आपलं सरकार

आपलं सरकार

तुम्ही निवडून आणलं बहूमतानं तुमच्या विचारांचं सरकार
निष्पक्ष राहून तपासून पहा त्याची ध्येय, धोरणे आणि आचार

सरकार नावाची गाडी बेकार, तिच्या इंजिनाची फार तक्रार
आघाडी, युपीए, युती, दळभद्री निती, सत्तेसाठी सगळे लाचार

कोणी विकतो स्वस्तात स्पेक्ट्रम, कोणी देत दारु करात सुट
कोणी बिल्डरनां मुक्त अंगण, कोणी नवरत्न कंपनीचा बुट

किती घ्यावी लाच? याचे आकडे एसीबी सहजा नाही मांडत
त्यांचा बॉस यांचा गुलाम म्हणून शासकीय गुपिते नाही सांगत

कोणता पक्ष स्वच्छ? कोणी? कोणाला? त्याचा द्यावा दाखला
सगळेच गाळात रुतलेले, कोणता नेता सज्जन, स्वच्छ, चांगला?

ना चिंता राज्याची, ना देशाची हे करती शत्रूशी मुक्त व्यापार
झटपट श्रीमंती, त्यासाठी वाट्टेल ते, स्वहिताचा मनी फक्त विचार

एकदाचे मंत्रीपद मिळो, मिळो फायद्याचे यांना केंद्रात खातं
व्यापार, संरक्षण, अवजड उद्योग, वाणिज्य, सोन्याचंच अंड देतं

यांना मुक्त द्वार, हे मंत्री झाले की कंत्राटे स्वतः चमच्यांना देतात
पाच वर्षात लुटून घ्यावं, म्हणून मेहुण्यांनाही आपल्या सोबत नेतात

यांचे पुत्र, भाचे, पीए, सर्वांचा मंत्रालयात मुक्त, स्वैर कुठेही संचार
खात्याचे सचिव यांचे गुलाम, बदलीचा धाक ते बिचारे बहीरे ठार

सरकार बदलल तरी निर्लज्ज यंत्रणा, म्हणून गोष्टी तशाच घडतात
सामान्यांना सगळं कळतं तो असाह्य, याच्या वेदना मनाला छळतात

बिहारमध्ये कैक कोटी खर्च होऊनही उभारलेला पुल कोसळतो
चुक कोणाची कळत नाही ठेकेदार नैसर्गिक आपत्तीच दळण दळतो

मालकाची कंपनी काळ्या यादीत तरीही तोच राज्यात बीड जिंकतो
पुन्हा एकदा माणसे मारायचा मुक्त परवाना खुलेआम त्यालाच मिळतो

रस्त्यावर घातलेल्या डांबराची नाजूक चादर पावसात होते चोरी
अंगणवाडी बांधकाम सुरू होताच पोचतो हप्ता, बोकाळली गुन्हेगारी

सरकारी इमारत, धरण वा असो पुल, अर्धे सिमेंट होते राजरोस गुल
स्ट्रक्चरल इंजिनिअरला दिली जाते व्हिटॅमिन एम ची नकळत भुल

दिमाखात उद्घाटन झालेल्या विरासत सात मूर्ती वर्षातच भंगतात
करांच्या कोट्यवधी रुपयांची लूट, पण पीएम, सीएम जीभ टांगतात

अपघात रेल्वेवर किंवा रस्त्यावर शासन चुकीने सामान्यच मरतो
अधीकारी, मंत्री अपघातात किती गेले पहायला नंतर मागून धावतो

फौजफाटा हलू लागतो, ढीगातुन बाहेर पडतात कित्येक मुडदे
खरं तर किती वाईट! दुःखी प्रसंग! पण जाहीर होतात खोटे आकडे

जे अपघातात दुर्दैवाने वाचतात त्यांच्या यातनांना नसतो अंत
त्यांच्या अंगावरील जखमा, तुटलेले हात, पाय पाहून सुटतो कंप

जनतेचा पैसा, त्याचा हिशेब, कोण? कधी? कोणाकडे मागणार?
काही इमानी कार्यकर्ते, वर्षात काय दिवे लावले बोबंलत फिरणार

पाच वर्षे संपण्यापूर्वी हे निर्लज्ज, पक्ष चिन्हाची आठवण पुन्हा देणार
आम्ही त्यांचे पाप विसरून, लाचार होत पक्षाचा ध्वज खांद्यावर घेणार

कसल स्वातंत्र्य? कसला प्रजासत्ताक? का आम्ही करावं साजर?
ना नितिमत्ता, ना माणूसकी, सगळाच उन्माद, आयुष्यच बोचर

काय करावे? आता कोणत्याही पक्षाची देता येत नाही ठामपणे खात्री
ज्याचा पक्ष सत्तेत तिथे सगळेच पळती कोणी मंत्री कोणी वाजंत्री

प्रत्येक पक्षातच स्वार्थी लोकांचा जमाव, बुरसटल्या विचारांची दलदल
उजवा डाव करून उपयोग काय? मानसिकताच आमची इथे विकल

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *