प्रतिभा

प्रतिभा

प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळं
वर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळं
कोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळं
रंगाने होत काय? नका विचारू, नभात इंद्रधनुष्य, पुण्यवंताचं बळ

कोणी बोलण्यात धूर्त, कोणी मोकळा ढोकळा, तर काही उदासीन
कोणी शब्दात अडखळणारा, कोणी कोट्या करणारा, सदैव शाईन
कोणी अंतर्मुख डोह, कोणी अगदी उथळ, कोणी नितळ निर्मळ
ज्याच्याकडे शब्दभांडार, त्याचे बोलणे उत्स्फूर्त, झऱ्याची खळखळ

कोणी चित्रकार, कोणी मूर्तिकार, कोणी कलात्मक शब्द रचनाकार
खिळवून ठेवतो प्रत्येक जण त्यालाच माहिती ती वळणे नी आकार
कोणाची ऐकावी शब्दफेक, कोणाचा थांबलेला श्वास म्हणजे नकार
कोणी नृत्य विशारद, त्याचे पद लालित्य करे कृष्णलीला सहज साकार

कोणाकडे नेतृत्व, तर कोणाचे कर्तृत्व, कोणी फक्त अनाथांचा आधार
कोणाच्या शब्दांना शस्त्रांची धार, तर कुणी गुणवंत स्नेहाची मृदू धार
कोणी धूर्त, चलाख, बोलणे चतुर, तिची देहबोली हाच तिचा व्यापार
तिच्या देहाची कमनियता, तिचे अधर, नयनाची भाषा, होती आशिक गार

कोणाच्या मुखी सुरांचा छबिना, कुणी गंधर्व छेडीतसे अखंड गोड ताना
कोणी न्हाऊन निघे त्या अमृतधारात, कोणी ऐकूनही मुक जणू रिकामा
कोणी समाधिस्थ, स्वर्गीय आनंदाच्या नशेत मश्गुल अश्रू मोकर नयना
कोणास उरे न स्वअस्तित्वाचे भान, तो ही मुक्त कंठे गाऊ लागे तरना

कोणी नादब्रह्म, त्यांच्या हाती जादू, छेडता सतार, नाचते सप्तकात तार
वाजे मृदुंग तिरकट ता ता, धा धीन धा धा, बोल उमटती हवेत कंप बहार
पायीचे नृपुर, बोलती पैंजण, नेत्राची बोली तसेच नर्तन, उठती धरेवरी शहार
दरवळ सुटला, गंधित हवा, साथ देतसे कला गुणांना, वाह वा! हुंकार

गुणांचे अधिकारी बैसले, सजली मैफल, जुळल्या तारा, उमटे मनी झंकार
साथ देऊन, गीत सजतसे, तरंग लहरी फिरती हवेवर, नादब्रह्म ओंकार
प्रतिभेचे दान दिले प्रभूने, लागता षड्ज स्वर घुमे अंतरी घडे चमत्कार
निनादे स्वर, डोलती माना, चैतन्याचा झरे मधूरस, लया जाई तत्क्षणी अहंकार

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar