माझ्या मातीचे वैभव
सह्याद्रीच्या कुशीत राहतो त्यास ना कष्टाचे कधी भय
कोकणचा राजा शिवछत्रपती देई शरणांगतास अभय
खालाटी, वल्हाटी, राजापुरी, मालवणी भाषेत वेगळी लय
भजन कुणाचे, बाल्या नाचे चाळ बांधूनी, होळीला शबय
कोकणाची वाट वळणाची, मज गावाची दाटून येई सय
चतुर्थी, शिमगा कधी न चुकवला, रेल्वेची मधूने केली सोय
परशुरामाची भुमी माझी देवांच्या अधिवासाने पूण्यपावन
केशवसुत, आरती प्रभू, मधू कर्णिक, केळूसकर गाती गूण
एका बाजूस सडा सह्याद्री, सोडून बसतो अरबीत त्रिकाळ पाय
अंगावर त्याच्या खेळती सरीता, सावित्री, कुंडलीनी, नसे त्या उपाय
पहाटेस चहूदिशेने घुमते घंटा, घाडी, राऊळ देवास आळवती
घालून ईश्वरा अभ्यंगस्नान उटी लावूनी सजवता, वस्त्रे नेसवती
काकड आरतीला जमले भक्तगण, सोहळा प्रेमे, आनंदे पाहती
सुगंधी सुमने चरणी अर्पुनी शरण प्रभूला आशीर्वाद मागती
देवरायाची दृष्टी विशाल स्नेहमय नेत्र भक्तांना सामोरे पाहती
छाया माझी या भूमीवर भक्त न दुःखी माझा असेल देव नयने बोलती
आम्ही कुणबी, तेली, सोनार, वाणी,ब्राह्मण, सुतार, कुंभार, धवड
प्रत्येकाच्या पोटाची सोय करते माती, ना कोणाची येथे परवड
रेल्वे आम्हा सफर घडवते, कधी बोगदे, उंचच पूल भय ना वाटे
निसर्गाची असिम शोभा, उंचावरून पडे धबधबा, स्वर्गाचे रूप थिटे
माड,पोफळी शिपंतो लाटेने, पपनस, अननस, लावले कितीक काय!
सड्यावर कलमाची दाटी, काजू, हापूस, मांडकूळ उन्नतीचा माझा उपाय
गावात भरती चार दहिकाले, महादेव, सातेरी, कळकाई, वेताळ देई फळ
ज्याचा त्याचा मान काठीचा, खांब तोलणे नसे विषय मजेचा, देवच देई त्यास बळ
कोकणची माणसे साधी, घालती शिवी प्रेमळ नाती, येथे सर्वांना अभय
पाहुणचार कसा असावा? येथे येऊन पहा एकदा, राहण्याची उत्तम सोय
माझ्या मातीचे काळीज मोठे, फळ फळावळ आम्हा देत, तेच आम्हा वैभव
चार दिसात जीव सुखावे, येथील निसर्ग मजला भावे असे समृद्ध माझे गाव