आई शप्पथ खरं सांगतो

आई शप्पथ खरं सांगतो

खोटं वाटलं तरी शप्पथ खरंच सांगतो खुशाल हवं तसं वागा
फाट्यावर मारा अदृश्य अडचणींना आज, आत्ता मस्त जगा

स्वतःशी हवे प्रामाणिक, खोटे उगाच कुणा, कशाला भ्यावे?
भिती मनी बाळगूच नये, दुसऱ्याशी आपुलकी अन प्रेमानेच वागावे

प्रेम करा स्वतःवरती किंवा जोडा मैत्रीचा नवा कोरा धागा
मोकळं करा मन तुमचं, संकटात मात्र मैत्रीला अवश्य जागा

रोजचंच रडगाणं, रोजचे प्रॉब्लेम, आज तरी सर्वच विसरा
आनंदासाठी मुहूर्त नको, समजा आजच आहे दिवाळी दसरा

मस्त म्हणा झिंगाट गाणे, एन्फईल्ड उडवा तिचा माज खरा
मोकळं आहे डोक्यावर आभाळ, कानी घुमणारा सैराट वारा

असो पत्नी वा मैत्रीण सोबत, करू नका कुणा तेव्हाच इशारा
झिम्माड पाऊस, उघडा माळ आणि टपटपणाऱ्या टपोऱ्या गारा

पावसात मस्त ट्रेक करावा मित्रांसह गाठावे नवे अवघड शिखर
काळे कातळ, त्यातील ओघळ, पहावे चैतन्य अन निसर्गाचा बहर

हिवाळ्यात गाठावे सुर्यमाळ, सापुतारा, अनुभवावी धुक्याची चादर
सकाळीच बागेत गेलात तर दिसेल गवतावर पसरले दवाचे अस्तर

आव्हान पेलावे नव लक्षाचे, तुमचे ध्येय, करावे साध्य कष्टाने सर
मिजास नको पण अभिमान हवा, हवी कृतार्थ स्नेहाची नजर

फेसळणाऱ्या लाटात खेळा, शंखशिंपले खुशाल गोळा करा
खुशाल खेळा पकडा पकडी, खुणावे सागर, स्वच्छ वाळूकिनारा

दोघांत एक कुल्फी खावी, मिटून डोळे ऐकावी दर्याची गाज
उद्याचे काय? प्रश्नच नको, किनारा गाठतांना लाटांचा पहा माज

फुलपाखरू स्वंच्छदी फिरते, मोद वाटत भिरभिरते, ते जगते आज
गुणगुणणारा भुंगा गातो, आवडो न आवडो फिरतो करीत नाद

कोणालाच ठाऊक नाही उद्याचे, काय दडलंय काळाच्या पोटात?
का करावी उगा चिंता उद्याची? जगावं,जगू द्यावे राजाच्या थाटात

येत आहे मकर संक्रांत, गोड बोलून तिळगुळ हक्काने मागा
भांडण, गैरसमज खोल गाडा, जुळवा स्नेहाचा मुलायम धागा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar