिरायला जायचो . गावाची वेस ओलांडली कि एक ओढा लागे. त्या ओढ्यापुढे निरव शांतता असे. सुरु होई वन राज्य . पक्षांचे संगीत कानावर पडे. फारच लवकर जंगलाचा रस्ता धरला तर कवड्यांचा मोठा थवा पायाखालून भूर करत निघून जाई. पारस्याचा गवताचा नंबर पाठी टाकला कि निरव शांततेला गूढता व्यापुन टाकी. त्या नम्बरा पुढे दोन रस्ते लागत एक घाटीम – नवघर गावाकडे जाई तर दुसरा तांदुळवाडी गावाकडे. ह्या रस्त्यावरून बैल गाड्यांची वर्दळ कधी मधी असे मग मात्र घाबरट मुलांना कंठ फुटे.
रस्ता नजरेस पडताच मुलांचा उत्साह वाढे ,पावले झपाझप पडू लागत .
दूरवरून येण्याऱ्या बैलगाडीच्या चाकांची कूच कूच कानी पडे.बैलाच्या गळ्यातले घुंगरू ऐकू येत. चालत्या रस्त्याच अस्तित्व जाणावे . गाडीवान बैलाला ही र अशी हाळी घाली , ती साऱ्या रानात गुंजत राही .गाडी समोर दिसली कि आम्ही मुल गाडीत चढायला धाव मारत असू . रस्त्याच्या एका अंगाने निमुळती शेरी रानाच्या अंगाने आत शिरे . कुणीतरी हळूच कुजबुजे भूतीचा पोंदा आला. पावले जड होवू लागत. वातावरण गुढ होई. पावलाखाली सुकलेली पाने आली तरी होणाऱ्या आवाजांनी मनाचा थरकाप होई. त्या भूतीचा पोनद्यात वस्त भूतांची वस्ती आहे आणि ती हुम्बाच्या झाडाला लटकून असतात असे मोठ्या माणसांकडून बऱ्याचदा ऐकले होते.नजर सावध होई उगाचच खर्च एखाद्या हुम्बाच्या झाडावर वस्त नाही ना याची नजर शोध घेई. तो भूतीचा पोंदा कधी एकदा ओलांडतो अशी स्थिती होई. ह्या भूतीच्या पोन्द्यावर सपाट मैदान होत. तिथूनच तांदुळवाडी किल्ला नजरेस पडे .
आम्ही मुले अनेकदा हा भूतीचा पोंदा पार करून करवंदीच्या जाळ्यावर तुटुन पडत असू.हटुर्ण,चिकन , आसन ,पेटार यांचा मुक्त आस्वाद घेता घेता वेळ कसा सरला काळात नसे. सूर्य डोक्यावर आला कि भूतीचा पोन्दा जागा होतो, वस्त एकएका मुलाला नावानी हक मारतात आणि आपल्या साम्राज्यात नेतात असा समज होता. त्यामुळे हा रानाचा मेवा खाण्या पलीकडे आमची झेप कधी गेली नव्हती. किल्ला आमच्यासाठी असाध्याच ठरला. दर सुट्टीत एकत्र जमलो कि ह्या जंगला विषयी गूढ कथा ऐकू येत . पळसाची माची, खडी मशीन , कारवीचा डोंगर ह्या ठिकाणची भूल आजही मनात जागी झाली तरी लहानपणी त्या जागाविषयी असणार गूढ किती थरारक होत त्याची जाणीव होई.प्रत्येक मोठी सुट्टी आम्ही जंगल सफर एन्जॉय करीत असू. दहावी इयत्ता संपली आणी कॉलेज नावाच दुष्ट भूत मानगुटीवर बसलं आत्ता मुल कॉलेज एन्जॉय करतात तेव्हा मलातरी तशी संधी नव्हती. काय ते शिका आणी लवकर पोटा पाण्याला लागा अशी तंबी वडिलांकडून मिळाली होती. सुट्टी पडली कि वेळ घालवण्यापेक्षा पैसे कसे मिळवता येतील ज्याचा उपयोग पुस्तके आणी गरजेच्या साधनासाठी करता येईल हेच डोक्यात होते. किल्ला जवळ असूनही म्हणूनच किल्ला सर करण्याचे कधी सुचले नाही. अभिजित घोरपडे ,मिलिंद गुणाजी यांचे लेख वाचनात आले. माझ्याच गावचा किल्ला मी पहिला नव्हता अन्य गडांचे काय ? हळू हळू पटू लागले ज्याचेकडे ज्यांच्याकडे आहे त्याची त्यांना किंमत कळत नाही गावात गड असूनही म्हणुनच गडावर जाणे कधी झाले नाही.
तीस चाळीस वर्षांचा कालखंड कसा गेला कळलेच नाही. प्रपंच आणि त्याच्या विवंचना या मुळे खऱ्या सुखाची परिभाषा ओळखता आली नाही . संसाराच्या जबाबदाऱ्या कोणावर नसतात का ?कोषातून पडल्याशिवाय खर आयुष्य खर जीवन कळणार तरी तरी कस ? इतर मुल इतर ग्रुप ट्रेकिंगला गेल्याच्या कथा, त्यांचे लेख वर्तमान पत्रात वाचत होतो. घालवलेली ,हरवलेली ती संधी पुन्हा हाती येणार नाही अस वाटत असतांना अचानक माझ्याच शाळेची व्हिजीट डहाणू येथे पावर स्टेशनला जायची निश्चित झाली आणि पुन्हा गडाची याद आली. इतर सहकाऱ्या सोबत चर्चा करून ट्रेक न्यायाचा निश्चित केले पण काय काय व्यवस्था करावी लागेल ह्याची कल्पनाच नव्हती. नेताजी पाटील याचं तांदूळ वाडीचा किल्ला यावर लिहिलेलं पुस्तक देण्याच वैती या मित्राने मान्य केल होत. तो ट्रेकला येणार होता पण आयत्या वेळेला माशी शिंकली. न पुस्तक मिळाले ना मित्र सोबतीला. माझ्याच घराशेजारी शैलेश टोपले रहात होता त्याला किल्ल्याची माहिती होती म्हणून थोडे बरे झाले. अखेर पन्नास मुले ,पंधरा मुली ,दोन शिक्षक आणि दोन माहितगार यांच्यासह किल्ला चढू लागलो. मुले पंधरा सोळा वर्षाची, अमाप उत्साह यामुळे वाट दिसेल तशी चालत राहिली. जणू त्याची तेथे येण्याची ती दहावी वेळ असावी. पाहता पाहतामुले आम्हाला न सांगताच येव्हढ्या उंचावर जावून पोचली कि परत येण्याचा मार्गाच कळेना. त्या मुलांसोबत मुलीही होत्या. वर गडावर जाण्याचा रस्ताही दिसेना. परतावे म्हणुन प्रयत्न करू लागले तर पायाखालची वाळू आणी छोटे दगड घसरू लागले. मुली हुशारी करत वर चढल्या होत्या आत्ता त्यांच्या डोळ्यातून गंगा जमना वाहू लागल्या मुलींची फजिती पाहून आधी येत होत. मुलांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा दगड -माती घसरण्याचा वेग वाढला तेंव्हा संकटाची चाहूल लागली.
सगळ्यात महत्वाच होत धीर खचू न देण, मी स्वतः हळू हळू वर चढण्याचा प्रयत्न केला. प्रथम मी होतो तिथुन किमान सात आठ फुट खाली घसरलो.सर,सर ,सांभाळा अस ऐकू येई पर्यंत बाजूनी दोन दगड घरंगळत गेले. माझ्या मागे मुलांची रांग होती. नशिबनच दगड वळण घेत दूर निघुन गेले. मी धोका ओळखुन मुलांना जागीच थांबण्याच्या सूचना दिल्या.खर तर घडल्या प्रकाराने मी गांगरलो होतो. मी एक दोन मोठ्या मुलाना सावकाश घसरत तिला कसे बसे मी सावरले. प्रसंग पाहून उरलेल्या मुलांची हिम्मत होईना.क्षणभर माझे डोके सुन्न झाले. इतक्यात माझ्या मदतीला शैलेश,माझा मित्र आणि गावचा सुपुत्र आला . मंगेश भाऊ थांब मी वाट शोधतो मग यांना उतरू. तो मदतीला आल्याने मला धीर आला. त्यांनी एका सखल भागातुन वाट शोधली आणि पाहता पाहता वर अडकलेली वीस पंचवीस मुले सुखरूप खाली पोचली. माझे सहकारी शिक्षक हा थरार पहात होते. माहित नसताना ,पुरेशी साधन नसतांना आणि योग्य मार्गदर्शक नसल्यास काय फजिती होते ते ह्या ट्रेकने माझ्यासह माझ्या विध्यार्थ्यांना समजले. समाधानाची बाब हीच होती कोणालाही दुखापत झाली नाही. आम्ही मार्ग बदलुन शैलेशच्या मागे न बोलता चालत राहिलो.किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्याचा आनंद अवर्णनिय होता . एका बाजुला खोलच खोल दरी आणि दुसऱ्या बाजुला खुणावणारा कडा पाहून मन आनंदुन गेले. तेथे पाण्याचे सात टाक होते. मुलानी ते थंड पाणी मनसोक्त पिले. काही विध्यार्थी चक्क त्या टाकत उतरून डुम्बले. वरच्या गार हवेने सारा थकवा पळुन गेला किल्ल्याच्या माथ्यावर ससे पकडायला आलेल्या गावातल्या मुल्लांनी लावलेली जाळी पाहुन आश्चर्य वाटले. आम्हाला एकदाच गड चढताना नानी याद आ गई मग ह्या फासे पारध करणाऱ्या मुलाचं काय ?
बहुदा निसर्गानेच ती कवच कुंडले त्यांना बहाल केली असावीत. ट्रेकला जावुन आलो त्याला पंधरा दिवस लोटले तरिहि माझ मन माझ्या अडकुन पडलेल्या
मुलामध्ये रेंगाळतेआहे. स्वप्नातही मी गडावर रमत आहे. एक सुंदर अनुभव,एका संकटाचा सामना करण्याचा अनुभव पाठिशी मिळाला हे अहो भाग्याच !