निभावली रे प्रिती भाग २
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सानिकाच्या पायगूणाने घरात समृद्धी आली. तिच्या बारशाला प्रसाद आणि त्याचा बॉस हजर होता. बॉसने तिच्या मुलींसाठी खूप गिफ्ट आणली होती. सोन्याची चेन सानिकाच्या गळ्यात घातली होती आणि तिला घेऊन नाचला होता. प्रसादने आपला शब्द पाळला होता. निदान तिची मॉम आणि डॅड यांना नातीच्या बारश्याला आपल्या जावयाचं कौतुक करायची संधी मिळाली होती. सुख घरात लोळू लागल.घरात नोकर चाकर आले.
आता प्रसाद जास्त सिरियसली व्यवसायाकडे पाहू लागला. कधी कधी त्याला परतायला रात्रीचे दोन वाजू लागले. काही दिवस मोना रात्रीच्या जेवणासाठी त्याची उशिरा वाट पहात बसून राही. तो येई तेव्हा जेवणाची वेळ निघून गेलेली असे. कधी कधी तिचं आणि त्याच भांडण होई. तो तिच्याच शब्दात उत्तर देई, “Mona I gave you the luxurious life which you were expecting in those days, darling I have to work hard to make the money. I give you and our baby time when I am at home on Sunday. Is that not enough?”
ती रागावली, “प्रसाद, हे सुख तर माझ्या घरीही होते पण लग्न झाल्यावर तुझ्या सान्निध्यात राहण्याची माझी अपेक्षा असेलच ना? कधीतरी तू फिरायला न्यावं किंवा एखाद्या picture ला तुझ्या सोबत जावं, कधीतरी तूझ्या बरोबर खरेदीसाठी जावं मला वाटत असेल ना? शिवाय आपलं बाळही जस मोठं होईल मला तुझी गरज लागेलच तू रोज इतक्या उशीरा आलास तर कदाचित सानिका तुला आपला डॅड म्हणून विसरून जाईल. प्लीज आपल्या बाळासाठी तरी घरी लवकर येत जा.”
“मोना, पैसा कमवायचा तर वेळ द्यावा लागणारच, आज दारासमोर असणारी गाडी, हा बंगला, माझ्या भावंडांची शिक्षण माझ्या व्यवसायावर आहेत. एकदा पैसे खर्च करण्याची सवय लागली की कमी पैशात माणूस जगू शकत नाही.” “प्रसाद तुला आता पुरेसा अनुभव मिळाला आहे, मार्केटमध्ये तुझं नाव झालं आहे, तू स्वतंत्र बिझनेस का करत नाही, किमान आपण स्वतःचे मालक असू, कोणाचे गुलाम नाही, आता तू मला सोडच, पण मुलीलाही वेळ देऊ शकत नाही, काय करायचा आहे तुझा पैसा? तूच जर सोबत नसशील तर त्याचा काय उपयोग?”
affiliate link
“मोना डार्लिंग एक लक्षात घे, हे ऐश्वर्य मोहन शेठने हात दिला म्हणून आहे. आता मी स्वतंत्र नाही, आणि तू म्हणते तसा माझ्या मनाने जगू शकणार नाही, मोहन शेठ जितका मनानं मोठा आहे तितकाच जालीम आहे. जर मी त्याच्याशी दगाबाजी केली त्याला वेळ देऊ शकलो नाही तर तो माझा पत्ता साफ करेल. कोणाला पत्ताही लागणार नाही. तेव्हा शक्य असेल तेव्हा मी वेळ नक्की देईन पण माझ्या शिवाय जगायची सवय करून घे. कोणती वेळ कशी असेल? काही सांगता येत नाही.”
कोणाला कसे समजावून सांगायचे त्याचे तंत्र त्यांनी चांगले आत्मसात केले होते. मोना नाराज होऊ नये म्हणून दर दोन तीन महिन्यांनी तो मोनाला कुठेतरी दूर घेऊन जाई, विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेल, नयनरम्य निसर्ग सौंदर्य आणि ते दोघे, अजून काय हवे! सगळा रुसवा ,दुरावा दूर करून तो पुन्हा कामात हरवून जाई. बाळाची आजी त्याला स्वतःच्या डोळ्यापासून दूर होऊ देत नसे. तसेही शरीर सुडोल दिसावे, राहावे म्हणून बाळाला बाहेरच्या दुधाची सवय तिने लावली होती. सर्व सुख हात जोडून आता उभे होते. गावात आणि मैत्रिणीत प्रतिष्ठा होती. काही मंडळावर ती सन्माननीय सदस्य होती.
हळूहळू तो जास्त बिझी झाला, अनेकदा तो रात्री खूप उशिरा येत असे किंवा फारच उशीर झाला तर घरी येत नसे, “Darling I have a meeting late at night, I can’t come.” एवढंच निरोपाच बोलून तो फोन कट करत असे. ही late night meeting कोणाबरोबर? तिला संशय येई पण ती निमूट राही, त्याच्या मीटिंग मध्ये व्यत्यय नको म्हणून ती त्याचा फोन येण्याची वाट पाहता पाहता उपाशीच झोपी जाई. एक दिवस त्याच्या या लेट येण्याबद्दल दोघाचं कडाक्याचं भांडण झाले आणि तो रागाने निघून गेला. ती त्याला फोन करून थकून गेली तरी त्यांनी ना फोन घेतला ना घरी आला. तीन चार दिवस झाले तरी त्याचे येण्याचे चिन्ह दिसेना, शेवटचा उपाय म्हणून तिने मोहन शेठ यांना फोन करून प्रसादसाठी मुलीच्या बोबड्या आवाजात, “पप्पा तुम्ही कधी येणार? We miss you” निरोप ठेवला. तो आला तेव्हा तिने भरल्या डोळ्यांनी त्याची माफी मागितली. तो थकल्यासारखा दिसत होता. तो ना काही बोलला, ना न येण्याच कारण सांगितले.
त्याने मुलीला जवळ घेतले, तिचा संयमाचा बांध फुटला. “प्रसाद, मला तुझं ऐश्वर्य नको, गाडी नको, बंगला नको, माझ्यापासून तू दूर दूर जात आहेस ते मी सहन करू शकत नाही. तूला मी नकोशी झाली आहे का रे! तू थकून घरी येतोस तेव्हा आपलं बोलणं होत नाही, तू सकाळी लवकर जातोस तेव्हा आपली सानीका उठलेली देखील नसते. पूर्ण दिवस मी काय करते? माझा वेळ कसा जातो तू कधीतरी विचारतोस का? तू उशीरा घरी येतोस तेव्हा तू जेवत नाहीस पण तुझी बायको उपाशी आहे हे तरी तुझ्या लक्षात येत का? ती हमसून रडू लागली. “एवढ्या लवकर तू बदलशील असे नव्हते वाटले.”
तो तिला समजावत, तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, “मोना मला समजून घे, आमच्या धंद्यात व्यवसाय बोलणी रात्री उशिरापर्यंत होतात का? ते मी तुला सांगू शकत नाही. पण विश्वास ठेव मी आजही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो पण व्यवसाय सोडून मी तुला वेळ देऊ शकत नाही. तुला वाटेल तेव्हा तू आईकडे जा. गावाच्या समस्या जाणून घे, त्यात लक्ष घाल, तुझा छान वेळ जाईल.तुझ्या मित्रमैत्रीणींना बोलवून एंजॉय कर माझी काहीच हरकत नाही. शक्य तेव्हा मी तुला नक्की वेळ देईन पण तुझ्या प्रेमाने आणि डोळ्यातील अश्रूंनी माझ्या स्वप्नांच्या आड येऊ नको.विश्वास ठेव मी तुझाच आहे, मी कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही पण माझी प्रगती रोखू नको.” त्याचे ते शब्द ऐकून ती चिडली, “कोणत्या मित्रमैत्रीणीं बद्दल तू बोलतोस? तुझ्याशिवाय मला कुणी मित्र नाही आणि मैत्रीणींना मी फार मागे सोडून आले, मला कल्पना नव्हती की तू असा अर्ध्यावरच हात सोडशील.”
तो तिला जवळ ओढत म्हणाला,”मोना तू उगाचच गैरसमज करून घेतेस मला तुझ्या शाळेतील मित्रमैत्रीणींबद्दल म्हणत होतो. मी कधीही तुझ्या बाबत संशय घेतला नाही, तुच माझ्यावर संशय घेतेस.” तिची खात्री झाली की त्याला समजून घेण्यात तिच चूक करत आहे. बिझनेसमुळेच त्याला तिच्यासाठी वेळ होण शक्य होत नाही. ती त्याच्या खांद्यावर मान टाकून हमसून हमसून रडू लागली, “प्रसाद मला क्षमा कर, तुझ्या अनियमित येण्याने मी काही वेगळच समजले.तू माझ्यावर पुर्वीसारख प्रेम करत नाहीस, म्हणूनच तू घरी येण्याच टाळतो.” तो तिला जवळ घेत म्हणाला, “ये वेडाबाई अजिबात रडायचं नाही, मी तुला या पूर्वीच सांगितले आहे. बिझनेस म्हटला की वेळ द्यावाच लागतो. तुला आणि माझ्या घरातील सर्वांना तुझ्या नवऱ्याचा सार्थ अभिमान वाटेल अशी कामगिरी मला करून दाखवायची आहे.या शहरात आपल साम्राज्य उभं करणं हे माझं स्वप्न आहे. तू वेळोवेळी जर माझ्या प्रगतीच्या आड येत राहिलीस तर माझ स्वप्न सत्यात आणण अवघड आहे.”
तिची शंका दूर झाली. त्याच्या कुशीत ती शांत झोपी गेली, आज मनातील मळभ दूर झाले होते. तिने मोठ्या मनाने त्याचे आव्हान स्वीकारले होते.ती त्याच्या कानात कुजबुजली, “प्रसाद, तू जरूर मोठा हो पण इतकाही नको की बायकोच तुला भेटू शकणार नाही.” ती त्याच्या घराची कर्ती झाली.सासरे असतांना दोन नणंदांची लग्न तिने स्वतः जबाबदारी घेऊन पार पाडली. दोन्ही नणंदा आपल्या वहिनीच्या शब्दाबाहेर नव्हत्या. दिर पराग अजूनही लहानच होता. प्रसाद आपल्या बहिणींचा मोठा भाऊ म्हणून लग्नाला हजर असला तरी सगळा व्यवहार, देण घेण तिने एकहाती पेललं. कुठेही कटूता आली नाही की कोणी तक्रार केली नाही. स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी तिने पेलली त्यामुळे प्रसाद निश्चिंत झाला. आपल्या गैरहजेरीत मोना घर सांभाळू शकते याची खात्री त्याला पटली.
affiliate link
धंद्यात कोण कोणाचा स्पर्धक असेल आणि गोड बोलून कोण कोणावर कुरघोडी करेल किंवा काटा काढेल सांगणे अवघड, तिला याचा अनुभव लवकरच आला. एका जमीन खरेदी प्रकरणात प्रसादचा मालक मोहन शेट आणि पावले या दोन व्यवसायिक पार्टीत मतभेद झाले त्याचे पर्यवसान मुळ जमीन मालकाच्या खुनात झाले आणि त्याचा संशयित खुनी म्हणून प्रसादच्या घरी पोलीसांनी धाड टाकली. अर्थात तेव्हा प्रसाद घरी नव्हताच पण त्याच्या कपाटात एक पिस्तूल मिळाले त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला. बरीच शोधा शोध केल्यावर प्रसाद सापडला नाही तेव्हा पोलिसांनी त्याच्या वडिलांना पकडून नेले. या प्रसंगाने मोना हादरली. नाईलाजाने प्रसादला पोलीसांसमोर हजर व्हावे लागले. त्याला संशयित म्हणून जेल झाली. बरेच प्रयत्न करुन मोहन शेठने त्याला आठवड्यात जामीन तर मिळवला पण मोनाची त्या दिवसात जी मानसिक अवस्था झाली त्याने ती पार उध्वस्त झाली. तिच्या नशिबाने सानिका आजीकडे रूळली होती म्हणून ठिक होते.
प्रसादला भेटायला ती पोलीस ठाण्यात गेली तेव्हा, प्रत्येक जण तिच्याकडे वळून वळून पहात होते,ही बाई का बर पोलीस ठाण्यात आली असावी? असा नजरेत सूर होता, त्यांची जेलच्या त्या बराकी बाहेरच्या पँसेजमध्ये भेट झाली तेव्हा ती मनाने फारच खचली होती. त्या सहा दिवसात पोलीसांनी त्याची शारिरीक दुर्दशा केली असावी असा तिचा समज होता. त्यांची भेट दोन पोलीस काँन्स्टेबलच्या समक्ष झाली. क्षणभर ती बधीर होऊन त्याच्याकडे पहातच राहिली. त्याचे खोल गेलेले डोळे आणि वाढलेली दाढी यावरून तो गेले काही दिवस झोपला नसावा हे नक्की होते. तिने गहिवरून त्याचे हात धरले,तसा पोलीस हवालदार ओरडत म्हणाला,”बाई, दूरून बोला,सायबांची तशी ऑर्डर आहे.” तिने बोलायचा प्रयत्न केला पण त्याची अवस्था पाहून तोंडातून शब्द फुटत नव्हते, ती कशीबशी म्हणाली,
“प्रसाद हे रे काय झाले? तू खरचं खून केला नाहीस ना? मला भिती वाटते.” अस म्हणत ती बेशुध्द पडली. तिच्या डॉक्टर वडिलांनी तोंडवर पाणी मारून तिला सावध केली, तिला धीर दिला आणि सावरून घरी आणले. दुसऱ्या दिवशी मोहन शेठ घरी भेटायला आले, “पोरी तू काळजी करू नको, तुझ्या नवऱ्याला काही होणार नाही. पोलीस त्याला हात लावणार नाही, साले, आपल्या पैश्यावर जगतात. त्यांची आपल्या माणसाला हात लावायची हिंमत नाही व्हायची.” तीच्या दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या होत्या, ती म्हणाली, “दादा, हे हो काय झाले? ,माझा नवरा कुणाचा खून करणार नाही, त्याला कोणी यात गुंतवले?”
तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,”मला दादा बोलली ना तू, मग विश्वास ठेव चार दिवसात तुझा नवरा घरी येईल. तुझ्या नवऱ्याला काही होणार नाही. तू रडू नको,तुझी पोरगी रडेल. साला बारकी पोरं रडली की आपला कलेजा खलास होतो.” मोहन शेट तीच सांत्वन करून निघून गेला. सासरे तिला रागावून बोलले, “तुझ्या नादी लागून माझा पोरगा फुकट गेला, तो हुशार होता कुठेतरी ऑफिसमध्ये लागला असता, तुला खूप पैसे पाहिजे म्हणून तो धंद्यात उतरला, काय झाले? आम्ही बरबाद झालो ना! आमचं नांव बदनाम झालं.आता त्याला कोण सोडवेल? सून बाई तो लवकर घरी आला नाही तर मी अन्न त्याग करून जीव देईन.”
त्यांची समजूत कशी काढावी तिला कळेना, त्यांचं वय झालं होतं, खरंच त्यांच काही बर वाईट झालं तर तिला नणंदा आणि सासू यांनी नक्की माफ केले नसते. “बाबा, मी दोन तीन दिवसात त्यांना घेऊन येईन, विश्वास ठेवा, मी वकील करीन, पैसे खर्च करिन पण त्यांना सोडवून आणीन.”
तिने मोहन शेठला फोन केला, घरची परिस्थिती सांगितली. शक्य ते प्रयत्न मोहन शेट करत होते, त्यांनी दिल्लीवरून कोणी मोठा वकील बोलावला. आठ दिवसांनी त्याला हाय कोर्टातुन जामीन मिळाला, पण यापुढे कोणता प्रसंग येऊ शकतो हा विचार करूनच ती हादरली. खरोखरच जर प्रसादच्या हातून खून झाला असेल तर? आणि पोलिसांनी त्याचे प्रुफ शोधून काढले तर प्रसादला फाशी होईल आणि मग आपल आणि सानिकाच जीवनच उध्वस्त होईल. तिने वर पहात हात जोडले हे ईश्वरा मला माफ कर,प्रसादच्या हातून काही वाईट घडू देऊ नको. पैशासाठी कोणाच्या जीवावर उठण्याची कुबूध्दी त्याला देऊ नको.
प्रसाद जामिनावर घरी आला तेव्हा तणावाखाली होता. मोनाने त्याला धीर दिला. “प्रसाद तू जर खून केला नाहीस तर तुला भिती कसली?” “मोना! बॉस म्हणाला तू काहीच बोलू नको, मोना बॉसने खून करतांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पण मी काही बोलू शकत नाही, तुमचा सर्वांचा जीव धोक्यात आहे. बॉस असे काहीं करेल असे कधीही वाटले नव्हते. बॉस मला म्हणतो, तुला जेल झाली तर मी पाहून घेईन.”
“प्रसाद, पण उद्या तुझी नार्को टेस्ट झाली किंवा लाय डिटेक्टर टेस्ट झाली तर तू खरं बोलून टाकशील त्यापेक्षा तू आत्ताच का खर सांगत नाहीस? माफीचा साक्षीदार का होत नाहीस?” “मोना ते एवढं सोप्प नाही, ही माणसं खतरनाक आहेत, ते एकालाही जिवंत ठेवणार नाहीत. आमचा बॉस वाईट असला तरी तो मला शिक्षा होऊ देणार नाही.”
“प्रसाद, ह्या संकटातून तू बाहेर पडलास की हा मार्ग सोडून दे,मला साधं जगणं आवडेल पण सतत मानेवर टांगती सूरी ठेवून जगणं जमणार नाही.” “मोना ही श्वापदाची गुहा आहे,येथे गेलेल्या माणसाला श्वापद बनाव लागतं, मारो या मरो, अन्यथा जगता येत नाही.” प्रसाद शांत शब्दात बोलला. प्रसाद वरील केस तीन वर्षे चालली,त्याला दर पंधरा दिवसांनी पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागे. याच काळात जुईलीचा जन्म झाला. मुलगा व्हावा अशी त्याच्या घरील मंडळींची इच्छा होती पण ती फोल ठरली. हळू हळू तो या सगळ्या गोष्टींना सरावला.आत जाणं अन बेलवर सुटून येणं सरावाच झालं. मोनालाही त्याच्या या प्रवासाची भीती वाटेनाशी झाली. जणू त्याच अस जोखमीचे जगण तिन स्विकारलं होतं. चार वर्षांनी पुराव्या अभावी तो निर्दोष सुटला पण त्याच्या माथी खुनाचा आरोप लागला तो लागलाच. आता लोक त्याला वचकून वागू लागले.त्याला नावा ऐवजी “दादा”म्हणून हाक मारू लागले. खूनाचा आरोप होऊनही त्याची गावातील पत वाढली.
मोना गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावू लागली. या कार्यक्रमाचा खर्च उचलू लागली. बक्षीस समारंभ, गावातील लग्न समारंभ यांना हजेरी लावू लागली आणि पाहता पाहता मोनाची, ‘मोना मॅडम’ कधी झाली ते तिलाही कळले नाही. ग्रामीण भागातील निवडणूक कार्यक्रमात प्रसाद रस घेऊ लागला. गावातील मोक्याच्या जमिनी स्वस्तात पदरी पडून घेणे हा जरी उद्देश असला तरी वरकरणी गावचे हित पाहण्याची जणू त्याने शपथ घेतली असावी असाच त्याचा कांगावा होता. लोक पैशाला लवकर भुलतात. त्याची ही खेळी यशस्वी झाली. अनेक कार्यक्रमात त्याचे प्रायोजकत्व असे. तरुण मुलांना या उपक्रमात खर्च करायला पैसे मिळत असल्याने ते त्याचा उदोउदो करत. गावचा ‘मसीहा’ असल्या प्रमाणे तो वागत होता आणि लोक त्याला मान देत होते. या त्याच्या खेळीमुतळे ग्रामीण भागातील लोकांचा पाठिंबा वाढल्याने त्याची राजकीय पक्षात आणि नेते मंडळीत ऊठबस वाढली. तो पहिल्यापेक्षा जास्त बिझी झाला. जणू लोकसेवा करण्यासाठी त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले असावे.
त्याच्या अनियमित येण्या जाण्याची मोनाने जणू सवय करून घेतली. आता तो घरी वेळेवर आला नाही तर,एक फोन करून त्याच स्टेटस विचारून ती मोकळी होत होती. मुली पप्पा आला नाही तर व्हिडिओ कॉल करून त्याची खुशाली घेत होत्या. जीवनाने वेग घेतला होता. काळ कोणासाठी थांबत नसतो. तिचे सासरे होते तोपर्यंत ती संध्याकाळी शक्यतो बाहेर जात नसे पण ते गेले आणि तीच घरातील सर्वोसर्वा बनली. गावाच्या आणि तालुक्याच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली . खेड्यापाड्यात व्यायाम शाळा, अंगणवाडी यांना ती भेटी देत असे, गरजेच्या वस्तू विद्यार्थ्यांना वाटत असे त्या मुळे तिचं social status वाढल होतं. लोक आदराने तिला मॅडम म्हणून हाक मारत. या पूर्वी तिला इंफिरीओरिटी कॉम्प्लेक्स होता पण जस जशी ती समाजात वावरू लागली प्रसाद इतकीच तिच्या कामाची चर्चा होऊ लागली. गावातील शैक्षणिक संस्थेची ती अध्यक्ष म्हणून निवडून आली. मुळातच बोल्ड असणारा स्वभाव आणि परिस्थितीने दिलेले धडे यामुळे तिच्यातील नेतृत्व उजळून आले.
प्रसादने राजकारणात उडी घेतल्यापासून त्याच्या व्यवसायाला बरकत आली होती. जिल्ह्यातील सरकारी कामे त्यांच्या कंपनीला मिळत होती. सरकारी बाबू त्याचा पाहूणचार घेऊन घरबसल्या त्याची बिले मंजूर करत होती आणि ट्रेझरी क्लर्क त्यांच्या कंपनीची बिले मंजूर करत होती. पैसा, प्रतिष्ठा त्याच्या घरी स्वतःहून येत होता. कितीतरी सामाजिक संस्थावर तो अध्यक्ष म्हणून आमंत्रित होता. जिल्ह्यातील राजकारण त्याच्या सोयीने चालत होते. तो म्हणेल त्याचा गळ्यात जिल्हा अध्यक्षपद पडत होत. सानिका आणि जुईली कॉलेजमध्ये जाऊ लागल्या होत्या. त्यांचं वागणं भन्नाट होत, मोनाच्या एक पाऊल त्या पुढेच होत्या.
affiliate link
गेल्या वीस पंचवीस वर्षात मोनात अमुलाग्र बदल घडला होता. अनुभवाने तिला कोणत्याही प्रसंगी ताठ राहून लढण्यास समर्थ बनवलं होतं. आता मोना त्याच्या प्रत्येक व्यवहाराची साक्षीदार होती. त्याच्यावर होणाऱ्या आरोपाबाबत आणि शिक्षा झाली तरी शांत राहून तोंड देण्याच्या निर्धारा बाबतही, तीच कुणीही कौतुक करावे अस तिने स्वतःला घडवलं होत. गावातील अनेक योजना तिच्या साक्षीने आणि पुढाकाराने उभ्या राहिल्या होत्या. पहाता पाहता मुलींच्या आवडीने त्यांचं शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी आपला जोडीदार निवडला. प्रसादने मुलींच्या लग्नात जिल्ह्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांना बोलावून त्यांचा सत्कार घडवून आणला आणि आपले शक्तीप्रदर्शन केले. गेल्या तीस वर्षात मोनाला अनेक कटू अनुभव आले. कित्येक वेळा काही प्रसंगामुळे प्रसादला दीर्घ मुदतीची शिक्षा भोगावी लागली तरी ती तठस्त राहीली.
तिच्या आयुष्यात घडलेले अनेक कटू प्रसंग जमेल तसे लिहिण्याचा तिने प्रयत्न केला, त्यातून ह्या कथेने जन्म घेतला.आज मोना सक्षमपणे कोणत्याही प्रसंगाला तोंड देत आहे या मागे आहे जोडीदारावरील दृढ विश्वास. तिला माहिती आहे काही झाले तरी प्रसाद तिची साथ सोडणार नाही आणि ती प्रसादची. जीवनात अनेकदा गैरसमज झाले अन अनाहूतपणे वादळे आली. पण संयम, श्रद्धा आणि विश्वास याच्या जोरावर तिने संकटाला तोंड दिले. तिने त्याच्या साक्षीने जीवनाचे प्रणय गित एकदाच गायले होते तेच तिच्या स्मृतिकोषात अजरामर आहे.
प्रसादने तिला क्वालेटी टाईम दिला नसेलही पण तिने त्याबद्दल मनात अढी बाळगली नाही अन्यथा छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोटाची प्रकरणे थोडी का होतात? पण तिने मनाची प्रगल्भता दाखवून त्याला अनेकदा माफ केले. स्त्री ही मुलाच्या चूका जशा पोटात घालते तशीच आपल्या पतीच्या हातून समजून उमजून घडलेल्या चुकांवरही पांघरूण घालते याचे कारण ह्रदयीचे ममत्व आणि वात्सल्य. एका विशिष्ट वयानंतर ती आपल्या नवऱ्यालाही मायेचा ममतेने सांभाळते हेच ते सत्य. म्हणूनच ज्या महिलेच्या हृदयात ममत्व असते ती नवऱ्याच्या हजारो चूका माफ करते पण जर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर ती नवऱ्यालाही माफ करत नाही. मोनाने नवऱ्याच्या प्रत्येक संकटात त्याला मदत करत “प्रीतीची रीत” निभावली. पोकळ प्रेम आणि त्याचे दिखाऊ दर्शन हल्ली पटकन घडतं. खरी कसोटी संकटातच लागते. मोनाने ती कसोटी पार केली आणि प्रितही निभावली.