आघात

आघात भाग १

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

संजीव पटवर्धन एका मध्यम वर्गातील कुटुंबात वाढलेला मुलगा, खुप हुशार नसला तरी पार्ले टिळक शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेत तो गुणांनी नेहमी पहिल्या पाच विद्यार्थ्यांत असे. वडील महानगरपालिकेत टाईम किपर म्हणून कामाला होते. आई  गृहिणी होती. बहीण शामला त्याच्यापेक्षा पाच वर्षे लहान. त्याची दहावी परीक्षेचा जून महिन्यात निकाल लागला ८३% गुणांनी तो उत्तीर्ण झाला. वडीलांनी त्याने कोठे प्रवेश घ्यावा याचा निर्णय त्याच्यावर सोडला. अनेक नातलगांनी पुढील शिक्षणाबाबत वेगवेगळे सल्ले दिले मात्र त्यांनी कॉमर्सला जायचे निश्चित केले. त्याला विज्ञान शाखेत रस नव्हता आणि कला शाखेला भविष्य आहे की नाही या विषयी त्यालाही फारशी माहिती नव्हती.

प्रवासात अभ्यासाचा वेळ वाया जावू नये म्हणून त्याच्या वडीलांनी ओळख काढून त्याला डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. इयत्ता अकरावी म्हणजे कॉलेजचे पहिले वर्ष. नवे वातावरण, मित्र मैत्रिणींचा सहवास, थोडी नवलाई, मौज मजा, साहस करून पाहण्याची ईर्षा यामुळे सत्र कधी सुरू झाले आणि कधी संपले कुणालाच कळत नसे. जेव्हा फर्स्ट टर्मचे मार्क डिस्प्ले केले की तेव्हाच “आसमानसे गीरा जमीन पे टपका” असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे व्हायचे. पण तो त्याला अपवाद होता, वर्गात  तसेही त्याला कोणत्याच विषयाचे फारसे भय वाटत नव्हते. सेमी इंग्रजी घेऊन तो दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे आणि commerce विषयांची तोंड ओळख प्रवेशापूर्वी झाल्याने  माध्यमाचे भय नव्हते. पहिल्या सत्राचा निकाल लागला तेव्हा book keeping आणि OC आणि Eco या विषयात त्याला उत्तम गुण होते. एकंदरीत अभ्यास चांगला चालला होता. घरून अभ्यासाचा दबाव नव्हता.





सकाळी अकरा वाजता Lecture संपली की तो तासभर Library मध्ये बसून notes काढत असे. घरी कधीही तो पुस्तके मांडून बसला असे दिसत नसे, आई कोमल अधून मधून त्याच्या बाबांच्या, शेखरच्या कानावर घाली, “अहो मुलांचा काय अभ्यास चालला आहे कधी विचाराल की नाही? ती कधी Home work करतात ते विचारा, काय करतात ते  पहा बरं वेळ काढून, त्यांना कमी गूण मिळाले तर नंतर मला दोष देऊ नका म्हणजे झालं.” 

असे बऱ्याचदा ऐकले की कधीतरी  तो तिच्या समाधानासाठी दोन्ही मुलांना बोलावून त्यांची उगाचच हजेरी घेत असे. “संजीव,इकडे ये तुझ्या अभ्यासाच काय चाललंय? ,तुमचे कोण ते देशपांडे सर परवा बाजारात भेटले, म्हणाले तू त्यांचे क्लास अटेंड करत नाही. तुझं नक्की काय चाललंय?” “अहो पप्पा मी तर रेग्युलर असतो आणि त्यांचे period फक्त wensday आणि Friday ला असतात, असं कसं म्हणाले ते?” “बरं बरं, तू रेग्युलर जातोस ना मग झालं”  शेखर त्याच्याकडे न पाहताच म्हणाला. “पप्पा अस कसं? मी उद्या स्टाफ रूममध्ये जाऊन विचारेन, त्यांनी तुम्हाला चुकीच सांगायलाच  नको.” संजीव आवेशाने म्हणाला.  तस शेखर समजुतीच्या स्वरात म्हणाला, “अरे जाऊ दे, ते चुकून मला कुणा दुसऱ्याचे पालक समजले असावे, तू रोज अटेंड करतोस ना मग झालं तर, आणि हो तुला संध्याकाळी वेळ असतो तर शामलचा होमवर्क पहा, तुझ्या ज्ञानाचा तिला उपयोग होईल.”

 “अहो पप्पा त्या मॅड मुलीला विचारा ती माझ्याकडे बसते का?” तिला आल्याबरोबर त्या मुलांशी खेळायचे असते,कधी एकदा सॅक टाकते,कपडे बदलते अस तिला झालेलं असते,चहा घ्यायलाही थांबत नाही. तिलाच विचारा.” संजीव तिची तक्रार करत म्हणाला. शामल त्याच्याकडे पहात म्हणाली, “तू सारखा मोबाईलवर गेम  खेळत बसतोस त्याच काय? माझ्या मैत्रिणी मला बोलवायला येतात म्हणून मी जाते, अंधार पडल्यावर  माझ्या बरोबर कोण खेळणार? पप्पा बरोबर की नाही?” पोरीने त्याला निरुत्तर केलं होतं. अशी गुणी मुलं असल्यावर अजून त्यांना काय सांगणार.





संजीव बारावी पास झाला तेव्हा त्याला ८५% गूण मिळाले कॉलेजमध्ये तो तिसरा आला. शिंत्रेनी ती बातमी सोसायटी फलकावर लिहिली. बऱ्याच जणांनी त्या फलकावर अभिनंदन लिहून स्वाक्षरी केली. साहजिकच ती बातमी सर्वत्र पोचली, त्यांच्या सोसायटीत त्याच्या कौतुक करणारे मेसेज बोर्डवर झळकले..

शेखरने गिरगावच्या पणशीकर मधून पेढे आणले. कोमलने ते पेढे देवाकडे ठेवून संजीवला नमस्कार घालायला लावला. पहिला पेढा त्याला भरवून त्याचे तोंड गोड केले,तो पाया पडला तस जवळ घेत म्हणाली, “पुढेही असाच अभ्यास कर आणि पटवर्धन घराण्याच नाव मोठं कर हो.”  संजीव  हसला. “आई तुझं आपलं काहीतरीच,त्याच्यावर भार टाकून कोणी मोठं होईल का?

“ती रागावून म्हणाली,”मला शहाणपण शिकवू नको, जा पेढे वाटून ये ,आणि हो कुणी विचारले तर  नीट बोल त्यांच्याशी,पाया पड वाकून.” संजीव रागावत म्हणाला,”तूच जा की पेढे वाटायला,मला कशाला सांगतेस?” “मी जाईन हो पण कुणी तुझ्या विषयी विचारले तर काय सांगू तो कोपऱ्यात  बसलाय रागाने म्हणून!” संजीव आढेवेढे घेत पेढे  वाटायला गेला.

संजीवने सोसायटीमधील  सर्व फ्लॅटमध्ये  पेढे वाटले, त्याच्या हातावर शिंत्रे काकूंनी, बने काकूंनी पाकीट ठेवले होते,नायर साहेबांनी त्याचा हात घट्ट धरून Congratulation केलं  तर सामंत घरी होते त्यांनी त्याला एक पुस्तक भेट दिलं. तो घरी आला, आईने विचारले, झाले का पेढे वाटून आणि हे काय घेऊन आलास? “त्यांनी  ती पाकिटे आणि पुस्तक आईकडे दिली. “अरे कोण कोण घरी होते ? काय म्हणाले?” तो रागावत म्हणाला,”आई, मला असं दारोदार फिरणं बर वाटत नाही, कोण काय म्हणत असेल, एवढेसे मार्क मिळाले तर जाहिरात करतात. मी पुन्हा जाणार नाही, सांगून ठेवतो.” ती हसली “बर बाबा, पुन्हा  नको जाऊस हो ,अरे आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी केलं तर त्यांनाही ते आवडतं. आणि त्यांनी तुला कौतुक म्हणून काही दिले तर ते नाकारू नये. तुला राग कशाचा आला इतका का तू मोठा झालास आणि कोणी काही म्हणालं तर म्हणालं.”

तो रागातच म्हणाला, “कोणी काही म्हणण्याची वाट कशासाठी पहायची?आपल्याकडे कोणी येत का पेढे वाटायला?” “तर,तर येतात की,तळमजल्याला रहाणारे शिंपी चार दिवसांपूर्वी पेढे घेऊन आले होते, मुलगा एमबीबीएस झाला त्यांचा नायर हॉस्पिटलमध्ये internship करतोय.अरे प्रत्येक आई वडिलांना मुलांच कौतुक असतेच,कोणी सांगते, कोणी नाही सांगत.” ती त्याच्या डोक्यावर केसातून हात फिरवत म्हणाली.

तो त्या रागातच हॉलमध्ये येऊन बसला तर शामल त्याच्याकडे पाहून म्हणाली, “पूर्ण सोसायटीत पेढे वाटून झाले, मला दिले का? की बहिणीला नाही दिले तरी चालतं!” तो  आधीच रागात होता, तिला चिडवत म्हणाला, “तुलाही मिच पेढे द्यायला हवे का? जा  की आईकडे माग.” “इतरांना द्यायचे होते तेव्हा बरे पळत सुटलास, बहिणीला देताना तुझे हात झरतात का? शामल तोंड फुगवून म्हणाली. “बर तुला पेढे देतो, तु मला काय गिफ्ट देणार आहेस ते सांग?”  ती रागावत म्हणाली “बहिणीकडे कोणी गिफ्ट मागत का रे दादूटल्या?” त्याने पेढा आणून  तिला दिला. तस ती म्हणाली, “असा नाही आईने तुला कसा भरवला तसा भरव.” 





त्याने पेढा तिच्या तोंडात कोंबला. तसं ती ओरडत म्हणाली,”दादूटल्या,हे रे काय,संध्याकाळी तुझ नाव पप्पांना सांगते बघ, मग कळेल तुला.”  त्यांचा आरडा ओरडा ऐकून कोमल बाहेर आली आणि त्यांच्यावर रागावत म्हणाली,”अरे काय आरडा ओरडा लावलाय? लोकांच्या घरातून कसला आवाज आहे का पहा? शेजारच्या काकू हसणार तुम्हाला.”

“शामल तिच्याकडे पहात म्हणाली,”सकाळी काकूच काकांशी जोर जोरात  बोलत होत्या.”  ती शामलवर ओरडत म्हणाली, “कार्टे चूप बस, कोण कोणाशी भांडत ते तुला काय करायच?जा निमूट अभ्यास कर.” “आता अकरा वाजून गेले,जेवायला वाढ की, उशीरा निघाले की बसमध्ये जागा मिळत नाही.”   “दहा मिनिटात वाढते तो पर्यंत एखाद्या धडा वाच आणि नुसती बसू नको सर्व पुस्तके वह्या  घे. नाहीतर जीना उतरताना काहीतरी मागत बसशील, अजीबात देणार नाही, सांगून ठेवते.” कोमल स्वयंपाक खोलीत गेली.

 कोमल म्हणाली म्हणून शेखरने सत्यनारायणाची पूजा घातली, सोसायटीच्या सर्व मेंबर्सना तिर्थ प्रसादाला बोलवले.कोमलच्या माहेरून मदतीला भाची आली होती.पूर्ण घर आनंदात होतं. सगळं कसं व्यवस्थित पार पडले. 

संजीव अकरावीत असतानाच  शेखरने त्याला नोट्स काढायला उपयोग होतो म्हणून  लॅपटॉप घेऊन दिला. आणि संजीव त्याचा योग्य उपयोग करत होता. कधी कधी तो आणि शामल  चेस खेळत बसत.कोमल त्यांना रागावत म्हणे “पप्पा आले की सांगणार हो  तुम्ही लॅपटॉपवर खेळत बसता म्हणून.”  तीने संध्याकाळी शेखरकडे मुलांची तक्रार केली, तर शेखर म्हणे अग तो बुद्धी असणाऱ्यांचा खेळ आहे.चांगली गोष्ट आहे. मुलं बुध्दीबळ खेळतात.

संजीव FY ,Bcom ला गेला तशी त्याची जाण्या येण्याची वेळ बदलली. सकाळी बारा वाजेपर्यंत तो घरी असे दुपारी एक नंतर त्याची लेक्चर सुरू होत. घर छोटे  असल्याने संजीव हॉलमध्ये बसूनच त्याचा अभ्यास करत असे. त्याने कोणत्याच विषयासाठी क्लास लावला नव्हता,एक दिवस शेखर त्याला म्हणाला तुला हवे  तर चांगल्या क्लासला  Vacation batch ला प्रवेश घे  म्हणजे तुझे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि percentage वाढतील  ,पण संजीव ठामपणे म्हणाला,”पप्पा I think I don’t need classes. I can study  on my own.” शेखर हसला,बरे तर तुला योग्य ते कर माझे काही म्हणणे नाही. 





संजीव अस इंग्रजी बोलायला लागला की कोमल ऐकत राही. तिला वाटे मुलगा किती सहज बोलतो,एकदा ती त्याला म्हणाली,”संजीव तू इंग्रजी बोलायला लागलास की ऐकत राहावं अस वाटते,मला समजते पण एक वाक्य बोलता येत नाही,तुला इतकं सहज कस जमतं?”  शामल हसली,”अग आई तो उगाच शाईन मारतो, त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन पहा, इतर मुली किती चांगलं बोलतात त्या,तुला कळत नाही म्हणून चमकीशगिरी करतो दुसरं काही नाही.” संजीव तिच्यावर रागावला,”म्हशी,माझ्यावर का जळतेस, तुला तरी येत का बोलता?”  “मला प्रदर्शन मांडायला नाही आवडत हो,तू आई,पप्पाना  दाखवायला उगाच इंग्रजी झाडतो. एखाद्या debate मध्ये भाग घे आणि Medal आण मग मानलं तुला.” शामल त्याला डिवचत म्हणाली.

संजीव तिच्या मागे धावला आणि तिची वेणी ओढू लागला तस ती ओरडत म्हणाली,” आई,ह्या म्हश्याला सांग ना,बघ माझी वेणी ओढतोय,केस तुटतील ना!”  कोमल संजीव वर ओरडत म्हणाली, “तुमचं पटत नाही तर एक मेकाची कळ का काढता,तू ग, का त्याला डिवचत बसते?” तिने संजीववर दोन फटके ओढले तस तो ओरडत म्हणाला, “तुझं बर आहे,केव्हा पासून ती मला चिडवते तू काही नाही बोललीस,आणि आता मलाच का मारते, सांग की ह्या म्हशीला माझ्या वाटेला जाऊ नको म्हणून.” तो रागावून निघून गेला.

परीक्षा जवळ आली तसा तो नियमित  अभ्यास करत होता. तळमजल्यावरील देशमुख काका त्याला अडचण आल्यास मदत करीत. Accounting आणि Auditing  मध्ये ते expert होते. ते Housing Society ,Company Vender Shops यांच Audit and Accounting च काम घेत.टॅक्स रिटर्न भरण्याचं काम ते करत. त्यांच्या मदतीला त्यांनी  lएक मुलगी ठेवली होती.

आजही तो अभ्यास करत बसला होता,इतक्यात त्याला सानिकाचा आवाज आला. बहुदा ती तिच्या आई बरोबर बाहेर निघाली असावी. तो आवाज ऐकून तिला पाहण्यासाठी तो उठला तोपर्यंत ती जीना उतरून खाली गेली होती. मागच्या महिन्यातील गोष्ट त्याला अचानक आठवली,तो बारावी उत्तीर्ण झाल्यावर पेढे वाटताना त्याची  सानिकाशी भेट झाली,या पूर्वी तिला रोज तो पहात असे पण तिचे वडील गोखले अतिशय शिष्ट असल्याने सोसायटीतील कोणी त्यांच्याशी कारणशिवाय बोलत नसे म्हणून त्याने स्वतः तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला  नव्हता. ती  तिसऱ्या मजल्यावर  रहात होती. सोसायटीच्या आवारात त्याने तिला अनेक वेळा पाहिले होते. ती पंधरा,सोळा वर्षांची असावी पण बांधा रेखीव होता. हसली की गालाला खळी पडे. बहूदा वडिलांना खूप घाबरत असावी कारण ते असताना ती चुकूनही बाहेर दिसत नसे, त्या काकू देखील दिसायला देखण्या होत्या पण त्या ही कोणत्याही कार्यक्रमात कधी दिसत नसत.





ती नेहमी घाईत असल्याप्रमाणे जिन्यावरून जायची. सोसायटीत  वार्षिक सत्यनारायण होळी पौर्णिमा रंगपंचमी, दहीहंडी असे अनेक कार्यक्रम असत पण ती सहसा खाली येत नसे. जेव्हा बारावीचा निकाल लागला तेव्हा त्यांनी संपूर्ण सोसायटीत पेढे वाटले तेव्हा पहिली त्यांची भेट त्याला आठवली अचानक तो भुतकाळात शिरला.

त्यांची भेट म्हटलं तर ओझरती,त्याने  तिला पेढे दिले तेव्हा तिने  विचारले, “तू बारावी कॉमर्सला होतास ना? किती पर्सेंट मिळाले?”  .तो म्हणाला “८५%च आहेत पण आई म्हणाली आपल्या Family मध्ये कोणी एवढे टक्के गूण काढले नव्हते तूच इतके गुण मिळवणारा पहिला मुलगा आहेस.”

ती हसली “अरे कमाल आहे,८५% म्हणजे का कमी!”  तिने हात पूढे करत congratulate केल.  “मग आता कुठे प्रवेश घेणार? म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये” तिने पुन्हा शेक हँड केलं. नाही, मी डाहणूकरला आहे,तिथे Senior ला स्टाफ बरा आहे  मी तिथेच ग्रज्युएशन करणार.”  ती हसली. तो तिच्या स्पर्शाने गोंधळला.तो दुसऱ्या फ्लॅट कडे वळणार तो तिने पुन्हा बोलावले, “संजीव  जरा इकडे ये,थांब हं मी तुझं तोंड गोड करते.” ,ती घरातून वाटीतून साखर घेऊन ,त्याच्या हातावर साखर देत म्हणाली,”माझी आई म्हणते चांगली बातमी ऐकली तर तोंड गोड करावं.”तो थँक्स म्हणाला, तस ती गोड हसली. तो जायला निघाला तस तिने हात हलवून त्याचा निरोप घेतला. त्याला तिच्या त्या स्पर्शात काय जादू होती ते कळेना, पण तो मनातून  सुखावला. पहिल्यांदाच कुणी मुलीने त्याच कौतुक केले होते. तो घरी आला तरी सानिका आणि तिचा तो मुलायम स्पर्श काही केल्या मनातून जाईना. तो एकटा असला की अस अनेक वेळा होई,प्रसंग आठवला की पानोपानी फक्त तिचा हसणारा चेहरा नाचत राही. यालाच का प्रेम म्हणतात, तेच त्याला कळेना? हा आजार कधी जडला  ते कळेना. ती दिसावी,हसावी या साठी तो वाटेल तितक्या वेळा जिने चढायला आणि उतरायला तयार  असे.

आजही तो accounts problems सोडवत बसला होता.आणि अचानक तिची आठवण आली. आई घरात काम करत होती. तो एकटाच हॉलमध्ये बसला होता. त्याला सानिका आठवली.”किती क्युट दिसते.” तो स्वत:शी म्हणाला. आजू बाजूस कुणीच नव्हते तरी तो चपापला. तिचा स्पर्श आठवून त्याला कुणीतरी मोरपीस फिरवून गेलं असावं असं वाटलं.



सानिका सेंट पॉल कन्व्हेंट शाळेत दहावी इयत्तेत होती. तिचा सफारचंदा सारखा गोरा रंग, नाजूक हनूवटी,लाल चुटूट ओठ,सुंदर भुवया आणि केसांचा बॉबकट तिला छान शोभत होता.गालावर किवा हनुवटीवर एक तिळ असता तर!  ती कधी तरी त्याला युनिफॉर्ममध्ये रस्त्यात दिसत होती. शाळेचा रेड चेक्सचा  युनिफॉर्म तिला फार सुट होत होता. ती शाळेत जाण्याच्या वेळी तो कॉलेजमधून येत असे. ते एकमेकांना स्माईल देत पण त्यांच बोलण अस कधी झाले नव्हते. 

सानिकाला दहावीला नव्वद टक्के गूण मिळाले तेव्हा तिला विश करण्याच्या निमित्ताने त्याने तिला रस्त्यात गाठले आणि गुलाब दिला, शेकहॅन्ड केले.ती गोंधळून गेली, लाजली,त्याच्याकडे पहात बसली तसा तिचा हात त्यांनी सोडला.”Sorry Sanika मी शेक हँड केल्याचं तुला आवडलेलं दिसत नाही, खरं ना?”

ती हसली,”छे छे तस काही नाही मी थोडी घाबरले कोणी पाहिले तर काय म्हणतील.” “Again Sorry” त्यांने हात जोडून नमस्कार केला,तस ती लाजली,तिने त्याचा गुलाब त्याला परत देत म्हटले, “Sorry म्हणणार असशील तर तुझा Rose परत घे.” दोघ खळाळून हसले.

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

8 thoughts on “आघात भाग १

  1. अविनाश गोसावी
    अविनाश गोसावी says:

    छान 👍

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      Avinash thanks

  2. cheap wigs

    Too expensive, not worth the price

  3. आघात भाग ५ – प रि व र्त न

    […] भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ […]

  4. आघात भाग ४ – प रि व र्त न

    […] भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ […]

  5. आघात भाग ६ – प रि व र्त न

    […] भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ […]

Comments are closed.