असाही एक गौतम

असाही एक गौतम

जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम संस्कार तर हवेच पण उत्तम वाचन झालं तर झालेल्या संस्काराची मशागत होते. त्यामुळे कुमार्गाकडे कल आपोआप कमी होतो. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ तर अशाच निर्मळ वातावरणात गौतम वाढला, लहान वयातच पाटीवर अक्षरं गिरवून झाली, शाळेत पहिल्या बाकावर त्याची वर्णी लागली ती कायम. त्याने पहिला नंबर कधी सोडला नाही. पाहता पाहता तो सर्व शिक्षकांचा आवडता झाला. मनमिळाऊ, विनयशील आणि चारित्र्यवान असा त्याचा लौकिक. बक्षीस वितरण कार्यक्रमात त्याला अनेक बक्षिसे असत त्यामुळे तो पालकांच्या लक्षात राही. असा मुलगा अचनाक गायब झाला तर चर्चा होणारच. नववी इयत्तेच्या परीक्षा संपत नाही तो दहावी इयत्तेचा अभ्यास सूरु होतो. प्रत्येक शाळेला आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये यावे असे वाटत असते. याच वेळी एस एस सी बोर्डात आपल्या शाळेचा विद्यार्थीच पहिला यावा अशी आकांक्षा असते.

गौतमच्या बाबतीत घरून आणि शाळेकडून अगदी असेच घडले. दहावीची परीक्षा जवळ आली तस घरून गौतमकडे अधिक लक्ष दिलं जाऊ लागलं. सर्वच पालक जवळपास असच वागतात. जी मुल वर्षभर सातत्यपूर्ण अभ्यास करतात त्यांना खर तर पालकांनी परीक्षेसाठी नव्याने सांगण्याची गरज नसते, पण पालकांचा स्वतःवर संयम नसतो. मुलं पालकांच्या अपेक्षेच्या दबावाखाली असतील तर त्याची परिणती नको त्या गोष्टीत घडते.

एक दिवस सकाळी गौतम शाळेत जाण्यासाठी तो गेला आणि पुन्हा शाळेतून घरी आला नाही. कधीकधी शाळा एक्सट्रा तास घेऊन लेट सुटत असे, म्हणूनच त्यांनी उशीरापर्यंत त्याची वाट पाहिली आणि शाळेत फोन केला. शाळेत त्या दिवशी कोणताच अधिकचा तास नसल्याचे समजले तेव्हा त्याच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने गोपाळरावांना फोन करून गौतम घरी न पोचल्याबद्दल काळजी व्यक्त केली. अधीर स्वरात त्या म्हणाल्या, “आधी माझ्या मुलाचा शोध घ्या तो घरी परतल्याशिवाय माझ चित्त कशात लागायचं नाही.”

गोपाळरावांनी मित्रासह त्याचा गावभर शोध घेतला , त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही तेव्हा त्यांनी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिसिंग कंप्लेंट नोंदवली. शोधसत्र सुरू झाले आणि पोलीसांनी त्यांच्या घरी जाऊन त्याची अभ्यासाला बसण्याची जागा, बेडरूम यांचा शोध घेतला. त्या दिवशी तो ज्या मित्राच्या शेजारी बसला होता त्याच्याजवळ विचारणा केली. कुठेही चिठ्ठीचपाटी सापडली नाही की संशयास्पद काही आढळलं नाही. गोपाळरावांची पत्नी तर रडकुंडीला आली. जीवाच काही बरंवाईट तर केलं नसावं ना म्हणून मित्रांनी गावातील संभाव्य विहिरी आणि परिसर पालथा घातला. गौतमची आई धाय मोकलून रडत होती आणि वडील किंवा नातेवाईक यांना काहीच सूचत नव्हते. वर्तमानपत्रात मिसींगची फोटोसह बातमी देऊनही काही फायदा झाला नाही. पोलीसांचा शोध सूरू होता पण गौतम नक्की कोणत्या दिशेने गेला असावा याचा तर्क करता येत नव्हता.

शेजारी, मित्रपरिवार यांनी समजुत घालण्याऐवजी डागण्याच दिल्या. ‘सतत अभ्यासाचा धोशा लावल्यावर पोरं कंटाळणार नाहीतर काय?’ कान असुनही बहिर असल्याच सोंग वठवावं लागत होतं.

दोन तीन दिवसांनी एका खाजगी पिसीओ वरून घरी फोन आला, आईने तो धडधडत्या काळजानी उचलला. “आई ग sss, मी तुझा गौतम, न सांगता मी निघून जाऊन तुला खूप दुःख दिलं. मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नव्हतो असे नव्हते पण तुमच्या सुस्वभावी वातावरणात माझा श्वास गुदमरत होता. तुम्हाला सतत माझ्या प्रगतीचा ध्यास. मी नेहमी पहिलं यावं, स्पर्धेत असावं अस तुम्हाला वाटायचं, खरं तर त्यात तुमची काही चूक नव्हती. कोणतीही गोष्ट करायला गेलो की मनात प्रश्न यायचा पप्पांना काय वाटेल? साधे खेळातले पत्ते मी हातात धरले तरी मनात अपराधी भावना यायची,पत्ते खेळतांना पप्पांना काय वाटेल? असा विचार मनात येताच हात कापायचे. तुम्ही आणि तुमच्या चांगुलपणाने, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मला मन आहे, मला विकार शीवू शकतात याचा तुम्ही विचार केला होता की नव्हता कळेना, भविष्यात सतत दडपण बाळगण मला शक्य नव्हतं , म्हणून मी तुमच्या पासून दूर जायच ठरवलं.”

“फोन कुठून आला? हे शोधण तुम्हाला अवघड नाही, तुम्ही ते पोलीस मदत घेऊन करू शकाल, पण मला आता तरी परतायच नाही. माझे प्रश्न काय आहेत? ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करीन. या शोधयात्रेत माझ्या सोबत कुणी नको. जेव्हा केव्हा मला परतावे असे वाटेल मी परतेन त्या नंतर माझ्या बदललेल्या स्वरूपात तुम्ही माझा स्विकार करावा की नाही ते स्वातंत्र्य तुमचे आहे. आई रडू नको, मोह, माया यांचे जाळे खरचं मोठे आहे त्या जाळ्यात जो जीव अडकतो त्याला मुक्ती नाही अस मी ऐकलं आहे, वाचलं आहे. मी यात अडकेन की नाही आत्ताच सांगू शकत नाही. आज तरी मी कोणत्याही मोह बंधनात नाही. कोणाही असंगाच्या सानिध्यात नाही. दुःख करू नको, बाबांना धीर दे, पुरूष रडू शकत नाही म्हणूनच त्याच्या दुःखाला वाचा फुटत नाही. असो, मी तुम्हाला दुःख दिले, मुलगा म्हणून माझं कर्तव्य पूर्ण न करताच मी पळ काढला, तरी मला समजून घ्या.”

इतका वेळ ती फक्त ऐकत होती,स्फुंदून स्फुंदून रडत होती. त्याच बोलण संपताच ती कळवळून म्हणाली, “बाळा sss, नको रे जाऊस, आमच्यासाठी परत ये,आमच्या काही अपेक्षा नाहीत. तू सामान्य होऊन जग. तुला कुणीही रागावणार नाही की तुझ्याकडून अपेक्षा बाळगणार नाही तू परत ये. तुझ्या शिवाय रहाणे शक्य नाही, मी तुझ्या दुःखाने खचून मरून जाईन. मी तुला नकोशी झाली आहे का?”

‘नैनं छंदंम् गच्छामि, नैनं छंदंम् पावका.’ हे मी गीतेत वाचलय, आता आता मला त्याचा अर्थ उमगू लागलाय, आता मला कोणी परतवू शकणार नाही. तेव्हा मला माफ कर.”

तिने काकुळतीला येऊन गौतमला सांगितले, “बाळा नको रे असा निष्ठुर होऊन वागुस, तु परत ये. पप्पा तुला काहीच बोलणार नाहीत.”

“मी परतण्यासाठी घर सोडलेलं नाही आई ,माझ इप्सित साध्य करूनच मी परतेन. पप्पांना सांग, रागावू नका, त्यांच्या प्रतिमेला ठेच लागेल अस कोणतही कृत्य मी करणार नाही, विश्वास ठेवा.”

फोन आला तेव्हा गोपाळराव घरी नव्हते. ते आल्यावर तिने गौतमच्या फोनबद्दल त्यांना सांगितले. त्यांना प्रचंड दुःख झाले. आपल्या महत्वकांक्षेने मुलगा घालवून बसलो याचा पश्चाताप झाला. काय करावं काही कळत नव्हते. त्यांनी जवळच्या मित्राला, गौतमच्या फोन बाबत सांगितले. तो म्हणाला, “गोपाळ,तुझ्या मुलाचे विचार स्पष्ट आहेत, त्याला स्वतःचा शोध घेऊ दे, कदाचित तो यशस्वी झाला तर नावलौकीक होईल तेव्हा त्याची मिसिंग तक्रार पाठी घे तोच शहाणपणा आहे.”

दोन दिवसांनी गोपळरावांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार मागे घेत असल्याचे लिहून दिले. पोलीसांनी तक्रार पाठी का घेत आहात? या बाबत भरपूर चौकशी केली.तुमचे काही भांडण झाले आहे का? इथ पासून ते मुलाला काही व्यसन होते का? घरातील दागदागिने पाहिलेत का? प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांनी तितक्याच शांतपणे उत्तरे दिली. घरी आले तेव्हा ते थकले होते. विमनस्क अवस्थेत दोघेही दोन दिवस होते. शेवटी पत्नीने धीर दिला. “अहो,दुःख मलाही आहे, नऊ महिने मी त्याला उदरात वाढवले पण आता सत्य स्विकरलं पाहिजे, न जाणो त्याला आपलं दुःख समजलं तर तो परतेल सुध्दा. पण जगण थांबवून चालेल का? तुम्हीच अशी हार मानली तर मी कोणाकडे पाहू.”

त्या दिवसानंतर गौतमचा शोध बंद झाला. जो स्वतः घरापासून स्वतः दूर झाला, त्याचा शोध कसा आणि कुठे घेणार? देशपांडे दांपत्याने स्वतः च्या कर्माला दोष दिला. गुणी मुलगा पदरी देऊन नियतीने तो हिसकावून घेतला याचा रागही आला आणि आपल्या नशिबी मुलाचे सुख नाही याची खंतही वाटली. दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी तो गेला आणि तेच त्याचे प्राक्तन असावे असे समजून त्यांनी शोक आवरला.

