घर देता का, घर?
अहो घर द्या, घर, आमचे सर्वांचे एकच मागणे मुंबईत हवे घर
विश्वास नाहीच बसणार पण आताशा यांच्या मागणीचा पंच “घर”
“कुणी घर देता का घर!” विधानभवनात बेघर आमदार फिरत होते
अधिवेशन संपवून थकून भागून एसी गाडीतून, आमदार निवासात शिरत होते
गावाकडे जमीन आहे, तालुक्याला बंगला आहे, ते कोटींचे धनी
साखर कारखाना, दुध डेरी, सहकारी बँक, कशाचीही नाही कमी
शाळा, महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, लक्ष्मी भरते पाणी
दुसरं बिऱ्हाड, तिसरी हौशी, मुंबईत आल्यावर बैठकीत लावणी
तारांकित यांचे प्रश्न, यांचे उपोषण, यांचे धरणे, यांच्यापाशी युक्ती नामी
विविध प्रश्न, यांची अडवणूक, यांचे धोरण यांचा अजेंडा एक कलमी
कितीही मिळो वेतन,भत्ते, पुढल्या वेळी पेन्शन जिंकण्याची यांची हमी
एकाच टर्ममध्ये नाहीच भागले तर पूढील वेळेस ते किंवा त्यांचा डमी
कुठे आणि किती गुंतवणूक? कोणी बिल्डर, कोणी डेव्हलपर
ठेका असो रस्त्याचा वा इमारतीचा, यांचे कमीशन, यांचाच वावर
इतकं सगळं चालते तरी, हे गरीब, यांना खरंच हो नाही कुणी वाली
हे निजती एसीमध्ये सोबत ह्यांच्या छेलछबिना तरी यांच्या आठी भाळी
काय म्हणावे या गरिबांना! भाकर, तुकडा द्या त्यांना, द्या कुणी मुंबईत घर
आसरा हवा मलबार वरती बांधा टॉवर, शंभर मजली किंवा बांधा अजूनही वरवर
आम्ही मुर्ख, यांच्या कष्टाची न जाण आम्हाला,जनतेचे हे सेवक महाराष्ट्री त्यांचा बोलाबाला
द्या हो या गरीबांना पेन्शन नी भत्ता, फुकट प्रवास, द्या घर MLA ला, निर्णय किती चांगला
किती संमजस, ना वाद रंगला, न चर्चा झाल्या, एकमत यांचे नाजूक “घर” विषयावर
द्या हो द्या यांना वरळीला घर, द्या यांना बीडीडी मधील उंचच उंच टॉवर
हे डोमकावळे, टपून होते, लक्ष यांचे या मोक्याच्या भूखंडावर
जनतेचे हे सेवक कसले, फसू नका हो यांच्या शब्दांच्या नौटंकीवर
म्हणती सेवक उगा स्वतःला, नको आरक्षण, ना एसटी चा संप मिटवला
संधीसाधू हे, न सेवक तुमचे, लुटती तिजोरी, आम्ही मुर्ख फक्त “कर” निमूट भरण्याला
कटु सत्य…!
आज आगरकरांच्या बोलण्याची तीव्रतेने आठवण होत आहे. स्वराज्य मिळणे महत्त्वाचे नाही. सुराज्य काय हे लोकांना आधी समजले पाहिजे..
प्रतिसाद नोंदवल्या बद्दल धन्यवाद मॅडम