गवत फुला रे गवत फुला
श्रावणातल्या रिमझिम सरी सुरू झाल्या आणि उन-पाऊस असा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. गवताला इटुकली पिटुकली फुल दिसू लागतात आणि पाहता पाहता सगळे रान आनंदात बुडून जाते.
“रंग रंगुल्या सान सानुल्या गवतफुला रे गवत फुला
“असा कसा रे मला लागला, तुझा लळा रे तुझा लळा”
ही इंदिरा संत यांची कविता आठवल्याशिवाय रहात नाही. फक्त रानातच नाही तर बांधा बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा हे वैभव फुलत असतं. काही धवल शुभ्र, तर काही पिवळी तर काही फिक्कट निळी अशी शेकडो फुल मन प्रफुल्लित करतात. या गवत फुलांवर पावसाचे कण हिऱ्याप्रमाणे सकाळच्या किरणात चमकत असतात. या फुलाला असणारे रंगीत परागण कोंदणात बसवलेल्या पाचू प्रमाणे भासतात. वारा त्यांच्या त्या नाजूक रूपावर भाळतो आणि त्यांना झुल्यावर बसवून झुलवतो. फुलपाखरे त्यांच्या भोवती पिंगा घालून त्याच्यांमधील मध शोधात फिरत असतात. अतिशय हळूवारपणे हवेत उडता उडता मध शोषून घेण सुरू असत.
या फुलांचं आयुष्य अवघ दोन दिवसांच असतं. या दोन दिवसात ते निसर्गाच रूप बदलून टाकतात. आयुष्य छोटं असलं तरी फुलपाखराला आणि कवी मनाच्या माणसाला ते आनंद देतात, मोद देतात. डोंगराच्या माळावर गेलात तर या गवतफुलांच नंदनवन अवतरलेलं दिसेल.
या गवताला एक वेगळाच गंध असतो तो श्वासात भरून घ्यावा.या गवत फुलाला हळूवारपणे गोंजाराव त्याच रूप मनात साठवून घ्याव. कासच पठार सगळ्यांच्या परिचयाचं, लाडकं, तेथे असणारी विविध फुलं मनोवेधक यात वाद नाहीच. असंच फुलांच नंदनवन कोकणात भोगवे येथे सड्यावर म्हणजेच डोंगरावरील माळावर पाहता येईल. एका बाजूला गर्जना करणारा तर कधी धीरगंभीर असा अथांग सागर आणि दुसरीकडे हा माळ. अतिशय विलोभनीय असं हे दृश्य. भोगाव्याला जाणं चिपी विमानतळामुळे अगदी सहज शक्य होईल. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये हा फुलांचा नजरा तुम्ही पाहू शकाल. ज्याच्याकडे सौंदर्य दृष्टी असेल त्याला माळावरील गवतफुलही तितकंच आकर्षक दिसेल. खडक फोडून बाहेर पडण्याचं त्याच सामर्थ्य, जगण्याची, अडचणीत वाट काढण्याची जिद्द तुम्हाला प्रेरणा देईल. घराबाहेर पडून मोकळ्या माळ रानात जा, किंवा टेकडी गाठा, हे गोजिर रूप तुमच्या स्वागताला नक्की उभं असेल.
ओढ्याच्या काठा काठाने किंवा बांधवर रान उडीद वाढत असतो,या उडीदाला ऑगस्ट महिन्यात जांभळ्या रंगाची नाजूक फुले येतात. या फुलांवर फुलपाखरे मध टिपण्यासाठी येत असतात. त्यांचे विविध रंग पाहिले की निसर्गाच्या क्षमतेचा हेवा वाटतो. फुलांचा रंग उत्तम की फुलपाखरांचा उत्तम हे ठरवणे अवघड वाटावे इतकी विविधता आणि रंगांची उधळण त्या दोघांवर निसर्गाने केलेली दिसते.
ही फुलपाखरे उडतांना त्यांच्यावर कोवळी किरणे पडली की फारच आकर्षक दिसतात. उडता उडता त्या नाजूक फुलांवर क्षणभर बसून ते मध शोषून घेते. पाऊस संपता संपता अगणित चतुर आणि फुल पाखरं या गवत फुलांवर खेळतांना तुम्हाला दिसतील. फुलपाखरे इतकी नाजुक असतात की फुलपाखरांना धरू गेल्यास त्यांचा रंग हाताला लागेल किंवा त्यांचा पंख तुमच्या हाती येईल म्हणून त्यांना हातात धरणाचा नतद्रष्टपणा करू नये त्यांचे रूपरंग डोळ्यातच साठवावे.
कवी ग.ह.पाटील यांची कविता अचानक आठवली तिसरी किंवा चवथी इयत्तेत होती. पाटील यांनी फुलपाखरांचे यथार्थ वर्णन केले आहे.
फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू छान किती दिसते
या वेलीवर, फुलां बरोबर गोड किती हसते, फुलपाखरू
पंख, चिमुकले, निळे जांभळे, हालवुनि झुलते, फुलपाखरू
लहानपणी आम्ही चतुर किंवा दिंडोशी धरून त्याच्या शेपटीला सूत बांधत असू, तसेही चतुर धरणं फारच अवघड, अंगठा आणि मधले बोट यांचा वापर करून त्याला अलगद शेपटीला धरले तरच तो पकडता येतो.नीट निरीक्षण केले तर त्याचे गोलाकार डोके आणि त्याखाली असलेले छोटे तोंड सहज दिसते. चतुर अतिशय वेगाने पंख फडफडवत असतो.
याच काळात आपट्याच्या झाडावर एक सोनेरी कीटक त्याची कवळी पान खाण्यासाठी येऊन बसतो.हा किटक चांगला जाडजूड असतो. याचा एक पाय अर्ध्यावरून तोडून त्या भागात पानाच्या मधून घातलेला काटा टोचला आणि पानात गुळगुळीत काठी घालून ही काठी दोन्ही हाताच्या अंगठा आणि बाजुचे बोट यामध्ये धरून एक दोन वेळा गोल,स्वतःभोवती फिरवली की हा किटक काठी भोवती गरगर फिरू लागतो.चक्क अर्धा अर्धा तास न थकता तो फिरत असतो.खरे तर ती त्याची सुटून जाण्याची धडपड असते ,पण दुर्दैवाने आम्हाला तेव्हा ती करमणूक वाटत असे. त्याचे सोनेरी पंख उन्हात चमकत असतात. आम्ही त्याला कवळी पाने खायला घालत काडेपेटीच्या खोक्यात बंद करत असू. अर्थात हे अमानुष कृत्य आहे हे तेव्हा कळत नव्हतं.
पाऊस कमी झाला की एका प्रकारच्या गवताला काळ्या रंगाचे टोकदार व कडक पाते बाहेर पडत, हाच तो गवताचा बाण किंवा भाला. जर अश्विन महिन्यात तुम्ही बांधावरून चालण्याचा किंवा गवती प्लॉट मधून चालण्याचा प्रयत्न केला तर हे गवताचे भाले टोचल्या शिवाय सुटका नाही. बर एका वेळेस असे अनेक बाण तुमच्या कपड्यात शिरतात आणि सहजासहजी निघत नाहीत कारण त्याला कुस असते ते उलट्या पात्याप्रमाणे रुतून बसते. गवताचा एक वेगळा प्रकार देखील असतो याच्यावर एक छोटे तीन पाकळ्या सारखे अरूंद फुल येते. ते अतिशय तलम असते. ते गवताच्या मुख्य रोपट्यापासुन अलग करून दोन्ही तळव्यात धरलं आणि दोन्ही तळवे एकमेकांवर अलगद सरकवले की हे फुल हवेत उंच उडत.
लहानपणी अजूनही एक गंमत आम्ही करत असू, मैदानावर चिमण्यांचे गवत उगवत असे या गवतावर तांदळाच्या आकाराचा चपटा दाणा असे, चिमण्या भुक लागली की ह्या गवताचा चपटा दाणा खातात म्हणून त्याला चिमण्यांचे गवत म्हणतात. हे गवत फार उंच वाढतही नाही आणि अतीशय देखणं दिसत. या गवतावर आम्ही मनसोक्त लोळत असू.
खाडीच्या काठावर असेच उंच वाढलेले गवत दिसून येईल, हे गवत आतून पोकळ असते. याच्या डोक्यावर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांद्याला जशी धण्यांच्या आकाराचे बिज असते तशी फुल येतात, याला लव्हाळी असे म्हणतात. भरती आली की लव्हाळी पाण्यावर लोळण घेते आणि ओहोटी सरत आली की लव्हाळी पुन्हा ताट उभी राहते. याची तात्पुरती बिछायत अतिशय आरामदायी असते. ‘महापूरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती’ असे म्हणतात ते त्याच्या नम्रपणा या गुणधर्मामुळे. ही लव्हाळी तीन साडेतीन फुट उंचीपर्यंत वाढते. आदिवासी समाज, घरावर छत साकारण्यासाठी त्याचे अस्तर घरावर घालत होते. आदिवासी लोकांच्या घराच्या भिंती ह्या कारवीच्या काठ्या एकत्र गुंफून किंवा विणून बनवलेल्या असतात. ह्या काठ्या सात ते आठ फुटांपर्यंत सरळसोट वाढतात. त्या आणून पूर्ण वाळवल्या की एका समोर एक ठेवत काथ्याच्या दोरीने वेणीतील फुलांप्रमाणे गुंफतात,त्या पासून जी एक सेंटीमीटर जाडीची भिंत उभी राहते तीलाच कुड म्हणतात. या कारवीला चैत्र, वैशाख महिन्यात सुंदर सफेद फूले येतात.
वाळ्याचे गवत हे नदिच्या काठाने उगवते, हे बहुवर्षायू गवत असून हैत्ती, इंडोनेशिया, भारत या ठिकाणी उगवते . त्याला ‘खस’ असेही म्हणतात. या गवताला वेगळा सुगंध आहे. हे गवत मृदेची धूप थांबवते. उन्हाळ्यात काही नागरीक दारासमोर वाळ्याचे पडदे बांधून त्यावर पाणी फवारतात यामुळे उन्हापासून संरक्षण होते. थंड माठात हे गवत घातले की त्याचा सुंदर गंध येतो.
मारवेल, कसळी, हरळी, तांबट, भुई शिरड अशा काही आणखी गवताच्या जाती आहेत. विशेषतः दर पावसाळ्यात हे गवत स्वतः उगवते आणि तिन महिने धरित्रीला वेगळाच साज चढवते. कोकणात बांधाच्या कडेने उंच वाढणारी गवताची एक प्रजाती म्हणजे बोरू याची धाटणी ऊसा सारखी असते. अर्थात याचे पान अरूंद पण लांबसडक आणि धारदार असते. त्याच्या पानाच्या पात्याला हात स्पर्शून गेला तर त्वचेवर खोल जखम होते इतके ते धारदार असते. गोंड्याचे गवतही असेच ओहोळाच्या कडेने उगवते याला झुबकेदार फुले येतात हि फुले गोंडा किंवा झेंडूच्या फुलांच्या माळेत आवर्जून घालतात. गावाकडे बैलपोळ्याच्या दिवशी याची माळ बैलांच्या गळ्यात घालतात. या फुलांना राखाडी किंवा निळा रंग असतो.
फुललेले गवत आणि त्याची नजाकत पाहण्यासाठी डोंगर माथ्यावरील माळावर किंवा ओहोळाच्या काठीच गेले पाहिजे. त्या वातावरणात थोडा वेळ घालवला किंवा त्या गवतावर छान बैठक मारली तर तुमच्या नजरेस आजुबाजुला बागडणारी फुलपाखरे नजरेस दिसतील. याचा होणारा आनंद हा अवर्णनीय असेल.
सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे तसेच वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथे सप्टेंबर महिन्यात पाऊस संपता संपता निसर्ग आपले वैभव मांडून प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत असतो. पण ते दरवर्षी घडेलच याचा नेम नाही. फुले फुलू लागली की वनखाते या बाबत माहिती वृत्तपत्रात पाठवते. या पठारावर फुलणारी फुले पाहिली की निसर्गाच्या कलाकृतीचा हेवा वाटतो. तेथे भेट देण्यासाठी गेले तर पाऊल तेथून निघतही नाही. मात्र तिथे फिरताना आपल्या पाऊल खुणा सोडू नये. कोणताही कागद, प्लास्टिक, पेय बाटल्या टाकून हे ठिकाण प्रदूषित करू नये.
सिल्व्हासा गुजरात येथे सुंदर फुलपाखरे उद्यान आहे. भारतात काश्मीर घाटी, लद्दाख, हिमालय प्रदेश, उत्तराखंड अशा हिमालयाच्या रांगात, दरी खोऱ्यात काही काळ पसरलेले हे वैभव पाहायला पर्यटक आवर्जून जातात आणि या नैसर्गिक चमत्काराच्या प्रेमात पडतात.अर्थात इतक्या दूर जाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी कोकण पठार गाठावे.पश्चिम घाटातून भ्रमंती करावी. स्थानिक तरुण किंवा वृद्ध या बद्दल आपल्याला नेमकी माहिती देऊ शकतील. आता कोकणात गणपतीसाठी मुद्दाम जातच आहात तर ही रानफुले वापरूनच गणपतीची सजावट करा. उगाचच थर्माकोल, प्लास्टिक, नायलॉन रिबन यांचा अतिरेकी वापर करू नका.
दर दोन दिवसांनी तुम्ही आवश्यक तितकी रानफुले वापरून बाप्पा समोरील सजावट करून वेगळी बहार आणू शकाल. तर या वर्षी बाप्पासाठी तुमच्या अदाकारीने मकर नटवा, सजवा आणि आनंद फुलवा.