कोकण विकासातील अडथळे
गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता. खरे तर कौटुंबिक आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली त्यामुळे शिक्षणाच्या फारशा इयत्ता न केल्याने पोटासाठी दाही दिशा जाण्याशिवाय गत्यंतर तेव्हा नव्हते.
कोकणात स्थानिक उद्योग तेव्हा नव्हतेच. शेती हाच काय तो व्यवसाय परंतू शेतीसाठी सपाट एकक्षेत्री जमीन नव्हती तसेच सिंचन समस्या आ वासून होतीच. पाटाचे पाणी उंचावर नेणार तरी कसे? मुख्य म्हणजे तोपर्यंत हापूस आंबा लागवड ही फारच मर्यादित शेतकरी करत त्यामुळे कुटुंब वाढले तशी पोटापाण्याची व्यवस्था तोकडी पडू लागली. कोकणातून बाहेर पडण्याशिवाय उपायच नव्हता. मुंबईत आणि कोल्हापूरात तेव्हा लोकांना सुतगिरण्या किंवा कापड उद्योग हा मोठा आधार होता. नाही म्हणायला मुंबईत काही इंजिनिअरिंग कंपन्यामध्ये तेथील साहेबांच्या मेहेरबानीवर कित्येक कोकणवासी चिकटले हे ही सत्य स्वीकारावे लागेल.
रत्नागिरी येथे जे के फाईल्स, सिमेंट पत्रे, फिश मिलसारखे काही उद्योग सुरू झाले, परंतु त्यांची क्षमता मर्यादित होती. चिपळूण येथे घरडा केमीकल सारखे काही केमीकल प्लांट कार्यरत आहेत परंतु आजही त्यांची क्षमता काहीशे कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून देईल इतकीच आहे. यामुळे आजही संपूर्ण कोकणपट्टी ही नोकरी किंवा रोजगारासाठी मुंबईलाच धाव घेते.
ऐकेकाळी मुंबईतील लाल बाहाद्दूर शास्त्री म्हणजेच एलबीएस रोडवर आणि अंधेरी चकाला नाका परिसरात असणाऱ्या अनेक कंपन्यामध्ये कोकणी माणसे कामाला होती. कळवा परिसरात मकुंद आयर्न, सिमेन्स, भारत बिजली, इंडाल मफतलाल इंजिनिअरिंग, सीएट टायर्स अशा कंपन्या कोकणी माणसाला आधार होतो. रेल्वे, मुंबई टेलिफोन माझगाव येथे परप्रांतीयांनी बाजी मारली होती याचे कारण शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य. कोकणात तोपर्यंत तंत्र शिक्षण म्हणजे काय हेच फारसे कुणाला ठाऊक नव्हते.
मुंबईतील मुळ कोकणवासीयांनी आपल्या गावाकडील मुलांना येथील कंपनीत भरती केले आणि स्थैर्य प्राप्त होत असल्याने कोकणातील मुले नोकरीसाठी मुंबई जवळ करू लागले. गिरगाव, लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर, प्रभादेवी येथे कोकणातील लोक चाळीतून राहू लागले. आपल्या कुटुंबासाठी चार पैसे मोनिऑर्डर पाठवू लागले. खरेतर या पैशांनीच घोळ घातला, आपण काही तरी हातपाय हलवावे ही उर्मी कमी झाली. येथील प्रत्येक व्यक्तीच्या हातात जादू आहे पण स्वतःची ओळख निट न झाल्याने त्याने शिक्षणाचा बाऊ करत स्वतःच्या प्रगती भोवती कुंपण घातले आहे. हे कुंपण आणि सुरक्षितता सोडून तो उद्योग किंवा अन्य क्षेत्रात उडी घेत नाही तोपर्यंत त्याची गरीबी हटणार नाही. दुर्दैवाने येथील निसर्ग, प्राणी शेतीचे नुकसान करत असल्याने शेतीत मेहनत करुनही हाती फारसे लागत नाही. शासनाने येथील वन्य प्राण्यांच्या हालचालींवर बंधन आणले नाही तर येथील शेतकरी स्वतः शस्त्र हाती घेऊन पिकांचे संरक्षण करतील.
सरकार या भागात कोणताही उद्योग उभारत नाही. येथील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना काम दिले नाही तर ही तरुण पिढी नको त्या मार्गावर जाईल म्हणून येथे व्यवसाय उभारण्यास प्राधान्य द्यायलाच हवे. अन्यथा येथे रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून मुंबईत जाऊन पक्षाच्या नेत्यांची हुजरेगिरी करून जगण्यात आयुष्य नष्ट होईल. तरूण पिढीने एकत्रितपणे एखादा उद्योग उभारण्यासाठी प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी बँक कर्ज उभारावे आणि उद्योग चालवावा यातून वणवण तर थांबेल आणि इतर तरूणांपुढे आदर्श निर्माण होईल.
त्या काळात बॅरिस्टर नाथ पै आणि मधू दंडवते असे अभ्यासू नेतृत्व केंद्रात असूनही त्यांना येथे उत्तम आणि नोकरीसाठी उपयुक्त ठरतील अशा शिक्षण संस्था काढणे शक्य झाले नाही. परिणामी कोल्हापूर, कराड, सांगली, मिरज, सातारा या जिल्ह्यात शिक्षण घेऊन काही लोकांनी स्वतःची प्रगती साधली ती कोकणाला जमली नाही. सक्षम नेतृत्व नसल्याने धरणे बांधली गेली नाहीत. त्यामुळे शेतीसाठी सिंचन व्यवस्था नाही, ऊस नाही, दूध महासंघ निर्माण झाले नाहीत. उद्योग तर, लोटे परशुराम कुडाळ येथील एमआयडीसी सोडली तर नगण्य त्यातही कौशल्य प्राप्त असलेले कामगार कुडाळ येथे न मिळाल्याने कुडाळ एमआयडीसी लवकर आजारी पडली. जलद वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडत गेली. साहजिकच नोकरी धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरून कामगार निघून गेले.
कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी चार महत्त्वाच्या गोष्टी हव्या, १) व्यवसायासाठी वीज, पाणी, रस्ते आणि जलद तांत्रिक दळणवळण व्यवस्था सुविधायुक्त जागा २) पुरेसा भांडवल पुरोवठा ३) कच्च्या मालाची उपलब्धता ४) पक्क्या मालासाठी बाजारपेठ ५) तांत्रिक साहाय्य. दुर्दैवाने या गोष्टी कोकणात उपलब्ध झाल्या नाहीत.
साहजिकच कोकणातील उद्योग कोलमडला. त्यानंतर कित्येक रेल्वे गाड्या येथील मार्गावरून धावू लागल्या तरीही कोकण उद्योग वाचवण्यासाठी राजकरण्यांनी प्रयत्न केले नाहीत.
त्या तुलनेने औरंगाबाद, नाशिक येथे मात्र उद्योग उशीराने सुरू होऊन त्यांनी बाळसे धरले. जेथे विविध मार्गाने वाहतूक व्यवस्था उत्तम असेल अशा ठिकाणी व्यवसायिकांनी उद्योग उभारणी केली. गुजरात हे त्याचं आदर्श उदाहरण आहे. तेथील सरकारने व्यावसायिकांसाठी रेड कार्पेट घातले. सुविधा तर दिल्याच पण वाजवी दरात कर्ज उपलब्ध करून दिले आणि विज सातत्याची हमी दिली.
आज काही राजकीय पक्ष महाराष्ट्रातील उद्योग गुजरात पळवत आहे अशी आवई उठवत आहेत. मी म्हणेन येथील उद्योग वाचवण्यासाठी आपण व्यवसायिकांना पाठबळ पुरवत नाही. गुजरात प्रमाणे त्यांच्या कर्जाला हमी दिली. काही वर्षे कर माफ केला, विज खंडीत होणार नाही याची काळजी घेतली आणि कौशल्य प्रधान कर्मचारी मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात कौशल्य शिक्षण सुविधा. निर्माण केली तर महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाणारच नाही.
आपल्या मुंबईतील उद्योग वाचवण्याचा प्रश्न नव्हता कारण
येथील जागा उपलब्ध ईमारती उभारण्यासाठी सोन्याच्या भावाने विकल्या गेल्या. मालकांना बक्कळ पैसा मिळाला मग ते उगाचच कामगार का पोसत बसतील? बर हे उद्योग आपल्या मराठी अस्मिता जपणाऱ्या पक्षानेच केले. आपल्या तुंबड्या भरून ते मोकळे झाले.
कोकणात खाणव्यवसाय फक्त रेड्डी परिसरात चालतो. अजूनही या बाबत सह्याद्रीच्या रांगात फारसे संशोधन झालेले दिसत नाही. स्थानिक पातळीवर गरजा भागवणारी उत्पादने लोक सहज स्विकारणार नाहीत अन्यथा कितीतरी छोटे उद्योग उभे राहू शकतील. रिस्क घेण्याची मानसिकता नसल्याने नोकरीत समाधान मानण्याची कोकणी वृत्ती आहेच.
पर्यटन विकास झाला तर थोडी उर्जितावस्था येईलही पण त्यासाठी वाहतूक व्यवस्था मजबूत होणे आवश्यक आहे.
आपल्याकडे रस्ता तक्रारी कधीही कमी झालेल्या नाहीत.
बांधकाम क्षेत्रात प्रगती झाली असुनही आम्ही न तुटणारे, खड्डेमुक्त रस्ते बांधू शकत नाही ही शरमेची बाब आहे. एक एक रस्त्यावर सतत खर्च करून आपली सोय पाहणारे रस्ते विकास मंडळ बरखास्त करावे म्हणजे सामान्य नागरीकांचा कररूपी पैसा अनाठायी खर्च होणार नाही.
काही महिन्यांपूर्वी मुबंई-गोवा मार्गाबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक गृहस्थ एका सिव्हिल इंजिनिअरच्या बंगल्याजवळ जात त्यांना फोन करून म्हणतो, साहेब भेट घ्यायची होती, येऊ का? ते विचारात पडतात, एवढ्या सकाळी कोण बर भेट घ्यायला आलं असावं? तरीही ते होकार कळवतात. ती व्यक्ती येऊन पाया पडण्यासाठी पुढे सरसावते, तस इंजिनिअर विचारतात, “कोण तुम्ही? आणि पाया का पडताय?” तसं ते म्हणतात, “साहेब,तुम्ही कोकण हायवे वर इंजिनिअर आहात अस समजलं, म्हणून भेट घ्यायला आलो. मी कोकणातील एक सामान्य नागरिक, माझ्या पत्नीला जुळं होणार होतं म्हणून मी डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी मला सल्ला दिला की ताईंना थोड कॉम्प्लिकेशन आहे, इथे डिलिव्हरी होणार नाही तुम्ही मुंबईत जा तिथ त्यांची योग्य डिलिव्हरी होईल, सत्तरऐशी हजार खर्च येईल.” “बर पण या सगळ्याशी माझा काय संबंध, मी इंजिनिअर आहे डॉक्टर नाही.” “साहेब थोडं शांतपणे ऐका तर खर,तर बायकोच्या डिलिव्हरीसाठी मी कशीबशी पैशांची सोय करून वाहनाने निघालोच होतो पण तुमच्या कृपेमुळे रस्त्यात मिसेसची डिलिव्हरी झाली. साहेब तुमचे उपकार मानावे तेवढे थोढेच, तुम्ही रस्त्यावर खड्डे ठेवले म्हणून नॉर्मल डिलीव्हरी झाली आणि माझे सत्तर हजार वाचले.” इंजिनिअरचा चेहरा पाहण्यालायक झाला.
जोक अपार्ट पण नितीन गडकरीसारखे सक्षम रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री असतांना कोकण महामार्गाची ही अवस्था मग राज्यातील इतर ठिकाणच बोलायलाच नको. पाच ऑगस्ट रोजी चाकरमान्यांनी मुंबई – गोवामहामार्गावर धरणे आंदोलन केले होते. रवींद्र चव्हाण जे कोकण भुमीपुत्र आहेत तेच राज्यमहामार्ग मंत्री असुनही गोवा रस्त्याची ही अवस्था तर राज्यातील इतर रस्त्याचे बोलायलाच नको.
प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील जमिनींचे वाद रखडल्याने रस्ते बांधकाम रखडले असे माहितगार सांगतात. हे जमीनीचे वाद सुटावे यासाठी आणखी किती वर्षे थांबावे लागणार? समृद्धी महामार्ग कैकपटीने लांब पल्ल्याचा असूनही अवघ्या चार वर्षात पूर्ण झाला मग गोवा महामार्गाचे घोडे कुठे अडले तेच कळत नाही.
गडकरी जेव्हा अनेक वाहिन्यांना मुलाखत देतांना महाराष्ट्रात कोण कोणत्या महामार्गाना नूतनीकरण मंजुरी मिळाली आणि त्याचे बजेट किती करोडचे आहे याचे आकडे नॉन स्टॉप सांगतात ते ऐकतांना छाती फुगून येते. संपूर्ण भारतात कुठून कुठे रस्ते जोडले गेले आहेत आणि या रस्त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे असं प्रत्येक भाषणात गडकरी सांगतात, अनेक राज्यात त्यांच्या विभागाचे कौतुक होते. कमी दिवसात जास्त लांबीचा सहा पदरी महामार्ग बनवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. नागपुर येथे एकावर एक असे रस्ता जाळे गडकरींनी बांधले आहेत. असे असताना महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे घोड कुठे पेंड खाते हेच कळत नाही.
गेले चौदा वर्ष याचे काम रखडले आहे आणि कोकण पर्यटनावर आणि उद्योग धंद्यावर त्यामुळे मंदी आली आहे. आपल्याच राज्यात राष्ट्रीय महामार्ग काम रखडावे यामुळे विकासगती कुंठित व्हावी हे योग्य नाही.
आतातर शिवडी ते अलीबाग असा नवाकोरा अटलबिहारी सेतू पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू होऊन दोन महिने झाले. मग मुंबई कोकण गोवा रस्त्याबाबत सरकार उदासीन का? आमचे कोकणातील सर्व आमदार, खासदार फारच उदासीन आणि बोटचेपे धोरण राबवणारे आहेत. हे सर्व आमदार, खासदार निवडणूक कोकणातून येतात मात्र राहतात मुंबईत त्यामुळे कोकणच्या रस्त्याबद्दल त्यांना म्हणावी तशी आस्था नाही. कोकणाने शिवसेनेला राज्यात आणि मुंबई महानगरपालिका येथे तीस वर्षे सत्ता दिली पण या शिवसेनेच्या अजेंड्यावरसमृद्धी महामार्ग होता, गोवा महामार्गाला हा पक्ष किती महत्व देतो ते दिसते आहे. केवळ एन्रॉन किंवा जैतापूर असे काही महत्त्वाचे आणि कोकण विकासाला पूरक प्रकल्प सुरू होतांना खोडा घालण्याचे काम सरकारने केले. दुर्दैवाने कोकणी आमदार त्यांच्या वळचणीला बांधलेले नंदीबैल. ते कसा उठाव करतील? त्यांनी येथील प्रकल्पग्रस्त गरिबांच्या जमिनी पडेल किमतीत घेऊन ठेवल्या आहेत. त्यांना हे ठाऊक आहे उद्या नाही तर दहा वर्षात येथे प्रकल्प होणारच. मेलेल्या माणसाच्या मड्यावरचे लोणी खाणारी ही जमात त्यांना गरीब जनतेच्या सुखदुःखाशी काही घेण देणं नाही.
चिपी येथे दिवसात अवघी दोन विमान येतात. त्या विमानातून आर्थिक परिस्थिती सुधारलेले स्थानिकच येतात. जोपर्यंत आपल्या येथील नदीकिनारे, मंदिरे, येथील खाद्य संस्कृती याची माहिती योग्य प्रकारे जगाला करून देणार नाही, पर्यटन विकास शक्य नाही. तेव्हा आता तरुण पिढीने येथील सुंदर, विस्तीर्ण समुद्र किनारे, निसर्ग, मंदिरे, खाद्य संस्कृती, दशावतारी नाटके याबाबत जगाला ओळख करून द्यावी. याच बरोबर स्थानिक पातळीवर असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन, प्लास्टिक उद्योग, धातू भांडी, सिपोरेक्स ब्लॉक, लाकडी खेळणी, इत्यादी गोष्टी फोकस करून त्यांचे उद्योग काढावे तरच येथील हुशार विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल. कोकणाचे वैभव सातासमुद्रापार गेले तरच कोकणाला उर्जितावस्था येईल. चला काही भव्य दिव्य स्वप्ने पाहू, या भुमीला वैभवाचे दिन दावू.