मन वढाय वढाय भाग 1

मन वढाय वढाय भाग 1

प्रेम हा रोगच असा आहे की तो ज्याला लागतो त्याला ना भूक लागत ना तहान त्याची रात्रच नव्हे तर दिवसही स्वप्न रंजनात जाते. ‘ती’ मला दिसली तर मी हे करीन, ते करीन, ‘तीची’ भेट झाली तर मी असे बोलीन तसे बोलीन, तिचा हात हळूवारपणे हातात घेऊन कुरवाळीन, तिच्या डोळ्यातल्या डोहात माझे प्रतिबिंब पाहिन वगेरे वगेरे. तेव्हा ज्याला हा रोग होतो त्याचा दवा फक्त तिच्याकडे असतो आणि ती तर भाव द्यायला तयार नसते. तिचा पाठलाग करून ती मिळेल याची खात्री नसते, पण, ‘दिल है की मानता नही’ त्यामुळे आराधना सुरू असते. विलासची स्थिती काहिशी तशीच होती. 

विलासला एस एस सी परीक्षेत जेमतेम ५५% गुण मिळूनही, कॉलेजला प्रवेश तर मिळाला. मोठी इमारत, पाहावे तिथे चिवचिवणारे थवे पाहून त्या भारल्या वातावरणात त्याला हायसे वाटले, ग्रामीण भागातील शाळेतून तालुक्यातील किंवा शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंख फुटल्याचे आभास होतो. घरापासून दूर असल्याने कोणाचे नियंत्रण नव्हते. मुलंमुली मस्त बागडत असलेल्या पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू फुटले. ते स्वच्छंदी  वातावरण पाहूनच तो खुश झाला. ना युनिफॉर्मचे बंधन ना कोणता प्रोटोकॉल, ना बँग ना सॅकची सक्ती. सिर्फ एक नोटबुक काफी है।

हळूहळू काही इंग्रजी शब्द तोंडात रुळू लागलेले. Bro, go to hell, I swear, god promise असे अनेक शब्द जिभेवर सहजच येऊ लागले.  पहिल्या तासाला घेतली जाणारी अटेंडन्स फक्त नावापुरती. वर्गात साधारण साठ ते सत्तर विद्यार्थी सर्वच नवे, अनोळखी त्यामुळे तेव्हा तरी सिरियसली स्वतःचीच अटेंडन्स दिली जात होती पण अवघ्या महिन्याभरात हे चित्र पालटले, जेव्हा त्याचे नाव घेताच कोणीतरी “येस सर् ” म्हणाले आणि त्याच्या मागून तो ही एस सर म्हणाला तेव्हा सर त्यालाच “Stand up, go out of class”  ओरडले तेव्हा त्याला समजले, इथे तुमच्या प्रमाणिकपणाची किंमत शून्य. कोण कोणाची प्रेझेंटी देतो त्याची कोणालाही कल्पना नाही.

या भारलेल्या वातावरणात मनमौजी नायक विलास स्वतःच्या मस्तीत फक्त एक वही घेऊन कॉलेजमध्ये जायचा,अर्थात त्या एका वहीत, Bk, OC, Eco, Sp आणि language  हातात हात घालून नांदायच्या.  त्या वहीत तो नक्की काय लिहून घेतो तो संशोधनाचा विषय असावा. डिक्टेशन दिले तर ते सेंटेन्स लिहून होण्यापूर्वी सर पूढले सेंटेन्स सांगायचे, स्पेलिंग तर  महिती नव्हते. त्यामुळे घरी पोचल्यानंतर आपण काय लिहून आणले त्याचा शोध लावण्यात बराच वेळ जायचा.

