निभावली रे प्रिती भाग १

निभावली रे प्रिती भाग १

मध्यम वर्गीय सुशिक्षित कुटुंबातील संस्कारात वाढलेली असली तरी ती मॉडर्न होती. म्हणजे मिडी, जीन्स, बेलबॉटम, स्लीव्ह लेस टॉप असे कपडे. हाय हिल सँडल, सोम्य मेकअप अशा स्वरूपात ती ऐशीच्या दशकात वावरत होती. कॉलेज गोईंग गर्लचा धीटपणा तिच्याकडे आला होता. मूळचा गौर वर्ण आणि नुकतेच सोळावे संपून तारुण्यात आल्याने चेहऱ्यावर आलेली लाली आणि केसांचा बॉब कट यामुळे रस्त्याने ती चालू लागली की रस्ता तिच्याकडे पाहू लागे. आपण आधुनिक आहोत हे दर्शवण्यासाठी खांद्याला सुदंर पर्स आणि हातात कॉमिक्स किंवा इंग्रजी न्युज पेपर असा तिचा रुबाब असे. आई वडील सरकारी कर्मचारी आणि आधुनिक विचारांचे असल्याने ती मुक्तपणे मुलांमध्ये वावरत असे. कळत नकळत तिच्या मैत्रिणी तिचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असत, पण ती जात्याच सुंदर असल्याने तिला ते शोभून दिसे मात्र भडक कपड्यात मैत्रिणी बाहुल्या वाटत.

ती फर्स्ट क्लास ने प्रवास करे त्यामुळे तीच तिच्यासाठी एक वेगळं स्टेट्स असे. अभ्यासात फार हुशार नसली तरी चौफेर वाचन आणि धीटपणा ह्यामुळे ती चारचौघीत सहज नजरेत येई. कॉलेजमध्ये जाऊन महिना होण्यापूर्वीच तिचे अनेक मित्र झाले, आधी ती मैत्रिणी बरोबर प्रवास करत असे आता तिचा एक वेगळा ग्रुप तयार झाला. तिच्या मैत्रिणी तिच्या एवढ्या फॉरवर्ड नसल्याने आणि त्यांच्या घरी मुलींना एवढं स्वातंत्र्य नसल्याने त्या तिच्यापासून अलिप्त झाल्या. कॉलेजच्या अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये ती भाग घेऊ लागली आणि तिच्या मोकळेपणाने ती मुलांमध्ये प्रिय झाली. वर्षे पाठी पडली आणि तिचा बोल्डपणा वाढला. मुलांच्या कंपूत बसून गप्पा मारण्यात किंवा कॉलेज कॅन्टीनमध्ये एकत्र बसून टिफिन शेअर करण्यात तिला काहीच संकोच वाटत नव्हता.



affiliate link

जशी ती वयाने मोठी झाली ती जास्त स्मार्ट आणि बोल्ड झाली. मुले तिच्याभोवती पिंगा घालू लागली आणि पोर आपल्यावर मरतात हे पाहून ती आनंदून गेली. “रोझ डे” दिवशी सगळ्यात जास्त गुलाब फुले तिला मिळत, फ्रेंड्स डे ला तिचे दोन्ही हात मैत्रीच्या मेसेजने आणि कलर रिबीनने भरून जात. ती एसवायला असतांना कुंदनने तिला अनेकदा एकटे भेटण्याचा प्रयत्न केला. तो हँडसम तर होताच पण घरून सधन होता. कॉलेजच्या स्टुडंट फेडरेशनचा तो सेक्रेटरी होता. अनेक मुली त्याच्याशी लगट करतांना तिने अनेकदा पाहिले होते, म्हणूनच ती त्याला टाळू पहात होती. तो मात्र तिच्याशी मैत्री व्हावी यासाठी अधीर होता. तो कसा आहे? या बाबत तिला माहिती नसली तरी सर्व कॉलेज त्याला रोमियो म्हणून ओळखत होतं, त्याच्यापासून सुटका करून घ्यावी म्हणूनच ती पुन्हा मुलींच्या घोळक्यात दिसू लागली. आता ती जास्त गांभीर्याने वागू लागली. जस जसे ती त्याला टाळत होती,तिच्याशी मैत्री करण्यासाठी तो संधी शोधत होता, तळमळत होता.

जेव्हा ही गोष्ट तिने आपल्या मैत्रिणीला सांगितली, तिने तिची ओळख प्रसादशी करून दिली. “मोना, हा प्रसाद आपल्या गावातला आहे, हुशार आहे, तू तुझी अडचण त्याला सांग तो तुला मदत करेल.” तिने त्याच्याशी हँडशेक केला. “Glad to see you.” तो हसला,”Me too.” तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, I will be with you.” प्रसादला तिने अनेकदा दुरून पाहिले होते तो हँडसम होता यात दुमत नव्हते पण तो मॉडर्न वाटत नव्हता. तो मुलांच्या कंपूत असला तरी थोडा शाय होता. प्रसादनेच मैत्रीसाठी हात पुढे केला आणि मोनिका त्याच्या त्या स्पर्शाने बावरून गेली. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले, तो गालातल्या गालात हसत होता. “मोना विश्वास ठेव या पुढे तुला कोणीही मुलगा सतावणार नाही, पण तू ही उगाच जिमखान्यात येत जाऊ नको.” काय बोलावे ते क्षणभर तिला सुचले नाही पण ती हळुवार हात सोडवून घेत म्हणाली, “So nice of you.”

त्या नंतर ती फक्त त्याच्या बरोबरच दिसू लागली.कुंदनने दोन तीन वेळा हाक मारली,एक दिवस चक्क तिची वाट अडवून तो उभा राहिला, ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, “सॉरी, मी तुझ्याशी मैत्री करू शकत नाही, If I complain , the Principal may suspend you, now only six weeks remain for the university exam. Don’t waste your career.” त्याच्याशी मैत्री करायला मुली एका पायावर तयार असत कारण तो कॉलेजचा स्टुडंट सेक्रेटरी होता, वेग वेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याच्यामार्फत जावं लागे आणि तरीही तिने त्याला धुडकावून लावले होते. त्यालाच नवल वाटले, ही पोरगी वेगळी आहे डॅशिंग आहे, म्हणूनच तो तिच्या प्रेमात पडला होता.

प्रसाद श्रीमंत नसला तरी हुशार होता, त्याने तिच्याशी कधीही जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मैत्रीच्या आड काही गैर व्यवहार केला नाही. पाहता पाहता ती त्याच्या जवळ ओढली गेली. एक दोन वेळा कुंदनने तिच्या वाटेत मोटरसायकल आडवी घालून त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्याच आठवड्यात प्रसादने त्याला जिमखान्यात सर्वांसमोर त्याबद्दल विचारून तिची माफी मागायला लावली आणि सांगितले “कुंदन ती माझ्या गावातून येते, तिच्या वाटेला जाऊन आपल्या मैत्रीला डाग लावू नको. जर या पुढे तिला त्रास दिला तर माझ्यासारखा कुणी वाईट नसेल.”

त्याचे शब्द ऐकताच कुंदनने त्याचा गळा धरला, पण चपळतेने प्रसादने त्याला जमिनीवर आडवा पाडला. कुणीतरी त्यांची तक्रार प्रिंसिपल कानिटकर यांना केली आणि त्यांनी दोघानाही पंधरा दिवसासाठी रस्टिकेट केलं.ही बातमी सगळीकडेच पसरली.प्रसादचे ते शेवटच वर्ष होते. प्रसादाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा त्याला घरून फायरिंग झाली. “त्या डॉक्टरच्या पोरीसाठी तू मित्रांशी मारामारी करतो, लाज नाही वाटत, तिची मैत्री सोड, घरची परिस्थिती बघ, मी आता रिटायर होईन तीन भावंडे पाठीवर आहेत. तुझ्यावर त्यांचं शिक्षण आहे.तू गुंड झालास तर त्यांचं कोण बघेल? त्या पोरीचा नाद सोड, नाही तर घरातून हाकलून लावीन.” त्याने वडिलांना काही उत्तर दिले नाही, तो मान खाली घालुन शांत राहिला. त्याला आपल्या घरची कल्पना होती. या पुढे दोन बहिणी आणि भाऊ यांचं शिक्षण आपल्यावर आहे याची जाणीव त्याला होती. त्या दिवसापासून तो सिरियसली अभ्यास करू लागला. मोनिकाची भेट घेणं तो टाळत होता पण दोन चार दिवसात त्याच्या लक्षात आले की तिला भेटल्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्यांनी एक दिवस त्याबद्दल तिला कबुली दिली. “मोनिका, तू मला आवडतेस, I can’t live without you. Do you love me too.”





ती हसली पण काही बोलली नाही. त्याचं करिअर, त्याची आर्थिक परिस्थिती या बाबत ती साशंक होती,दोस्ती ठिक होती पण कायमचं एकमेकांच्या सहवासात रहायच, लग्न करायच शक्य होईल ना! ती म्हणाली, “प्रसाद मला थोडा वेळ दे, तुझी परीक्षा होऊ दे, तूला नोकरी लागू दे मग आपण विचार करू. सध्या आपण एकमेकांना भेटायचे नाही. तू शांतपणे अभ्यास कर. परीक्षा संपली की आपण भेटू.”

तो थोडा चिडला, “अच्छा! म्हणजे मी तुला तुझा बॉडिगार्ड म्हणून हवा होतो तर? हीच पारख केली का माझी.” “प्लिज,प्रसाद, मला तसं म्हणायचं नाही, पण तुला नोकरी नसताना मी माझ्या डॅड ला काय सांगू? जॉबलेस मुलावर माझं प्रेम जडलंय, ते परवानगी देतील?” तो तिचे दोन्ही हात हातात घट्ट धरत म्हणाला,”कदाचित माझी परिस्थिती तुला ठाऊक असेल. माझ्या तीन भावडांचे शिक्षण माझ्यावर आहे याची मला कल्पना आहे, पण I promise you की मी तुला सुखात ठेवेन, तुझं स्टँडर्ड जपण्याचा प्रयत्न करेन.” त्याने विश्वासाने तिच्या डोळ्यात पहात सांगितले.
ती गोड हसली,”Dear I will wait for you, but till then, we can’t meet in college campus and seriously study.” दोघांनी निरोप घेतला, दोघानाही ते अवघड होतं पण पुढील गोड फळ चाखायची असतील तर संयम गरजेचा होताच. मनावर दगड ठेवून त्यांनी भेट टाळली. तो त्याच्या इच्छा शक्तीची परीक्षा घेत होता म्हणूनच संयम पाळत होता.

त्याचं कॉलेज संपलं तस त्याने नोकरी मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण कुठे ओळख नसल्याने यश येई ना, घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी एका मित्राच्या ओळखीने एका हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी स्वीकारली.

त्याने नोकरी लागताच मोनाची भेट घेतली, “मोना मला नोकरी लागली आता आपण भेटू शकतो.” ती नाराज होत म्हणाली,”शी, कसली नोकरी? तर एका थर्ड ग्रेड फालतू हॉटेलमध्ये मॅनेजर. लोक तुझ्या समोर रुबाबात पैसे टाकणार आणि तू खोटं खोटं हसणार.” “Mona it’s just beginning, believe me I will find a respectable job at the earliest.” ती हसली,”प्रसाद, तुला माहिती आहे माझ्या आई वडिलानी मला लाडात वाढवली, they must be happy to see me settled with good gentleman.” “I promise you dear, I will give you all that even your parents can’t afford, just give me some time.”तो तिला ठाम आणि निश्चयी स्वरात म्हणाला. ती गोड हसली.”ठिक त्या दिवसाची मी वाट पाहीन,I am proud to see your confidence. Definitely you will achieve your goal.” तिने त्याचा निरोप घेतला. तिला खात्री होती तिच्यासाठी तो कोणतही दिव्य करेल पण माघार घेणार नाही.

त्याच्या या नोकरीने घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. घरात भावंडे त्याला मान देवू लागली. वडील कधीतरी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले.लवकरच त्याच्या लक्षात आले त्या हॉटेलमध्ये काही खास कस्टमरसाठी पाठच्या दाराने दारूची अवैध विक्री केली जाते. अर्थात ते पैसे त्याच्याकडे जमा होत. खर तर त्याला हे ठाऊक होते की रेड पडली तर तोच आत जाणार होता, उद्या गावात तोंड दाखवायला जागा राहणार नव्हती पण गरजवंताला अक्कल नसते. म्हणून तो मालकाशी त्या बाबत काही बोलला नाही.

“हम चुप रहेंगे” याच गुणामुळे दोन महिन्यानी त्याला मालकांनी बोलवले आणि म्हणाले,”प्रसाद तू गुणी मुलगा आहेस. मुख्य म्हणजे मालकाला काय हवे ते तुला बरोबर कळते.या पूढे तू माझे ऑफिस पहा, मला खात्री आहे तू नक्की प्रगती करशील.” त्यांनी मालकांचे पाय धरले,”सर मला जमेल ना, मला ऑफिसचा काही अनुभव नाही म्हणून म्हणतो.” “मला खात्री नव्हे विश्वास आहे तू नक्की ऍडजस्ट होशील. हे बघ पुढच्या एक तारखेपासून तुझा पगार दुप्पट म्हणजे दोन हजार ” मोहनशेठ म्हणाले. ते ऐकून त्याला हर्षवायूच झाला असता,पण मोहन शेठचा तो रांगडा अवतार पाहून त्यांनी हसू ओठात दाबले. या पूर्वी तो मोनाशी कधीतरी फोनवर बोलत असे कॉलेजमध्ये जाऊन भेटत असे पण ती मात्र त्याला भेटायला फारशी उत्सुक नसे. ती म्हणे “प्रसाद, हा फालतू जॉब तू सोड आणि एखादा चांगला जॉब पहा. तू कॉमर्स ग्रॅज्युएट आहेस तुला बँकेत किंवा कंपनीत सहज नोकरी मिळेल.”

तो तिची समजूत घालत म्हणे,”मोना, Give me some time, every company wants experience ,from where to have that unless someone give me opportunity?” ते ऐकून ती निरुत्तर होई.
मोहन शेठ यांची ऑफर जेव्हा त्याने मोनाला सांगितली, ती म्हणाली, “प्रसाद, Is that your goal? Why don’t you move to a reputed company? Where you will have respect and honour.” तो तिच्यावर रागावला,”Mona I am trying hard, I apply for every possible post that is in advertisement, but till then I can’t survive without a job. I have helped my father. Are you getting me? no one will give me this much salary, and now this is the corporate office of his construction business, not a shop or bar.”





तिला ते पटलं, अर्थात तरीही मोहन शेठ यांचा बिझनेस तिला ऐकून माहिती होता. लोकांच्या जमीनी स्वस्तात हडप करून त्यावर इमारती बांधणे हे काही प्रतिष्ठित पणाच लक्षण नव्हते पण प्रसादची गरज भागत होती आणि मुख्य म्हणजे त्याला अनुभव मिळणार होता. तो मोहन शेठच्या ऑफिसमध्ये काम करू लागला. त्याने पाहता पाहता मोहन शेठचा बिझनेस समजून घेतला. मोक्याच्या जमिनी शोधून आणि त्या मालकाची नड ओळखून ऐन केन मार्गाने जमीन घशात घालायची. त्या जमिनीला चांगला दर आला की प्लाँट पाडून विकायची किंवा पार्टनरशीप करून बिल्डिंग उभी करायची. हळूहळू तो स्वतः डील करु लागला. कोणत्या जागेवर काय उभारता येईल या बाबत तो शेठला अचूक सल्ला देऊ लागला.शेठ जवळ त्याच वजन वाढल. शेठच्या वाढत्या साम्राज्याचा तो एक घटक झाला.

अनेक व्यवहार त्याच्यावर सोपवून मोहन शेठ निर्धास्तपणे कुठेही जात असे. दोन तीन वर्षात घराच दैन्य संपल, घरावर पक्क छत आल.आईच्या गळ्यात सोन्याचा हार आला. त्याने गाडी घेतली दर विकेंडला तो तिला फिरायला घेऊन जाऊ लागला.आपली अपेक्षा तिला सांगू लागला.ती त्याच्या या प्रगतीवर खुश झाली आणि मोहन शेठ बद्दल तिच्या मनातील अढी कमी झाली. त्यांच्याविषयी आता गावात जाहीर चर्चा होऊ लागली. तीला मैत्रीणींनी विचारल तरी ती बिनधास्त त्यांच्या मैत्री बद्दल सांगू लागली.

मोनाच्या घरी ही बातमी या पूर्वीच पोचली होती. एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाबरोबर तिचा मित्र काम करतो ऐकून ते हादरले. मोनाच्या मम्मीने तिला या बद्दल विचारताच, तिने सांगितले, “मम्मा तो बिझनेसमन आहे,चांगला पैसा कमावतो आणि भविष्यात तो खूप उंची गाठेल या बाबतीत मला विश्वास आहे. ममा तुम्ही स्वतः आंतरजातीय प्रेम विवाह केलात ,तुमचं कोणतं नुकसान झालं?” तिच्या मनातील भावना आणि त्याच्या बाबत सार्थ विश्वास ऐकून तिच्या डॅड नी तिला होकार दिला. ते म्हणाले,”हे बघ बेटा,आमच्या लग्नाला तिस वर्षे झाली. आम्ही एक मेकांना समजून घेत संसार केला. तुम्हाला देता येईल ते सर्व दिल, मुख्य म्हणजे भेदभाव न करता शिक्षण दिल. उद्या तुला त्याच्या घरी तोच मान सन्मान नाही मिळाला तर तू जुळवून घेशील की नाही हाच प्रश्न आहे. तू बंडखोर स्वभावाची आहेस म्हणून काळजी वाटते.” “No Dad, don’t worry, I am old enough and bold enough to take care. I will not bring any complaint, I can solve it at my place.” ती ठामपणे म्हणाली.
“ठिक आहे तुला एवढा विश्वास असेल तर त्याला घेऊन ये,आम्हाला त्याला एकदा भेटू दे.”ते म्हणाले.

मोनाच्या आई वडिलांनी त्याला बोलावून घेतलं. प्रथम भेटीतच तो त्यांना आवडला. अर्थात त्यांनीही बिल्डर जवळ काम करीत असल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. तो निघण्यापूर्वी, मोनाला आम्ही लाडात वाढवले आहे तिला मुलगी म्हणून कधीही वेगळी ट्रिटमेंट दिली नाही तसेच तिला कष्टाची सवय नाही अशी बरीच माहिती दिली. त्याच्या वडिलांना भेटण्याची वेळ ठरवून त्यांनी त्याचे कौतुकही केले. गावात चर्चा होत असल्याने शक्य तितक्या लवकर लग्न करण्याची त्याला गळ घातली.

रजिस्टर लग्न करुन ती प्रसादच्या घरी आली. श्रीमंता घरची लेक म्हणून तिला कोणी काही बोलत नसे. घरातील धुणीभांडी कामे तिला करू देत नसत. मात्र ती सासूला इतर कामात मदत करे. ती येताच तिने घरात काही बदल केले. घरातली टापटीप वाढली. जेवताना सर्व एकत्र जमू लागले. नणंद आणि दिर यांना स्वतःच वळण लावलं.

त्यांच घरी येणजाण यावर ली लक्ष देऊ लागली. प्रसादचे वडील तिच्याशी आदराने वागू लागले. प्रसादला घरी परतायला नेहमीच उशीर होत होता परंतू घरातील हा बदल तो पहात होता. एखादे दिवशी प्रसादला ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर झाला तर मोहनशेठ फोन करुन त्याची खबर बात घेऊ लागले. मोहनशेठ त्याच्यावर खुश होते. अनेकदा त्याला अपेक्षीत असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त नफा प्रसाद त्यांना कमावून देता होता. प्रसादला त्याबद्दल बक्षिसही मिळत होत.

मेहनतीने प्रसाद, मोहन शेठच्या व्यवसायात पार्टनर बनला. याच काळात मोना प्रेग्नंट राहिली. सासू आनंदून गेली. तिच कोडकौतुक करतांना घर आनंदाने न्हाऊन गेलं. सासू तिला कोणतही काम करू देईना. मात्र प्रसादला त्याच्या बिझी शेड्युलमुळे तिच्यासाठी वेळ देता येईना. तो ना कधी तिच्या मेडिकल चेकअपसाठी तिच्या सोबत गेला ना तिच्यासाठी कधी घरी राहिला. तिची ममा म्हणे,”असला कसला ग तुझा नवरा, ना तुझी काळजी, ना होणाऱ्या बाळाची काळजी. शिक्षण असूनही त्याला तुझी काळजी नाही त्यापेक्षा अडाणी तरी बरे!” “ममा,त्याला तसच महत्त्वाचे काम असेल नाहीतर तो नक्की थांबला असता.” ती त्याची बाजू मांडे. “मोना, तुझ्या नवऱ्याचं कौतुक काही सांगू नकोस, गेले तीन वर्षांत किती वेळा तुझ्यासाठी थांबला? किती वेळा तुझ्या बरोबर डॉक्टरकडे गेला? तू अशीच नरमाईने वागलीस तर तुझं काही खरं नाही.” मोनाची आई नाराजी दर्शवत म्हणाली.

मोना तिच्याशी असहमती दर्शवत म्हणाली, “ममा, गेले वर्षभर तो बिझी आहे हे खर पण त्यापूर्वी तो दर संडेला मला फिरायला न्यायचा, शाँपिग करतांना बरोबर असायचा, आता त्याला फोन करून जेवणासाठी आठवण करून द्यावी लागते. त्याचा नाईलाज आहे, तो तरी काय करेल?” अर्थात मोनाच्या आईने याच कारणामुळे प्रसादची वेळोवेळी कान उघडणी केली होती पण पालथ्या घड्यावर पाणी तिच्या ओटीभरणी कार्यक्रमासही तो हजर राहू शकला नाही. मोनाला याच फार वाईट वाटलं. तिने त्याला आवर्जून सांगितले होते, की ममाने आपल्या मैत्रीणींना बोलावलं आहे, तिला तिचा जावई मैत्रीणींना दाखवायचा आहे तू थोडावेळ तरी येऊन जा, म्हणजे ममाला बरं वाटेल,पण तो काही आला नाही, ना त्याचा फोन आला. तिचा खुप निरस झाला.

तिच्या आई बाबांनी तिच्या ओटी भरणी कार्यक्रमात भरपूर खर्च केला, रजिस्टर लग्नाची कसर त्यांनी भरून काढली. सात महिने पूर्ण झाल्याने तिची हालचाल मंदावली. तिला तो सोबत असावा, त्याने तिची विचारपूस करावी असे सारखे वाटे. सासूबाई आपल्या मुलाला नेहमी तिच्या सोबत थांबण्याबद्दल त्याला खडसावत पण तो मनावर घेत नसे. नऊ महिने पूर्ण होताच एक दिवस सकाळीच सात पाऊंड वजनाची गुटगुटीत मुलगी जन्माला आली. खरं तर प्रसादने या वेळी तिच्या सोबत असायला हवं होत पण नेहमीप्रमाणे तो कुठेतरी शहराबाहेर कामासाठी गेला होता. त्यांनी फोनवरून तिचं कौतुक केलं. दोन दिवसांनी तो तिच्या भेटीसाठी आला तेव्हा खुप मोठा बुके घेऊन आला. त्याच्या माणसाने फळांची करंडी आणून ठेवली. सिस्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मिठाई वाटली पण तिच्या डिलिव्हरीच्या वेळी तो हजर नव्हता याच शल्य ती विसरू शकली नाही. त्याने तिचा हात हाती घेत तिची माफी मागीतली. “Mona I am really sorry,I am ready for your punishment. Please try to understand, I was busy and I have no alternative but to attend the meeting.”



affiliate link

ती क्षणभर काहीच बोलली नाही, तिने बेबीला हळूच त्याच्या हाती दिले, “प्रसाद भविष्यात तुला तुझ्या मुलीलाच याचा हिशोब द्यावा लागेल, तिच्या जन्माच्या वेळी तू हजर राहू शकत नव्हता एवढं किती महत्त्वाचे काम तुला होते? आपल्या बायकोच्या जीवन मरणापेक्षा खरच का पैसा एवढा मोठा आहे?” त्याने काहीही सांगीतले तरी तिचे समाधान होणार नव्हते. तो तिच्याकडे पहात मुलीला हळूवार थोपटत राहिला. त्याला त्याची चूक कळत होती पण त्याचे हात कर्तव्याने बांधले गेले होते. त्याने स्वतःचा धिक्कार केला. हळूहळू ती शांत झाली. प्रसाद आता तिच्या बारशाला तरी हजर राहशील ना? मम्मा आणि डॅड खूप रागावलेत, मला प्रॉमिस दे, at any cost You will be there for naming ceremony.” “Yes dear, certainly I will be there. “तो हळू आवाजात म्हणाला. “प्रसाद आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे तू ठरवलेस का?” प्रसाद म्हणाला, “मोना तूच छान नाव ठेव मला काही तुझ्या मुलीसाठी योग्य नाव सुचणार नाही.” ती त्याच्यावर रागावत म्हणाली,”असा कसा रे अरसिक तू, दुसऱ्या बापाने पन्नास नांव सुचवली असती.” “मोना, तुझ्या एवढं सुंदर आणि योग्य नाव मी सुचवू शकेन का? तूच ठरव, तू म्हणशील काकू सारख नाव मला नको, म्हणून म्हणतो.” “मी तीच नाव सानिका ठेवणार आहे, तुला कसं वाटत?” “छान ,सुरेख! मी म्हटलं नव्हतं तूच सुंदर नाव ठेवशील म्हणून.”

प्रसाद तिच्याशी गप्पा मारत असतांना त्याला फोन आला, तो गडबडीत उठून उभा राहिला,”हा सर, थोड्या वेळात निघतो, हो सर, मुलगी झाली. हा सर, थँक्स सर .” तासभर बसून तो निघाला, “मोना मला निघालं पाहिजे बॉस ने बोलावलं आहे,आणि हो आपल्या मुलीला आशिर्वाद द्यायला बॉस विसरला नाही बरं. सानिका बाय बेटा, आय लव्ह यू.” त्याने मुलीचा पापा घेतला. त्याला तातडीने निघावं लागलं. तिला माहीत होतं आता तो पूर्वीचा तिची काळजी घेणारा प्रसाद राहिला नव्हता, पण तीच तर म्हणाली होती, माझी स्वप्न आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा जोडीदार मला पाहिजे. तिचं मन म्हणालं, Mona you were expecting wealth and you have all, that you want, for what you are crying? Wealth and mental peace can not be together.ती खिन्नपणे हसली, होय मला श्रीमंत जोडीदार हवा होता. मीच तो गरीब आणि साधा म्हणून त्याला नकार देणार होते,दैवाने एक हाताने मला संपत्ती दिली आणि दुसऱ्या हाताने माझे सुख हिरावून घेतले.

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar