कट्टा
कट्टा हा शब्द तसा जाम ‘भारी’. म्हटलं तर थट्टेचा विषय, म्हटलं तर भितीचा पण म्हटलं तर प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचा. अनेकदा पोलीस कारवाई करून हत्यारे जप्त करतात त्यात गावठी कट्टा सापडला असा उल्लेख असतो. आपणही ते ऐकलं असेल, वाचलही असेल. तर पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रास्त्रातील कट्टा किंवा गावठी कट्टा म्हणजे बेकायदेशीरपणे हाताने बनवलेले पिस्तूल जे वापरण्यास सुरक्षित नसते. हे शस्त्र विकणे, खरेदी करणे वा कोणत्याही कारणासाठी वापर करणे हा गुन्हा आहे. असे असले तरी आजही ग्रामीण भागात विनापरवाना वापरली जाणारी शस्त्र खरेदी होतात. ही शस्त्रे महाराष्ट्राच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र या सिमेवरून महाराष्ट्रात येतात. गावगुंड शहरात वा गावात दहशत माजवण्यासाठी त्याचा उपयोग करतात.
कधीकधी हा गावठी कट्टा वापरणारे, हा कट्टा चालवताना स्वतः जखमी किंवा कायमचे जायबंदी होतात. दुर्दैवाने अजूनही समाजात समाजभान किंवा याच्या वापरा विषयी संभाव्य धोक्याची योग्य जाणीव आली नसल्याने गुंडगिरी करणारे महाभाग तो कट्टा स्वस्तात आणि विना परवाना मिळतो म्हणून खरेदी करतात आणि पराक्रम करताना फसतात. बाजारपेठेत दहशत माजवण्यासाठी, हप्ते वसुलीसाठी, किंवा एखाद्या व्यक्तीचे अपहरण करण्यासाठी अशा फालतू ट्रिक हे दिड शहाणे गुंड लढवतात. आपल्याला या कट्टा प्रकरणाशी काही घेणे देणे नाही पण प्रचलित शब्द माहिती असणे गरजेचे आहेच.
आपल्या देशात फार फार वर्षांपासून चावडी हा शब्द प्रचलित आहे, चावडीचे आधुनिक स्वरूप म्हणजे कट्टा, तर ग्रामीण भागात दररोज कामधंदा नसणारी टवाळ पोर, माणसे जेथे एकत्र येऊन दुनियेत घडणाऱ्या आणि ज्याची फारशी माहिती कोणालाही नाही अशा गोष्टींवर उगाचच वायफळ चर्चा करण्यात जिथे गुंतलेली असतात आणि आपले अर्धवट ज्ञान जगाला देण्याचा उगाचच प्रयत्न करतात ती चावडीची जागा किंवा शहरातील चौक जेथे वेगवेगळ्या समाजातील, व्यवसायातील मित्र ऐकमेकांना भेटतात, विचारांची देवाणघेवाण करतात, आपल्या शंकांचे निरसन करतात किंवा आपल्या जवळच्या चुकीच्या ज्ञानाने दुसऱ्या व्यक्तींची चिंता वाढवतात अशी बिनकामाची नसली तरी चुकीची जागा म्हणजे चौक किंवा कट्टा असा कधीकाळी माझा समज होता. ‘आपली समज तसा आपला अर्थ’ . प्रत्येक गोष्टीत अन्वयार्थ शोधायचा नसतो. दुर्दैवाने आपण दुसऱ्यांना रिकामटेकडे म्हणत असताना स्वतःतेच रिकामटेकडे उद्योग करतो.
इलेक्ट्रॉनिक कट्टा म्हणजे WhatsApp मंत्रालय, अर्थात सोशल मिडिया, समोरासमोर उभे न राहता व्यक्त होण्याचे जबरदस्त माध्यम. तसे ते फायद्याचे, चुकून समोरच्या विषयी काही अपशब्द लिहिले गेले तरी हातापाई होत नाही त्याअर्थी अहिंसक मार्ग. शब्दांची जखम मोठी असली तरी आठ दिवस माध्यमावरून गायब झाले की पुलाखालून खूप पाणी पाहून जाते. Memory is short lived अस म्हणतात. राजकारणात आपल्याला खुप काही कळतय अस समजून आपला मित्र परिवार सोशल मेडियावर प्रवचन देतच असतो. कोणी सरकारची तरफदारी करतो तर कोणी गांधी कुटुंबाची तळी उचलतो.
कोणी समाजवादाच्या गप्पा मारतो. तापातापी होते,एखाद्या व्यक्तीला मिम्स पाठवले जातात, टार्गेट केले जाते आणि काही दिवसांनी सर्व विरूनही जाते. कधीतरी सोशल मिडियाचा गैरवापर केल्याने गुन्हा दाखल होतो. माध्यम फुकट असलं तरी कोणाविषयी किती काय लिहावे आणि हाती काही पुरावा नसताना किती मांडावे ह्याला मर्यादा हवीच. आपण प्रत्येक जण आता अशा सोशल कट्ट्याचे सभासद आहोत पण सोशेल तेवढच लिहा, उगाच अति कराल आणि जायबंदी व्हाल.
गावाकडे किंवा शहरात याच कट्ट्यावर बसुन लोक एकमेकांचे ज्ञान प्रबोधन करतात. एकमेकांच्या बाबतीत चुकेचे भाष्य करून वैर पेटवतात, येथूनच चुकीच्या संदेशाचे आदान प्रदान करतात. जो तेथे हजर नसेल त्याची कुचेष्टा करतात. लावालाव्या करतात. असे मला नेहमीच वाटत आले याचे कारण मी गावी तसे अनेकदा पाहिले, ऐकले. याच कट्ट्यावर कधीतरी चर्चा करतांना मतभेद विकोपाला जाताच एकमेकांच्या आई वडिलांचा समोरासमोर उध्दार करतात, गळा पकडतात, उरावर बसतात किंवा माथी भडकली तर एकमेकांचा खूनही पाडतात. तरीही गावातील चौक ही माहिती मिळवण्याचा खात्रीशीर जागा असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
गावाच्या चावडीवर गावात कोण नवे सरकारी कर्मचारी, परिचारिका,डॉक्टर मॅडम कामावर रुजू झाल्या. कोणाच्या म्हशीला रेडी झाली? म्हैस पैलारू की जुनी इथंपासून ते गावात कोणाची कोणाशी लफडी आहेत? किंवा जे शहरात कामाला गेलेत त्यांना कोणाला किती हजार पगार आहे ? अशी एकत्रित माहिती याच चावडीवर मिळते. कट्ट्यावर ऐकलेल्या वितभर गोष्टी हातभर कधी झाल्या कळतही नाही. ध चा मा करण्यात कट्ट्यावरील महाभाग माहीर असतात आणि त्याने महाभारत घडते हे ही तितकेच खरे. तेव्हा ‘आमची शाखा कुठेही नाही’ असे चावडीवर लिहायला हरकत नाही.
साहित्य कट्टा हा शब्द तुम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षात दुरदर्शनवर पाहता, ऐकता यात अनेक साहित्यिक व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास कसा घडला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकतो, कै. विक्रम गोखले अशाच एका कार्यक्रमात मराठी लेखक, अभिनेते, निर्माते यांना त्यांच्या दुसरी बाजू कार्यक्रमात बोलते करत. पण चाळीस वर्षांपासून साहित्य कट्टा गिरगाव, गोरेगाव, पार्लै, मुलुंड या मराठी जनतेच्या गल्लीत तो माणसाळला होता. येथे दर शनिवार रविवारी एखाद्या विषयावर विधायक चर्चा चाले. शासनाच्या विविध खात्यात असणारे बाबू अर्थात साहेब मंडळी त्या विषयावर आपले मत प्रदर्शीत करीत. मग ते सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयावर मत प्रदर्शन करून ते मुद्दे लिहून काढून त्यावर पुन्हा साधकबाधक चर्चा करून ते नगराध्यक्ष, शासनाच्या एखादा विभाग,एखाद्या खात्याला कळवित. त्याचा पाठपुरावा करून घेत. मग हे पत्र शहरात असणाऱ्या विविध अपुऱ्या रस्त्याविषयी , आरोग्य सुविधेविषयी किंवा शहरातील कच्च्या सुरक्षा व्यवस्थेविषयी असे.
याच कट्ट्यावर कधीकधी जेष्ठ साहित्यिकांच्या मुलाखती होत असत. त्या साहित्यिकाला जाणून घेण्याचा तो प्रयत्न असे. अशाच प्रकारच्या कट्ट्यावर नवकवींचे संमेलन घडवून आणले जाई. तेव्हा ते अनेक लोकांसाठी व्यासपीठ ठरे. शहरातील अनेक आंदोलनाचे नियोजन अशाच कट्ट्यावर झाले असेही म्हणता येईल.
मी दहावी बारावीत असतांना गोरेगाव येथे आमच्या चुलत बहीण भवांकडे जयप्रकाश नगर, गोगटे वाडी, पांडुरंग वाडी या भागात जात असे तेव्हा तेथे जेष्ठ कट्टे असायचे. आणि आता सांगायला हरकत नाही ही माणसे जमलेली पाहिली की यांना काही उद्योग आहे की नाही? इथे रिकामटेकडे का बसले असावेत ? असा प्रश्न माझ्या मनात येई.
त्यानंतर मला समजले, हे कट्टे काही वृद्ध व्यक्तींसाठी आपले विचार मांडण्याचे किंवा भावनिक भूक भागवण्याचे ठिकाण आहे. जे विचार स्वतःच्या घरात उघडपणे बोलण्याची त्यांना चोरी होती किंवा मनाई होती ते वयोवृद्ध येथे आपल्या समवयस्क मित्रांसोबत आपले दुःख हलके करीत असत.
आज अनेक बागांमध्ये किंवा बागेच्या बाहेर असणाऱ्या बाकड्यांवर वयोजेष्ठ मंडळींचे कट्टे भरत असतात. एक ठराविक वय ओलांडले की घरातील वृद्ध व्यक्ती ही कौटुंबिक अडचण ठरते, विशेषतः पुरुष, कारण त्यांना मुलांच्या आणि नातवाच्या अनेक विषयात उगाचच मत व्यक्त करायचे असते. त्यांची सुरवात ‘आमच्या वेळेला, हे असे नव्हते, किंवा मी त्यावेळेस असे करत होतो.’ एक दोन वेळेस मुलं, नातू त्यांची गोष्ट ऐकून दुर्लक्ष करतात. पण पुढील वेळेस आजोबांचे बोलणे त्याच दिशेने जात आहे हे नातवाच्या लक्षात आले की त्याचा संयम सुटतो मग तो आजोबांना सुनावतो, “आजोबा मी अस बाबांच्या तोंडून ऐकलयं की तुमचे आजोबा फक्त कमरेवर एक वस्त्र गुंडाळत होते पण अंगावर बनियन, सदरा, काहीच घालत नव्हते, मग तुम्ही उगाचच तो लेहंगा, त्यावर झब्बा,खिशात परिट घडीचा रूमाल असा जामानिमा करून बाहेर का निघतात? या वयात हे शोभत का?”,
नातवाने आजोबाच्या तिनही दांड्या गुल केल्यानंतर आजोबा काय बोलणार? तेव्हा आपले विचार व्यक्त करायला, एकमेकांना समजून घ्यायला, कुणीही विचारले नाही तरी फुकटचा सल्ला देण्यासाठी व्यासपीठ म्हणून कट्टा हवाच हवा.
हल्ली मी बागेच्या किंवा रीक्षा स्टँडच्या बाजूला असलेल्या बाकड्यांवर वृद्ध आणि सेवानिवृत्त बायका एकत्र बसून गप्पा मारताना पाहतो. ज्यांच्या घरात सून आलेली आहे, तिला किचन तिचं स्वतःच वाटावं, आपण त्यात लुडबूड करू नये यास्तव हा प्रयत्न एखादी निवृत्त महिला करत असेल तर अभिमानास्पद आहे. अर्थात महिलांनाही आपल्या सुनेबद्दल किंवा आपल्या शेजारच्या कुटुंबाबद्दल गॉसिप करायला आवडते. त्यामुळे महिलांनी असा कट्टा चालवला तर कोणी नाक मुरडण्याची गरज नाही. त्यांनाही मन मोकळं करायचे असतेच की. या महिला एकत्र जमून पिकनिक काढतात, पार्टी ठरवतात, स्वतःसाठी जगतात. काय हरकत आहे असं नाक्यावर जमून आपले मन मोकळे करायला. मोठ्या घरातील बायका कुठेतरी पबमध्ये जमतात, किंवा एखाद्या मैत्रिणीच्या घरी जमतात तो ही त्यांचा कट्टाच तर असतो.
बर असा कट्टा असणं ही वयोवृद्ध व्यक्तींचीच गरज नाही तर युवक आणि विवाहित तरूणांचीही ती गरज आहे. युवकांची व्यक्त होण्याची एक वेगळी भाषा असते, ती भाषा घरात बोलता येत नाही, ती समवयस्क मित्रांसोबत बोलता येते किंवा तरूण वयात शरीरात जे बदल होत असतात आणि भावनांची जी आवर्तन निर्माण होतात ती कुठेही व्यक्त करता येत नाही. यासाठी समदुःखी मित्र सार्वजनिक बागेच्या बाहेर एखादा कोपरा गाठून आपलं कोंडाळ जमवतात आणि तिथे अतिशय दुर्लभ आणि गलिच्छ भाषेत व्यक्त होतात. दुर्दैवाने त्या वयात ती त्यांना ती गरज वाटते.
त्यांच्या मनातील गोंधळ मांडण्यासाठी आणि विचारांचा निचरा होण्यासाठी त्या कट्ट्याची गरज असते. ऐकट्याने मनाचा कोंडमारा सहन करण्याची हिंमत त्यांच्यात नसते. मग परीक्षेतील अपयश असो किंवा प्रेयसीने दिलेला नकार अथवा अभ्यासात फेल्युअर ठरला म्हणून बाबांनी चार चौघात काढलेली खरडपट्टी किंवा काही व्यसन करताना कुटुंबातील जेष्ठानी पाहिले आणि ते सोशल होऊन नाचक्की होण्याचे भय. अशी कोणतीही गोष्ट स्वतःबाबत झाली की मित्र आठवतात. त्यांच्याकडे. व्यक्त झाले तर दुःख हलक होत.
भावनिक कोंडमारा झाला तर त्याचे पर्यवसान अशा मुलांच्या वर्तनातील चिडखोरपणा, उध्दट वागणे यात परावर्तित होतो. जर मानसिक ताण असह्य झाला तर विचार आत्महत्येत बदलू शकतात. त्यामुळे पालकांना मनातून आवडत नसले तरीही कधीतरी अशा कट्ट्यावर मुलगा वा मुलगी गेली तर खरडपट्टी काढणे योग्य ठरणार नाही. पालकांनी जागल्याची भुमीका घ्यावा पण जर आपल्या मुलाला तेथे जाण्यापासून रोकले तर तेथे जाण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.
तेव्हा आपल्या राहत्या नगरातील गर्दीच्या ठिकाणी किंवा निवांत ठिकाणी मुले एकत्र येऊन कुजबुजत असतील किंवा हलक्या आवाजात बोलत असतील तर समजून जा की कोंडलेल्या वाफेला ते मोकळं करत आहेत. पण आपण आंधळा विश्वास मात्र त्यांच्या एकत्र येण्यावर ठेऊन चालणार नाही. याचे कारण कधीकधी या अशा कट्ट्यावर विघातक कृत्याचे डाव ठरतात. जसे या कट्ट्याचा उपयोग विधायक कामासाठी होऊ शकतो तसाच तो विघातक योजनेसाठी होऊ शकतो. मग दरोडा टाकणे,अति वेगाने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवणे, चुकीच्या गोष्टीवर बेट लावणे असे प्रयोग होतात आणि तरूण जीव गमावून बसतात.
सध्या विविध दुरदर्शन वाहिन्या अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतात त्याला कट्टा किंवा चावडी, अदालत असे गोंडस नामकरण केले जाते,आप वाहिनीवर असा मुलाखत कट्टा भरतो. यात आपची पूर्ण टीम विरुद्ध आमंत्रित अशी ही मुलाखत रंगत असते. रजत शर्मा किंवा ABP Maza मुलाखतकार अश्विन बापट हे आमंत्रित व्यक्तीला बोलत करण्यासाठी किंवा कोंडीत पकडण्याची पराकाष्ठा करत असतात. आजपर्यंत या कट्ट्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह अनेक राजकरणी, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले आहेत. हस्ते परहस्ते एखाद्या सेलिब्रिटी बद्दल ज्या गोष्टी बापट यांच्या कानापर्यंत पोचल्या असतील त्या बाबत योग्य शब्दात त्यांच्याकडून माहिती काढण्यात ते पटाईत आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीकडून अचूक माहिती कशी काढाण्यात ते पारंगत झाले आहेत.
सध्या बागेच्या बाहेरील बाकड्यावर वयोजेष्ठ मित्रांचे कट्टे जमून अमेरीकन परराष्ट्र धोरण, ट्रंप यांच्या मुस्क्या आवळण्याची शक्यता, सिंदूर राजकारण, बिहार मतदार यादीतून ६५ लाख मतदारांची नावे कमी करण्यामागचे राजकारण, मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार ? दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? कंगना रणावत आणि प्रियांका वढरा यात भारी कोण? अशा विविध विषयांवर दबक्या आवाजात गप्पा मारत असतात.
त्यांच्यातही किमान दोन तट असतातच. प्रत्येक जण आपले मत हिरिरीने मांडत असतो. अधुनमधून आवाज टिपेला जातो आणि कुणी तिथे पाहिले की काही घडलच नाही इतक वातावरण शांत होत. कट्टा ही माणसाची ज्ञानाची, मनाची, अज्ञान दूर करणारी आणि माहितीची भूक भागवणारी कार्यशाळा आहे. तेव्हा कट्टा ही उपेक्षित सामान्यांची गरज आहे असे म्हटले तर वावगे वाटू नये.
केवळ आधुनिक माध्यमाचा वापर करून ज्ञान आणि माहिती मिळवण्यापेक्षा अनुभवी आणि तावून सुलाखून परिपक्व झालेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकण्यासाठी ,ज्ञान मिळवण्यासाठी, विविध विषयांची नवी माहिती कळावी, नवा उपक्रम कळावा म्हणून, विरंगुळा म्हणून किंवा बहुश्रुत व्हावे म्हणूनही कट्टा असणे आणि तेथे हजेरी लावणे ही गरज आहेच. तेव्हा जर हळूहळू आवाजात किंवा तावातावाने एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कोणी बोलत असेल तर ते भांडण समजू नये. तो असतो कट्ट्यावरील वाद आणि संवाद.
uwi00k