दोन आठवडे पुस्तके नव्हती त्यामुळे लिहून आणलेले पुन्हा उतरवून घेण्यात वेळ जायचा. यापुढे शक्य तितके निटनेटके लिहून आणण्याचा संकल्प त्याने अनेकदा केला पण दुर्दैवाने तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकलाच नाही. मग कोणीतरी बुक बँकेतून  पुस्तके रेंटवर मिळतात म्हणाले तेव्हा विलासनी पुस्तके घेतली.  त्या त्या विषयाचे इंग्रजीतील पुस्तक पाहीले आणि दोन चार वाक्य जुळवून वाचली तरी फारसे कळे ना. आपण ग्रँज्यूएशन पूर्ण करू शकू की नाही याची शंका येऊ लागली. प्रवेश घेऊन दोन तीन आठवडे लोटल्याने पर्याय नव्हता. अट्टाहासाने त्याने पुस्तके पुन्हा पुन्हा वाचली तेव्हा कुठे  हळूहळू  त्याला अर्थबोध होऊ लागला.या वेगाने पुढील पन्नास वर्षात ग्रँज्युएशन पूर्ण होणे शक्य  नव्हते.

लाँग बूकमध्ये विषयवार परिच्छेद नव्हते त्यामुळे कोणत्या पानावर कुठून कोणता विषय सुरू झाला आणि दुसरे लेक्चर कोणत्या विषयाचे होते त्याचा हिशेब ठेवायला आस्मादिकांना तेव्हा  वेळ नव्हती. जेव्हा वर्ग बंक करायचा असेल तेव्हा ती वही पॅन्टच्या आत घालून वरून शर्ट मोकळा सोडला की विलासराव क्लास बाहेर पडायला मोकळे व्हायचे.

पॅसेजमधून जाताना हळूवार शिळ घालीत जाणे हा त्याचा जूनाच  छंद होता. एक दोन वेळा त्यासाठी त्याला काँलेजच्या टिचर्स जवळून  ओरडून घ्यावे लागले होते. ती शीळ ऐकून एखादी फटाकडी पटली तर पटली ही भाबडी आशा, पण एवढ्या सहज थोडी मुली पटतात. त्यासाठी स्वतःला सिध्द करावे लागते. प्रेझेन्स सेन्स असावा लागतो,  एखाद्या विषयावर कमांड असावी लागते, स्पोर्टस ऍक्टिव्हिटीत किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीत नाव असावे लागते, किमान स्वतःची बाईक, मोटारसायकल असावी लागते, भरलेल पाकीट असावे लागते तेव्हा कुठे एखादे फुलपाखरू हाती लागले तर लागले.

आस्मादिकांच्या खिशात त्या वेळी फारच तर दोन पाच रूपये असण्याची शक्यता. पण हौसला बुलंद था। एका बोटावर वही गरगर फिरवण्यात तो तरबेज होता. त्यामुळे एखादे गाणे शिळेवर गुणगुणत वही सुदर्शन चक्रासारखी फिरवत तो करमणूक करत असे. आपण मोठे कलाकार असल्याचा आव तो आणत असे.

आठ आण्यात फार तर एक वडा प्लेट किंवा मिसळ एवढेच शक्य पण कँंटीनमध्ये एखादे टेबल अडवून तिथून मुलींना निरखून पाहण्यासाठी पैसे थोडेच लागतात. अर्थात लेक्चर सुरू असताना कॅन्टीनमध्ये बसून गप्पांची मैफल जमवणारी मुले असतात तशा  मुली ही टाईम पास करण्यासाठी आलेल्या असतात. त्यामुळे तो शौक फर्मावायला कोणाची परवानगी लागत नसे. अगदी वर्गात लेक्चर सुरू असतांना ही अटेंडंस झाले की मुल सराची पाठ होताच  सहजच वर्गाबाहेर निसटत. अशी दोन पाच टाळकी दोन तीन ग्रुप करून कँटीनमध्ये बसलेली सहजच दिसत. विलास मित्रांनी फर्माईश केली की आनंद, जंजीर पासून आराधनातले राजेशखन्ना स्टाईल  एक दोन डायलॉग सहज मारून जाई. एखादी फटाकडी त्यावर हसायची तेवढीच 

हसी मजाक मध्ये दोन महिने कुठे गेले समजले नाही. आणि एक दिवस सकाळीच तुरीले सर म्हणाले आज युनिट टेस्ट आहे. मी बोर्डावर क्वेश्चन लिहितो. The test is for 25 marks, and your time starts now. एका एका बाकावर दोन दोन फंटर, एखादा स्टुडंट मुद्दाम मोठ्या आवाजात बोलून उत्तर लिहायचा. But Turile has no business observing who is that guy?

Bell rang and Turile asked the first bench students in each row to collect the answer sheet. “Hurry up, within the next two minutes I want all the answer sheets. If I leave class  I will not accept your answer book.” Turile growled .

तरीही चार सहा कार्टी एकमेकाच पाहून लिहीत होती. तुरले सरांनी answer sheet घेतले आणि क्लास बाहेर पडले. चार पाच मुले त्यांच्या मागे आपल्या आन्सरशीट देण्यासाठी धावली but alas , तुरीले सरांच्या पाठून धावणाऱ्या मुलांमध्ये विलासही होता. डोळे भरून आले. तुरीले स्टाफ रूममध्ये पोचले,पोर पाठून धावली. “सर प्लीज ,पुन्हा नाही चूक होणार. प्लीज सर.”

तुरीले पाठी वळून विद्यार्थ्यांवर ओरडले. “Go away, I warned you in the beginning but you didn’t listen. now nothing can be done.”  You will remember the scene till the end of your college days.

विलासराव मागे फिरले, “च्या आयचा घो, मादरचोद, यार  जरा सुध्दा दया नाही.” तो बोलता बोलताच सिरसाट मॅडम बाजूने गेल्या, त्याच्या सुदैवाने त्याना नीट ऐकू गेले नाही.

First Term देई पर्यंत ‘Tutorials’ हा काय. प्रकार असतो. त्याद्दल त्याला काही माहितीच नव्हते याचे कारण नोटिसबोर्डवरती  लावलेली सूचना वाचायची असते हे त्याच्या गावीच नव्हते. तो लेक्चर सुरू होण्यापूर्वी कधीच क्लासरूममध्ये येत नव्हता, लेक्चर सुटले की कधी एकदा जिमखाना गाठतो किंवा कॅन्टीन गाठतो असे वाटे, त्यामुळे नोटीस बोर्ड पाहण्याचा संबंध फारसा आलाच नव्हता. .

Tutorial submission करतांना सरांनी पेपर गोळा केले, तेव्हा याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. त्यांनी सिरियसली वहितून लिहिलेली  दोन पान टरकावली, त्यावर नाव आणि रोल नंबर लिहून ती  सबमिट केली. अर्थात सरांनी त्याची भजी केली की लोणचं घातल त्यांनाच माहिती.

त्या दिवसापासून तो लेक्चर सिरियसली अटेंड करू लागला, विलासराव लेक्चर अटेंड करू लागले पण चिकनी मुलगी दिसली की त्याचा सीक्थ सेन्स जागा होई, तिला  काहीतरी टाँन्ट मारल्या शिवाय, त्याचा दिवस चांगला जात  नसे. मग केसावरून, कपड्याच्या स्टाईलवरून, मेकअप अधिक झाला असल्यास त्याच्यावरून,  काहीही करून  तो अगदी सहज पण नेमके बोलून जाई. पोरं फिदीफिदी हसत. त्याला आपण स्मार्ट आहोत असा उगाचच भास होई. 

विलास नियमित लेक्चर अटेंड करू लागल्याने जेमतेम पास होण्यापुरते मार्कस्  मिळू लागले. कॉलेजला  दांडी झाली  तर  कोणाची तरी वही घेऊन ते उतरवून घेतले की मित्रांसोबत बसून समजून घेई. . Exam आली की रात्र रात्र जागून कॉपी करून completion करायचे आणि सबमिशन करायचे अशी विचित्र पद्धत. घरी विचारणारे कोणी नव्हते. वडील आपला मुलगा कॉलेजमध्ये जातो ह्यातच खुश. आपल्या लहान भावंडाशी तो दोन चार वाक्य इंग्रजीत बोलला की आईचे समाधान होई. ती फारशी शिकलेली नसावी.

बारावी मात्र त्याने seriously मनावर घेतली. प्रत्येक लेक्चर तो अटेंड करू लागला. त्याचे writing सुंदर होते. ती बोर्ड परीक्षा तो   ५७% ने पास झाला. हळूहळू कॉन्फिडन्स वाढला. मित्रां ऐवजी मैत्रीणी जवळच्या वाटू लागल्या. लवकरच अशाच एका फटाकडीशी त्याची ओळख झाली. दिसायला स्मार्ट नसली तर मॉडर्न लुक यावा म्हणून हाय हिल, लिपस्टिक, स्लीव लेस अशा अवतारात ती दिसे. विलासने तिच्याशी मैत्री केली.  कॉलेजमध्ये येता जाता तिची सोबत करू लागला.थोडे दिवस मैत्री टिकली. लवकरच तिच्या लक्षात आले की मित्र लुख्खा आहे. तो तिच्या मागे मागे फिरायचा, मित्रांना रचून गोष्टी सांगायचा, ती मला हे म्हणाली, ते म्हणाली, आम्ही फिरायला गेलो होतो. लवकरच पितळ उघड पडलं जेव्हा ती दुसऱ्या फ्रेंड बरोबर दिसू लागली. मुलींना फिरायला नेणारा, तिच्या गिफ्टसाठी खर्च करू शकणारा मित्र हवा असतो. 

सिनिअर फर्स्ट इयर ला असताना त्याला विषयातले काठीण्य कळू लागले. चमकीशगीरी आपोआप कमी झाली. आधी शिक्षक थोडे तरी डिक्टेशन देत होते. इथे सरानी वर्गात एंट्री केली की दोन मिनीटात random attendance  होत असे, मग लगेचच लेक्चर सुरू होई. अघळपघळ बोलणे मुळीच नसे.

बोर्डावर कोणता टॉपिक सुरू करत आहेत आणि त्याच्या अंतर्गत कोणत्या टर्म सांगणार तितकेच लीहिले जाई. बाकी नॉनस्टॉप चटर पटर सुरू असे, थोड्या थोड्या वेळाने Am i right?  got my point, Am I correct?  एखाद्या विद्यार्थ्यांचे लक्ष  नाही असे वाटले तर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा  क्वेश्चन विचारीत किंवा डस्टर फेकून मारत. त्यांनी आन्सर कंपलीट करण्यापूर्वी, “Yes,you are absolutely correct.”  अस म्हणत पूढे एक्सप्लेन करू लागत. विलास  ला कळेना यांच्या पाठीमागे कोणता  वाघ लागला आहे. एखादा विद्यार्थी प्रश्न विचारत असे, मग सर त्याला उलट प्रश्न विचारत तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय हे पाहताच,सर पुढल स्वतः उत्तर  सांगून मोकळे होत. “Good ,you understand my point, you are a genius,if you listen to me calmly you will get my point.” त्यांना वेळेची मर्यादा असावी. 

विलासच्या लक्षात आले की या वर्षी सबजेक्ट थोडे डिफिकल्ट  होत चालले होते. काही टर्म वाचून कळत नव्हत्या कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. वेळेत लक्ष दिले नाही तर वर्ष वाया जाण्याची शक्यता होती. परिस्थिती अवघड होती. 

तो आईला म्हणाला, “आई या वर्षी ट्युशन लावावी लागेल, विषय कठीण आहेत. शिक्षक एवढ्या वेगात शिकवतात की मला  काही कळत नाही.” आई म्हणाली, ” आपली परिस्थिती तुला माहिती आहे. तुम्हा चौघांचा  खर्च भागवण बाबांच्या पगारात कठीण आहे. ट्युशन लावायची असेल तर बाबांच्या कानावर घाल. किती पैसे दरमहा द्यावे लागतील ते ही विचार, आपल्याला परवडले पाहिजे. तुला माहिती आहे तुम्ही चार भावंडे आणि आम्ही दोघे,यांचा तुटपुंजा पगार ,कसे जमणार?” 

त्याने त्याच रात्री वडीलांना भितभितच ट्युशन संबंधीत विचारले, “बाबा,  गेले दोन वर्ष मी ट्युशन शिवाय अभ्यास केला, या वर्षी सिलेबस थोडा जड आहे, वर्गात शिक्षक जे शिकवतात ते  पुन्हा एक्सप्लेन नाही करत. त्यामुळे मला नीट कळत नाही, मी क्लास लाऊ का? ” वडील म्हणाले, “इतर मुलांना समजते की नाही?  की कुणालाच समजत नाही? तुमचे शिक्षक शिकवतात तेव्हा तुझे लक्ष असते का? वर्गात नीट लक्ष दिले तर नक्कीच समजेल.  आपली परिस्थिती समजून घे. एखाद्या हुशार मुलाची मदत घे. विनंती कर,  कोणीतरी तुला नक्की मदत करेल.” 

गेले पंधरा दिवस , विलास सिरियसली  वर्गातील कोणी मदत करू शकेल का याचा शोध घेत होता. फारच थोडे विद्यार्थी लेक्चर  गांभीर्याने घेत.  एक  सिनिअर चा एक विद्यार्थी म्हणाला, “आपल्या कॉलेजची SY ची एक मुलगी क्लास घेते ती ब्रिलीयंट आहे. तिची फी तुला परवडेल. तू तिला विचिरून बघ.” “अरे यार ,ती एसवाय ला आणि मी एफवायला तीला कस काय जमणार? गप्पा मारायला जायचे आहे का? मला माझी डिफिकल्टी सांगू शकेल यासाठी ट्युशन हवी.”

“विलास यार तू शंका लय घेतो, अरे तिच्याकडे already आठ नऊ  स्टूडंट जातात, त्यांना समजले नसते तर ते गेले असते का? नाहीतरी तू शोध घेत आहेस ,तिचे शिकवणे बरोबर नाही वाटले तर क्लास सोडून दे. ती फक्त दहा स्टुडंट घेणार आहे,तिच्या खोलीत तेवढीच जागा आहे. उशीरा गेलास तर हात चोळत बसशील.” शेवटी विलास मनाशी विचार केला,जाऊन तर पाहू, कसे शिकवते पाहू,  पटले तर थांबायच,आपल्याला जबरदस्ती थोडीच आहे. 

त्याच दिवशी त्याने वडीलांना सांगीतले, “बाबा, आमच्या वर्गातील बरीच मुल एका खाजगी क्लासला जातात. वर्गात दोन तीन मुलं हुशार आहेत पण ती आखडू आहेत. त्यांनी आपल्याला वेळ नाही सांगितले आहे.पण एक छोटा घरगुती क्लास आहे फी फार नसेल  मी जाऊ का?”

मुलाची अडचण पाहून त्यांचा नाईलाज झाला. ते म्हणाले, “कुणी घरगुती घेत असेल तर ठिक, मला खाजगी क्लास ची फी भरणे शक्य नाही.माझ्या आवाक्यात असेल तरच परवानगी मिळेल. फी किती ते आधी विचार. आपल्याला परवडली पाहिजे.  सांग मला मी फी ची काहीतरी व्यवस्था करतो. मात्र तुला पास व्हावे लागेल. मी भरलेली  फी फुकट गेलेली चालणार नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *