त्या वळणावर

त्या वळणावर

जीवनात संघर्ष असला तरच जगण्याची मजा असते हे वाक्य ऐकायला तसं बरं आहे, पण विजयला डिप्लोमाला ड्रॉप लागला आणि विलास आणि मुलात पहिला संघर्ष झाला. विलास विजयला म्हणाला, “तूला डीग्री करता यावी म्हणून मी तुला कमी गुण असूनही डोनेशन देऊन प्रवेश घेऊन दिला. तुला हवी ती पुस्तकं दिली, मागशील ती साधनं दिली. इतर मुलांकडे चांगले मोबाईल आहेत म्हणालास म्हणून तुला iPhone घेऊन दिला. Reebok शुज घेऊन दिले. तुझ्या मित्रांनी maths चा क्लास लावला म्हणून तुलाही मी नाही म्हणालो नाही. जे जे मला शक्य होतं ते सर्व तुझ्यासाठी केलं. तरीही तुला दुसऱ्या सेमिस्टरलाच ड्रॉप लागला. म्हणजे जोपर्यंत तु फर्स्ट सेमचे सब्जेक्ट सोडवत नाही किंवा तुझ्या केटी कमी करत नाहीस, तुला पुढे ऍडमिशन मिळणार नाही.आता तू नक्की काय ठरवलं आहेस ते सांग? जर प्रामाणिकपणे maths आणि इतर सब्जेक्ट सोडवले तर नक्की कठीण नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, maths चा पुन्हा क्लास लाव. चांगला अभ्यास कर.”

मान खाली घालून तो ऐकत होता, खरं तर एवढं लंबंचौडं भाषण ऐकायची या मनस्थितीत विजयची अजिबात तयारी नव्हती. त्याच्या वर्गातील अठरा जणांना ड्रॉप लागला होता, त्यातलाच तो एक. तो रिएक्ट झालाच, “डॅड मला एकट्याला ड्रॉप लागलेला नाही. अठरा जण आहेत. मी तुला, मला डिप्लोमाला प्रवेश घेऊन द्या म्हणालो नव्हतो, तू आणि मम्मा ने मला डिप्लोमाला लोटलं, मी विलींगली नव्हतो गेलो. मी तुमच्याकडे काही मागितले नव्हते, मी तिथे निमुटपणे जावं म्हणून तुम्ही मला अमिष म्हणून सर्व घेऊन दिलं. तुमचा प्रेस्टीज इश्यू म्हणून.”

“विजय! तू काय बोलतोस तुला कळतयं? तुला आम्ही लोटलं! मग तुला डिप्लोमा ऐवजी काय करायचं होत? आर्ट,कॉमर्स की मग..” “ते मी नव्हतं ठरवलं, But Diploma was not my choice.” “साधना ऐकतेस ना? ऐक तुझ्या लाडक्याची मुक्ताफळं. मला याचं तोंड पहावं असही वाटत नाही. भविष्यात याला डिग्रीला अडचण येऊ नये म्हणून डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन दिल तर म्हणतोय, मी नव्हतं सांगितलं. मी याला जन्माला का घातलं कुणास ठाऊक?” “विलास, जरा शांत हो,हे सगळ आत्ताच बोलायची गरज आहे का? विजयला नापास व्हायची हौस तर नव्हती. नसेल जमलं. पुन्हा प्रयत्न करेल. तू बेडरूममध्ये जाऊन थोडा पड, तुझा बिपी वाढेल.” “BP वाढेल,अग ह्याने काय दिवे लावले ते ऐकलं तेव्हाच BP वाढलाय. करंटा काय भोगायला लावणार आहे कुणास ठाऊक?”

विलास मुलाकडे रागाने पहात,तणतणत निघून गेला. “विजय, तू मुर्ख आहेस का? तुझ्या भल्यासाठीच ना तुला डिप्लोमाला प्रवेश घेऊन दिला. सर्व गोष्टी दिल्या. चांगला अभ्यास करण्या ऐवजी उन्हाडक्या केल्यास आणि वर डॅडलाच दोष देतोस. काय ठरवलं आहेस? डॅड रागावला तर घरातून हाकलून लावेल मग कळेल!” “मम्मा, डॅड ड्रामा करत असेल तर मी तरी का ऐकून घेऊ? ,मला का हौस होती नापास व्हायची? पण maths, physics माझ्या डोक्यात नाही जात, हा काय माझा दोष आहे का?” “जास्त शहाणा बनू नकोस, तु कसला अभ्यास करत होतास मला माहिती आहे, ssc ला ही तेच केलस. जर नीट लक्ष दिलं असतस तर नक्की पास झाला असतास, एव्हढाही काही अव्हरेज नाहीस, फक्त टाईम पास,मित्रांशी chatting, सारखा मोबाईल दुसरं काय केलस सांगशील?”

“मी तुम्हाला नकोसा झालो आहे ना ,जातो मी.” तो रागाने धुसमुसत होता,त्यांनी सॅक पाठीला लावली आणि हाताच्या बाहीला नाक पुसत तो दरवाजाच्या दिशेने निघाला. तिने सॅकला धरून त्याला पाठी ओढले आणि तिने त्याच्या थोबाडीत मारत म्हणाली “मूर्ख मूला, यासाठीच तुला जन्म दिला होता का? तुला अस बोलतांना काहीच कसे वाटले नाही. तुला नक्की करायचं तरी काय ते सांगशील का?”

तिने त्याला सोफ्यावर बसवलं, पाठीवरची सॅक काढून ठेवली. त्याच्या केसात बोट फिरवता फिरवता आणि रडत ती म्हणाली, “विजय, सोन्या नको रे असं वागू, खूप मोठ्या अपेक्षा होत्या तुझ्या डॅडच्या, आज तु बेजबाबदार वागून आमची निराशा केलीस. तुझ्या डॅडला कोणाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस.” “ममा, मी डॅडला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही अस काय केलंय, चोरी की बलात्कार?” “विजय तोंड बंद कर, जास्त बोललास तर मुस्कट फोडीन, म्हणे चोरी केली की बलात्कार, कसं बोलवत तुला? अजून किती छळशील?”

“मम्मा, मी तुम्हाला छळतोय? मला खरंच तुम्हाला नाराज नव्हतं करायचंय पण मला डिप्लोमाचा अभ्यास जमत नाही. शिकवलेलं सगळं माझ्या डोक्यावरून जातं. त्यापेक्षा मी मला जमेल असा एखादा कोर्स करीन. प्लिज तु डॅड ला सांग. मला कळतंय, मी तुमचे पैसे वाया घालवले पण maths मला नाहीच कळत त्याला मी तरी काय करू?” तो हमसून हमसून रडत होता.”

तिला काय बोलावे सुचत नव्हते. तो हताशपणे तिच्याकडे पहात राहिला. ती कंटाळून किचनमध्ये निघून गेली. त्याच्या डोक्यात विचार आला. डॅड नी मला त्यांना देत येईल ते सगळं दिलं होत यात काही खोटं नव्हतं. पण नाहीतरी आज ना उद्या हे सर्व मला मिळणार, मला द्यावं लागणार हे डॅडला माहिती आहे. माझा मेंदू अभ्यासात नाही चालत. त्यांना कळायला हवं होतं की हे task मला नाही जमणार, त्याच्या मोठेपणासाठी त्यांनी मला डिप्लोमाला घातला. मला नाही जमलं. विजय मम्माला काही बोलला नाही पण डॅड कधी कधी फार वाईट वागतो अशी त्याची ठाम समजूत झाली.

कधीतरी डॅड ची शाळा कॉलेजमधली सर्टिफिकेट पहिली पाहिजेत डॅड ने काय दिवे लावले होते ते कळेल? म्हणजे डॅड एवढं का बोलतो ते कळेल. तो स्वतःशी म्हणाला. मम्मा डॅडची बाजू घेणार यात शंकाच नव्हती,ती, डॅड नी किती कष्ट केले त्याच्या स्टोऱ्या ऐकवते. डॅड आणि ती made for each other असल्या प्रमाणे वागतात. अशी त्याची समजूत होती. त्याच्या डोक्यात विचार आला, डॅड आणि मम्मा made for each other मग माझं काय ? मी कोणाचा? Unwanted kid, why didn’t they throw me in the garbage box when I was born?

त्याला बालपण आठवलं, किती प्रेम करायची दोघं, मम्मा कधीकधी फ्रॉक घालायची, डोळ्यात काजळ घालायची, हेअर बँड लावायची. इथं इथं नाचरे मोरा शिकवायची. डॅड कितीतरी खेळणी घेऊन यायचा. कितीतरी doll, car, truck, ट्रेन, मज्जा होती. डॅड कामावरून आला की पाहिलं त्याला उचलून घ्यायचा. त्याच्याशी घोडा घोडा खेळायचा. मम्माला वेळ नसेल तेव्हा मांडीवर निजवायचा. चक्क काही तरी गुणगुणायचा, मम्मा म्हणते तो तुझ्यासाठी अंगाई गायचा. Sunday ला बागेत न्यायचा.

मग आता काय झाल? मुलं मोठी झाली की आई बाबांचं प्रेम आटत का? असं का? मी तुमच्या पासून जन्मलो, माझं जे काही आहे ते तुमची genetic gift आहे. Seriously Nothing my own.

मम्मा म्हणते मी दहा वर्षांचा होईपर्यंत माझ्या प्रत्येक Birthday ला मला भेटवस्तू आणि माझ्या मित्रांना पार्टी ही ठरलेली होती. मग कधी बर्गर, कधी पिझ्झा, कधी न्युडल्स, भेळ, वडा, पावभाजी असे पदार्थ आणि प्रत्येक मित्राला एखादे गिफ्ट. डॅड हजर असला तर मुलांबरोबर गंमती करायचा, एखादे गाणे लावून नाचायचा विजय सिंगल चाईल्ड असल्याची त्याची उणीव स्वतः भरून काढायचा. अपयश एवढ वाईट असत का? मी असा का वागतो? का नाही मी अभ्यास करू शकत? का माझा हात सतत मोबाईलकडे जातो? का मला नको ते व्हिडीओ पहावेसे वाटतात? का मी व्हिडिओ गेम खेळत राहतो? मला यातून बाहेर पडलच पाहिजे, स्वतःसाठी नाही पण माझ्या डॅडसाठी. आज मी त्याला उलट बोललो. त्याला किती हर्ट झालं असेल? त्यांनी जे काही केल ते माझ्यासाठीच होतं. कधी कधी आपण फारच वाईट वागतो.

कोणत्या आई बापाला आपला मुलगा कमी शिकला आहे सांगायला आवडेल? Hell with me,I have no right to live, I must die. रागाच्या भरात त्यांनी मम्माची ओढणी घेऊन पंख्याला बांधली, स्टुलवर उभं रहात गळ्याभोवती फास करून मान त्यात अडकवली श्वास घेतला आणि स्वतःला स्टुलखाली लोटलं. स्टूलवरून खाली लटकताच घसा दाबला गेला, जीभ बाहेर ओढली जातेय की काय वाटू लागले. श्वास अडखळू लागला, बुबुळे डोळ्यांच्या बाहेर येत आहेत अस वाटू लागलं, तो जीवाच्या आकांताने तो ओरडला.”मम्माsss, मम्माsss , मला वाचव, मम्मा मला जगायचंय. मम्माsss ” त्याच्या वजनाने ओढणीचा फास ओढला गेला तसं, त्यानंतर त्याला बोलताही येईना.

हॉलमधला आवाज आणि घुसमट अस्पष्ट ऐकूनही साधना धावत हॉलमध्ये आली. तो प्रकार पाहून ती हादरली तरी तिने धीराने स्टूल त्याच्या पायाखाली सरकवले.दुसरी खुर्ची घेऊन ती वर चढली आणि तिने पंख्याची गाठ पूर्ण जोर लावून सोडवली. तो झपकन तिच्या अंगावर सरकला. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. दोघही खाली पडणार होती. तिने स्वतःला सावरलं. त्याला कसाबसा खाली घेतला.

त्याच्या घशातून चित्र विचित्र आवाज येत होते. जीभ बाहेर येते की काय अशी स्थिती होती. तिने त्याला जमिनीवर झोपवला. पदराने वारा घातला. अजूनही तो सावध झाला नव्हता. तिने त्याच्या छातीवर जोरा जोराने दाबले. त्याचे हात पाय चोळले. टेबलवर पाण्याच्या जग ठेवला होता. त्यातलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर मारले. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. हात पालथा धरत तिने नाकाकडे नेला. श्वास सुरू होता. तिच्या हाताला कंप सुटला होता. जोराने टाहो फोडावा अस तिला वाटू लागलं. हा प्रकार पाहून विलासचं काही झालं तर? तिच्या मनात आलं. तिने पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. पुन्हा त्याची छाती चोळली. त्याच्या नाकाजवळ तोंड नेत हवा blow केली. त्याचे डोळे थोडे हलले. तिच्या जीवात जीव आला. पण जे काही अनपेक्षित घडलं त्याची त्याला कल्पना नव्हती. अद्यापही तो बोलू शकत नव्हता. तिने हातानेच गप्प राहण्याची खूण केली.

जवळ जवळ अर्ध्या तासाने तो सावरला तस तिने दोन घोट पाणी पाजले, तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वहात होते, तिने पंख्यावरून ओढणी काढली. त्याला हळू आवाजात म्हणाली, “मला सोडून जात होतास? तुझी मम्मा कशी जगेल याचा विचार केला होतास? तुझ्या डॅडला काही कळता उपयोगी नाही, जीव देण्यापेक्षा डॅडचा जिवाभावाचा मित्र हो त्याला समजून घे.” “मम्मा, प्लिज कोणाला काही सांगू नको, नाही ना सांगणार? मला प्रॉमिस दे, मम्मा नाही ना सांगणार? मम्मा मला मित्र हसतील, डरपोक म्हणतील.” “मित्रांच्या हसण्याची भीती वाटते ना, मग डॅड ला तुझा मुलगा काय काय करतो अस मित्र विचारतात तेव्हा डॅडला कस वाटत असेल? बेटा, तुझं नाव विजय ठेवलं तेव्हा आम्ही किती hopeful होतो आणि तू आमच्या मनाविरुद्ध वागतोस,आमची निराशा करतोस. आम्हाला रडवतोस, माझं सोड पण डॅड, स्वतःसाठी काहीही न घेता तुला त्यांनी शक्य ते सर्व दिलं त्याची ही अशी परतफेड. नाही विजय तू माझा मुलगा शोभत नाहीस.” “मम्मा प्लिज समजून घे, मी आता चांगला वागेन, डॅड ला बरं वाटेल अस वागेन,डॅड म्हणेल ते करीन, मम्मा प्लिज डॅड ला काही सांगू नको,माझी शपथ आहे.”

तिने त्याला थोपटून शांत केल,तो तिच्या मांडीवर झोपी गेला. ती त्याच्या म्लान चेहऱ्याकडे पहात होती. काय हे स्वतःच करून घेतलं? कोणत्या जन्माचं पाप आम्ही फेडतोय न जाणे? तिला आठवलं. त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टींचं विलास कौतुक करायचा. बरेचदा तोच संध्याकाळी त्याला भरवायचा. ती घरातलं आवरे पर्यंत तो त्याला मांडीवर घालून झोपवायचा. सातवी पर्यंत विजय त्याच्या वर्गात पहिल्या पाच विद्यार्थ्यांत नेहमी असायचा. पण विजयचा परफॉर्मन्स आठवी नंतर घसरू लागला, काही विषयात जेमतेम गुण मिळू लागले आणि विलास गांगरला.

या पूर्वी पेरेंट मिटींगला साधना जायची पण त्याचा परफॉर्मन्स घसरला तस ती शाळेत जाणं टाळू लागली. विलासला मिटिंग अटेंड करण्याची गळ घालू लागली. विजयवर अभ्यासावरून डाफरु लागली. विजय पहात होता की मम्मा पहिल्यासारखी आनंदी दिसत नव्हती. डॅड पेरेंट मिटींगला येत होता. त्याच्याशी फारस काही बोलत नव्हता. त्याच्याशी फटकून वागू लागला. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याला दोघेही बोलू लागले.

एक दोन वेळा त्याच्या समोरच डॅडला टीचर रागावले, “मि. सावंत, विजय तुमचा एकुलता एक मुलगा, आम्ही वर्गातल्या साठ मुलांकडे लक्ष देतो तुम्हाला तुमच्या एका मुलाचा अभ्यास घेता येत नाही ? तुम्हाला अभ्यास घ्यायला वेळ नसेल तर एखाद्या चांगल्या क्लासला का नाही घालत? हल्ली त्याचं वर्गात अजिबात लक्ष नसतं. सारखं मुलींच्या बाकाकडे पाहात बसतो.इतर मुलांना डिस्टर्ब करतो. त्याच्या वर्तनात सुधारणा नाही झाली तर आम्हाला नाईलाजाने नाव काढून टाकावे लागेल.”

“डॅडचा एवढा अपमान आजवर कोणी केला नसेल. माझ्यमुळे त्याला सगळं ऐकावं लागलं. मी त्याच्या सोबत निमूट चालत होतो. डॅडचा राग अनावर झाला होता. आता घरी गेल्यावर काय घडेल त्याची कल्पना मला आली होती. घरी गेल्यावर चप्पल काढताच मला मारू लागला. पट्टी तुटली तरी डॅड चा राग कमी झाला नव्हता.मम्मा ने त्याच्या हातून कसाबसा मला सोडवला, त्याचा प्रसाद तिलाही मिळाला.”

“साधना, साल्याच अन्न पाणी बंद कर,नुसत गिळतो,आज पासून हा कुठंही बाहेर खेळायला जाणार नाही.कसा पास होत नाही? तेच बघतो. दीड दमडीचा मास्तर त्याने चार चौघात माझा अपमान केला.” डॅड ओरडला. मम्मा त्याच्या अवताराकडे पहातच राहिली.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar