आठवणींचा पुंजका
मी जवळ जवळ दोन महिन्यांनी सफाळे गावात गेलो होतो. हल्ली दर दोन महिन्यांनी माझा आतला आवाज मला ओढून माझ्या जन्मगावी, सफाळ्याला घेऊन जातो. विरार पाठी टाकलं आणि वैतरणा आलं की माझ्या शरीरात एक नवीन उर्जा खेळू लागते. वैतरणेचं पाणी पाहिलं की माझी गात्रे आनंदाने, उत्साहाने नाचू लागतात. सय येणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येतो. वैतरणा खाडीचा वारा मी श्वासात भरून घेतो. आता सफाळा येईल म्हणून उतरायला तयार होतो. रेल्वे खालून वाहणाऱ्या ओहोळात किती पाणी आहे ते पहाण्यासाठी माझी नजर वळते आणि तिथं डबकं पाहून मन क्षणभर उदास होतं पण क्षणभरच कारण तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याला, लोडखड किंवा उच्चभ्रू भाषेत रोडखड येथे असलेले तुडुंब भरलेले मातीचे धरण आठवले की आनंदही होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र चालू आहे म्हणूनच जगरहाट चालू आहे.
माझ्या लहानपणी आम्ही या कडाक्याच्या थंडीतही विहिरीच्या पाण्याने तेही सहा वाजेपर्यंत, सहा, सकाळचे बरं का, आंघोळ करत असू. गंमत म्हणजे विहिरीवर जाई पंर्यत थंडी लागत असे पण विहिरीतून पाणी काढून बादली अंगावर पडली की त्या पाण्याने सर्वांगातून वाफ बाहेर पडे. ज्यांनी थंडीत विहिरीवर आंघोळ केली असेल त्यालाच हे कळेल इतरांना त्या थापा वाटतील. तर लोडखड येथे एक आणि सरतोडी येथे दुसरे धरण झाले आणि ओहोळ वाहणे थांबले. पाणी धरणात बद्ध झालं. त्याला स्थिती प्राप्त झाली, त्यामुळे लोकांच्या बोरिंगला कमी खोलीवर पाणी लागलं आणि घरोघरी उत्पत्ती झाली पण जानेवारी पर्यंत ओहळाचे खळाळते पाणी थांबले, लय झाला. लोकांच्या दारात स्टॅण्डपोस्टवर पाणी आलं, काही लोकांच्या घरी पाणी आलं. तेव्हा thermodynamics समजण्यासाठी कुठे जाण्याचे कारण नाही. तर मूळ मुद्दा घरोघरी पाणी आल्याने आता विहिरीवर टिपरीने पाणी काढायला कुणी जात नाही, गाळ कुणी उसपत नाही. साचलेपण, मग ते प्रवाहाचा म्हणजे पाण्याचं असो, आर्थिक म्हणजे पैश्यांचे असो की बुद्धीचा असो. साचलेपण आले की गढूळपणा येतो. नष्ट होण्याची भीती वाढते. म्हणून पाणी प्रवाही पाहिजे, बुद्धी सकारात्मक चर्चा, वाद, संवाद, विचारांचे आदान प्रदान यासाठी हवी आणि पैसे चलनात येण्यासाठी, दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी हवे. आज सीएसआर फंडाची योजना आहे कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या किमान दोन टक्के आणि कमाल आठ टक्के रक्कम जनहीतासाठी खर्च करावी लागते पण जेव्हा सीएसआर फंड नव्हता तेव्हाही बिर्ला, टाटा यासारख्या कंपन्या समाजहितासाठी करोडो रूपये खर्च करतच होत्या. म्हणूनच टाटा आणि बिर्ला यांचं नाव जनमानसात आदरान घेतल जातं. माझी जुनी सवय किंवा खोड आहे म्हणा गाडी कोणत्या ट्रँकवर कधी घसरेल काही सांगता येत नाही असो विषयांतर टाळतो.
affiliate link
असो, तर सफाळा स्टेशनवर पाय ठेवला की सासुरवाशीण मुलीला माहेरी आल्यावर जसा आनंद होतो तसा मलाही होतो. स्टेशन बाहेर पडलं की आठवते, ते शिवदे कुटुंबाचे चणे-शेंगदाण्यांचे दुकान. विकासाच्या भाऊगर्दीतही शिवदे आपलं पारंपारिक चणे शेंगदाणे दुकान टिकवून आहेत. पाच पैशांचे चण्याचे माप दहा रूपये झाले हाच काय तो फरक तो ही चाळीस वर्षानंतरचा. ते चणे शेंगदाणे घेऊन मी चालत घरी निघतो, आजही रिक्षाने जाणे मला पसंत नाही. आजूबाजूला झालेला बदल पाहातच मी घर गाठतो. वाटेत अनेक लोक दिसतात पण ओळखीचे चार दोन चेहरेच असतात, आता तिथे मीच मला अनोळखी वाटू लागतो. कुंपणातील मोजक्याच झाडावरून नजर फिरवतो. शेगट बहरला आहे, त्याची फुले दवाने गळत असली तरी बऱ्याच शेंगा दिसल्यावर त्याची सतत देण्याची वृत्ती माझ्यातही यावी अशी मनोमन प्रार्थना त्या ईश्वराला करतो. गरम चहा, पोळी भाजी असा नाश्ता झाला की की घराच्या भोवती एक चक्कर मारतो. आंबा मोहरला आहे, आणि रामफळ फळांनी लगडलेले पाहून मन प्रसन्न होतं. पिकलेली पपई पाहून मी काठी घेऊन दोन पपया खाली ढकलतो. कारांद्याच्या वेलीवरचे खाली पडलेले दोन करांदे मला सापडतात.
लाल, पिवळी, केशरी जास्वंद, आणि लाल भडक मिरची जास्वंद पाहून बरे वाटले. मोगरी फुलली नसली तरी चांगली माजली आहे आणि गुलाबाच्या कळ्या मंद हवेवर डोलत आहेत. कृष्णकमळाच्या वेलीने कुंपण हिरवगार केल आहे. हा नजारा पाहून मन प्रसन्न होतं. हे निसर्ग वैभव हीच ह्या मातीची समृद्धता, अर्थात यासाठी त्यांची देखभाल करावी लागते. घरी असतील आणि मन म्हणेल तेव्हा पुतणी यासाठी वेळ देते. आवड असून चालत नाही सवड काढावी लागते हेच खरे. घराभोवतालच्या वातावरणाने मी चार्ज होतो. मित्रानो स्वतः ला चार्ज करणारी आपल्या आसपासची किंवा शहरा बाहेरची चार्जिंग स्टेशन तुम्हाला ठाऊक हवी. मग ते एखादे उद्यान असेल, गजबज नसलेले एखाद्या टेकडीवरील मंदिर असेल, एखादा ओहोळ किंवा समुद्राचा माणसांनी अस्पर्श किनारा! ही चार्जिंग स्टेशन तुमची प्रेरणा स्त्रोत असतात. तुमच्या मनाची बंद कवाड अलगद उघडणारी आणि “आप आपणाशी सवांदु” स्थितीत नेणारी जादुई कांडी असते. काही मित्र खूप जवळचे असतात, सुखात आणि दुःखातही सोबत करतात तशाच ह्या जागा त्याही तुमच्याशी हितगुज करतात पण तुम्हाला त्यांच्याशी मुक संवाद साधता आला पाहिजे. पाऊस सगळीकडे पडतो पण त्याचा अनुभव घेणारे आणि त्याच्याशी गप्पात रंगून जाणारे चार दोनच असतात.
“गतजन्मीची ओळख सांगत आला गंधीत वारा
मातीच्या गंधाने भिजला गगनाचा गाभारा”, अस शांताबाई शेळकेंनाच वाटतं.
किंवा मंगेश पाडगावकर म्हणतात
“जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझीम रेशिमधारा
सोशीक अशी माती सारखी वर्षावाने भिजे
युगायुगाची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे”
तेव्हा ह्या गावाकडच्या भिन्न ऋतूतील आठवणींचे धागे, या नाजूक धाग्यांची नाजूक वस्त्र लेवून आपण मोठे झालो. पहिल्या पावसाची मजा अनुभवत म्हटलेले ये रे ये रे पावसा असो किंवा श्रावणात घन निळा बरसला असो किंवा थंडीत काड्या कुड्या जमवून पेटवलेली शेकोटी असो हे आठवणींचे धागे मनाच्या कप्प्यात सुप्त अवस्थेत असतात आणि गावी गेलो की अचानक सय येऊन जागे होतात. थंडीत आम्ही चिंचा गोळा करून आमच्या पाड्यात येणाऱ्या बायकांना द्यायचो त्या बदल्यात आम्हाला वाफवलेल्या वालाच्या शेंगा,शेंगदाणा चिक्की, लाडू अस काहीतरी खाऊ मिळायचा, पैसे न खर्च करता आणि घरी न मागता खाऊ मिळवण्याची ही ट्रीक होती. यासाठी आमच्या घरापाठी असणाऱ्या चिंचेखाली फेरफटका मारावा लागे. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा अशा त्याच ऋतूत गेलो तर आठवणींची गुंफण नव्याने सुरु होते आणि नकळत मन बालपणीच्या हरवल्या काळात अल्लद उतरते.
या वेळेस अचानक आठवण होताच मी मित्राच्या वाडीत गेलो, मदनबाण मोगरा, कागडा, चमेली,जास्वंद अशी कित्येक फुलझाडे हातात हात घालून स्वागताला उभी असतात. एका खाचरात सफेद जांभळी वेल वांगी तर, एक खाचरात टामोटी म्हणजे घाटी टोमॅटो नव्हे त्यांना टामोटीच म्हणावं, पण टामोटी ही लालभडक होण्यासाठी जन्म घेत नाहीच साधारण पिवळसर झाक आली की ती आमच्या सारख्या माणसांच्या भक्ष्यस्थानी पडतात. त्यांची वांगी, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा यातील चव लाजबाब.
वीस बावीस वर्षांचा असतांना मी भांडूप येथे रहायचो आणि दर पंधरा दिवसांनी न चुकता शनिवारी सफाळ्याला जायचो, तेव्हा आवर्जून वाडीतून ताजी वांगी, टोमॅटो आणायचो. घरच्या शेवग्याच्या शेंगा आणि वाडीतून आणलेली ताजी भाजी नक्की खायचो. बहिणीच्या हाताची चव त्या भाजीला असायची. कालांतराने वय वाढत गेलं, व्याप वाढले, जाणं कमी झाले. पण त्या वयात केलेल्या गंमती जमती आजही पिंगा घालत असतात.
लहान असतांना शाळा नसेल तेव्हा, मी माणक्या आजोबांच्या शेतावर जायचो ते सांगतील तशी मदत करायचो, त्या शेत वाडीत चाळीसपन्नास वर्षांपूर्वी एक टिपऱ्यांचा रहाट रेड्याच्या मदतीने फिरत असे. मी अनेकदा त्या रेड्याला हाकत असे. रहाट फिरू लागला की टिपऱ्यांची रांग विहिरोतील पाणी घेऊन वर येई आणि ते पाणी पाटात जाई. त्या पाटातल्या झुळझुळत्या पाण्यात हात बुडवून खेळण्यास मला खुप मजा यायची तो राहट, कुचू कुचू करत चालत राही. दोन चार खाचरात पाणी शिंपून होईपर्यंत डोळ्यावर झापड बांधलेला बिचारा रेडा राहाटा भोवती गोल फिरत बसे. त्याच्या कष्टाने ते शेत पाणी पिऊन तृप्त होई. आम्ही त्या रेडयानी जोरात पळावे म्हणून त्याला हाकत बसू. त्याची शेपटी पिळत असू, ती क्रुरता उशीरानेच लक्षात आली. हे माणक्या घरत आजोबा मी केलेल्या मदती बद्दल सफेद जांभ, कधी लाल पेरू, तर कधी आंबा मला स्वतःच्या हाताने घेऊ द्यायचे. मी खिसाभर जांभ किंवा पेरू घेऊनच घरी जायचो. हव्यास कोणाला सुटलाय का? ती आठवण मनात जागी होताच मी त्या विहिरीच्या शोधात निघालो पण मित्र म्हणाला, अरे २००५ च्या पुरात विहीर कोसळली. तिथेच रहाटाचा आरा, एक मोठा लाकडी गीअर, भग्न अवस्थेत पडला होता. माझ्या मते त्या विहिरेने पाऊणशे वर्ष किंवा जास्तच सोबत माणक्या आजोबांना केली असावी. थकली बिचारी आणि कायमची विसावली. ती विहीर कोसळली ऐकून मी निश्वास सोडला.
आता त्या शेतात आजोबांच्या नातवाने चारपाच बोअर खणले असून ते त्या शेताची तहान भागवतात पण रहाटाचा तो कुचकुच आवाज आणि टिपऱ्या पन्हाळात पाणी टाकताना येणारी सुरावट कायमची शांत झाली. आता संपूर्ण शेतात, ड्रीप इरिगेशन केलं असल्याने पाणी बचत होते आणि जास्त क्षेत्र भिजते मात्र विहीर काळाच्या उदरात गडप झाल्याच शल्य मनास टोचलंच. आजोबांच्या मुलाला आणि नातवांना त्या रहाटाची आणि तेथील घराची गरज आता उरली नव्हती आपल्या कुटुंबातील वृद्धांचं तसंच असतं, उमेदीत ते कुटुंबासाठी राबत असतात पण एकदा ते थकले की बिचारे एकलं जीवन जगत असतात. त्यातही तो किंवा ती सोबत सोडून गेली की मागे उरेल त्याच जगणं जास्तच एकाकी आणि त्रासदायक बनत.
असो, “कालाय तस्मै नमः”. गावाच्या बाहेरून एक ओहोळ वाहतो, तो तांदुळवाडी किल्ल्यावरून आणि आजू बाजूच्या डोंगरदऱ्यातून अमाप पाणी घेऊन येतो. लहान असताना फेब्रुवारी मार्च पर्यंत आम्ही त्या ओहोळात प्रत्येक रविवार मनसोक्त डुंबत असू. पोहण्याचा सराव झाला आणि आम्ही भरल्या विहिरीत उड्या घालू लागलो. आज जागोजागी बंधारे बांधल्याने जानेवारी पर्यंत जेमतेम ओहोळ वाहतो. त्या नंतर बांधीव जागेतच पाणी दिसते.
“जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरूनी टाका सडत न एक्या ठाई ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका” असं केशवसुत म्हणाले आणि आम्ही फारसा विचार न करता त्यांच वाक्य प्रमाण मानलं. पण ते वाईट रुढी आणि परंपरा म्हणून असणाऱ्या गोष्टी बद्दल बोलले मग बाल विवाह असो, बहूपत्नीकत्व, केशवपन, भुतखेत याविषयी बोलले. आम्ही मात्र विकासाच्या भरभराटीत सर्वच जुने संपवले. नवउत्पती होतांना लय ही होणारच पण कोणत्या गोष्टी संपवायच्या याच भान माणसाला हवच हवं.
गावाच्या बाहेर जवळ जवळ वीस एकरात आमच्या दूरच्या काकांनी कै. शांताराम शेट केळूसकर यांनी शासनाकडून लिजवर मिळालेल्या जागेत आंबा काजूची बाग करुन त्या भोवती सुरूची लागवड केली होती. दूर वरून या बागेतील सुरूंच्या पानांची सळसळ ऐकली की पायात चाळ बांधून सहस्त्र गोपीका नाच करत असल्याचा भास होई. आम्ही मित्र या बागेतील कैरीच्या लोभाने कुंपणातून शिरायचो, एक दिवस मला माझ्या दूरच्या केळूसकर भावाने कैरी तोडतांना पकडले. रागावत तो म्हणाला “तू चोरी करतोस ? कैरी हवी तर माझ्याकडे माग, तारेच्या कुंपणातून शिरतांना तार लागली तर?” तेव्हा मला समजले ती बाग आमच्या दूरच्या बंधूची होती. अर्थात तेव्हा कैरी पाडणे किंवा पळवणे याला आम्ही तरी चोरी समजत नव्हतो. पण अनावधानाने का होईना आम्ही चोरी करत होतो. अर्थात मजा यायची.
ही बाग आणि गेरूचा ओहोळ संपला की सुरू होते शांततेचं साम्राज्य अर्थात जंगल. या शांत वातावरणालाही एक वेगळाच नाद असतो, तो ऐकण्यासाठी कानाच मन कराव लागत दूरवर विविध पक्षी ओरडत असतात. अचानक एखादा करडा ससा, रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस लांब उडी मारून मनात धडकी भरवतो. तो ससा पाहिल्यावर मात्र हसू येत,हात्तीच्या ससा होता काय?आधी कळालं असत तर.. अर्थात या म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. जंगलात किंवा जीवनात आधी काही कळतच नाही, कळतं तेव्हा धक्का बसतो कधी सुखद् तर कधी दुःखाचा. हे जंगल, ही संपदा भविष्यातील पिढीचा उर्जास्त्रोत आहे. हे वैभव जपणं ही या पिढीची जबाबदारी आहे. येथूनच डोंगराच्या नागमोडी वळणाने रस्ता वैतरणा नदी ओलांडून हमरस्त्यावर जातो. या प्रवासाला साधारण पाऊण तास लागतो.आज अनेक पर्यटक केळवा माहीम बिचवर सुट्टी एन्जॉय करायला येतात. ह्या डोंगराचा रान वारा खाऊन तृप्त होऊनच घरी परततात.
affiliate link
तेव्हा आठवणींची लडी उलगडताना लक्षात येते,अरे अख्खा गुंडा हाततच आहे मग सुटले ते काय? मित्र हो, आपल्या आयुष्यात अशा कितीतरी घटना घडतच असतात. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एक संकल्पना आहे त्याला शिफ्ट रजिस्टर अस म्हणतात तर या संकल्पनेत काही माहिती ही तात्पुरती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होते पण ती रजिस्टर म्हणजे साठवलेली असते आणि On Demand म्हणाव तशी ती स्मृती कोशातून बाहेर येते. आठवू लागते आणि त्यामुळे पुन्हा एखदा भुतकाळात डोकावता येते. अर्थात सगळ्यांचाच भुतकाळ हा संमीश्र म्हणजे खट्टा मिठाच असणार पण या कडू गोड आठवणी हेच तर संचीत आहे. कडू आठवणी म्हणतात मातू नकोस, आणि एवढा पल्ला आपण पार केला याचा आनंदही देतातच. असो ही आठवणींची लड न संपणारी आहे म्हणूनच थांबतो. Time Machine ही संकल्पना आपण प्रत्यक्षात राबवू शकू की नाही हे सांगता आलं नाही तरी आठवणींच्या महालात शिरल्यावर तुम्ही हव तस हुंदडू शकता ते सर्वस्वी तुमच्यावर आहे.
लिखाणातून मी स्वतः बालपण तर जगतोच पण या लिखाण प्रपंचातून तुमच्या आठवणीनां उजाळा मिळणारच याची मला खात्री नव्हे विश्वास आहे. तेव्हा हा आनंद मनाशी आठवताना माझी आठवण नाही काढली तरी चालेल पण आपल्या बालपणीच्या सवंगड्यांची आठवण आलीच तर त्यांना फोन करुन जरूर कळवा पहा त्यांचही सुख त्या आठवणींवर नक्की झुलेल.
सुंदर लेख!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
सुंदरलेख वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या