दैव योग ना कधी कुणा कळला
खरंच चार पाच दिवसांपूर्वी काय घडलं त्याचा अर्थ लावता येत नाही. वार शनिवार दि.२२फेब्रुवारी ,वेळ साधारण रात्रीचे पावणे अकरा, नुकताच जेवण आटोपून शतपावली घालण्यासाठी बाहेर निघत होतो इतक्यात मोबाईल वाजला. एवढ्या उशिरा कोणी फोन करण्याच काही कारण नव्हते, कदाचित एखाद्या कंपनीचा फोन असावा म्हणून खर तर इग्नोर करणार होतो. तरीही मी फोन घेतला, माझ्या सफाळा येथील मित्राचा फोन पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली, “अरे! इतक्या उशीरा फोन, काय रे?” ,मी पुढे बोलण्या अगोदच तो म्हणाला, “अरे यतीन वारला, मला माईचा फोन आला होता.” मला तो संदर्भ काही लागला नाही. तस मी विचारले,” अरे कोण यतीन?” तसं तो म्हणाला, ” अरे, माई बरोबरच होता बघ, तो वारला.”
मग माझी ट्यूब थोडी पेटली, या वर्षी वैष्णोदेवीला जातांना माईंबरोबर साधारण साठपासष्ट वर्षांची एक व्यक्ती होती. ती व्यक्ती माईंची सर्व व्यवस्था पहात होती. आमच्या माई, म्हणजे जयंतीमाई चुरी, ज्या मुंबई वैष्णोदेवी मंडळाच्या एक कार्यकर्त्या गेले चाळीस वर्षे मुंबई मधील मध्यमवर्गीय कुटुंबाना वैष्णोदेवी दर्शन घडवत आहेत. आज त्या ८०+ असूनही, उत्साहाने दर वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई मंडळाच्या वैष्णोदेवी यात्रेच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलतात. तर यतीन ही व्यक्ती म्हणजे माईंची प्रवासातील ‘काठी’. वाढत्या वयामुळे माईंना सोबत एक सहकारी लागतो. गेले कैक वर्षे यतीन पदके प्रवासात माईंची काळजी घेत होता. मी खरेतर दुसऱ्यांदा माईंबरोबर वैष्णोदेवीला जात होतो पण जे अनेक वर्षे मांईसोबत जात होते त्यात इतवारही होता. त्यांनीच हे मला सांगितले.
या वर्षीही डिसेंबरमध्ये मी वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलो तेव्हा तो माईंच्या सोबत होताच. माईंना प्रवासात किंवा कटरा येथे वैष्णोदेवी दर्शनाला जातांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यतीन त्यांच्या सोबत सावलीसारखा असायचा. काही हवं नको असेल तर माईंनी त्याला सांगावं आणि त्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्यांचं म्हणणं ऐकावं इतक छान ट्युनिंग त्यांच्यात होतं.
मित्राचा फोन येऊन जात नाही तो थोड्याच वेळाने माईंचा फोन आला होता पण फोन सायलेंट मोडवर ठेऊन मी झोपलो असल्याने मला समजल नाही. सकाळी मी मेसेज वाचला आणि त्यांना फोन केला. त्या म्हणाल्या यतीनला काल संध्याकाळी heart attack आला त्यात तो वारला. मी विचारले,” ते कुठे राहतात?” त्यांनी मला सांगितलं, “पलावा, डोंबिवलीत, मी तुला ऍड्रेस पाठवते.”
थोड्या वेळातच मला त्यांचं पूर्ण नाव आणि गुगल मॅप त्यांनी पाठवला. त्या प्रवासात होत्या त्यामुळे नेटवर्क अभावी फारसे बोलणे झाले नाही. मी तेथे गेलो, मी पोचता, पोचताच माई त्यांच्या गाडीने चिंचण म्हणजे वाणगाव, जिल्हा पालघर, येथून आल्या. त्यांचे वैष्णोदेवी मंडळाचे दोन निष्ठावंत कार्यकर्ते अश्विन आणि खन्ना तेथे अगोदरच हजर होते. त्यांनी माईंना सावकाश गाडीतून बाहेर उतरूवून घेतले. अश्विन हे सुध्दा वैष्णोदेवी भक्त आणि माईंचे जवळचे सहकारी. माई आणि अश्विनी यांचे वडील एका मोठ्या फर्ममध्ये एकत्र काम करायचे. त्यामुळे अश्विन त्यांना लहान मुलाप्रमाणे होता. आम्ही लिफ्टने यतीन पदके यांच्या माळ्यावर पोचलो.
माईंनी त्यांच्या दारात पाय ठेवल्या ठेवल्या त्यांना समोरच यतीनचे शव जमीनीवर ठेवलेले दिसले तसा त्यांनी हंबरडा फोडला,” यतीन उठss s , यतीन उठ sss तुझी माई आल्याय बघ तुझ्या घरी, बाळा उठss ,उठ ना रे!” वृद्ध असल्या तरी त्यांचा दमदार आवाज घरात घुमत राहिला. त्या ओक्साबोक्शी रडत होत्या. घरातील इतर अपरिचित व्यक्ती ही कोण त्यांची म्हणून माईकडे पहात होते. माईंची लहान बहिण, अरूणाही रडत होती.
यतीनच्या बहिणीने त्यांना खुर्चीत बसवलं. घरातील माहोल अतीशय कुंद होता. यतीनच्या शवावर,विशेषतः तोंडावर पूर्ण पट्टी बांधली होती त्यामुळे चेहरा पूर्ण झाकला गेला होता. माईंना त्याच्या जवळ बसायची इच्छा होती पण गुडघ्याचं दुखणं आणि स्थूल शरीरामुळे जमिनीवर बसताच येत नव्हते. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. यतीनच्या बहिणीला घट्ट मिठी मारून त्या रडत होत्या. थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने कालची घटना सांगितली. काल त्यांची पत्नी बीपीच्या गोळ्या घेण्याविषयी त्यांना सांगत होत्या पण नंतर घेईन म्हणत त्यांनी त्या टाळल्या. गेले काही दिवस ते औषधे घ्यायला कंटाळा करत होते. त्यामुळे त्यांचा बीपी वाढला की नक्की काय झाले कळेना, कालच्या बारा तासात यतीनच्या पत्नीच जीवन उध्वस्त करणारी घटना घडून त्यांना पोरक करून गेली होती. पूढे काय हा प्रश्न होताच कारण मुलं नसली तरी तेव्हा त्याची सोबत होती.
काल यतीन पदके आपले शेजारी हरविंदर आणि त्यांचा मुलगा यांच्या सोबत डीवायपाटील स्टेडियम येथे सिनिअर क्रिकेटपटूचा सामना पाहण्यासाठी त्यांच्या गाडीने गेले होते. तद्पूर्वी ते सकाळी डोंबिवली डी मार्ट येथे खरेदीसाठी गेले होते. हरविंदर सांगत होता, “अंकल एकदम जाँली मुडवाला था, मेरे बच्चे के साथ हसी मजाक चलती थी। ” अर्थात त्यांना मुलबाळ नसल्याचे शल्य नक्कीच असावे पण ते कुठे व्यक्त होत नसावेत. परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले असावे. त्यांच्या सौभाग्यवती तबला वादन शिकवतात, त्यांनीही आपला वेळ चांगला जावा यासाठी मन गुंतवून घेतल असावं. घरातील मांडणीवरून त्या दोघांना सौंदर्याची आवड असलेली लक्षात येत होती.
सामन्याला भरपूर गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून यतीन यांनी हरविंदर यांना आपण लवकर निघू म्हणून सांगितले होते, खर तर संध्याकाळी ७.३० ची मॅच त्यामुळे खूप लवकर निघण्याची गरज नव्हती पण क्रिकेट जर्सी घ्यायची म्हणून ते साडेचार ,पाचच्या दरम्यान निघाले. गाडी पार्किंग करून ते दहा मिनिटे चालत स्टेडियम जवळ आले तेव्हा त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तर हरविंदरला ते म्हणाले, बेटा मुझे अनईजी लग रहा है। त्याने पाण्याची बाटली घेऊन थोडे पाणी प्यायला दिले. तरीही त्यांची अस्वस्थता कमी होईना, तसे ते त्याला म्हणाले, “बेटा मै घर जाता हू।” हरविंदर त्यांना म्हणाला, अंकल मै रीक्षा मंगाता हू, आप अकेले जा सकते है ? या फीर मै आऊ। हरविंदर बरोबर त्याची लहान मुलं मुद्दाम क्रिकेट सामना पहायला आली होती, सचिनसह सगळे सेलिब्रिटी क्रिकेटपटू येणार होते, मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून यतीन म्हणाले. “तुम रिक्षा बुला लो मै घर जाता हू। “
हरविंदरने ओला बुक केली, रिक्षावाल्याला त्यांनी, रिक्षा हळूहळू ने असही बजावून सांगितले. सात वाजले होते, आता मॅच सुरू व्हायला थोडाच वेळ होता म्हणून तो आणि त्याचा मुलगा, अर्श, गेट नंबर दहाने आत पोचले. तो त्याच्या सिटवर बसला इतक्यात फोन वाजला, एवढ्या कोलाहलात फोन ऐकू येण शक्य नव्हते तरीही त्याने, कौन बोल रहे हो ? विचारलं आणि तो परिचित नंबर नाही पाहून राँग नंबर म्हणून ठेवणारच होता, तो पर्यंत तो मोबाईलवाला म्हणाला, “दादा मै रीक्षावाला बोल रहा हू। अभी आपने अंकल को रीक्षा मे बीठाया था ना उनको उल्टी हो गयी। ” ते अस्पष्ट कानावर पडताच तो एका कोपऱ्यात गेला आणि त्याने पुन्हा विचारले, तेव्हा त्याला काय झाले ते कळले. तो रीक्षावाल्याला म्हणाला,”यार थोडा पानी पिला दे और नजदिक कोई अस्पताल है तो लेके जा, मै आता हू। “
तो फोन कट करून आपल्या मुलांना घडलेला प्रसंग सांगायला जात होता तोच रीक्षावाल्याचा पुन्हा फोन आला, “दादा ओ बेहोष हो गये है। उनका मुँह खुल गया है और आँखे खुली है, देखता हू नजदिक किसी अस्पताल लेके जाता हू प्लीज आप जल्दी आ जाई ऐ, मुझे डर लग रहा है।
हरविंदर याच्या घडला प्रकार लक्षात आला, त्यांनी मुलांला सांगितले की “अंकल जादा बिमार है, मै निकलता हू। तुम लोग बाद मे आ जाना.” पण मुलांना यतीन आजोबांचा लळा होता कारण यतीन यांना मुलबाळ नव्हते या कुटुंबाबरोबर आणि अर्थातच लहान मुलांच्या बरोबर गेले अकरा वर्षे ते रहात होते. करोना काळात हरविंदर याला करोना झाला होता तेव्हा त्यांचा अर्श हा मुलगा महिनाभर त्यांच्याच घरात राहिला होता. तो म्हणाला,” नही डँड मुझे नही मॅच देखना हम दादा को देखने जायेंगे।”
एव्हाना स्टेडियम पूर्ण भरला होता,परतण मुश्कील होतं. हरविंदरने सिक्युरिटीना घडला प्रकार सांगितला तस त्यांनी इमर्जन्सी गेटने त्यांना बाहेर सोडले. ते आपल्या गाडीकडे पोचले तोच त्याच रीक्षावाल्याचा पुन्हा फोन आला, दादा मै अस्पताल हू। डॉक्टर आपसे बात करना चाहते है। हरविंदर म्हणाला, “अंकल अब ठिक तो है ना?” तोपर्यंत डॉक्टरांनीच मोबाईल घेतला, त्यांनी हरविंदरला, तो त्यांचा कोण लागतो? विचारल आणि काय घडलं ते ही विचारले. हरविंदरने यतीन अंकलचा सकाळपासूनचा घटना क्रम सांगितला सकाळी ते D mart येथे खरेदीला गेले होते. त्यानंतर दुपारी रेस्ट घेऊन ते मॅच पाहायला डी वाय पाटील येथे सहा साडेसहाला पोचले. ते ऐकून डॉक्टर हरविंदरला म्हणाले,” He is ten minutes late, दस मिनिटं पहले ही उनको अँटँक आया था । अगर थोडे पहले पोहुचते तो बच भी जाते थे। Sorry, you please come with their relatives here and take his body. ” ते ऐकून हरविंदरच्या पायाखालची जमीन सरकली. दहा बारा वर्षांचा एका माळ्यावरचा सहवास होता. हरविंदर विचार करत होता, ज्याला मी अंकल संबोधतो त्या माणसाबरोबर मी सकाळी D’Mart मध्ये खरेदीसाठी जातो काय आणि त्याला घेऊन पुन्हा मॅच पाहायला गाडीने डी वाय पाटील स्टेडियमवर येतो काय? आणि अर्ध्या तासात तो हे जग सोडून निघून जातो काय? सगळं अतर्क्य! आता त्यांच्या पत्नीला, आंटीला सांगायचं काय? कसं सांगणार? अंकल अब नही रहे! त्या विश्वास ठेवतील? त्याला दरदरून घाम फुटला . कसाबसा तो हॉस्पिटलजवळ आला. त्याने आपल्या पत्नीला यतीन अंकल यांच्या घरी जायला सांगितले, तिच्या उपस्थितीत धीर एकवटून त्यांनी ती अप्रिय बातमी त्यांना सांगितली. त्या ते ऐकून क्षणभर स्तब्द झाल्या. काय बोलावे,काय विचारावे त्यांना बहुधा कळे ना? त्या मटकन खुर्चीत बसल्या. हरविंदरच्या पत्नीने त्यांना पाणी आणून दिले.
हरविंदर याची पत्नी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी हरविंदरच्या पत्नीकडे स्वतः चा मोबाईल दिला आणि हरविंदरच्या पत्नीने त्या सांगतील तेवढ्या नातेवाईकांना पटापट फोन करून यतीन च्या अकस्मात निधनाची बातमी कळवली. थोड्या वेळात जवळचे नातेवाईक आली. तोंपर्यंत हरविंदरने यतीनच्या चुलतभावाला सोबत घेऊन डेड बाँडी घेऊन आला. यतीन रिक्षेने घरच्या मार्गावर असताना वाटेत, रीक्षेतच यतीनला अँटक आला. Attack इतका जबरदस्त होता कि रीक्षावाल्याने हाताने पंपीग करूनही काहीच फायदा झाला नाही. दुर्दैव त्याचे रीक्षावाला त्याला अगोदरच हॉस्पिटलमध्ये जाऊ म्हणत होता मात्र त्याला घर गाठायचे होते त्यामुळे वेळेत उपचार झाले नाहीत. केवळ घरी जायच्या अट्टहासापायी त्याने रीक्षेतच प्राण सोडला.
त्या रात्री उशिरा हरविंदर आणि यतीनच्या चुलत भावाने पोस्टमार्टेम झाल्यानंतर त्याचे शव घरी आणले. रीक्षेतच मृत्यू झाल्याने पोलिसांना पंचनामा करणे भाग होते. त्या रीक्षेतच उलटी झाल्याने तेथे उभे राहणेही सहन करण्यापलीकडे होते. तेथेच त्यांचा चष्मा पडला होता. पोलीसांनी त्याची नोंद घेत तो ताब्यात दिला. बिचारा रीक्षावाला, त्याला या सगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.
आम्ही यतीनच्या घरी त्यांचे अंत दर्शन घ्यायला गेलो तेव्हा त्यांच्या बिल्डिंग मधील त्याचे मित्र इतर रहीवासी तेथे जमले होते, ते आपआपल्या आठवणी सांगत होते. यतीन साठ पार होता पण खिलाडू वृत्तीचा होता. अनेक तरुणांशी गप्पा टप्पा चालायच्या, मस्करी चालायची. विशेष म्हणजे म्हणजे थट्टा मस्करी सहज चालायची. यतीन गेला हे मान्य करायला त्याचे मित्र तयार नव्हते. जे घडले ते दुर्दैवी असले तरी वास्तव होते.
काल जे घडले ते हरविंदर याच्या तोंडून ऐकतांना त्याचा दुःखी चेहरा त्याला काल अगदी अनपेक्षित आणि अचानक जो धक्का बसला त्याने तो किती हादरला असावा त्याची कल्पना येत होती. त्यापेक्षाही त्याच्या बारापंधरा वर्षे मुलांला यतीन अंकल गेल्याचा धक्का बसला असावा., अर्श, येऊन जाऊन त्यांच्या घरीच असायचा कारण त्या दोघांना मुलाची आवड होती आणि ईश्वराने त्याच्या बरोबर न्याय केलाच नव्हता.
थोड्या वेळाने डोंबिवली येथील वैकुंठ रथ आला. अश्विन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिरडी बांधली, यतीन यांचा एक चुलत भाऊ मदत करत होता. उर्वरित सर्व त्या धक्कादायक घटनेने हादरले होते. बऱ्याचदा अशा वेळेस जमलेले कवरेबावरे झालेले असतात. मात्र कोणीतरी पुढाकार घेतो आणि ते सोपस्कार पूर्ण करतो. यतीन याचे शव आणून ते फुलांनी सजवले गेले आणि अवघ्या अर्ध्या तासात अंत्यरथ मार्गस्थ झाला. पलावा वासियांचे दुर्दैव तेथे सर्व सुखसोयी आहेत मात्र अद्यापही तेथे अंत्यसंस्कार करण्याची सोय नाही. तेथील गाववाल्यांच्या वैकुंठधामात बाहेरून येथे रहायला आलेल्या रहिवाशांना कुणी देहलोकी गेला तरी प्रवेश नाही. पलावा ते डोंबिवली शिवमंदिर हे अंतर किमान पाच किलोमीटर नक्कीच असावे.
रथ मार्गस्थ झाला तसे मी माईंची भेट घेण्यासाठी गेलो. सांभाळून जा म्हणून निरोप घेत घरी परतलो पण माझ्या मनात खळबळ सुरू होती. यतीन यांची पत्नी पतीच्या निधनानंतर काही तासात सावरली होती. त्यांना पर्यायच नव्हता. घरात एवढे वर्षे त्या दोघांव्यतिरीक्त फारसे कोणी नसावे. पण माई यतीनच्या मृत्यूने दुभंगली होती. गेले ४२ वर्षे यतीन यांचा माई यांच्याशी मातृत्वाचा सबंध होता. त्यांच शव इमारतीमधून खाली नेताना त्यांचं या मानलेल्या आईच काळीज तीळ तीळ तुटत होत.
माई वाणगाव, चिंचण येथे निसर्गाच्या कुशीत रहायच्या, माईंच्या आईपासून यतीन याची तेथे ये जा होती. तो हक्काने तिथे चार दोन दिवस राहायचा. आवडीने तेथील घराची साफसफाई करायचा. तिथे तो ते घर स्वतःच, हक्काचे असावे तसा मुक्त बागडायचा. खूप आनंदी असायचा.
यतीन मोठ्या कंपनीत कामाला होता जिथे स्टील उत्पादनाची मशीनरी बनवली जाई. बरेचदा तो परदेशवारीवरच असायचा. पण जेव्हा तो भारतातील कोणत्याही राज्यात भ्रमंतीवर असेल माईंसाठी भेटवस्तु घेऊन चिंचणीत यायचा. माई ह्या त्याला स्वतःच्या आईच्या जागी होत्या. दोन वर्षांपूर्वी तो रिटायर झाला होता. त्याला वाटेल तेव्हा तो चिंचणला येऊन दोन दिवस राहून फ्रेश होऊन जायचा. माई सांगत होत्या, “दोन दिवसांपूर्वी त्याचा मी चार दिवस रहायला येतो असा फोन आला होता, मी त्याला म्हणाले,गावात नात्यात लग्न आहे,मी गडबडीत असेन, तू दोन दिवसांनी ये,काय मला दुर्बुद्धी झाली, त्याची माझी शेवटची भेट व्हायची नव्हती. आता मला चुटपुट लागून राहिली आहे,कदाचित इथे आला असता तर?”
अर्थात दैवलिखीत चुकत नाही म्हणतात. काळ आला की तो व्यक्तीला ओढून नेतो. खरे तर रीक्षावाला त्यांना म्हणाला होता, अंकल इथल्याच जवळच्या हाँस्पिटलमध्ये जाऊया, पण यतीन त्यांना म्हणाले, ‘मुझे घर पहुचा दो.” शेवटी त्यांना त्या रीक्षातच मृत्यू यायचा होता, यालाच दैवगती म्हणतात. कल्पना करा, जेव्हा जेव्हा तो रीक्षावाला कोणी भाडेकरू नसतांना उशीरा एकटा रिक्षा चालवत असेल तेव्हा त्याच्या मनाची अवस्था कशी असेल? तो कितीही धीट असला तरी, मन चिंती ते वैरी न चिंती. यतीन यांच्या खिशात ३०,००० ,रोकड, त्यांचा मोबाईल, चावी होती. रीक्षावाल्याने त्या गोष्टी त्यांच्या पत्नीकडे दिल्या. हरविंदरने ओला रीक्षा केली नसती तर कदाचित रीक्षावाले त्याला संपर्क करू शकले नसते. मग गोंधळ वाढला असता. घटना घडल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत रीक्षावाला सोबत होता. त्याचा प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे थोडे.
माईंची आई वारल्यानंतर यतीन एकमेव, जो चिंचण येथे गेला तर त्यांच्या आईच्या खोलीत एकटा झोपायचा आणि म्हणायचा रात्री मला आई भेटतात. माझ्या डोक्यावरून हात फिरवतात. ती खोली माईंच्या आईच्या जाण्याने रिकामी झालीच होती पण आता ती सुनी सुनी झाली. काही घटना अतर्क्य असतात.माईंची हक्काची काठी हरवली. माईंचा शोक अनावर झाला तेव्हा त्या म्हणत होत्या, “बाळा सांग, आता माझ्यासाठी हक्काची काठी कुठून आणू. खर आहे काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट आणि मजबूत असतात. ईश्वर जेव्हा अशा व्यक्तीची ताटातूट घडवतो तेव्हा खरच म्हणावेसे वाटते, “दैवयोग ना कधी कुणा कळला!”
घडलेल्या दु:खद प्रसंगाचे अतिशय विस्तृत विवेचन केले आहे.अगदी जसेच्या तसे !!आम्हांलाही हे सगळे ज्ञात नव्हते. तुमच्या ह्या लेखनाने आणखीनच दु:ख झाले, कारण इत्यंभूत माहिती वाचून त्याच्या आकस्मिक निधनाचे रहस्य उलगडले. त्याला अस्वस्थ वाटले तेव्हाच वैद्यकीय उपचार झाले असते तर आज ही वेळ आली
नसती !! पण नियतीपुढे कुणाचं चालत नाही…
आयुष्यभरासाठी दुःख देऊन गेला ..
साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली .
कै. यतीन यांच्या अंत्यविधीसाठी मी हजर होतो. त्यांच्या मित्रपरिवाराकडून जे ऐकले आणि मी त्या दुःखद् घटनेचा जो अनुभव घेतला त्याने मी हेलावून गेलो होतो. माईंना झालेल्या दुःखाला मातृत्वाची किनार होती , त्यामुळे मला लिहिले नसते तर अस्वस्थता आली असती. मन मोकळे करण्यासाठी मी लिहिले, इतकेच।
My brother recommended I might like this web site He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks