WhatsApp

WhatsApp

WhatsApp तुमचा, माझा, सर्वांचा मित्र
जणू कोणा महत्म्याचे सुंदर अखंड पत्र
म्हटले तर उपलब्धी, म्हटली तर अडचण
म्हटले तर मृगजळ, म्हटले तर दर्पण

WhatsApp व्हिडीओ कॉल म्हणजे मनोरंजन
कितीही बोललं तरी भरतच नाही कधी मन
कळतच नाही की दिसतेय घरातील अडचण
एका कॉल वर कितीजणांनी बोलावे नसते बंधन

WhatsApp कॉल करून दाखवतो विशेष भोजन
टेबलवर काय किती मांडलंय याचं थेट घडे दर्शन
प्रत्येक गोष्टीची जाहिरात करण्याचं लागे व्यसन
निर्बंध नक्कीच येईल जेव्हा डेटावर येईल बंधन

Whatsयाpp ने म्हटलं तर मित्र जवळ आणले
पण म्हटलं तर मनातील संभ्रम उगाचच वाढले
मैत्रीचे नवनवीन पुल एका टिचकीत जोडले
तर कधी वाग्बाण कुणी कुणावर उगाच सोडले

Whatsapp ने माहितीचे नवे दालन खुले झाले
दुर्दैव इतकेच की शहानिशा न करता forward झाले
अर्धवट माहितीने हळकुंड पिवळे, चर्चासत्र सुरू केले
किती काय वाचावे, उत्तर पुन्हा लिहावे, व्याप वाढले

WhatsApp हेच जणू विचारांचे सुत्र ठरले
फक्त एका मित्राने सुचवतात उभे राहती इमले
आपले म्हणणे मांडण्यासाठी देती जुनेच दाखले
सेवानिवृत्त मित्रमैत्रीणींचे यामुळे चांगलेच फावले

WhatsApp मेसेज ही ठरली ऋग्णांना संजीवनी
ऋग्णशय्येवरूनच मेसेज करताच आप्त येती धावूनी
आजारी असला तरी खिदळतो मित्रांचे मेसेज पाहुन
वेळ घालवण्यासाठी अन्य काही उपाय आहे का याहून?

WhatsApp मेसेज येणे ही काहींना ठरते अडचण
सतत मेसेज येत राहिले की होतेच ना विचलित मन
स्वयंपाक आंघोळ कशातच लक्ष नसतं वाया जाती क्षण
कधी उतू जातं दूध तर कधी होतो कोळसा, जळे सरपण

Whatsयाpp ने मात्र घालवली माणसाची झोप
काय करणार? जमवलाय मैत्रीचा प्रचंड गोफ
स्क्रीनवर सतत आदळत असतात जशी मैदानी तोफ
मेसेजची परतफेड करावी लागते तरच वाढतो लोभ

WhatsApp युनिव्हर्सिटीची सत्यता पहा पडताळून
उगाच चुकीच्या विषयांवर नको चर्चा शिरा ताणून
काय खरे काय खोटे घ्या माहितगाराला विचारून
करून घेऊ नका स्वतःचे हसे सगळेच सत्य मानून

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar