दिवाळी फराळ
आपण उत्सवप्रिय आहोत. जगाच्या पाठीवर एखादाच देश शिल्लक असेल जेथे भारतीय पोचला नसेल, त्यामुळे होल युनिव्हर्स मध्ये दिवाळी फराळ बनवला जात असला तरी त्यांची पत्नी, अन्नपूर्णा जसा फराळ बनवते त्याला तोड नाही असा बंडूनानांचा कयास आहे. बंडूनानांचा तसा परिवार दणदणीत ,म्हणजे पाच मुलगे आणि सहा कन्या असा मोठा आहे. तेव्हा करमणुकीचे साधन नसल्याने करमणूक करता करता हे सगळ घडलं अस त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा उगाचच तुम्हाला अकरा अपत्य आहेत का? असा तिरका प्रश्न कोणी विचारू नये. आम्हाला तेव्हा जमले तुम्हाला ते जमलेच पाहिजे असा आग्रह नाही, बंडूनाना असे सरळ ऊत्तर विचारणाऱ्या इसमाला देऊन त्याचे दात घशात घालतात.
बंडूनाना पासपोर्ट ऑफिसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते त्यामुळे बाहेर जाण्यासाठी येथील तरुण किती उत्सूक असतात आणि परदेशी जाणारी मंडळी सहसा भारतात परतत नाहीत तर तिथेच प्रगती करतात हे पाहून त्यांनी आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देऊन उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पाठवले. तेव्हा विदेशात जाणे सहज शक्य नव्हते तरीही बंडूनानांची सर्व मुले विदेशात जाऊन स्थिरस्थावर झाली यातच बंडूनानांचे कर्तृत्व उमजून येते. मुलांनीही स्वतः मेहनत घेऊन अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवली हे नमुद केलेले बरे, नाहीतर पासपोर्ट ऑफिसमध्ये बंडूनानांनी बराच माल कमावला अशी कुणालाही उगाचच शंका यायची.
बंडूनानांच्या अकरा अपत्यापैकी दोन अमेरिकेत, दोन आफ्रिकेत, तीन युरोपात दोन ऑस्ट्रेलियात आणि दोन मिडल इस्टमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या मुलांनी जग पादाक्रांत केले म्हणायला वाव आहे. ज्यांना प्रथम संधी मिळाली त्यांनी ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथे’ म्हणत पुढच्याचा मार्ग प्रशस्त केला त्यामुळेचे हे शक्य झाले यात माझे कर्तृत्व शुन्य असे बंडूनाना आवर्जून सांगतात.
आपल्या सोबत एकही मुलगा रहात नाही याचे वैषम्य त्यांना वाटत नाही, उलट ही सर्व मुले वेगवेगळ्या ठिकाणी रहात असल्याने त्यांच्या घरातील कार्यात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपसूकच जाणे होते आणि तेथे काही महिने राहिल्याने तेथील शहरे, निसर्ग पाहता येतो, तेथील राहणीमान कळते ,वातावरणाची सवय होते, तब्येत ठणठणीत राहते असे बंडूनानांना वाटते. आता विश्वात्मके देवो हे बंडूनाना विश्वास संचार करून जगले. मुलांनी त्यांना शक्य तो युरोप दाखवला, अमेरिका दाखवला त्यामुळे ते समाधानी आहेत. मात्र भारतीय सणावाराला आपण उभयता भारतात असलेच पाहिजे असा नानांचा कटाक्ष असतो.
इतर वेळेस बंडूनाना असतील त्या देशातून घरातील देवांवर नित्यनेमाने अभिषेक करून स्वतःच्या पदरात पुण्य जमा करत असतात. अलीकडे भारतीय सण विदेशात साजरे केले जातात, त्याचे मुळच मुळी बंडूनानांनाच्या विदेश यात्रेत आहे. तेच भारतीय सण साजरे करतांना भारतात परतण्यापूर्वी तेथील भारतीयांना त्या सणांचे महत्त्व पटवून देऊन मग प्रयाण करतात. भारतीयांसाठी दिवाळी हा सण दिवाळे काढणारा असला तरी तो आनंदाचा आहे त्यामुळे तो दिव्यांच्या झगमगाटात झालाच पाहिजे असे बंडूनानांचे तत्त्वज्ञान आहे. आपले दिवाळे निघते तेव्हाच कोणाला तरी चार पैसे मिळतात आणि अर्थाकारण चालते असा अर्थशास्त्राचा नियम बंडूनानांना माहिती आहे.
आपण दिवाळी सण साजरा केला नसता तर व्यापारी उपाशी मेले असते, त्यांना जगवावे आणि हातून थोडे पूण्याचे काम घडावे म्हणून आपल्या संस्कृतीत दिवाळी साजरी करण्याचा प्रघात पडला असे बंडूनानांचे संशोधन सांगते. त्यामुळे बंडूनानांच्या घरी अकरा अपत्यांसह दिवाळी साजरी होत होती तेव्हा आजूबाजूच्या एकशे अकरा घरात त्याची चर्चा होत होती. फराळ, फटाके, नवीन कपडे सगळे काही मोठ्या प्रमाणावर असे, हीच प्रथा अबाधित रहावी यासाठी बंडूनाना आजही प्रयत्नशील असतात. फक्त आता एकत्र जमून दिवाळी साजरी करता येत नाही याची खंत नानांना आहेच.
सर्व मुले इतर वेगवेगळ्या देशात रहात असल्याने ‘भारतीय दिवाळी फराळ’ त्या त्या देशात पाठवण्याची व्यवस्था बंडूनाना यांनी गेले पंचवीस वर्षे डोक्यावर घेतली आहे. खरे तर अन्नपूर्णा यांच्या शिरावर ती बंडूनानांनी लादली आहे. पण इतरांना सांगतांना ते त्यांच्या सौभाग्यवतीचा हा आग्रह आहे असे सांगतात. त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना भारतीय सणवार लक्षात राहीले पाहिजेत, त्यासाठी त्या जास्तीचा वेळ द्यायला दोघेही तयार आहेत. प्रत्येक भारतीय सणाचे वैशिष्ट्य म्हणून जे काही असेल ते जपण्याचा त्या प्रयत्न करतात. त्या त्या वेळेस तो सण उत्सवपूर्ण होईल याची खबरदारी घेतात.
बंडूनाना यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या मैत्रीणी यांना महिनाभर अगोदरच दिवाळी फराळाची योजना आखावी लागते. प्रत्येक मुलाच्या कुटुंबातील चिल्यापिल्लांची आवड लक्षात घेऊन हा फराळ बनवणे म्हणजे एक दिव्यच की, पण अन्नपूर्णा काकू आपल्या मैत्रीणींची मदत घेऊन हे दिव्य पार पाडतात.
प्रत्येक महिला ही उत्तम व्यवस्थापन सांभळते पण अन्नपूर्णा काकू यांच्या व्यवस्थापनात अजिबात ढिसाळपणा नाही त्यामुळे कंपनी वर्कशॉपमध्ये जसा फ्लो चार्ट लावतात तसा काकूंच्या घरातही एका फलकावर अकरा अपत्यांची नावे आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ यांची यादी केलेली आहे. प्रत्येक पदार्थांची त्या त्या अपत्यासाठी किती क्वांटीटी बनवावी लागेल तो अंक कंसात लिहून तक्त्याच्या शेवटी त्या त्या वस्तूचे एकूण वजन नोंदवले आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर चकल्या प्रत्येकाल आवडत असल्या तरी एकूण सहा बहिण भावांना भाजणीच्या चकल्या आवडतात तर पाच मुलांना बिनभाजणीच्या चकल्या आवडतात. त्यातही दोन मुलांना आणि एका मुलीला खुसखुशीत चकलीपेक्षा कडाकड आवाज येईल अशा थोड्या कडक चकल्या आवडतात. हे कमी की काय म्हणून तीन मुलांच्या घरी कमी मिठाचे पदार्थ खाल्ले जातात. फक्त चकली बद्दल इतके सगळे मुद्दे लक्षात ठेऊन काकू प्रत्येक कुटुंबासाठी दिड ते दोन किलो चकली बनवतात.म्हणजे फराळ पाठवताना होणारी तोडमोड लक्षात घेऊन २५ किलो चकल्या बनवाव्याच लागतात.
चकली बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध पदार्थांची यादी, त्याचे ग्राम मधील वजन नोंदवून ठेवणे ते त्याच्या मिश्रणापर्यंत एकही पायरी गळू नये यासाठी त्यांनी लाँजिक बोर्ड तयार केला आहे, पिठ तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष चकली तयार होईपर्यत मुख्य म्हणजे त्या त्या मुलाच्या आवडीप्रमाणे तो तो पदार्थ झाला आहे की नाही हे चव घेऊन पाहण्यासाठी बंडूनानांना किती यत्न करावा लागत असावा त्याची कल्पना आपण करून पहा. Tested ,ok अस बंडूनानांनी म्हटलं म्हणजे अन्नपूर्णा काकूंच्या गाली कृतकृत्य झाल्याचे स्मित उमटते ते पाहण्यासाठी ते क्षणभर तेथे रेंगाळत असतात. बंडूनानांना एका प्रकारची भाजणीची चकली खाऊन झाली की बिन भाजणीची चकली अर्ध्या तासानंतर खाऊन त्याचा अहवाल पत्नीला देतात.
वर केलेले वर्णन हे फक्त चकल्यापुरते मर्यादित नाही. शंकरपाळे बनवायचे झाले तरी तेच, कुणाला तिखट मिठाच्या तर कोणाला गोड शंकरपाळे आवडते. कोणाला खुसखुशीत तोंडात घातल्यावर विरघळणारी तर कोणाला कर्रमकुरम् आवाज करणारे शंकरपाळे हवे असते. यात अजून वेगळा प्रकार म्हणजे कोणाला मैद्याच्या शंकरपाळ्या नको असतात तर कोणाला गव्हाच्या हव्या असतात. एक जावई नाचणीच्या शंकरपाळ्याची फर्माईश करत होते पण तो प्रयोग करतांना बंडूनानांचा दात स्वर्गवासी झाला त्यामुळे तो प्रयत्न सोडून द्यावा लागला. बंडूनानानी सौची चांगलीच खरडपट्टी काढली तिथपासून नाचणीच्या पदार्थांवर बंडूनाना यांनी फुल्ली मारली आहे.सहा सात पदार्थ आणि त्या पदार्थांतील बारकावे, ७०री ओलांडलेल्या अन्नपूर्णा काकू, सगळं कस बरं लक्षात ठेवत असतील? यावरून महिलांच्या स्मरणशक्तीचे कौतुक तर केलेच पाहिजे.
मनाशी कल्पना करून पहा की चकली,करंजी, शंकरपाळे, अनारसे, लाडूचे किमान दोन प्रकार, चिवडा असे साधारण सहा ते सात पदार्थ प्रत्येक मुलासाठी ते ही प्रत्येकी दिड दोन किलो बनवण्यासाठी किती उस्तावारी करावी लागत असेल? पण काकू कोणताही घोळ न घालता हे सगळं निभावून नेतात याचाच अर्थ त्या उत्तम व्यवस्थापक आहेत.
प्रत्येक पदार्थांसाठी लागणारे जिन्नस अन्नपूर्णा काकूंच्या मागणीनुसार आणून देणे हे बंडु नानांचे काम, त्यात जर काही वरखाली झाले तर गाठ अन्नपूर्णा काकूंशी असे. त्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बोलून त्यांना भंडावून सोडत त्यामुळे बंडूनाना दुकानात खरेदीला गेले की पदार्था गणीक यादी पून्हा पून्हा काढून खात्री करून पहातात. अगदी होलसेल दुकानात गेले तरी बार्गेन करतात. त्यांच्या खरेदीची यादी पाहून होलसेल दुकानदार जमेल ती सूट त्यांना देतो. काही हजार रूपयांच्या खरेदीचे गिऱ्हाईक हातून घालवणे त्याला परवडणारे नसते. दुकानदार ते पैसे कुठेतरी नक्की ऍडजस्ट करणार हे नक्की पण आपण सूट मिळवली हा नानांना आनंद.
विविध चवीच्या ह्या सहा सात पदार्थांची चव घेता घेता मधेच बंडूनानांच्या जीभेची चव बिघडून जाई, ती ताळ्यावर आणण्यासाठी त्यांना पान लावावे लागे. ते चांगले रवंथ करून हजाम होईपर्यंत अर्धा पाऊण तास सहजच निघून जाई, मग मात्र अन्नपूर्णा बाई हतबल होत, कारण त्याना डायबेटीस असल्याने गोड पदार्थ चाखून पाहणे शक्य नव्हते तर ब्लडप्रेशर असल्याने अधीक मिठाचे पदार्थ त्यांना पाहणे शक्य नसे. बंडूनाना अभिप्राय देईपर्यंत त्यांचे आणि त्यांच्या हाताखालच्या महिलांची वेळ वाया जात असे. फराळ तयार झाल्यानंतर त्या त्या देशातील पदार्थ वेष्टनाचे नियम पाळण्यासाठी कसरत करावी लागे. हे करतांना हाताखाली मदतीस असणाऱ्या शेजारच्या बायकांनी काही घोळ घातलाच नसेल याची खात्री कोण देणार? तर तो सोडवताना होणारा मनस्ताप वेगळाच. त्यामुळे काकूंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पदार्थ वजन पडताळून योग्य प्रकारे भरला जाई, त्याचे यंत्रावर पॅकिंग करून त्या नंतर पदार्थ भरले जात. प्रत्येक पॅकिंग वरती त्या त्या मुलाच्या वा मुलीच्या नावाचा कोड चिकटवला जाई.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर फराळ बनवला जात असल्याने शेजाऱ्यांना या गोष्टीचे चार दिवस कौतुक वाटे पण दोन तीन दिवसानंतर मात्र पदार्थांच्या वेगवेगळ्या वासाने मन उबगून जाई. तर काही घरात मात्र त्या काकु वृद्ध असून इतके पदार्थ बनवू शकतात पण तुला चार पदार्थ बनवता येत नाहीत, ते ही तू बाहेरून मागावतेस, अशी शेरेबाजी झाली की यावरून भांडण होते.
या व्यापातून कधीकधी पदार्थांची अदलाबदली होई आणि एखाद्या मुलाला पाठवायचे पदार्थ चुकीने मुलीला पाठवला गेला, तर जावई नाराज तर होतच पण कन्येची बडबड ऐकून घ्यावे लागे, याचे कारण अन्नपूर्णा बाई आपल्या मुलांकडून या पदार्थांचे पैसे ते ही डॉलर च्या स्वरुपात मागून घेत. अगदी सुनाही तातडीने व्हिडीओ कॉल करून या वेळेस त्यांनी काय काय गडबड केली ते आवर्जून सांगत, या वयात फुकटात एवढे उपद्व्याप त्यांनी का म्हणून करावेत? तेथे मुलगे, सुना, मुली आणि जावई रग्गड कमवत असतांना त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात फराळ फुकट पाठवणे तसेही आतबट्ट्याचा व्यवहार ठरला नसता का?
त्यामुळे अन्नपूर्णा काकू पदार्थ बनवताना आधी आपल्या मैत्रीणींना काही सूचना देत, इथे कामासाठी आल्यानंतर डोक्यात घरचे काही घेऊन यायचे नाही. पदार्थ बनवताना काही चूक झाल्यास मुळीच लपवाछपवी करायची नाही. कोठेही कंजूषी करायची नाही. मुख्य म्हणजे स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची,त्यामुळे शेफ जसे डोक्यावर टोपी आणि हातात ग्लोज घालतात तशा, काकूंसह सर्व महिला ड्रेसिंग कोडमध्ये असत. पदार्थ बनवण्यासाठी येणारे पदार्थ हे खात्रीशीर असतील याची काळजी काका घेत असत तरीही काकू प्रत्येक पदार्थ आपल्या काकदृष्टीने पाहून घेत. तसाच एखादा पदार्थ जुना किंवा त्याच्या वापराची मुदत संपलेला निघाला तर काकू थयथयाट करत आणि मग नाना दुकानात जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार करून त्याच्या नाकी दम आणत.
प्रत्येकाला पाच ते सात पदार्थ ते ही दीड दोन किलो म्हणजे चेष्टा नव्हती पण दिवाळी जवळ आली की काकूंच्या अंगी कात्यायनी संचारत असे त्यामुळे आजूबाजूला निरोप जाई आणि दर वर्षी वेळापत्रकानुसार काम वेळेत पूर्ण होऊन डबे मार्गस्थ होत. तुटलेले किंवा ठरवल्या पेक्षा कमी आकाराचे पदार्थ काकू आपल्या सहकारी मैत्रीणींना अर्ध्या किमतीत विकत असत आणि ते पैसे त्यांच्या मजूरीतून परस्पर कापून घेते. त्यामुळे देणेघेणे एकदम चोख. कोणती महिला किती दिवस आली तिने कोणते टार्गेट पूर्ण केले याची अचूक नोंद काकू कशा ठेवत हा उत्सुकतेचा विषय असे.
कल्पना करा की अकरा कुटुंबाचे पदार्थ योग्य पत्त्यावर पाठवले जावेत यासाठी इंटर नॅशनल कुरिअर ऑफिसमध्ये बंडूनाना फराळाचे प्रत्येकी तीन खोके याप्रमाणे तेहतीस किंवा अधिक खोके घेऊन तिथे त्याची रीतसर पावती घेऊन येईपर्यंत किती ताण त्यांना सहन करावा लागत असेल. आणि तरीही फराळ खोक्या वर योग्य पत्ता टाकला आहे की काही चूक तर झाली नाही ना ही हुरहूर मनात राहून जाई. जोपर्यंत मुला मुलींकडून कुरिअर मिळाल्याचा मेसेज येत नसे त्यांचा जीव टांगणीला लागलेला असे.
आजही दिवाळीच्या आधी किमान एक महिना बंडू नानांचे घर हे वॉररूम झालेली असते. साधारण वीस ते पंचवीस लेबल लावलेल्या डब्यातून वेगवेगळ्या पदार्थांचे घटक साठवून ठेवलेले असत. एक एक दिवशी किमान एक पदार्थ या प्रमाणे अन्नपूर्णा काकू स्वतः च्या हाताने एका विशिष्ट क्रमाने पदार्थ तयार करत. हे पदार्थ पुरेसे थंड झाले याची खात्री करूनच पॅकिंग करावी लागे. या दिवसात काकू पहाटे साडेचार पाचला उठून, शारीरिक व्यायाम आणि आपली आन्हिके उरकून देवपूजा करूनच तयार होत.
कोणत्या महिलेला कोणत्या पदार्थांची गती आहे याची अचूक नोंद त्यांच्या मेंदूत तयार असल्याने त्या महिलेच्या ताब्यात त्या पदार्थांसाठी लागणारे साहित्य तिच्या ताब्यात दिले की काम बरेचसे सोप्पे होई. त्या बाई आपले सामान जिवापाड जपत आणि आपला पदार्थ उत्तम होईल असाच प्रयत्न करत. काकू त्यांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करत असत. मदतीसाठी येणाऱ्या महिलांच्या पोटपूजेची व्यवस्था काकू स्वतः करत त्यामुळे कोणत्याही महिलेने काकूंना मदत करण्यास नकार दिल्याचे ऐकीवात नाही. काकूंचा प्रेमळ पण सडेतोड स्वभाव आणि काकूंची करडी नजर यामुळे चूक होऊ नये यासाठी प्रत्येक महिला आपले पूर्ण योगदान देई .
म्हटलं तर काकूची ‘दिवाळी फराळ शाळा’ हे इतर महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर होते जे व्यवस्थापनाचा उत्तम नमुना होते. त्यामुळे फराळ बनवण्याचे काम संपत आले की प्रत्येक महिलेला काम संपणार याचा आनंद तर असेच पण उद्या पासून काकूंचा सहवास लाभणार नाही याची हुरहूर असे. गेल्या पंचवीस वर्षात काकूंच्या दिवाळी फराळ शाळेने महिलांना शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे धडे दिले, प्रेम दिले आणि कार्यतत्पर राहण्याची प्रेरणा दिली. यातून महिलांना स्व कष्टाची कमाई झाली आणि एकत्रितपणे काम करताना आपली कौटुंबिक सुखदुःख वाटता आली. मन हलके करता आले. अशी एखादी अन्नपूर्णा आपल्या वाट्याला आली तर आपलेही जीवन नक्कीच समृद्ध होईल यात शंका नाही.
एवढ्या प्रमाणात पदार्थ बनवताना काकू थकून जात पण स्वतः च्या कष्टाचे पैसे वृद्धांसाठी देता येतात याचा आनंदच इतका मोठा असतो की कष्टाचे त्यांना फारसे काही वाटत नाही. विशेष म्हणजे त्यांना मदत करणाऱ्या महिला अगदी नवरात्रीपासून काकू कधी बोलवतात याची वाट पहात असतात, त्यांनाही चार पैसे मिळणार याचे अप्रूप असतेच. गेल्या काही वर्षात महिलांनी एवढे कौशल्य मिळवले आहे की प्रत्येक लाडू किंवा चकली,करंजी हे साच्यातून काढले असावेत असे समान आकाराचे असतात. या कौशल्याचा वापर या महिला आपल्या चरितार्थ चालवताना करतात. मग काकूनी फराळ बनवायचा थांबवला तर बरं दिसेल का?
या दिवसात बंडूनाना आपल्या मित्रांना मुकतात, त्यांची सतत लगबग सुरू असते, मित्र आपसात म्हणतात याची पैसे कमवायची हाव काही संपत नाही. खऱ खोटं फक्त दोघानांच माहिती एक ते आणि दुसरे आश्रमाचे व्यवस्थापक. बागेत जाऊन गप्पा मारण्याच्या त्यांच्या नेहमीच्या सवयीला या काळात मुरड घालावी लागे पण धर्मकार्य समजून ते फराळ पाठवून होईपर्यंत क्वचितच वामकुक्षी घेत. न जाणो काकूंना कधी त्यांची आठवण व्हावी. नवरात्र सुरू झाली की जवळपास पंधरा दिवस हा उद्योग चाले. अर्थात आपली पत्नी सक्षमपणे हे सगळे सांभाळते या बद्दल त्यांना अभिमान आणि गर्व आहेच.
फक्त वयापरत्वे बंडूनाना या कमामुळे कधीतरी थकून लवकर झोपी जात आणि काकूंना एकटीला जागून उर्वरीत कामे आवरावी लागत. काकू दररोज बंडूनाना यांनी वस्तू खरेदीसाठी दुकानदार, रीक्षा , कुरिअर इत्यादींना दिलेले पैसे, झालेला रोजचा खर्च लिहून काढत तसेच फराळाचे डबे एकदाचे पोहोच झाले की वापरलेले सिलेंडर, बायकांची मजुरी आणि मुलांकडून खात्यावर पाठवलेले पैसे याची नोंद करून हिशेब जुळल्याची खात्री करून घेत. या सर्व व्यवहारात झालेला नफा हा त्या वृद्धाश्रमास ते दोघे जाऊन देत तेव्हा कृतकृत्य झाल्याचे एक समाधान आणि त्याचे आगळे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असे.
गेल्या पंचवीस वर्षात त्याची वाच्यता होणार नाही याची खबरदारी दोघांनी घेतली होती. कदाचित त्याचमुळे त्यांच्या मुलांच्या भावना संमिश्र असाव्यात नानांना पेन्शन तर होतीच पण मुले वेळोवेळी त्यांच्या खर्चासाठी पैसे पाठवत. आपले आईबाबा इतके व्यवहारी कसे? या इतक्या पैशांचे ते काय करत असावेत? हा प्रश्न त्या अकरा जणांना आणि त्यांच्या जोडीदारांना पडला असेल तर त्यात नवल नव्हते. बंडूनानांनी मुलांना परदेशात पाठवताना आपल्या वाट्याचे शेत, जमवलेली पूंजी, सारेकाही मुलांसाठी खर्च केली होती. मुलांनी आपल्या पसंतीने जोडीदार निवडल्यानंतर दोघांनी ते स्विकारले होते, त्यांचे स्वागतच केले होते. त्यामुळे त्यांना किंवा आईला प्रश्न विचारण्याची कुणाला गरज वाटली नव्हती.
या मुलांच्या गरजेच्या वेळी दोघेही आपले चंबुगबाळ आवरून धावून परदेशात त्यांच्या मदतीला गेले होते. मुलांचे वाढदिवस, त्यांच्या लग्नाचे वाढदिवस अर्थात marriage anniversary, नातवांचे birthday लक्षात ठेऊन शुभेच्छा पाठवत होते. त्यामुळे नानांचे आणि आईचे वागणे हे मुलांसाठी गुढ होते. कधीतरी मोठा मुलगा यशवंत त्यांना त्यांच्या वयाची आठवण करून देत त्यांनी उगाचच दगदग करू नये असे कळवत असे पण आईच त्याला म्हणे “अरे तुम्हाला माझ्या हातचा फराळ किती आवडतो ते मला का माहिती नाही? मग माझ्या मुलांसाठी मला थोडे कष्ट घ्यावे लागले तर घ्यायला नको का? ” इतरांनाही असेच उत्तर मिळत असावे. आईला हा फराळ बनवण्यात समाधान मिळत असेल तर थांब सांगून तिची नाराजी का ओढवून घ्या म्हणून कोणी बोलत नव्हते.
या वर्षी मात्र अन्नपूर्णा काकूंना आपल्या मुलांना फराळ पाठवता येईल असे वाटेना कारण गेले पंधरा दिवस बंडूनाना थकल्यासारखे वाटत होते, रोज ज्या उत्साहाने ते सकाळी फिरायला आणि नंतर भाजीपाला आणायला जात तो उत्साह मावळत चालल्याची जाणीव त्यांना होत होती. काकूंनी त्यांना त्यांचे फॅमिली डॉक्टर देशपांडे यांच्याकडे नेऊन आणले, तेव्हा ते म्हणाले “नाना अगदी ठणठणीत आहेत,मी टॉनिक लिहून देतो ते जेवणापूर्वी दोन चमचे घेऊ देत की ते अगदी ठणठणीत बरे होतील.”
बंडूनाना पत्नीला म्हणाले, ” तू उगाचच चिंता करतेस मला काही झालेल नाही. वयानुसार थोडा थकवा वाटतो, ७८ व्या वर्षी मी तरुणासारखा कसा पळेन? तुझ आपल काहितरीच, तुला मुलांना फराळ पाठवता येईल की नाही याचीच चिंता अधिक असावी. खरं ना?”
अन्नपूर्णा काकू, ते ऐकून रागावल्या. “अहो! काहितरीच काय, एक वर्ष फराळ नाही पाठवला म्हणून काही बिघडत नाही, मला चिंता वाटते ते तुमची, तुम्ही तब्येत आताशा ठिक वाटत नाही. सकाळीच उठून ऐकटेच फिरायला जाऊ नका. उगाचच शरीराला त्रास देऊ नका. थोडा आराम करा. तुम्हाला काय होते ते खरखुर मला सांगा, मग मी चिंता करणार नाही.”
ते हसले, ‘अन्नपूर्णे अग उगाचच चिंता का करते, मला कसली धाड भरल्यायं, आता नवरात्र संपेल आणि दसरा जवळ येईल. तू नेहमीप्रमाणे तुझ्या याद्या तयार ठेव आणि शेजारच्या बायकांना निरोपही दे. मुलांना फराळ वेळेत पोचलाच पाहिजे.” खरोखरच दुसऱ्या दिवसापासून बंडूनाना उत्साहाने कामाला लागले. पुढील वीस दिवस बंडूनानानी नेहमीप्रमाणे खरेदी केली. फराळ बनवताना लागणारी मदत केली आणि वेळेवर फराळ पोचेल याची पूर्ण काळजी घेतली, जणू त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत काही घडलच नसावे.
मात्र मदतीचा चेक वृद्धाश्रमात देतांना ते आठल्येना म्हणाले, ‘भाऊ या वर्षी ही शेवटची सेवा, वयोमानानुसार पुढल्या वर्षी जमेल की नाही सांगता येत नाही. ते ऐकून अन्नपूर्णा काकूंच्या पोटात कालवाकालव झाली. पण त्या तिथे काही बोलल्या नाहीत. घरी आल्यानंतर त्या त्यांच्या पायाशी बसल्या आणि स्फुंदत म्हणाल्या अहो, तरी मी तुम्हाला सांगत होते, बरं नसेल तर फराळाचे एवढे काही अडले नाही, पण ऐकाल तर ना! तुम्हाला बरं नसल्याचे मुलांना कळवायचे का?”
तस ते त्यांचा हात धरून जवळ बसवत म्हणाले, “अन्नपूर्णे तू वेडी की खुळी दिवाळीचा सण आहे. मुलं, नातू आनंदात असतील,त्यांच्या त्यांच्या आवडीचा फराळ खात असतील, फटाके वाजवत असतील. त्यांना उगाचच मला बरं नाही सांगून चिंतेत टाकणार आहेस का? मला काही झालेल नाही.”
दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी म्हणून बंडूनानांनी घरासमोर भलामोठा आकाशकंदील लावला, काकूंनी दुसऱ्या दिवसासाठी अभ्यंगस्नानासाठी उटणे, नवीन मोती साबण, नवीन टॉवेल, कपडे तयार ठेवले. रात्री नेहमीच्या वेळेवर ‘रामकृष्ण हरि’ म्हणत नाना झोपयला अंथरुणावर पडले. सकाळी ‘गोविंदा गोविंदा’ ची आरोळी ऐकून अन्नपूर्णा काकूंना जाग आली, त्यांनी लाईट लावून घड्याळात पाहिले, साडेपाच वाजले होते. त्यांनी बंडूनानांना हाक मारली. “अहो, उठताय ना, उठा साडेपाच झाले”, पण बंडूनानां पलंगावरून हलले नाहीत. काकू जवळ जाऊन त्यांना हळूवार हातांनी हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. नानांच अंग थंडगार लागले. त्या मटकन खाली बसल्या. बंडूनानां त्यांना संभ्रमात ठेऊन निघून गेले होते पण त्यापूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे मुलांना दिवाळी फराळ पाठवला होता.
बंडूनानांच्या इच्छेप्रमाणे दिवाळी संपल्यानंतर भारतातील भाच्यानी आपल्या भावंडांना घडल्या प्रकारा विषयी व्हिडीओ कॉल करून सांगितले तेव्हा ते सर्व हळहळले. सर्व मुले,सुना, जावई आपल्या व्यापात असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉल वरून आईची अश्रूपूर्ण नेत्रांनी भेट घेतली, तिची समजूत काढली. आता तातडीने येणे शक्य नसले तरी प्रत्येक महीन्यात एकजण नक्की येत जाईल याची खात्री दिली. अन्नपूर्णा काकूना ते ऐकून गहिवरून आले. आपल्या मुलांना, सुनांना आणि जावयांना नानांविषयी कितीही वाटत असले तरी त्यांच्या कामामुळे ते शक्य होणार नाही याचे वाईटही वाटले.
नेमके त्याच दिवशी, वृद्धाश्रम व्यवस्थापक आठल्ये अन्नपूर्णा काकूंच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी बंडूनानांनी गेले पंचवीस वर्षे वृद्धाश्रमासाठी जे व्रत चालवले होते त्याची माहिती मुलांना दिली. मुलांच्या सहकार्यामुळे बंडूनानांना आणि वहिनी हे दिव्य पार पाडू शकले म्हणून मुलांचे आभारही मानले. बंडूनानांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक सदिच्छा पत्र दिले होते ते वाचून दाखवण्याची मुलांकडे परवानगी मागितली. त्या इच्छापत्रात लिहिले होते की मुलांची हरकत नसेल तर, आमच्या दोघांपैकी जो कोणी मागे राहिल त्याची पूर्ण जबाबदारी आश्रमाने घ्यावी. त्याच्या खर्चासाठी राहते घर, त्यांच्या खात्यावरील रोख रक्कम, शेअर्स इत्यादी मालमत्ता आश्रमास दिली जावी.
अर्थात सर्व मुले उमद्या मनाची असल्याने नानांच्या इच्छेनुसार त्यांनी नानांची सर्व मालमत्ता वृद्धाश्रमासाठी दिली मात्र आपल्या आईला ते दिवाळी फराळाची नवीन शाखा उघडण्यासाठी घेऊन जाणार होते. एका हुशार व कल्पक व्यवस्थापकाने आपल्या मालमत्तेची व्यवस्था केली होती. साहजिकच त्या आश्रमाला नानांचे नाव दिले गेले.