गोपाळराव आणि वैजयंती यांच्या नात्यातील सारे हळहळले पण कुणीही सहानुभूतीने भेटायला आले नाहीत, गौतम घरी नसला तरी हयात होता. त्याचं प्राक्तन त्याने निवडलं होत. अमरावती येथून गौतम मुंबईत आला. दोन दिवस तो मुंबई फिरत होता. प्रत्येक जण घाईत होता. ह्या गर्दीत आपण हरवून जाऊ याची मनात भिती वाटू लागली. खिशात खाऊसाठी कधीमधी दिलेले पैसे वाचवून ठेवलेले पैसे होते ते संपले. गळ्यात एक सोन्याची साखळी होती. दहाव्या वाढदिवसाला मावशीने दिली होती. पोट खपाटीला गेले, आतडी कुरकुर करू लागली. तो सोनाराकडे गेला,चेन विकायची आहे म्हणाला, सोनार अतिशय धुर्त होता.”कोणाची आहे? तुझी की घरातून चोरून आणलीस ?” त्याने गळा दाखवला, “माझीच आहे, गरज म्हणून विकतो आहे. किती पैसे मिळतील?”

“घरातून पळाला आहेस का? जा बाळा परत घरी जा ?”
“अंकल, काही तरी केल्यानंतरच वडिलांना तोंड दाखवेन, तोपर्यंत नाही अशी मी प्रतीज्ञा घेतली आहे, प्लीज मला याचे किती पैसे मिळतील तेवढ सांगा.वाढदिवसाला मावशीने दिली आहे, दहा ग्रँमची आहे.” “खरी आहे का पहावी लागेल, खरी असेल तर याचे दहा हजार येतील.” “बसं, दहा हजार, सोन तर खूप महाग आहे,बत्तीस हजार रूपये तोळा, म्हणजे तुम्ही मला निम्मे ही देत नाही आहात.”
“ये पोरा, घरून पळून आला आहेस, चेन तुझी की चोरीची माहिती नाही, हवे तर हे बारा हजार घे, नाहीतर पोलिसांना बोलवतो.” कधीकधी डोळे असुन आंधळ व्हाव लागत. अडला हरी,त्याला कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे नव्हते. त्याने निमुटपणे बारा हजार मोजून घेतले. खिशात पैसे नव्हते, पैशांशिवाय काही करू शकत नव्हता.

पोटात कावळे ओरडू लागले तसे त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पोटभर खाल्ले. स्वतःला काही कपडे घेतले. दोन दिवस तो मनसोक्त मुबंई फिरला. आवडेल ते पोटभर खाल्ले. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते माहिती नव्हतं, म्हणूनच मुबंईचा कानाकोपरा त्यांनी पहिला. रात्री तो एखाद्या मंदिराच्या आवारात पथारी पसरत असे. दोन तीन दिवसात खिसा खाली झाला तेव्हा लक्षात आले की शहरात पैसे असतील तरच आसरा आहे.आता मुंबईत थांबून उपयोग नव्हता.

तिथून तो फिरत फिरत व्हिटी स्टेशनवर गेला. बराच वेळ येणाऱ्या जाणाऱ्या लोकल पहात बसला, बाजूने पोलीस काका जातांना पाहिले की पोटात भितीने गोळा यायचा. वाटायच येतील आणि संशयित बाल गुन्हेगार म्हणून धरून नेतील. सगळ एका मिनिटात संपेल. दूर पाहत होता तेव्हा दिसलं, दुसऱ्या बाजूला मेल, एक्सप्रेस येतजात होत्या. इंडिकेटरवर मुंबई- अलाहाबाद गाडी दाखवली होती. फारसा विचार न करता जनरल तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मवर जाऊन विचारून गाडीचा जनरल डबा शोधून काढला.

आता त्याच्या परिचयाचे कोणीही नव्हते. गाडी हळूहळू भरू लागली.संडासमध्ये जाऊन त्याने शिल्लक पैसे विभागून ठेवले. दिवस नव नवीन स्टेशन पाहण्यात बरा गेला, आजूबाजूला सगळेच चित्रविचित्र कपड्यातील लोक बसले होते. कोणी विचारल कुठे जातोस तर काय सांगाव? विचार करून डोक फुटलं पण उत्तर सुचत नव्हतं,कोणी विचारल नाही हे पाहून काळजी वाटू लागली. चेहरा थोडा रडवेला झाला. आईची आठवण येत होती. हळूहळू स्वतः ला समजावलं. सर्व लोक जणू त्याच्याकडेच पाहत होते. त्याने खरेदीसाठी पॉकेट काढलं की आजूबाजूचे त्याच्याकडे टक लावून पाहत.

त्याला कधी झोप लागली कळले नाही, सकाळी डब्यातील कलकलाट ऐकून जाग आली,तो तोंड धुवून आला,चहा प्यायचा म्हणून त्यांनी हा पॉकेट काढण्यासाठी हात खिशाकडे नेला तेव्हा त्याचे पॉकेट गेल्याचे कळले. पॉकेट अंडर पॅन्ट मध्ये ठेवायला हवं होतं, मनी विचार, घडायच ते घडून गेलं. रडून उपयोग नव्हता. पैसे एकत्र नव्हते म्हणून तो वाचला पण तिकीट तर गुल झाले होते. पोटात भीतीचा गोळा आला. संडासात जाऊन त्यांनी अंडरवेअर मध्ये लपवून ठेवलेले पैसे काढले चहा प्यायला, काही खाल्ले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो अलाहाबाद येथे पोचला. टीसी ने सावज नेमके हेरले. तिकीट विचारताच त्यांनी घडलेली घटना सांगितली. टीसी रागावला, चल झुट्टे, कूच भी मत बता, पैसा भर वरना जेल भिजवाऊंगा, तो हातापाया पडला,गयावया केली पण टीसी ठाम होता. त्याने भोकांड पसरल तस एका कोपऱ्यात नेत म्हणाला, “चोट्टे कितने पैसे है,निकाल कहा छिपाके रखे है।” त्यानेच खिसे तपासले, होते ते दोनशे-तिनशे रूपये काढून घेतले आणि स्टेशन बाहेर हाकलून दिले. बाहेर पडताच पून्हा भुकेची जाणिव झाली तसा तो सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला, शर्टाच्या बाहित शंभरची नोट ठेवली होती, भरपेट नाश्ता केला. दोन तिन दिवसात कपड्यात जपून ठेवलेले पैसे संपले.आता तो कफल्लक होता. भिक मागायला लाज वाटत होती. शहरभर फिरून तो फार थकला.

फिरत फिरत तो महादेवाच्या मंदिराच्या सोपानावर थांबला,
संध्याकाळ सरली होती, कुठे जायचे माहिती नव्हते. तिथेच तो थकून झोपला. सकाळी पुजेसाठी आलेल्या बाह्मणाच्या नजरेस पडला. त्याची माहिती ऐकून त्याने त्याला घरी नेले. ते पुजाअर्चा करत, त्यांना या मंदिराच्या पुजेची वहिवाट मिळाली होती. हा गोरापान मुलगा पाहून बाह्मणाच्या पत्नीला आनंद झाला, तिने त्याला आंघोळीसाठी गरम पाणी दिले. चहापाणी झाल्यानंतर विचारपूस केली. गौतमाने खरे तेच सांगितले. ती कावरीबावरी होत म्हणाली,. “गौतम,तुझ्या आईच्या मनास किती दुःख झाले असेल कल्पना कर. आधी फोन करून त्यांना तू सुखरूप असल्याचे सांग.तू सुखरूप आहेस हे ऐकल्याशीवाय त्या माऊलीला झोप यायची नाही.”

खरे तर आपण केलेला मुर्खपणा सांगण्याचे त्याला पटत नव्हते पण त्या काकुंच्या आग्रहाखातर त्याने पून्हा फोन करून सारे सांगितले.अगदी सोन्याची चेन विकल्याचेही सांगितले. आई रडली,तुझ्या पप्पांनी अन्न बंद केलय म्हणाली, तुझ्यावर कोणी रागावणार नाही पण तू परत ये अस काकुळतीला येऊन म्हणाली. तो म्हणाला,”मला माफ कर,पप्पांना म्हणावं,आपल्या मुलावर भरोसा ठेवा. काही तरी दैदीप्यमान करेन तेव्हाच परत येईन.” त्याने फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी तो त्या पुजारी काकाकाकुंना म्हणाला, “काही ओळख पाळख नसतांना तुम्ही मला ठेऊन घेतले, खाऊ घातले त्याबद्दल आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला आता निघाले पाहिजे.” ते जोडपे रागावले, “हे पहा तू वयाने अगदी लहान आहेस, तुझे येथे कोणी ओळखीचे नाही, तू येथे उगाच भटकंती करणार त्यापेक्षा तू आमच्याकडे रहा आम्ही तुला एखाद्या वेद शाळेत घालू, तेथे तू भारतीय संस्कृती, वैदिक शास्त्र, भारतीय धर्मग्रंथ यांचा अभ्यास कर तुला दिशा मिळाली की पूढे काय करायचे ते ठरव,आम्ही तुझ्या मार्गात येणार नाही.
त्यालाही ते पटले. तो घरचाच एक असल्याप्रमाणे राहू लागला. काकूंना मदत करू लागला.आठ,पंधरा दिवस तो त्यांच्या घरी होता. त्याने आजुबाजुचा परिसर पाहून घेतला. त्याला घरात बसून खूप कंटाळा आला.त्याची अस्वस्थता काकूंच्या लक्षात आली.

विश्वनाथ पुरोहीतांनी त्याला एका वेदशाळेत प्रवेश घेऊन दिला. तेथील वेदाचार्य निलकंठ शास्त्री यांनी त्याचा हात पाहूनच पुरोहीतांना सांगितले हा मुलगा म्हणजे रत्न आहे रत्न, त्याला थोडे उजळवले तर धर्मासाठी फार मोठे कार्य करेल. असला विद्यार्थी मिळायला भाग्य लागते. मी याच्यावर मेहनत घेईन. गौतम त्यांच्या पाया पडला, “गुरूजी, क्षमा असावी, मी काही समजलो नाही, मी एक संभ्रमीत मुलगा आहे, आई वडील यांना संकटात टाकून मी आलो आणि तरीही माझी संभावना तुम्ही रत्नात करता.”
“तू पळून आला नाहीस बेटा या विश्वेवराने तुला बोलावून घेतले,तुझ्याकडून त्याला काहीतरी महान कार्य करून घ्यायचे आहे, तेव्हा उद्या पासून, कशाला आजपासूनच तू इथेच थांब. मला शक्य असेल ते सारे मी शिकवेन,विश्वास ठेव तु योग्य जागी आला आहेस.”

पहाटे चारलाच वेदशाळेचा दिवस सुरू व्हायचा,अनेच ऋचा त्याने मुखोद्गत केल्या, श्रृती, स्मृती, संत साहित्य यांच्या अभ्यासात त्यांनी वेद, उपनिषदे, पुराण, न्यायशास्त्र,योग ग्रंथ यांचा अभ्यास केला. निलकंठ शास्त्री यांच्याकडे वेदाभ्यास करण्यासाठी दूरून विद्यार्थी आले होते पण गौतममध्ये एक वेगळीच चमक होती. सहसा कोणतीही गोष्ट त्याला पून्हा सांगावी लागत नसे म्हणून शास्त्री त्याच्यावर खुश होते.

रोज पाच घरी माधुकरी मागावी लागे, पहिल्या दिवशी फारच अवघड गेले, ‘भिक्षाम् देही’ म्हणत दारोदारी फिरायचे म्हणजे!, पण स्वतः मधील घमेंड आणि अभिमान टाकून नम्रता धारण केल्या शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणूनच हा परिपाठ होता. चार पाच दिवसात तो सरावला, काही घरातील गृहिणी त्याची आवर्जून वाट पाहू लागल्या. त्याची आस्थेने विचारपूस करू लागल्या मात्र त्यांनी आपल्या घरादारा बद्दल एक अवाक्षर काढले नाही.
हा विद्याभ्यास शिकण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्ष लागत. गौतमने ते दोन वर्षात आत्मसात केले.एक दिवस निळकंठ शास्त्री त्याला म्हणाले,”बाळ गौतम,मला ज्ञात असणारे माझ्या अवाक्यानुसार सारे तुला शिकवले. ते तू उत्तम आत्मसात केले आहेस. आता तुझे ज्ञान इतरांना देऊ शकतोस.”

तो म्हणाला, “गुरूजी मला अध्यात्म आणि आधुनिक ज्ञान याची सांगड घालायची आहे, मला मार्गदर्शन करा.” शास्त्रींनी त्याला सांगितले, तू आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास कर, या अभ्यासाला पुराणकाळातील ज्ञानाची जोड दे. म्हणजे विज्ञानाला न सुटणारी कोडी नक्की उलगडतील. तसे शक्य झाले तर विनाशी तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर करूनही आपण प्रगती करू शकू. त्याला पटले. चंद्र, मंगळ,गुरू, बुध यांच्या अस्तित्वासह त्यावरील विविध गोष्टी माणसाला समजू शकल्या तर त्यांचा यथायोग्य वापर, उर्जानिर्मिती, आरोग्य, प्रवास माध्यम, मोल्यवान खनिजे यासाठी करणे शक्य होईल.

तो निळकंठ गुरूजींचा आशीर्वाद घेऊन निघाला, पुरोहित जोडप्याला वंदन करत म्हणाला, काका, तुम्ही मला रस्ता दाखवला, प्रेमाने आश्रय दिला.येथील विद्याभ्यास पूर्ण झाला असे शास्त्री म्हणाले.आता मी काही नवीन शिकण्यासाठी दूर जात आहे.तुम्हाला मी कधीही विसरू शकणार नाही. काकूंनी त्याला जवळ घेत आलींगन दिले आणि प्रेमाने एक सोन्याची डबी दिली. “गौतम, या डबीत एक अनमोल लींग आहे, जोवर ते तुझ्याकडे आहे तुला कोणतही संकट शिवू शकणार नाही. यशस्वी हो आणि आमची आठवण ठेव.” नालंदा विद्यापीठाचा शोध घेत तेथे पोचला. निलकंठ शास्त्रींनी आपल्या स्नेह्याला आपल्या शिष्याबद्दल आणि त्याच्या महत्वकांक्षेबद्दल कळवले होते.

त्यांची भेट होताच गौतमला आनंद झाला. जगातील सर्वात पुरातन अशा विद्यापीठात तो पोहोचला होता.अनेक देशांच्या सहकार्याने जवळपास १००एकर जागेवर नालंदा विद्यासंकुल पून्हा दिमाखात उभे राहिले होते. भव्य दिव्य आणि तितकेच आकर्षक. तेथील व्यवस्थापक सुधांशु अय्यर यांना तो जाऊन भेटला, शास्त्री महाशयांनी दिलेले पत्र त्यांना दाखवले. ते हसले, त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, “शास्त्रींनी पाठवलं आहे म्हणून माझ्या विशेष अधिकारात प्रवेश मिळेल पण तद्पूर्वी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.” त्यांनी महाभारतातील,अनेक व्यक्ती रेखा त्यांची भुमीका याविषयी. चाणक्य निती विषयी चर्चा केली. संस्कृत मधील अनेक अर्थपूर्ण कोडी आणि त्यांचे समाधान यावर प्रश्न विचारले आणि समाधान झाल्यावर एक विशेष बाब म्हणून बाह्य विद्यार्थी म्हणून त्यास विशेष अटींवर प्रवेश दिला. त्याच्या अभ्यासा व्यतिरिक्त विद्यापीठात त्याने दररोज चार तास आपला वेळ देणे गरजेचे होते.विद्यापीठ आवरा बाहेरील वसाहतीत त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.एका खोलीत सहा सहा विद्यार्थी रहात होते. ते वेगवेगळ्या प्रांतातून विद्यार्जन करण्यासाठी आले होते.

त्याचा दिनक्रम सुरु झाला. सकाळी स्नान उरकून त्यांनी शिवस्तुती म्हटली. स्वतः जवळील डबीत असणारे शिवलिंग त्याने पहिल्यांदा पाहण्यासाठी डबी उघडली. त्यातून सहस्त्रावधी किरणे बाहेर पडल्याचा भास झाला. डोळे दिपून गेले. त्याने डबी मिटून टाकली. मनोभावे नमस्कार करून ती पुन्हा पिशवीत ठेवली. विद्यापीठ कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी नाश्ता केला आणि तो कार्यालयात गेला. अय्यर यांनी त्याचे स्वागत केले. त्याचा अध्ययन विभाग त्याला दाखवून दिला. दुपारी पुन्हा येऊन भेटण्याची सूचना देऊन ते निघून गेले.

त्या वर्गात तीस विद्यार्थी भारतीय बैठक सजवून बसले होते. त्यांचे अध्यापक एका बांबूच्या चटईवर बसले होते. उभा चेहरा, लांब दाढी, कपाळी भस्म, कपाळावर आठ्या. दंडावर चंदनाच्या रेघोट्या, मनगटात रूद्राक्ष माळ, श्वेत धोतर आणि कुर्ता असा पोशाख आणि ओठावर मंद स्मित. त्यांनी गौतमला परिचय करून द्यायला सांगितला तस त्याने प्रणाम करत आपली ओळख करून दिली. अभ्यास सुरु झाला. चार पाच दिवसातच गौतमने शिक्षणातील आपली अभिरूची दाखवून त्यांना अचंबीत केले. रोज आपला वर्ग संपल्यावर तो अय्यर यांच्या कार्यालयात मदतीसाठी जाऊ लागला.

नालंदा येथील संग्रहालयात अनेकांनी आपल्या घरी पडून असलेली दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्या संग्रहालयासाठी दान दिल्या होत्या. त्यात जुने ग्रंथही होते. त्यांची संख्या लाखाच्या घरात गेली असावी. त्यातील आवश्यक ती पुस्तके विषयानुसार वर्गीकरण करून निटनेटकी लावणे त्यांचे जतन करणे या कामात त्यांनी ग्रंथपालांना सहाय्यक म्हणून काम करणे अपेक्षित होते. या बदलत्या त्याला थोडे मानधन मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. ग्रंथ संपदा पाहून तो चक्रावून गेला.

तो नित्य नियमाने कानावरून गेलेल्या ग्रंथातील काही भाग वाचन करू लागला. भवभूती, चाणक्य नीती अशा ग्रंथाचे त्यांनी वाचनपठण केले. त्याच्या आकलनात भर पडू लागली. एखाद्या उपाशी बालका प्रमाणे तो वाचत होता.

विद्यापीठाने काही मार्गदर्शकांची मदत घेत निवडक ग्रंथांचे डिजिटल पुनर्मुद्रण सुरू केले होते. कागद जुना झाल्याने हाताळणे अवघड होते तसेच कसरीने खाल्ल्याने त्यातील अनेक शब्द वाचणे अवघड होते. गौतमने महत्प्रयासाने ते शोधले, साहजिकच त्याला अनेक ग्रंथ चाळायला मिळाले. कामाला दिशा मिळाली. गौतम अध्यात्म बरोबर पुराणकालीन शस्त्रे आणि अस्त्रे तसेच शल्य चिकित्सा या बाबत अभ्यास करत होता. फावल्या वेळात तो ग्रंथालयात वाचनात मग्न असे.

तिथे येऊन गौतमला तीन वर्षे झाली. या काळात अनेक देशी, परदेशी विद्यार्थ्यांशी ओळख झाली. त्यांच्या सोबत चर्चेची संधी मिळाली. जुनी हस्तलिखिते पहायला मिळाली, काही संस्कृत, तमिळ तर काही पाली भाषेत काही अर्धमागधी भाषेत होती. पाली आणि अर्धमागधी भाषेची तोंड ओळख झाल्याने त्याला वाचन करतांना सुलभता आली. हळूहळू त्या भाषांचा अभ्यास त्यानी सुरू केला. अनेक भाषा तज्ञांनी त्याला मदत केली. त्याला तुटपुंजी शिष्यवृत्ती मिळत होती त्यामुळे त्याच्या मनातील अनेक गोष्टी त्याला करता येत नव्हत्या. त्याचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व आहे हे नायर सरांना माहिती होते त्यांनी गौतमला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही माहिती इतर अध्यापक सहकाऱ्यांना सांगितली त्यामुळे काही परदेशी विद्यार्थ्यांनी त्याला संस्कृत शिकवण्याची गळ घातल्याने त्याला त्या बदल्यात त्यांच्याकडून आर्थिक मदत होऊ लागली. हळूहळू त्याच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी वाढले. नावलौकीक झाला.

यामुळेच त्याची ओळख अकिराशी झाली. ती दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती.आपल्या देशातील उच्च शिक्षण घेऊन ती संशोधन करत होती. बौद्ध धर्माची संस्कृती अभ्यासतांना तिला आपल्या संस्कृतीची आणि भारतीय संस्कृतीची नाळ जोडलेली आहे हे लक्षात आल्यानंतर ती भारतीय संस्कृती आणि स्थापत्य शास्त्र यांचा अभ्यास करायला आली होती. तिला भारतातील बौद्ध विहारांना भेटी द्यायच्या होत्या. तेथील स्थापत्य कलेचा अभ्यास करायची तिची इच्छा होती. दर दोन तीन महिन्यांनी त्यांचा गट एखाद्या पुरातन ठिकाणी क्षेत्रभेट करण्यासाठी जात असत.

कान्हेरी, अजिंठा, एलिफंटा, कार्ले, याच बरोबर रत्नगिरी येथील डोंगरशिल्पे, गुजरातमध्ये ढोलविरा येथे ५००० वर्षांपूर्वीचे आधुनिक शहर उत्खननात सापडलेले लोथल, मोहेंजोदरो, राखी गढ या सिंधू संस्कृतीच्या काळातील शहरांना त्यांनी भेट दिली. गौतमला या भेटी दरम्यान interpreter म्हणून सहभागी होता आले.स्थापत्य शास्त्राची तोंड ओळख झाली. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतांना गौतम तेथील भागाचा वाचनात आलेली पौराणिक कथा आणि इतिहास यांची माहिती त्यांना देत होता. रोज पायपीट करावी लागत होती. तेथील कार्यालयात पत्र देऊन अनुमती घेणे, गटाच्या सभासदांची व्यवस्था लावणे यात दिवस सरत होता. अकिराशी प्रत्यक्षात फारच थोडा वेळ भेट होई, ती कामात व्यस्त होती.अगदी पोटतिडकीने काम सुरू होते.

जेव्हा हा गट पुन्हा नालंदा येथे परतला त्यांनी गौतमची खूप प्रशंसा केली. आता अकिरा आणि तो वारंवार भेटू लागले. कधीकधी गौतम संभ्रमात पडे की आपण आपल्या ध्येयापासून दूर जात तर नाही ना? एक दिवशी त्याच्या स्वप्नात रामकृष्ण परमहंस आले आणि त्यांनी त्याचा संभ्रम दूर केला. मन मारून टाकण्याची आणि स्वःची उपेक्षा करण्याची गरज नाही अन्यथा संसार नाही आणि मोक्ष नाही हे पटवून दिले. पण जो जो तो अकिरा पासुन दूर जाण्याचा प्रयत्न करत असे तो तो अकिराची आठवण त्याचा पिच्छा पुरवत होती.

सुधांशु सर यांच्या जवळ त्यांनी आपण नालंदा सोडून कुठेतरी दूर जाऊ इच्छितो हे सांगितले तेव्हा त्यांनी जपानमध्ये इंडो जापनीज कल्चरल सेंटर मध्ये इंडियन आयडॉलॉजी शिकवण्यासाठी एका व्यक्तीची गरज आहे, तुझी मी शिफारस करतो, तू तिथे गेलास तर जॉब नक्की मिळेल आणि भाषा शिकण्याची संधीही. ते ऐकून त्याला आनंद झाला. त्याबे ते अकिराला सांगितले,तिला आनंद झाला.ती पुढच्या दोन महिन्यांनी आपल्या देशात जाणार होती. गौतम समोर प्रश्न होता. खरच आपलं इप्सित साध्य झालय का? आपण अकिराच्या मैत्रीसाठी अविचार तर करत नाही ना? त्यांनी पुरोहित काकांना फोन करून जपानला जात असल्याबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “देश सोडण्यापूर्वी आपल्या पालकांना भेटून ये, त्यांना या बाबत कल्पना दे.त्यांची अनुमती घे. आशीर्वाद घे.”

तो बऱ्याच वर्षांनी आपल्या गावी जाणार होता, आई वडिलांसाठी काही खरेदी केली. अकिराचा निरोप घेऊन तो निघाला. प्रवास करताना त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. एवढ्या वर्षानंतर आपण घरी जात आहोत, आईबाबा काय म्हणतील? आपण मुलाचं कर्तव्य पूर्ण केलं नाही याबद्दल दोष देतील का? आपली स्थिती काय असेल? अकिरा बद्दल सांगितले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते तिला स्विकारायला तयार होतील का?” गाडीत झोप नव्हतीच, सतत डोळ्यासमोर एक एक दृष्य चलत चित्रपटाप्रमाणे दिसत रहायचे. कधी पुरोहित काका,तर कधी शास्त्री तर कधी अय्यर. दुसऱ्या दिवशी तो आमरावती शहरात पोचला. बराच बदल झाला होता. शहराने कात टाकली होती. टोलेजंग इमारती उभ्या रहात होत्या.
रिक्षा पकडून तो घरी पोचला, त्याने बेल वाजवली, आईने दार उघडले, त्याच लक्ष तिच्या कपाळावर गेलं, कपाळाला कुंकू नव्हतं,त्याने हंबरडा फोडला, “आईsss” तिने त्याला आधार देत घरात घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्याला सोफ्यावर बसवत ती म्हणाली, “सगळ संपलं, उशीर केलास बाळा, तु गेल्यानंतर त्यांनी हाय खाल्ली, तुला कळवायच कसं? आमच्याकडे तुझा पत्ता नव्हता. ना फोन, पोलीसात तक्रार नोंदवली असती तर तू नाराज झाला असतास.”

त्याने स्वतः च्या गालावर सटासट मारून घेतलं, “होय मीच करंटा, मी स्वतः तुमच्याशी संबंध तोडले होते, मनात माया उत्पन्न झाली तर घरी परतण्याचा मोह आवरता आला नसता म्हणून. पप्पांच्या जाण्याला मी एकटाच जबाबदार आहे. परमेश्वरा हे माझ्या हातून काय घडलं, मला काही तरी वेगळे करायचे होते, असे काही की प्रत्येकजण माझी वाह वा करेल पण आता तर माझ्या वाट्याला फक्त तिरस्कारच येणार.”

तिने त्याला महत्प्रयासाने शांत केले. “हे बघ गौतम,उगाच रडत बसू नकोस, घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करत बसण्यापेक्षा भविष्यात दुःख करून घेण्याची पाळी येणार नाही याची काळजी घ्यायची असते. आता तू आला आहेस, माझी काळजी मिटली.जा प्रवासाने शिणला असशील आधी गरम पाण्याने आंघोळ कर ,चहा घे आणि शांत झोप घे.”

तो जपानच्या प्रयाणापुर्वी आई-बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला होता पण येथील परिस्थिती पाहता, आता पूढे काय? To be or not to be, सांगाव, की सांगू नये? न सांगता निघून जाण म्हणजे दुसरा धक्का देणं. जीने नऊ महिने आपल्या उदरी गर्भ वाढवून हे जग दाखवल त्या मातेची फसवणूक. काहीच तर निर्णय घेता येत नव्हता, मन सुन्न झालं होतं. एकिकडे त्याच्या वाटेवर डोळे लावून बसलेली अकिरा आणि दुसरीकडे जन्मदाती. त्याला तस बसलेल पाहून तिला संशय आला, “बाळा तू अवघडलेला दिसतोस तुला काही सांगायच आहे का? “

त्याने आवंढा गिळला,आपण धर्मग्रंथाचा अभ्यास करूनही कोरडे ठाक राहिलो, ‘कर्मण्ये वाधि कारस्ते मा फलेषु कदाचन’, अस फक्त वाचलं पण आपली स्थिती आज युध्दात उतरलेल्या अर्जुना प्रमाणे झाली आहे. मोठ्या निर्धाराने तो म्हणाला,”आई मी पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि भारतीय संस्कृती शिकवण्यासाठी जपानला जायच म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो होतो.इथे येऊन पाहतो तो..”

“बाळा तुला हाच प्रश्न पडला आहे ना,की मी तुझ्या पायातल्या शृंखला बनेन, तु परदेशी जाऊ शकणार नाही. पण मी एवढी का अप्पलपोटी आहे, की तुझ्या प्रगतीत लोढणं बनेन, नाही राजा मग तुला जननी शब्दाचा अर्थ उमगला नाही. जा तु निश्चिंत मनाने जा,माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.”

तो शांत झाला, स्वतः चे स्नानादीक काम आवरून त्याने चहा घेतला. प्रवासाचा शिण म्हणून तो झोपला,आणि झोपेतच दचकून जागा झाला. “नाही, आई नाही, मी कुठेही जाणार नाही, तुझ्या पायाशीच माझे स्थान आहे, क्षणभर मला मोह झाला होता पण गुरूजींच्या मार्गदर्शनाने मी मोठ्या पापातून वाचलो. किती अभागी आहे मी, मला मोहाची बेडी तोडता येत नव्हती आणि मी भारतीय संस्कृती शिकवण्यासाठी दुसऱ्या देशात निघालो होतो.”

त्याला प्रचंड घाम फुटला होता. अंग गरम झाले होते. त्याने डोळे उघडले, आई पाय चेपत होती. “बाळा काय झाले, स्वप्न का पडले? मी तुझ्या जवळ आहे. शांत हो,माझी चिंता करू नको, तो विश्वेश्वर माझी काळजी घ्यायला समर्थ आहे.” त्याने उठून आईचे पाय धरले, आई मला विश्वेश्वराने दर्शन दिले, माझे डोळे उघडले, मी भारतात राहून मला अजूनही न उमगलेलं ज्ञान आत्मसात करीन. मला कोठेही जायचे नाही. आईने त्याच्या केसात हात फिरवत मायेने जवळ घेतले.”बाळ गौतम तुला आलेली संधी दवडू नको, माझे असे कितीसे दिवस राहिले आहेत. तुला आलेली संधी दवडू नको. तू मोठा झालेल मला ऐकायचं आहे.जा ज्याच्यासाठी तू घरदार त्याग करून बाहेर पडलास ते स्वप्न पूर्ण कर.” त्याच्या जीवाची घालमेल होत होती.आईच्या शब्दाने हुरूप आला. “आई ! तू खरचं मला जायला सांगतेस?” “होय गौतमा,कदाचित तुझ्या बौधीसत्वाचा वृक्ष तिथेच असेल, जा आपल्या भारतीय सभ्य संस्कृतीचा प्रचार, प्रसार कर,कदाचित तुझा जन्म त्यासाठीच असेल.”

तो एक आठवडा राहिला, त्याने शाळेला भेट दिली,तेथे त्यांनी नालंदा विद्यापीठ पुनर्वसन आणि शिक्षण संधी यावर भाष्य केल. मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या.आपल्या आप्तेष्टांचे आशीर्वाद घेतले आणि परतीच्या वाटेला लागला. जपानला जाण्यापूर्वी त्यांनी पुरोहित काका आणि शास्त्री गुरूजी यांची भेट घेतली. दरम्यानच्या काळात त्याचा व्हिजा आणि निमंत्रण त्याला प्राप्त झाले होते. अकिरा आणि तो नालंदाच्या अय्यर सरांना भेटले. त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले. भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी त्याने मातृभूमी आणि जन्मदाती यांचा निरोप घेतला होता. वृद्धपकाळात जन्मदात्रीची सेवा करण्याची संस्कृती तो विसरला होता मात्र भारतीय संस्कृती शिकवण्यासाठी तो भुमातेला सोडायला तयार होता. कसा हा योगायोग. काही गोष्टी अतर्क्य असतात त्याचा अर्थ लावण्यासाठी काळ यावा लागतो. पण असाही एक गौतम होऊन गेला हे त्रिकालाबाधित सत्य काळाच्या उदरात गडप होण्यापूर्वी आपल्या चरणी अर्पण करावं अस वाटलं. गौतमनेच स्वप्नी आत्मकथन केल ते मी शब्दबद्ध केलं. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऋणातून मुक्त होण्याचा एक अयशस्वी मार्ग अस हव तर समजा.

॥कृष्णार्पणमस्तु॥

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar