दिवाळी आली, दिवाळी आली
“दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा’, ही बालभारती मधील कविता आठवत असेल. आज वसु बारस म्हणून सहज आठवण झाली. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा निसर्गाच्या विविध रूपांशी आणि संस्कारांशी जोडलेला आहे. तुम्ही कोणताही सण आठवून पहा त्या सणाचे नाते हे वृक्ष, प्राणी,पिके ऋतू या प्रत्येक गोष्टींशी जोडले आहे. आमच्या घरी गाई,म्हशी आणि वासरे होती.या दिवशी गाईचा गोठा लख्ख करून आई रांगोळी काढत असे. संध्याकाळी गाईची पूजा करुन सवाष्णीची ओटी भरतात तशी तीची ओटी भरत असे.
आज आमच्या सफाळ्याच्या घरी गोठाही नाही आणि आईही पण प्रत्येक सणावाराला या आठवणी उचंबळून येतात. आज माझी ताई या जगात नाही. भाऊबीज आली की तीचीही आठवण येते पण पोटभर रडताही येत नाही जणू डोळ्यातील अश्रूच आटून गेले असावेत. दोन भाऊही काळाच्या पडद्याआड गेले. हे दुःख उरी वागवत, ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत पूढील पिढीसाठी आपल्याला हसावे लागते. सण आले की एका डोळ्यात हासू आणि एका डोळ्यात आठवणींचा उमाळा. यालाच तर जीवन म्हणतात. पण या आठवणींना वेगळाच गंध असतो प्रेमाचा, मायेचा आपुलकीचा, स्नेहाचा तो जपण्यासाठी या आठवणीच मदत करतात. पाहाता, पाहता साठी ओलांडून पूढे गेलो. लहानपणीच्या गावातील आठवणी अधूनमधून मनाचा ताबा घेतात.ते दिवस आठवले की थोड बैचेन व्हायला होत. गेले ते दिन गेले अस वाटू लागत. शहरातील गच्च वस्तीत आणि गजबजाटात जीव कासावीस होतो. मुळापासून तुटलेल्या वृक्षासारखी अवस्था कित्येकांची असते. सुदैवाने सय आली की मी या गजबजाटापासून दूर सफाळा किंवा मालवणला निघून जातो पण पून्हा या नव्या घरट्यात परतावेच लागते. दिवाळीत मुंबई जशी नटते ते पाहून हेवा वाटतो, पण सुशिक्षित असुनही सणाचे निमित्त साधून जे फटाके फोडले जातात त्याच्या आवाजाने आणि विविध रासायनिक पदार्थांच्या वासाने या दिवसात शहरात थांबणे नको से वाटते.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे वाचले, ऐकले आणि लहानपणी गुणगणले आहे. खरंच सांगतो, अज्ञानात सूख असते हे पदोपदी जाणवतं. आता जी साठी पार केलेली पिढी आहे ती म्हटल तर फार नशीबवान आणि आताशी तुलना केली तर कर्म दरीद्री पिढी आहे. या पिढीने दुधात कालवलेलं आवळ्यांच्या बियांच उटणं आई किंवा ताईच्या हाताने पाटावर बसून लावून घेऊन उन्ह, कडक पाण्याने घराबाहेर दगडी फाथरीवर बसून अभ्यंगस्नान केलेल आहे. दिवाळीत थंडी अनुभवली आहे. पायाच्या अंगठ्याने कडू चिराट फोडतांना गोविंदा, गोविंदा अशी आरोळी न लाजता मारलेली आहे. ‘लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती है वहा’ हे ऐकलं आणि अनुभवलं आहे. लवंगी फटाक्यांची माळ सोडवून एक एक फटका फोडण्यात धन्यता मानली आहे. फुलबाजा पेटवून त्याची तार पाठून वळवून तो फुलबाजा झाडावर लटकत पेंटताना उड्या मारून आनंद अनुभवला आहे. फटाक्यांचे कारंजे, भुईचक्र पेटतानाची मजा अनुभवली आहे. अंगणात भली मोठी ठिपक्यांची रांगोळी काढताना आई किंवा ताईची एकाग्रता पाहिली आहे. पहाटेच्या थंडीत, अनवाणी गावात फेरफटका मारून कोण कोण उठलं पाहण्यात धन्यता मानली आहे.
आता फॉरचून, स्वीटी किंवा अजूनही कोणत्या तेलाच्या पिशव्या बाजारात येतात. अगदी तूपही प्लास्टिक पिशवी किंवा डब्यातून येते. तेव्हा सणावाराला लोक वनस्पती तेल किंवा डालडा वापरत. या डालड्याचा गोल डबा येत असे. अर्थात तेव्हाही अतिसधन घरात तूप होते पण ते घरचे. बाजारात तूप मिळत होते की नव्हते आठवत नाही. पण तेव्हा डालड्यात तळलेल्या खुसखुशीत करंज्या करतांना देवाजवळ ठेवलेली पहिली करंजी किंवा कुरकुरीत चकलीची चव चाखली आहे. आईच्या बाजूला बसून करंजीच्या पातीत सारण भरण्याचा अनुभव घेतला आहे.
शंकरपाळे करतांना पिठ चांगले मळून देण्याचं किंवा पाट्यावर वरवंट्याने झेजरून मऊसुत करण्याच काम केलं आहे. पतंगाच्या आकाराच्या शंकरपाळे व्हावे म्हणून तिरक्या रेघा चिरण्याने मारतांना त्या सरळ आल्या नाहीत म्हणून बोलणी खाल्ली आहेत. टम्म फुगलेली करंजी किंवा शंकरपाळे कसे दिसते ते गाव फुगवून दाखवले की आई गालातल्या गालात कशी हसते ते पाहिले आहे. पिठ चांगले मळले आणि थोडावेळ तसेच ठेवले की शंकरपाळे खुसखुशीत होते हे आईचे शब्द अजूनही आठवतात. आता याच टीप युट्युबवर केदार मॅडम देऊन बक्कळ पैसा कमवत आहेत. अर्थात नवीन संसार मांडणाऱ्या मुलींना या युट्यूबर अनमोल मार्गदर्शन करतात यात काही वादच नाही.
चकली तळतांना तेलातून येणारे बुडबुडे किती कमी झाले की ती परतावी याचे प्रात्यक्षिक घेतले आहे. कडबोळी हा पदार्थ केव्हा बनतो ते पाहिले आहे. अनारसे खायला चांगले लागले तरी त्याचा खटाटोप किती मोठा असतो ते ही पाहिलं आहे. फराळ भरण्यासाठी पत्र्याचे चौकोनी डबे उन्हात वाळवतांना पाहिलं आहे.या डब्याच्या तळाशी पेपर ठेऊन फराळ सुबकपणे भरण्याच तंत्र पाहिलं आहे.
नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी आठ वाजता एकत्र बसून दिवाळीचा फराळ आणि प्रत्येक पदार्थांची चव यावर खाताखाता चर्चा केली आहे. फराळ शेजारच्या गोरगरीब लोकांना वाटून मगच खायचा हा संस्कार आईकडून घेतला आहे. नातेवाईकांना फराळाचा डबा त्यातील चकली, करंजी न तुटता पोचवण्याची कसरत केली आहे. ताईला आठ आणे किंवा एक रूपया भाऊबीज घालताना कसे वाटते आणि ती ओवाळत असतांना निरंजना सोबत मान डोलवतांना मनात कोणत्या भावना असतात ते समजून घेतले आहे.
फार मजा होती. नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री आई रागावे, लवकर झोपा रे, सकाळी पहाटेस उठायचे आहे. त्या रात्री लवकर जाग येत असे. आई घराबाहेर चुल पेटवून त्यावर पाण्याचे मोठे भांडे पाणी तापवण्यासाठी ठेवत असे. आमची अथंरूणावर चुळबूळ सुरू असे. ती कधी, “उठा रे” म्हणते याची वाट न पहताच आम्ही उठून चुली भोवती बसून मशेरी लावत असू. मग वडिलांची आंघोळ झाली की आमचा एकएकाचा नंबर. तेव्हा अभ्यंगस्नान वगेरे कठीण शब्द फक्त पुस्तकात किंवा लिखाणात असत. घरभर चुलीतील वास भरून राही. मग तुळशीच्या समोर चिरोटे फोडून नरकासुराचा वध करत असू. चिरोटे तोंडात घातले की त्याची कडू चव लवकर जात नसे. गोविंदा आरोळी मारली की नंतर, देव आणि आईबाबांच्या पाया पडून फटाके फोडायला मोकळे.काही फटाके नीट पेटत नसत, फक्त वात पेटून जाई अशा फटाक्यांची आम्ही सुरसुरी करत असू. फटाक्यांमधून बाहेर पडणारे विविध रंग पाहून आनंद होई. दर दिवाळीला नवीन कपडे नसायचे पण नाराजीचा सुर नव्हता. आहे त्यात गोड मानुन घेण्याची सवय घरातून लागली होती.
फराळ मात्र ताटभर असायचा, तिखट पोहे, गोड पोहे, दही पोहे असे तीन प्रकार असायचे. याशिवाय गुळाच्या करंज्या, चकली, शंकरपाळे, लाडू, तिखट शेव. थोडे थोडे घेतले तरी पोटभर व्हायचे. मग आजुबाजूच्या चार घरात फराळ पोचवण्याचं काम असे. त्यातील पदार्थ तुटू नये म्हणून आई चार चार वेळा सांगून पाठवे.
आज शहरात रहायला आल्यानंतर सगळ सिमित झालं आहे. अमुक बाय तमुक एरियाच्या घरात राहणाऱ्या शहरातील लोकांना, नाक्ष घराबाहेरील पाथरीवरचे अभ्यंगस्नान, ना घराबाहेर लाल मातीची शेणाने सारवलेली ओटी, ना अंगणातील आकाशकंदील ना तुळशी वृंदावन. ना एकत्र फटाके फोडण्याची मौज. आता रेडिमेडचा जमाना आहे. टिपके काढण्यासाठी ब्लॉक समोर जागा तर हवी, तरीही छोटी का होईना अजूनही रांगोळी काढली जाते. रंग भरले जातात, व्हाट्सएपच्या व्दारे ती रांगोळी सर्वत्र फिरते, लाईक मिळतात. फराळाचे,नवीन कपड्यांचे,दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या फराळाचे सेल्फी फोटो सर्वत्र फिरतात लाईक जमवत. आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपली स्टाईल. आज देशपांडे, काळे इत्यादी नामवंताचे दिवाळी पहाट लाईव्ह कार्यक्रम ठिकठिकाणी होतात. पाच हजार ते एक हजार रूपये देऊन त्यांचे चाहते तो कार्यक्रम याची देही याची डोळा पाहतात आणि आनंदाची पेटी भरून तो कार्यक्रम पाहिल्याचा व्हाट्सएप आपल्या ग्रुपमध्ये फिरवतात. आनंद शोधण्याची आणि समाधान मानण्याची रीत बदलली आहे.
आनंद किंवा सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्याकडे अनेक कारण असतात काही खाजगी तर काही सार्वजनिक. दिवाळी, मग ती श्रीमंताची असो की गरीबाची आकाश कंदिल दोनशे रूपयांचा की दोन हजारांचा असो त्या मागील तम हटवण्याची नितांत सुंदर भावना आणि आनंदाचे परिमाण एकच. फराळ रेडिमेड आणलेला असो की घरात खूप सारे कष्ट करून केलेला. घरातील मुले, मोठे आणि वृद्ध यांच्या चेहऱ्यावर हा फराळ खातांना दिसणारे फुलणारे चेहरे आणि समाधान महत्त्वाचे.
अर्थात चाळीस रुपयाला एक करंजी, पंचवीस रुपयाला एक बेसन लाडू, वीस रुपयाला एक चकली, तीस रुपयाला एक अनारसा, किंवा तीनशे रुपये किलो शंकरपाळे आणून काय खाणार? विकत आणलेले पदार्थ, बचकाभर शंकरपाळे आणि दोन तीन बेसन लाडू किंवा मूठभर चिवडा एकाच वेळेस हादडताना संकोच वाटेलच ना? विकतचे पदार्थ शेजारी देतांना किती रुपये लागले याचा विचार मनात येईल की नाही? अर्थात हे सगळ्यांच तसंच असेल असं मी म्हणणार नाही. आता मॉलमध्ये गेलं की एकावर एक फ्री अस काहीही मिळतं, न जाणो फराळही मिळत असावा.
जोपर्यंत फराळ बनवण्यात आनंद मिळत असेल या वयातच बनवा, नंतर तुमच्या शरीराचं आणि साधनांचा ताळमेळ जमणार नाही. गॅस समोर एकाग्रतेने उभे राहणे, तळताना येणारा वास किंवा धूर सहन करणे भविष्यात जमेल असेच नाही. तुमच्या नातवंडांना सांगण्यासाठी काही शिदोरी हवी की नको. म्हणून कितीही पगाराची नोकरी, कितीही महत्वाची कामे, कितीही व्यस्त वेळापत्रक असू दे, वेळ काढला तर अशक्य काही नाही. ती प्रार्थना आहे ना, ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी.’ ती तुम्हाला उद्देशून आहे. हे स्वामी म्हणजे तुमचा स्वतःवरील विश्वास. तुम्ही स्वतः!
आजकाल दिवाळी सणात अडकण्यापेक्षा लोक टूरवर जाण पसंत करतात. शहरापासून दूर एकांतात मग भारतात असेल किंवा बाहेर पण नेहमीच्या वातावरणापासून दूर. जिथे शांतता अनुभवता येईल, जिथे स्वतःशी मुक्त संवाद साधता येईल, स्वतःला शोधता येईल, स्वतःच्या भावनांना न्याय देता येईल. मनातली पणती पेटवून तिच्या प्रकाशात मनातला अंधार दूर सारता येईल. दिवाळी शहरात साजरी करायची की जन्म घरी, गावी साजरी करायची की मग या शहरापासून दूर निर्णय तुमचाच असेल. पण या चारसहा दिवसात तुमची बॅटरी फुल चार्ज करून घ्या. म्हणजे पुढील दिवसातील अवघड वाटा,वळणावर गाडी न थांबता मार्गक्रमण करु शकेल.
‘दिवाळी आली दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली.’ जाहिरात पहिली असेल. त्यातील बाबा आपल्या मुलाला संस्कार आणि परंपरेची आठवण करून देतो आणि आजोबा खूश होतात. अगदी तसेच तुमच्या चिमण्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाके, फराळ, कपडे यापेक्षा तुमच्या मुलाला कशाची गरज असेल तर ती तुमच्या सान्निध्याची पण ती ही मोबाईल विरहित. आहे कबूल? पहा तुम्हालाही तुमचे बालपण आठवेल आणि आठवतील आईबाबा. आठवेल दादा आणि ताई, आठवतील तुमचे सवंगडी आणि आठवेल प्रसंग जेव्हा तुमचा हात धरून शरीरापासून दूर धरत फुलबाजा कसा पेटवायचा हे बाबांनी दाखवलं होतं.आठवेल आई जिने तुम्हाला रांगोळीची ओटी शेण आणि लाल मातीने सारवून ठिपके काढायला शिकवलं होतं. ह्या आठवणींना उजाळा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही बाळ गोपाळ होऊन मुलाला तुमचा वेळ द्याल. त्यासाठी वेळ वाया घालवू नका. आजची दिवाळी थोडी हटके.
तेव्हा दिवाळी दिवसातील आनंद आणि गत कालीन आठवणी लुटण्यासाठी सज्ज व्हा. दिवाळी दारात उभी आहे. तिला सन्मानाने घरात घ्या. तिचं औक्षण करून हसतमुख स्वागत करा. तुमच्या घरातील आणि मनातील जळमटे दूर पळतील. तिखट गोड पदार्थ, रांगोळीचे रंग आणि प्रदूषण कमी करणारे फटाके यांच्या आनंदात तुमच्या मनातील रंग उजळून येतील आणि म्हणाल, दिवाळी आली, दिवाळी आली.