झुंज
Man proposes and God disposes अशी म्हण आहे.किती सुंदर स्वप्न आपण पहात असतो. स्वत:साठी आणि आपल्या कुटूंबासाठी, काय चूक आहे अशी स्वप्न पाहण्यात? पण स्वप्न पाहणं आणि ती सत्यात येणं ह्यात एका श्वासाचं अंतर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
आज तो मुंबईच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये करोनाशी लढा देत होता. गेले तीन महिने सतत वेगवेगळया भागात बंदोबस्त करण्यासाठी तो व त्याचे इतर सहकारी झटत होते. पेशंटला वाचवण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटल स्टाफ जीवाचं रान करतांना तो पहात होता. कधी containment zone, कधी हॉस्पिटल तर कधी Ambulance अशी ड्युटी बदलत होती. घरी गेल्यानंतर सॅनिटाइज करून स्वच्छ आंघोळ केल्याशिवाय त्याला समाधान वाटत नव्हतं. घरात दोन गोंडस मुले आणि पत्नी यांचे आरोग्य महत्त्वाचे होते. त्यांचा बराचसा स्टाफ याच कामात गुंतला होता. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्याच काॅलनीतील सहकारी करोना पाॅझिटिव्ह डिटेक्ट झाला तिथपासून सगळेच खाते हादरले होते.
तो शक्य तितकी पूर्ण काळजी घेत होता. असे असूनही गेले चार दिवस अंगात कणकण जाणवत असल्याने ऍडमिट झाला होता. घरी दोन दिवस त्याला ताप येत होता. काॅलनीतल्या डाॅक्टरांनी त्याची लक्षण ऐकून त्याला ऍडमिट होण्याचा सल्ला व लेटर दिले तेव्हा तो हादरला. तरीही पत्नीची समजूत काढत म्हणाला मुलांची काळजी घे, त्यांना बाहेर पाठवू नको, पप्पांना फोन करू नको ते घाबरतील. घर सोडतांना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. मोठ्या प्रयत्नाने त्याने मुलांचा निरोप घेतला व हॉस्पिटल गाठले.
डाँक्टर अजूनही व्हिजीटला आले नव्हते परंतू त्याला सलाईन लावण्यात आले होते. औषध व गोळ्या सकाळीच देण्यात आलेल्या होत्या. त्याला थकवा जाणवत होता म्हणून त्याने सिस्टरला bell मारून बोलावले. “मॅडम मला खूप थकवा जाणवतो,जरा temperature पहा”. त्यांनी धीर दिला, “तुम्हाला,मी गोळ्या दिल्या आहेत. थोड शांत पडून रहा.डॉक्टर येतील इतक्यात. मग रिपोर्ट काढू”. सिस्टर निघून गेल्या, तितक्यात त्याला ग्लानी आली. ग्लानीत असतांनाच त्याच्या समोर मागील वीस पंचवीस वर्षांपूर्वी चे चित्र तरळून गेले.
लहानपणी तो खूप खट्याळ होता. कॉलनी मधील सर्व मुले खूप धुडगूस घालत, तो पण रस्त्यावर cricket खेळे, पण वडील येण्याची वेळ झाली की तो घरी येऊन अभ्यास करत बसे. शालेय जीवन पूर्ण होतांना What you will dream to be? अस शिक्षक, घरातील ज्येष्ठ, नातेवाईक आणि मित्र विचारत तेव्हा स्वतःला खरंच प्रश्न पडे, मी कोण होणार? काय व्हायला मला आवडेल? तो प्रश्न त्यांने स्वतःला विचारला होता तेव्हा त्याला आठवली होती घराण्याची परंपरा, पोलीस मैदानावर पाहीलेले रुबाबदार संचलन. वडीलांचा पोषाख आणि त्या पोशाखातील त्यांचे घरात लावलेले फोटो. वरळी बीडीडी कॅम्प आणि सतत जाणवणारे पोलिसी वातावरण, या वातावरणात तो वाढला. त्यांच्या घरात फारच क्वचित पोलिस व त्यांच्या कामकाजाची चर्चा होत असे, कारण मुलाने वेगळ्या क्षेत्रात जावं. तेथे मोठ्या पदावर काम करावं असे वडिलांना वाटे. आपल्या सारखी सतत ताण वाढवत जाणारी नोकरी मुलाने करू नये असे त्यांना वाटे.
पण त्याच्या मनात मात्र पोलीस खात्यात नोकरी मिळवायची हे नक्की ठरलेलं होत. शाळेत असताना जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्यांना आपली कौटुंबिक माहिती विचारत तेव्हा आपले वडील पोलिस आहेत हे सांगताना त्याला अभिमान वाटे.
त्याची देहयष्टी दणकट होती. शाळेत तो विविध क्रीडा प्रकारात भाग घेत असे. शाळेतील कबड्डी संघाचा तो कप्तान होता. जिल्हा आणि आंतरजिल्हा कबड्डी स्पर्धेत त्यांने अनेकदा नेतृत्व केलं होत. वेळ काढून gym मध्ये नियमित जाणं आणि स्वतःला आरशात बघून स्वतःच, स्वतःच्या शरीराच कौतूक करून घेणं त्याला आवडे. आई त्याला योग्य आहार देत होती. बारावीत असतांनाच त्यांने खात्यात भरतीला उभा राहतो असे सांगितले तेव्हा वडील रागावले, म्हणाले, “बापाची हौस फिटली, पाहतोस ना कधीपण जावं लागतं कामावर, परत यायचं पण नक्की नसत, शिक आणि दुसरी कसली पण नोकरी कर पण या खात्याची नको”.
तो काही बोलला नाही पण त्यांने आईला सांगितलं, “मी पोलिस भरतीला उभा राहणार आहे”. आई त्याला समजूतीने म्हणाली, ” त्यांची ड्युटी बघतोस ना कधी घरी येतात ते, बंदोबस्त लागला की बारा बारा तास घर दिसत नाही, सण नाही, नात्यागोत्यात लग्न समारंभ नाही. बाप काय खुळा आहे होय, तु त्या पोलिस खात्याचा नाद सोड, शिक, बापाची इच्छा आहे, तू मोठा व्हावास”.
तो तिला म्हणाला, “आई मी कधीच ठरवलं, मला पोलिसात जायचयं, मी पण डिपार्टमेंट परीक्षा देवून मोठ्या पदावर जाऊ शकतो. मी काही कायम त्याच जागी रहाणार नाही”. शेवटी आई रागावत म्हणाली “तु आणि तुझ नशीब, बाप एवढं सांगतो तो अनुभव आहे म्हणूनच ना?” तिने विषय संपवला.
अचानक त्याचे मनगट कोणीतरी धरले आणि त्याला जाग आली. त्याच्या भोवती पीपीई किट घातलेले दोन डॉक्टर आणि सिस्टर दिसले. त्यांनी त्याचा केस पेपर पाहून सिस्टरला instruction दिल्या आणि ते त्याच्याकडे पाहून म्हणाले, “हॅलो, काय नाव तुमचं? कुठे काम करता?” त्याने आपल नाव सांगितलं “संतोष माने. पोलिस आहे”. “घाबरु नका, आज आपण टेस्ट घेऊ. मी सिस्टरना तुमची औषध सुरू करायच्या सूचना दिल्या आहेत, ओके, लवकर बरे व्हाल”. तो हसला, “सर, काय झालय मला, कोविड नाही ना ?” “ते swab टेस्ट रिपोर्ट आल्यावर कळेल, तो पर्यंत आपले उपचार सुरू आहेत. don’t worry, you will recover soon”.
डाॅक्टर निघून गेले. सिस्टर सुध्दा इतर पेशंट पाहायला निघून गेल्या. त्याने आपल्या आजूबाजूला पहिले, सारे बेड भरलेले होते. तो स्वतःशीच पुटपुटला “मी यातून बरा होईन ना?” गेले तीन महिने तो मुंबई मधील परिस्थिती पहात होता. सारेच भयाच्या सावटाखाली वावरत होते. मुंबई मधील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंटची रिघ लागली होती. बरेच पेशंट बरे होऊन घरी जात होते, पण काही दुर्दैवी मृत्यूला कवटाळत होते. त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकवत नव्हता. डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफ जिवाच रान करूनही अपेक्षित यश मिळत नव्हतं. पेशंटची संख्या आणि मृतांचा आकडा वाढतच होता.
गेले तीन महिने हे तो पहातच होता. त्याचा सहकारीवर्गही लोकांनी घरा बाहेर पडू नये शर्थीचे प्रयत्न करत होता पण आत्ता तर तोच असहाय्यपणे हॉस्पिटल मध्ये पडला होता. विचाराने त्याच डोक भणभणून गेलं. आपलं काय? पत्नी आणि मुलांना संसर्ग झाला नसेल ना? सगळेच प्रश्न अनुत्तरित होते.
त्याला पुन्हा ग्लानी आली. तो प्रयत्न करून डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करत होता. त्याला ठसका लागला, डोळ्यात अश्रू आले. सिस्टरनी त्याला प्यायला गरम पाणी दिले. त्याच्या घशाला कोरड पडत होती, विचित्र जाणीव होत होती. त्याला थकवा आला.त्यांने डोळे मिटून घेतले.
त्याच्या डोळ्यासमोर चित्र तरळत होते, बारावी सेकंड क्लास मिळवून तो पास झाल्यानंतर त्याने रितसर अर्ज केला होता. त्याला कॉल मिळाला, त्याचे सर्व दाखले त्यांनी तपासले आणि तो इतर मित्रांसह पोलिस भरतीला गेला. त्याच्या नशिबाने साथ दिली आणि तो प्रथम पात्राता फेरी पास झाला.
फिजकल मध्ये त्याला प्रश्नच नव्हता कारण वजन, उंची, छाती यांची कमाल पात्रता तो पूर्ण करत होताच पण त्याचबरोबर, रनींग, पुशअप्स, सिटअप्स यात तो कुठेही मागे पडणार नव्हता. याचीही पूर्ण तयारी तो गेले वर्षभर करत होता. त्याच्या क्षमतेवर त्याचा विश्वास होता. नायगावच्या परेड मैदानावर त्यांची उंची आणि छातीची रुंदी तपासली गेली. ४० इंच छाती आणि त्याच्या पाच फूट सात इंच उंचीच्या मानाने त्याचे वजनही अगदी योग्य, ७२ किलो होते. दोनशे मीटर अंतर त्यांने चाळीस सेकंदात पूर्ण केले.
पुश अप, पुल अप ही त्याने पूर्ण केले. पुढील लेखी परीक्षा तो पास आणि त्यामुळे निश्चिंत झाला. वडील हे सारे तटस्थपणे पहात होते. ना त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला सांगितले, ना कोणाची मदत घेतली. मेडिकल मधील आवश्यक त्या तपासण्या त्यांने फॅमिली डॉक्टर यांच्याकडून करून घेवून फिट असल्याची खात्री करून घेतली होती.
निवड पॅनलनी त्याची मुलाखत घेतली. त्याच नाव आणि घराचा पत्ता पाहून त्यांनी “वडील पोलिस आहेत का? कोणत्या विभागात काम करतात? कोणते पोलिस स्टेशन?” असे मोघम प्रश्न विचारले, आणि महिन्याभराने त्याला निवड झाल्याचे मेरिट लिस्टमध्ये दिसले. वडीलांचा विरोध असूनही त्यांनी खात्यात प्रवेश केला होता.
“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद तो नाशिकच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेश द्वारावर रोज पहात होता. ट्रेनिंगचे पहीले पंधरा दिवस त्याला जड गेले पण नंतर सवय झाली आणि अनेक activities मध्ये तो लीड करू लागला. ट्रेनिंग पूर्ण होता होता त्याला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला आणि त्याची नेमणूक सशस्त्र कृती दलात झाली. त्याची नेमणूक झाल्याचे पत्र मिळाले तेव्हा वडील त्याला जवळ बोलावून म्हणाले, “मी विरोध करूनही तू स्वतःच खात्यात भरती झालास, पण खात्यात टिकून राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कर, कुणाला विनाकारण त्रास देऊ नको. कुणाकडून लाच घेऊ नको. उगाच कुणाची हाजी हाजी करू नको, आपले काम भले आपण भले”. तो पाया पडत म्हणाला “पप्पा तुम्हाला मान खाली घालावी लागेल अस मी खात्रीने वागणार नाही.” वडिलांनी त्याला आशिर्वाद दिला.
त्याला आग्रीपाडा पोलिस स्टेशन मिळाले. वरळी ते आग्रीपाडा हे अंतर तो फिटनेस साठी सायकल वरून करत होता. त्याला संखे साहेबांच्या हाताखाली नेमणूक मिळाली. आग्रीपाडा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मराठा मंदिर,जगजीवनराम पासून खटाव मिलपर्यंतचा परिसर येत होता. या भागात गर्दुल्ले मोठ्या प्रमाणात होते. बांगलादेशी नागरिकांनी फ़ूटपाथ अडवून झोपड्या उभ्या केलेल्या होत्या.
ब-याचदा त्यांच्यात मारामा-या होत.कधी कधी एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जात असे. या प्रकाराकडे साहेब कधी कधी दुर्लक्ष करत कारण या लोकांवर पोलीस केस करणं म्हणजे विनाकारण कोर्टात खेटे घालणं आलं. त्यांच्या विरोधात साक्षीदार आणि पुरावे मिळवणं फारच कठीण, कारण कोणाचाही ठावठिकाणा निश्र्चित कधीच नसे. तो मात्र एखादे प्रकरण हाती घेतले तर त्याचा तपास पूर्ण होई पर्यंत पिच्छा पुरवत असे. नोकरीत तो कायम झाला आणि वडिलांनी त्याच लग्न ठरवलं. मुलगी गावाकडची असली होती. दिसायला सुंदर होती आणि त्यांच घराणही पोलीस खात्याशी संबंधीत होत.
थाटामाटात लग्न झालं, पवारांची एकुलती एक लेक, सून म्हणून मानेंच्या घरी आली. मुंबईत घर मिळालं, नवरा सरकारी नोकरीत अजून काय हवे! ती खूप आनंदात होती. सासू, सासरे दोघंही लाड करत, त्यांची मुलगी लग्न करून दिल्या घरी सुखी होती, त्यांचा जावई बँकेमध्ये कामाला होता. मुलीला एक चार वर्षाचा मुलगाही होता.
सणावाराला मुलगी आणि जावई येत होते. माने खूष होते. त्यांची निवृत्ती जवळ आली होती. नातावाच तोंड पहायचं आणि गाव गाठायचं असं त्यांनी ठरवलं होत. गावी जमीन होती. म्हातारे आईबाप होते. भाऊ आणि त्याच कुटुंब शेती पहात होते. मस्त निवांत जीवन जगायचं ठरवून ते योजना करत होते.
मुलाला पहिली मुलगी झाली तसे ते थोडे नाराज झाले. मात्र त्यांची मुलगीच म्हणाली “पप्पा, हे हो काय ? सगळं जग म्हणत मुलगी-मुलगा समान तरी तुम्ही अस वागता. मला बुवा गुड्डी आवडली”. तिनेच बारश्याला नाव ठेवलं. मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला पार्टी दिली त्यांनी. ते निवृत्त झाले आणि गावी जायला निघाले तसं मुलगा म्हणाला “पप्पा तुम्ही गावी जाऊन काय करणार? तिथे संभाजी काका आहेत की, कधी तरी हवा पालट करायला जा, इथे राहिलात तर तुमच्या नातीला खेळवाल, दिवस मजेत जाईल, पटतंय ना?” ते म्हणाले “आपली एवढीशी खोली, त्यात चार सहा माणसं कशी राहायची, आम्ही येऊ की खुशाली घ्यायला, जरा माझ्या बाबासोबत राहु दे की, त्यांच पण वय झालंय कधी गप्प झाले तर मनाला लागेल माझ्या”. ते आवरा आवर करुन गावी निघून गेले.
आत्ता खऱ्या अर्थानं संसार राजा राणीचा सुरू झाला. मुलीच्या ओढीने तो कामावरून लगोलग घरी येई. तिला खेळवण्यात त्याचा वेळ कसा गेला त्यालाच कळत नसे. इमारतीतील जुने शेजारी गुड्डीचे लाड करत, फारच थोडा वेळ ती आईकडे असे. त्यामुळे तिलाही काम आवरायला मदतच होई. मुलीच्या पाठीवर तीन वर्षांनी त्याला मुलगा झाला तेव्हा वडील मुंबईला गाडी घेऊन आले. बारश्याचा दणका उडवून दिला.त्याने आईला बायकोच्या मदतीला ठेवून घेतले. त्याच्या सासाऱ्यानी नातवाला सोन्याची चेन घातली. त्याला वाईट वाटले मुलगी झाली तेव्हा चांदीच्या कर्गोट्यावर भागावले होते याची त्याला आठवण झाली.
पाहता पाहता दोन्ही मुले शाळेला जाऊ लागली, फारच क्वचित प्रसंगी तो शाळेत पालक सभेला जात असे. त्याची बायको आपल्या नवऱ्याला ताण नको म्हणून स्वतः सर्व पहात होती. तीच मुलांचा अभ्यासही पाही. तिला नाही म्हटलं तरी अभ्यासाची चांगली गोडी होती. या वर्षी मुलगी दहावी परीक्षेला बसली होती तर मुलगा आठवी स्कॉलरशिप परीक्षेस बसला होता.
सगळं कसं मनाजोगत चाललं होत, आणि हा ब्रह्मराक्षस कुठून तो भारतात आला आणि सर्व नागरिकांची झोप उडवून गेला. पाहता पाहता या करोनाने मुंबईत हातपाय पसरले. वरळी, आदर्श नगर, दादर, प्रभादेवी असा भाग हादरून गेला. मार्चच्या मध्यावर अचानक शाळा बंद झाल्या आणि घरी मुलांचा गोंधळ वाढला, परीक्षा होणार असे गृहीत धरून त्याची पत्नी मुलांचा क्लास, त्याचं Home Work करून घेत होती. मुलीची बोर्ड एक्झाम संपत आली होती, त्यामुळे ती खुश होती, गावी आजोबांकडे जाण्याचे तिने ठरवून टाकले होते.
हा करोना आल्यापासून त्याला सवड नव्हती, कधी मंत्री, तर कधी विरोधी पक्ष प्रमुख तर कधी आयुक्त येणार म्हणून सतत कुठे ना कुठे पळावं लागत होत. गेले सतत तीन महिने पळापळ सुरू होती आणि खात्यातील काही मित्र positive झाल्या पासून त्याची चिंता वाढली होती. घरी मुले जवळच वावरत असल्याने तो पत्नीला आपली चिंता सांगू शकत नव्हता.आणि अचानक त्याच्यावर हा दुर्धर प्रसंग ओढावला.
.
तो स्वप्नाच्या गुंगीत होता तेव्हाच कधी तरी सिस्टर आली, तिने हाक मारली, त्याला जाग आली. त्याच्या डोळ्यासमोर सारे तरळून गेले जणू कुणी जीवन चित्रपट उलगडून दाखवत असावे. “अहो माने अंघोळ करताय ना? चला मी तुम्हाला बाथरूम दाखवते”, ती खरोखरच बहिणीच्या मायेने बोलत असावी. त्याने उठून बाथरूमला जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला तसे तिने वॉर्ड बॉय ला हाक मारली, “रमेश, जरा ह्यांना बाथरूमला घेवून जा, लक्ष ठेव बर त्यांना विकनेस आलंय”, त्याने तिचे मनोमन आभार मानले, “वॉर्ड बॉय त्याला घेवून गेला, अंघोळ केल्याने त्याला फ्रेश वाटले. दुपारी बळेबळे त्यांनी चार घास खाल्ले परंतू संध्याकाळी त्याला जास्त थकवा लागला, त्यांनी बेल वाजवली आणि सिस्टर हजर झाली, तिने पाहिले तो जास्तच गंभीर दिसत होता. तिने डॉक्टरना फोन लावला. डॉक्टर आले आणि त्यांनी त्याला ICU मध्ये हलवण्यास सांगितले.
तो positive असल्याची लक्षणे दिसल्याने त्याच्या बायको आणि मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये संशयित म्हणून भरती करण्यात आले होते. हे एवढे अक्रित घडल्यानंतर गावी वडिलांना कळवण्यात आले. बिचारे माने, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कशी बशी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी काढली, आणि ते मुंबईला आले. मुलाला आणि नातवांना भेटण्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता, परंतु शासकीय नियमानूसार ना मुलाला भेटू शकले, ना सुनेला, ना नातवांना.
हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आल्यावर त्याची चिंता वाढली आपल्या पत्नी आणि मुलांच काय? ते सुरक्षित आहेत ना की त्यांनाही ——. नुसता विचार करून त्याचे डोके दुखू लागले. डॉक्टर प्रयत्नाची शर्थ करत होते पण दुसऱ्या दिवशीच त्याची प्राणज्योत मालवली.
ही माहिती पत्नीला सांगायची कोणी हाच मोठा प्रश्न होता. पण सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याच्या मित्रांनी “त्याला हृदयाचा झटका आल्याने तो वारला, तेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी बॉडी ताब्यात घ्या” असा निरोप वॉर्ड मधून आल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले. त्याची बहीण आणि भावजी कसेबसे बोरिवलीहुन आले. सर्व कुटुंबावर मोठे संकट ओढवले. तरुण वयात मुलगा गेल्याचं दुःख कोणा बापाच्या वाट्याला येऊ नये. त्यांच्यावर आभाळ कोसळले, मुलगा वारला आणि सूनही हॉस्पिटलमध्ये.
तिच्या कानावर घालणं अतिशय गरजेचं होत. त्यांनी काळजावर दगड ठेवत फोन करून ही वाईट बातमी तिला सांगितली, त्याच दिवशी तिचा करोना report positive आल्याचे तिला कळाले. सासऱ्यानी सांगितलेली बातमी ऐकून ती हादरली. दणकट नवरा इतक्या सहज करोनाला हार जाईल हे तिला खर वाटेना. “मामा काय सांगताय, काल तर ते बरे होते, आज अचानक अस कस हो झालं?” तिचा शोक अनावर झाला. संपूर्ण वॉर्ड तिच्या रडण्याने हादरला, मुले जवळ नव्हती, ती शेजारच्या वॉर्ड मध्ये होती त्यांना कस सांगावं तुमचे पप्पा गेले.ती धाय मोकलून रडत होती. सिस्टर तिची समजूत काढत होत्या पण तीच दुःखच तस होत.
थोड्या वेळाने ती सावरली. नवरा हार्टअटॅकने मरण्याएवढा कमकुवत नव्हता. हा मृत्यू नक्की करोनाने असावा असं तिचं मन म्हणत होत. तिने सासऱ्यानां आपले मत सांगितले. त्यांनाही ते पटलं त्यांनी हॉस्पिटल अधिकाऱ्यांना कळवले, हा मृत्यू Heart attack ने नसून करोना मुळे असावा, तरी जो पर्यंत त्याच्या शवाची करोनाची चाचणी होत नाही तो पर्यंत आम्ही त्यांचे शव घेणार नाही. हॉस्पिटल प्रशासन मात्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे आपल्या मताशी ठाम होते. एखाद्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे शवविच्छेदना शिवाय त्याच्या रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे असा निर्णय घेण्यात आला होता. तिने त्याला आव्हान देत त्याचे शव घेतले नाही. तशी बातमी प्रसिध्द वर्तमान पत्रात छापून आली. या बातमीची प्रशासनाने वेळीच दखल घेतली व अखेर हॉस्पिटल प्रशासनाने तिचे म्हणणे मान्य केले आणि शवविच्छेदन करून घेतलेल्या चाचणी नुसार त्यास करोना झाल्याचे मान्य करावे लागले. स्वत:वर इतका वाईट प्रसंग येऊनही ती योध्द्याप्रमाणे लढली आणि तिने पतीला न्याय मिळवून दिला. याच बरोबर तिच्या पतीच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींनी आपली करोना चाचणी करून घ्यावी असेही सुचवले.
जर तीने हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे मान्य करत शव ताब्यात घेऊन दहन केले असते, तर तिच्या पतीचा उल्लेख कोविड योद्धा असा झाला नसता आणि ती व तिची मुले एका अक्षम्य चुकीमुळे शासनाच्या लाभापासून वंचित राहिली असती, आणि त्याचे जनतेची सेवा करतांना केलेले बलिदान व्यर्थ गेले असते. तिने शासन निर्णयाविरोधात झुंज देवून पतीसाठी न्याय मिळवून दिला आणि खरी योद्धा ठरली तिच्या झुंजीला त्रिवार सलाम.
छान वर्णन सर….
Thanks Rajesh, thanks for your comments.