वाटेवरती काटे गं

वाटेवरती काटे गं

आपल्या देशात अगदी सुशिक्षित समाजातही वर्षानुवर्षे मुलगी-मुलगा असा भेदभाव केला जात होता आता त्याचे प्रमाण कमी झाले इतकेच. मुलाच्या कपड्याबाबत आई खूप आग्रही नसते तसेच मुलगी लहान असेपर्यंत आई शर्ट पॅन्ट किंवा अन्य आकर्षक कपडे घालून खरे तर स्वतःची हौस भागवून घेते. आताची मुले खूपच शार्प आहेत त्यांनाही कोडकौतुक करून घ्यायला आवडते.

त्यातही पहिले बाळ मुलगी असेल तर तिच्या संगोपनात आणि तिच्या कपड्यात, तिला सजवण्यात आई कुठेही कमी पडू देत नाही. अगदी लहान वयातील मुलीही आपल्या कपड्यांच्या रंगसंगती, केशरचना, इअरिंग, बांगड्याबाबत आग्रही असतात. आताचे सर्वच पालक आपल्या मुलांना वय वर्षे अडीच असतांना बालवाडीत प्रवेश घेतात साहजिकच तेथे एकतर विशिष्ट युनिफॉर्म असतो किंवा रंगीबेरंगी कपडे असतात. पालक लहान मुलांकडून स्त्रोत्र, अभंग,आरत्या पाठांतर करून घेतात. त्यांना नृत्य करण्यास प्रवृत्त केले जाते. पालक आपल्या सर्व इच्छा आकांक्षा या लहान मुलांवर थोपवतात. आरंभी लहान मुलांनाही मजा वाटते कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुकच होते पण कालांतराने त्याचे रूपांतर स्पर्धेत होते आणि मग मूल स्पर्धेत राहावे म्हणून त्याच्या मनाविरुद्ध त्यांच्याकडून पाठांतर करून घे, स्पर्धेत भाग घे असा छळ सुरू होतो. लहान मुलांच्या बाबतीतही हे प्रकर्षाने होते.

मुली अगदी लहान वयातच फॅशनेबल कपडे घालून आई बाबा बरोबर एखाद्या समारंभाला जातात तेव्हा ती कौतुकाचा विषय ठरते. कुटुंबात पहिलीच मुलगी असेल तर तिला मुलाचे कपडे घातले जातात. फोटो काढून ते नातेवाईकांना कौतुकाने दाखवले जातात. अन तेव्हाच तिच्या लक्षात येऊ लागते की आपण सुंदर कपडे घातले आणि मेकअप केला की जास्तच सुंदर दिसतो. कधीकधी आईच तिची कौतुकाने दृष्ट काढते. हे लाडकोड पाहून मुलगी शेफारून जाते.

जशी मुलगी मोठी होते कपड्या बाबत आई थोडी जागरूक होते. तोकडे कपडे घातले जाऊ नये याकडे तिचा कटाक्ष असतो. तरीही मुलीच्या सुंदर दिसण्याबाबत आईच जास्त आनंदी असते. कधीतरी आई सहजच बोलूनही जाते, “माझी मुलगी परी आहे परी!” या सर्वांचा परिणाम म्हणजे वाढत्या वयातही मुली त्यांच्या आवडीचे कपडे घालू लागतात. मग मात्र आई सावध होते. मोठ्या वयात मुलींनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून बाहेर फिरु नये या बाबत ती आग्रही असते पण वाढत्या वयात मुले पालकांच्या ऐकण्या पलीकडे गेलेली असतात. ती अट्टाहासाने त्यांना आवडतात तेच कपडे घालतात. सध्या अती तोकडे कपडे आणि ढोपरापासून ठिकठिकाणी मुद्दाम फाडलेले कपडे घालून समारंभाला जाणे ट्रेंड झाला आहे. ऐवढेच नव्हे तर मित्रांसोबत फिरायला जाणे, उशीराने घरी परतणे किंवा त्यापुढच्या गोष्टी करतात. आताच्या स्मार्ट जगात पालकांच्यापुढे मुलांचे फारसे चालत नाही ही वस्तुस्थिती आहे.

तरूण मुले स्वतःची स्पेस शोधतात. मुलींना स्वतंत्र रूम किंवा बेडरूम हवी होते, तिला तिचे स्वतंत्र कपाट हवे होते. तिचे कपडे,तिची सौंदर्य प्रसाधने यासाठी वेगळी व्यवस्था असते. त्या गोष्टींना कुणी हात लावलेला तिला आवडत नाही. कोणी तक्रार करत नाही तोपर्यंत आईही नव्याने येणारी प्रत्येक फॅशन आपल्या मुलींसाठी करू देते. कोणत्याही क्षेत्रात ती मागे राहता उपयोगी नाही असेच तिला वाटत असते. वास्तवतः प्रत्येक स्त्री अपुरी स्वप्ने आपल्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण करत असते.

नकळतपणे याचा परिणाम मुलीच्या वर्तनावर होतो आणि ती कुटुंबात आपण खास आहोत अशा तोऱ्यात वागू लागते. हळूहळू आईशी सहज होणारा संवाद कमी होतो. अनुभवी आईच्या लक्षात येताच, मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत? त्या कोणत्या विषयावर बोलतात ? यावर आईचे लक्ष असते. मध्यम वर्गीय कुटुंबात कामासाठी मेड असल्याने मुलींना घरकामाची सवय नसते. त्यांच्या शिक्षणाच्या काळात पालक त्यांना घरातील कामापासून मोकळे ठेवतात. त्यामुळे पूढील काळातही मुली घरातील कामे इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात.

मुळातच मुलांपेक्षा मुलींना कपडे, सौंदर्य प्रसाधने याची जास्त आवड असते आणि वाढत्या वयात मुक्त वागण्याची एकही संधी मुली वाया घालवत नाहीत. या सर्वाचा परिणाम म्हणजे मुली पझेसिव्ह आणि सिलेक्टिव्ह बनत जातात. त्यांच्या आवडी निवडी ठरतात.त्यांच्या राहणीमानावर एक वेगळी छाप दिसते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मैत्रीणी त्यामुळे इंप्रेस होतात आणि तिला डोळ्यासमोर ठेऊन वागू लागतात. तिच्या प्रमाणे आपल्याला जगता यावे यासाठी घरात तगादा लावतात. त्यांचे फ्रेंड सर्कल तयार होते. त्या अगम्य भाषेत विविध विषयांवर बोलतात. तारूण्यात असल्याने त्यांना मुलांविषयी आकर्षण वाटू लागते. इथेच धोका निर्माण होतो. अभ्यासाचे किंवा विशेष वर्गाचे कारण सांगत मुले अधीक वळ घराबाहेर राहू लागली की पालकांच्या मनात शंका उत्पन्न होतेच.

आताचे जनरेशन स्मार्ट आहे, वय वर्षे आठ ते दहा उलटली की मुली आपल्या दिसण्याबाबत जागृत होतात. कपड्यांची रंगसंगती, बांगड्या, चपला, रीबन, या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आग्रही असते. याचा सरळ साधा अर्थ आपण निटनेटके आणि आकर्षक दिसावे यासाठी महिला जागरूक असतात.

मग दररोज आरशासमोर उभे राहून आपल्या प्रतिमेसोबत हितगुज करण्यात त्यांचे बरेच तास खर्च होतात. मुलींच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीरात बदल होतात आणि प्रसाधनांची गरजाही वाढत जातात. वाढत्या वयानुसार त्यांच्या मित्रमैत्रीणींची संख्याही वाढत जाते. इतर मैत्रीणींशी तुलना करता तिच्या गरजाही वाढतात. घरा बाहेर पडतांना आपला ड्रेस त्यावरील एक्सेसरी योग्य आहे याची खात्री झाल्याशिवाय त्या बाहेर पडतही नाही.

प्रत्येक स्त्रीला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणे आवडते यात शंका नाहीच पण कमी कपड्यात वावरणे किंवा अतिरेकी मेकअप करणे यामुळे ती वाह्यात तरुणांच्या निदर्शनास येते आणि तिच्यावर अतिप्रसंग ओढवू शकतो. कधीकधी आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राकडून अतिप्रसंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय कपडे घालतो? किंवा किती प्रमाणात शृंगार करतो ? याचे वास्तवदर्शी भान मुलींनी बाळगावे. याच बरोबर आपण ज्यांना मित्र समजतो, त्या मित्रांसोबत पर्यटनासाठी किंवा पिक्चर पाहण्यासाठी जातांना त्यांच्या वर्तनाबाबत हमी देऊ शकत नाही म्हणून शक्यतो एकांत जागी, किंवा एकटीने जाणे टाळणे अगदी योग्य. कोणत्याही संकटात पडून वैयक्तिक नुकसान होऊ नये याचे भान जपणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मुलांच्या खोट्या इमेजला मुली फसतात आणि वाहवत जातात. जेव्हा घडू नये ती चूक घडते तेव्हा उशीर झालेला असतो. तेव्हा विशिष्ट वयात स्वतःचा तोल सावरणे फारच गरजेचे असते.

शिक्षण घेतांना मुली समाजात वावरत असते तिचा आपल्या मित्रमैत्रीणींशी संवाद झडत असतो. साहजिकच तिच्यातील भिडस्तपणा आपोआप कमी होतो. ती कामासाठी प्रवास करू लागली की विनासंकोच कोणाशीही बोलू शकते. लग्न झाल्यानंतर तिच्या मनात आईशी होणारी ताटातूट किंवा आपल्या घरापासून आपण दूर जात आहोत असले कोणतेच दुःख नसते. विवाह झाल्यानंतरही आपले स्वातंत्र्य अबाधित राहणार हा आत्मविश्वास असतो म्हणून ती आनंदी असते. हा बदल अगदी पालकांनाही जाणवतो. आता लग्नाच्या वेदीवर कोणतीही मुलगी न लाजता प्रत्येकाची ओळख करून घेते तसेच आपल्या नात्यातील व्यक्तींची ओळख करून देते.

कॉलेजमध्ये किंवा कार्यालयात जाणाऱ्या मुली स्वतःच्या रुपाबाबत अतिशय जागरूक असतात. आवर्जून दर महिन्यात beauty parlour ची वारी करत असतात. व्यावसायिक beauty parlour वेगवेगळ्या ऑफर देऊन मुलींना उद्युक्त करतात. लग्न समारंभास जायचे असले किंवा काही विशेष कार्यक्रम असला तर स्वतःसाठी ब्युटी पार्लरमधून ब्युटीशीयनला आमंत्रित करतात. स्वतःच्या लग्नात शहरातील प्रसिद्ध ब्युटीशीयनला हळद ते लग्न असे पँकेज यासाठी मुली किंवा तिच्या माहेरचे विस हजार ते लाखभर रूपये सहजच खर्च करताना दिसतात. आता लग्न समारंभ हा धार्मिक विधी राहिला नसून तो एक ‘मेगा इव्हेंट’ बनला आहे. यात कुटुंब समाजात मोठेपणा करण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालतात. वास्तवता हे पैसे मुलीच्या भविष्यासाठी उपयोगी पडू शकतात.

मुलीच्या आयुष्यात एकदाच घडणाऱ्या समारंभासाठी असे करण्यात काही गैर आहे असे नाही. पण यासाठी खर्च होणारे पैसे आणि दिला जाणारा वेळ याचा अभ्यास केला तर एवढाच वेळ त्यांनी आपल्या कला आणि ज्ञान वाढवण्यासाठी केला तर त्यांचे व्यक्तीमत्व नक्कीच उजळेल जे पुढील विकासासाठी पोषक ठरेल.

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्यात लग्नात जावयाला हुंडा देण्याची पध्दत आहे. मुली सुखी रहावी यासाठी पालक ऐनकेन प्रकारे हुंड्याची रक्कम देऊन टाकतात. यापाई काही मुलीचे पालक जमीन गहाण टाकतात. मात्र कितीही हुंडा घेतला तरी नवरा आणि सासरच्या माणसांची हाव संपतच नाही. जर मुलीच्या पतीची मागणी पूर्ण केली नाही तर मुलीचा छळ होतो. प्रसंगी त्याचे पर्यवसान तिच्या हत्येत होते. जर तरूण मुला मुलीनी हुंड्याची दुर्दैवी पध्दतीस विरोध केला तर!

बरेचदा एखाद्या मुलीच्या संसारातून नवरा अपघाताने अचानक निघून जातो, माहेरी आई वडील हयात असतील तर स्नेहाचा हात नक्कीच पूढे येतो पण आई वडिलांचे छत्र हरवले असेल आणि भावाची पत्नी जुळवून घेणारी नसेल तर तीला माहेरी आधार मिळत नाही. सासरही तीला म्हणावे तसे सहकार्य करत नाही. म्हणून संमजस भुमिका घेत मुलींनी आपल्या पालकांकडे लग्न साधेपणाने करून देण्याचा आग्रह धरावा. आपल्या पालकांना लग्नासाठी जमीन विकावी लागू नये आणि कर्ज घ्यावे लागू नये याची जरूर काळजी घ्यावी.

दुर्दैवाने मुलींच्या सौंदर्याचा जेवढा विचार होतो किंवा वाहवा होते तेवढी स्तुती तिच्या बुध्दीमतेची, तिच्यातील कलेची ,तिच्या चातुर्याची होत नाही हे खरेच दुर्दैव आहे. अगदी मुलीचा विवाह करतांना प्रथम दर्शनी पाहिले जाते ते सौंदर्य, अर्थात वास्तवादी दुनियेत वावरणारे तिच्या शिक्षणाला आणि चातुर्याला तिच्या व्यवहारी वृत्तीला तितेकच महत्त्व देतात का l? पण ‘ती पाहताच बाला कलेजा खलास झाला.’ किंवा ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ असे घडते ते प्रथम दर्शनी होणाऱ्या तिच्या बोलक्या आणि सौंदर्यपूर्ण दिसण्यावर यात शंका नाहीच. ती दिसली आणि तिने मन जिंकून घेतले असे म्हणतात ते सौंदर्याच्या नजकतीतच.

कुणा मनात भरलेल्या तरुणाची प्रेयसी ते पत्नी हे transformation अगदी सहजासहजी घडत असावं असं म्हणण धाडसाचे ठरेल . प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येक मुलीची अदा वेगळीच असते.जुन्या काळचे पदराशी किंवा ओढणीशी चाळा करून प्रेम व्यक्त करण्याचे दिवस कधीच इतिहास जमा झाले. चिठ्ठी लिहून व्यक्त होण कालबाह्य झाले. ‘मै तेरे प्यार मे पागल, एक सहारा धुंडती हूँ’ गुणगुणण्याचे दिवसही कालबाह्य झाले.आता माध्यमे बदलली, व्यक्त होण्याची पध्दत आणि भाषाही बदलली असावी ‘फेसबुक किंवा ‘इनस्टा रिक्वेस्ट’ किंवा अन्य काही माध्यमातून मैत्री होऊ लागली आहेत त्यामुळे कोण या गोष्टीसाठी लीड घेतो, तो की ती हे ही निश्चितपणे सांगणे अवघड आहे. ‘नजर मिली और इश्क हो गया’ अशी स्थिती राहिलेली नाही.

लग्न हा विषय दिवसेंदिवस किचकट होत असून त्यातील गुंता वाढत आहे. करिअर करणे नक्कीच महत्त्वाचे आहेच पण मुलींनी कोणत्या वयात लग्न करावे याला घरबंध राहिलेला नाही. अगदी चाळीसी जवळ झुकलेल्या मुली अद्यापही अविवाहित आहेत. जीवनात स्थिरता आल्यावर आर्थिक सुबत्ता हवी तसे परीपूर्ण जीवनासाठी संसारही हवा. आपले सुख दुःख सांगण्यासाठी जीवाभावाची व्यक्ती हवी पण दुर्दैवाने तारूण्याच्या कैफात तो विचारच मुलींना सूचत नाही.

काही मुली त्यांच्या मनातील राजकुमार मिळावा म्हणून प्रतीक्षा करत असतात. येणाऱ्या स्थळाला काही ना काही कारणाने नकार देतात. काही उदाहरणात किती मुलांशी दोस्ती केल्यानंतर आणि किती वेळा डेटवर गेल्यानंतर दोघांमध्ये भावनिक बंध जुळतील हे ही सांगता येत नाही. त्यामुळे मुला मुलींची वय वाढत आहेत. शहरात वय वाढलेल्या असंख्य मुली दिसत आहेत. याने सामाजिक व्यवस्थेचा असमतोल निर्माण होत आहे. मुली आपल्या मित्राच्या भेटीसाठी गेल्या तर तिच्या पालकांना त्यात काही वावगे वाटत नाही. या भेटी नंतरच विचारांची देवाणघेवाण होते. त्यांची मते आणि विचार जुळले तरच ते एकमेकांना अनुरूप आहेत की नाही ते ठरते. इथपर्यंत सारे योग्य आहे पण हे भेटणे किती काळ सुरू असावे याला अखेर मर्यादा हवीच ना!

सध्या मुला मुलींचा माईंडसेट छोट्या छोट्या गोष्टींने बदलतो. ज्याच्याशी अनेक वर्षांची मैत्री होती आणि म्हणून लग्न केले असे बिलव्हड लग्न झाल्यानंतर वर्षभरात घटस्फोटाच्या पायरीपर्यंत पोचतात. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी म्हण आहे. एकत्र राहू लागले की एकमेकांचे दोष शोधण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे दिर्घकाळ मैत्री असणे हा तोटा ठरू शकतो.

मुला मुलींच्या अशा भेटीनंतर मने मुळात जुळतील की मग पुढे जाऊन मुलगा पुरेसा सधन नाही किंवा ‘मुलगी आकर्षक नाही, मुलात काही दम नाही’ मुलगा खूप संशयी आहे असे काही लक्षात आल्यानंतर काही दिवसांत मैत्रीचा ब्रेकअप होईल हे ही अनिश्चित आहे. जोवर तिला आपल्या जोडीदाराविषयी, त्याच्या प्रामाणिकपणा विषयी ल खात्री पटत नाही तोपर्यंत ती प्रत्यक्ष किंवा माध्यमावरून त्याच्याशी भेटत राहते आणि जेव्हा तिच्या मनाची खात्री पटते तेव्हाच ती त्याला प्रतिसाद देते किंवा नकार कळवते. यात किती कालापव्यय होतो तो त्याच जाणे. काही मुलींना संसाराचे रडगाणे आणि मुले त्यांचे व्याप नको असतात पण तुमच्या आईंनेही हे सर्व भोगले याचा विसर पडतो आहे हे दुर्दैवी आहे.

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर भेट हा फंडा काळाच्या कसोटीवर किती काळ टिकेल ? ते ईश्वर जाणे. सध्या प्री वेड शूटचा जमाना आहे मुलींचे लग्न ठरले की ते एकमेकांना सहज भेटत असतात त्यासाठी त्यांना कुटुंबाची परवानगी लागत नाही. प्री वेड शूट करतांना त्यांची एखादी पोझ बरोबर नसेल तर फोटोग्राफर किंवा व्हिडिओ ग्राफर “मँडम ! वन मोर टेक प्लीज” असे म्हणतो आणि ती न लाजता तेच आपल्या जोडीदाराला पुन्हा करायला लावते. जे काही फक्त दोघांमध्ये एकांतात घडायला हवं ते सार्वजनिक करण्यात काय मौज असते ते त्यांनाच माहिती. मात्र हे सर्व लग्नसमारंभात पडद्यावर पाहताना आपण आधुनिक युगात आहोत याची प्रचिती येत जाते.

पूर्वी मुलगी लग्न होऊन परक्या घरी जाणार या विचाराने वधुच्या आईचे डोळे भरून येत, तिच्या आठवणीने ती वेडीपीशी होई. दगडासारखा घट्ट बापही अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असे,त्याला तिच्या जुन्या आठवणी आल्या की भरून येते. कधीतरी मुली त्याच्यावर रागावली असेलही पण कधीतरी तिने बापाला धीरही दिलेला असेल, सावरले असेल.कधीतरी दुःख असाह्य होऊन बापाच्या कुशीतही ती शिरली असेल तर कधीतरी बाप एकटाच शांत शांत बसलेला पाहून तिच मन कातर झालं असेल. मुलीचं बापाची आई होऊ जाणतात.

एखाद्या मुलीने आपला प्रियकर निवडणे किंवा घरातल्या जाणत्या मंडळींनी तिच्यासाठी अनुरूप वर शोधणे या दरम्यान तिच्या मनात कोणते विचार उमटत असावेत? कोणती भावना तिच्या मनात दाटुन येत असावी?ज्याच्यावर ती आयुष्याचा जोडीदार म्हणून विश्वास टाकते आहे तो तिची सोबत निभावेल ना? तिचे स्त्रीपण उपभोगून झाल्यावर तिला एकटे सोडून तर देणार नाही ना? का म्हणून म्हणून तिने. अपरिचित माणसाशी मैत्री करावी? त्याला आपलं सर्वस्व अर्पण करावं? जर उद्या या माणसाने तिची.साथ अर्ध्यावर सोडली तर ती नक्की काय करेल? शिल भ्रष्ट झालं म्हणून आत्महत्या करेल की सावरून काहीच घडलं नाही समजून समजून नव्या उत्साहाने जीवनाला सामोरी जाईन? जे काही माझ्याशी घडल त्याचा ताण मी वागवू शकेन?

पुरूषी अहंकाराचा अनुभव घेतल्यानंतर ती त्यातून सावरू शकेन का? हा प्रश्न मुलींच्या मनात असतोच. एकदा वाईट अनुभव आल्यानंतर दुसऱ्या कोणा पुरूषाच्या नजरेला ती नजर देऊ शकेन की त्याच क्षणी मनात पिडा उत्पन्न होईल आणि जे भोगलं त्याची आठवण होऊन डोळे बंड करतील? कोणत्याही महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच लागली की ती शांत बसणे कठीण असते. एका स्त्री च्या मनात तिच्या वाटेला आलेल्या अशा प्रसंगा नंतर भावनेचा कल्लोळ उठत असतो. ती उध्वस्त होत असते. म्हणून स्त्रीपण जपण आणि कौमार्य सांभाळणे ही तितकीशी सोप्पी गोष्ट राहिलेली नाही.

आज कौमार्याची व्याख्या बदलली आहे. तरूण तरूणी नोकरीसाठी वेगळ्या शहरात राहतात. तेथे त्यांची नव्या मित्रमैत्रीणींशी भेट होते. ओळख होते. कालांतराने ते ऐकमेकांना आवडू लागतात तरीही लग्न करावे या निष्कर्षाप्रत ते येत नाहीत पण मैत्री गरज बनते. मग दोघांच्या शारीरिक आणि मानसिक गरजेतून ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहायचा निर्णय घेतात. ते लग्न कराराने बांधले जात नाहीत. पटेल तिथपर्यंत एकत्र रहायचे,एकमेकांच्या गरजा सांभाळत जीवन एंजॉय करायचे. समजा नाहीच पटले तर नाते संपवून मोकळे व्हायचे. सांगा यात खरच तरल भावनेला काही आधार आहे का? इथे ना शील भ्रष्ट होण्याचा संबंध असतो ना संसार उध्वस्त होण्याचा कारण ती समजून उमजून गरजेतून केलेली तडजोड असते. शील भ्रष्ट झालेच तर दोघांचेही होईल. फक्त स्त्री चे का होईल.

समजा पहिल्या जोडीदाराने साथ दिली नाही आणि गरजेतून दुसरा जोडीदार शोधावा लागला, तर तो ही तसाच निघाला तर? तो अननुभवी असेल असे नाही. तो ही त्याची गरज म्हणूनच तिचा स्विकार करेल. खरे तर त्याने स्विकार करणे हा शब्द मुळी चुकीचा ठरतो कारण तो ही काही अटींवर असलेला करार असेल आणि अटी दोघांच्याही असू शकतील. अर्थात येथे तरल भावनेला आधार असेल की नाही ते सांगणे तसे अवघड आहे. पूर्व अनुभवाच्या अद्रुष्य खुणा तो किंवा ती शरीरावर आणि मनावर वागवत असतांना, त्याच त्या अनुभवातून जाताना रोमांच उठेल मन कावरेबावरे होईल असे घडणे थोडे अवघड असेल. पहिले प्रेम, त्यातील कोमल भावना भविष्यात तशीच टीकेल की नाही सांगणे अवघड.

आज चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील ज्यांना तुम्ही आयडोल समजत होता त्यांनी आपल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन दुसरे घर शोधले आणि तीने तशी संमत्ती दिली. ऐकून खरे तर सुन्न व्हायला होते. त्या दोघांच्या जीवनात काय असे घडले असावे की मुल असतांना त्यांनी वेगळे व्हायचा विचार केला? मुख्य म्हणजे मुलांबद्दल असणारे प्रेम किंवा मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना का बांधून ठेऊ शकली नाही?

मैत्री निभावताना दोघे एकमेकांच्या विचारानेच आणि एकमेकांचा आदर करतच वागतील याची हमी कोण कशी देणार? दोघांपैकी कोणीही एका विशिष्ट टप्प्यावर चुकीचे वागू शकते आणि मैत्री संपू शकते.अशा वेळेस घडते त्याचा शारीरिक किंवा मानसिक दृष्य किंवा अदृष्य परिणाम ,एखादा दुर्धर प्रसंग स्त्रीच्या बाबतीत घडला तर तीने का म्हणून जीवाला घोर लावावा? असे, अननुभवी म्हणेतील , पण कोणीतरी शरीर लुटून गेल्यानंतर मनावर होणारी जखम पुन्हा पुन्हा भळभळत रहाणारच यात शंका नाही. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणणे स्त्री ला शक्य होईलच असे नाही. सर्व साधारणतः असा समज आहे की पुरुष स्त्री चे शारीरिक आकर्षण वाटते म्हणून ओढला जातो तर स्त्रीमनाने, त्या पुरूषाचे गूण आवडले म्हणून मैत्री करते. यात कोण कोणाची की स्वतःची फसवणूक करतो ते समजून घेणे अवघड आहे.

विवाहित जीवन म्हणजे काय,त्याची जबाबदारी कोणती हे कळण्यापूर्वी केवळ शारिरीक ओढी पोटी दोन तरूणांनी जवळ येणे नक्कीच धोकादायक ठरू शकते. काही मुली आपल्या आईच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातील अनुभवाने शिकतात, सावरतात तर काही मुली ह्या बंडखोर प्रवृत्तीच्या असतात. त्यांचे विचार ठाम असतात, अशा मुलींना आईही फारसे समजावू शकत नाही. या मुलीं शक्यतो काही गोष्टी आईपासून लपवतात पण आईला त्या फसवू शकत नाहीत.

आजकाल मुली उशिरापर्यंत आपल्या करिअर च्या शोधात असतात. दरम्यान जवळचे मित्र असतातच पण ते फक्त टाईमपाससाठी सोबत येतात. एकत्र फिरणे, खाणे, मौज मस्ती असा सगळाच थाट असतो. पण कधीतरी नाजूक वळणावर पाय घसरतो आणि मग मनावर आघात होतो. जाग येते तेव्हा सगळे लूटून नेलेले असते. बरे मैत्री त्यांनी समजून उमजून केलेलु असते. दोष देणार तरी कोणाला? ,मन उध्वस्त होते.

ही गोष्ट जगाला कळली तर! त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार करता येत नाही. तो मनावर ओरखडा उठवून निघून जातो पून्हा न भेटण्यासाठी. उपाय करून ती सुटका करून घेते पण मनात भळभळती जगम असतेच. झाले गेले विसरणे फारच कठीण असते. म्हणूनच चांगली ओळख असल्याशिवाय आणि त्याच्या वर्तनाविषयी माहिती असल्याशीवाय मैत्री करू नये.

मध्यंतरी वर्तमानपत्रात व इतर माध्यमातून मुलींनेही कौमार्यतेचा उगाचच बाऊ करावा की करू नये? यावर चर्चा झडली. चार मुलींशी संबंध ठेवणाऱ्या मुलाला त्याचे कौमार्य भंग झाले आहे का? कुणी विचारत नाही. तो ही आपला लग्नापूर्वी कोणाशी लैंगिक संबंध आला की नाही याबद्दल आपल्या जोडीदार पत्नीला काही सांगत नाही. मग मुलींनीच नैतिकतेची भिती मनात का म्हणून बाळगावी? विचार केला तर तात्विक मत म्हणून पटते तरीही वरवरच्या आकर्षणाला भुलून असे घडू नये हे योग्य. म्हणूनच आईने मुलीला वेळीच सावध करणे गरजेचे असते. पण तारुण्याच्या कैफात आणि मित्र मैत्रिणींच्या उन्मादात नकळत गोष्ट घडून जाते आणि त्याचे ओझे आयुष्यभर वागवावे लागते. म्हणूनच मुली असो की मुले तारुण्याच्या वाटेवर स्वतःला जपणे गरजेचे असते.

दुर्दैवाने सामाजिक संकोचाने योग्य वयात लैंगिकता आणि धोके या विषयी कोणतीही आई उघडपणे मुलीला सांगत नाही. त्यामुळेच मुली वयात आल्यानंतर आपल्या भावनांवर आवर घालू शकल्या नाहीत किंवा मित्रांच्या अमीषाला बळी पडल्या तर तारूण्याच्या एका वळणावर वाहवत जातात, नवलाई म्हणून किंवा त्यातील गंमत अनुभवण्याचा प्रयत्न करतात संकटात सापडतात. त्या गोष्टीत अडकत जातात. समोरची व्यक्ती अगदी जीवाभावाचा मित्र असला तरी भावनिक साद घालत किंवा ब्लॅकमेल करून मजा लुटत असेल आणि अंगाशी आले की सोडून निघून जाईल अशी शंका मनात असेल तर मुलींना सावध असले पाहिजे .

जोपर्यंत मनाची चंचलता कमी होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घाईघाईने घेऊन संकटात सापडू नये.प्रेम हे भुंग्या सारख असते ते आज कोणा एकावर बसेल उद्या दुसऱ्यावर,जोवर त्यातील धोका ओळखता येत नाही आणि जबाबदारी जाणीव येत नाही त्या वाटेने न जाण्यातच शहाणपण आहे.

लग्नापूर्वी तरुण तरुणींची मैत्री असते त्यात शारीरिक आकर्षण अधिक असते पण जबाबदारीची जाणीव नसते. वैचारिक प्रगल्भता असेल तर अनेक भेटीनंतर मैत्री टिकते. लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय दोघे समजून उमजून घेतात. भविष्यातील जबाबदाऱ्या ओळखतात. त्यासाठी नियोजन करतात. विवाह बंधनाच्या पवित्र संस्काराने मैत्री दृढ होते. काही क्षण उत्साहाचे असतात. नाविन्याचे आणि चैतन्याचे असतात.

विवाह बंधनाचा अर्थ मुलीला ती लग्नानंतर माप ओलांडून घरात प्रवेश करतांना हळूहळू कळू लागतो.या पूर्वी मोकळा वागणारा मित्र नवरा झाला की हक्क गाजवू लागतो. आग्रही मत मांडतो, हुकुमत गाजवू लागतो. तिला ते असाह्य होते किंवा त्याची भुमीका पटवून घेण्याचा ती प्रयत्न करते. तिच्यातील आक्रमकता वाढते किंवा हळवेपणा कमी होतो. विवाहबद्ध झाल्यावर येणारे सामाजिक बंधन हे सांस्कृतिक बंधन असते आणि ते झुगारून देता येणार नाही याची तिला नव्याने जाणीव होते. आपल्या भोवती असणाऱ्या नात्यातील व्यक्तीच्या अस्तित्वात ती खुलतेही आणि मर्यादा पाळतेही. पण प्रत्येक वेळी असेच होईल असे नाही. तिलाही वैचारिक स्वातंत्र्य असते, स्वतःचे मत असते, भुमिका असते. त्यांच्या मतांचा आदर करावा याबद्दल तिचे काही म्हणणे नसते मात्र तिच्या स्वातंत्र्याला कायमची मुरड घालायला ती स्वतः तयार नसते.

लग्न झाले म्हणून तिने तिचे विचारआचार स्वातंत्र्य का म्हणून गमवावे? का म्हणून मित्रांशी बोलणे टाळावे ? किंवा मित्र मैत्रीणींसह पार्टीला जातांना नवऱ्याने नाकारावे ? ही गोष्ट तिला खटकते आणि मग वारंवार खटके उडतात . विवाहापूर्वी दोघांमध्ये वैचारिक स्पष्टता हवी. दोघांनी एकमेकांच्या मताचा आणि अर्थातच स्वतंत्र भुमिकेचा आदर केला पाहिजे. विवाहानंतर सामाजिक भान जपणे दोघांनाही बंधनकारक आहेच पण उगाचच एकमेकांवर संशय व्यक्त करणे किंवा एकमेकांवर कुरघोडी करणे टाळता आले तरच विवाह यशस्वी होऊ शकतो.

यापूर्वी आपल्या मित्रमैत्रीणीच्या ज्या गोष्टी दोघांना चांगल्या वाटत असतात त्या लग्नानंतर वाटतीलच असे नाही. कला क्षेत्रात दोघेही काम करत असतील आणि कधी काळी थ्रिल, गंमत म्हणून किंवा आव्हान म्हणून त्याची सिगारेट किंवा त्याचा ग्लास तिने शेअर केलाही असेल पण लग्न झाल्यावर तेच ती करू धजणार नाही. यापूर्वी तो करत असलेला पांचट संवाद ती खपवून घेणार नाही आणि तिलाही तो करू देणारही नाही. लग्न झाल्यावर येणारे सामाजिक बंधन ते हेच. हिंदू संस्काराबाबत नाक मुरडणारासुध्दा असली गोष्ट खपवून घेणार नाही. मात्र स्त्री मुक्तीच्या नावाखाली आणि स्त्री स्वातंत्र्याचा खोटा उदो उदो करण्याच्या नावाखाली ज्यांनी लग्न केले नाही किंवा स्त्री स्वातंत्र्याचा पुळका घेत आपल्या पतीला सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मनाची अवस्था कालांतराने कशी होत असावी? ते न सांगणे योग्य.

हल्ली विवाहित असणारे तरुण तरुणीही आपल्या जोडीदाराच्या अपरोक्ष दुसरा जोडीदार शोधतात. कदाचित ती मानसिक गरज असू शकते. तिचा पती किंवा त्याची पत्नी समजून घेण्यात.कमी पडली तर भावनिक गरज म्हणून किंवा विचार जुळतात म्हणून मैत्री होते आणि त्याचा परिणाम नको तो होतो म्हणूनच लग्नानंतर दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.

शहरातून कुटुंबात आता दोघेही नोकरी करत असल्याने घरातील कामाचे समसमान विभाजन करू लागल्याचे दिसत आहे. अगदी १०० % नाही पण ३०ते ४०% जोडपी या पध्दतीने जगत आहेत कारण कामाची जबाबदारी आणि वेळा भिन्न असल्याने दोघांनाही घरात लक्ष देणे अपरिहार्य असते. हळूहळू हे बाळकडू आपोआप खाली झिरपत असते . अर्थात वाढत्या वयातील मुले याला अपवाद असणारच एखाद्या सुशिक्षित महिलेला आपल्या पतीने वा मुलीने घरातील कामात मदत केलेली चालत असली तरी आपल्या मुलांनी घरातील कामे करण्यास तिचा विरोधच असतो. आता मुलीही शिक्षण,क्लास, स्पर्धा किंवा अन्य कारण सांगत कामापासून सुटका करून घेण्यात धन्यता मानतात. साहजिकच काही तरूणींना लग्नाच्या वयात स्वयंपाक माहिती नसतो आणि पालक तिच्या करिअरमुळे तिने घरात लक्ष दिले नाही अभिमानाने सांगतात. मुलांचे जरूर लाड करावे पण भविष्यात एकमेकांना साथ देण्यासाठी घरातील व्यवहारीक ज्ञान मुलगा असो वा मुलगी ,दोघांनाही देणे तितकेच गरजेचे आहे. मी नोकरी करतो किंवा करते त्यामुळे अमुक एक जबाबदारी माझी नाही असे म्हणणे अविवेकी आहे. संसार दोघांचाही आहे त्यामुळे तो दोघांनी एकमेकांच्या साथीने पूढे नेला तरच दोघांमध्ये वाद झडणार नाहीत.

महिलांनी अन्याय सहन करू नयेत पण आपल्या विवेकी वागण्याला सोडचिठ्ठी देऊ नये. वैवाहिक जीवनात फक्त हक्काची बाजू पाहून चालत नाही तर विवाह म्हणजे दोघानी एकमेकांच्या भावना समजून घेणे, आदर करणे गरजेचे आहे. विवाह म्हणजे समर्पण, विवाह म्हणजे आपल्या जोडीदारासाठी त्याग.विवाहात पती किंवा पत्नी यांना स्वैर वागण्याचे लायसेन्स मिळत नाही तर विवाह संयम शिकवतो.

जसे दिवस पाठी पडत जातात, पती पत्नी नात्याचा अर्थ आणि गांभीर्य दोघाना कळू लागते.आधी मित्र असणारे दोघे वेगळ्या नात्याने आणि आपुलकीने दोघाना समजून घेऊ लागतात. एकमेकांच्या चुकाबद्दल क्षमाशील होत जातात. मात्र लग्न झाल्यानंतर स्त्रीला हा पुरुष फक्त माझा नवरा आहे याचा नव्याने तिला शोध लागतो. पुरूषालाही आपल्या बायकोचे मित्र चालेनासे होतात. उभयता ते एकमेकांवर मालकी प्रस्थापित करतात. असे का होते?बयाच समर्पक उत्तर कदाचित दोघेही देवू शकणार नाहीत.

मैत्री म्हणून परिचय असणे आणि पतिपत्नी या नात्यात एकमेकांना समजून घेणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. पती पत्नी म्हणून ज्या संयुक्त जबाबदाऱ्या असतात त्याची व्याप्ती हळूहळू उलगडत जाते आणि वैचारिक मतभेद असले तरी ते वाढत गेले तर जगणे अवघड बनते. म्हणूनच आधुनिक काळात नवीन जोडपी लग्न झाल्यानंतर काही वर्षे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. लग्नानंतर आपण एकमेकांना दीर्घकाळ साथ सोबत करू शकू का? या विषयी चाचपणी करतात. जर वैचारिक मतभेद वाढले तर वेळीच सांमजंस्य दाखवत दूर होतात. जर आपण एकमेकांना सहन करू शकू याची खात्री पटली तर संसारात स्थिर स्थावर झाल्या नंतरच बाळाचा विचार करतात. खरे तर याला परिपक्वता म्हणता येईल अन्यथा जोडप्यांच्या घटस्फोटानंतर बाळ पोरके आणि मनाने उध्वस्त होते.

विवाह संस्थेविषयी अभ्यास करणाऱ्या मंडळींचा दावा आहे जी लग्न ठरवून होतात ती दीर्घकाळ टिकतात मात्र अगदी घनिष्ठ मित्र मैत्रिण असणारे लग्नानंतर चार सहा महिन्यात घटस्फोटाच्या पायरीवर उभे असतात. याचे कारण मित्र म्हणून एकमेकांना स्वीकारणे फार अवघड नसते, पण दोघेही स्वतंत्र बाण्याचे आणि मनस्वी असतील तर पती पत्नी यांच्या नात्यातील बंधनात दुरावा येण्याची शक्यता वाढते. स्त्री पुरुष दोघेही आर्थिक निकषावर भक्कम असतील आणि मनस्वी असतील तर दोघांत कोणत्याही विषयांवर मतभेद झाले तर त्यांच्यात दुरावा निर्माण झालाच म्हणून समजा, कारण प्रश्न येतो माघार कोणी घ्यायची?

लग्नानंतर उशिराने बाळाच्या जन्माचा निर्णय वैचारिक पोक्तपणा आहे याचे कारण लग्नानंतर एकमेकांबद्दल स्वारस्य नसल्याचे किंवा आत्मीयता नसल्याचे लक्षात आले तर बाळ जन्माला घातलं म्हणून रडत रडत दीर्घकालीन संसार सुखाचा होणे शक्य नाही हे लक्षात येताच कटुता न आणता विभक्त होणे नक्कीच चांगले. जर हा पोक्तपणा न दाखवता लग्न केले आणि घाईघाईत बाळ होऊ दिले तर चुकीच्या निर्णयामुळे ते बाळ पोरके होते. दोघांच्या प्रेमाला दुरावते.

आपण मुलाचे बाप बनणार हे कळताच तरूण अचानक प्रोढ होतो, नवा उत्साह त्याच्यात संचारतो. नव्या जबाबदारीची जाणीवही त्याला उमगते. हर्ष,उल्हास, आनंद याला भरते येते कारण तो बाळाचा बाप तर बनणार असतोच पण त्याच्या मते त्याने त्याचे पौरुषत्व सिध्द झालेले असते हा साक्षात्कार त्याला होतो. अर्थात पौरुषत्वाचा अविवेकी अहंकार मनात न बाळगता आपल्या पत्नी विषयी ऋजुता मनात असावी. तिच्या बाळंतपणात तिची मानसिक अवस्था समजून घेऊन तिला भक्कम आधार देण्याची वृत्ती त्याच्याकडे असावी तरच स्नेह भक्कम होईल.

मातृत्वाच्या कळा स्त्री सोसून नव महिने ती गर्भ वाढवते, स्वतःच्या जगण्यावर बंधने आनंदाने स्विकारते ,मात्र काहीही न सोसता वारस बापाला मिळतो. कोणतीही शारीरिक, मानसिक झीज न सोसाता तो दिमाखात मी बाप झाल्याची बातमी जगाला सांगत असतो तेव्हा तिलाही मी त्याच्या कुटुंबाला वारस देऊ शकल्याचा आनंद तर असतोच. मातृत्वाने ती उजळून निघते. तिच्या मुखावर एक वेगळे वैभव आणि समाधान दिसू लागते.बाळाचा जन्म ही दोघांची वाढती जबाबदारी आहे आणि ती दोघांनी उचलणे गरजेचे आहे. स्त्री ला गर्भारपण देऊन पुरूष मोठा होत नाही किंवा बाप बनत नाही तर पत्नी आणि मुलं यांच्या बाबतीत कर्तव्य करूनच तो मोठा होऊ शकतो. पत्नी आणी मुलांविषयी आत्मियता,प्रेम त्यांच्या वरील विश्वास यानेच तो बाप म्हणून जास्त सिध्द होतो.

मातृत्व स्वीकारणे ही गोष्ट स्त्री च्या जीवनात बरीच उलथापालथ घडवून जाते.मातृत्व स्विकारतांना तिच्या करिअरवर आपोआपच बंधने येतात. मातृत्व रजा कार्यालय देत नसेल तर काही काळ तीचे आर्थिक स्वातंत्र्य नाहीस होतं, विवाहापूर्वीच्या तिच्या गरजा यात कपात होण्याची शक्यता असते. तिचे संचार आणि सहवास स्वातंत्र्य आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास यावरही परिणाम होणार असतो. याखेरीज गरोदरपणात होणारे शारीरिक बदल त्यामुळे येणारा मानसिक ताण ही एक वेगळी समस्या असते.

आपले शारिरीक सौंदर्य गरोदरपणात टिकेल की हरवेल? ही चिंताही नव विवाहित स्त्री च्या मनात असते. सामाजिक आणि आर्थिक असुरक्षितता यांचे दडपण आणि भविष्याची चिंता यामुळे काही काळ ती स्वतः अलिप्त ठेवते. गरोदरपणात आपला मित्र परिवार दुरावणार तर नाहीना? ही भावना ठाण मांडून बसते याचा परिणाम म्हणून सोशली ऍक्टिव्ह असणाऱ्या मुली आपले अस्तित्व हरवू नये यासाठी चिंतातुर होतात. जर जोडीदार खुल्या मनाचा आणि तिच्या भावना समजून घेणारा असेल तर तिच्या मनातील संभ्रम दूर करून तिला मानसिक आधार देऊ शकतो. तिच्या शंका दूर करून मातृत्व स्वीकारण्यासाठी तिच्या मनाची तयारी करून घेऊ शकतो. मातृत्व म्हणजे सृजनशीलता आहे, जर पत्नीला जोडीदाराची चांगली साथ सोबत असेल तर तिच्या गरोदर अवस्थेत तो तिच्या सोबत वेळ घालवून तिच मन फुलवू शकतो. तिला भक्कम मानसिक आधार देऊ शकतो.

गेले अनेक वर्ष शहरातून ‘गर्भ संस्कार’ कार्यशाळा चालतात तेथे गर्भधारणा होण्यापूर्वी किंवा गर्भधारणा होताच काय वाचावे?काय खावे? कोणता व्यायाम वा योगा करावा? किती वेळा सोनोग्राफी करावी? यासंबंधी योग्य ती माहिती दिली जाते मार्गदर्शन केले जाते. बाळ गर्भाशयात वाढत असताना माता त्याच्याशी कशी कनेक्ट होऊ शकते आणि त्याचे बाळाला आणि मातेला काय फायदे होतात? त्या विषयी मार्गदर्शन केले जाते.

प्रसुती काळात आपल्या पतीने जवळ थांबावे,आपल्याला मानसिक आधार द्यावा अशी तरुणींची इच्छा असते. प्रसुती काळात मन हळव झालेलं असतं म्हणून मै हू ना! च्या थाटात त्याने तिला आत्मविश्वास दिला तर ती खंबीर होते. शारीरिक बदलांच्या काळात पतीचा सकारात्मक पाठींबा, तिच्या देखभालीकडे लक्ष, दिर्घकाळ सहवास यानेच तिचे मनोबल वाढते. त्याच्या सहवासात ती फुलते,स्वतः ला सुरक्षित समजते. यामुळे जर पुरुष आपले कामकाज सांभाळून तिच्यासाठी वेळ देऊ शकत असेल तर तिला प्रसूतीसाठी माहेरी पाठवण्याची गरज नाही. मी तर म्हणेन तिला सोबत करण्यातच तिचे स्वास्थ्य आहे.

पहिले बाळंतपण माहेरचे, या संकल्पनेमागे, आई आणि मुलीचे जन्मापासून संबध असल्याने तिच्या स्वभावाची तिला कल्पना असते.आई मुलीला अशा जोखमीच्या काळात जेवढी पँपर करू शकेल जेवढी तिची विचारपूस करू शकेल किंवा तिचे श्रम कमी करू शकेल किंवा तिला सोबत करू शकेल तेवढी काळजी सासरचे घेतील की नाही ही काळजी मुलीच्या माहेरच्यांना वाटत असते.परंतु ते नेहमीच खरे नसते,कधीकधी अगदी या उलट घडते सासू किंवा नणंद यांना घरात येणाऱ्या बाळाविषयी उत्सुकता असते. साहजिकच तेच गर्भारपणात तिची अवास्तव काळजी घेतात. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भारपणातही स्त्री जेवढी शरीराची हालचाल करेल तेवढे तिचे गर्भारपणातून सुटका सहज होईल.तेव्हा दोन्ही बाजूंनी विचार व्हावा.

जर बाळंतपणात ती माहेरी गेली आणि तिची हक्काची रजा संपताना पुन्हा स्वगृही आली तर बदललेल्या वातावरणात स्थिर होतांना तिला जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास आणि थकवा जाणवेल. म्हणूनच शक्य असल्यास मातेने मुलीच्या मदतीला यावे पण फारसे गुंतून न घेता मदत करावी तरच मुलीला बाळ झाल्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे होईल.

वैचारिक प्रगल्भता असेल तर ताण सहन करतांना प्रसुतीचा आनंद तरूणी घेऊ शकतात. मोठ्या वयात ज्या तरूणींची प्रथम प्रसुती होते त्यांच्या बाबतीत शारिरीक लवचिकता कमी झाल्याने वैद्यकीय अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून स्त्री चे बाळंतपण हा बाळाचा जन्म आणि स्त्री चा पुर्नजन्म सोहळा आहे असे म्हंटले जाते.यामुळे घरातील किंवा कुटुंबातील सदस्यांनी ती एकटी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती उल्हासित आणि प्रसन्न राहिल याकडे लक्ष पुरवले पाहिजे. तिच्या आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतांना सोबत करणे गरजेचे ठरते.

गर्र्भाची पुरेशी वाढ झाली की हळूहळू मातेला त्याची चाहूल लागते. बाळ आणि माता यांच्यात संवाद सुरू होतो. ती भाषा स्पर्शाची असते. जाणिवेची असते. जस जसा गर्भ वाढतो, त्याच्या हालचाली वाढतात,बाळ आणि माता यातील संवाद वाढतो. या कालखंडात तिला असुरक्षित वाटू नये,तिची शारीरिक गरजच नव्हे तर भावनिक गरज योग्य प्रमाणात भागवणे ही पती आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी असते. ती हसतमुख राहील, ती योग्य व्यायाम करेल,योग्य आहार घेईल यांच्याकडे लक्ष देणे ही पतीची जबाबदारी आहे.त्याने ती मनापासून स्विकारली तर मातृत्व फुलत जाईल. तेव्हा पती आणि कुटुंबाचे,विशेषतः तिच्या आईचे सानिध्य,प्रेमळ शब्द ही प्रसुतीस सिध्द होणाऱ्या तरूणीची भावनिक गरज आहे. जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यानंतर तिला तिचा पती समोर दिसल्याने होणारा आनंद अवर्णनीय असतो. समोर बाळाच्या जन्मानंतर पुढील दोन तिन तासात डॉक्टर बाळाला स्तनपान करण्याची सूचना देतात,जेव्हा बाळाच्या तोंडाचा पहिला स्पर्श मातेच्या स्तनाग्रांना होतो तेव्हा मातृत्व तिच्यात झिरपू लागते.

तिच्या ह्रदयात प्रेमाचा पाझर फुटतो आणि बाळाच्या प्रत्येक कृतीतून ती आनंद शोधू लागते. तिच्या मातृत्वाचा तिला शोध लागतो. तिच्या पतीलाही आपण बाप झाल्याची मनी जाणीव होईल तेव्हाच तो पालकत्व स्वीकारण्यास मनाने खंबीर होईल.तिच्या छोट्या मोठ्या गोष्टीत मदतीस तयार होईल. जुन्या पिढीपेक्षख नवीन पिढीतील तरुण जास्त जबाबदारीने पालकत्व स्वीकारतात असे माझे निरक्षण आहे. मुलींचा जीवनातील प्रवास हा खडतर असतो. तो चांगला व्हावा यासाठी सत्शीलता, विवेक आणि नम्रता या मार्गानेच जीवन सफल होऊ शकते.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *