तर!
गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सर
वर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावर
तुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तर
तुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर।
नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते घर
नाही झालीस माझी तरी मनी अजूनही आदर
एकतर्फी करून प्रेम मी ओढली प्रेमाची चादर
तू माझीच आहेस कल्पून माझ्या काव्याचा बहर।
कोणत्याही ड्रेसमध्ये दिसायची तितकीच सुंदर
तुझ्या केसांचा धुंद गंध, तिथे फिके पडे अत्तर
तुझे हळूवार बोलणे विषयातील तुझा मुक्त वावर
विषय ज्ञानाची खोली, ‘अक्षर शिल्प’ मोहक सुंदर।
तुझ्या ज्ञानामृताचे चार थेंब, मी कापले गुणांचे अंतर
गोडी लागली अभ्यासाची वाटले आता गाठूच शिखर
तुला पाहीले की माझ्या काव्याला येई नकळत बहर
पावसाच्या एका शिडकाव्याने जसा फुलून येतो तगर।
तुझा निमगोरा रंग,आखीव चेहरा अन नाजूक अधर
तुझे निळे घारे डोळे, निमुळत्या भुवया, तिक्ष्ण नजर
या सगळ्याची नशा माझ्या ह्रदयी, मन मात्र होई कातर
I Love You म्हणालो, तक्षणी कानाखाली बसली तर!
खोट सांगत नाही, खरं बोलवत नाही या गोष्टी नसतात वरवर
तुमच्या काळजात बसल्या असतील रुतून येतात कधीतरी वर
सांगायला हिंमत लागते, तिला पाहताच कंप पावती अधर
निशब्द भाषेची भावना असली तरी तिला असतो आठवणीचा पदर।
जेव्हा सय येते तेव्हा डोळे ओलवतात शब्द होती कातर
तू या जगात आहेस की नाहीस याचे कोण देणार उत्तर?
पाऊस पडुन गेला की मोकळे आकाश दिसे निरभ्र मनोहर
माझ्या मनी, तुझ्या आठवणींना मी कधीच देणार नाही अंतर
प्रत्येक माणूस त्याचा अंतरंग ही स्वतः वाचावी अशीच बखर।