ऐसे बोलावे बोल

ऐसे बोलावे बोल

माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन! अशी आमची मराठी भाषा.
आमची भाषा मोठी विनोदी. वळवावी तशी वळते, वकुबानुसार कळते. बोलतांना तोल सांभाळून बोललं नाही आणि समोरच्या व्यक्तीचा गैरसमज झाला तर क्षणात वातावरण पेटते म्हणूनच तिचा वापर जपून करावा. जिभेला रसना म्हणतात खरे पण ही जीभ किंवा जिव्हा केव्हा घात करेल ते सांगणे तसे अवघडच म्हणूनच कधी कुठे किती बोलावं? याचं तारतम्य बाळगता आलं नाही तर मोठी फजिती होते. काही जणांनी शालेय जीवनात किंवा तद्नंतर स्पर्धा परीक्षेत फक्त पर्यायी उत्तर असणारे प्रश्नच सोडवले असावेत एवढं ते त्रोटक बोलतात. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच बोलणं किंवा उत्तर हो, नाही, बरं,
मग, असं, ठिक इतकेच असते. तर काही मात्र दिर्घोतरी उत्तरे लिहून पास झाल्याप्रमाणे बोलतात किंवा बोलघेवडे म्हणजे शब्दांचा पाऊस पाडणारे असतात.

काही व्यक्तींचं बोलणं मोजून मापून असतं. सहजा बोलताना आपण चूक करणार नाही याची ते दक्षता घेतात. बोलतांना कोणाचा उपमर्द होऊ नये याची ते काळजी घेतात तर काही साळढाळ बोलतात, त्यांच बोलण अघळपघळ असतं. ते काय सांगत होते आणि कुठे जाऊन पोचले? याची जाणीव त्यांना नसते. त्यांना समोरची व्यक्ती अग किंवा अरे तू ते हे सांगत होतीस किंवा होतास ही जाणीव करून द्यावी लागते. तेव्हा ते मुद्द्यावर येतात. काहींची भाषा ही अतिशय मृदु असते तर काही बोलताना त्यांच्या वाक्याचा समारोप एखादे सुभाषित किंवा प्रचलित म्हण वापरून करतात.

तेव्हा बोलणं, सांगण किंवा आपली भुमिका मांडणं ही एक कला आहे. खूप काही बोलून गैरसमज होण्या ऐवजी मोजक पण परिणामकारक बोलल तर लवकर परिणाम साधला जातो. दुसऱ्या व्यक्तीला वाईट वाटेल, त्याच्या भावना दुखावतील किंवा चार चौघात त्याचा अपमान होईल अस बोलू नये. बोलण्यापूर्वी मनाशी योग्य त्या शब्दांची जुळणी करून आणि त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवून बोलावे म्हणजे नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.

‘नेमकेच बोलावे’, असं वचन आहे पण बऱ्याच जणांना ओळखीचं कोणी भेटलं किंवा दिसलं की काय बोलू आणि किती बोलू असे होते. लोकल डब्यात, दोन दाक्षिणात्य, गुजराती मित्रमैत्रिणी किंवा सिंधी मित्र भेटले की याची प्रचिती येईल. त्यांच्या संभाषणात स्वल्पविराम किंवा पूर्ण विराम असतो की नाही ते कळू नये इतक सलग ते बोलतात. अर्थात फक्त सिंधी किंवा मद्रासी नव्हे तर बंगाली मोशायही बरेच जण अस बोलतात. “पण आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा कार्टा अस करता येत नाही. तोल मोल के बोल असं त्यांना म्हटलं तर ते आपल्याला बदडून काढतील. “शब्दांच्या तलवारीची धार करी मृदुल मना बेजार.” अस आपण वाचलं असावं. तेव्हा समोरच्या व्यक्तीचे वय, समाजातील स्थान, त्याचे शिक्षण, त्याची मानसिकता या सर्व गोष्टींचा विचार करूनच बोलावे, म्हणजे बोलल्याबद्दल पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही.

काही माणसं खूप संवेदनशील असतात त्यांची भाषाही कोमल असते. ते कोणाही व्यक्तीशी आदरार्थी भाषेत बोलतात, रांगड्या स्वभावाच्या माणसाला या भाषेचं अपचन होत. सौजन्य किती असावं, आपण प्लिज सरकाल का? साहेब मला हा पत्ता माहिती नाही, आपण मार्गदर्शन कराल का? आपणास थोडे कष्ट देतो,पण आपण माझी सोबत कराल का? काही व्यक्तींना तालात किंवा लयबद्ध बोलायची सवय असते. असं वाटत,संगीत ऐकता ऐकता यांचा जन्म झाला असावा. तेव्हा अति कोमल भाषाही मनाला बोचते, आपण फार सज्जन नाही याची जाणीव होते.दुसऱ्या व्यक्तीच्या संभाषणात उगाचच भाग घेऊ नये म्हणजे लक्ष देऊ नये हे ही खर असलं तरी तरूण युगुल हळूहळू बोलत असलं की बरेच जण कान देतात. त्यातही जर ती किंवा तो हसत असेल तर interesting story चल रही है, इथपर्यंत आपली मजल जाते.





काही व्यक्ती बोलायला लागल्या की ऐकतच रहाव अस वाटत. त्यांचा आवाज तर कर्णमधुर असतोच पण बोलण्याला संगीताची लय असते. शब्दातील आरोह, अवरोह, ठहराव अगदी स्पष्ट असतो. ते बोलतात तेव्हाच त्यांच्या बोलण्याचा कार्यकारण भाव व्यक्त होतो. किर्तनकारांने निरूपण करावं इतक सगळ स्पष्ट असत. स्वरांचा चढ उतार योग्य असतो. ते एखादी कथा तर वाचून दाखवत नाहीत ना, अस नकळत वाटाव इतंक त्यांच्या बोलण्यात आपण गुंग होतो. सातारकर महाराज असो, मंगलाताई गोडबले असो की उपाद्ये, ही कला त्यांनी साध्य केली आहे. अच्युतराव गोडबोले यांच व्याख्यान ऐकल्यावर तोच भास होतो. आपली मती गुंग व्हावी, आपण स्वतःच अस्तित्व विसरून जावं अस काहीतरी विलक्षण पण सुंदर त्यांच्यापाशी आहे. एखादा कालखंड आणि ती व्यक्ती आपल्या समोर उभी असून आपल्याशी संवाद साधते आहे अस वाटाव इतक समरसून ते बोलतात. अमिताभ बच्चनजी, आवाज जाडा असला तरी त्यांनी शब्दांची उंची पारखून बोलण्याची किमया साधली असल्याने ‘कौन बनेगा करोडपती’ यशस्वी ठरला. त्यांची विनयशीलता त्यांच्या बोलण्याला वेगळी उंची प्राप्त करून देते. त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण अमितजी तर अमितजीच आहेत.

अनेक जण अनेक वेळा अगदी जाहीरपणे असंदब्ध बोलल्याचे आपण ऐकले असेल, चार आठ दिवसांपूर्वी पत्रकार आणि पक्षांचे कार्यकर्ते यांनी अजित पवार यांना ते भाजपच्या वाटेने जाणार का? शरद पवार साहेबांनी पक्षाध्यक्ष पद सोडायच ठरवलं आहे याबाबत तुमच मत काय? अस विचारून भंडावून सोडले तेव्हा,जरा थांबरे बाबानो, सारख दादा दादा काय करतोस? “दादा पादा”, अस सुप्रिया सुळे शेजारीच उभ्या असतांना बोलले. संजय राऊत, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे ह्या व्यक्ती जाहीरपणे काय बोलतील ते सांगण अवघड आहे. आता तर ठाकरेसुद्धा बेताल बोलण्यात आघाडीवर असतात. नाहीतरी मवीआ आघाडीच नेतृत्व त्यांच्याकडे आहेच. बोलण्यावर लगाम नसला तर नंतर मला असं म्हणायच होत, पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला अशी कोलांटी उडी घेतली तरी, “बुंद से गई हौदोसे नही आती हेच खंर.”

खरं तर, कधीकधी जाहिरपणे आपण काय बोलतो ते लक्षात येत नाही म्हणजे अस की बोलतांना स्थळ, काळ आणि वेळ याच भान नसेल तर तुम्ही केलेली स्तुती सुध्दा समोरच्या व्यक्तीच चारित्र्य हनन करणारी ठरते. एकदा मी गावातच माझ्या मित्राकडे गेलो होतो, त्याची पत्नी ही त्याच गावातील आणि परिचयाची होती. तिचे वडील गावचे सरपंच होते. आम्हा मुलांना शाळेच्या फी सवलत अर्जावर त्यांची सही घ्यावी लागे.बरेचदा हे सरपंच ‘घेऊनच’ असत. मी एकदा फी सवलत अर्जावर सही घेण्यासाठी गेलो तेव्हा ते त्याच गिअरमध्ये होते. मी त्यांच्या घरी जाऊन, अर्ज त्यांच्या पत्नीच्या हाती दिला. त्यांनी तो अर्ज घेतला आणि म्हणाल्या, “पोरा, बाबू काका आता निजेल हाय, उठलं, का मी सही घेऊन ठेवतय” मी अनावधानाने तो किस्सा त्याच्या पत्नीसमोर त्याला ऐकवला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. पण माझी जीभ घसरली आणि त्याच्या सासऱ्यांबद्दल माझे उद्गार ऐकून माझ्या मित्राचा चेहरा पडला. तो म्हणाला,”पन्नास वर्षे अगोदर गावातील वातावरण तस होत हे खरं पण आज गावात कोणीही जाहीर नशापाणी करत नाही.” माझ्या जीभेवर लगाम नसल्याने मी मित्रासमोर चुकीची गोष्ट सांगून मोकळा झालो. जीभ ही संगीनी आहे ती क्षणात समोरच्याची वाट लावू शकते. नेहमीच एक घाव आणि दोन तुकडे धोरण बरोबर नाही.

बोलतांना स्पष्ट उच्चार होईल असे आणि ऐकू जाईल इतक्याच मोठ्या आवाजात बोलावे म्हणजे समोरची व्यक्ती त्यातून चुकीचा अर्थ काढणार नाही. एखाद्या मित्रासोबत बोलताना तिसरा मित्र जवळ असेल तर त्याला ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात बोलू नये, किंवा दूर जाऊन बोलू नये. अस केल्यास तिसऱ्या व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण होऊन वाईटपण येते.

बऱ्याच जणांना मोठेपणा म्हणून किंवा काही अन्य कारणामुळे इंग्रजी मधून किंवा हिंदी मधून बोलण्याची हुक्की येते. दिखाव्यासाठी उगाचच इंग्रजी किंवा अन्य भाषेचा वापर करू नये. शेवटी आपल्या आपल्या भाषेचा तोल आपल्याला माहिती असतो. कोकणातील दोन व्यक्ती मुंबईत जरी भेटल्या तरी एकमेकांच स्वागत करतांना म्हणतील “मायझया हल्ली असतस खंय?” किंवा औरंगाबाद येथील दोन मित्र म्हणतील, “भौ भेटस नाय तो” तेव्हा दोन मित्र कुठल्याही भागातील असो , भेटतांना ते आपल्या मातृभाषेतूनच साद घालतील. हीच आहे भाषेची गोडवी.

मराठी भाषेचा लेहजा दर बारा कोसांवर बदलतो, खानदेशी अहिराणी, विदर्भात वऱ्हाडी,कोकणात मालवणी किंवा कोकणी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरी किंवा घाटी, पुणेरी, ठाणे पालघर, रायगड येथील आगरी, वारली, सातारा, सोलापूर येथील माणदेशी अशा अनेक भाषा आहेत. त्या त्या भाषेतील संभाषण अनेकदा कानावर पडले तर त्यातील गोडवा कळतो.तिची लिपी देवनागरी हिच आहे. लक्ष्मण देशपांडे यांच ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ ,तर मश्चिंद्र कांबळी यांच, ‘वस्त्रहरण’ खरचं परदेशवारी करून पावलं.

संस्कृत भाषा ही अभिजनांची किंवा काही मुठभर लोकांची होती त्यामुळे चार वेद,सहा शास्त्रे, अठरा पुराणे यात असणारे ज्ञान हे मुठभर लोंकाना अवगत होते. सामान्य त्यापासून वंचित होते म्हणूनच समाजात दूरी आणि दरी निर्माण झाली होती. ज्ञानाची मक्तेदारी ही फक्त मुठभर लोंकाकडे होती. हे ज्ञानाचे भांडार मुक्त व्हावे म्हणून संतांनी प्रयत्न केले.

संतजन माऊली म्हणून ज्यांचा उल्लेख करतात त्या संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या चवदाव्या वर्षी आपल्या अमृतमय रसाळ वाणीत विविध दाखले देत अतिशय योग्य शब्दात ज्ञानेश्वरी मधून गीता समजून सांगितली आणि तिचाच आधार घेत, संत नामदेव, संत तुकाराम आणि अन्य संतांनी त्यांच्या अनुभवाचे बोल आपल्या बोली भाषेत समाजापर्यंत पोचवले. आजही केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याची सूचना आणि नियोजन सरकार करत आहे. अभिव्यक्ती ही मायबोलीतून जशी जमेल तशी विदेशी किंवा अन्य भाषेतून जमणार नाही.

उच्च जातीत जन्म घेतल्याने ज्ञान मिळत नाही तर ज्ञान मिळण्यासाठी उघडे डोळे आणि चिंतन करण्याची सवय लागते. संत गोरा कुंभार, सावता माळी,नरहरी सोनार, बोल्होबा, संत जना, मिराबाई यापैकी कोणीही उच्च कुळात जन्म घेतला नव्हता किंवा कोणत्याही प्रचलीत शाळेत गेले नाहीत तर त्यांची आध्यात्मिक बैठक योग्य असल्यानी आणि योग्य वेळी गुरु केल्यामुळे त्यांना चिंतन आणि मनन यातून आणि अनुभवातून जे ज्ञान मिळाले ते त्यांनी समाजापुढे मांडले. भाषेचे अवडंबर न करता आणि जडत्व न येता देवाची भक्ती करता येते हे तुकोबांनी दाखवून दिले. तुकडोजी महाराज यांनी तर सामाजिक कार्य करत लोकांना एकतेची शिकवण दिली.ग्रामस्वच्छताझ रस्ते बांधणे यासारखी कामे त्यांनी समाजाच्या मदतीने केली.
“मनी नाही भाव अन देवा म्हणे पाव
देव अशान पावायचा नाही रे
देव बाजारातला भाजीपाला नाही रे “

अशा प्रकारची छंदबध्द ३००० पेक्षा जास्त भजने लिहिली. ‘देह शुद्ध करुनी भजनी भजावे’ ,’हाथी नाही येणे, हाथी नाही जाणे’ ,या भजनातील गोडवा असा की ती भजने पुन्हा पुन्हा ऐकवी आणि गुण गुणावी असे वाटते. ग्रामीण भाषेतील गोडवा त्यांनी लोकांच्या मनात पोचवला. त्यांनी ग्रामगीता लिहिली.या संतांनी आपल्या बोलीभाषेत जनजागृती केली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवला.

वेगवेगळ्या संतांनी सांगितलेला जीवनाचा अर्थ त्यासाठी योजलेली उदाहरणे आणि दाखले ज्या पद्धतीने गुंफली आहेत ते पाहता भाषेचे नवल वाटते. संस्कृत ही भाषेची जननी आणि तिला जवळची भाषा मराठी, अस आम्ही म्हणावं तर तमीळ त्यापेक्षा वयाने मोठी आणि संस्कृत भाषेला जवळची अस तामिळनाडू मधील जनता म्हणेल. मग कन्नड तरी मागे कसे राहील? ती सुद्धा मीच संस्कृतभाषेची जवळची मैत्रीण म्हणून दावा सांगेल. मराठीत असे शेकडोनी शब्द असतील की एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असेही असंख्य शब्द असतील की शब्दामागचा काना काढला की किंवा वेलांटी रस्व्ह की दिर्घ यावरून त्याचा अर्थ भिन्न होतो आणि शब्दात कोणत्या अक्षरावर अनुस्वार आहे यावरूनही त्याचा अर्थ बदलतो किंवा ते शब्द परस्पर टोकाचे किंवा विरोधी अर्थ ध्वनित करणारे ठरतात. म्हणून कथानक सांगणारे किंवा निरूपणकार एकच ओवी घेऊन ती वेगवेगळ्या अर्थाने आणि रंगाने सादर करतात. एकच अभंग आपण जितक्या वेळा वाचू आणि ज्या भावनेने वाचू वेगळाच भासतो. “रोज एक तरी ओवी अनुभवावी.” अस जेव्हा संत म्हणतात कारण तो अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. ज्ञानेश्वरी असो, हरिविजय, भक्ती कथासार, एकनाथ कथासार असो की अन्य ग्रंथ, त्याचे निरूपण कोण करतो? कोणत्या भावनेने करतो? यावर त्याचा रसस्वाद अनुभवाला येतो. अवघी एक ओवी घेऊन ती भक्तीमार्गाच्या अंगाने किंवा आताच्या निवृत्ती महाराज यांच्या भाषेत, व्यवहारीक अंगाने फुलवली तर निरूपणकार दोन तीन तास त्यावर सहज भाष्य करतो इतकी प्रचंड ताकद त्या पदात किंवा ओवीत असते.





भाषा कोणतीही असो तिच्यातील गोडवा जपण ही काही केवळ शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कलाकारांची जबाबदारी नाही. कोणतही प्रचलीत शिक्षण नसतांना बहिणा जीवनाच खूप मोठं तत्व सांगून जाते. मिरा त्या सावळ्याच्या प्रेमात पडली तरी भजनातून सत्य तेच सांगते.बिस्मिल्ला खा यांची शेहनाई,झाकीर हुसेन यांचा तबला,अमजद अली यांच सरोद,पंडित रवी शंकर यांची सतार ही वाद्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याशी बोलतात तेव्हा काळीज आनंदात न्हाऊन जाते.तन्मयतेने आणि तद्रूप होऊन जेव्हा हृदयाच्या आतून स्वर निघतात तेव्हा भाषा कोणतीही असली तरी ती मनाला आनंद देते. भाषा स्वरांची असो की सुरांची मनाला आनंदच देते.

शब्दांची भाषा असते तशी स्वरांचीही भाषा असते, कर्नाटक संगीत पुढे नेणाऱ्या शोभा गुर्टू असो की हिराबाई बडोदेकर, जोस्ना भोळे,गंगुबाई हनगल, भास्करबुवा बखले,छोटा गंधर्व, सवाई गंधर्व, मोठा गंधर्व, जितेंद्र अभिषेकी भिमसेन जोशी, वसंत देशपांडे अशा उत्तोमोत्तम शास्त्रीय संगीत कलाकारांनी मराठी माणसांना संगीतात न्हाऊन काढलं. या प्रत्येक दिग्गजांनी सुरांच्या मैफलीत झुल्यावर बसवून झुलवल. प्रत्येक कलाकाराच्या शास्त्रीय संगीताचा पोत वेगळा असला तरी त्या सुरावटीचा परिणाम तोच.ईश्वराच्या जवळ नेणार, ईश्वराशी तादात्म्य पावणारं. आत्म्याचा हुंकार ऐकायला लावणार संगीत म्हणजे ईश्वरीय संकेतच जणू. ‘कधी कधी गर्जती निरंतर पाहणे,ऐसा म्या देखिला निराकार ओ माये’ किंवा भिमसेनजींचं,’ कानडा राजा पंढरीचा’ ऐकल की मन तृप्त होतं.काळानुसार आमचे आयडॉल बदलतात, आता महेश काळे,राहूल देशपांडे, कलापिनी कोमकली आपल्या कलेने रसीकांचे मन रिझवत आहेत.रेल्वे लोकलमधून एखादे भजन गाणारा जेव्हा तन्मयतेने ईश्वराला आळवतो तेव्हा त्याचे शब्द कधीकधी पोचत नाहीत पण त्याची तान मात्र मनाला प्रसन्न करते.

संस्कृत भाषा सर्वपरिचित नाही म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊलींनी गीता आपल्या साध्या बोलीभाषेत लिहिली. सन्याशाचा एवढास कारटा दुर्लभ गीता साध्या सोप्या शब्दांत सांगतो म्हणूनच तर स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा छळ केला. ज्ञानेश्वर यांनी अन्याय सहन केला असला तरी तुकराम महाराज यांनी समाजातील विविध रुढी, चालीरिती यावर आपल्या अभंगातून परखड टिका केली आहे.’मऊ मेणाऊनी आम्ही हरिदास कठीण वज्रास भेदू ऐसे, किंवा ठकासी महाठक.’ जर साधी भाषा कळत नसेल तर त्यांना समजेल अशा भाषेत सांगणे भाग होते.परंतु मंबाजी यांनी तुकराम हे पात्रता नसतांना ज्ञान सांगतात असा आक्षेप घेत तुकाराम यांनाही पुन्हा काही न लिहीण्याची शिक्षा दिली. म्हणजे ज्ञानेश्वर असो की नामदेव असो किंवा तुकाराम, त्यांनी समाजाला ज्ञाना विषयी काही बोलूच नये,देव या बाबत काही सांगू नये असा स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मंडळींचाआग्रह होता.

बोलतांना आपण ज्ञानी आहोत असा अहंकार बाळगू नये, बरेचदा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला म्हणते,”बाळ्या!लेका तू त्यात पडू नग,तुला त्यातल काय बी कळायचं न्हाई.”जणू तो एकटाच शहाणा. काही जण उगाचच जड शब्द वापरतात, “त्याच काय आहे, विद्वत सभेत असा ठराव झाला आहे,की सभेस फक्त मान्यवर मंडळीनाच बोलवावे,म्हणजे तालीकेवरील प्रश्नांचा सोक्षमोक्ष त्वरेने लावून अंतिम निर्णय करता येईल.”,लेका समोरच्या व्यक्तीला समजेल अस बोल की, पण नाही, तस ते बोलले तर विद्वान कोण म्हणेल?

काही जणांना आपल्या वैभवाच प्रदर्शन करण्याची किंवा चातुर्यासंंधी चार चौघात त्या बाबत बोलण्याची सवय असते, एखादा चतुर मित्र ती संधी साधुन त्याच्या जवळ आर्थिक मदतीची याचना करतो मग त्याचा चेहरा अचानक पडतो. तेव्हा अगदी बोलण्याचे साहसही अंगलट येऊ शकते याची जाणीव ठेवावी अन्यथा आपले शब्द फुकाचे होते हे लक्षात येते.

असच आपण आपल्या घराबद्दल किंवा गावच्या जमीन, जुमल्या बद्दल उगाचच प्रौढी मिरवतो, कधीकधी तोंडघशी पडतो.एकदा आम्ही मित्रमंडळी एका मित्राच्या गावी गेलो.त्यांनी गावात उपलब्ध प्लॉटवर घर बांधले होते.खाली तीन खोल्या आणि त्यावर दोन मजले. म्हणजे तीन कुटूंबांना राहण्यास पुरेसे होते,पण आमच्या मित्रांपैकी कोणीतरी बोललं “की दोस्ता, काय छोट्या छोट्या खोल्या काढल्यास, आमच्या गुरांचा गोठाही अवाढव्य आहे.” ज्याच्या घरी आम्ही उतरलो होतो त्याचे वडील म्हणाले,आमच्या बैलांनलाबी रग्गड मोठा गोठा हाय, पर आपण माणस नव्ह का जागा लहान असली म्हणजे टापटीपपणा रहातो म्हणूनशान घर आटोपशीर बांधलय.” मित्राचा चेहरा पाहण्या लायक झाला.

असाच एक किस्सा घडला, आमच्या कार्यालयातील एक चतुर्थी श्रेणी कर्मचारी ऐन पन्नाशीत वारला, या कर्मचाऱ्याच्या घरी त्याच्या विभागातील सहकारी भेटायला गेले होते.तो इतरांना कोणतीही मदत करायला तत्पर असे पण तो खाण्याच्या बाबतीत अधीर होता.संस्थेत काही कार्यक्रम असला तरी तो पोटाला तड लागेपर्यंत हादडत असेU आणि मग पोट जास्त भरलं की धापा टाकत असे, हे वास्तव अनेकांनी पाहिलं होत. अनेकांनी त्याला सल्ला ही दिला होता.पण शरीराला दिसल की खा ,अशी सवय लागली होती. त्यामुळे शरीर सुटल होत.चालताना दम लागत होता. उच्च रक्तदाब होऊन तो एक दिवस अनंतयात्रेला गेला.त्याच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या सहकाऱ्यांपैकी एक जण म्हणाला.भाऊंची तब्येत छान होती. जेवणपण तब्बेतीत होत, त्यावर दुसरा म्हणाला, “अरे काय तरी काय सांगतोस, जेवण तब्बेतीच्या बाहेर होत,बुफे असतांना ताटभर वाढून घ्यायचा,मी त्याला सांगायचो, “भाऊ, ताटाबाहेर पदार्थ चाललेत नंतर घ्या.तर माझ्याकडे पाहून हसायचा.

शेवटी जेवणानीच घात केला. गेल्या आठवड्यात कार्यक्रमला सहा वाट्या बासुंदी पिली.तेवढीच त्याच्या नशीबात होती.” त्याच्या घरची लोक, हे ऐकून शरमेन मेले असतील.ग्रुप मधील सर्वांना हसू येत होतं आणि या आगावूपणाचा राग ही येत होता.
लाल आपण त्याच्या कुटुंबाला भेटायला आणि सांत्वन गेलो आहोत? की काय खाल्लं त्याचा हिशोब सांगायला?त्याच वाभाडे काढायला हेच सांगणाऱ्या मित्राला समजल नाही.तेव्हा स्थळ ,काळ आणि कार्यकारणभाव पाहूनच बोलावे .

आमच्या एका गप्पीष्ट मित्राला बोलतांना फायर राऊंड करण्याची सवय आहे.त्यांनी खुशालीसाठी सहज फोन केला तरी कितीतरी वेळ वेगवेगळ्या विषयांवर तो माहिती सांगत राहतो. तुमच काम फक्त श्रोत्याच, तुम्ही विचारलं, “xxx तुला ए्ढी माहिती कोण देत रे?” “अरे मित्रा, मी मैताला नेहमी जातो म्हणून मला या गोष्टी कळतात.एक वेळ लग्नाच्या रिसेप्शनला नाही गेल तरी चालत पण मैताला चुकवून चालत नाही. मेलेल्या व्यक्ती बद्दल खर ते तेव्हाच कळतं अशीही पुस्ती जोडतो.

तुम्ही त्याला काही विचारण्याची गरज नाही, तुमचं काम तुम्ही ऐकत आहात हे सूचित करण्यासाठी हू, हू अस करणं, मुख्य म्हणजे सांगताना तो ती घटना तुमच्या समोर घडत आहे अशा खाश्या पद्धतीने सांगतो.तुमची ऐकायची तयारी असो वा नसो त्याला माहिती असलेल्या नजीकच्या काळातील घटना तो त्या घटनेचा चष्मोदीत साक्षीदार आहे अशा थाटात सांगतो. खर तर त्याच्या जवळून ऐकलेली घटना ऐकून आपणच म्हणतो,”खरं की काय? काय सांगतोस, तू साला ग्रेट आहेस.” एवढ टॉनिक मिळालं की त्याची गाडी भन्नाट पळते. घडलेले प्रसंग संगतवार तो सांगतो.त्याच प्रत्येक वाक्य एखाद्या इरसाल शीवीने सुरू होते आणि शिवीनेच पूर्ण होते. सांगताना तो कोणाची पत्रास न बाळगता बरीच सिक्रेट अगदी सहज उघड करतो आणि सवयीप्रमाणे xxxx शिवी घालत म्हणतो कोणाला सांगितलं तरी आपलं काय xx वाकड होणार? मुख्य म्हणजे त्याच बोलण कोणी सिरिअसली घेत नाही. तो बोलघेवड्या आहे हे सर्वांना माहिती.पण तो सांगतो त्यातील बरीच माहिती खरी असते. फक्त त्याला कुठे थांबाव त्याला कळत नाही,मग आपल्यालाच सांगावं लागतं, “चल जरा अर्जंट काम आहे, नंतर बोलू.” तेव्हा कुठे त्याची गाडी विराम घेते. पण तरीही त्याची मैत्री हवीहवीशी वाटते. एरव्ही आपल्या गावाकडची एवढी विस्तृत माहिती आपल्याला सांगणार तरी कोण? त्याला एक फोन केला की त्या कालखंडात कोण गेलं? कोणी काय झोल केला? काय नवीन उपक्रम गावात सुरू झाला, सगळच तर कळतं. तेव्हा गप्पीष्ट माणस कुठपर्यंत वाहवत जातील सांगण अवघड.

काही महिलांना एका शेजारणीच्या चाहड्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगण्याची सवय असते, कधीकधी दुसरी मैत्रीण ही आगलावी असते ती ऐकलेली गोष्ट तिखट मीठ लावून पुन्हा शेजारच्या बाईंना सांगते मग जे काही महाभारत घडत त्याच नाव ते .कोणी आपल्याकडे काही मदत मागितली किंवा घरातील फुटकळ वस्तू मागितल्या तर एक तर ठाम नकार द्यावा पण ती काय काय मागून नेते त्याची यादी दुसरीकडे पोचवू नये अशाने गैरसमज वाढतात आणि भांडणेही होतात.पण जिभेवर संयम ही गोष्ट बऱ्याच भगीनींच्या गावी नसते.कोणी तिला नवीन घेतलेली साडी दाखवली तर ती बया तिसरीला म्हणेल, हजाराची साडी आणली आणि उगाचच सहा हजाराची साडी घेतली म्हणून सांगते.जस काही आम्ही साड्या कधी खरेदी केल्याच नाहीत.हेच दागिन्यांच्या बाबतीत.कधीकधी तर मुद्दाम मोबाईलवर एवढ्या मोठ्याने बोलतात की शेजारणीची ऐकण्याची इच्छा नसली तरी ऐकावं लागत. मग ती ते तिखटमीठ लावून तिच्या मैत्रीणीला सांगते.तेव्हा नंतर भांडणाला सामोर जाण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करूनच बोलावे. कुणाची स्तुती केली नाही तरी चालेल पण निंदा मुळीच करू नये.

काही नेत्यांना भाषण करतांना शिवराळ भाषा वापरण्याची सवय असते,हळूहळू ती लकब होत जाते.त्यांचे चाहतेही त्यांना मिसलीड करतात,उगाचच त्यांच कौतुक करतात त्यामुळे ते भरकटत जातात.
तेव्हा शिवराळ भाषा म्हणजे काही अभिमान नव्हे.काही व्यक्ती आपण स्पष्टवक्ते आहोत असं सांगून नको ते जाहीरपणे बोलतात आणि दुसऱ्या व्यक्तीची फजिती करतात.बोलतांना परिणाम साध्य व्हावा म्हणून काही वक्ते थांबून थांबून बोलतात.तर काही वक्ते श्वास नियंत्रित करूनही बोलतात.अमोल पालेकर, नाना पाटेकर,डॉ. श्रीराम लागू यांचे संवाद परिणाम का साधतात ? त्याच गमक त्यांच्या वाक्य संवादात उतरवतांना ते स्वतः शब्दफेक कधी परिणामकारक होईल ते पडताळतात. कै.अटलजींच्या बोलण्यात तीच खुबी होती. समोरच्या श्रोत्यांना ते स्वतः बरोबर घेऊन संवाद साधत होते म्हणून त्यांची कविता ते ऐकवत नव्हते तर जागवत होते.

आता मुलाखत घेणारा मेडिया रिपोर्टर ज्या कुणा मान्यवरांची मुलाखत घेतो त्याला ठेवणीतले प्रश्न विचारतो आणि मुलाखत देणारा त्याला छापील उत्तरे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींनी त्याला पाठवली असावीत अशी उत्तर देतो. उत्तम कांबळे,निखिल वागळे, ज्ञानदा कदम, राहुल कुलकर्णी, प्रसन्न वाजपेयी,राजीव खांडेकर, रजत शर्मा किंवा शेखर गुप्ता,असे अनेक पत्रकार एकाच वेळेस, वार्तांकन करतात,राजकीय नेते, खेळाडू ,अभिनेते किंवा वादग्रस्त व्यक्ती यांची मुलाखतही घेतात. या मुलाखतीत विविध प्रकारचे प्रश्न असतात,काही घरगुती तर काही मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या स्पर्धका बाबत किंवा विरोधका बाबत. कधीकधी मुलाखत घेणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर प्रश्नांचा एवढा मारा करते की त्याला उत्तर देणे कठीण होते. मुलाखत कशी घ्यावी याचीही काही आचारसंहिता असावी आणि ती पाळली जावी असे वाटू लागते.आपकी अदालतमध्ये नानाही येऊन गेले आणि योगीही येऊन गेले.एखाद्या प्रश्नावर चुप्पी कशी साधावी ते दोघांनाही छान जमते. बोलण्याचा कार्यक्रम असला तरी मोजके बोलले तर ते श्रोत्यांना रूचते आणि प्रभावी ठरते.

काही माणसं मुलखाची अबोल असतात, अगदी एखाद्या कार्यक्रमात आले तरी फारस कुणाशी बोलत नाहीत. जणू ते बोलले तर त्यांच्या बोलण्यावर कोणी कर आकारेल.त्यांच्याशी कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बोलण्यास सहमती असेल किंवा होकार असेल तर एकतर मान होकारार्थी डोलवतील किंवा हं sss असा होकार भरतील आणि तुमच्या बोलण्याशी सहमत नसतील तर नकारार्थी मान हलवतील किंवा च्यँक असा ध्वनी काढतील. जितक कमी बोलाल तेवढे विसंवाद कमी अस कोणीतरी त्यांना बजावल असावं आणि ते त्याच काटेकोरपणे पालन कळत असावेत. बटाट्याची की यांच्याकडे बोलायलग शब्दच नाहीत की काय ? काही माणस मात्र ऐवढी बोलघेवडी असतात की त्यांना बोलण्यासाठी कोणताही विषय आणि कोणतही निमित्त पुरत. आता तुम्हाला कोणत्या प्रकारच्या माणसांशी मैत्री करण आवडते तुम्हीच ठरवा.

ओठ न हलवता बोलण्यात शब्द भ्रमकार रामदास पाद्ये प्रविण आहेत यात संशय नाहीच. अर्थात असे तोंड बंद ठेऊन बोलण फारच अवघड. काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हुबेहूब काढण्यात माहिर असतात.

तेव्हा बोलण ही एक कला आहे,समोरच्या व्यक्तीला न दुखावता आपल म्हणणं त्याच्या गळी उतरवण काही व्यक्तींना सहज जमतं.औषधी कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या कंपनीचे उत्पादन घेऊन शहरातील असंख्य डॉक्टर मंडळींना भेटतात आणि आपली उत्पादने विविध आजारावर कशी गुणकारी आहेत ते पटवून देतात.आपल्या उत्पादनाचा खप वाढवावा यासाठी हा उपदव्याप असतो.पण काही लोकांच्या बोलण्याचा ठसा आपोआपच उमटतो, जसे आमच्या डोंबिवलीतील लळीत गुरूजी,ते पोरोहित्य करतात, सत्य नारायण पुजा, लग्नविधी, गृहशांती, मुंज अशा अनेक कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी गेलं तर लळीत गुरुजी दिसतात. त्यांच पौरोहित्य अनेक लोकांना आवडत म्हणूनच जिथं मंगल कार्यक्रम असेल तिथे त्यांची हजेरी असते. खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, विधिबाबत योग्य ज्ञान आणि हसतमुख चेहरा हेच त्यांचे भांडवल.

तेव्हा आपलं बोलण प्रभावी व्हावे यासाठी इतर मान्यवरांचे ओडियो किंवा व्हिडीओ पाहून स्वतः सुधारणा केल्या पाहिजे. नेमक तेवढ अचूक आणि कमी शब्दात बोलण्याचा सराव केला पाहिजे. इतर बोलत असतांना आपली गाडी मध्येच दामटू नये, समोरच्या व्यक्तींच्या बोलण्याचा संदर्भ लक्षात घेऊन त्या बाबत मत प्रदर्शीत करण्या एवढी माहिती आपल्याला असेल तरच बोलावे.ऐकीव माहितीच्या आधारे शक्य तो भाष्य करू नये. थोडक्यात काय तर आपल बोलणं रूचत असेल, पटत असेल तरच बोलण्यात अर्थ अन्यथा ती फुकाची बडबड. अर्थात ज्यांना सतत संभाषणात भाग घ्यायची आणि आपले म्हणणे रेटण्याची सवय असते त्याला स्वतः वर आवर घालणे तसेही कठीणच.

एखाद्या मैफलीत रंग भरला तर मन आपसूक डोलू लागत, तसच भाषेच आहे, ह्रदयापर्यंत पोचली तरच आपलीशी वाटते. आज तुम्ही बनारस येथील हिंदी ऐकली तर अनोळखी वाटेल पण मुंबईची हिंदी आपली वाटेल ,याच कारण ती सर्व भाषांना सोबत घेऊन प्रवाही बनली आहे म्हणून ती तुम्हाला तुमची वाटते, तिच्याशी तुमचं नातं जुळते. तिचे बोल आपल्या पर्यंत पोचतात. एक दुजे के मधील वासू सपना आठवा, भाषा भिन्न असुनही संवाद घडला, मनाला भावला, मनं जुळली हाच तो भाषेतील गोडवा. तो गोडवा आपणही जपुया,इतर भाषांना सोबत घेऊन समृद्ध करूया. भाषा, तुझी माझी न करता आपली बनवू तरच गोडवा वाढेल, टिकेल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar