टक्क्यांचा दावा सोडला

टक्क्यांचा दावा सोडला

आरक्षण विषयावर पिएचडी करून मी टक्क्याचा दावा सोडला
संविधानाचे पारायण करूनही मी आंबेडकरवाद मनातच कोंडला

जखमा चाटून पुन्हा ताज्या ठेवण्यात, काहींचे स्वारस्य होते दडले
सांगा, ज्यांनी बुध्द घेतलाच नाही त्यांचे संसारात काय कुठे अडले?

स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी कुठवर घ्यावा आरक्षणाचा आधार?
सोडून द्या कुबड्या मनातील, करून कष्ट, द्या तुमच्या कौशल्याला धार

अन्याय झालाय, ‘अन्याय’, म्हणत, कुठवर जागवणार मनातील अंधार?
शिक्षण नोकरीसाठीच हवे, ही चूक नको, आधी ठोठवा ज्ञानासाठी दार

ऐवढे वर्षे बुद्धी असुनही कळलाच नव्हता साहेबांच्या मनाचा विचार
स्वतःचे हित जपण्यापलिकडे कुणी केलाच नाही का मनावर संस्कार

कुणीतरी मजवर अन्याय केलाय, हिच सतत दिली तुम्हाला शिकवण
दारिद्रय, विषमता, शैक्षणिक वंचना याचेच मनावर ओढले नित्य व्रण

अधुनमधून कुणीतरी चिथावणी देत, चिघळवत ठेवतो तुमची जखम
राजकारण मला कळतही नाही ‘जय भीम’ शब्दाने निबर झालय मन

कार्ल मार्क्स, एंगल्स, रूसो यांच वाचन करुन मिळवलं मी विचार धन
पुर्वी सोशालिस्ट,कम्युनिस्ट या शब्दांतच अडकलं होत पूर्ण जीवन

कोणीही उकसवलं तरी आता ‘भिमाचं’ सांगणं माझ्या आलय ध्यानी
शिक्षण, बुध्दी, कष्ट आणि समतेचा विचार, हिच हत्यारं येतील कामी

अंधकार मनातील हटवायला, नकोच संताप आणि दुहीच्या मशाली
संभ्रम दूर झालाय माझा, मेहनतीने उच्च शिक्षण, कोरेन यश भाळी

शिकेन, नितीच्या मार्गाने राष्ट्रासाठी काही करेन, तेव्हाच शांती मिळेल
आरक्षणाविना प्रगती, मित्राना सत्य कळेल, साहेबांचा चेहरा फुलेल

मित्रांनो प्रत्येक गोष्ट हट्ट करून मागायची सवय आता सोडावी लागेल
तुमची नजर थोडी बदलली तर ग्लास तुम्हालाही अर्धा भरलेला दिसेल

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar