वाट पाहतो

वाट पाहतो

पावसाचं वय किती असावं? आम्ही कधी मोजलं नाही
धावत धावत पडतांना तो थकलाय का, विचारलं नाही

भात्यातुन बाण बाहेर काढला की, शरसंधान करावं लागतं
तो अंदमानातुन सुटला की, त्याला उत्तर टोक गाठावं लागतं

कधी लवकर कधी उशीर, त्याच पिच गाठायला तो अधीर
वारं सुटताच होतो आरूढ, तो शूर योद्धा देतो आम्हाला धीर

केरळात चहासाठी थांबला, तरी आमच्या पोटात येतो गोळा
त्याच आगमन म्हणजे बच्चे कंपनी ते वृद्ध, एक सोहळा

शेतकरी, नागरिक, सरकार सगळेच त्याच्यासाठी आतुर
वेळेत नाही पडला तर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर

त्यांने कधी किती पडावं? हे तुमच्या माझ्या नाही हातात
बरेच झाले, तुम्ही केला असता त्याचा माकड, खुळ्या नादात

सचिन, माही, विराट यांच्यावर ह्यांच्या अपेक्षांच होतं ओझं
त्यांनी मैदानात उतरताच ठोकावे शतक, हेच स्वप्न तुमचं

शून्यावर परतले तर शापित गंधर्व, होतात अपयशाचे धनी
हेच ओझं घेऊन ते पाय रोवून खेळतात, फक्त खेळ मनी

तुमचा उत्साह पाहून, त्यांना येत भरतं, तुमचं प्रेम त्यांना पुरतं
पावसाचं आणि मुलांचं अगदी अस्सच असतं प्रेमळ नातं

वीज लख्ख हसत नाचते आणि तो ढोल बडवत खाली येतो
येताच मुलांना आलिंगन देत त्यांच्या आनंदात सामील होतो

धावा काढतांना पाऊस आणि धोनी आऊट होताच अपशकुन होतो
सगळीकडे शांतता, जणू जगण्याचा आत्माच हरवून जातो

म्हणून सगळी पोर पावसाला आवर्जून साकडं घालतात
आता खोटा पैसा नव्हे तर उघड्या डोंगरावर झाडं लावतात

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar