मन सज्जना भक्ती पंथेची जावे
‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे’ रामदास स्वामी यांना अभिप्रेत असणाऱ्या भक्तीमार्गावर जाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे की काय? असे दानपेटीत जमणारे धन पाहून वाटते. कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाच्या पेटीत साडेपाच कोटीपेक्षा जास्त दान पडले होते आणि आषाढी एकादशीला आठ कोटी ९२ लाख रूपये दान मिळाले. गणपतीला लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी चढाओढ लागते, आता अंबानी यांच्यामुळे तो ग्लोबल झाला आणि गर्दी आवरता आवरत नाही, पेटीत दर वर्षी उचांकी दान पडते, विशेष म्हणजे दर वर्षी हे आकडे वाढत आहेत.
हिच स्थिती शिर्डीच्या साईबाबा मंदिरात, तिरूपती येथील बालाजी मंदिरात किंवा अन्य धार्मिक स्थळी आढळते. केरळ त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ स्वामी हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. मंदिराच्या तिजोरीत १.२ लाख कोटी रूपयांचे सोने, जडजवाहीर आहे. तिरूमला तिरूपती व्यंकटेश्र्वर मंदिर यांच्याके ११ टन सोने आणि १५९३८ कोटीपेक्षा अधिक रोकड आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात दरवर्षी अंदाजे १८०० किलो सोने दान स्वरूपात मिळते. या मंदिराचे उत्पन्न ५०० कोटी रूपये आहे.
वेगवेगळ्या मंदिरातील दान पेटीचे आकडे पाहिले की भक्तीमार्गाला लागलेल्या भक्तांची संख्या अफाट वाढताना दिसते. पूर्वीपेक्षा जास्त मोठ्या संख्येने लोक तिर्थक्षेत्र भेटीसाठी निघून देवधर्म करू लागले असावेत असे वाटते. भारतातील लोक श्रध्देत इतके अडकले आहेत की एखाद्या “आसाराम बुवावर किंवा मातारानीवर’ त्यांची श्रध्दा बसली तर त्या बुवाची मालमत्ता चार वर्षात कोट्यावधीची होते. मन अशांत असेल, समोर संकटातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नसेल तेव्हा लोक शेवटचा उपाय म्हणून मंदिरात ईश्वराच्या चरणाशी शरण जातात. काही एखाद्या बुवाच्या नादी लागून कंगालही होतात. अर्थात काही आपले वैभव टिकून रहावे यासाठी तर काही आपली भरभराट व्हावी यासाठी देवदर्शनाला जातात. काही जणांची इच्छा पूर्ण झाली किंवा अचानक धनलाभ झाला की नवस फेडायला जातात आणि स्वतः दान करतात.
तुकाराम मोरे अर्थात ‘तुकाराम महाराज’ यांनी विठ्ठलाच्या भक्तीसाठी संसार त्यागला, त्यांनी विठ्ठलाकडे तुझ्या नामात मन राहो मागणे मागितले. अंतापर्यंत पारमार्थिक अर्थाने ते श्रीमंत होते पण पत्नी आवलीला अभिप्रेत असलेली श्रमंती पांडुरंगाने तिला दिली नाही. ते सदेह वैकुंठाला गेले की नाही या फंदात न फडता आजही ३५० वर्षानंतर तुकाराम नावाने शिल्लक आहेतच. त्यामुळे निव्वळ भक्तीमार्ग स्विकारणारी चोखामेळा, नरहरी सोनार, सावता माळी यांची जातकुळी वेगळी. त्यांनी विठोबाला धन अर्पण केल्याचे कधी वाचनात नाही आले. मात्र विठ्ठलाला किंवा भवानी मातेला किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईला राजेराजवाडे यांच्याकडून दाग दागिने, जड जवाहिर याचे दान तेव्हाही येत होते.
वरवर पाहता असे वाटते की लोक भक्तीभावाने दर्शन घेतात आणि दान पेटीत पैसे टाकतात किंवा दागिने दान देतात तेव्हा त्यांचा मोह कमी होतो आणि आध्यात्मिक आवड निर्माण होते. सोने नाणे यांचा मोह संपतो का ते सांगणे अवघड, याचा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणात लोक सदवर्तनाकडे वळत आहेत असा घ्यावा का? मंदिरात जाऊन, दर्शन घेऊन मतपरिवर्तन होते का? आचार आणि विचारही शुद्ध होतात का? तसे घडत असते तर फारच बरे झाले असते.
पण मग गुन्हे करण्याचे प्रमाण आणि एकूणच गुन्ह्यांची संख्या का वाढत असावी? भारतात दर लाख लोकसंख्येमागे ४२९ इतके गुन्हेगार आहेत. त्यातही आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. अगदी शुल्लक कारणावरूनही प्रकरण विकोपाला जाते. देवावर श्रध्दा असणाऱ्या भावीकांची संख्या वाढत असूनही मन भक्तीमार्गाला का लागत नाही? मन विकार का सोडून देत नाही?
एखाद्याचा धक्का लागल्या बरोबर त्याचा कोथळा बाहेर काढण्याची प्रवृत्ती का वाढीस लागत असावी? महिलांवर होणारे अत्याचार का वाढत असावेत? आपल्या वंशाला दिवा नाही म्हणून पोटी होऊ घातलेली निष्पाप पणती विझवण्याचे कौर्य मनात का जन्म घेत असावे? स्थावर वाटणी वरून सख्या भावात प्रकरण कोर्टात जाण्याचे प्रकार का वाढत आहेत? वडिलांना घराबाहेर काढून त्यांची संपत्ती बळकावण्याची प्रवृत्ती का वाढीस लागत असावी? भामटेगिरी का वाढीस लागली असावी? पैशाच्या मोहापायी एखाद्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी वा मंगळसूत्र तिला इजा करत का ओढले जात असावे? सोन्याच्या बांगड्या घातलेला हात का छाटला जावा? हे गुन्हे करण्याचे धाडस मनात कसे निर्माण होत असावे? गुन्हा करतांना आपण पकडले जाऊ किंवा ईश्वर आपल्याला शिक्षा देईल अशी भिती का वाटत नाही?
याचा अर्थ, दुर्दैवाने देवदर्शन घेऊन मनपरिवर्तन होईल अशी आजची स्थिती नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे हे समजणे फारच अवघड आहे. देवाच्या सर्वात निकट असणारा पुजारीच जर चोरी करत असेल तर सामान्य माणसाचे काय? अन्यथा मानवाची सेवा करण्याची शपथ घेणाऱ्या डॉक्टर मंडळींनी बॉम्बस्फोट घडवून नरसंहार केला नसता. कित्येक सुतिकागृहात गर्भलिंग तपासणी झाल्यानंतर तो गर्भ मुलीचा आहे म्हणून डॉक्टरच्या मदतीने कळी कुस्करून नष्ट केली गेली नसती. तेव्हा मनात चांगले, शुद्ध विचार यावेत हा आशावाद झाला. दुर्दैवाने तसे घडत नाही म्हणून जगात अशांती आहे. युद्ध आहे.
ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आहे अशी राष्ट्रे, आपले वर्चस्व राखण्यासाठी इतर राष्ट्रांवर हल्ला करत मृत्यूचे थैमान घालत आहेत. चीन ने तिबेट घशात घातले आणि अमेरिकेने व्हेनेझुएला, ना जिझसच्या, ना अल्लाच्या ना बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर काही परीणाम झाला .
एखाद्या शहरात किती मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे आहेत यावरून ते शहर पवित्र ठरत नाही. तर खरेच तेथे लोक सदाचाराने जगतात का? धर्माने वागतात का? मनातील दुष्ट बुध्दीवर विजय मिळवून जगतात का? तसे असते तर तीर्थक्षेत्री चोरी, लूटमार झाली नसती. सध्या जास्त गुन्हे हृषीकेश, बनारस, काशी अशाच ठिकाणी होतात. तेथील देव त्यांना चांगली बुद्धी का देत नाही? किंवा जे तीर्थयात्रा करून गाठीशी पुण्य जोडतात त्यांना तरी सद्बुद्धी असते का? तसे नसेल तर त्या पुण्यक्षेत्री जाण्यात अर्थ काय?
तसेच केवळ चांगले कपडे घातले, घर स्वच्छ ठेवले म्हणजे मनात शुध्द विचार येतील असे नाही. तर त्यासाठी मनाला बजावले पाहिजे की स्वतःच्या स्वार्थासाठी कोणावर जुलूम, अत्याचार करून चालणार नाही. कोणत्याही गोष्टीने तुला चांगल्या गोष्टी पासून विचलित होऊन चालणार नाही. विवेकाचा अंकुश टोचत राहिला पाहिजे तरच ते चुकून चुकणार नाही. अन्यथा हरीनाम मुखी आणि मन थाऱ्यावर नाही,किंवा राम नाम जपना पराया माल अपना, हे काय कामाचे?
याचा अर्थ स्पष्ट आहे. विचार आणि आचरण यात ताळतंत्र हवे. मनात शुद्ध विचार असेल तोच मंदिरात प्रवेश करत असेल असे नक्की सांगता येणार नाही. किंवा मनात शुद्ध विचार यावे यासाठी ईश्वराची करुणा भाकण्यासाठी भक्त मंदिरात जात असावेत का? सांगता येत नाही. आपल्या हातून अपराध घडला, चुकीची गोष्ट घडली की पश्चताप होतो का? पश्चाताप करून मनशुध्दी होईल का? सांगणे अवघडच.
आपण केलेल्या कृतीच्या किंवा अविचाराच्या पापातून मुक्त होण्यासाठी, क्षमा याचना करण्यासाठी लोक कदाचित मंदिरात जात असतील. ईश्वर क्षमाशील आहे आणि तो भक्तांना माफ करतो असे म्हणतात. त्यामुळे केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला की कदाचित लोक ईश्वराला शरण जात असावेत. तेथे मनाच्या शुध्दीपेक्षा स्वतःला संकटमुक्त करून घेण्याची घाई असते. मनात असणारी खदखद थांबावी किंवा इतरांना आपण पापभिरू आहोत हे दिसावे अशी इच्छा असते. मनाची टोचणी ही इतर कोणी व्यकीने दिलेल्या शिहेपेक्षा मोठी असते असे मानले तर मग अशा व्यक्तीचे आचरण कायमस्वरूपी शुध्द होते का? भविष्यात तो कोणताही अपराध करणार नाही किंवा वाईट विचार त्याच्या मनात येणार नाही इतपत मतपरिवर्तन होईल का?
मन नावाची गोष्ट आहे की नाही, माहिती नाही. मात्र कोणीही व्यक्ती आपल्या मित्राशी तुच्छतेने वागायला लागला किंवा एखाद्या व्यक्तीने गंभीर अपघात घडूनही त्या प्रसंगाकडे कानाडोळा केला की आपण सहजच त्याला विचारतो, तुला मन आहे की नाही? हे मन नक्की कुठे असते ते कोणालाही माहिती नाही. पण कवियत्री बहिणा बाई मात्र, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, जस हाकलं हाकलं फिरून येत पिकावर अशी मनाची व्याख्या करतात. एखाद्या व्यक्तीने आपले विचार ओळखले तर आपण त्याला मनकवडा किंवा मनकवडी म्हणतो. मग नक्की मन म्हणजे काय? मन मेंदूत असते की ह्रदयात?
आपल्या शरीरात विचारांची उत्पत्ती ही मेंदूच्या नुरॉनने बनलेल्या जाळ्यात होते असे शास्त्र मानते त्या अर्थी मन हे मेंदूच्या एखाद्या कप्प्यात असावे असे म्हणायला जागा आहे. काही कला रसिक असतात तर काहीना गणितीय काम प्रिय असते. हे सगळे त्या मनाचे व्यापार आहेत हे सांगूनही खरे वाटत नाही. डाव्या भागात जाणीव, भावना, विचार, तर्क, कल्पनाशक्ती इत्यादी गोष्टींना यांची प्रेरणा मनच देत असते. निर्णय आणि मुल्यमापन करण्याची कला मनाकडे असते. इतके मात्र खरे की हे मन आपल्याला स्वास्थ्य लाभू देत नाही. त्याच्या अंगी नाना कळा आहेत. ते दुःखी होते, ते तुम्हाला मनमुराद हसायला भाग पाडते, ते एखाद्या व्यंगावर टिप्पणी करते. ते रुसते, रागावते, हटून बसते. ते मिश्कील आहे, ते भांभावते, गोंधळते ते स्वतःत हरवूनही जाते.
आपण एखाद्या जागी किती वेळ एक चित्त बसू शकतो? काही सेकंद, फारच फार तर काही मिनीटे पण त्या वेळातही फक्त शरीर स्थिर असते मन तर इतस्ततः फिरत असते. आपण पाहतो काही माणसे एका जागी बसलेली असली तरी त्यांचे पाय सारखे हलत असतात, हाताच्या बोटांचा चाळा सूरू असतो किंवा पापण्यांची उघडझाप सुरू असते, डोळे इतस्ततः फिरत असतात. तेवढ्या काही मिनिटात बरे वाईट असंख्य विचार मनात येऊन जातात. ध्यानात बसणे तर फारच दूर.
वाल्या कोळयानी अंगावर वारूळ जमेपर्यंत ध्यान केले तेव्हा कुठे वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यासाठी आसक्ती सोडली, शरीरधर्म सोडला आपल्याला हे शक्यच नाही. वाटेत तहान लागली तर दहा मिनिटे आपण तहान आवरू शकत नाही, अगदी घर नजरेच्या टप्प्यात असले तरी आपण बिसलेरी विकत घेऊन पाणी पितो. कोणतीही गोष्ट झटपट ,त्वरेने मिळवण्याची शरीराला सवय लागली की ती सुटणे शक्य नाही.
सिध्दी प्राप्त करण्यासाठी परशुराम, शुक्रचार्यासह अनेकांनी अनेक वर्षे तप केले असे आपण ऐकतो. पण हे तप केल्यानंतरही त्यांचे मन ताब्यात असल्याचे ऐकिवात नाही. तसे असते तर दुर्वास ऋषींनी क्रोधीत होऊन शाप दिला नसता. परशुरामाने आपल्या पित्याने मातेचा वध करण्याचा दिलेला आदेश तार्किक विचार करून पाळला असता. याचा आपल्यापुरता अर्थ, कोणालाही मनावर सहजासहजी ताबा मिळवणे शक्य नाही.
अविचाराने वागण्यावर अंकुश आणण्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. याचाच अर्थ मनावर चांगले संस्कार झाले तर मनात वाईट विचारांचा संचार सहजासहजी होणार नाही. मनात वाईट विचार येण्यासाठी कोणी कुणाला काही सांगत नाही. एखादे आठ दहा वर्षांचे मुल आई बरोबर चांगले चाललेले असते, वाटेत एखादे कुत्र्याचे पिल्लू दिसते आणि त्या मुलाला अचानक कुत्र्याला लाथ मारावीशी वाटते किंवा दगड मारावासा वाटतो. आईला समजताच आई पाठीत दणका घालते. तिला वेगळी चिंता असते, ती कुत्र्याला का उगाचच मारतोस? हे न विचारता, “मेल्या, कुत्रा चावला तर? इंजेक्शने घेत बसावी लागतील.” आईने वास्तवतः काय सांगायला हवे? ‘ बाळा त्या कुत्र्याला लाथ का मारतो, त्याने तुझे काहीच तर केले नाही.’ पण भूतदयेपेक्षा तिला आपल्या मुलाला कुत्रा चावेल याचीच चिंता अधिक आहे.
तुमच्या ठायी जे काही विचार येतात त्याचे उगमस्थान हे मन आहे. त्या मनावर कोणाचा, अगदी तुमचा स्वतःचा ताबा आहे की नाही? ते ही महिती नाही म्हणून आपल्याला दुःख किंवा अति आनंद झाला की डोळे बंड करून पाझरू लागतात. त्या अश्रूंवर तुमचाही ताबा नसतो. अर्थात व्यक्तीला आनंद झाला आहे की दुःख हे त्या मनाला कसे कळत असावे? हे ही एक कोडेच आहे? मनाचा थांग लागणे अवघड आहे.केसात गुंता होतो हे आपण ऐकले असेल पण मनाचा गुंता झाला की मन सैरभैर होते. नक्की कसे व्यक्त व्हावे हे कळत नाही. मनात उलट सुलट विचार येऊ लागले तर आपली बिकट अवस्था होते.
अचानक खूप काळाने प्रियकर तिच्या समोर आला की आनंदाने रडावे, त्याच्या कुशीत शिरावे, की त्याच्यावर लटके रागावावे, रुसून बसावे, त्याच्याशी अबोला धरावा हे तिला कळत नाही. इतक्या गोंधळात ती पडलेली असते. तो गुंता तेव्हाच अचानक सुटतो जेव्हा तो तिला भावना आवेगाने कुणी आजूबाजूला आहे की नाही हे न पाहता मिठीत घेतो. तेव्हा कधीकधी विचारापेक्षा कृती योग्य ठरते. पण कधी कधीच, नेहमी नाही, अन्यथा परिणामाची भीती अधिक, कारण विचाराविना कृती म्हणजे अधर्म.
कधीकधी एखादी व्यक्ती तिला झालेला आनंद वा दुःख पटकन व्यक्त करत नाही, ती त्या भावनेच्या आवेगात हरवून जाते आणि समोरची व्यक्ती मग संभ्रमात पडते, मी आल्याचे दुःख झाले आहे की आनंद हेच तर तिला कळत नाही. ज्याला पटकन आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्याला सहृदयी कठोर काळजाचा, पत्थर दिल म्हणतात. तेव्हा मन आणि त्याची स्थिती समजून घेणे फार अवघड असते. एखाद्याच्या मनात शिरण्याची कला सहजसाध्य नसते, त्यासाठी त्या व्यक्तीच्या मनाचे दार नक्की कुठे आहे? कळणे अवघड असते. एखादी प्रेयसी फक्त त्याच्या हळुवार स्पर्शाने फुलते तर एखाद्या मोहिनिला फुलवण्यासाठी शब्दांचे भांडार खुले करावे लागते किंवा भेटींची खैरात करावी लागते, त्यामुळे मनाची चावी शोधणे तसे अवघड काम आहे. तर मन हा भावनेचा खेळ आहे. समोरच्या व्यक्तीची प्रसंगनुरूप भावना समजून घेता आली तरच ती व्यक्ती फुलते.
बर ह्या मनाची धाव एवढी प्रचंड की कुणीतरी आठवण काढायला आणि शिंक यायला सेकंद पुरतो आता या गोष्टीवर कुणाचा किती विश्वास आहे? तो त्यालाच ठाऊक. मनाला मोराची उपमा देणे कवी जगदीश खेबुडकर यांनाच जमते मग ते लिहितात, ‘बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला?” ही तर मनाच्या आनंदाची परिसीमा झाली.हा पिसारा फुलायला प्रत्यक्षात कुणी समोर असाव लागतं,यावच लागतं असे काही नाही.एखादी आठवण आली एखादा प्रसंग आठवलग तरी आपण खूदकन हसतो, ते का? ते गुज फक्त आपल्यालाच माहिती असते. त्या क्षणाला आपण जणू तिथे नसतोच, तर आपल्या सख्या, सजणा बरोबर एखाद्या नयनरम्य ठिकाणी एकांतात त्याच्या मांडीवर डोक ठेऊन हलकेच पहुडलेल्या असतो आणि तो एखादं नाजूक पान घेऊन आपल्या गालावरून, मानेवरून हलक्या हाताने फिरवत असतो.तेव्हाच तर आपल्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटत असते.
निसर्गाबरोबर मनात आंदोलने सुरू असतात. वसंतात कोकीळ पंचम लाऊन गावू लागली आणि तेव्हाच जर मनात प्रेमाला पालवी फुटत असेल तर मग मनाची अवस्था वेगळीच असते. मनाची अवस्था नेहमीच शब्दात पकडता येईलच असे नाही पण, ‘ मन उधाण वाऱ्याचे, ते गुज पावसाचे’ हे शब्द आरती प्रभू अर्थात चि. त्र्य. खानोलकर याना समुद्राची गाज ऐकताना सुचले असावे. तेव्हा मनाला आपण देऊ तेव्हढ्या उपमा कमीचं.
मनात चुकीच्या विचाराचे आवर्त उठले की मात्र ते तुम्हाला काय विपरीत करायला लावेल? ते सांगणे किंवा समजणे अवघड,रामदास स्वामी त्याचा उल्लेख विकारी असा करतात. तेव्हा चांगले विचार मनात यावे, हातून सदाचार घडावा म्हणून सुसंगती, सज्जनांचा सहवास, चांगले वाचन, शुध्द आचार महत्त्वाचा आहे. तुम्ही काय वाचता?, कोणत्या मित्रांशी सख्य करता? , कोणते पदार्थ खाता? कोणते पेय पिता? त्यानुसार तुमचे विचार घडत असतात.शरीरा प्रमाणे मनालाही चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. मनात वाईट विचार येत असतील तर त्यापासून केवळ दूर न जाता त्या विचारांच्या मुळाशी जाऊन त्याचे कारण शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावर सदवर्तनाचा अंकुश असेल तर ते भरकटणार नाही.
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे आपण बरेचदा म्हणतो. आपला शत्रू विचार करणार नाही ती शक्यता आपल्या डोक्यात येते. आपले चंचल आणि दुष्ट मन हेच नंबर एक चे आपले शत्रू आहे. आधी विचार मग कृती हा क्रम आहे, मग विचारच जर शुद्ध असेल तर हातून चांगलीच कृती घडेल.तेव्हा मनात चांगले विचार येण्यासाठी चांगल्या गोष्टीचे किंवा चांगल्या लेखकांचे वाचन करावे. ज्यांचे विचार जीवनाला प्रेरक ठरतील अशा मार्गदर्शकाचे लिखाण वाचावे. मोबाईल किंवा कंप्यूटरवरती लहान मुलांसाठी असणारे खेळही हिंसक असतील तर त्यांच्या मनावर परिणाम तर होणारच.
लहान वयातच पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करणे अभिप्रेत आहे. त्यांना चांगल्या वाचनाची सवय लावणे, भक्तीगीत ऐकवणे किंवा चांगल्या मित्रांच्या सोबत राहणे गरजेचे आहे तरच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील.
वाचनाची आवड असेल तर तरुण वयात आपण मिळेल ते वाचतो, त्यातील काही गोष्टी मनाचा ताबा घेतात, त्या गोष्टी चांगल्या की वाईट याची शहानिशा न करता आपण त्याच प्रकारचे वाचन दीर्घकाळ करत राहतो आणि मन त्याला हळूहळू प्रतिसाद देते. म्हणूनच तुम्ही काय वाचता आणि त्याची मांडणी कशी केली आहे? त्यानुसार तुमच्या मनावर परिणाम होत असतो. लेखकाची भाषा ओघवती असेल आणि विचार स्पष्ट असतील तर साहजिकच आपण त्या विचारांकडे ओढले जातो आणि आपल्या मनाची बैठक तशी होते. म्हणूनच संस्कारक्षम वयातच चांगले विचार रुजवणे, चांगली पुस्तके तुमच्या हाती पडतील अशी तरतूद करणे गरजेचे असते.
जी मुले,साहस कथा वाचतात किंवा उत्साहवर्धक कथा वाचतात त्यांना आपल्या हातातील पुस्तक पूर्ण केल्याशिवाय समाधान लाभत नाही, मग त्यासाठी रात्र रात्र जागे राहण्याचा प्रमादही घडतो. एखादी चांगली कादंबरी हाती पडली तरी जोपर्यंत समाधान होत नाही किंवा डोळे पेंगत नाहीत आपण ती वाचत राहतो. ती कादंबरी आपण कधी वाचून पूर्ण करतो असे आपल्याला होते, इतक्या झपाटलेपणाने आपण वाचत असतो. तेव्हा मनाचे खेळ खरच अद्भुत असतात ते सहजासहजी कोणाला कळत नाहीत हेच खरे.
‘मन क्यू बेहका बेहका रे आधी रात को’ गाणं ऐकल असेल,अर्ध्या रात्री कशाचीही आठवण होऊ शकते, तेव्हा काळा,वेळाची बंधने मनाला अडवू शकत नाहीत. मनाने एखादी गोष्ट करायची ठरवली की व्यक्ती त्यासाठी कितीही श्रम घ्यायला आणि कोणतेही दिव्य करायला तयार होते इतकी मनाची पकड मजबूत असते.
तरीही काही सत्शील मात्र आपल्या मनावर ताबा मिळवतात. अर्थात असा मनावर ताबा मिळवण्यासाठी किती संयम बाळगावा लागत असेल? आणि किती प्रिय किंवा आवडत्या गोष्टींना तिलांजली द्यावी लागत असेल? ते त्या व्यक्तीलाच माहिती. देवेंद्र अधूनमधून मोहात पडत होता, चंद्र क्षतिग्रस्त झाला होता कित्येक ऋषींना मोह आवरता आला नाही याचे कारण त्यांचा मनावर ताबा नव्हता हेच तर आहे. संभाजी महाराज गोदावरीच्या मोहक रूपाच्या प्रेमात पडले होते हे तर वास्तव होते, त्यामुळे त्यांच्यावर बदफैली असल्याचा आरोप झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीतही बरखा या नृत्यांगनेमुळे नामुष्की आली. मनावर संयम नसला की काय होते त्याची अशी शेकडो उदाहरणे आहेत.
आपल्या सारख्या सामान्य माणसाला ते शक्य नाही कारण आपल्या मनात तर प्रत्येक सेकंदाला विचारांची वावटळे निर्माण होत असतात, अनेक प्रलोभने हाक देत असतात. अनेक विकारांच्या गर्तेत आपण अधूनमधून फिरत असतो.जो मन जिंकू शकतो तो जग जिंकू शकतो. काही शहरात नंदकिशोर संस्कार वर्ग चालवले जातात तेथे लहान मुलांना एकत्र जमवून रामायण, महाभारत किंवा इतर संस्कार कथा ऐकवल्या जातात. काही स्तोत्रे ,सुभाषिते पाठ करून घेतल्या जातात. संस्कृती जुजबी बोलायला वाचायला शिकवले जाते. या मुलांच्या मुद्दाम स्पर्धा घेऊन बक्षीस देतात. मुलांना एकदाची गोडी लागली.की मुले आपणच योग्य मार्गावर जातात.
सांगायचा मुद्दा आपण स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद नाही होऊ शकत, आपल्या विचारांची तेवढी झेप नाही पण मनात शुद्ध विचारांची पेरणी नित्य करीत राहिल्यास निरोगी मनात थोडे तरी सदवर्तनाचे बीज उगवण्यास हरकत नाही.चांगले वागणे यालाही लोक आता भ्याडपणा समजतात, अलिप्त राहूनही नावे ठेवली जातात मग मन संभ्रमात पडते.
चुकीचे वागून किंवा विवेक हरवल्यामुळे काय त्रास होतो? याची शेकडो उदाहरणे डोळ्यासमोर असली तरी आपण एखाद्या क्षणी मोहात पडतो की फसतो आणि भोग पाठी लागतात. याकरिता दुसऱ्या व्यक्तीशी कोणत्याही बाबतीत तुलना न करणे सगळ्यात उत्तम. आपण आपल्या कर्माला आणि संचिताला जबाबदार असतो.जर आपण मनावर अंकुश ठेऊ शकलो तर आपल्या हातून कमी चुका घडतील साहजिकच कमी भोग पाठी लागतील. तेव्हा मोह, माया, मत्सर इत्यादी षड्रिपु दूर ठेवले, तसे मनाला बजावले तर संकटाची मालिका दूर ठेवता येईल.
मन शुध्द, अंतकरण स्वच्छ आणि आचारण चांगले असले की भलते सलते विचार मनात रुंजी घालत नाही, ‘रुणझुण रूणुझुणी रे भ्रमरा, सांडी तु अवगुणु रे भ्रमरा’ संतश्रेष्ठ काय सांगतात तर आपल मन भ्रमर असले तरी त्याला अवगुण टाकून देण्याची विनंती स्वतः कडे आणि ईश्वराच्या चरणी करा. भ्रमराची अवस्था येऊ नये म्हणून चांगले वागा. अर्थात त्यासाठी नामाचा आधार घेणे योग्य. पण नाम घेताना मनात अन्य विचार असतील तर नाम ही नाही आणि मनाला आरामही नाही.
तेव्हा दुसऱ्याला काय वाटते? किंवा दुसरा आपल्या विषयी काय मत बनवतो? यापेक्षा आपण आपल्याला कसे पाहतो? ते विचारून आपले वर्तन ठरवावे. कोणत्याही बाबतीत अति अपेक्षा बाळगणे म्हणजेही ताणच, मनावर ताण दिला तर विपरीत गोष्ट घडेल म्हणून अति अपेक्षा अगदी चांगल्या गोष्टींच्याही बाळगू नये म्हणजे ताण विरहित आणि शांत मनाने जगता येईल.
असो, आपल्या मनाला योग्य वाटेल आणि ज्याने आपल्या कुटुंबाला आणि समाजाला त्रास होणार नाही असे वागण्याची शिकस्त करू. मनाला इतके जरी बजावले तरी समर्थांचा काही उपदेश आपल्या पर्यंत पोचला असे म्हणता येईल. आता पर्यंत अनावधानाने अनंत चूक झाल्या असतील,त्यांना ईश्वर आणि अर्थात आपला मित्र परिवार क्षमा करील अशी आशा बाळगून चांगल्या विचारांकडे प्रवास करण्यासाठी हे मना तु बुद्धी दे.
नवरात्र उत्सव संपला दसरा झाला आता दिवाळी जवळ येईल, नवदुर्गा दर्शनासाठी कुटुंबे मुद्दाम या काळात उत्साहाने जातात. मग कोल्हापूरची महालक्ष्मी अंबा, तुळापूरची भवानी, माहुर गडावरची रेणुका ,वणीच्या गडावरील सप्तशृंगी इत्यादी ठिकाणी दर्शन घेतात.
रामनवमीच्या काळात नाशिक येथे पंचवटीला जाऊन काळारामाचे दर्शन घेतात. उन्हाळ्यात कोणी चारधाम यात्रा करतात. गंगेचे पवित्र उदक आणतात. गंगापूजा करतात. कोणी सुट्टी मिळाली की पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, शेगाव, शिरडी अशी भ्रमंती करून येते.
भारतात इतकी पवित्र स्थळे आहेत तरी लोकांचे आचरण का सुधारत नाही? देवदर्शन करून मनात शुध्द भाव निर्माण होण्याची कोणतीही हमी नाही. तुम्ही रामभूमी पर्यटन केले पण तुमच्या मनातील राम कोरडाच राहिला. त्या आत्मारामाला आधी ओळखा, त्याला शांत करा, संयम शिकवा, मनातील विचार दूर करतांना विषय आणि विकार दूर करण्यासाठी प्रयत्न केले तरच उपयोग, अन्यथा देह शुध्द न करता दर्शन, भजन,पूजन काहीच उपयोगाचे नाही.
तेव्हा भविष्यात आपण आत्मभान बाळगत आणि स्वतःच्या मर्यादा, क्षमता यांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करत जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जमेल तेव्हा दुसऱ्याच्या मदतीसाठी गेलेही पाहिजे पण स्वतः वर संकट ओढवून आणि आपल्या मर्यादा ताणून किंवा मनाविरुद्ध जाऊन कोणतीही गोष्ट न करू तर त्यातच आपले हित आहे.आज तुकाराम महाराजांचा गौरव होत असला उदोउदो होत असला तरी जीवंत असतांना समाजाकडून हेटाळणी झाली. अगदी पत्नी सुध्दा संतापली होती. त्यामुळे प्रपंच नेटका करावा,आचरण आणि व्यवहार शुध्द ठेवावा आणि देवाचे नाम मुखी असावे,पण देवदेव करत भटकंती नको. ज्ञान मिळवण्यासाठी बहु आयामी व्यक्तीमत्व हवे ,धन असल्यास पर्यटन हवे. देवाच्या मागे मात्र लागू नये. ‘देवा करुनी पुढता त्याचा माग काढावा’ तेव्हा जमले तर देवाच्या निमित्ताने व्यवहार सदाचरणाने वाढवला तर फारच उत्तम.
रामकृष्ण हरी। पाडुरंग हरि।