आठवणींचा कोष उलगडताना

आठवणींचा कोष उलगडताना

७९ व्या मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष, निसर्ग अभ्यासक, निसर्ग संरक्षक मारुती चितमपल्ली यांच्या बाबत माहिती वाचता वाचता मला मी सफाळे येथे रहात असताना जंगलात गेल्यानंतर जो अनुभव यायचा तो आठवू लागला. तेव्हा आर्थिक परिस्थिती बेतास बात होती, रेशनिंगवर अगदी दोन किंवा पाच लिटर रॉकेल मिळे त्यामुळे सारपणाला लाकडे हाच स्वस्त पर्याय होता. साहजिकच रजेच्या दिवशी जंगलात जाणे नित्याचे होते. मुख्य म्हणजे जंगलात जातो म्हणजे काही तरी साहस करतो असे वाटायचे.

मी आठवी इयत्तेत असतांना एकदा कारवी आणायला ताई बरोबर जंगलात गेलो होतो, आम्ही कारवी तोडताना दोन वेळा सरसर, सरसर आवाज आला. झाडावर माकडं ओरडत होती म्हणून आधी दुर्लक्ष केलं पण पून्हा तसाच आवाज आला आणि माकड जोराने ओरडू लागली म्हणून पाहिले तर आमच्या पासून सात आठ फुटांवर भला मोठा अजगर जात होता. क्षणभर आम्ही गोठलो, जेव्हा संकट लक्षात आलं तेव्हा आम्ही तिथून काहीच न घेता काढता पाय घेतला. जेव्हा थोड्या सपाट जागेवर आलो तेव्हा जीवात जीव आला. घरी गेल्यावर पाहिलेला प्रसंग सांगितला तेव्हा वडील आधी रागावले, “एवढ्या खोल जंगलात गेलातच कशाला?” असं म्हणाले. अर्थात घरासाठी कारवी हवी होती हे त्यांनाही माहिती होते. अजगर निद्रिस्त किंवा बेसावध असलेल्या प्राण्यांना आधी विळखा घालतो आणि नंतर गिळतो. तो सहसा माणसावर हल्ला करत नाही किंवा हलणारी वस्तू गिळण्याचा प्रयत्न करत नाही अशी माहिती वडिलांनी दिली पण त्या दिवसानंतर एकटं दुकटं जाण्याची हिंमत आम्ही केली नाही.

डोंंगरात भरपूर माकडे होती, ती सहसा वाट्याला येत नसत, पण आपण त्यांच्या दिशेने दगड मारला किंवा काठी भिरकावली तर मात्र दात विचकून दाखवत, किंवा फुत्कारत अंगावर धावून येत, त्यांचा तसा अवतार भितीदायक वाटे.

अशाच एका दुसऱ्या डोंगरात एकदा पावसाच्या दिवसात आमची गाय व्यायली. ती घरी परतली नव्हती या चिंतेने आई आणि माझा मोठा भाऊ गाईच्या नावाने, “तांबूsss तांबूsss” अशी हाक मारत मारत शोध घेत होते. खडीमशीनच्या वरच्या अंगाने गेल्यानंतर गाईला हाक मारताच गाय हंबरुन प्रतिसाद देऊ लागली आणि शोध घेत घेत तिथं पोचले. गाय जोराने हंबरू लागली. पाहिले तर गाय व्यायली होती आणि वासरु बाजूला पडले होते. गाईपासून काही अंतरावर मोठा अजगर गाईच्या दिशेने येत होता.आईने वासराला उचलून पोटाशी धरले आणि जोराने ओरड घातली त्याची स्पंदन त्याला जाणवली आणि अजगर दुसऱ्या दिशेला निघून गेला. डोंगरात भेकरं, ससा, डुक्कर असे प्राणी होते शहरी लोक दर रविवारी गावातील काही गावकऱ्यांसोबत बंदूक घेऊन आणि कधी कुत्र्यांना सोबत घेऊन शिकारीसाठी जात. आमच्या पर्यंत ह्या जंगली प्राण्यांच मांस कधी आलं नाही. पण जंगली डुक्कर, ससा, भेकर यांचे मांस रुचकर लागते असे माझे मित्र म्हणतं. रान डुकराचं मटण मला कोकणात खायला मिळालं. डोंगरात बिबटे आणि कोल्हे आहेत अस लोक सांगत, पण त्यांच दर्शन कधी झालं नाही आणि नशिबाने कधी आमच्या वाटेत आले नाहीत.

आमच्या सफाळे गावात पावसाळ्यात भरपूर सरपटणारे प्राणी दिसत आणि सरपणाची लाकडे, गोवऱ्याचे ढीग, गुरांसाठी ठेवलेले गवत, रचून ठेवलेल्या विटा किंवा रेती यात लपून बसत. त्यांचे सावज खरे तर उंदीर किंवा बेडूक जे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ढिगात लपून बसत. नाग-नागीण मिलनासाठी एकत्र दिसले तर आदिवासी त्याला मेळ असं म्हणत. पावसात विंचू, सरपटणारे इतर प्राणी रात्री कधीही पायाखाली येत असत आणि तेव्हा रस्त्यावर दिवे नव्हते म्हणून विषारी जनावरापासून काळजी घ्यावी लागे. एकदा आई संध्याकाळी गाईच दूध काढत होती,आमची शालू मांजर तिच्या पदरा बरोबर खेळत होती, दोन तीन वेळा आई मांजरीला रागावली तरीही तिचं पदराशी खेळणं सुरू होत आणि आईला दूध काढताना व्यत्यय येत होता, शेवटी मांजरीला पिटाळण्यासाठी आई उठली, पाहते तर मांजर जनावराला अडवत होती. आईने हाक मारताच बाबा आले आणि त्यांनी ते जनावर (साप) मारले. जेव्हा एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याची ओळख पटत नाही तेव्हा आम्ही जनावर म्हणत असू. सांगण्याचा मुद्दा, मांजर नसते तर कदाचित आईला दंश झाला असता.

आमचा एक मित्र पक्षी पकडण्यात माहिर होता, तो वडाचा, पिंपळाचा चिक एकत्र बांबूच्या टोकरात साठवून ठेऊन त्यात माडाचे किंवा ताडाचे हिर ठेऊन डिंक लागलेले हिर,जेथे पक्षांनी घरटी बांधली असतील अशा झाडाच्या फांदिवर खुबीने लपवत असे. पक्षी या चिकट काठ्यांवर बसले की पाय चिकटून जात व तो उडू शकत नसे. मग मित्र मजेत त्यांच्या घरट्या जवळ जाऊन पक्षी व त्याची अंडी घेऊन येत. पोपट, मैना, बुलबुल घुबड असे बरेच पक्षी तो पिंजऱ्यात पाळत असे.आम्हाला काही नवीन प्राणी पकडल्याचे कळले की आम्ही मुले पाहण्यासाठी जात असू. तेव्हा गंमत येत असे. आज त्या गोष्टींचा राग येतो. कालांतराने समज आली तशी त्याने तो उद्योग बंद केला.

सत्तरच्या दशकात थंडीच्या दिवसात रात्री सफाळ्याला भालू घरापासून फर्लांगभर अंतरावर ओरडत. भालू ओरडायला लागली की कुत्रे भुंकून झोपमोड करत. आम्ही भालू काही पाहिल नाही मात्र त्याची दहशत मनावर होती. अशी भालू ओरडू लागली की गावात काही वाईट बातमी आहे असं आई म्हणे आणि सकाळी याचा प्रत्यय येई, कुणीतरी स्वर्गवासी झाल्याची बातमी ऐकू येई.

गावात एखादी गाय अथवा बैल मेला की तो गावकुसाबाहेर टाकला जात असे, तेव्हा एका वेळेस दहा विस घुबडे त्यावर तुटून पडत. आमच्या शाळेकडे जायचा शॉर्टकट त्या जागेच्या बाजूने होता. ती गिधाडे त्या प्राण्यांची वाताहात लावतांना मी अनेकदा पाहिले आहे. त्यांनी अति मांस खाल्ले की ती तिथेच पडून रहात. ते चित्र अतिशय ओंगळवाणे दिसे.

आमच्या गावाच्या डोंगरात जर आम्हाला असे अनुभव आले असतील तर मारूती चितमपल्ली यांना विदर्भातील मेळघाट जंगलात कसे कसे अनुभव आले असावेत?
या आठवणी जागवायच्या तर मारूती चितमपल्ली यांना समजून घेतले पाहिजे असे वाटून मी मारुती चितमपल्ली यांच्याबद्दल माहिती वाचायला सुरवात केली. अनेकांनी विविध प्रसंगी त्यांचा घेतलेल्या मुलाखती पाहिल्या. त्यांनी लिहीलेल्या रानभुल या पुस्तकातील कथा ऐकल्या आणि मी त्यांच्या कथालेखनाच्या प्रेमात पडलो.

त्यांचा जन्म सोलापुरात गरीब कुटुंबात झाला. ते एका गुजराती माणसाच्या वाड्यात रहात त्यामुळे त्यांना गुजराती, आजोबा बुधवार पेठेत रहात ते तेलगू भाषिक होते ,तेथे तेलगू बोलणाऱ्यांची वस्ती होती त्यामुळे तेलगू, तसेच त्यांना लहानपणीच उर्दूमिश्रित हिंदी भाषा अवगत होती. या भाषा ते लहानपणीच ते शिकले. त्यांना वडिलांमुळे वाचनाची गोडी लागली. त्यांना जंगलाच वेड त्यांच्या आईकडून लागले, तिला जंगला विषयी भरपूर माहीती होती . ती त्यांना जंगलातील अनेक प्राण्यांच्या गोष्टी सांगायची.त्यांचा लिंबा मामा त्यांना जंगलात फिरायला न्यायचा. हणमंत मामा त्यांना पाखराची नावे सांगायचा त्यांच्या सवयी सांगायचा. लहान असताना आई रोज झोपण्यापूर्वी गोष्टी सांगायची.

त्यांनी आपल्या आईने सांगितलेली आठवण लिहून ठेवली आहे. ते रहात होते त्या घराच्या आवारात गुप्तधन होते ज्याची राखण एक नाग करत होता. अमवास्या, पौर्णिमेला ते गुप्तधन, “मी येऊ का?” अशी साद घालत असे, आमच्या आईला ते गुप्तधन आहे माहिती असुनही ती काही बोलली नाही, परिणामी धन आल्या पावली निघून गेले नाग तेवढा माझ्या समोर येऊन फणा काढून उभा राहिला, त्याला आई म्हणाली, “तुझे धन मला नको, माझा पोरगा मला सुखरूप दे.” तसा नागही परतून गेला. अशी आठवण चितमपल्ली सांगतात.अर्थात ही गोष्ट आता विज्ञान मान्य करणार नाही हे ही खरेच. शाळेत त्यांची प्रगती फारशी चांगली नव्हती. प्रचलीत शिक्षणात त्यांना रस नव्हता. त्यानंतर त्यांनी जंगल शास्त्र शिकण्यासाठी वानीकी विद्यालयात अर्ज सादर केला. तेथे सोलापूरचे गाडगीळ सर होते, त्यांनी त्याना मार्गदर्शन केले तसेच वितमपल्ली यांनीही मार्गदर्शन केले त्यामुळे लेखी परीक्षा समाधानकारक झाली नव्हती तरी ते पूर्वपरीक्षा पास झाले आणि त्यांना कोईमतूरच्या फॉरेस्ट रेंजर कॉलेज येथे निशुल्क प्रवेश मिळाला.

पारंपरिक शिक्षणा ऐवजी वेगळे शिकावे म्हणून ते फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये भरती झाले, तेथे त्यांनी, कोइंबतुर येथून शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या काळात ते नागपूर, मेळघाट, सह्याद्री रांगा फिरले, तेथील जंगले अनुभवली, विदर्भातील जंगले निसर्गाच्या विविधतेने नटलेली आहेत म्हणून ते तेथे स्थिरावले. चितमपल्ली यांना नरहरी कुरूंदकर, गो.नि . दांडेकर, चित्रकार अनवेलकर यांचा सहवास लाभला. या जेष्ठ लेखक व चित्रकारांनी त्यांना निसर्गाकडे पाहण्याची आणि लेखन शैलीची दृष्टी दिली, त्यामुळे जंगल खात्यातील नोकरी करता निसर्ग आणि पशूपक्षी यांचे निरीक्षण करण्याचा छंद त्यांना जडला. या छंदाने त्यांना झपाटून टाकले.

मेळघाट आकारमानाने खूप मोठे जंगल असून घनदाट आहे. येथे आजमितीस ८० वाघ आहेत पण जंगलाचे आकारमान खूप मोठे असल्याने वाघाचे दर्शन सहजासहजी होत नाही. ताडोबा-अंधारी ही पानगळ प्रकारातील जंगल आहे. याची व्याप्ती १७५० चौ. की इतकी आहे. येथे तारु नावाचा गावप्रमुख होता तो वाघा बरोबर झालेल्या झटापटीत मेला असे सांगितले जाते. तर अंधारी ही नदी चंद्रपूरच्या डोंगरातून वाहते. ती या जंगलाचे दोन भाग करते. येथे सागाची प्रचंड प्रमाणात झाडे आहेत.हा भाग अमरावती जिल्ह्यात येत असून त्याचे टोक मध्यप्रदेशात पोचते.येथील जंगल घनदाट आहे व तेथे ८८ वाघांचे वास्तव्य आहे. याशिवाय येथे चितळ, भेकर, खवले मांजर, अस्वल, रानगवा, नीलगाय, चौसिंगा इत्यादी प्राणी आहेत.


आज शासनाने येथील अभयारण्य लोकांसाठी खुली केली आहेत. पाऊस वगळता उरलेले आठ महिने येथे जंगल सफारी आयोजन केले जाते, त्याच बरोबर ज्यांना प्राण्यांचे रात्र जीवन पहायचे असेल त्यांच्यासाठी मचाण व्यवस्था केली जाते. मात्र जेव्हा चितमपल्ली कार्यरत होते तेव्हा तेथील स्थानिक माणूस बरोबर घेऊनच फिरावे लागे अन्यथा तेथील सारख्या दिसणाऱ्या रचनेमुळे, तेथील वाटा लवकर सापडत नसतं, अशा न सापडणाऱ्या वाटांनाच ‘चकवा’, म्हंटलं जात. कित्येक जंगलात आपण फिरताना जर वाट चुकलो आणि आपण आपल्या सहकाऱ्यांना हाक मारली तर कुणीतरी आपल्याला हाक मारत आहे असा भास होतो.त्या आवाजाच्या दिशेने आपण गेलो तर अनोळखी भागात जातो आणि वाट न सापडल्याने घाबरतो.हा अनुभव या पूर्वी अनेकांना आला असावा पण चितमपल्ली यांच्या लेखनाच्या शैलीमुळे तो ताजा होतो.

आज मारूती चितमपल्ली ९० पेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांचे वास्तव्य सोलापूर येथे असते. ते फॉरेस्ट खात्यात कार्यरत होते त्यामुळे त्यांनी विदर्भ तसेच पश्चिम घाटमाथा पिंजून काढला आहे. त्यांचा वन्यजीव आणि वनसंपदा यांचा चांगला अभ्यास आहे. डॉ. सलीम अली यांच्या सोबत पक्षी निरीक्षणाचा फायदा त्यांना झाला पण याच बरोबर ह्या अभ्यासाला जोड मिळाली ती सह्याद्रीच्या काना कोपऱ्यात रहाणाऱ्या वनवासी लोकांची अस त्यांनी स्वतः लिहिले आहे.त्यांनी कोरकू, गोंड माडीया, वारली अशा अनेक भाषा शिकून घेतल्या.

या वनवासी लोकांचं जीवन हे जंगलावर अवलंबून असत म्हणून त्यांना पशू, पक्षी, प्राणी यांच्या सवयी,त्यांची घरटी, विणीचा हंगाम याची माहिती असते ,चितमपल्ली यांना वनवासी लोकांजवळून ही माहिती मिळाली. समुद्री जीवन अभ्यासण्यासाठी त्यांनी कोकणातील खाडीत भ्रमंती करून कांदळवनातील तिवरं आणि खारफुटी यांचा अभ्यास केला.

वनवासी लोंकाजवळून मिळालेली माहिती पडतळून घेता यावी व अभ्यासपूर्ण लेखन करता यावे म्हणून संस्कृत आणि पाली भाषा ते शिकले. नवेगावच्या माधव पाटलांसोबत त्यांची मैत्री होती. ‘रानवाटा’, ‘निसर्ग रचना’, ‘पक्षिकोष’ या पुस्तकात त्यांनी आपले अनुभव मांडले. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे जीवशास्त्र अभ्यासकांच्या उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवा आहे. याच बरोबर त्यांच्या अनुभव कथनातुन वनवासी संस्कृती, त्यांचे औषधोपचार ज्ञान याची ओळख आपल्याला होते. त्यांच्या अनेक मुलाखती ऐकता ऐकता ‘आम्रवर्षा’ , ‘केशर पाऊस’ इत्यादी नवीन शब्द परिचीत झाले.
आपल्याला आलेला अनुभव शब्दबद्ध करण ही एक कला आहे. बरेच साहित्यिक आपले लिखाण करण्यासाठी निवांत जागेच्या शोधात फॉरेस्ट खात्याचा बंगल्याची निवड करत. गो.नी दां, व्यकटेश माडगूळकर यांच्या सहवासात ही कला ते शिकले. खात्यामध्ये फिरतीची नोकरी असल्यामुळे ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फिरले तेथील वनवासी जमातीच्या सानिध्यात आल्याने तेथील जीवन समजुन घेतले त्यांची भाषा शिकून घेतली.

वनवासी आणि शासन यांच्यातील संघर्ष आणि त्याची कारणे त्यांनी समजून घेतली. हा संघर्ष कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या बोलीभाषेचा उपयोग झाला. आम्ही सफाळ्याला असतांना आमच्या आजुबाजुला रहाणाऱ्या आदिवासी समाजाची भाषा आम्ही ऐकून ऐकून शिकलो. आपण जर त्यांच्याशी त्याच भाषेत बोललो तर त्यांना आपल्या विषयी आपुलकी वाटते. जेव्हा जंगलात सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी जात असू तेव्हा या आदिवासी बायकांसोबत जात असू , जंगलातील वाटा त्यांना परिचयाच्या असतात. सरपण आणतांना फॉरेस्ट गार्ड आम्हाला अडवत असत. कोणतेही इमारती लाकूड तोडलेले नाही याची खात्री पटली की जाऊ देत.

जेव्हा मारुती चितमपल्ली यांचे साहित्य मी वाचतो तेव्हा मी माझ्या गावतील आदिवासी त्यांची भाषा, पोषाख आणि संस्कृती याचा आणि स्वतःचा विचार करतो. माझे बालपण सफाळा या अतिशय मागास गावात गेले,माझ्या घराच्या भोवती आदिवासी वस्ती होती,आजही ही वस्ती आहे. या समाजातील चालीरिती थोड्या वेगळ्याच आहेत, बहुपत्नीत्व यात त्यांना काही वावग वाटत नाही, एखाद्या जोडप्याच नाही पटलं तर ते सहज वेगळे होतात आणि बाई तिला आवडेल त्या व्यक्ती सोबत राहू शकते, संसार थाटू शकते त्यासाठी पहिल्या नवऱ्याच्या संमतीची गरज नसते. इथे पती आणि पत्नीला समान न्याय आहे असं म्हणता येत. या समाजात प्रचंड अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरीती आहेत. माझे वडील फॉरेस्ट खात्यात नोकरी करत होते.
त्यामुळे हे लोक प्रारंभी आमच्या पासून फटकून वागत मात्र वडिलांची फिरतीची नोकरी होती त्यामुळे ते उंबरगाव, वाणगाव, उमरोळी, घोलविरा, संजाण, केळवे अशा विविध गावातील जंगल नाक्यावर होते. आमचे घर मात्र सफाळे येथे होते. माझी आई सणावाराला या आदिवासी कुटुंबाना गोडधोड द्यायची, लाकडं फोडणे, घरं शाकारणे, अशा कामासाठी बोलवत असे त्यामुळे आमच्या शेजारच्या लोकांची भिती हळूहळू कमी झाली.

वडिलांना तुटपुंजा पगार असल्याने आई सरपण स्वतः जंगलात जाऊन आणायची. कोकणातील वने आणि ठाणे जिल्ह्यातील वने ही सह्याद्रीच्या एकाच पट्टयातील असल्याने आईला जंगला विषयी चांगली माहिती होती. आम्ही मुले तिच्या सोबत जात असु त्यामुळे आम्हाला जंगलातील विविध प्रकारच्या झाडांची ओळख झाली.

आसन, काटेसन, साग, पालेसन, ऐन, शीवण, शीसव अशी जंगली झाडे ती दाखवत असे. सागाची कवळी पाने किंवा कोंब हातावर चोळली तर रक्त बाहेर पडल्या प्रमाणे हात लालभडक होतो. जंगलात सोबत पाणी नसेल आणि तहान लागली तर उक्षीची वेल कापली असता त्यातून पाणी ठिबकते,ज्यांनी तहान भागू शकते.आईने अशा अनेक गोष्टी चालता चालता दाखवल्या.

इमारती झाडे कोणती, सरपण कोणत्या झाडाचे चांगले आणि औषधी झाडे आणि वनस्पती कोणत्या याबाबत आईला माहिती होती. हरडा, व्हेळा, कुडा, काजरा, मुरुड शेंग, सफेद आणि लाल गुंज ज्याला विड्याच्या पानात हरापत्ता संबोधले जाते ती वनस्पती, या औषधी वनस्पती ती दाखवत असे. आसन, चिकन, टेम्भूर्ण, हुंब, पेटार, करवंद, उंबर अशा फळ झाडांची ओळख आम्हाला तिथेच झाली. यातील प्रत्येक फळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.मुख्य म्हणजे माकडांनाही ही फळ आवडतात.

कोणत्या आजारावर कोणत्या झाडांची साल किंवा फळ झरवून दिले की फायदा होतो हे ती जंगलात लाकडे गोळा करतांना शिकवत असे. पळस झाडाची फुले ती जमा करून घरी सुकवून ठेवे. पोट स्वच्छ होण्यासाठी कुड्याची साल, हरडा ,मुरुड शेंग, किरायत यांचा काढा अनाशा पोटी देत असे. आई कोकणात वाढल्याने तिला अनेक वनस्पतींची चांगली माहिती होती. काजरा वनस्पतींची बी उगाळून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येत असे.आईने निरीक्षणातून बरीच माहिती मिळवली होती. बाळ हरडा, व्हेळा, कडू कुड्याची साल या गोष्टी उन्हाळ्यात ती जमा करून ठेवत असे. अर्थात हे ज्ञान कोकणात तिच्या आईकडून आणि सफाळा येथे आदिवासी मैत्रीणीकडून मिळाले होते.

पंच्याहत्तर सालापर्यंत सफाळा गावापासून मैलाच्या अंतरावर घनदाट जंगल होते पण घरासाठी ईमारती लाकूड आणि सरपण विकण्याचा आदिवासी यांचा व्यवसाय यामुळे दोन हजार सालापर्यंत जंगल विरळ झाले. याच बरोबर ठेकेदारांनी येथे दगड खाणी सुरू केल्या, वेगवेगळ्या यंत्रांनी येथील जंगल दणाणून गेले. शहरी लोकांनी जंगलात अतिक्रमण करून शेती निर्माण केली. आपली घरे बांधली आणि जंगली प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला. आज अधूनमधून आरे किंवा मरोळ गाव भागात बिबट्या किंवा अन्य प्राण्यांचे हल्ले होतात त्याला आपणच जबाबदार आहोत.पर्यावरण समतोल राखण्यासाठी किमान 30% जंगल टिकवणे आवश्यक आहे पण महाराष्ट्रात अवघे 12% वनक्षेत्र शिल्लक आहे आणि विकासाच्या झपाट्यात ते ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यात समाधानाची बाब म्हणजे आताच्या सरकारने घराघरात गॅस दिल्यामुळे ज्यांना गॅस सिलेंडर परवडते त्यांनी जंगलात जाऊन लाकडे आणणे थांबवले आहे, याच बरोबर घरासाठी लोक लाकडाएवजी लोखंड वापरू लागले आहेत, परिणामी वृक्षतोड नक्कीच कमी झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे पुन्हा जंगल बहरू लागले आहे. पुन्हा मोरांचे ओरडणे ऐकू येऊ लागले आहे. हा बदल नक्की सकारात्मक आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “आठवणींचा कोष उलगडताना

  1. सागर सिद्धू पाटील
    सागर सिद्धू पाटील says:

    खूप छान लेख आहे सर , गावी रहाणाऱ्या माणसाला लेख वाचताना गावाचा परिसर पाठवितो, डोळ्यासमोर जंगल उभे राहते, धन्यवाद सर

Comments are closed.