आनंद आणि अप्रूप

आनंद आणि अप्रूप

आज आपली पिढी ज्या वेगाने अनेक साधनांचा उपभोग घेत आहे ते पाहता आपण फक्त साधनांच्या जनरेशन नेक्स्ट ची वाट पाहण्याची उत्सुकता दाखवू शकतो. मग नोकियाचा मोठा हँडसेट ते आता स्लिम व्हर्जन हा बदल घडून आपल्या समोर येण्यासाठी फार काही काळ लोटला नाही. तीच गत कोळशाच्या इंजीनापासून ते मेट्रो किंवा मँगलेव्ह ट्रेनबाबत. सुधारणा एवढ्या वेगाने घडत असूनही त्या बाबत आपण फारसे समाधानी नाही मग आनंद किंवा अप्रूप वाटणे फारच दूर.

आपल्या हातात साधने यायला जेवढा कालखंड किंवा जेवढी वर्षे लागली त्याचा विचार करता आताच्या पिढीच्या हाती या वस्तू फारच लवकर मिळाल्या. आपल्याला हाती बॉलपेन मिळाल्यानंतर जेवढा आनंद झाला होता तेवढा आनंदही आताच्या मुलांना मोबाईल हाती मिळूनही होत नाही तर तो अँपल का नाही किंवा नोट का नाही ? या बाबत ते नाराज असतात. त्यांना कोणतीही गोष्ट ही उत्तमोत्तम हवी असते हे समजू शकतो पण मिळालेल्या गोष्टीत आनंद व्यक्त ते करू शकत नाहीत, अप्रूप वाटणं फारच दूर. हे असं का व्हावं याचा विचार करता लक्षात येतं की चूक ही आपल्या बाजूने होते. त्यांनी कितीही
चांगले गुण मिळवले तरी आमची अपेक्षा कधी पूर्ण होत नाही. म्हणजे मिळेल त्या गोष्टीत समाधान मानणे ही प्रवृत्ती नष्ट होण्यात आमचाही सहभाग आहे. पण जर तुम्हाला बालपण आठवत असेल तर अगदी लिमलेट गोळी मिळाली किंवा चणे शेंगदाणे मिळाले तरी आम्हाला जो आनंद होत होता तो आताच्या काळी कुठेतरी हरवला आहे याची खंत मनात आहे. कोणत्याही गोष्टीने मुलांचे समाधान होत नाही. कोणतीही गोष्ट त्यांना दीर्घकाळ मानवत नाही मग ती मैत्री असो की नोकरी. सतत कोणत्या तरी विचारात असणं, सतत कोणत्यातरी साधनात अडकून पडणे किंवा शोधात असणे अशी अस्थिर अवस्था असेल तर आनंदयात्री होणं कस शक्य होईल. शेवटी आनंद मानण्यावर आहे. किती साधन आली, किती सधनता आली म्हणजे माणूस सुखी होईल? हे ठरवणं अवघड आहे. म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधला पाहिजे तर कदाचित एखाद्या गोष्टीबद्दल अप्रूप नक्की वाटेल.





खरं तर हा लेख लिहायला घेण्यापुर्वी काही मिनिटे अगोदर मी मला कोणीतरी पाठवलेली व्हिडिओ क्लीप पाहिली आणि मी काही सेकंदात माझ्या बालपणात पोचलो ७० साली आमच्या घरी लाईट आली. गावात लाईट दोन वर्ष अगोदरच आली होती पण तेव्हा लाईट घेण्याइतके आम्ही सक्षम नव्हतो. १९७० च्या दशकात कोकणात ज्याच्या घरी लाईट असेल तो श्रीमंत गणला जात होता. त्याअर्थी आम्ही गरिब होतो. तेव्हा श्रीमंतीची व्याख्या थोडी निराळी होती. ज्याच्या घरी लाईट, ट्राझींस्टर म्हणजे रेडिओ आणि स्वयंपाक घरात स्टीलची भांडी असतील किंवा स्वतःची विहीर असेल तो श्रीमंत गणला जात होता. आता हे वाचतांना तुम्हाला हसू येत असेल किंवा किती हा विपर्यास असही वाटेल. मला आठवतय मी तिसरीत असतांना माझ्या मोठ्या भावाने चार स्टीलची ताट आणि दोन तांबे आणले तेव्हा आम्ही हरखून गेलो होतो. त्या स्टीलच्या नव्या ताटात स्वतःची छबी कशी दिसते ते कितीतरी वेळा पहात होतो. ती ताटं कोणी जेवायला घ्यायची यावरून आम्हा भावंडात वादही झाला. आईने मात्र ती भांडी पाहुणे आले तरच वापरायची सांगितले आणि आमचा पोपट झाला. तर ते दिवस तसेच होते घरात तांब्या पितळेची भांडी भरपूर होती पण स्टीलच अप्रूप होतं. तसच त्या नंतर लाईटच होतं.

लाईट घेतली तेव्हा पहिल्यांदा अडीच पॉईंटची फिटींग घरी केली होती. जगदीश भाते यांनी वायरिंग केल्याचं आजही आठवते. ते वायरिंग करत असतांना आम्ही कुतूहलाने त्यांच्या प्रतेक कृतीकडे पहात बसत असू. वायरिंग झाल्या दिवसापासून आम्ही रोज आईला विचारत असू की लाईट कधी येणार? एवढी उत्सुकता त्या वेळी होती. त्या नंतर महिन्या भराने लाईट आली. पहिला बल्ब घरात पेटला त्याचा जो काही आनंद झाला ते तेव्हा आणि आजही शब्दात सांगता यायचं नाही.

त्या पूर्वी आम्ही नरशुशेठ सामंत, अर्थात सामंत आजोबा यांच्या घरी जायचो. ते खूप श्रीमंत असल्याने त्यांच्याकडे आधीपासून लाईट होती. मी मुद्दाम लाईट कशी पेटते ते पाहण्यासाठी उशीराने त्यांच्याकडे गेलो होतो. संध्याकाळी काळोख झाला म्हणून आजींनी बटन दाबून बल्ब पेटवला आणि लख्ख प्रकाश पडला. त्या एवढ्याशा काचेच्या गोळ्यातून प्रकाश पसरला की प्रचंड आनंद व्हायचा.या विजेच्या प्रकाशाच आम्हाला अप्रूप वाटायचं. मी कधी तरी आईला विचारायचो, “आई लोकांकडे लाईट आली, आपल्याकडे कधी लाईट येणार?” आई समजूत घालायची, आपल्याकडे इतके पैसे नाहीत, पण लवकरच आपण लाईट घेऊ.” तेव्हा दिडशे-दोनशे रूपये लागत असावेत अस ऐकून होतो. जी गोष्ट सहज साध्य नसते तिचच तर अप्रूप असते. असंच अप्रूप सामंत आजोबांच्या रेडिओचं होत. त्यांच्याकडे असणाऱ्या रेडीओवर धावत्या घोड्याची छबी असल्याच आजही मला आठवते. लाईटच्या मानाने मर्फी कंपनीचा रेडिओ लवकर घरी आला. तेव्हा चार सेलवर रेडिओ चालायचा. माझी आई सकाळची भक्ती गिते आणि अकराची कामगारसभा न चुकता ऐकायची. लहानपणी अशा अनेक गोष्टींच अप्रूप होतं.

शोले पिक्चर रिलीज झाला आणि पाठोपाठ त्याची रेकॉर्ड निघाली. तेव्हा ती रेकॉर्डिंग स्पुलवर होती. त्यातील अमजद खानचा डायलॉग, “अरे हो सांभा, कितने आदमी थे?” किंवा हेमामालिनीचे डायलॉग मोठ्या आवाजात आम्ही ऐकत असू, हा रेकॉर्डर मोठ्या बंधूने मित्राकडून आणला होता. गावात तेव्हा तो कोणाकडे ही नव्हता. या रेकॉर्डरचही तेव्हा आम्हाला अप्रूप वाटल होतं. गावातील, पाड्यातील माझे मित्र शोलेचे डायलॉग ऐकायला तेव्हा यायचे. आपण अचानक श्रीमंत झालो आहोत असं तेव्हा वाटायचं.

७३-७४ ला गावात दोन-तीन घरी टीव्ही आले एक नाईक कुटुंबाकडे आणि दुसरा माधव पाटील यांच्याकडे. आमची आई खूप स्वाभिमानी होती, कोणाच्या मेहेरबानीवर काही मिळवायचं नाही याचं बाळकडू तिचच. तर त्या टीव्हीच आम्हाला कोण अप्रूप! पण आईने सक्त ताकीद दिल्यामुळे तिला चोरून कोणाकडे टीव्ही पहायला जायची हिम्मत नव्हती. अखेर एक दिवस नाईक कुटुंबाने मला टीव्ही पाहण्यासाठी बोलावल्याचा निरोप आईनेच आणला.मला प्रचंड आनंद झाला. संध्याकाळी साडेचारचा की पाचचा चित्रपट पाहण्यासाठी साडेतीन पासूनच तयार, इतका मी उतावीळ झालो होतो.





मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या घरच्या मालकीणबाई, माईंनी मला पाहून हाक मारली, “ये रे, येताना ते गेट बंद कर ही कार्टी घरात उच्छाद मांडतात.” तेव्हा टीव्ही पाहायला ते चार आणे घेत असत. मी माजघरात गेलो आणि एका भिंतीला चिकटून बसलो. समोर एका टेबलवर तो मोठा चौकोनी बॉक्स ठेवला होता. त्याची वायर प्लग मध्ये घातली होती. सव्वाचार वाजता त्यांच्या मुलाने टीव्ही सुरू केला आणि टीव्ही वर मुंग्या दिसू लागल्या, आता काय होणार ही उत्सुक्तता स्वस्थ बसू देई ना,हळू हळू ती म्युझिक सुरू झाली, टू नू टू नू नू, डयांक क चीक चीक, टू नू टू नू नू, मग ते टीव्हीवर तेव्हाच दुरदर्शनच चिन्ह फिरू लागलं. आणि अर्ध्या मिनिटांनी निवेदिका दिसू लागली. आहा हा हा! प्रत्यक्ष बोलणारी बाई त्या खोक्यात अवतिर्ण झाली. आणि त्या खोक्याचं अप्रूप वाटू लागलं. जराही न हलता तो अडीच तासाचा चित्रपट पाहिला. मध्यंतराला जाहिरात लागली होती की नाही काही आठवत नाही पण थिएटरमध्ये न जाता घरच्या घरी चित्रपट पाहता येतो याचा मला प्रचंड आनंद झाला.

नाईक कुटुंब तेव्हा कार्यक्रम पाहण्याचे चार आणे घेत ते मी पाहिले होते त्यामुळे पुन्हा पुन्हा फुकट त्यांच्याकडे जाणे योग्य नव्हते आणि चित्रपट किंवा काही कार्यक्रम पाहण्यासाठी चार आणे खर्च करावे हे आईच्या शिस्तीत बसणारे नव्हते. सत्तर साली लाईट आल्यानंतर बल्ब कसा पेटतो ती उत्सुकता लागली होती. पण टिव्हीचे मात्र अप्रूप होते कारण आमच्यासाठी ते Forbidden fruit होते. शाळेत दहावी पर्यंत सर्व मुले हाफ पॅन्ट घालत पण दहावीच्या परीक्षेला जातांना काही मित्रांनी फुल पॅन्ट घातली होती. त्या मुलांबद्दल असुया वाटली. दहावी इयत्ता पास झाल्या नंतर फुल पॅन्ट घालायला मिळणार याचेही आम्हाला अप्रूप होते.

तेव्हा अनेक घरातील आर्थिक परिस्थिती तोळामासाच असायची त्यामुळे कॅडबरी,वेफर हे शब्द आम्ही ऐकलेही नव्हते. आमची धाव गुळाची की साखरेची टॉफी, तिथपर्यंत असायची ती पाच की दहा पैशांची मिळे. आमचे वडील मासे आणत तेव्हा घरी येतांना स्टेशनवरून पाच पैशांचे चणे-शेंगदाणे आणायचे आणि रात्री माशांचे जेवण झाले की चणे शेंगदाणे आमच्या हातावर मुखशुध्दी म्हणून घालायचे, तेव्हा हातावर बडीशेप घातली जात नसे पण आम्ही त्यावरच खुश असायचो. शाळेत असतांना फारशी कुठे पिकनिक जात नसे फारच फार तर एडवण कोरा येथील शंकराचे मंदिर किंवा गेरूचा ओहोळ.

रेल्वे गाडीने वडिलांच्या सोबत तिसरीत असतांना प्रवास केला होता पण तेव्हा हाताच मनगट वडीलांच्या दणकट हातात आणि गाडी फलाटावर आली तस वडिलांनी डब्यात उचलून ठेवलं, स्वतः चढले. उतरताना तेच उचलून खाली फलाटावर सोडलं. त्यामुळे गाडीने स्वतः एकटं प्रवास करण्याचा योग आला नव्हता.

इयत्ता चौथीत असतांना पहिल्यांदाच रेल्वे गाडीने सफाळे ते पालघर असा पँसेंजर ने प्रवास केला, तेव्हा कोळशावर चालणारी इंजिन होते. दुरून ही गाडी दोनचार वेळा पाहिली होती पण हे वाफेवर चालणारे इंजिन धावते कसे ते पाहण्याची आणि या रेल्वेगाडीच्या प्रवासाचेही मला अप्रूप होते. हे ऐवढे मोठे धुड चालते कसे ही जिज्ञासा होतीच पण त्याच गाडीने आपण प्रवास करणार त्यामुळे मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. रेल्वेचा प्लॅटफॉर्म कमी उंचीचा असे आणि गाडीच्या दरवाज्याला पायऱ्या असत त्यावर चढून आत शिरावे लागे, सगळी कसरत. गाडी सुटतांना जोरदार कुकsss कुक कुकsss अशी साद घाली. प्रचंड वाफ आणि धूर हवेत फेकला जाई. त्या शिट्टीचा आवाज आसमंतात घुमत राही. आजही तो आवाज आणि ती बाहेर टाकत असलेला धूर मनात आहे. ती गाडी चालताना म्हणे, “कशा साठी पोटा साठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, झ्याक झुक,झ्याक झुक” असं म्हणत असते, असं मोठी माणसं सांगायची. काय गंमत होती, मोठी माणसं जी समजूत करून द्यायची आम्हाला मान्य असायचं, कधी उलट विचारलं नाही की त्यांच्यावर अविश्वास दाखवला नाही, हिच ती निरागसता, हवं तर अज्ञान म्हणा ,काही अडचण नाही, तर या अज्ञानात प्रचंड सुख होतं. आज तुमच्या नातवंडांना किंवा तुमची लहान मुलं असतील तर त्यांना हे कशासाठी पोटासाठी ऐकंवा, तुमचं ,म्हणजे तुमच्या बोलण्याच पोस्टमार्टम झालच म्हणून समजा. प्रत्येक गोष्टीकडे सशंयाने पाहिल्यावर सुख कुठून मिळणार?

ह्या कोळशाच्या इंजिन मधुन अतिशय बारीक कोळशाचे कण बाहेर पडत आणि चालत्या गाडीबाहेर पाहिल्यास डोळ्यात जातं. तर त्या पहिल्या प्रवासाचे मला अप्रूप वाटले होते. चौदा किलोमीटरचा प्रवास जेमतेम तास लागला असावा पण त्याची आठवण आज एकसष्ठ वयापर्यंत पुरली. मित्रांनो या आठवणींवर आपलं एकलेपण छान जात.
अशा आठवणींची शिदोरी असली की माणस तुम्ही म्हणता तशी व्हर्च्युअली भेटू लागतात. भुतकाळात शिरतानां तसा त्रासही होतो पण मौजही वाटते. तेव्हाच ते अप्रूप आजही स्मरणात आहे.

चवथीत असतानाच पहिली पिकनिक पालघर येथे नेली होती तेथे पाकिजा चित्रपट पाहिल्याच आठवत. पडद्यावर चित्रपट पाहणं हे अप्रूपच होतं. आजही त्या चित्रपटातील गाणी आठवतात.
“चलते चलते यु ही कोई मिलगया था, सरे राह चलते चलते”

या गाण्यातील ते उंची सेट मनाला भावले. पाकीजा चित्रपट पाहून आल्यानंतर कोणीतरी मिनाकुमारीच्या हाताला सहा बोटं आहेत तू पाहिली का? असं म्हणाल आणि अरे रे! आपण या मिनाकुमारीच्या हाताकडे पाहिलच नाही अशी सल मनाला लागली. त्यानंतर टीव्ही वरती जेव्हा जेव्हा पाकिजा चित्रपटातील मिनाकुमारीच गाणं पहायचा योग आला, गाणं पाहण्याएवजी मी ते सहाव बोट दिसत का हे पाहण्यातच वेळ घालवला पण ना ते सहाव बोट दिसल ना मिनाकुमारीच प्रेम कळलं. तेव्हा या नट्या कुठे आणि कशा रहात असाव्यात हे पहायला मिळावं तेव्हाच अप्रूप होतं.

आकाशातून पडणारा तारा पहायला मिळण किंवा समुद्रात राईड घेतांना तुमच्या बाजुने डॉल्फिन येऊन जाणं किंवा कुठेतरी ट्रेक ला गेले असता इंद्रधनुष्य पाहायला मिळणं किंवा एखाद्या ग्रहणाच्या दिवशी दिवसा उजेडी मिट्ट अंधार पडलेला पाहायला मिळण. नायगारा वॉटर फॉल मध्ये कोणीतरी उडी मारूनही सहीसलामत पुढे जिवंत जातांना दिसणं. अशा अनेक घटना घडतांना पाहणं फारच थोड्या लोकांच्या नशिबी असत. म्हणूनच यातील प्रत्येक घटनेचे अप्रूप असते.

लहानपणी कितीतरी गोष्टींच अप्रूप होतं जस आकाशात विमान दिसले की ते प्रत्यक्षात केवढे असावे ते मी वडिलांना विचारत असे पण वडिलांनी तरी प्रत्यक्ष विमान न पाहिल्याने ते तरी काय कपाळ सांगणार? तेव्हा ज्या गोष्टी कधी पहिल्या नव्हत्या त्या प्रत्येक गोष्टीचे आकर्षण होतेच आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात पहिल्या तेव्हा अप्रुपही वाटले.मी माझ्या मुलांना म्हणालो की माझ्या बालपणी तीन पैशांचे मुठभर खायचे चणे मिळायचे तर त्यांना अप्रूप वाटेल की नाही? किंवा माझ्याजवळ चांदीचे राणीछाप वीस रुपये दाखवले तर अप्रूप वाटेल की नाही? तुम्ही म्हणाल चांदीचे राणीछाप रूपये तुमच्याकडे होते? वाटलं की नाही अप्रूप? तर अगदी खरं, माझ्या आईकडे १९७० साला पर्यंत चांदीचे राणीछाप वीस, पंचवीस रूपये होते. ७२-७३ ला आर्थिक मंदी आणि दुष्काळ होता तेव्हा एक चांदीच्या रुपयाला २८ रूपये मिळतात म्हणून आईने गरजेला काही खर्च केले.

तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण ७२ किंवा ७३ ला वडिलांनी पहिल्यांदा फ्लॉवर आणला तेव्हाही आम्हाला त्याच अप्रूप वाटलं होत. भोपळी मिरची त्या नंतर किती वर्षांनी पाहिली ते नक्की आठवतही नाही. आजच्या तरूण पिढीला जाऊदेत अगदी तीन चार वर्षांच्या किंवा त्यापेक्षा लहान मुलांना कसलच अप्रूप वाटत नाही. याचं कारण आश्चर्य किंवा अप्रूप वाटावं असं काहीच शिल्लक नाही. त्यांच्या हाती असणाऱ्या मोबाईलवर सगळच तर दिसतय आणि थोडा हट्ट धरला की ती गोष्ट दोन दिवसात किंवा चक्क काही तासात त्यांच्या समोर हजर असते. झालाच तर वस्तू तातडीने मागवल्याबद्दल थोडा आनंद होईल पण अप्रूप वाटेलच याची काही खात्री नाही.



affiliate link

तोंडाने वाजवायचा बाजा,आज किती क्षुल्लक गोष्ट, पण तेव्हा कोणी दुसऱ्या मुलाने वाजवला की त्याच अप्रूप वाटायच, तो जर सुरात वाजवत असेल तर असुया वाटायची. वाटायचं असा बाजा आपल्याला मिळाला तर! कदाचित आपणही एखादे आवडीचे गाणे त्यावर वाजवू.

आता, “दुनिया मुठ्ठी मे, बोलो मेरे आका क्या हुक्म है।” असं म्हणायला आणि त्वरीत Flipkart, Amazon, Big Basket किंवा एखाद्या अन्य साईटवर ऑर्डर नोंदवायला पालक तयार असतात. पत्नीने किंवा मुलांनी एखादी गोष्ट मागण्याचा अवकाश. पुढील काही तासात किंवा दिवसात त्या वस्तू हजर असतात. कोणत्याही गोष्टी विषयी उत्सुकता किंवा अप्रूप नाहीच याचे कारण ती वस्तू कशी आहे ते तुम्ही साईटवर तात्काळ पाहू शकता. अगदी कपडे किंवा दागीने विकत घेतल्यानंतर ते घालून तुम्ही कसे दिसाल ते virtually पाहू शकाल.

खरं सांगायच तर आताच्या पिढीला कोणत्या गोष्टीचं अप्रूप असेल की नाही हेच सांगता येत नाही. ना ती वस्तू कुरीअरने येणार किंवा मिळणार याची उत्सुकता, ना त्याचे कौतुक. बहिणीने राखी पाठवण्यापूर्वी त्याची इमेज पाठवलेली असते. ती कशी आहे हे आधीच पाहिले तर उत्सुकता कशी असेल? अगदी बालपणीचा जीवश्च कंठश्च मित्र अचानक आज भेटला तर तुम्हाला नक्की अप्रूप वाटेल.पण आता जी मुलं पंधरा ते वीस वर्षांची आहेत त्यांना ना कशाच नाविन्य ना कोणत्याही गोष्टींच अप्रूप.

यापुढे अगदी स्वतःचे लग्न किंवा होणारे बाळ या विषयी तरी उत्सुकता किंवा आनंद असेल की नाही ते देव जाणे.जर लग्न होण्यापूर्वी त्याचा डेमो किंवा ट्रायल मँरेज करायचं ठरवलं तर लग्न समारंभाच अप्रूप काही असेल का?
तुम्हाला वाटेल हे जरा अतिच होतय पण श्रीमंत कुटुंबात एखादा सोहळा होण्यापूर्वी काही ठराविक कुटुंबिय त्याचा सराव करतात अस मी ऐकलं आणि पाहिलं आहे. प्रिवेडिंग फोटोसेशन केल जात आणि ते शूट लग्नात मोठ्या स्क्रीनवर दाखवल जात हे नक्की काय आहे?खरच या जाहीर प्रदर्शनाची गरज आहे का? पहिली भेट, त्यातील उत्सुकता आणि ती मिलनाची ती हळवी भावना जाहीर दाखवण गरजेच आहे का? ज्या गोष्टी फक्त दोघांच्याच आहेत त्या अशा पडद्यावर दाखवल्या तर त्यातील कुतूहल आणि हळव्या भावनांना काही अर्थ राहील का? सगळच अँडव्हान्स मध्ये उरकल्यावर कसली उत्सुकता आणि कसलं अप्रूप?

आता मुलं होईपर्यंत दोन चार वेळा सोनोग्राफी केली जाते. बाळ मुलगा आहे की मुलगी ही उत्सुकता तशीच ठेवायला काय हरकत? पण प्रगत तंत्रज्ञान असतांना का थांबा? आता सारे काही झटपट. आज,आत्ता, ताबडतोब हा नव्या युगाचा नारा. त्याचे धोके किंवा दुष्परिणाम तितकेच गंभीर आहेत.मुलांनी वस्तू मगितली आणि पालकांनी दिली नाही की लगेच आत्महत्या किंवा धुसफूस. आठवड्या पूर्वी एक व्हिडिओ युट्यूब वर व्हायरल झाला होता एक गुजराती कुटुंबातील मुलीने तिला मोबाईल वापरू दिला नाही म्हणून पूर्ण घर उध्वस्त करून टाकलं होतं. काही म्हणून शिल्लक ठेवलं नव्हतं. ही आक्रमकता आली कुठून? कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहण्याची सवय नसेल तर ती गोष्ट मिळाल्यावर अप्रूप वाटेलच याची काय खात्री?

आम्हाला गणपतीचा पाट गणेश शाळेत दिला की ती मूर्ती कशी दिसेल? याची उत्सुकता असायची आणि त्या मुर्तीकाराने काही वेगळं केलं तर त्याच अप्रूप वाटायचं. आज पैसा फेको तमाशा देखो असं प्रत्येकाला वाटतं. “अरे वा! फारच छान दिसतंय, इतकं सुंदर दिसेल याची कल्पना नव्हती.” हे झालं अप्रूप. तेव्हा रंगकाम करणारा पेंटर घराचा ताबा घ्यायचा आणि आठ दहा दिवसांनी मालकाला घराचा रंग पहायला बोलवायचा, त्याने ज्या नजाकतीने हॉलसाठी पीओपी काम केलेले असेल किंवा रंगछटा वापरल्या असतील त्या पाहिल्यावर तोंड उघड राहायचं, मग शब्द फुटायचे, “सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम, ला जबाब “
हे व्यक्त होण म्हणजे अप्रतीमतेची पोचपावती. रंग देणारा भरून पावायचा. त्याला आत्मिक समाधान लाभायचे. कर्तव्याचे आणि निष्ठेचे.



affiliate link

मित्रांनो अगदी खर खर सांगा, उंचावरून विविध आकार घेत खाली कोसळणारा धबधबा, प्रपात पाहिल्यावर तोंड उघड रहात की नाही? त्या निसर्गाच्या अप्रतिम अदाकारीने डोळे दिपून जातात की नाही? मग महाबळेश्वर येथील दरीतून वर येणारा उलटा प्रवाह प्रवाह असो किंवा अन्य काही तर निसर्गाच दर्शन स्वतः पाहण्यात जो थरार आहे जी मजा आहे ती मजा इंटरनेटवर पाहण्यात आहे का?

एखाद्या गोष्टी मागचं तत्व, तंत्र किंवा विज्ञान कळालं की उत्सुकता संपते अन अप्रूपही संपते.कदाचित आताच्या पिढीसाठी अप्रूप वाटाव अशा अन्य गोष्टी असतीलही पण इंटरनेट नावाच्या जादूगाराने थरार आणि अप्रूपता संपवून टाकली आहे. पूर्वी प्रत्येक लहान मुलाला आपले वडील किंवा डॅड ग्रेट वाटायचे आणि आजी,आजोबांच्या पोतडीत इतक्या गोष्टी असत की त्याच, प्रत्येक लहान मुलाला कौतुक असायचं. ते त्याच्या शब्दातून व्यक्त व्हायचं, “आमचे डॅड एकदम ग्रेट आहेत,काही करू शकतात.”
आता कोणी लहान मुलं अस बोलताना तुम्ही ऐकलं आहे का? ही मुलं माहिती जालाच्या इतकी समीप, इतकी जवळ गेली आहेत की मनाला पडलेला प्रश्न ,मनाला पडलेलं कोड मनात न ठेवता त्याचा त्वरित शोध घेऊन टाकतात. म्हटलं तर कौतुकास्पद आणि म्हटलं तर आव्हानात्मक. ज्या गोष्टी जेव्हा माहिती व्हायला हव्या त्या वेळे अगोदरच कळल्या तर! प्रश्न नाही का उदभवणार?

आता मुलांना स्वतः यंत्र मानव तयार करता येतो. मग तो प्रोटो का होईनायान, स्पेस शटल हे शब्द त्यांचा परिचयाचे आहेत. आभासी जग म्हणजे काय ते त्यांना कळू लागले आहे. ही मुलं बागुलबुवाला भित नाहीत. यांना भूत शब्दाची भीती वाटत नाही. म्हटलं तर ते चांगलं आहेच पण जेव्हा टेस्ट ट्यूब बेबी किंवा सारोगसी किंवा अन्य गोष्टी त्यांच्या बोलण्यात येतात तेव्हा आश्चर्य वाटत. त्यांच्यासाठी अप्रूप काही असेल की नाही? हा प्रश्न आहे? चावी देऊन हलणारी बाहुली किंवा पळणारी गाडी त्यांच्या हाती दिली तर त्याची स्प्रिंग काढून तुम्हालाच धक्का देतील इतक झटपट ते शिकत आहेत.

आकाशातील इंद्रधनुष्य पाहून यांना अप्रूप वाटणार नाही. किंवा संध्याकाळी पश्चिमेला आकाशात निर्माण होणाऱ्या गुलाबी छटा आणि हळूहळू समुद्रात उतरणारा सुर्य पाहूनही अप्रूप वाटणार नाही.मित्रांनो टिकेसाठी टीका किंवा उगाच काही लिहावं म्हणून लिहिलेलं नाही. कोणत्याही गोष्टी योग्य वेळेवर घडल्या तर बरं असते, आता तर काय म्हणे गळफास घेतल्यावर जीव कसा जातो हे ही मुलांना पहावस वाटतं, काय म्हणाल या जिज्ञासेला? तेव्हा मुलांना लवकर कळतय म्हणून सारच उघडं करण्याची गरज नाही. कळू द्या की सावकाश, त्यातली गंमत, त्यातला थरार अन आंतरिक ओढ अन अनामिक भिती सगळ काही हळूहळू कळूद्या सगळच अगोदर जगून घेतल तर नंतरला काही शिल्लक राहणारच नाही.

कोविड काळात लहान मुलांच शिक्षण ऑन लाईन झालं होतं. मुलांच्या हाती आपसूक मोबाईल आला.चार ते पाच वर्षे वयाच्या मुलांना मोबाईलवर गेम डाउनलोड करता येऊ लागला.अन बरेच प्रश्न निर्माण झाले. आई, बाबा मोबाईलवर काम करतात की मोबाईलवर पाहतात याच्याशी या मुलांना काही देणं घेणं नाही. जर तो आईबाबा वापरतात म्हणजे नक्की वाईट नाही, मग आम्ही थोडा वेळ वापरला तर त्यात काय बिघडलं? मग कुतूहल म्हणून एक एक स्टेप सरकत मुलांनी यू ट्यूब वरील गोष्ट पाहिली तर पालकांना संकोच वाटून चालणार नाही. गंमत म्हणजे घरातील आजीआजोबांना नातू सफाईदारपणे मोबाईल वापरतो याचही अप्रूप वाटतच ना? नव्हे माझा नातु किती सहजपणे मोबाईल वापरतो हे कौतुक ते आपल्या मित्रांना सांगतांना मी पाहिलं आणि ऐकलं सुध्दा.

आपल्याला कशा कशाने आनंद होतो?कोणता आनंद चिरकाल टिकतो? याचा थोडा विचार करुन पहा.कोणाला कोणत्या गोष्टीत आनंद होईल ते सांगता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा आनंद उपभोग हा वेगळा असेल. गरीबाला परिस्थिती सुधारल्यामुळे स्वतःच्या पक्क्या घरात रहायला मिळालं तर आनंच होईल, पण समजा त्याच गरीबाच मुल उच्च पातळीवर चमकलं आणि त्याला शहरात सरकारी नोकरी लागली ,रहायला बंगला,फिरायला गाडी मिळाली तर त्याच्या बा ला चकचकीत बंगल्याच आणि स्वच्छ ,सुंदर गाडीच अप्रूप वाटेल की नाही? तुम्ही ज्यांना आदर्श मानता अशा व्यक्तीला भेटायला मिळाल तर अप्रुप वाटेलच ना? कोणत्या तरी दुरच्या नातलगांनी अचानक विमान प्रवास घडवला किंवा परदेश वारी घडवली तर त्याच अप्रूप वाटेलच ना! गावात भरलेल्या गाण्याच्या मैफलीत आपल आवडत दुर्मिळ गाण ऐकायला मिळण, एखाद्या महान व्यक्तीची सहजच भेट होण अशा अनेक छोट्या गोष्टी असतील ज्यामुळे तुम्ही आयुष्य जगल्याच समाधान तुम्हाला मिळत असेल तर तो आनंद अवर्णनीय असाच असेल.

भविष्यात तुमच्या बरोबर इतरांना सहभागी करा,त्यांना आनंद मिळेल यासाठी वेगळ काही करा जेणे करून त्यांना तुमच्या बद्दल अभिमान वाटेल. आपल्या ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा संयुक्त कार्यक्रम आखा आणि त्यांना अशा स्थळांची भेट घडवून आणा मग ते ऐतिहासिक वारसा स्थळ असेल किंवा धार्मिक स्थळ असेल. एखादा सैनिकी तळ असेल किंवा संशोधन प्रकल्प असेल.माझ्या मित्राच्या मदतीने आम्ही कोयना धरण प्रकल्प अगदी त्याच्या पायथ्याशी पाण्याच्या आत जाऊन पाहिला तेव्हाची आमची प्रतिक्रिया ही बोलकी होती.एखादी लँड स्लाईड, भूकंप, तारका उत्पात, त्सुनामी सारखे चक्रीवादळ, शार्क माशाचे अचानक घडलेले दर्शन या गोष्टी आपल्यासाठी अप्रूप आहेत कारण सामान्यतः या गोष्टी आपण पाहू शकत नाही.

उत्सुकतेपोटी ज्या गोष्टी ज्या वयात करायच्या नाही त्या केल्या की क्षणिक आनंद मिळेलही, ज्या गोष्टी करताच आल्या नव्हत्या त्या अचानक करायला मिळाल्या तर अप्रूपही वाटेल. मित्रांनो कोणत्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायचा आणि कोणत्या गोष्टींचे अप्रूप मनात बाळगायचे यात सिमारेषा असेल तरच पुढील पिढीला आनंदी जीवन जगता येईल,त्यातील लज्जत चाखता येईल. सर्व गोष्टी जाहीरपणे समोर आल्या किंवा वेळेपूर्वी उघड झाल्या तर त्यातील चार्म निघून जाईल. निर्णय तुमचा आहे, कळीचे हळूहळू फुल झालेले पहायचे की तिला अकाली फुलण्यास भाग पाडायचे हे तर तुमच्या हाती.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar